डिजिटल अर्काईव्ह

जनतारूपी सामान्य माणसांच्या दारिद्र्याच्या प्रश्नाबरोबर त्यांच्या मनात रूढींनी व नव्या बाजारी जीवनातल्या भ्रष्टाचारांनी साचलेली विषे काढण्याचा प्रयत्न डाव्या पक्षांनी करायला नको का? पण गेल्या काही दशकांत हे काम झालेले नाही; कारण या विषांकडे डाव्यांनी पुरेसे लक्षच दिले नाही. लक्ष का दिले नाही, तर जनता म्हणजे डोळस, निर्भय व क्रांतिसन्मुख लोकसमूह असा एक भ्रम डाव्या पक्षांनी करून घेतला आहे.

डावे पक्ष म्हणजे जनतेला अन्न, वस्त्र, निवारा आणि संस्कृती मिळावी म्हणून झगडणारे पक्ष आहे ती व्यवस्था, म्हणजेच जनतेचे दारिद्र्य व सांस्कृतिक आंधळेपणा टिकून राहावा म्हणणारे ते उजवे पक्ष. उजव्या डाव्यांचा संघर्ष साऱ्या देशात चालू आहे. तो संपणार नाही; निदान विषमता, बेकारी, वंशद्वेष, महायुद्धाची तयारी, हे सारे चालू आहे तोवर संघर्ष चालणारच.

या संघर्षात जय कोणाला मिळेल? या प्रश्नाचे उत्तर कोणी दिलेले नाही, व कोणी देऊ शकणार नाही. माणसांची मने जिंकू शकतील ते यशस्वी होतील. कारण, हा संघर्ष केवळ शस्त्रांचा नाही. मनांचा, विचारांचा आणि मग वेळ आलीच तर शस्त्रांचा, हा संघर्ष आहे. पण शस्त्रांआधी हा भावनांचा संघर्ष आहे. जनता डाव्यांच्या बाजूला फारच झपाट्याने आली तर शस्त्रांची वेळ येणारही नाही. पण यात दिरंगाई झाली. तर मात्र उजवे पक्ष निकरावर येऊन शस्त्र' उचलतील. डाव्यांच्या सरशीने ज्यांची मत्ता व सत्ता धोक्यात येऊ शकेल असे लोक त्या पक्षांत किंवा त्या पक्षांच्या मागे आहेत. आजवर त्यांनी जमा केले ते हिंसेने, व राखलेही हिंसेने. आपले आसन, आपली सत्ता, व मत्ता ते शस्त्रानेच राखू शकतील. पण समजा, डाव्या पक्षांनी माणसांची मने खंबीर केली, समजुतीने निर्भय केली, तर मग संघर्ष फार अहिंसक होईल. मने खंबीर झाली तर मतदानाने सारे जग बदलेल, व जनतेचे दारिद्र्य संपेल. युद्धाची दहशत नाहीशी होईल. नव्या इतिहासाचे पान उलटेल.  दास्यत्वातून मुक्त झालेली मानव जात एका नव्या माणुसकीने जगण्याच्या युगात प्रवेश करील. एक जुने स्वप्न व आजच्या मानवांची एकमेव जागती आकांक्षा पुरी होईल. नवे प्रश्न येतील, पण साचलेल्या जुन्या प्रश्नांना पुरेसे उत्तर मिळेल; तुमच्या-आमच्या जीवनात ते उत्तर स्थिर होईल. हे सारे होईल का? डावे पक्ष माणसांची मने जिंकून, त्यांना निर्भय करून, त्याना नव्या जीवनाची रचना करण्याचे कौशल्य देऊन, नव्या समाजाची रचना घडवू शकतील का? जनतेची मने शतकानुशतकांच्या सवयीतून मुक्त करू शकतील का? सवयाचे दास्य जनता सोडोल का? आणि जनतेला मार्ग दाखवणारे वाटाडे तरी आपल्या मनाच्या सवयींचे दास्य आधी सोडतील का? हे दास्य सोडवण्याचे धैर्य या जन-नेत्यांमध्ये येईल का? कधी काळी येईल हे आश्वासन अपुरे व निरुपयोगी आहे. संघर्षांची तीव्रता निर्णायक कसोटीच्या क्षणाला पोचण्याआधी सवयीच्या दास्यातून डाव्या पक्षाचे नेतृत्व सुटेल का? हा यक्षप्रश्न आहे.

मानवजातीचे, त्यातून ज्यांना यापुढे सारे जगायचे आहे त्या तरुण पिढीचे भवितव्य या प्रश्नाच्या उत्तरावर टांगलेले आहे. आपल्या देशात तरुण पिढीचे व देशातील साऱ्या जाती-जमातीचे व साऱ्या सुसंस्कृत अस्तित्वाचे व प्रत्येकाच्या बियाचे भवितव्य या प्रश्नावर हेलावणारे आहे.

डाव्या पक्षांच्या ऐवजी समजा, उजवे पक्ष जिंकू शकले तर काय तर चालू रागड्याहून वेगळे काही होणार नाही. आहे ती सुव्यवस्था व कायदा स्थिर होईल. विषमता स्थिर होईल. बेकारी व दारिद्र्य, अंधश्रद्धा, हिंसा यांचे थैमान स्थिर होईल. सारेच स्थिरस्थावर होईल. आणि डावे पक्षनेते मोठमोठ्या राजांच्या छावण्यांतून स्थिर होतील. जेथे हुकूमशाही आली तेथे जे झाले तेच होईल. यापेक्षा वेगळे काही व्हावयाचे असेल तर डाव्या पक्षांच्या मागे जनतेचे पाठबळ, नैतिक बळ आणि नैतिक धैर्य उभे राहिले पाहिजे. ती गोष्ट साध्य कशी होईल? ती काही या ना त्या शास्त्रीय पुस्तकांतील प्रमेयांची बाब नाही. नैतिक धैर्य हीच मुळात पुस्तकी गोष्ट नसून माणसाच्या वागण्याची गोष्ट आहे व म्हणून फार अवघड व नाजुक बाब आहे.

जनतेच्या नैतिक धैर्यावाचून, शस्त्रे असून नसुन काहीच घडू शकणार नाही, आणि हे धैर्य नेत्यांच्या दास्यमुक्तीवाचून जन मानसातही येणार नाही.

ही दास्यमुक्ती फार अवघड आहे, व तेवढीच नाजुक आहे. कारण येथे बाहेरच्या रणांगणांचा व वीरश्रीचा प्रश्न नाही. येथे प्रश्न साधा आहे व तो खऱ्या दास्यमुक्तीचा आहे. मनाने दास्याच्या बेड्या तोडण्याचा हा प्रश्न आहे.

पहिला भ्रम : आत्ममग्नता

डाव्या पक्षातील नेत्यांपैकी एकजण एकदा माझ्याशी मनमोकळपणाने बोलत होता. मोकळेपणाने बोलण्यासाठीच तो माझ्याकडे आला होता. विराट सभातून गर्जना करणारे, मोर्चाच्या अग्रभागी छाती काढून चालणारे झुंजार मन अबोल झाले होते, व दुसरे एक मन बोलत होते. डाव्या पक्षांची एकजूट झाली तर जादूची कांडी फिरल्यासारखे होईल, जनतेचे सारे बळ एकवटेल, भारताचे दारिद्र्य व लाजिरवाणेपण नाहीसे होईल. सारे खरे. पण ही एकजूट होत नाही याची खंत या नेत्याला वाटत होती. एकजुटीची 'घोषणा' तो करत नव्हता, तर प्रामाणिकपणे एकजुटीच्या प्रयत्नांचे अपयश दुःखी मनाने सांगत होता. मित्राशी, पक्षीय राजकारणापासून दूर असलेल्या एका साध्या माझ्यासारख्या नागरिकाशी, तो हितगुज करू पाहात होता.  मी त्याला म्हटले की, डाव्यांची एकजूट व्हायला पाहिजे हे खरे, पण होत नाही याचा दोष कोणा एकाचा नाही. डाव्या नेत्यांच्या मनात, सर्वांच्या मनांत, एकजुटीची इच्छा असून ती  घडून येत नाही. तेव्हा ती इच्छा दडपून टाकणारी दुसरी एखादी मातबर भावना मात करत असेल का? याचा आपण शोध घेऊ या.

"अशी कोणती भावना असेल?  "नेत्याने प्रश्न केला.

मी म्हणाली, "सन 1950 च्या पूर्वीची वीस वर्षे मी तुमच्यासारखाच जगलो. पण तेव्हापासून राजकारणाच्या धकाधकीपासून अलग राहून, तुमच्या दृष्टीने सुखवस्तु पांढरपेशाचे जीवन जगणारा मी माणूस आहे. माझे बोलणे तुम्हांला पटणार नाही, रागही येईल. तुमच्या-माझ्यात संवाद साधणे कदाचित कठीण होईल एवढा अंतराय निर्माण झाला असेल. मित्रत्वाच्या भावनेनेही तो उल्लंधता येणारा नाही. तुमचा त्याग मला परिचित आहे. तुम्ही स्वतःकडे पाहिले नाही, व समर्पित जीवन जगलात, आणि म्हणूनच माझे बोलणे तुमच्यापर्यंत कदाचित पोचणार नाही व तुम्हांला फक्त राग येईल." नेत्याने म्हटले, "या घटकेला तरी मी राग येण्याच्या मनःस्थितीत नाही. स्वतःचे सुख न पाहता मी पक्षाचे कार्य केले, पण मला स्वतःचे मनही पाहणे कठीण झाले आहे."

मी म्हटले, "कार्यमग्नतेत पुष्कळदा हेच घडते, व मग त्यातून सावरणे कठीण होते. असे व्हायलाच पाहिजे असे मात्र नाही. कार्यमग्न राहूनही स्वतः कडे पाहता येईल, आले पाहिजे. पण राजकारणाच्या धकाधकीचे आजवर असे रूप राहिले आहे की, माणूस स्वतःला हरवून बसतो. एक भ्रम बाळगतो. तो भ्रम असा की, 'मी, माझा डावा पक्ष, व माझ्या पक्षाचे तत्त्वज्ञान आणि डावपेच यांच्या तुलनेने इतर सारे दुबळे व हिणकस आहे.' या आत्ममग्न भावनेने तीव्र स्वरूप धारण केले की उजव्या पक्षांपेक्षाही इतर डावे पक्ष माणसाला वैरी वाटू लागतात.

आज तसेच काही येथे घडत आहे. म्हणून मला भीती वाटते. डाव्यांची एकजूट साधेल- पण ती साऱ्याच डाव्यांना फॅसिस्ट हुकूमशाहीच्या राजबंदी छावण्यांत डांबले जाईल तेव्हा, व तेथे साधली जाईल, असे भयानक दृश्य माझ्या डोळ्यांसमोर येते. समाजवादी पक्षांना पहिला शत्रू मानणारे जर्मन कम्युनिस्ट शेवटी हिटलरच्या छावण्यांत समाजवाद्यांबरोबर डांबले गेले, आणि कम्युनिस्टांना देशद्रोही फितूर मानणारे त्याच छावण्यांतून डांबले गेले." यावर तो नेता म्हणाला, "डाव्यांची एकजूट झाली नाही म्हणून हिटलर यशस्वी झाला हे खरे, पण याला खरे कारण कोणते? मी व माझा डावा पक्ष श्रेष्ठ ही भावना एकजुटीला बाधक ठरली का? का ठोकळेबाजपणा, हिंसाचार, लबाडी, परकीयांचे अनुकरण किंवा लाचारी ह्या गोष्टी घातक ठरल्या? "या प्रश्नावर आमचे बरेच बोलणे झाले व युरोप आणि आशिया खंडांतील डाव्या जहाल राष्ट्रवादी व समाजवादी चळवळीत एकजुटी, आघाड्या व फाटा फुटी यांची उदाहरणे आम्ही तपाशीत गेलो. रशियन व चिनी कम्युनिस्टांतच वैराची भित उभारली कशी गेली? खुद्द या देशातच स्टॅलिन व ट्रॉट्स्की, माओत्सेतुंग व लिजो शिओची यांच्यातील हाडवैरे कशी पेटली? हा इतिहास पाहिला आणि भारतीय कम्युनिस्ट, भारतीय समाजवादी, व इतर डावे पक्ष यांच्यातील सर्वकष झगडे व फाटाफुटी त्यांचे चित्र आम्ही डोळ्यांसमोर धरले. माझे म्हणणे असे होते की, फाटाफुटीला ठोकळेबाजपणाने, पोथीनिष्ठेने व हिंसात्मक प्रवृत्तीने भर दिली जाते हे खरे, पण मूळ कारण नेत्यांच्या आत्ममग्न आग्रहीपणात आहे. नाही तर एकच पोथी मानणारे किंवा एकच आचारसंहिता (मग ती हिंसेची असो की शुचितेची असो) मानणारे आपसात भांडले नसते.

तेव्हा एका देवाला, ख्रिस्ताला व बायबलाला मानणाऱ्यांनी जशा एकमेकांच्या कत्तली धर्माच्या नावावरच केल्या, तसे काही तरी जनताजनार्दनाला मानणाऱ्यांचे झाले आहे. नेत्याला माझे म्हणणे पटले नाही, व तो म्हणाला की, तुमचे सारे विश्लेषण मानस शास्त्रीय आहे. मनातल्या एका भ्रमाकडे बोट दाखवून तुम्ही सारा प्रश्न अवास्तव पद्धतीने सोडवू पाहात आहात. यावर मी काय म्हणणार? समाजातील वास्तव मी मानतो, व त्या अर्थी मटेरिअलिस्ट आहे. पण मानवी व्यवहारातली यशापयशे व गुणदोष शेवटी मनातल्या गुणदोषांवर निर्भय आहेत असेही मी मानतो. शेवटी परिवर्तन आपोआप घडत नाही, मनाने पटवावे लागते. हे जर खरे, तर डाव्यांच्या फाटाफुटीचे खापर वास्तवावर न फोडता मनातले भ्रमच तपासायला हवेत. ते भ्रम हेच दास्य आहे.

दुसरा भ्रम : जनताजनार्दन

डाव्या पक्षातील नेत्यांच्या मनांत फाटाफुटीला कारण होणारा आत्मगौरवी भ्रम है एक दास्य आहे. डाव्यांचे बळ एकवटू न देणारे हे मनाचे दास्य दूर करणे नेत्यांच्याच हाती (किंवा मनोधैर्यात) आहे. हे दास्य दूर करूनच साऱ्या जनतेला आपल्या पायांवर उभे राहण्याचे सामर्थ्य डावे पक्ष देऊ शकतील, ही गोष्ट सांगून एक दुसरा भ्रम सांगणे इष्ट होईल. तो भ्रम स्वतःबद्दलचा नसून जनतेबद्दलचा आहे. डाव्या पक्षातील नेते जनतेला परात्पर ईश्वर मानतात. लोकमान्य टिळकांनी 'श्रीशाय जनतात्मने' म्हणून आपले गीतारहस्य जनतारूपी जनार्दनाला अर्पण केले. ही पूजा सतत चालूच आहे. उजवे पक्ष व त्यांचे नेते जनतेला 'आज्ञा धारक प्रजा' मानतात. परंपरेतील प्रजावत्सल राजा जसा प्रजेला मातापित्यांच्या प्रेमाने सांभाळत असे तसे आम्ही भारतीयांना संभाळू, परकीय लांडग्यांपासून या कोकरांचे रक्षण करू, त्यासाठी सत्ता हाती येताच हायड्रोजन बॉम्ब बनवू, अशी उजव्यांची धारणा आहे. त्यांनी राष्ट्रवादाची शुद्ध शिकवण देण्याचे ठरवले आहे, व भारतात राहणाऱ्या लाखो अभारतीय प्रवृत्तीच्या कोकरांना प्रेमाने किंवा शिक्षणाने शुद्ध भारतीय कोकरे बनवण्याचे त्यांनी ठरवले आहे. समाजवादी आणि कम्युनिस्ट त्यांना राष्ट्रद्रोही वाटतात, पण गरिबांचा सांभाळ करण्यासाठी उपयोगी पडेल बता विशुद्ध समाजवादाचे त्यांनाही वावडे नाही! पण हे सारे बोलताना त्यांची मूळ धारणा 'प्रजावात्सल्या'ची आहे.

डाव्या पक्षाची धारणा उलटी आहे. त्यांना जनता म्हणजे प्रजा नसून परमेश्वर वाटतो. हा परमेश्वर भक्ताला पावतो अशी त्यांची धारणा असते. भक्त परमेश्वराला कधी शिकवू शकतो का? त्याचे गुणदोष पाहतो का? जनता भोळी आहे व उदार आहे. निर्भय आहे व शूर आहे, अशी एक सरसकट कल्पना डाव्या पक्षांची आहे. याचे एक उदाहरण परवा माझ्या ध्यानात आले. गांधीजींनी लोकांना निर्भय बनवले व इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध लाखो माणसे लढू शकली, असे माझे मत एका डाव्या नेत्याला मी सांगितले. तो नाराज झाला. तो म्हणाला, गांधीजीच्या अहिंसेने मुळात शूर व निर्भय असलेली जनता भित्री बनली! गांधीजींची अहिंसा ही जनतेला, त्यांतून हिंदू समाजाला, भेकड बनवण्यासाठी योजलेली कपटी युक्ती होती, हे मत उजव्या पक्षातील नेत्यांच्या तोंडून मी अनेकदा ऐकले होते. तेच नव्हे पण तत्सम मत या डाव्या नेत्याच्या तोंडून मी ऐकले. या डाव्या नेत्याच्या मनात ही अगदी पट्ट बसलेली कल्पना होती की, जनता म्हणजे एक दारिद्रयाच्या पिंजऱ्यात अडकलेला वाघ आहे. दारिद्र्य नष्ट करावयाचे आव्हान, समाजवादाचे आर्थिक समतेचे आश्वासन, आणि पिळणूक करणाराविरुद्ध संताप निर्माण करणारा कार्यक्रम व घोषणा देणारा डावा पक्ष भेटला की या पिंजऱ्याचे गज तोडून हा वाघ बाहेर पडेल. तो क्रांतीच्या आवाहनाची वाटच पाहात आहे. अहिंसेचे, आणि कचखाऊ डाव्या नेत्यांचे धोरण जनतेला भुलवीत आहे. जनतेला फक्त या भुलावणीतून बाहेर काढायचे काम आहे!

डाव्या पक्षांच्या नेत्याच्या मनात जनतेबद्दल अतीव आदर आहे व तो हवाच. नाही तर जनतेला मार्गदर्शन करणेच डाव्या पक्षांना अशक्य होईल. पण, एक भ्रम डाव्या पक्षांनी टाकायला हवा. जनता ही उजवे मानतात त्याप्रमाणे मुकी, आज्ञाधारक 'प्रजा' नाही, त्याचप्रमाणे निर्भय डोळस मनाच्या माणसांचा समूहही नाही. साधी सामान्य माणसे म्हणजे जनता. या माणसांना दारिद्रयाने गांजले आहे, तसेच अंध श्रद्धांनी व स्वार्थ भावनांनीही गांजले आहे. संप, मोर्चे व सामूहिक आंदोलनात ही माणसे लाखोंनी भाग घेतात, निकराने लढूही शकतात. पण हीच माणसे आंधळेपणाने सामूहिक परस्पर-वैरातही भाग घेतात. दोन महायुद्धे झाली, त्यांत कोट्यवधी सामान्यांनी भाग घेतला. सामूहिक वैराने पेटलेली ही माणसेच रणांगणावर एकमेकांवर प्राणघातक शस्त्रांचा प्रहार करत गेली. एखाद्या मोठ्या पराभवानंतर हीच सामान्य माणसे सहज गलितधैर्य होऊन माघार घेतात व आक्रमकांपुढे मान वाकवतात, अशी साक्षही इतिहास देतो ना?

जनता म्हणजे परमेश्वर नसून आपल्या सारखीच माणसे आहेत, ती भित्री आहेत व शूर आहेत, आंधळी आहेत व डोळस आहेत, असे दोन्ही किंवा दुहेरी मानायला हवे; कारण ते सत्य आहे. पण डाव्या पक्षांतील नेते हे सत्य पुरतेपणी मानीत नाहीत; अतिरेकी डावे तर असे मानून चालू लागतात की, मूठभर शूरांनी शस्त्रांनी लढा दिला की लाखो स्फूर्तीने लढू लागतील. वासुदेव बळवंतांपासून नक्षलवाद्यांपर्यंत सर्वांची हीच भ्रामक समजूत झालेली दिसते. ही अतिरेकी भूमिका घेणारे सोडले तर बाकीचे डावे पक्ष जनता सशस्त्र बंडासाठी कोणत्याही क्षणी अधीर झालेली असते असे मानीत नाहीत. पण, तरी जनतेला सामान्य माणसे मानून त्यांच्यातील अंधश्रद्धा, दुराग्रह फाटाफूट व कच खाण्याची प्रवृत्ती या दोषांचा पुरेसा विचार डावे पक्षनेते करत नाहीत. यामुळे त्यांच्या मनात असा भ्रम बळावतो की, आपण लढाऊ एकजुटीचा कार्यक्रम दिला की सहजासहजी जनतेची लढाऊ एकजूट बांधली जाईल.

प्रत्यक्षात तशी एकजूट घडलेली दिसत नाही, व हा अनुभव येताच प्रत्येक डावा पक्ष इतरांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांच्यावर खापरफोड करू लागतो. खापरफोडीचा हा मार्ग सर्वांनीच पत्करण्या इतका सोपा आहे. एकाने दुसऱ्याला परक्याचे राष्ट्रद्रोही हस्तक म्हणावे, भांडवलदारांचे हस्तक म्हणावे, 'गुप्तपणे मिळणाऱ्या रकमांचे खरेखोटे तपशील आपापल्या गोटांतून बोलत राहावे, किंवा एकंदरीत सामान्य माणसाला उबग येईल अशा तन्हेने डाव्या पक्षांतील फाटाफुटीचे प्रदर्शन चालू राहावे, हाच परिणाम मग शिल्लक उरतो.

जनतारूपी सामान्य माणसांच्या दारिद्र्याच्या प्रश्नाबरोबर त्यांच्या मनात रूढींनी व नव्या बाजारी जीवनातल्या भ्रष्टाचारांनी साचलेली विषे काढण्याचा प्रयत्न डाव्या पक्षांनी करायला नको का? पण गेल्या काही दशकांत हे काम झालेले नाही; कारण या विषांकडे डाव्यांनी पुरेसे लक्षच दिले नाही. लक्ष का दिले नाही, तर जनता म्हणजे डोळस, निर्भय व क्रांतिसन्मुख लोकसमूह असा एक भ्रम डाव्या पक्षांनी करून घेतला आहे.

उजव्यांनी हा भ्रम वागवलेला नाही. जनतेच्या अंधश्रद्धा, आणि सामान्य माणसांतही आढळणारी स्वार्थी अविवेकी वृत्ती त्यांनी नीट ओळखली. किंबहुना आपले राजकीय डावपेच व प्रचार या प्रवृत्तीच्या आधारेच त्यांनी आखले, व त्यांना विनासायास पाठिंबा मिळाला. मशिदी, चर्च व मंदिरे, अंधश्रद्धा व स्वार्थ, भय व वैरभावना यांचा आधार घेऊन उजव्या पक्षांना बल संपादन करता आले, असे आजवरच्या इतिहासात घडून आलेले आढळते. अशी इतिहासाची साक्ष व सूचना मिळूनही डावे पक्ष जनतेच्या सर्वांगीण जीवनाचा विचार न करता फक्त दारिद्रयावर भर देऊन आपले डावपेच आखत राहिले हे नवल नाही का?

जनतेबद्दलच्या अशा काही भ्रामक ढोबळ कल्पना बाळगणे हे डाव्या पक्षातील नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे एक दास्य आहे. मनाच्या या सवयीचे दास्य सुटल्यावाचून आपल्या समाजातील माणसांच्या वेगवेगळ्या समूहांना भोगावी लागणारी वेगवेगळ्या प्रकारची दुःखे व त्यांवरील उपाय डाव्या पक्षांना उमगणार नाहीत. आर्थिक प्रश्नांना महत्व आहेच, पण इतर प्रश्नांच्या बाबतीत कोरडे राहून आर्थिक प्रश्नांची कोंडी फोडणे शक्य नाही. 'आधी आर्थिक मग इतर प्रश्न' असे काही सूत्र मानणे धोक्याचे आहे.

एकजुटीची शक्यता

वरील विवेचनात डाव्या पक्षांच्या एकजुटी आड येणाऱ्या दोनच गोष्टींची दखल मी घेतली आहे. तसे पाहिले तर अनेक गोष्टी आड आल्या आहेत. त्यांची दखल डाव्या पक्षांतील नेते व कार्यकर्ते यांना आजवर घ्यावी लागली आहेच. कारण त्या गोष्टी राजकीय व्यवहार क्षेत्रातल्या आहेत. मी ज्या दोन गोष्टींकडे लक्ष वेधले आहे त्या थोडे दूर व अलग राहणाऱ्याला दिसणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांचा प्रत्यक्ष व्यवहारात कितपत उपयोग होईल?-मी ते सांगू शकत नाही. पण, आत्मनिरीक्षणापुरता त्यांचा उपयोग झाला तरी पुरे. मनाची दास्यमुक्ती ही दास्यमुक्तीच्या लढ्यात प्राथमिक महत्त्वाची गोष्ट आहे, असे आपण सर्व मानतो. तेव्हा एक-दोन सवयी आपल्या मनावर कशा पकड घेऊन आहेत त्याची जाणीव मला झाली व तीच येथे मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

Tags: साधना दास्यमुक्ती विशेषांक 1970 ख्रिश्चन आशिया खंड महात्मा गांधी दि. के. बेडेकर Sadhna Christian Dasya Special Issue 1970 ashiya Continent D. K. Bedekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके