डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हे देशसेवक की स्वार्थी संधिसाधू?

यद्यपिशुद्धं लोकविरुद्धं नाचरणीयं नाकरणीयं। ही म्हण हजारो वर्षे रूढ आहे. पण या रूढीविरुद्ध बंड ज्यांनी केले त्यात शारीरिक, मानसिक यातनाच नव्हे तर उभे आयुष्य वरबाद करून कोटि कोटीतील एखाद्याच व्यक्तीने हे व्रत स्वीकारले म्हणून समाजात सुधारणा होत गेल्या हे आपण आजही अनुभवतो आहोत ना?

‘खैरनार शासनकर्ते आणि तारकुंडे’ या लेखामध्ये आपले विचार वाचण्यात आले आणि मनात प्रतिक्रिया उमटल्या त्यांवर प्रबोधन होणे आवश्यक वाटते.

‘परंतु ज्या शासनाचे ते घटक आहेत त्या शासनातील काही व्यक्तींच्या विरुद्ध त्यांना उघड संघर्ष करावयाचा असल्यास सेवा नियमांच्या चौकटीत राहून तो करता येणार नाही. 'हे आपले विधान तार्किक दृष्ट्या बरोबर असल्यानेच, शासकीय गरजू सेवक, अन्न, वस्त्र, निवारा देणाऱ्या, नोकरीपासून वंचित होणे स्वीकारत नाही. म्हणूनच तो (सेवक) उघड्या डोळ्यांनी चाललेला भ्रष्टाचार चूप राहून सहन करतो व पर्यायाने थोड्या प्रमाणात तोही भ्रष्टाचारात भागीदार होणे स्वीकारतो. असे घडत आलेले आहे हे आपण पदोपदी अनुभवतही असतो. स्वतंत्र नागरिक असूनही आपण गप्प राहून काही प्रमाणात, त्या भ्रष्ट आचरणाचे अप्रत्यक्षपणे साहाय्यकही बनतो. हा झाला व्यवहार जिणं जगण्याचा आणि ते सारे जगतातही.

यद्यपिशुद्धं लोकविरुद्धं नाचरणीयं नाकरणीयं। ही म्हण हजारो वर्षे रूढ आहे. पण या रूढीविरुद्ध बंड ज्यांनी केले त्यात शारीरिक, मानसिक यातनाच नव्हे तर उभे आयुष्य वरबाद करून कोटि कोटीतील एखाद्याच व्यक्तीने हे व्रत स्वीकारले म्हणून समाजात सुधारणा होत गेल्या हे आपण आजही अनुभवतो आहोत ना?

महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांनी त्या वेळवच्या लोकरूढीविरुद्ध बंड पुकारले म्हणूनच आजवरच्या ठळक समाजसुधारणा घडल्या आहेत. ब्रिटिशांच्या राजवटीतही शासन विरुद्ध बंड करणारे सावकार, भगतसिंग, राजगुरु यांसारखे बंडखोर प्राणांवर उदार झाले, तेही रूढ शासनाविरुद्ध, लोक- कायद्याविरुद्ध वर्तन करूनच ना! 

आज आपण स्वतंत्र आहोत. शासन लोकांनी (देशवासीयांनी) निर्माण केले. लोकांनीच आपले प्रतिनिधी निवडून दिले. त्यांना लोकांनीच लोकशाहीनेच-उच्च पदावर विराजमान केले. त्याच वेळी त्या त्या उच्च पदस्थांवर लोकसेवा करण्याबाबत अलिखित नियम अस्तित्वात आलेच व, त्याची क्षिती बाळगणे हा नियम नव्हे का? 

खैरनार जसे शासकीय सेवक आहेत तद्वत मंत्रीही शासन अस्तित्वात आणणाऱ्या जनतेचे सेवक आहेत. येथे सेवक लहान-मोठा हा भेद व्हावयास नको आहे. वास्तविक मुख्यमंत्र्यांसारख्या महनीय व्यक्तीने खैरनारांसारख्या जिवावर उदार होणाऱ्या एका त्यामानाने गौण सेवकास बोलावून वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीसमोर, त्यांना जे काही निवेदन द्यायचे आहे त्यावावत अभय द्यावयास हवे होते. पण एक ज्येष्ठ सेवक, त्याच्यापेक्षा अधिक ज्येष्ठ म्हणजे प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून अभय मागतात आणि चक्क आत्मसंतुष्ट होऊन रीलॅक्स होतात. हे सारे पक्षीय राजकारण झाले. यात लोकसेवेच्या व्रताचा धादांत अवमान म्हणूनच भ्रष्टाचार झाला आहे. हाच भ्रष्टाचार सूर्यासारखा तेजस्वी आहे. आमच्यासारख्या सर्वसाधारण जनतेस मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केला की नाही हे मुळीच माहिती नाही. तद्वत खैरनारांसारखी 90 कोटींतील एखादी व्यक्ती जिवावर उदार होऊन जे धारिष्ट्य दाखवीत आहे, तिच्याकडे पुरावे आहेत की नाहीत हेही आम्हांस माहिती नाही.

आम्हांस एकच चमत्कार दिसतो तो हा की आम्ही सारे भ्रष्टाचारात ओढलो जात असता गप्प बसून देशाशी बेइमानीही करीत असतो, एक खैरनार निर्माण झाला आहे त्याला निवेदन करण्यास संधी व अभय देण्याचे लोकशाहीतील पवित्र कर्तव्य म्हणून मुख्यमंत्र्यांनी वाव न देणे ही त्यांची भ्रष्टाचारी कृती वाटते.

निवडणुकीत मतदान मागण्यास जाणारे हे देशसेवक, भ्रष्टाचाराचा आरोप होत असता जनतेसमोर जाणे का नाकारतात! ते धैर्य का दाखवीत नाहीत. उलट अभय मागायला दिल्लीत का जातात; व अभय मिळवून आत्मसंतुष्ट होऊन का रिलॅक्स होतात. आम्हांस अन्य कोणता नव्हे, पण हाच भ्रष्टाचार वाटतो उठून दिसणारा.

म्हणून त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी खैरनारांना निलंबित करणे कितीही शुद्ध (योग्य) असले तरी ती शुद्धता नोकरी व कातडी बचाऊ वाटते. त्यांसमोर आता 'खैर' नाही असा शड्डू ठोकून उभे राहिलेले खैरनार राष्ट्रपतीपेक्षाही मोठे वाटतात. आज जनता लहानसहान भ्रष्टाचारांत भरडून निघत आहे. तिचा आवाज खैरनार यांनी सारी बंधने जर तोडली नाहीत तर देश हादरून कसा सोडणार! त्यांनी स्वीकारलेले धोरण हीच कृतिशील 'साधना' होय. अंशमात्र का होईना भ्रष्टाचार कमी करण्याला तीच साधना कारणीभूत होणार आहे. खैरनारांच्या निमित्ताने एक टक्का भ्रष्टाचार जरी कमी झाला तरी त्यांचा जन्म कारणी लागला असेच सारे जग म्हणेल.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके