डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जे. कृष्णमूर्ति : विध्वंसाला समर्थ आव्हान रचनेचे

पेरलेले बी आवाजत नाही, खळाळत नाही. मौन, निद्रिस्त वाटते. परंतु सचेत तर असते. एका भल्या पहाटे अंकूरलेले नाविन्य ठरते! जे. कृष्णमूर्ति आयुष्यभर असे बीजारोपण करीत राहिले. विध्वंसक शक्तींना अज्ञात, समर्थ आव्हाने देणाऱ्या कृष्णमूर्तीच्या स्मृतिदिन प्रसंगी त्यांची आठवण. 'आत बाहेरच्या' लावण्याची अनुपम जुगलबंदी फुललेल्या त्यांच्या चेहऱ्यासारख्याच व्यक्तित्वाचे पारदर्शी दर्शन.

माघ शुद्ध अष्टमी शके 1907 ला आकाशवाणीवर जे. कृष्णमूर्तींचे निधन झाल्याचे ऐकले. आदल्याच महिन्यात ते भारतात येऊन गेले होते. ते नव्वद वर्षांचे होते. कॅलिफोर्निया येथे त्यांनी देह ठेवला. ते गेले पण गेली कित्येक वर्षे ते 'राहत' आले. दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात त्यांची मुंबईस प्रवचने व्हायची. गेले काही दिवस त्यांच्या प्रवचनाच्या ध्वनिफिती ऐकवण्याचा कार्यक्रमही होत असे. फार पूर्वी त्यांची पुण्यास बैठक व्हायची ती जुन्या टिळक स्मारक मंदिरात. त्या वेळेस सुरुवातीला थोडे प्रास्ताविक आणि नंतर प्रश्नोत्तरे असे त्याचे स्वरूप असायचे. बऱ्याच वेळा कै. रावसाहेब पटवर्धन त्यात सहभागी असत. पुढे कृष्णजींनी आपल्या निरूपणाचे स्वरूप हेच आपल्या आविष्काराचे मुख्य अंग ठेवले. त्यांचा असा एक श्रोतृवर्ग अस्तित्वात आला होता. या श्रोतृवर्गात समाजातल्या सर्व पातळीवरचे स्वतंत्र वृत्तीचे सुविद्य श्रोते असायचे. पण या श्रोत्यांत नव्या पिढीच्या श्रोत्यांच्या भरणा फारसा नव्हता. त्यांचे श्रोते आणि ते म्हातारे झाले, होत गेले पण त्यांची वाणी मात्र टवटवीत राहिली, अक्षय्य राहिली. जिव्हा जी स्वच्छ करते ती वाणी याचा प्रत्यय त्यांच्या शब्दाशब्दांतून जागायचा. नव्वद वर्षांची मजल गाठल्यानंतर त्यांनी या इहलोकीचा परदेशात 'निरोप' घेतला. परंतु त्यांच्याबाबत 'परदेश' म्हणणे चूक होय. कारण त्यांनी अगदी यथार्थतेने जगाचा जागतिक आणि विश्वमानव म्हणता यावे असेच ते व्यक्तिमत्त्व सदा प्रकाशमान राहिले. 

मूळचे आंध्र प्रदेशातील, मदनपल्ली येथे मे 1895 मधे जन्मलेले जिदू कृष्णमूर्ति मद्रासातील अड्यार येथे त्यांच्या प्रायोजित आयुष्याचे संस्कार घेते झाले ते इ. स. 1909 पासून. आईवडिलांचे आठवे मूल म्हणून 'कृष्ण' झालेले हे पोर. बालपणापासून निसर्गवेडे! अथांग निळे आकाश, हरित विशाल भूमी, पर्वतराजी आणि तिच्या अंगावर लीलया सळसळणारे वृक्ष यांची ओढ त्यांना इतकी अनिवार होती की, त्यांच्यापुढे बंदिस्त शाळा व पुस्तकी शिक्षण त्यांना फिके व गौण वाटायचे. बालपणापासूनच या कृष्णाचे पृथगात्म व्यक्तिमत्त्व आणि वेगळी आभा कुणाचेही लक्ष खिळवून ठेवणारी होती. कृष्णजी अतिशय सुंदर होते. त्यांच्या चेहऱ्यावर रवीन्द्रनाथ ठाकुरांसारखी 'आतबाहेरच्या' लावण्याची अनुपम जुगलबंदी फुललेली जाणवे. थिऑसॉफिकल सोसायटीच्या लेडबिटर यांच्या नजरेस हे पोर आले आणि त्यांना जाणले की, हाच भविष्यकाळाला ज्याची आवश्यकता आहे तो प्रेषित होय. असे होण्याचा अवकाश की, या कृष्णाला अ‍ॅनीबेझंट बाईंनी ताब्यात घेतला आणि त्यांच्या संस्कारांचा आरंभ झाला.

आपले असाधारण पोर असे हातचे दुसऱ्यांच्या हातात गेल्याचे पाहून आईवडील अस्वस्थ झाले. त्यांनी त्याचा ताबा मिळवण्याकरता कोर्टाकडे धाव घेतली. दीर्घसूत्री कोर्टबाजीनंतर कोर्टाने थिऑसॉफिकल सोसायटीच्या व्यक्तींना मोकळे केले पण कृष्णा हा कोर्टाचा ‘वॉर्ड' म्हणून घोषित झाला. बेझंट बाईंनी मग हे प्रकरण प्रीव्ही कौन्सिलकडे नेले व कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली. बेझंट- बाईच्या या प्रयत्नांना यश आले. कृष्णमूर्तींचा कलही बेझंटबाई आणि थिऑसॉफिकल सोसायटीकडे होता. अशा रितीने कृष्णजी आपल्या आईवडिलांपासून अलग झाले. नियतीच्या दैवी कौन्सिलने कृष्णमूर्तीचा मार्ग आईवडिलांच्या सामान्य मुलासारखा राहू दिला नाही. 

कृष्णमूर्तीचे शिक्षण आणि वाढ ही थिऑसॉफिकल सोसायटीचा भावी वारस म्हणूनच झाली. परदेशातील वास्तव्य यापोटीच होते. एवढेच नव्हे तर परिणामतः जी प्रचंड इस्टेट त्यांना मिळाली, तिचाही त्यांनी त्याग केला. या इस्टेटीत अठराव्या शतकातील वास्तुशिल्पाचा अत्युत्तम नमुना ठरावा असा किल्ला आणि अदमासे पांचशे एकरांची वूडलँडची येमेनमधील (हॉलंड) जमीन होती. ती सारी बरखास्त केली कारण चौतीस वर्षांचे प्रगल्भ कृष्णमूर्ती असे तयार झाले होते की त्यांच्यामध्ये सत्त्व आणि स्वत्व यांच्या संगमातून एक नवे जीवननिष्ठ तत्त्वज्ञान रूपास आले होते. या तत्त्वज्ञानात मानव आणि मानव्याकरता संघ, संघटना, धर्म परंपरा, रूढी, राजकीय व सामाजिक बांधिलकीची आवश्यकता नव्हती. जीवनाशी प्रतारणा करणारे आणि प्रत्यक्ष जगण्यापासून पलायनाचे ते प्रकार होते व आहेत. इतिहासात धर्म, पंथ, महाराज, प्रेषित, मुनी पक्ष, पुढारी, राजे महाराजे, क्रांतिकारक यांच्या कृतिउक्तीने माणसाचे पाऊल पुढे पडलेले नाही. जे पडले ते चार पावले पुढे तर पाच मागे, असेच. प्रचंड रचना आणि त्यापेक्षा जास्त अक्राळविक्राळ विध्वंसानेच हा इतिहास बनला आणि मानवी जगणे नासवत राहिला. हे सारे झटकले तरच मनुष्याचा विकास आरपार साधेल. कारण जीवनाचे रहस्य सत्यशोध नात आहे. सत्यशोधन हे तर अंत नसलेले पाथेय आहे, त्याची कास धरायची तर प्रत्येकानेच त्याचा शोध घेतला पाहिजे, अथक व अखंडपणे. तोही धर्मकांड, धर्म, कर्मकांड व कोणत्याही इझमच्या कुबड्या न घेता.

‘तू' आणि 'मी’ आणि या दोघांचे नाते, हेच जग आहे. यांतील एकाला कमी करा, शून्यच हाती लागते तेव्हा या 'तू' आणि 'मी' ने बसून प्रत्येक बाबीचा निखळ आणि स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. त्याला सतत विवेकाची जोड दिली पाहिजे. मनावर, प्रज्ञवर, विचारावर कसलाही थर जमता कामा नये. कसलेही वजन असता कामा नये. यत्किंचितही दबावाला वाव नसावा. जगणे सहज असले तरच सुंदर असते, बनते. असे सहजसुंदर जगणे प्रत्येकाने अनुभवावे, यास्तव ते तळमळीने त्रिकाल संचार करीत बोलत राहिले.

माणूस स्वतःपासून पळत असतो. जेव्हा तो पळत नाही, तेव्हा सदा बाहेर पाहणारी त्यांची इंद्रिये त्याच्या- पासून दूरदूर धावत असतात. माणसाला स्वतःजवळ राहता आले पाहिजे. 'आपुला संवाद आपणाशी' करता आला पाहिजे. असे झाले म्हणजे आपली म्हणून जी जागा असते ती चुकत नाही. एकदा ही जागा सापडल्यावर आत' पाहता आले पाहिजे. 'आत’ पाहता पाहता अंतर स्वच्छ स्वच्छ निरामय होत गेले. तर भोवतालच्या व आतील सृष्टीचे उमटत जाणारे मनोरम प्रतिबिंब प्रतिसृष्टीची नांदी ठरते. असा सृजनाचा उद्भव होतो आणि त्याचीच परिणती सृजनशील अस्मितेत होते. कृष्णजींच्या निरूपणातून हेच ओज तेज झरत, झंकारत राहिल्याचा पडताळा मजसारखाच अनेकांना मिळाला. 

कृष्णजी 1948 साली दहा वर्षानंतर जेव्हा भारतात परतले, तेव्हा देशाची फाळणी आणि महात्मा गांधींची हत्या यांचे दारुण, करुण विपरित पाहून त्यांना अतीव वेदना झाल्या, ते व्याकुळ बनले. नीतिमूल्यांची लाजिरवाणी घसरण त्यांना विकल करून राहिली. मानवाच्या भवितव्याबद्दल ते संचित झाले त्यानंतर ते नियमाने दरवर्षी भारतभेटीस येत राहिले, प्रवचने देत राहिले. भारतातील सर्व प्रांतांतून 'जिज्ञासू ही प्रवचने ऐकावयास येत. त्यांची पुस्तके निघाली. कृष्णजी फाउन्डेशनतर्फे त्यांच्या विचाराचा प्रसार होत राहिला, प्रचार नव्हे. कारण कृष्णजी प्रचाराविरुद्ध होते. त्यांच्या मते मनःपूतता महत्त्वाची होती. त्यात स्वच्छ स्वीकाराचे व पुढाकाराचे सूत्र होते. तेही स्वतः ठरवून, पटले तरच! 

जन्मभर सुविद्य श्रोत्यांपुढे जगात त्यांनी हेच जागरण वर्तमान ठेवले. ना गुरू, ना शिष्य, ना अनुयायी हा त्यांचा व्रती घोष होता. जमिनीत पेरले गेलेले बी आवाजत नाही, खळाळत नाही. ते मौन व निद्रिस्त वाटते, पण सचेत असते. जमिनीतील ओल आणि ऊब घेत ते एका भल्या पहाटे अंकुरलेले नावीन्य दिसते. जे. कृष्णमूर्ती आयुष्यभर असे बीजारोपण करत राहिले. कित्येकांना त्यांनी या शैलीनेच आवरले, सावरले आणि तारण प्रेरण दिले. हे सगळे अज्ञात भासण्यासारखे होते - म्हणून अस्तित्वातच नव्हते असे कसे म्हणता येईल? नक्कीच ते जाहिराबाजीच्या युगाला मागे टाकत अंकुरत राहिले आहे. आज जगात जीवनाच्या सर्व विरोधाला आणि भयंकर विध्वंसक शक्तीला न जुमानता जी समर्थ आव्हाने काही थोडया व मोजक्या माणसांकडून दिली जात आहेत, त्यांत जे. कृष्णमूर्तिसारख्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे निराळे सांगावयास नको.

Tags: चरित्र जे कृष्णमूर्ति सामाजिक कार्यकर्ता Biography J. Krishnamurthi #Social reformer weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके