डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

व्यासंगी संशोधनावर आधारलेला ग्रंथ

या ग्रंथातील ग्रीक तत्त्वज्ञानापासून पुढे विशेषत: जर्मन, फ्रेंच, चीन इत्यादीमधील वैचारिक प्रवाह आणि तत्त्वज्ञानाबद्दलचे विवेचन संक्षेपाने केलेले असले तरी पण परिपूर्ण वाटते. माझ्या मते विचार (विश्वा)ला ‘कृती’पासून वेगळे करता येत नाही, करू नयेही. ‘विषयाकडे’ ह्या प्रास्ताविकात लेखकाने तीच भूमिका घेतली असे जाणवते. पण विवेचनात संबंधित तत्त्वज्ञ, विचारवंतांच्या संकल्पना, विचार आणि सैद्धांतिक इत्यादी योगदानावरच चर्चा बऱ्याचदा थांबते. त्या विचारांचा, समकालीन संस्था, समाजकारण इत्यादींवर जो प्रभाव आहे, (म्हणजे कृती) त्याबद्दल ग्रंथात फारसे विवेचन आढळत नाही. कदाचित प्रा.शिरवाडकरांनी स्वत:हूनच विषयमांडणीला तशी मर्यादा घालून घेतली असावी.  

‘आपले विचारविश्व’ हा ग्रंथ काळजीपूर्वक चाळल्यानंतर आणि त्यातील काही निवडक भाग तपशिलात जाऊन वाचल्यावर प्रथम हा ग्रंथ लिहून लेखकाने हातावेगळा केला याबद्दल त्याचे अभिनंदन करायला हवे. ग्रंथात समाविष्ट विषयांची व्याप्ती थक्क करणारी आहे. एखाद्या लघुकोशकार्याचेच त्याला स्वरूप आहे. लेखक महोदयांचे वाचन, चिंतन आणि व्यासंग ग्रंथाच्या पानापानांमधून दिसतो. या ग्रंथाचा आवाका एवढा विस्तृत आणि सखोल आहे की त्यावर भाष्य, समीक्षा करण्याचा माझा अधिकार नाही, कारण त्यात समाविष्ट केलेल्या बऱ्याच ज्ञानक्षेत्रांशी (विशेषत: तत्त्वज्ञान) माझा जुजबी परिचयही नाही, पण त्यातला जो भाग मला समजला त्याबद्दल माझ्या बौद्धिक मर्यादांची जाणीव ठेवून मी थोडे मुद्दे उपस्थित करतो. ‘अपूर्णत्व’ हे कोणत्याही ‘कोशा’त्मक लेखनाचे व्यवच्छेदक लक्षण असते. तो दोष मानता येत नाही. मात्र पुन्हा आवृत्ती निघणार असेल तर त्यात थोडी भर घालता येऊ शकते.

1. ‘विषयाकडे’ ह्या प्रास्ताविकात ‘Beaing,knowing  आणि acting- ‘असणे, विचार करणे, वागणे’ यांच्या आधारे तत्त्वज्ञानाचे सत्ताशास्त्र (ontology) ‘ज्ञाननिर्मितिशास्त्र (epistemology) आणि नीतिशास्त्र (ethics) असे तीन भाग पडतात.’ ही योग्य भूमिका लेखकाने घेतलीय. मात्र, ‘विचारविश्वाच्या आढाव्यात’ एकंदरच तत्त्वचिंतकांच्या ‘कृती’ (Action) बद्दल म्हणावे तसे भाष्य केलेले नाही असे काही ठिकाणी प्रकर्षाने जाणवते.

2. याचे पहिले उदाहरण म्हणजे ‘कृतीच्या’ दृष्टीने ‘भारतीय विचार’ परंपरेत महर्षी व्यासांचा उल्लेख नसणे खटकणारे आहे. संपूर्ण वेदोपनिषद, 28 पुराणे इत्यादी वेद आणि वेदोत्तरकालीन ज्ञानभांडाराचे दस्तऐवजीकरण त्यांनी केले. माझ्या मते ज्ञानप्राप्ती आणि संवर्धनासाठी संस्थात्मक आधार हवा असतो, तो व्यासांच्या संशोधन पद्धतीशास्त्राने भारतीय विचार परंपरेला घालून दिला आहे. ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्व्‌’ म्हणतात ते उगीचच नाही. व्यासपरंपरा नसती तर आपण भारतीय समृद्ध विचारपरंपरेला कायमचे विन्मुख झालो असतो हे विसरून चालणार नाही.

3. कृतीच्या बाबतीत आद्यशंकराचार्यांच्या योगदानाचा विचार, अद्वैत दर्शन (पृष्ठ 20-24) मांडताना पुन्हा ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ किंवा ‘आत्मन्‌’ आणि ‘ब्रह्मन्‌’ हे द्वैत नाही, ते अभेद्य आहेत. ही भूमिका अधोरेखित करून लेखक थांबतात. पण तो विचार आज ‘वारसा’ म्हणून भारतीय परंपरेत जपलाय, याचे मुख्य कारण शंकराचार्याचे संस्थात्मक कार्य. चार धाम, चार पीठे आणि बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थापनेतून शंकराचार्यांनी धर्मप्रसाराचे आणि बौद्ध दर्शनातून निर्माण झालेला थोडाफार वैचारिक गोंधळ दूर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले याचा उल्लेख या ग्रंथात झालेला नाही.

4. ‘इस्लामचे योगदान’ ह्या प्रकरणात लेखकाने इब्न रश्द, अबु अली, इब्न सीना, अल किंडी, अल फराबी (पृष्ठ 50 ते 58) ह्या अरब तत्त्वज्ञांचा मागोवा घेतलाय. इब्न सीना हे ताजिकिस्तानातले, म्हणजे पूर्व आशियातले होते. मी ताजिकिस्तानला 1981 मध्ये गेलो तेव्हा दुशांबेपासून 35 कि.मी. दूर त्यांचे स्मारक होते ते पाहायला गेलो. त्या वेळी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला 1000 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते भव्य (एक हजार कारंजी असलेले) स्मारक उभारलेले होते. तेव्हा बोलताना ताजिक लोक मात्र त्यांची अस्मिता अरबांपेक्षा वेगळी मानतात हे जाणवले.  

मुख्य म्हणजे ‘इस्लामच्या योगदानात’ इब्न खालदून ह्या आफ्रिकन तत्त्वज्ञाचा उल्लेखही केलेला नाही. इ.स. 1332 ते 1406 हा त्याचा कालखंड. Berber of tunis अशी ओळख असलेल्या, मूळ अरबच असलेल्या खालदूनने मरुभूीतल्या भटक्या विमुक्त जनजातींच्या ऐतिहासिक संशोधनातून इतिहास लेखनशास्त्राबद्दल मोठे मौलिक लेखन केले. त्यांच्या मते, ग्रीक तत्त्वज्ञान व संस्कृती परिपूर्ण असून ख्रिश्चन व इस्लामची वैचारिक मांडणी बरीच विस्कळीत वळी dis - organised आहे. कारण ती इतिहासाकडे ‘स्थिर’ static असल्याचे मानूनच पाहते. खालदून इतिहासाला ‘प्रवाही’ मानतो. म्हणून परिवर्तन समजून घेण्यास त्या पुरेशा नाहीत. त्यांना त्या Historiographies पुरेशा नाहीत. त्यांना तो Eschatological conception of christian historiography मानतो. (पाहा, Howard Beokar and Henry Elmer Barnes, Social Thought from Love to Science, Vol-I, न्यूयॉर्क डोव्हर पब्लिकेशन्स, पृष्ठ 166-179).

5. तुलनेने या ग्रंथातील ग्रीक तत्त्वज्ञानापासून पुढे विशेषत: जर्मन, फ्रेंच, चीन इत्यादीमधील वैचारिक प्रवाह आणि तत्त्वज्ञानाबद्दलचे विवेचन संक्षेपाने केलेले असले तरी पण परिपूर्ण वाटते. माझ्या मते विचार (विश्वा)ला ‘कृती’पासून वेगळे करता येत नाही, करू नयेही. ‘विषयाकडे’ ह्या प्रास्ताविकात लेखकाने तीच भूमिका घेतली असे जाणवते. पण विवेचनात संबंधित तत्त्वज्ञ, विचारवंतांच्या संकल्पना, विचार आणि सैद्धांतिक इत्यादी योगदानावरच चर्चा बऱ्याचदा थांबते. त्या विचारांचा, समकालीन संस्था, समाजकारण इत्यादींवर जो प्रभाव आहे, (म्हणजे कृती) त्याबद्दल ग्रंथात फारसे विवेचन आढळत नाही. कदाचित प्रा.शिरवाडकरांनी स्वत:हूनच विषयमांडणीला तशी मर्यादा घालून घेतली असावी.

6. मार्क्सवादी समाजशास्त्रावर चर्चा (पृ. 131 ते 150) या ग्रंथात चांगली आहे, त्याचप्रमाणे ‘मार्क्सवादानंतरचा मार्क्सवाद’ (पृष्ठ 182 ते 195) हा भागही उत्तम झाला आहे. तथापि विकासाच्या समाजशास्त्रात ‘नवमार्क्सवाद’ अहमहमिकेने मांडणाऱ्या पॉल बारान, आन्द्रे गुंडर फ्रँक, समीर आमीन, हामझा अलावी, पॉल स्वीझी इत्यादींचा परामर्श ना समाजशास्त्र भागात झालाय, ना ‘मार्क्सवादानंतरचा मार्क्सवाद’ ह्या भागात, ही चोखंदळ वाचकाला मोठी त्रुटी जाणवेल, पण अशा कोशात्मक आढाव्यात तसे होणे अपरिहार्य आहे हेदेखील मान्यच करावे लागेल.

7. मिशेल फुको यांचा ‘ज्ञान आणि सत्ता’ विचार चांगल्या पद्धतीने थोडक्यात (203-05) विशद केला आहे, पण पुन्हा कृती आणि नीतिशास्त्राच्या बाबतीत एकंदरच उत्तर आधुनिकतावाद किती वरवरच्या उथळ पातळीवर आणि तेही काहीशा विकारी व्यक्तिवादी भूमिकेतून विचार करतो यावर लेखकाने भाष्य/ समीक्षा केली नाही, असे का? मिशेल फुको फार लहान वयात एडस्‌ रोगाने मृत्यू पावला हे कशाचे द्योतक मानायचे? ‘कृती’ची आपण समीक्षा करायची की नाही? पाश्चात्य विचारवंतांसमोर लोटांगण घालताना त्यांच्या कृतिजन्य स्वैराचारातून भारतीयांनी बोध घ्यायचा की नाही?

8. भाग 4- ‘आपला भारत’मध्ये नऊ शतकांच्या वैचारिक प्रवासाचा आढावा घेतला आहे. त्यात स्थूलमानाने दोन विभाग आहेत. एक- संतपरंपरा आणि दुसरा- आधुनिक भारताचे (1818 नंतरच्या) प्रबोधन युग. यातील पहिल्या विभागावर लिहिण्याइतपत माझे वाचन नाही, पण संतपरंपरेत लेखकाने मुख्यत्वे करून महाराष्ट्रावर भर दिला आहे. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू, दक्षिणेत त्यागराज आणि तिरुवलवार, उत्तरेकडे कबीर, तुलसीदास, सूरदास, राजस्थानात संत मीराबाई आणि गुजरातेत नरसी मेहता यांनी भक्तिसंप्रदायाला दिलेले योगदान काहीसे दुर्लक्षित राहिले असे कोणत्याही वाचकाला वाटेल. अर्थात कबीर, नानक, महात्मा बसवेश्वर ह्यांच्यावर विस्तृत विवेचन आले आहे, याची नोंद घेतलीच पाहिजे.

8.1 दुसऱ्या भागात ‘आधुनिक भारताचा उष:काल’ ही चर्चा राजा राममोहन रॉय यांच्यापासून सुरू होऊन महात्मा गांधींवर संपते (पृष्ठे 245-268). प्रबोधनाचे हे सगळ्यांत महत्त्वाचे पर्व- ह्या चर्चेत दोन महत्त्वाच्या त्रुटी जाणवल्या. एक म्हणजे युरोपमधील प्रबोधन युग आणि वसाहतिक कालखंडातील भारतातील प्रबोधन युग यांच्यातील साम्यस्थळे कोणती आणि महत्त्वाचे फरक कोणते? याचा ऊहापोह कुठेही नाही. दुसरे म्हणजे ‘समाजसुधारणा’, ‘स्त्रियांचे समाजातील स्थान’ (संमतीचे वय, विधवा विवाह, केशवपन इत्यादी) हे प्रश्न आणि जातिविषमता निर्मूलन तसेच धर्मचिंतन/समीक्षा हे दुसऱ्या भागातले कळीचे मुद्दे जर आपण मान्य केले तर बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख), विष्णुबुवा ब्रह्मचारी, न्या.काशिनाथ त्र्यंबक तेलंग, डॉ. रा. गो. भांडारकर, न्या. चंदावरकर, पंडिता रमाबाई, रे. टिळक, मुख्य म्हणजे हा आढावा गांधींवर न थांबता डॉ. आंबेडकरांचे धम्मचक्रपरिवर्तन आणि महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्यापर्यंत आणायला हवा होता असे मला वाटले. भारतीय विचार-विश्व गांधींनंतर थांबत नाही हे महत्त्वाचे. अर्थात समकालीनता कितपत आणायची याच्या मर्यादा अखेर लेखकालाच ठरवाव्या लागतात.

9. या ग्रंथात संदर्भ ग्रंथांची यादी नाही, तसेच नाम-विषयसूची नाही. ह्या त्रुटींमुळे एक संदर्भग्रंथ म्हणून वाचणाऱ्याला अनेकदा अडचणी येतात. लेखकाने हा ग्रंथ या त्रुटींसह प्रकाशकाला छापू दिला याचेच आश्चर्य वाटते. माझे जे मुद्दे व्यासंगी संशोधकांना आणि अभ्यासकांना ‘अज्ञानजन्य’ वाटतील त्याकडे दुर्लक्ष करावे.

Tags:  bharatache prabhodanyug भारताचे  प्रबोधन युग markswadi samajshastra मार्क्सवादी समाजशास्त्र . Ibna khaldun इब्न खालदून isalamache yogadan इस्लामचे योगदान’ maharshi vvyas महर्षी व्यास nitishastra नीतिशास्त्र dnyannirmmitishastra ज्ञाननिर्मितिशास्त्र sattashastra सत्ताशास्त्र apale vicharvishwa आपले विचारविश्व’ tatvadyan तत्त्वज्ञान D.N dhangare द. ना. धनागरे vyasangi sanshodhanavr adharalela grantha व्यासंगी संशोधनावर आधारलेला ग्रंथ pustak parichay पुस्तक परिचय weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

द. ना. धनागरे

(1936 - 2017) समाजशास्त्राचे अभ्यासक, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु,भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव. ‘भारतातील शेतकऱ्यांच्या चळवळी (1920-50)’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. 30 वर्षे विदर्भातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके