डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विवेकवाद व तत्त्वनिष्ठा यांचा संगम

त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या संकल्पनेत विवेकवाद आणि तत्त्वनिष्ठा यांचा संगम सामावलेला होता. मुख्य म्हणजे- कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना, त्यांना मार्गदर्शन करताना ते स्वत:ला ‘कार्यकर्त्यांपैकीच एक’ अशा भूमिकेतून पाहत असत. आपण कोणी मोठे विचारवंत, पुढारी आणि कार्यकर्ते म्हणजे पावलावर पाऊल टाकणारे अनुयायी- असे द्वैत दाभोलकरांना मान्य नसे. कार्यकर्त्यांपासूनसुद्धा काही चांगले घेण्यासारखे, शिकण्यासारखे असते, अशा विश्वासाने ते काम करीत.

 

वैचारिक प्रगल्भतेचा समृद्ध वारसा महाराष्ट्राला आहे आणि याचा प्रत्येक मराठी माणसाला सार्थ अभिमान वाटतो. महाराष्ट्र आणि बंगाल या दोन प्रांतांमध्ये 19व्या शतकातच प्रबोधन- युगाची मुहूर्तेढ रोवली गेली. साम्राज्यशाही आणि वसाहतवादाचे समर्थन करणाऱ्या गोऱ्या परकीय राज्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न काही क्रांतिकारकांनी केले. त्यात सशस्त्र उठाव आणि काही हिंसा झाल्या, नाही असे नाही; परंतु अखेर विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेल्या ब्रिटिश राज्यसत्तेला हिंसक पद्धतीने आव्हान देणे कठीण आहे, हे स्वा. तात्यासाहेब सावरकरांनाही पटले होते.

ब्रिटिशांना विरोध करीत असतानाच आपल्याच भारतीय समाजात शतकानुशतके चालत आलेल्या, पण काही बुरसटलेल्या रूढी-परंपरा, स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना, अंधश्रद्धा आणि कालबाह्य झालेल्या संस्थांना तपासून पाहण्याची गरज आहे; आपल्यातच सुधारणा आवश्यक आहेत, याचीही जाण येत गेली. विचारांचा लढा हा वैचारिक पातळीवरच लढला गेला पाहिजे, हे आपल्या विचारवंतांना पटू लागले. त्यासाठी इंग्रजांशी टक्कर देताना त्यांच्यातल्या काही चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत, हे ध्यानात आले. त्यामुळे प्रबोधनयुगात महाराष्ट्रातील चर्चाविश्व विस्तारले गेले. त्यांत जगन्नाथ शंकरशेट, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, महात्मा जोतिबा फुले, बाळशास्त्री जांभेकर, न्या. रानडे, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यापासून ते छ. शाहूहाराज, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, न्या. तेलंग, गोपाळ कृष्ण गोखले, भांडारकर, म. विठ्ठल रामजी शिंदे, बॅ. जयकर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेकांचे बहुोल योगदान आहे.

या सर्व विचारवंतांनी-समाजसुधारकांनी आपापल्या वैचारिक भूमिकेशी एकनिष्ठ राहून परिवर्तनाच्या वाटचालीत लहान-मोठ्या चळवळी केल्या, साहित्य निर्माण केले, संस्था उभारल्या, कट्टर कार्यकर्ते घडविले. त्यांच्यात आपापसांत मतभेद होते; काही वेळा टोकाच्या भूमिका घेतल्या गेल्या, त्यामुळे प्रत्येकाची वाट वेगळी झाली. कधी ते एकत्र येऊन लढले, तर कधी दुरावले. मात्र विचार पटत नाही म्हणून तो संपविण्यासाठी हिंसेचा आश्रय कोणी घेतला नाही किंवा अति-असहिष्णुतेतून उत्पन्न होणाऱ्या शारीरिक हत्येचेही कोणी समर्थन केले नाही.

महाराष्ट्रापुरताच विचार करायचा म्हटले, तर वैचारिक मतभेद अथवा संघर्ष यांना वादसंवादाच्या पातळीवर ठेवण्याच्या परंपरेला काही अपवाद निश्चित झाले. त्यांत सगळ्यात मोठा अपवाद नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या केल्याचा. त्या दुर्भाग्यपूर्ण घटनेची गर्द सावली महाराष्ट्रावर आजही पडल्याचे दिसते.

महात्मा गांधीजींच्या हत्येला काही प्रमाणात भारताच्या विभाजनाची पार्श्वभूमी होती. त्यांचे पट्टशिष्य मानलेले पं. जवाहरलाल नेहरू किंवा सरदार पटेल ती फाळणी थांबवू शकले नाहीत. त्यातच ‘नौखालीत घडलेली जातीय दंगल आणि नव्याने निर्मिती झालेल्या पाकिस्तानला भारताने आपल्या राखीव निधीतून कोट्यवधींची रक्कम द्यावी हा महात्माजींचा आग्रह’ या दोन घटनांनी आगीत तेल ओतल्यासारखे झाले! नथुराम गोडसेंच्या अविवेकी कृत्यामागे हिंदुत्ववादी संघटना कितपत जबाबदार होत्या?- हा प्रश्र्न चौकशी समित्यांनी निकालात काढला आणि निर्दोषत्व सिद्ध झालेल्या संघटनांवरची बंदी भारत सरकारने हटवली. तरीही धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवीत पक्षीय राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी गांधीहत्येचे खापर हिंदुत्ववादी विचार आणि संघटनांवर फोडण्याचे आजही थांबवलेले नाही.

दुसरे उदाहरण पुण्यातच झालेल्या जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्येचे. खरे तर खलिस्तानवादी भिंद्रनवाले यांनी शिखांच्या सुवर्णंदिरात ठाण मांडून कब्जा केलेला असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरूनच अमृतसर येथे भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’द्वारे खलिस्तानी आतंकवाद्यांपासून सुवर्णंदिर मुक्त केले होते. पण जनरल अरुणकुमार वैद्य आणि नंतर इंदिरा गांधी यांनाही त्याची किंमत चुकवावी लागली. आज खलिस्तानवाद इतिहासजमा झाला, हद्दपार झाला की निद्रितावस्थेत आहे, याबाबतची चर्चा इतक्यात आणि इथे न केलेली बरी! 

परंपरेला गालबोट 

या दोन घटनांचा अपवाद सोडला, तर राजकीय हत्येची परंपरा महाराष्ट्रात नाही. काही प्रमाणात मुंबई-पुण्यातील राजकारणाने जेव्हा टोळीयुद्धाचा आश्रय घेतला, त्या वेळी किंवा स्थानिक पातळीवर कामगार संघटना व सहकारसंस्थाधिष्ठित राजकीय-आर्थिक संघर्षात काही खून, हत्या झाल्या (उदा.दत्ता सांमत हत्या); पण एखाद्या समाजसुधारणा चळवळीची वैचारिक मांडणी गैरसोईची वाटल्यामुळे दुखावल्या गेलेल्या व्यक्ती-संस्थांनी एका परिवर्तनवादी चळवळीच्या अग्रदूताचा काटा काढण्याचे प्रकार आजवर तरी स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. मात्र 20 ऑगस्ट 2013 या रक्षाबंधनाच्या दिवशीच सकाळच्या सुमारास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. या धक्कादायक घटनेुळे महाराष्ट्राच्या वैचारिक सहिष्णुतेला कायमचे गालबोट लागले, असेच म्हणावे लागेल.

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या नरेंद्र दाभोलकरांनी गेली 25 वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन- म्हणजे समाजसुधारणा- विवेकवादाच्या दिशेने नेण्याची पहिली पायरी मानली आणि त्या कामात सर्वस्व झोकून दिले होते.

दाभोलकरांचे घराणे सुधारणावाद्यांचे असले, तरीही उदारमतवादाची कास सातत्याने धरून काम करणाऱ्यांचे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी ज्यांचा परिचय झाला होता किंवा जवळून संबंध आला, त्यांना हे माहीत असणार की, डॉक्टरांची मांडणी सुस्पष्ट असे. कोणालाही दुखावणारा अपशब्द त्यांच्या तोंडातून निघत नसे किंवा कोणावरही अवमानकारक टिप्पणी ते करीत नसत. आपली आग्रही भूमिका मांडतानासुद्‌धा डॉ. दाभोलकर स्वत:च्या संयमाची मर्यादा कधी सोडत नसत. स्वत:ची भूमिका ठामपणे मांडताना चर्चेच्या दरम्यान वातावरण फार गंभीर किंवा तणावपूर्व झाले असे जाणवताच दाभोलकर नर्मविनोदपूर्ण किस्सा सांगून संवाद हसत-खेळत पुढे नेत.

डॉ. दाभोलकरांची कार्यपद्धती वैशिष्ट्यपूर्ण होती. परिवर्तनवादी विचार, तो समाजात रुजविण्यासाठी उभ्या केलेल्या संस्था आणि कामे त्यांना अधिक महत्त्वाची वाटत होती. व्यक्तीचे अतिस्तोम माजवणे त्यांना मान्य नसे. अनौपचारिक चर्चेतसुद्धा ते स्वत:बद्दल- स्वत:चे छंद, आवडीनिवडी यांबद्दल- कधीही उल्लेख करीत नसत. उदाहरणार्थ- गेल्या 10-12 वर्षांत माझ्या व त्यांच्या अनेकदा भेटी झाल्या- सोबत चहा, फराळ, जेवण झाले; पण डॉक्टर एक उत्तम कबड्डीपटू/खेळाडू आहेत/होते, हे मला माहीत नव्हते. त्यांच्या अमानुष हत्येनंतर साप्ताहिक साधनाचा विशेष स्मृतीअंक प्रसिद्ध झाला, त्यातील काही लेखांधून मला ते समजले. सतत ध्येयासक्त वृत्तीमुळे अंनिसच्या आणि ‘साधना’च्या कार्यकर्त्यांशी सारखा संवाद हाच त्यांचा श्वास होता आणि तोच त्यांचा ध्यास. 

वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती 

गेली 35 वर्षे माझे पुण्यात वास्तव्य आहे. त्यामुळे अंनिसच्या कामाबद्दल मी ऐकून होतो, त्याबद्दल थोडेफार वाचलेसुद्धा होते. ‘माणसाची सत्यनिष्ठा आणि तत्त्वनिष्ठा किती अविचल आहे याचे मोजमाप, ती व्यक्ती किती निर्भयपणे आणि ती निष्ठा स्पष्टपणे व्यक्त करते यावरून करावे’, असे महात्मा गांधी म्हणत असत : ‘Fearlessness is the first precondition of freedomof expression.’ या निकषावर डॉ. दाभोलकरांची तत्त्वनिष्ठा पुरेपूर सिद्ध झालेली होती.

त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या संकल्पनेत विवेकवाद आणि तत्त्वनिष्ठा यांचा संगम सामावलेला होता. मुख्य म्हणजे- कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना, त्यांना मार्गदर्शन करताना ते स्वत:ला ‘कार्यकर्त्यांपैकीच एक’ अशा भूमिकेतून पाहत असत. आपण कोणी मोठे विचारवंत, पुढारी आणि कार्यकर्ते म्हणजे पावलावर पाऊल टाकणारे अनुयायी- असे द्वैत दाभोलकरांना मान्य नसे. कार्यकर्त्यांपासूनसुद्धा काही चांगले घेण्यासारखे, शिकण्यासारखे असते, अशा विश्वासाने ते काम करीत.

मला आठवते त्याप्रमाणे माझी व डॉक्टरांची पहिली अनौपचारिक भेट शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयात झाली. बहुधा एप्रिल 1996चा काळ असावा. मी त्या पदावर रुजू होऊन जेमतेम 4-5 महिने काय ते झाले होते. एके दिवशी सकाळी 11च्या सुमारास ‘डॉ. श्रीराम लागू, निळुभाऊ फुले आणि डॉ. दाभोलकर असे तिघे मला भेटू इच्छितात’, असे स्वीय सचिवांनी मला सांगितले. या तीन नावाजलेल्या व्यक्ती कुलगुरूंना भेटायला आल्यात, ही बातमी प्रशासकीय भवनात वायुवेगाने पसरली. ते भेटीला येणार किंवा कोणत्या कामासाठी येणार याची मला पूर्वसूचना किंवा कल्पना नव्हती. तरी पण क्षणाचाही विलंब न लावता मी त्यांचे स्वागत केले. चहा घेत असताना डॉ. दाभोलकरांनी भेटीमागील हेतू स्पष्ट केला. ती सदिच्छा भेट नव्हती, हे माझ्या लगेचच ध्यानात आले. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी विद्यापीठातर्फे ज्या कॉलेजमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत राष्ट्रीय समाजसेवा शिबिरे, अभ्यासवर्ग आयोजित केले जातात; त्यांध्ये अंनिसच्या कार्यकर्त्यांना एक-दीड तासाच्या सत्रात भाषण देण्याची संधी विद्यापीठाने द्यावी’, अशी विनंती करायला ते तिघे आले होते.

‘अंनिस’च्या कार्याबद्दल छापील परिपत्रक/प्रसिद्धिपत्रक व त्यासोबत समितीचे औपचारिक पत्र त्यांनी मला दिले आणि ‘हे परिपत्रक एनएसएस केंद्र असलेल्या सर्व महाविद्यालयांना विद्यापीठाने पाठवावे’, असे सुचविले. सुमारे अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर तिघेही फारसा गाजावाजा न करता परत गेले. प्रशासकीय कामकाजात त्यांच्या भेटीमुळे व्यत्यय येणार नाही याची त्यांनी काळजी घेतली.

मी नंतर विद्यार्थी-कल्याण विभागाचे अधिष्ठाता प्रा. शरद नावरे यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही अंनिसचे परिपत्रक सर्व महाविद्यालयांकडे विद्यापीठाच्या आदेशवजा पत्रासह लगेचच पाठविले. या घटनेनंतर आठ दिवस उलटले आणि विद्यापीठाने पाठविलेल्या परिपत्रकावर एक वेगळीच, काहीशी अनपेक्षित प्रतिक्रिया मला समजली. त्याच संदर्भात नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोल्हापुरातील दोन कार्यकर्ते (त्यांची नावे आता मला आठवत नाहीत) आणि संघपरिवातील एक कार्यकर्ता असे मला भेटायला आले.

‘‘अंनिस ही समाजवादी विचारांच्या मंडळींनी सुरू केलेली चळवळ, त्यांचे कार्यकर्ते- विशेषत: दाभोलकर संघपरिवारावर सतत आगपाखड करीत असतात. कुलगुरू आदेशावरून अंनिसचे परिपत्रक महाविद्यालयांकडे आदेश म्हणून पाठविले गेले- याचा अर्थ विद्यापीठ त्यांच्या वैचारिक भूमिकेचे समर्थन करतेय, असे आम्ही समजायचे काय?’’

त्या तिघांनी असा प्रश्र्न मला विचारला. त्यांच्या प्रश्र्न विचारण्यात आक्रमकता जरी नव्हती, तरी आवेश होता. एवढेच नाही, तर ‘तुम्ही (म्हणजे कुलगुरू धनागरे) संघ-संस्कारित कुटुंबातले असताना असा निर्णय तुम्ही कसा घेतला?’ हा प्रश्र्नसुद्धा त्यांच्या पहिल्या प्रश्र्नात गर्भित होताच.

माझ्या आठवणीप्रमाणे संघकार्यकर्ते म्हणून सुहास जोशी आले होते. एक समंजस, सहृदयी व्यक्ती म्हणून ते सर्वांना परिचित होते. फार पुढे-पुढे न करता चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक ते न चुकता करायचे. माझ्या कुलगुरुपदावरील पाच वर्षांच्या कालावधीत मला पदावरून हटविण्यासाठी राजकीय हेतूने  प्रेरित झालेली आंदोलने तीन-साडेतीन वर्षे सातत्याने होत राहिली. या अग्निदिव्यात सुहास जोशी खंबीरपणे माझ्या पाठीशी राहिले होते. त्यांना सोबत घेऊन अभाविपचे कार्यकर्ते मला भेटायला आणि अंनिसच्या परिपत्रकावर प्रतिक्रिया द्यायला आले, म्हणून मी जरा बुचकळ्यात पडलो!

माझ्याकडून प्रतिसाद मिळण्यापूर्वीच- ‘‘जर आम्हीही अशाच प्रचारकी थाटाचे परिपत्रक महाविद्यालयांना पाठविण्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडे दिले, तर ते तुम्ही तुमच्या आदेशासह सर्व महाविद्यालयांना पाठवाल का?’’ असा सवाल त्यांनी लगेचच केला.

अतिशय शांतपणे मी म्हणालो, ‘‘तुम्हाला कोणते परिपत्रक पाठवायचे आहे, ते मला दाखवा; त्यातला आशय माझ्या विवेकबुद्धीला पटणारा असेल, तर सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मी निर्णय घेईन याची खात्री बाळगा. अंनिसचे परिपत्रक प्रचारकी स्वरूपाचे असले तरीही समाजात धर्मभावनेची ढाल वापरून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तीला त्या चळवळीचा विरोध आहे. लोकांनी विवेक जागा ठेवून निर्णय घ्यावेत, अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे मलाही वाटते.

विद्यापीठ हे सर्व प्रकारच्या विचारविनिमयासाठी/चर्चेसाठी एक खुले व्यासपीठे आहे, असे मला वाटते. अंनिसचे काम चांगले आहे; ते धर्मविरोधक नाही, श्रद्धेला त्यांचा विरोध नाही. अभाविप किंवा संघपरिवाराला कशा प्रकारच्या प्रचारासाठी परिपत्रक पाठविणे अपेक्षित आहे ते मला सांगा, ते पत्रक मला दाखवा. मी त्यावर नक्की योग्य तो निर्णय घेईन.’’ माझा प्रतिसाद त्यांना सकारात्मक वाटला असावा. मात्र माझ्या कुलगुरुपदावरील कार्यकाळात त्यांनी कुठलेही परिपत्रक माझ्याकडे आणले नाही, त्यामुळे प्रश्र्न मिटला! त्यानंतर 1996ची एनएसएस शिबिरे उन्हाळ्यात झाली. महाविद्यालयांनी भरविलेल्या या शिबिरांतून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी व्याख्याने दिली. मात्र 1996 नंतर 2005 पर्यंत पुन्हा माझा डॉ. दाभोलकरांशी अथवा अंनिस चळवळीशी संबंध आला नाही. 

नरेंद्र दाभोलकरांची ‘साधना’

दि. 1 नोव्हेंबर 2000 रोजी मी कुलगुरुपदावरील कार्यकाळ संपवून पुण्यात परत आलो. तसा मी साधना साप्ताहिकाचा वाचक नव्हतो, मी वर्गणीदार तर नव्हतोच नव्हतो. मात्र ग. प्र. प्रधानांचा, का कोण जाणे, माझ्यावर विलक्षण लोभ होता. अधून-मधून कुठल्याशा कार्यक्रमात त्यांची भेट होत असे, तेव्हा ते आस्थेने चौकशी/विचारपूस करायचे. शिवाजी विद्यापीठातील अग्निदिव्याच्या काळात भीतीने अनेक जण माझ्यापासून अंतर राखून राहिले; मात्र प्रधानसर विद्यापीठाच्या निमंत्रणावरून एकदा आणि आणखी एकदा कोणत्या तरी कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले. त्या दोन्ही वेळी प्रधानसर कुलगुरू निवासात भेटीस आले. ‘कुलगुरू धनागरे संघपरिवाराशी संबंधित आहेत’, असा पूर्वग्रह बाळगून त्यांनी कधी दुरावा केला नाही. बहुधा 2003 मध्ये प्रधानसरांच्या पत्नी मालविकाबार्इंचे निधन झाले. त्या वेळी शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी मी व माझी पत्नी सांत्वनपर भेटीसाठी प्रधानसरांकडे गेलो होतो. ‘आयुष्यात माणूस संग्राहक वृत्तीने पैसा आणि वस्तू/वास्तू साठवत जातो’- या नियमाला फार थोडे अपवाद असतात. प्रा. प्रधान त्यांध्ये लक्षणीय अपवाद म्हणता येतील.

प्रधानसरांनी विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या आवडत्या प्राध्यापकी पेशाला प्रथम तिलांजली दिली. अध्यापन आणि राजकारण यांची कधी गल्लत केली नाही. वसंत बापट व प्रधानसरांनी साधना साप्ताहिकाच्या संपादकत्वाचा राजीनामा देऊन 1998 मध्ये साप्ताहिक साधनाला 50 वर्षे झाली त्यावेळी डॉ.नरेंद्र दाभोलकरांकडे संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली. अखेरीस तर ‘इदं न मम’ या भावनेने प्रधानसरांनी त्यांच्या सदाशिव पेठेतल्या राहत्या घराचे दानपत्र साधना ट्रस्टच्या नावे करून ते स्वत: साने गुरुजी रुग्णालय (हडपसर) येथे राहायला गेले.

त्या घटनेनंतर माझा साप्ताहिक ‘साधना’शी संबंध आला तो केवळ योगायोगाने. श्री गंधर्ववेद प्रकाशन या संस्थेने 65 चरित्रग्रंथांचा संच प्रसिद्ध करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2005 मध्ये हाती घेतला होता. त्यासाठीच्या पहिल्या नियोजन बैठकीत डॉ.अरुण टिकेकर, भाजपचे अरविंद लेले, प्रा.गं.ना.जोगळेकर, डॉ.नवलगुंदकर, डॉ.प्र.ल.गावडे आणि मी याच्यासोबतच युवा लेखक-कार्यकर्ते विनोद शिरसाठ, अभय टिळक वगैरेंसुद्धा उपस्थित होते. महाराष्ट्र चरित्र ग्रंथांच्या संचाची संपादकीय जबाबदारी डॉ.टिकेकर, मी आणि प्रा.प्र.ना.परांजपे यांच्यावर त्या बैठकीत सोपविली गेली. त्या बैठकीत माझा ‘साधना’चे आता मुख्य संपादक म्हणून नेमलेले विनोद शिरसाठ यांच्याशी परिचय झाला.

श्री गंधर्ववेद प्रकाशनाच्या खाडिलकर बंधुद्वयांनी एकीकडे समाजवादी, दुसरीकडे संघपरिवाराशी संबंधित मंडळी आणि तिसरीकडे सिद्धहस्त पत्रकार, साहित्यिक-लेखक अशा तिनांची मोट बांधून त्यांचा प्रस्तावित ग्रंथ-संच प्रकल्प पाच वर्षांच्या कालावधीत पूर्णत्वास नेला. त्याच काळात त्या  प्रकाशन संस्थेतील एका अनौपचारिक बैठकीत विनोद शिरसाठ यांनी ‘सर, तुम्ही तुमचे उच्चशिक्षण क्षेत्रातील अनुभव, त्यासंबंधीचे चिंतनविचार लेखमालेच्या स्वरूपात ‘साधना’साठी लिहावे’, असे मला सुचवले.

असे लेख लिहिण्याची माझीही इच्छा होती. मात्र मला दर आठवड्यात एक लेख देणे शक्य होणार नाही; दर महिन्याला एक, जमल्यास दोन लेख देईन- ही माझी अट साधनातर्फे त्यांनी मान्य केली. ‘मी संघपरिवारातला, त्यामुळे माझे लेख छापणे समाजवादी परंपरेतल्या साधना नियतकालिकांत छापणे मानवेल किंवा नाही, यासंबंधी स्पष्ट खुलासा डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी करावा,’ असेही मी सुचविले. मला लेख लिहिण्यासंबंधी औपचारिक पत्र आले, पण त्यात माझे शंकानिरसन झाले नव्हते. माझ्या लेखाचे शीर्षक बदलण्याचे स्वातंत्र्य मी साधनाच्या संपादकांना दिले होते; मात्र मजकुरात काटछाट झालेली मला खपणार नाही, हीसुद्धा अट मी घातली होती. शेवटी डॉ.दाभोलकरांचा मला फोन आला. ‘‘अहो सर, तुमच्या लेखात काटछाट करायची कोण हिंमत करेल? तुम्ही ‘साधना’साठी अवश्य लिहा. लेखमाला सुरू करण्याची मी हमी देतो.’’ त्यांच्या आग्रहामुळे मी दोन वर्षे लेखमाला लिहिली, नंतर लोकवाङ्‌मयगृह प्रकाशनाकडून त्याचे पुस्तकही आले. साधना साप्ताहिकाचा प्रत्येक अंकाचा मजकूर डॉ.दाभोलकर स्वत: काळजीपूर्वक (मुद्रणालयासाठी पाठविण्याआधी) नजरेखालून घालीत असत.

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या कारभाराबद्दल आणि प्राचार्यांच्या नियुक्तीसंदर्भातील माझा लेख छापण्यापूर्वी त्यांचा मला फोन आला. त्यात काही ठिकाणी मला नेमके काय म्हणायचेय आणि महाविद्यालयांची संख्या व न नेमलेल्या प्राचार्यांची संख्या याचा त्यांना ताळमेळ लागेना, म्हणून त्यांचा फोन होता. मी सर्व खुलासा केला, तो त्यांना पटला आणि नंतरच तो लेख छपाईसाठी पाठविण्यात आला, हे मला आवर्जून सांगितले पाहिजे. तसा डॉ.दाभोलकरांच्या कामाचा व्याप मोठाच होता. अंनिस चळवळीमुळे महाराष्ट्रभर त्यांचे दौरे सतत सुरू असत. साधना ट्रस्टचे एक विश्वस्त म्हणूनही कार्यालयीन काम बरेच असे. ‘अंनिस’साठी केलेली आंदोलने, भाषणे आणि लेखनासंबंधी न्यायालयीन अनेक खटले सुरू होते. सभा-बैठका, कार्यक्रम तर न संपणारे. तशातच अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या विविध पुरस्कारांसाठीची निवडप्रक्रिया साधना ट्रस्टकडे सोपविण्यात आली. पण त्याचाही कारभार नरेंद्र दाभोलकरांनी अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि तटस्थपणे सांभाळला, याचाही उल्लेख केलाच पाहिजे. 

वैचारिक भूमिकेतही सहिष्णुता 

डॉ.दाभोलकर स्वत: उत्तम लेखक होते. त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले. काहींच्या दोन-तीन किंवा अधिक आवृत्त्या निघाल्या. ते सर्व ग्रंथ मी वाचले नाहीत; मात्र त्यांचा ‘तिमिरातुनि तेजाकडे’ हा ग्रंथ मी अथपासून इतिपर्यंत वाचला. पुण्यात एस.एम.जोशी सभागृहात त्या ग्रंथाच्या झालेल्या प्रकाशन समारंभात ज्येष्ठ रंगभूमी व चित्रपट अभिनेते डॉ.मोहन आगाशे, अभिनेत्री अमृता सुभाष, प्रा.रा.ग.जाधव आणि मी असे चारजण वक्ते म्हणून दाभोलकरांसोबत व्यासपीठावर होतो. आधी अभिनेत्यांची भाषणे, नंतर रा.ग.जाधव बोलले, लेखक म्हणून डॉ.दाभोलकरांनी सुरुवातीलाच स्वत:ची भूमिका मांडली. मला बोलण्याची संधी सगळ्यात शेवटी दिली गेली. 15-20 मिनिटांत मी मांडणी केली. त्यात प्रामुख्याने-

1. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा पुसट असते.

2. अंधश्रद्धा निर्मूलनाचा आग्रही विचार मांडताना एकाच धर्माला टीकेचे लक्ष्य केले जात आहे, असा लोकांचा समज होता कामा नये आणि

3. केवळ धर्मचिकित्सेद्वारा अंधश्रद्धा निर्मूलन होणे शक्य नाही, तर त्यासाठी लोकशिक्षणाचे प्रभावी कार्य होणे आवश्यक आहे-

असे काही मुद्दे मी मांडले. बोलताना मी डोळ्याच्या कोपऱ्यातून ‘डॉ.दाभोलकरांची काही बरी-वाईट प्रतिक्रिया दिसते का?’ हे पाहत होतो. तेव्हा डॉक्टर स्वत: माझ्या भाषणाची टिपणे घेत आहेत, असे मला दिसले. कार्यक्रमानंतर ‘छान!’ या एका शब्दात त्यांनी समाधान व्यक्त केले. मला कृतकृत्य वाटले.

उच्च-नीच जातींची उतरंड असो किंवा वर्णव्यवस्था आणि समाजातील तत्सम भेदाभेद; हे जसे समाजवाद्यांना मान्य नाहीत, तसे संघपरिवारालाही मान्य नाहीत. साम्यवादी, मार्क्सवादी, समाजवादी व प्रखर राष्ट्रवादी (हिंदुत्ववादी) विचारांच्या गटांनी आणि मंडळींनी भारतीय समाजाची वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक जडणघडण लक्षात घेऊन भारताच्या अभ्युदयासाठी एकत्र येऊन संवाद साधणे गरजेचे आहे, असे मला गेली चार दशके सारखे वाटते. यूजीसीतर्फे अभ्यागत प्राध्यापक म्हणून 1981 मध्ये मी रशियाला (त्या वेळच्या सोव्हिएत युनियनमध्ये) गेलो होतो. तिथेही मॉस्को,  लेनिनग्राड, ताश्कंद इत्यादी ठिकाणी झालेल्या भाषणांत आणि अनौपचारिक चर्चेत मी अशा संवादाची गरज असल्याचे जाणीवपूर्वक मांडले. अखेर साम्यवादी-समाजवादी विचारधारा उराशी बाळगून क्रांती घडवून आणणारे लेनिन, माओ त्से तुंग, स्टालिन यांनी सुप्तपणे आपला रशियन किंवा चीनचा राष्ट्रवाद असा जोपासला; तसाच तो व्हिएतनामच्या हो चि मिन्ह यांनी, युगोस्लाव्हियात मार्शल टीटो, चिलीमध्ये डॉ.अय्यंदे, अल्जीरियात फ्रँझ फेनॉन, मेक्सिकोत फिडेल कॅस्ट्रो यांनीही बाळगला. थोड्याफार फरकाने तेच झेकोस्लोव्हाकिया, पोलंड, बल्गेरिया आणि उत्तर कोरियात घडले. ‘कॉमिनटर्न’ (कम्युनिस्ट इंटरनॅशनल) ही जागतिक साम्यवादी संघटना असतानासुद्धा बुडाशी राष्ट्रवादी भावना सजग होतीच, ती कायम राहिली.

असे असताना ‘राष्ट्रवाद, राष्ट्रभावना ही प्रतिगामी आणि साम्यवाद-समाजवाद हा पुरोगामी’ असा विचार आम्हा भारतीयांच्या गळी का उतरविला जातोय, हेच उमगत नाही. समाजवाद आणि राष्ट्रवादी भूमिकांचा समन्वय होण्याची एक शक्यता जून 1975 ते मार्च 1977 या आणीबाणीच्या काळात निर्माण झाली होती. कारागृहात सगळ्यांनाच डांबलेले होते. काही वैचारिक आदान-प्रदान झालेही. त्यातून जनता पक्षाचा प्रयोग झाला, तो दोन-अडीच वर्षे यशस्वी ठरला. मात्र ‘संघ-जनसंघ अशी दुहेरी निष्ठा जनता पक्षात चालणार नाही’ या मधु लिमयांच्या भूमिकेने त्याला खोडा घातला. मात्र, पुढे नानासाहेब गोरे यांनी ‘डॉ.हेडगेवार पुरस्कार’ (रुपये एक लाख) स्वीकारला, तेव्हा पुन्हा एकदा वैचारिक भूमिका वेगळ्या ठेवूनही सामंजस्यपूर्ण वैचारिक संवाद सुरू होईल असे वाटले होते; पण तसे आजवर झाले नाही, ही एका अर्थाने शोकांतिका म्हटली पाहिजे. 

उणीव भासत राहणार 

समाजवादी वैचारिक धोरण उराशी बाळगून पक्षीय राजकरण करणे, हा डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा पिंड नव्हता. समाजवादी-उदारमतवादी अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ व संघटना उभी करताना जो कोणी तो विचार स्वीकारेल, त्याला सोबत घेऊन चालण्याची त्यांची तयारी असे. ‘वयं पंचाधिक शतम्‌’ हीच त्यांची भूमिका असावी. अर्थात ‘अंनिस’ ही व्यापक परिवर्तनवादी चळवळीचा अविभाज्य घटक आहे, असे ते मानीत. मात्र त्यांना अभिप्रेत असलेला परिवर्तनवादी विचार नेमका कोणता, कोणत्या दिशेने नेणारा- या प्रश्र्नांचा ऊहापोह करण्याची संधी मला मिळाली नाही.

साधना परिवारातर्फे आयोजित प्रत्येक कार्यक्रमात, उपक्रमांत माझा सहभाग असलाच पाहिजे, असा डॉ.दाभोलकरांचा आग्रह असे. त्यांचे ज्येष्ठ बंधू (ज्यांना नरेंद्र दाभोलकर पितृतुल्य मानीत असे) माजी कुलगुरू प्रा.देवदत्त दाभोलकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम इच्छेनुसार प्रत्येकी रुपये एक लाख रकमेच्या तीन शिष्यवृत्त्या साधना ट्रस्टतर्फे संशोधनासाठी तरुण कार्यकर्त्यांना दिल्या जाव्यात, असे ठरले. त्याची जाहिरात दिली गेली. अर्ज आले. त्याच्या निवड समितीवरच नव्हे, तर निवड केलेल्या संशोधकांना मार्गदर्शनही ज्यांनी करावे असे अपेक्षित होते; त्यांत माझा समावेश आवर्जून केला गेला. या सर्व निर्णयप्रक्रियेत डॉक्टर दाभोलकरांचा उत्साही सहभाग होता. संशोधन हे ‘ग्रामीण शिक्षण’, ‘कोरडवाहू शेतीचे प्रश्र्न/समस्या व उपाय’ आणि महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेला ‘एन्रॉन’ विद्युत्‌प्रकल्प या तीन विषयांवर व्हावे, असे अपेक्षित होते. या सर्व चर्चेत भाग घेऊन डॉक्टर त्यांची मते मांडत. इतरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत. चर्चा चार-पाच तास चालत असे. मग आम्हा सर्वांसोबत ते भोजनाला यायचे. त्यांच्या या साधेपणातही किती मोठे सामंजस्य आणि सहिष्णुतेचा आशय दडलेला असे; अन्यथा माझ्यासारख्या संघपरिवाराच्या संस्कारांत वाढलेल्या माणसाला त्यांनी एवढे जवळ का करावे? ‘आपल्या कामासाठी कोणाचा तरी उपयोग होतो ना; मग त्याचा वापर करून घ्या’, अशी त्यांची धारणा मुळीच नव्हती.

माणसे जोडण्याचा त्यांना नादच होता, असे म्हणता येईल. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ मानणाऱ्या स्वा.सावरकरांचा आक्रमक हिंदुत्ववाद जरी डॉ.दाभोलकरांना मान्य नसला तरी ‘भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व’ अशी भूमिका स्वीकारणारा राष्ट्रवाद मात्र त्यांना अमान्य नसावा. परिवर्तनवादी व्यापक चळवळीत ही सहिष्णुता जपण्याला आवश्यक असा संवाद सुरू करण्याची मानसिकता आणि क्षमता डॉ.नरेंद्र दाभोलकरांकडे निश्चितच होती. त्यांच्या अशा अकल्पित (मात्र योजनापूर्ण) हत्येुळे वैचारिक संवादप्रक्रियेत त्यांची उणीव यापुढे दीर्घ काळ जाणवत राहणार, हे निश्चित. 

Tags: द. ना. धनागरे अंधश्रद्धा निर्मूलन विवेकवाद व तत्त्वनिष्ठा यांचा संगम da. Na. Dhanagare andhasraddha nirmulana Vivekavada va tattvaniṣṭha yannca saṅgama weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

द. ना. धनागरे

(1936 - 2017) समाजशास्त्राचे अभ्यासक, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु,भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव. ‘भारतातील शेतकऱ्यांच्या चळवळी (1920-50)’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. 30 वर्षे विदर्भातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके