डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वेध : एका शैक्षणिक ध्यासपर्वाचा

गेली काही वर्षे हे म्युच्युअल फंड आपल्या सभासदांना बाजारपेठेतील व्याजदरापेक्षा दुप्पट दराने लाभांश देत होते. पण गेल्या तीन महिन्यांत ते एवढे गाळात गेले आहेत की, कदाचित पुढची दोन-तीन वर्षे त्यांना लाभांश देता येणार नाही. यामुळेच अशा गरीबकामगारांना निवृत्तीनंतर काही आर्थिक सुरक्षा मिळावीयासाठी सुरू करण्यात आलेल्या भविष्य निर्वाहनिधीची पुंजी भांडवलबाजारात गुंतवणेकामगारांसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. यामुळेच या नव्या पर्यायाला कामगार संघटनांनी केलेला विरोध रास्त आहे असेच म्हणावे लागते.

एका इटालियन तत्त्वज्ञाने असे म्हटलेय की, ‘सामान्य व्यक्ती सर्वसाधारणपणे आखून-बांधून दिलेल्या रस्त्यानेच चालत जातात. मात्र काळाच्या पुढे असलेल्या असामान्य व्यक्ती एखाद्या ध्येयाने झपाटलेल्या असतात. कशाचीही पर्वा न करता त्या चालू लागतात; आणि मग जिथे वाटही दिसत नसते तिथे राजमार्ग तयार होतो. ‘महाजनो मेन गत: स पन्थ:’ ह्या म्हणीतसुद्धा तोच विचार ध्वनित झाला आहे. 1818 साली मराठ्यांचा पाडाव झाला आणि शनिवारवाड्यावर ‘युनियन जॅक’ फडकू लागला. ह्या ऐतिहासिक घटनेने भारतीय समाज, विशेषत: बंगाल व महाराष्ट्र, हताश आणि हतबल झाला नाही. उलट, आपण कुठे कमी पडलो आणि काय केले म्हणजे सुधारणा होईल, परिवर्तन घडेल याचा कृतिशील विचार करणारांची मांदिमाळीच इथे तयार झाली.

जे घडले त्याला पराभव न मानता समाज बदलण्याची, त्याला नवी दिशा देण्याची ती सुवर्णसंधी आहे अशा विचाराने प्रेरित झालेली, पेटून उठलेली मंडळी पुढे आली; अनेक सामाजिक व राजकीय चळवळी सुरू झाल्या आणि त्या प्रबोधनपर्वात अनेक नव्या संस्थाही उदयाला आल्या. शिक्षण हे परिवर्तनाचे सर्वांत परिणामकारक साधन आहे हे प्रबोधनकारांनी जाणले. मात्र ते समाजातल्या उभ्रू वर्गापर्यंतच सीमित राहता कामा नये, तळागाळात शिक्षण पोचले पाहिजे, स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे; ग्रामीण, दलित आणि आदिवासी समाजही शिक्षणापासून दूर व विन्मुख राहणार नाही असा प्रयत्न करणारेय. ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, लो.टिळक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ह्यांच्यापासून तर महर्षीधोंडो केशव कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक प्रबोधनकारांनी शिक्षणप्रसाराचे मर्म जाणले.

प्रबोधनाची परंपरा

महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील प्रबोधनाची ही वाटचाल स्वातंत्र्य प्राप्तीनंतर थांबली नाही. त्या आधीच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी रमत शिक्षण संस्था सुरू केली होती. तिचा पुढे वटवृक्ष सर्वदूर पसरला. विदर्भात डॉ.पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्थादेखील रमतच्या प्रेरणेनेच सुरू केली. कुष्ठरोग्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाद्वारे स्वावलंबन निर्माण करण्यासाठी अमरावती येथे ‘तपो’वन स्थापन करणारे डॉ.शिवाजीराव पटवर्धन असोत किंवा वरोड्यात ‘आनंदवन’ उभे करणारे बाबा आमटे असोत, परिचारिका (नर्सींग) शिक्षणासाठी नागपुरात ‘मातृसंघ’ संस्था उभारणाऱ्या डॉ.कमलाबाई हॉस्पेट, नाशिकजवळ शिक्षणप्रसाराचे काम केलेल्या शांताबाई दाणी, अनुताई वाघ, या सर्वांनी आपली ध्येय निष्ठा आणि साधनशुचितेबद्दलची मूल्ये जोपासत शिक्षण हे समाजपरिवर्तन आणि सबलीकरणाचे बहुआयामी असे प्रभावी साधन आहे हे सप्रयोग सिद्ध केले.

याच परंपरेत आपल्याला पुण्यात विद्यार्थी सहायक समितीची एक चळवळ सुरू करणाऱ्या अच्युतराव आपट्यांचाही उल्लेख करता येईल इतके मोठे काम त्यांनी केले आहे. पुणे हे शिक्षण-उच्चशिक्षणाचे पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर साऱ्या देशातील एक अग्रगण्य केंद्र. मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी पुण्यात पुढील शिक्षणासाठी येतात. ज्यांचे पालक सधन-सुखवस्तू असतात त्यांना आपल्या पाल्यांसाठी महाविद्यालय प्रवेशाबरोबरच वसतिगृहाची सोय, ती न झाल्यास खोली भाड्याने घेऊन किंवा पेर्इंग गेस्ट सारखी राहण्या जेवणाची व्यवस्था करणे कठीण नसते. मात्र ग्रामीण भागातून पुण्यात येणारा विद्यार्थीवर्ग हा गरीब, रमतेच्या कुटुंबातला असतो, उच्चशिक्षण घेणारांच्या पहिल्या पिढीतला असतो. त्यांच्या साठी’ कमवा व शिका’ यांसारखी योजना राबवून वसतिगृहे उभी केली तर त्यांच्या मध्ये उच्चशिक्षितांची पिढी तयार करण्याला हातभार लागेल, हा साधा सरळ विचार साकार करण्यासाठी अच्युतराव आपटे पेटून उठले.

पन्नास-बावन्न वर्षांपूर्वी सुरू केलेल्या विद्यार्थी सहाय्यक समितीची आज पुण्यासारख्या महानगराच्या मध्यवर्ती भागात चारमोठी वसतिगृहे उभी आहेत आणि त्यात 350 मुले आणि 175 मुली(विद्यार्थिनी) आज राहताहेत. केवळ राहण्या-जेवणाची सोय करणे एवढाच या कामामागचा अच्युतरावांचा मर्यादित दृष्टिकोन नव्हता. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ग्रंथालय, योगासन वर्ग, श्रमदान,चित्रकला यांसारखे छंदही जोपासता येतील अशा सोयी समितीने निर्माण केल्या. विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा हा व्यापक उद्देश समोर ठेवून समितीचे कार्य आजही सुरू आहे. देशाचे आदर्श आणि स्वावलंबी भावी नागरिक तयार करण्याचा जणू कारखानाच अच्युतरावांनी सुरू केला असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही.

वेगळीच कार्य पद्धती

अलीकडे समाजकारण करण्यासाठी शासकीय अनुदानही मिळविता येते. त्यामुळे दारोदार झोळी घेऊन निधी संकलनासाठी भटकावे लागत नाही. एखादा मंत्री, खासदार, आमदाराला भेटून, जमल्यास त्यांनाच उद्‌घाटनाला बोलावून समाजकार्यासाठी शासकीय मदत पदरात पाडून घेणे हा आता राजमान्य व्यवसाय झाला आहे! त्यामुळे मिळविलेल्या अनुदानावर आपले नियंत्रण राहते, ‘राजकारणापासून दूर राहून’ समाजकार्य केल्याचा आभासही निर्माण करता येतो , आणि समाजात प्रतिष्ठाही मिळते! अशा स्वयंसेवी संस्थांना हाताशी धरून शासकीय विकासकामे व कल्याणकारी योजना राबविणे, हे राजकीय पुढारी आणि सनदी नोकरशहांनासुद्धा सोयीचे असते आणि मानवणारेही! आपल्या वातानुकूलित कार्यालयातून बाहेर न जाता केलेल्या विकास कायांची मादी त्यांना अहवालात दाखविता येते ; याशिवाय काहींना विनासामास ‘कमिशन’ मिळविता येते, तेही बिनबोभाटपणे. अशास्वयंसेवी संस्थांचा ((NGOs) आता सुळसुळाट झाला आहे.

मात्र सोपा असूनही हा मार्ग अच्युतरावांनी स्वीकारला नाही. शासकीय अनुदानाच्या कुबड्या घेऊन संस्था चालविणे मान्य नव्हते म्हणा किंवा ते कार्य त्यांना पुरेसे आव्हानात्मक वाटले नसावे. म्हणून त्यांनी स्वयं सेवी आणि नि:स्पृहपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फळी उभी केली. संस्थेच्या कार्यासाठी थोडाच का होईना पण नियमितपणे वेळ काढणाऱ्या -देणाऱ्यांचा शोध घेतला, त्यांना ह्या जगन्नाथाच्या रथास जुंपले हे सर्व कुठल्या ही मानधनाची अपेक्षा न ठेवणारे कार्यकर्ते होते व आहेत, ही समितीची जमेची बाजू.

याचा अर्थ अच्युतरावांचा शासनाच्या /राज्य संस्थेच्या विकासकार्य कार्यांना व योजनांना विरोध होता असे नाही. पण त्यांना समितीचे काम खऱ्या अर्थाने ‘स्वयं सेवी’ पद्धतीने उभे राहावे असे कळकळीने वाटत होते. शासकीय अनुदानातून येणारे मिंधेपण आणि नोकरशाहीचा संस्थेत अवास्तव हस्तक्षेप त्यांना नको होता. तसे म्हटले तर ‘If possible preferably independently and without you, if necessary with you, and if forced to, then in opposition to you’ असे अच्युतरावांचे शासनाशी सहकार्या बाबतचे तीन पर्याय -आणि अग्रक्रम होते असे म्हटले पाहिजे. आपल्या नैष्ठिक भूमिकेचा इतरांना दरारा वाटावा इतके साधनशुचितेबद्दल अच्युतराव दक्षता बाळगत होते.

तात्पर्य , राज्यसंस्था (State) आणि नागरी समाज (Civil Society) यांच्यात साहचर्म असावे असे जरी मानले तरी नागरी समाजाचे राज्य संस्थेवर नियंत्रण असायला हवे असे अच्युतरावांना वाटत होते. शासनकर्त्यांच्या धोरणांवर आणि कार्य पद्धतीवर अंकुश ठेवू शकेल असा एक ‘मतिवर्ग’ समाजात असला पाहिजे असे आचार्य जावडेकर म्हणत असत. अच्युतराव नेमके त्या मतिवर्गाचे खंबीरपणे प्रतिनिधित्व करीत होते.

देणग्या, छोट्या-मोठ्या मिळविण्यासाठी अफाट जनसंपर्क आणि त्या लोकसंग्रहातून निधी संकलन अशी परस्परपूरक कार्य पद्धती म्हणा, किंवा रणनीती म्हणा, विद्यार्थी सहाय्यक समितीने मोठ्या शिस्तबद्धपणे राबविली. देणाऱ्याने एकदा निधी दिला म्हणजे त्याच्याशी काही घेणे देणे नाही असे मानणाऱ्या आणि वागणाऱ्या कृतघ्न संस्थांची आज समाजात कमतरता नाही. देणगी मिळेपर्यंत संपर्क, एकदा प्राप्तीकर सवलतीचा उल्लेख /शिक्का असलेली पावती फाडली की पुन्हा त्या देणगीदाराशी संपर्क ठेवण्याची गरज तरी काम? असा व्यवहारी विचार करणाऱ्या संस्थाच अधिक असतात! अच्युतरावांच्या कार्य कर्त्यांनी मात्र ह्याच देणगीदारांना कायमचे आपलेसे करून घेण्याचे धोरण स्वीकारले. देणगी एकदाच देणारी व्यक्ती असो, अथवा दरमहा एका विद्यार्थी-विद्यार्थिंनींचा भोजनखर्च देणारे असोत, शंभर, पाचशे, हजार, वा लाखो रुपये देणारे असोत, ह्या सर्वोशी समितीने कायमचे नाते जोडले. प्रतिवर्षी 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला संध्या काळी स्नेहमेळावे, अल्पोपहार आयोजित केले, विद्यार्थी आणि त्यांचे देणगीदार-पालक यांच्या भेटीगाठी अशा कार्यक्रमातून सुरू झाल्या ; कधी शास्त्रीय संगीत मैफिलीचा, तर कधी मुलांच्या चित्रकला प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करून समिती व देणगीदार यांच्यातील भावबंध अधिक दृढ होत गेले.

हीच गोष्ट समितीच्या वसतिगृहात राहून अभ्यासक्रम, पदवी शिक्षण पूर्ण करून गेलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिंनीच्या बाबतीतही केली. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वत:चा एक संपर्क गट स्थापन केला. ज्या योजनेचा लाभ समितीकडून स्वत:ला मिळाला तोच इतरांनाही मिळावा यासाठी माजीविद्यार्थी सुद्धा झटू लागले. एका पणतीने दुसरी पणती पेटवावी ह्याप्रमाणे सारा अंधकार सांघिक प्रयत्नांनी दूर सारण्याचा प्रयोग यशस्वी झाला.

तीस-बत्तीस वर्षांपूर्वी मी पुण्यात (डिसेंबर 1977 मध्ये ) आलो तेव्हा मला समिती आणि अच्युतराव आपटे कोण हे सुद्धा अजिबात माहीत नव्हते. प्रा.डॉ.म.न.पलसाने हे पुणे विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख आणि मी एकमेकांशी नुसते पूर्वपरिचितच नव्हतो, तर एकाच गावचे, एकाच शाळा,महाविद्यालयात शिकलेले होतो. मी पुणे विद्यापीठात आल्या नंतर त्यांनी प्रथम मला विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली. ते दरमहा काही रक्कम समितीच्या कार्यासाठी देत असत, तसेच विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याच्या कार्यात ही सक्रीय भाग घेत. एवढेच नाही तर ‘मैत्रीच्या पलीकडे’ ((Beyond Friendship) ह्या समितीद्वारा प्रसिद्ध होणाऱ्या निमतकालिकाच्या संपादनातही त्यांचा सहभाग असे. त्यांच्याचमुळे मी वि.सा.समितीच्या परिवाराचा एक सदस्य झालो.

समितीच्या वसतिगृहात राहून शिकलेला एक विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान-विभागात एम.फिल.चा अभ्यासक्रम पूर्ण करीत होता. त्याला प्रा.पलसानेनी माझ्याकडे विभागातच भेट घ्या मला पाठविले. मला पुण्यात पाय रोवून आधी उभे राहायचे होते; म्हणून त्यावेळी एकरकमी मोठी देणगी देणे मला शक्य नव्हते. मात्र एका विद्यार्थ्याचा भोजनखर्च म्हणून दरमहा काही निधी देऊन ‘पालक’ बनण्याची एक योजना समितीने मोठ्या नेटाने चालविली होती. दरमहा काही रक्कम देणे मलाही सोयीस्कर होते. अशा तऱ्हेने तो माजी विद्यार्थी माझ्याकडून प्रत्येक महिन्यात धनादेश घेऊन जात असे. मग मला समितीच्या कार्यक्रयांची निमंत्रणे येऊ लागली. त्याद्वारे कार्यकर्त्यांशी ओळख झाली. मग मी ‘मैत्रीच्या पलीकडे’साठी लिहू लागलो. पुणे विद्यापीठाने मा.अच्युतरावांना सन्याननीय डी.लिट्‌ पदवी देऊन गौरव केला. त्या दीक्षांत समारंभाला मी उपस्थित होतो. तेव्हा त्यांची प्रकृती खालावलेली होती. ‘बसूनच मनोगत व्यक्तकरण्या बद्दल’ त्यांनी प्रथम उपस्थितांची माफी मागितली. ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार’ ह्या संतश्रेष्ठ तुकारायांच्या अभंगातल्या लीनतेने ते सदा सर्वांशी वागले. कार्य कर्त्यांवर ते कधी चिडायचे, संतापायचे असे काहींनी मला सांगितले; पण त्यामागे त्यांची पोटतिडिकीने काम करण्याची धारणा असे. त्याला राग म्हणता येणार नाही, सात्विक संताप म्हणणे अधिक योग्य होईल असे मला वाटते.

आज स्व.डॉ.अच्युतराव आपटे आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनानंतर पुण्यातील फार्ग्युसन्स रस्त्यावरील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतिगृहाला ‘अच्युतराव आपटे वसतिगृह’ असे नाव देण्यात आले. कदाचित त्यांच्या आत्म्याला ही बाब रूचली नसावी. मात्र समितीच्या कार्यामागची त्यांची प्रेरणा कार्य कर्त्यांच्या चिरंतन स्मरणात राहावी हाच त्या नामकरणामागचा हेतू असावा. समितीच्या कार्याला आता बावन्न-त्रेपन्न वर्षे झालीत. मी सुद्धासमितीशी जोडला गेलो त्या घटनेला आता बत्तीस वर्षे झालीत. मागे वळून पाहताना समितीच्या कार्यातील सातत्य आणि तिच्या उत्तरोत्तर प्रगतीमागचे खरे गमक काय असा प्रश्न मला पडतो.

चळवळ की संस्था?

समाजशास्त्राचा अभ्यासक म्हणून मी समितीकडे पाहतो तेव्हा तिची दोन रूपे माझ्या नजरेसमोर ठळकपणे येतात. एक ‘सामाजिक चळवळ’ ((Social movement) म्हणून आणि दुसरे ‘एक रूजलेली सुप्रतिष्ठित संस्था’ (Institution). कोणत्या ही सामाजिक कार्याचे चिरंतनत्व, त्याचे शाश्वत रूप त्याला लागणाऱ्या ऊर्जेमुळे टिकून राहते. ही ऊर्जा चळवळीतून नेहमी धगधगत ठेवता येते , हे मर्म अच्युतरावांनी जाणले होते. म्हणूनच समितीच्या कार्यासाठी अगदी कायदेशीर लागणारी घटना, पदाधिकारी, विश्वस्त संस्थेचे पंजीकरण, लेखापरीक्षण आणि अगदी मोजका कर्मचारी वर्ग,एवढेच संस्थीकरण ((Institutionalization) समितीला मानवणारे होते. तिच्या कार्याचे सातत्य हे मात्र ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरात वसतिगृहांच्या सोयी सुविधा पुरवून, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे ह्या वैचारिक बैठकीमुळे ((Ideology) होते. म्हणजेच अच्युतरावांनी समिती ही एक चळवळ आहे हीच धारणा अधिक विकसित व्हावी असा ध्यास घेतला होता.

संस्थीकरणाला प्राधान्य दिले की जनाधार क्षीण होत जातो व चळवळ दुबळी होते. मग फक्त निधी, देणग्या, नफा आणि गुंतवणुकीच्या आकडेवारीला अवास्तव महत्त्व प्राप्त होते. पदाधिकारी मोठे होतात, त्यांच्यात आर्थिक हितसंबंध निर्माण होऊन सत्ता-संघर्ष सुरू होतो, मात्र संस्थेची ऊर्जा कमी होऊन ती कमजोर होण्याचा धोका असतो. समिती ही एक चळवळ म्हणून ग्रामीण विद्यार्थी केंद्रितच असली पाहिजे, हाच अच्युतरावांचा ध्येयध्यास होता. चळवळ टिकली तर संस्था टिकेल. निधी, नफा,लेखापरीक्षण इत्यादी हे फक्त साधन आहे, साध्य नाही ह्या मूलभूत मूल्यांचा कार्य कर्त्यांना विसर पडता कामा नये. समितीच्या कामकाजात आधुनिक व्यवस्थापन तंत्र जरी काळानुरूप आणणे आवश्यक असले तरी अच्युतरावांच्या आघाडीच्या मूल्यधारणेला दृष्टीआड करणे हितावह नाही हे कार्यकर्त्यांनी जाणले पाहिजे.

अच्युतराव आपटे यांच्या कार्य पद्धतीच्या आणि मूल्यधारणेच्या गाभ्यात मला वेदकालीन आर्षवाणी ध्वनित होतेय असे वाटते.

संगच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानताम्‌।

देवाभाग मथा पूर्वे सज्जानानां उपासते।।

‘‘सर्वांचे पाय एकाच वेळेस एका गतीने (कदमसे कदम) पुढे पडावेत, सर्वांनी एकाच स्वरांत बोलावे, सगळ्यांच्या मनातला बोधव ध्यास एकच असावा, पूर्वी प्राचीन काळात ज्या पद्धतीने सगळ्यांच्या सांघिक बुद्धिचातुर्याने देवांनी दानवांवर यात करून आपले उद्दिष्ट साध्य केले, त्याचप्रमाणे आपण सगळेजण आपली ध्येय प्राप्ती करूया.’’

विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्य यापुढे वृद्धिंगत व्हायचे असेल तर ही कार्य पद्धती, चळवळीची ऊर्जा, जनाधार व जनसंपर्क आणि अविचल ध्येय निष्ठा जोपासली गेली पाहिजे. त्यासाठी स्व.अच्युतराव आपट्यांचा विशुद्ध साध्य -साधन विचार आणि विवेक सदैव जागृत राहणे आवश्यक आहे.

(विद्यार्थी सहाय्यक समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शांता मालेगावकर यांनी संपादित केलेला ग्रंथ या महिन्यात प्रकाशित होत आहे, त्या ग्रंथातून हा लेख घेतला आहे. – संपादक)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

द. ना. धनागरे

(1936 - 2017) समाजशास्त्राचे अभ्यासक, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु,भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव. ‘भारतातील शेतकऱ्यांच्या चळवळी (1920-50)’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. 30 वर्षे विदर्भातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके