डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्ञाननिर्मितीचे प्रयोजन आणि शिक्षकाची भूमिका

उत्कृष्ट शिक्षक असूनही ते आदर्श नाहीत/नव्हते याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास, महाभारतातील द्रोणाचार्यांचे नाव घेता येईल. धनुर्विद्येच्या क्षेत्रात त्यांच्यासारखा उत्कृष्ट शिक्षक दुसरा नव्हता, पण ज्यांना शिकवण्यासाठी द्रोणाचार्यांना नियुक्त केले होते, त्या कौरव-पांडवांपेक्षा अधिक चांगली तयारी एकलव्याची झालेली पाहून द्रोणाचार्यांना त्यात एक तर स्वत:चाच शिक्षक म्हणून पराभव झाल्याच्या भावनेने ग्रासले म्हणा, किंवा राजपुत्रांपेक्षा सरस अशी विद्या तळागाळातून वर आलेल्या एकलव्याने कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आत्मसात करून दाखवली हे राजघराण्याच्या इभ्रतीला हानिकारक ठरेल अशी भीती वाटली असावी म्हणून, द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे ‘गुरुदक्षिणा’ म्हणून ‘उजव्या हाताचा अंगठा कापून मला दे’ अशी मागणी केली. तशी गुरुदक्षिणा मागण्यात द्रोणाचार्यांनी अध्यापकाचा धर्म पाळला नाही आणि दुसरे म्हणजे शिक्षकाने शिरोधार्य मानावे अशा व्यावसायिक नीती-मूल्यांशी अक्षम्य तडजोड केली. मुख्य म्हणजे प्रत्यक्षात एकलव्याला द्रोणाचार्यांनी मुळात धनुर्विद्या शिकवलेलीच नव्हती. त्यामुळे गुरुदक्षिणा मागण्याचा त्यांना नैतिक अधिकार तरी कुठे होता? उत्कृष्ट शिक्षक हा ‘आदर्श शिक्षक’ असतोच असे नाही हे त्यामुळेच.

एक उत्तम आदर्श शिक्षक, अध्यापक वा प्राध्यापक कसा असावा? या  प्रश्नाचे सर्वमान्य असे उत्तर देणे तसे कठीणच आहे. मात्र त्याच्या व्यवच्छेदक लक्षणांचा शोध घेण्याचा प्रयत्न नक्कीच करता येईल. प्रतिवर्षी  5 सप्टेंबर हा ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतभर पाळला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांचा तो जन्मदिवस. त्यांच्या तत्त्वज्ञानातील, विशेष:त  भारतीय दार्शनिक परंपरेच्या अभ्यासातील व्यासंग विद्वत्मान्य होता. ते एक उत्तम प्राध्यापकही होते. ऑक्सफर्ड विद्यापीठामधील भारतीय तत्त्वज्ञानाच्या अध्यासनावर नियुक्ती होणारे ते पहिले भारतीय प्राध्यापक होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि वक्तृत्व अनुभवण्यासाठी आणि ऐकण्यासाठी केवळ विद्यार्थीच नव्हे, तर डॉ. राधाकृष्णन यांचे सहकारी प्राध्यापकसुद्धा उत्सुक असत. ब्रिटिश संसदेपुढे व्याख्यान देण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले होते. असा बहुमान फारच थोड्या भारतीय राजकारणी व मुत्सद्यांना आजवर मिळाला आहे. अशा थोर प्राध्यापक-मुत्सद्दी(academician- statesman) व्यक्तीचे स्मरण चिरंतन/निरंतर होत रहावे म्हणून त्यांच्या जन्मदिनी ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो. निदान भारत सरकार शिक्षकदिनाचे हेच ‘अधिकृत स्पष्टीकरण’ म्हणून सांगत असते.

मात्र लगेचच मनात प्रश्न येतो की, ‘गुरुपौर्णिमे’ च्या दिवशीसुद्धा विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या शिक्षक/प्राध्यापकांना अभिवादन करतात; कोणी पुष्पगुच्छ देऊन तर कोणी भेटकार्डाच्या माध्यमाद्वारे शिक्षकांना शुभेच्छा देतात. केंद्रशासन आणि राज्यशासनही ‘प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय’ अशा वेगवेगळ्या विभागातून आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांचा सन्मान करते. पुरस्कार-प्रदान सोहळा नंतर होत असेल/होतो; मात्र ‘गुरुपौर्णिमा’, ‘गुरुपूजन’ आणि ‘गुरुदक्षिणा’ या संकल्पना भारतीय विद्यार्जन आणि विद्यादान परंपरेत रूढ झालेल्या आहेत. भारतीय पंचांगात गुरुपौर्णिमेच्या दिनविशेषांत ‘व्यासपूजादिन’ असेही लिहिलेले असते. याचा अर्थ काय? व्यास हे उत्तम, शिक्षक होते काय? एक ज्ञानव्रती गुरुवर्य म्हणून महर्षी व्यासांची महती नेमकी कोणती? एक शिक्षक म्हणून वेदव्यासांचे कोणते कार्य आजच्या शिक्षकांच्या- प्राध्यापकांच्या पिढीलासुद्धा प्रस्तुत आणि कालसुसंगत वाटेल?

व्यासांच्या कार्याची व्याप्ती

नमोऽस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र:

येनत्वया भारततैलपूर्ण: प्रज्वलितो ज्ञानमयप्रदीप:।।

भगवद्‌गीतेच्या प्रार्थनेत प्रथम व्यासांना वंदन केले जाते, कारण ‘महाभारतरूपी तेलाने त्यांनी ज्ञानदीपच प्रज्वलित केला आहे’ असे कृतज्ञतापूर्वक म्हटले जाते. पण‘महाभारत’ ह्या व इतर पुराणांचे रचनाकार एवढीच व्यासांची ओळख नाही. ज्ञानाच्या सर्वच शाखांचा धांडोळा व्यासांनी घेतलाय. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न आणि प्रवास करून वेद आणि वेदोत्तरकालीन अभिजात मौखिक परंपरांचे संहितेत रूपांतर केले, दस्तावेजीकरण (Documentation) केले; त्यावर संशोधनकेले. व्यासांमुळेच प्राचीन भारतातील विस्मृतीत गेलेल्या विविध विद्या, शास्त्रे आणि कलांचे पुनरुज्जीवन तर झालेच, पण वेदवेदांगांचे संकलन-संपादन आणि विभाजनाचे प्रचंड कार्य त्यांनी केल्यामुळेच आजपर्यंत भारतीय संस्कृती अबाधित राहिली, तिचे सातत्य अक्षुण्ण राहिले असे मानले जाते.

असे हिमालयाच्या उंचीचे काम एक व्यक्ती तिच्या मर्यादित जीवनकाळात कसे करू शकेल? हे कार्य तर शतकानुशतके पुरले असेल. त्यामुळे काही प्राच्यविद्यापंडित असेही मानतात की, ‘हस्तिनापुरालगतच्या प्रदेशात पराशरमुनी आणि नाव (नौका) चालवणारी एक धीवर (कोळी) कन्या सत्यव्रती, यांच्या कामसंगातून जो पुत्र जन्माला आला तोच वेदव्यास आणि त्याचा जन्मकाल सामान्यत: इसवीसन पूर्व 3100 असावा’ (संदर्भ : पहा भारतीय संस्कृतिकोश, खंड 9, (1993), पृष्ठ 156.) अर्थात ही पुराणकथा (Mythology) आहे. तिला ऐतिहासिक सत्य मानले तरीही वेद-वेदोत्तर वाङ्‌मयाचे संकलन, संशोधन आणि संपादनाचे कार्य आटोक्यात यायला शतकेच नाही, तरी एक सहस्रक सहज लागले असावे. त्यामुळे ‘व्यास’ हे वैचारिक परंपरेचे, सिद्धांतन आणि अभ्यास-संशोधनपद्धतीचे (School of thougts) द्योतक असावे; म्हणजेच मूळ पुरुष व्यासऋषी जरी असले, तरीही नंतर मात्र त्यांच्या व्यासंगाचा वारसा सांगणारा ‘व्यास’ हा एक बौद्धिक संप्रदाय झाला असावा. कारण देवी भागवतात एकूण 28 व्यासांची नामावली दिलेली आहे आणि त्यातली आठ-दहा नावे ही आज गोत्र-नामे म्हणूनच सांगितली जातात. (पहा, संस्कृतिकोष,पूर्वोल्लेखित, पृष्ठ 156).

मुख्य म्हणजे व्यासांची परंपरा महाभारताची संहिता करून थांबली नाही तर, त्या महाकाव्यात वर्णिलेल्या घटना, कथा ‘व्यासपीठा’वरून अनेक प्रवचने, भाषणे देऊन तिने त्या जनमानसात कायम घर करून बसतील असा प्रयत्न अव्याहतपणे केला. त्याद्वारे लोकांना ‘धर्म’ म्हणजे काम, ‘नीतिमत्ता’, ‘मानव आणि सृष्टी यांचा परस्परसंबंध’, ‘जन्म-मरण’ यांबद्दल लोकशिक्षण होईल असा प्रयत्न केला. जेणेकरून पुढे हरिकथा, कीर्तन-प्रवचनांद्वारे बुद्धिवंतांचा अभिजनवर्ग आणि सर्वसामान्य लोक यांच्यातील दरी कमी करून भारतात एकात्मता साधली जाईल. तसेच ‘प्रेम, मैत्री, उद्यमशीलता, मानवता-मूल्यांची जोपासना, राष्ट्रीय सौहार्द आणि नीतिशिक्षणाचा प्रसार-प्रचार ह्या व्यासपरंपरेने केला आहे’ (पहा- संस्कृतिकोश, पूर्वोल्लेखित, पृष्ठ 159). म्हणूनच ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्‌’- म्हणजे जगातले सर्व ज्ञान व्यासांनी उष्टे करून सोडलेय असेही म्हटले जाते.

याचा अर्थ असा होतो की, व्याससंप्रदायाने/परंपरेने उत्कृष्ट लोकशिक्षक निर्माण केले. त्यांनी फक्त शास्त्रे, वाङ्‌मय, कला जोपासल्या एवढेच नाही, तर त्या लोकांना शिकवल्या, धर्म, नीती यासंबंधीच्या कल्पना प्रत्यक्ष आचरणात कशा आणायच्या ते स्वत:चा आदर्श लोकांसमोर ठेवण्याकरिता त्यांनी प्रथम आत्मसात केल्या, आपले वागणे आणि बोलणे यांच्यात विसंगती असता कामा नये हे जनमानसात बिंबवले. ह्या अर्थाने ‘व्यास’ हे उत्कृष्ट आणिआदर्श शिक्षक होते असे म्हणता येईल. ‘उत्कृष्ट’ आणि ‘आदर्श’ ही दोन स्वतंत्र विशेषणे आहेत. त्यांना ‘एकाच नाण्याच्या दोन बाजू’ असे म्हणता येत नाही. तसेच एकात दुसरे सामावलेले असतेच असेही गृहीत धरता येत नाही. याचा अर्थ ‘आदर्श’ शिक्षक हा ‘उत्कृष्ट’ अध्यापक असेलही, पण जो शिक्षक उत्तम अध्यापन करतो, (म्हणजे ज्याचा विषयाचा अभ्यास अद्ययावत तर आहेच,पण तो विषय विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याची कला आणि हातोटीही त्याच्याजवळ आहे) त्याला ‘उत्कृष्ट’ अध्यापक म्हणता येईल. यात्र तो ‘आदर्श’ असेलच हे सांगता येणार नाही. एखाद्या अध्यापकाला विद्यार्थ्यांनी ‘आदर्श’ मानणे हे त्याच्या व्यासंग आणि अध्यापन कौशल्याव्यतिरिक्त त्या पलीकडच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित असते. शिक्षकाचे वर्तन, चारित्र्य, विद्यार्थी-विद्यार्थिंनींशी असलेले निकोप संबंध, त्याचा प्रामाणिकपणा, त्याची नि:स्पृहता, ज्ञाननिष्ठा आणि ज्ञानदान ह्यांनाच अध्यापकी व्यवसायाचा मूलाधार मानून स्वत:चे कर्तव्य नि:स्पृहपणे करणे, ही आदर्श शिक्षकाची लक्षणे सर्वसामान्यपणे मानली जातात.

उत्कृष्ट शिक्षक असूनही ते आदर्श नाहीत/नव्हते याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास, महाभारतातील द्रोणाचार्यांचे घेता येईल. धनुर्विद्येच्या क्षेत्रात त्यांच्यासारखा उत्कृष्ट शिक्षक दुसरा नव्हता. म्हणूनच कौरव-पांडवांना त्या विद्येत पारंगत करण्यासाठी द्रोणाचार्यांवर जबाबदारी टाकण्यात आली होती. मात्र ते प्रशिक्षण सुरू असताना एकलव्य दुरूनच ती विद्या आत्मसात करीत होता. राजकुलात, तेही क्षत्रियांच्या कुळात त्याचा जन्म झालेला नव्हता म्हणून धनुर्विद्येचे शिक्षण राजगुरूंकडून, म्हणजे द्रोणाचार्यांकडून घेण्याचा त्याला अधिकार नव्हता. पण तरीही दुरूनच निरीक्षण करून एकलव्य त्या विद्येचा अभ्यास आणि सराव करू लागला. दंतकथा अशी सांगितली जाते की, द्रोणाचार्यांना मनाने ‘गुरू’म्हणून स्वीकारून गुरूंच्या साक्षीने आपण धनुर्विद्येचा अभ्यास करावा ह्या हेतूने एकलव्याने त्यांची एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीसमोर, तिच्या साक्षीने तो धनुर्विद्येचा सराव करू लागला. काही काळानंतर द्रोणाचार्यांना हे कळले आणि त्यांनी एकलव्याची परीक्षा घेतली तेव्हा एकलव्याने कौरव-पांडवांपेक्षा अधिक सरस ठरेल असे प्रावीण्य मिळविल्याचे त्यांच्या ध्यानात आले. पण ज्यांना शिकवण्यासाठी द्रोणाचार्यांना नियुक्त केले होते, त्या कौरव-पांडवांपेक्षा अधिक चांगली तयारी एकलव्याची झालेली पाहून द्रोणाचार्यांना त्यात एक तर स्वत:चाच शिक्षक म्हणून पराभव झाल्याच्या भावनेने ग्रासले म्हणा, किंवा राजपुत्रांपेक्षा सरस अशी विद्या तळागाळातून वर आलेल्या एकलव्याने कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आत्मसात करून दाखवली हे राजघराण्याच्या इभ्रतीला हानिकारक ठरेल अशी भीती वाटली असावी म्हणून, द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे ‘गुरुदक्षिणा’ म्हणून ‘उजव्या हाताचा अंगठा कापून मला दे’ अशी मागणी केली. ती पूर्ण केल्यानंतर निरुपयोगी झालेल्या हाताने एकलव्य प्रत्यंचा कधीच ओढू शकला नाही. तशी गुरुदक्षिणा मागण्यात द्रोणाचार्यांनी अध्यापकाचा धर्म पाळला नाही आणि दुसरे म्हणजे शिक्षकाने शिरोधार्य मानावे अशा व्यावसायिक नीती-मूल्यांशी अक्षम्य तडजोड केली. एक तर त्यांनी विशुद्ध आणि निरपेक्ष ज्ञानदानाचे व्रत मोडले; आणि दुसरे म्हणजे विद्याभ्यासातील प्राविण्याचे तौलनिक मूल्यांकन करताना शिक्षणबाह्य निकष वापरले, म्हणजे राजघराण्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचे किंवा ते अबाधित राखण्याचे राजकारण त्यांनी केले. अन्यथा त्यांनी ‘अंगठा कापून दे’ अशी दक्षिणा एकलव्याकडे मागितली नसती. मुख्य म्हणजे प्रत्यक्षात एकलव्याला द्रोणाचार्यांनी मुळात धनुर्विद्या शिकवलेलीच नव्हती. त्यामुळे गुरुदक्षिणा मागण्याचा त्यांना नैतिक अधिकार तरी कुठे होता? उत्कृष्ट शिक्षक हा ‘आदर्श शिक्षक’ असतोच असे नाही हे त्यामुळेच. एका आदर्श अध्यापकाने असा व्यवहार कधीच केला नसता.

शिक्षक आणि सद्‌गुरू

पारमार्थिकतेच्या संदर्भात आणि भक्तिमार्गात काही महापुरुषांना, सिद्धी प्राप्त व्यक्तींना ‘सद्‌गुरू’ म्हणून यानले जाते. ज्याला साक्षात्‌ ईश्वराचे दर्शन झाले आहे, किंवा तशी अनुभूती आहे त्याला सद्‌गुरु समजले जाते. ते त्यांच्या शिष्यांना अनुग्रह देतात, मंत्र सांगतात, नामस्मरण-जपजाप्य करायला सांगतात. शिष्यसुद्धा सद्‌गुरूंची/महाराजांची पाद्यपूजा करतात आणि त्यांची कृपादृष्टी रहावी म्हणून त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानतात. दैनंदिन जीवनात अडीअडचणी आल्या, संकटे आली की सद्‌गुरूंच्या प्रतिमेसमोर प्रार्थना केली की सर्व संकटे दूर होतील अशी श्रद्धा बाळगतात. किंबहुना जोपर्यंत एखादा शिष्य आपले ‘मी-पण’ विसरत नाही तोपर्यंत त्याला सद्‌गुरूंच्या कृपेची अनुभूती होत नाही, प्रचिती खऱ्या अर्थाने येणार नाही असे यानले जाते. (संदर्भ- पहा श्री ब्रह्मचैतन्म महाराज गोंदवलेकर,‘पारमार्थिक शंका समाधान’, गोंदवले, फेब्रुवारी 2004, पृष्ठ. 10-12). एका अर्थाने सद्‌गुरूही आपल्या शिष्यांना काहीतरी शिकवीत असतो, खऱ्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग कोणता, मन एकाग्रचित्त कसे करावे, माझे ‘मी-पण’ कसे सद्‌गुरूंच्या चरणी समर्पित करावे याबद्दल, म्हणजे आत्मबोध कसा होतो/होऊ शकेल, हेच शिकवीत असतात. मात्र सद्‌गुरू आणि त्यांच्या शिष्यांमध्ये साध्य-साधकाचे, किंवा सेव्य सेवकाचे नाते असते.

आजच्या काळाच्या संदर्भात अध्यापक आणि विद्यार्थ्यांचे नाते मात्र तसे नसते. शिक्षक उत्तम असला, उत्तम आचरणाद्वारे विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करीत असला, म्हणजे त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना आदर वाटतो. कदाचित ‘शिक्षकदिनी’ किंवा ‘गुरुपौर्णिमे’ला शिक्षकाच्या घरी जाऊन ते त्याला अभिवादन, चरणस्पर्शही करतील. तरीही त्यांचे नाते साध्य-साधकाचे नसते. शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप विद्यार्थ्यांवर पडू शकते, त्याचे वागणे त्यांना अनुकरणीयही (‘रोल मॉडेल’सारखे) वाटेल. तरीपण शिक्षकाला आपण आध्यात्मिक/पारमार्थिक अर्थाने ‘सद्‌गुरू’म्हणत नाही, किंवा विद्यार्थी त्यांचे भक्त नसतात. आणि विद्यार्थ्याला भावी आयुष्यातील वाटचालीसाठी शिक्षक-प्राध्यापकाने ‘प्रमाणपत्र’ जरी दिले, तरी त्याने विद्यार्थ्याला ‘अनुग्रह’ दिला, ‘कानमंत्र’ दिला असा शब्दप्रयोग आज शैक्षणिक विश्वात सहसा कोणी वापरत नाही.

याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांना एखादा विषय तन्ममतेने शिकविणारा अध्यापक जाणते-अजाणतेपणाने त्यांच्यावर संस्कार करीत असतो, त्यांना घडवीत असतो. ह्या संस्कारनिर्मिती प्रक्रियेचा परिणाम कालांतराने दिसतो, पण तिचे निश्चित मोजमाप संख्मात्मक पद्धतीने कधीच करता येत नाही. किंवा त्या प्रक्रियेचे चित्रीकरणही करणे शक्य नसते. तरीही शिक्षक विद्यार्थ्याला घडवतो, त्याच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतो हे सत्य नाकारता येत नाही. या संदर्भात एका ख्रिस्ती धर्मोपदेशकाची गोष्ट फार समर्पक आहे. एकदा एक धर्मोपदेशक खेड्यातून पाऊलवाटेने (शेतामधून) धर्मप्रसाराच्या कामासाठी चालला होता. तिथे त्याला एक राबणारा शेतकरी दिसला. त्याचे हिरवेगार, बहरलेले, समृद्धीने नटलेले शेत-पीक पाहून तो धर्मोपदेशक शेतकऱ्याला म्हणाला, ‘ही समृद्धी, तुझ्या शेतातलं हे उत्तम बागायती पीक म्हणजे परमेश्वराची कृपा आहे!’ शेतकऱ्याला त्याची ती बोजड भाषा समजली नाही. पण हा ख्रिस्ती धर्मोपदेशक आपल्या बहरलेल्या शेताबद्दल चांगले बोलतोय असे त्याला जाणवले. तेव्हा शेतकरी म्हणाला, ‘बरोबर आहे, मी परमेश्वराचा ऋणी आहे, त्याचीच ही कृपा आहे हे सर्व खरं, पण जेव्हा हे शेत पूर्णपणे परमेश्वराच्या मालकीचं होतं, आणि त्याच्याच ताब्यात होतं तेव्हा या शेताची दशा तुम्ही बघायला हवी होती. ‘म्हणजे शेतकऱ्याच्या प्रयत्नाशिवाय काही ते शेत हिरवंगार झालेलं नव्हतं; तिथली समृद्धी त्याच्या कष्टातून साकारलेली होती. आपण ‘प्रयत्नांती परमेश्वर’ असं म्हणतो, पण ‘समृद्धी ही काही दैवी देणगी नसते, ती माणसाच्या कष्टाचीच कमाई असते. तसेच शिक्षक विद्यार्थी घडवतो म्हणजे तो दैवी कृपाप्रसाद नसतो. तर शेतकऱ्याने शेताची जशी मशागत केलेली असते, पिकांची राखण केलेली असते, त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतो. त्यानेच विद्यार्थ्यांची ‘मशागत’ केलेली असते, त्यांना घडविलेले असते.

‘शिक्षक’: एका व्यापक अर्थाने

केवळ वर्गात नियोजित तासांवर जाऊन एखाद्या विषयावर भाषण देणे, किंवा शिकवणे एवढेच ‘शिक्षका’कडून अपेक्षित आहे का?जर आपल्या अंगिकृत कार्यात इतरांना गोडी लावून त्या कामाचे महत्त्व पटवून देणे आणि त्या कामाची प्रेरणा देणे हेसुद्धा चांगल्या शिक्षकाचे एक लक्षण असेल, तर मग इतिहासात अशा अनेक थोर व्यक्ती-विभूती होऊन गेल्या. ज्या लौकिकार्थाने शिक्षकी पेशात नव्हत्या, पण त्यांनी ध्येयासक्तीच्या झपाटलेपणाने हाती घेतलेल्या कामासाठी इतरांना उद्युक्त केले असेल, तर एका अर्थाने त्या व्यक्तीलाही आपण शिक्षक म्हणू शकू. लौकिकार्थाने जरी ती व्यक्ती शिष्य तयार करीत नसली, तरीही ती ‘लोकशिक्षक’ म्हणूनच कार्य करीत असते, मान्यता पावते. ह्या अर्थाने अब्राहम लिंकन, चर्चिल,लेनिन, जोसेफ मॅझिनी, महात्मा गांधी, पं.जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा योगी अरविंद, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांच्यापासून तर जे कृष्णमूर्ती, महर्षी रमण, रवींद्रनाथ टागोर, विठ्ठल रामजी शिंदे, पांडुरंगशास्त्री आठवले, मदर तेरेसा, बाबा आमटे हे सर्वशिक्षकच होते. ह्या सर्वांचे कार्यक्षेत्र वेगळे आणि कार्यपद्धती भिन्न होती तरीही ह्या सर्वांमध्ये एक समान धागा होता. प्रचंड ध्येयासक्ती, अविचल अशी मूल्यश्रद्धा आणि त्यासाठी स्वत:च्या जीवनामध्ये किंमत मोजण्याची सिद्धता हे तीन गुणधर्म समान आहेत/होते, म्हणून त्या व्यक्ती थोर आहेत. मात्र अशा थोरांची जीवनचरित्रे वाचताना आपण एक गोष्ट बरेचदा विसरतो की, शाळा-कॉलेजातून किंवा विद्यापीठांमधून कार्यरत असलेले उत्कृष्ट आणि आदर्श शिक्षक सुद्धा त्या थोर व्यक्तींची, स्थानिक पातळीवरची, प्रतिरूपेच असतात. त्यांनीसुद्धा अशीच जीवननिष्ठा आयुष्यभर जोपासलेली असते. स्वत: व्यावसायिक नीतिमत्तेशी कधीही तडजोड न करता त्यांनी आपले जीवितकार्य केलेले असते. महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता, अथवा पुरस्काराची अपेक्षा न बाळगता, एक केवळ ध्यासपर्व म्हणून कर्तव्य पूर्ण केलेले असते/किंवा करीत असतात. व्रतस्थ वृत्तीने केलेल्या शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतरही ते स्वत:चे लेखन, वाचन, संशोधन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवतात; त्यात औपचारिक सेवानिवृत्तीचा अडसर ते होऊ देत नाहीत.

शिक्षक : एक कालसापेक्ष संस्कार

‘आदर्श शिक्षकाने निरपेक्ष ज्ञानसाधना/ज्ञानोपासना करावी, ज्ञाननिर्मिती ज्ञानप्रसाराचे कार्य करावे, वर उल्लेख केल्याप्रमाणे व्रतस्थ राहून अध्ययन अध्यापन करावे’ असे म्हणताना आपण प्राचीन/वेदकालीन ‘गुरुकुला’बद्दल स्वप्नरंजन तर करीत नाही ना?- असा प्रश्न मनात येतो. वर्तमान वास्तवापासून दूर नेणारे गुरुकुलातील आश्रम पद्धतीचे उदात्तीकरण आजच्या एकविसाव्या शतकारंभी निश्चितच कालसुसंगत नाही. ‘विद्या धनम्‌ सर्वधनप्रधानम्‌’ ही मानसिकता शिक्षकाची असली पाहिजे अशी अपेक्षा करताना शिक्षक आपल्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या किमान सुख-सोयी आणि निर्वाहाच्या बाबतीत चिंतामुक्त राहील अशी समाजव्यवस्थेची धारणा असली पाहिजे. मात्र अधाशीपणाने अनिर्बंध उपभोगाचा हव्यास, हा कितीही विकसित आणि समृद्ध देश असला, तरी तो पुरविणे त्याला शक्य नाही. भोगलालसेवर नियंत्रण हा कालसापेक्ष संस्कार प्रथम शिक्षकाने स्वत:त रुजवला पाहिजे, तरच तो त्याच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांप्रत पोहोचेल. कारण महात्मा गांधी आणि शूमाकर यांनी म्हटल्याप्रमाणे :- “There s enough to meet everyone’s need but not everyone’s greed’’ (संदर्भ- मोहनदास करमचंद गांधी, हिंद स्वराज, नवजीवनप्रेस, अहमदाबाद, 1989, पृष्ठे 8-31; आणि E. F. Schumancker, Small Is Beautiful- A study of Economics as if People Mattered लंडन; पेंग्विन/अबाकस, 1973, पृष्ठे84-96) ह्याचा अर्थ, आदर्श शिक्षकाने फाटक्या कपड्यात रहावे किंवा पोटाला चिमटा काढून जीवन व्यतीत करावे असा होत नाही. स्वत:च्या हक्कासाठी झगडणे, वर्तमानातील राहणीमानानुसार स्वत:चा दर्जा त्याला सांभाळता यावा ही त्याची अपेक्षा वाजवी आहे. तो मिळत नसल्यास आजच्या काळात स्वत:च्या मागण्यांसाठी आंदोलन, मोर्चा, संपासारखे मार्गसुद्धा अवलंबिण्यास हरकत नसावी. यात्र ते करताना समाजातील आपल्या भूमिकेचे मुख्य प्रयोजन नेमके काय आहे, याचा विसर पडू देता कामा नये. ‘विद्यार्थी, अध्ययन आणि अध्यापन’ ही उद्दिष्टे केंद्रस्थानी ठेवूनच आदर्श शिक्षकाने स्वत:च्या जीवनाची आखणी केली पाहिजे, अग्रक्रम ठरविले पाहिजेत. स्वत:च्या मागण्यांसाठी संप करताना वर्गात शिकवणे बंद करणे म्हणजे व्यावसायिक नीतिमत्तेला मूठमाती देण्यासारखे आहे. ते प्राथमिक दायित्व निभावून ज्या इतर मार्गांनी संघटितपणे संघर्ष करायचा असेल तो अवश्य करावा. (ही माझी भूमिका मी स्वतंत्रपणे एका लेखात, याच सदरातून यापूर्वी मांडलेली आहे. पहा-‘अंगलट आलेला प्राध्यापकांचा संप’, साधना, वर्ष 62, अंक 5, 12 सप्टेंबर 2009, पृष्ठे 8-12). मात्र वर्ग आणि शिकवणे बंद करून, म्हणजेच विद्यार्थ्यांना वेठीस धरून शिक्षकांनी आपल्या मागण्या पूर्ण करून घेणे कधीही समर्थनीय होणार नाही. नैतिकतेच्या पातळीवर तर ते निंदनीयच ठरेल.

तसेच ‘गुरूंपासून विद्याग्रहण करणे’ ही कल्पनासुद्धा आज नीट तपासून घेतली पाहिजे. प्राचीनकालीन गुरुकुलात मौखिक परंपरेतून शास्त्रे शिकली/शिकविली जात. त्यात पाठांतरांवर भर असे. तसेच कडक आचरणावरही होता. ‘गुरूंचे वाक्य, त्यांची आज्ञा प्रमाण मानून, त्यावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित न करता विद्याग्रहणाची दीक्षा दिली-घेतली जात असे. मात्र हे फक्त ‘ज्ञानार्जन’ झाले. नवीन ज्ञाननिर्मितीला अशी कडक आचारसंहिता फार पोषक नसते. मात्र एकविसावे शतक हे ज्ञाननिर्मितीचे शतक यानले जाते. नवज्ञाननिर्मिती (Knowledge production) हेच ज्ञानाधिष्ठित(Knowledge-based) समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आज ‘ज्ञाननिर्मिती’ची संकल्पना गुरुकुलातील गुरूपासून विद्यार्थ्याने ‘विद्याग्रहण’ करण्याच्या संस्कारापासून फार पुढे गेलेली आहे. आजच्या ज्ञाननिर्मितीमध्ये गुरू-शिष्य परंपरेतील एकतर्फीपणा राहिलेला नाही. गुरूवर्यांनी जे दिले ते ज्ञान प्रसादरूपाने स्वीकारावे, तेही निमूटपणे, हे आता कोणीही स्वीकारणार नाही. ‘एक ने कही दूजे ने  यानी, गुरुनानकजी कहे दोनो ग्यानी (ज्ञानी)’ हे ज्ञानसूक्त (सूत्र म्हणा) आज कोणालाही मान्य होणार नाही. ‘‘गुरूचा उपमर्द होईल असा प्रतिप्रश्न आधी केला जात नसे. आता नवज्ञाननिर्मितीचे मूळच ‘शंके’मध्ये (Doubt) आहे. शिक्षक जे शिकवेल ते निमूटपणे न स्वीकारता ‘प्रत्यक्ष-प्रयाण’ कितपत आहे? असे प्रश्न आणि शंका विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न झाल्या, त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली म्हणजेच अध्यापन परिणामकारक होत आहे, असे आज मानले जाते.

केवळ शंका उपस्थित करून चालणार नाही, तर त्यांचा पाठपुरावा करण्याची जिज्ञासा (Curiosity) सुद्धा शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये जागविली पाहिजे. ‘Doubts must be followed by curiosity’ विद्यार्थ्याने उत्तरे शोधली पाहिजेत, शंका-निरसन करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आवश्यक तेथे प्रयोग करून पाहिले पाहिजेत- तशी प्रेरणा विद्यार्थ्याला शिक्षकांकडून मिळणे गरजेचे आहे. शंका, जिज्ञासा, नवज्ञाननिर्मिती व त्यांतून विज्ञान (किंवा विज्ञानातील संकल्पना, सिद्धांतन आणि प्रमेय यांच्यात बदल) घडणे असाच विज्ञानाचा प्रवास आहे. तो एक जाणिवांचा प्रवास आहे. म्हणजेच शिकवणारा अध्यापक त्यांच्या विद्यार्थ्यांना अस्वस्थ करून सोडतो किंवा नाही हे महत्त्वाचे आहे. एका अर्थाने आज शिक्षकाच्या भूमिकेतच आमूलाग्र बदल झाल्याचे आज दिसत आहे. तो आदर्श शिक्षकाने आधी समजून घेतला पाहिजे. ‘शिष्मात इच्छेत्‌पराजयम’ ह्या म्हणीत असाच ज्ञाननिर्मितीतील बदल अपेक्षित आहे. (संदर्भ- पहा. द.ना.धनागरे, ‘समर्पित शिक्षक म्हणजेच ब्रह्मवादिन:’, गणितशिक्षण, वर्ष 26, अंक 4, मार्च 2003, पृष्ठे IV-V)

झपाटलेपण आणि भूमिकांची अदलाबदल

आजच्या संदर्भात व्यावसायिकता, व्यवहार आणि किमान लाभाचा विचार एका उत्तम व आदर्श शिक्षकाने केला तर ते समजण्यासारखे आहे, पण विद्यार्थ्याच्या बाबतीत ‘जेवढ्यास तेवढे’ वृत्तीने त्रयस्थासारखे शिक्षकाने वागणे अक्षम्य आहे. विद्यार्थी घडवायचा म्हटलं की त्यांच्या अध्यापकाने स्वत:ला गुंतवून घेणं ओघानेच येतं. फक्त शिक्षक-छात्र संबंध नियोजित तासाच्या 45-50 मिनिटांपुरता असतो असे मानून तास आटोपला की लगेच आपल्या मोटारसायकलवर स्वार होऊन महाविद्यालयातून निघून जाणे अशोभनीय आहे. विद्यार्थ्यांसाठी, स्पष्टीकरण द्यायला, विषय समजला नसेल तर तो तपशिलात जाऊन, सोपा करून समजावून सांगायला अध्यापकाने तास आटोपल्यानंतरही विद्यार्थ्यांसाठीउपलब्ध असायला हवे. आजचे बव्हंशी शिक्षक (अपवाद सोडल्यास) घड्याळी तासांच्या गणितामध्ये किंवा कार्यभाराच्या(Work -load) आवर्तनामध्ये गुंतलेले आढळतात!

प्रत्येक वर्ग हा शिक्षकासाठी एक नवा ज्ञानानुभव असायला पाहिजे. प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता विद्यापीठात भावतोष दत्त हे अर्थशास्त्राचे एक विख्यात प्राध्यापक होते. त्यांनी त्यांच्या एका आठवणीबद्दल लिहिलंय की, “Every class is a new experience for me” क्लास सुरू होण्याच्या अर्धा एक तास आधी मी पूर्णपणे बेचैन, झपाटून गेलेला असतो. बायकोने ‘जेवण चांगलं झालं होतं का?’ हे विचारणंही मला आवडायचं नाही. इतकं ते झपाटलेपण वर्ग सुरू होण्याआधीचं.’ ज्या अध्यापक-प्राध्यापकांना ‘कशाला आपण या व्यवसायात आलो’ अशी उपरती होत असेल, किंवा पश्चात्ताप होत असेल त्यांनी प्रा.भावतोष दत्त यांचा लेख अवश्य वाचावा. त्यात ते म्हणतात... “Good teachers are not born and they are not made either.. They have to make themselves good by their own effort. Such effort is largely individual but partly collective also. Groups which act in unison for maintaining and raising the standards and for making education socially relevant do exist and it is their will that we ultimately depend for the growth of skill, intellect and culture (संदर्भ- पहा भावतोषदत्त, ‘द ॲडव्हेंचर ऑफ टीचिंग’ ON Being a Teacher(संपादितग्रंथ, प्रा.अमरिक सिंग संपादक), दिल्ली : कोनार्क पब्लिशर्स,1990, पृष्ठ 13-29).

जर शिक्षकाने स्वत:ला, स्वप्रयत्नाने घडवायचे असेल तर त्याने ‘अध्यापनाआधी अध्ययन’ हे तत्त्व स्वीकारून ते अखंडपणे पाळले पाहिजे; म्हणजे उत्तम शिक्षक हा सर्वप्रथम उत्तम विद्यार्थी असला पाहिजे. त्याचा अभ्यास/अध्ययन सातत्याने सुरू असायला पाहिजे, तरच त्याच्या अध्यापनात नित्यनूतनता आणि ताजेपणा राहील. ‘माझा अध्ययन काळ संपला, मी ज्ञानार्जनाच्या परिसीमेला पोहोचलो आता अधिक काही ग्रहण करण्याची आवश्यकता नाही’ अशी भावना बाळगणे शिक्षकांसाठी आत्मघातकी ठरते. म्हणून ‘Teaching requires a profound inversion of roles ‘ ह्या म्हणीत भूमिका परावर्तित करणं, म्हणजेच प्राध्यापकांनी आधी चांगलं विद्यार्थी होणं आणि तसं सतत राहणं अभिप्रेत आहे. सतत प्रयोगशीलता, निर्माणक्षमता जोपासूनसुद्धा आपण जितके नवं ज्ञान ग्रहण करतो, तितकेच ‘आपण अजून किती अज्ञानी आहोत’ हे अधिक उमगायला लागते. जे कळले आहे त्यापेक्षा न कळलेले, म्हणजेच अज्ञानाचे क्षेत्र अधिक मोठे आहे. जॉन एफ. केनेडी यांनी एका ठिकाणी असे म्हटले आहे की, ‘Teaching is constantly a confessional activity.’ मी इतकं ग्रहण करून सुद्धा मी अजूनही किती अज्ञानी आहे’ हे प्रत्येकाने प्रांजळपणे, विनम्रपणे यान्य केले पाहिजे. तरच विद्यार्थ्यांची आणि अध्यापकांची बौद्धिक प्रगती कुठे थांबत नाही; कुंठित होत नाही.

ज्ञानप्राप्ती आणि अध्यापनाचे प्रयोजन

सरतेशेवटी ज्ञाननिर्मिती, ज्ञानोपासना, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान ह्यांनाच ‘साध्य’ यानले तरच त्याच्या प्रयोजनाकडे आणि उपयोगितेकडे समाजहिताच्या व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहणे शक्य होते. अध्यापकाची तशी जीवननिष्ठा विकसित होणे गरजेचे आहे. मात्र आज ‘ज्ञानाधिष्ठित समाजा’कडे आपली वाटचाल सुरू आहे. म्हणजे जो वस्तू (Commodity) उत्पादन करतो, त्याच्यापेक्षा वस्तू तयार करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि यंत्रे उत्पादन करणारे अधिक श्रेष्ठ आणि ज्यांच्याजवळ उत्पादनासाठी लागणारे भांडवल (Capital) आहे, त्यापेक्षा जे फक्त सेवा (Services) उत्पादन करतात, पुरवितात ते कमी दर्जाचे आहे असे मानले जाते. या सामाजिक उतरंडीत आता ‘जे ज्ञाननिर्मिती करतात ते सर्वांत वरच्या दर्जाचे, त्यांच्याच हातात यापुढे एकविसाव्या शतकात सर्व सत्ताकेंद्रित होणार आहे असे सांगितले जाते. ह्या मांडणीच्या मुळाशी ‘ज्ञान हे सत्तासंपादनाचे साधन’, (Knowledge as means of power) हे गृहीतक आहे. म्हणजेच ‘Knowledge is power’ असे मानले जात आहे.

अशा मांडणीत एका मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे असे वाटते. ‘ज्ञान हीच सत्ता’ हे तत्त्व मानून जरी मान्य केले तरीही त्या सत्तेचा वापर कशासाठी करायचा? त्या सत्तेचे खरे प्रयोजन काय? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. त्या सत्तेचा वापर जर समाजात वितुष्ट, संघर्ष आणि विकारी स्पर्धा वाढविण्यासाठी होत असेल, त्यातून जर समाजातील विविध घटकांचे ध्रुवीकरण (Polarisation) होतअसेल/होणार असेल किंवा त्या ज्ञानाचा वापर एका विशिष्ट वर्गाचे, जातीचे, धर्माचे किंवा वांशिक/भाषिक गटांचे इतरांवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी होत असेल तर त्या ज्ञाननिर्मिती आणि संपादनाच्या सामाजिक प्रयोजनाबद्दलच कुठेतरी गोंधळ आहे हे स्पष्टपणे जाणवते.

ज्ञाननिर्मिती आणि शिक्षणप्रक्रियेला त्या त्या समाजाच्या जीवनदृष्टीपासून (World view किंवा philosophy of lifeपासून) वेगळे करता येणार नाही. सांस्कृतिक वैविध्य असलेल्या भारतीय समाजात विविध गट, जाती, प्रजाती, वर्ग विकास प्रक्रियेत भिन्न पातळयांवर आहेत. त्या सर्वांना मान्य अशी एक जीवनदृष्टी असणे तसे अशक्यच आहे. त्यामुळे ज्ञाननिर्मिती आणि शिक्षणाला सामाजिक मूल्यांचे अधिष्ठान असलेच पाहिजे. ही मूल्ये -‘स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि सर्वधर्मसमभाव तसेच समान संधी आणि मानव अधिकार’ - आज सर्वत्र मान्यता पावत आहेत. एका उत्तम शिक्षकाने, भारतीय संविधानात शिरोधार्य मानली गेलेली ही मूल्ये, प्रथम स्वत: आत्मसात केली पाहिजेत. म्हणजे मग शिक्षक ती स्वत:च्या आचरणाद्वारे त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात यशस्वी होऊ शकेल. मग तो विद्यार्थी संतवाङ्‌मयाचा अभ्यास करीत असो, किंवा गणिताचा, कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा विद्यार्थी असो किंवा जैवतंत्रज्ञानाचा वा माहिती तंत्रज्ञानाचा; ज्ञाननिर्मितीबरोबरच मानवी मूल्यांचे बीजारोपण अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत होत गेले म्हणजे विद्यार्थी घडविण्यासाठी अध्यापकाला वेगळे काही करावे लागणार नाही.

सरतेशेवटी उत्तम आणि आदर्श अध्यापकाला ‘विद्वत्ता आणि पांडित्य’ हीच खरी समृद्धी वाटली पाहिजे. त्याबरोबर लौकिक लाभतो ह्यात शंका नाही. समाज आणि राज्यशासन अशा अध्यापकांची दखल घेतच असते. अर्थात ख्याती, पुरस्कार, गौरव इत्यादी सर्वच शिक्षकांना लाभतात असे नाही. मात्र आपले वाचन, लेखन, संशोधन, अध्यापन आणि निरपेक्ष भावनेने विद्यार्थी घडविणे हेच अध्यापकाने आपले खरे/मुख्य कार्यक्षेत्र मानले पाहिजे. त्याच्या अनुषंगाने इतर पदे, जबाबदारी मिळतील ते स्वीकारण्याचे, नाकारण्याचे स्वत:चे स्वातंत्र्य त्याने अबाधित ठेवावे. तथापि केवळ बुद्धिमत्ता, गुणवत्ता, विद्वत्ता असणे हे अध्यापकाला आवश्यक असले तरी ते पुरेसे नाही. त्याने विवेकाला स्मरून घेतलेल्या निर्णयाला तो पक्का राहिला पाहिजे. त्यावर ठाम राहण्याचा अर्थ त्या निर्णयाच्या परिणामामुळे त्याने वाटेल ती किंमत मोजण्याची सिद्धता ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. असे असले तरीही केवळ हिमालयासारखा निर्धार असणे उपयोगाचे नाही; तर आपले विचार, संकल्पना, सिद्धांत, नीतिमत्तेच्या कल्पना, जीवनविषयक दृष्टी प्रत्यक्ष कृतीत उतरवून तो अध्यापक दाखवू शकतो की नाही, म्हणजेच ‘उक्ती’ आणि ‘कृती’त जर सुसंगती असेल तरच त्याला स्वत:ची समाजातील भूमिका निश्चितपणे उमगली आहे असे म्हणता येईल. ज्याला आपल्या आयुष्याचे प्रयोजन कळले आहे त्याला संस्कृतमध्ये ‘ब्रह्मवादिन:’ असे म्हणतात. अशी व्यक्ती आपला विचार कृतीत आणून दाखवीत असते. या अर्थाने भारताच्या प्रबोधन युगातील बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, जगन्नाथ शंकर शेट, गोपाळकृष्ण गोखले, न्या.रानडे, महात्मा फुले, लो.टिळक, महात्मा गांधी, स्वा. सावरकर डॉ.आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, एवढेच नव्हे तर कवी कुसुमाग्रज, बाबा आमटे ह्या सर्वांनाच ‘ब्रह्मवादिन:’ असे म्हटले पाहिजे. त्यांच्यासारखेच प्रत्येक शिक्षकाला आपल्या जीवनाचे प्रयोजन समजले आणि उमगले पाहिजे तरच समाजाप्रती दायित्व पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली असे म्हणता येईल.

(लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक व कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

(डॉ.द.भि.कुलकर्णी संपादित ‘प्रा. श्री. या. कुळकर्णी स्मृतिग्रंथ’, पद्मगंधा प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित झाला आहे. त्या ग्रंथासाठी लिहिलेला हा लेख विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन ‘विद्येच्या प्रांगणात’ या सदरात प्रसिद्ध करीत आहोत.)

- संपादक

Tags: विद्यार्थी मानवी मूल्य शिक्षक भूमिका अध्यापक अध्ययन अध्यापन प्रक्रिया शिक्षण पद्धती शिक्षक द.ना. धनागरे Teachers view ज्ञानाधिष्ठित समाज Knowledge production student-teacher Teaching motto student philosophy of life शिक्षणप्रक्रिया नवज्ञाननिर्मिती Power Knowledge Teaching methods Teachers weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

द. ना. धनागरे

(1936 - 2017) समाजशास्त्राचे अभ्यासक, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु,भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव. ‘भारतातील शेतकऱ्यांच्या चळवळी (1920-50)’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. 30 वर्षे विदर्भातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके