डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रज्ञा-प्रतिभेच्या संगमावरचा प्रसन्न यात्री

शेवाळकरांनी वैचारिक पातळीवरसुद्धा प्रचलित सत्ता रचनेतील राजकीय मंडळींविरुद्ध जाहीरपणे भूमिका घेतली नाही. म.गांधी, आचार्य विनोबांपासून तर सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजींपर्यंत... बाबा आमटेंपासून साने गुरुजींपर्यंत, ए.बी.वर्धन, मधु लिमये, मधु दंडवतेंपासून तर दत्तोपंत ठेंगडींपर्यंत आणि बापूजी अण्यांपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत ते सगळ्यांचीच स्तुती करायचे. प्रत्येकाच्या चांगुलपणाचा, गुणांचा शोध तेवढा घ्यावा, छिद्रान्वेषीपणा माणसाला प्रगल्भ बनवीत नाही अशी त्यांची धारणा असावी. ‘पण लक्षात कोण घेतो?’

प्राचार्य राम शेवाळकर यांचे 3 मे 2009 रोजी सकाळी काहीसे अकस्मातच, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यादिवशी पुण्यातील ‘गांधीभवन’मध्ये सु. गो. तपस्वींच्या पुढाकाराने सुरू झालेल्या एका चर्चागटाची बैठक सुरू होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास तिथे उपस्थित असलेल्या डॉ. कुमार सप्तर्षींचा मोबाईल खणखणला आणि त्यांना नागपूर येथून एका मित्राने ही दु:खद वार्ता दिली. दोन मिनिटांनंतर माझ्याही मोबाईलवर माझ्या चिरंजीवांनी तीच बातमी सांगितली. तो स्टार, एनडीटीव्ही, आजतक, झी 24 तास इत्यादी वाहिन्यांवर आलटून-पालटून त्यांसंबंधीच्या दाखविल्या जाणाऱ्या चित्रफिती पाहत होता. बैठकीत हजर असलेल्या आम्हा तीसेक जणांना धक्का बसला, हळहळ वाटली. संपतच आलेल्या चर्चेनंतर शेवाळकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी वेळेची मर्यादा सांभाळून मीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि ऋजू स्वभावाचा आलेख मांडला. तेव्हा जे भरभरून सांगावेसे वाटत होते पण आवरते घ्यावे लागले, ते आता व्यक्त करतो.

शेवाळकर आणि धनागरे कुटुंबीयांचे संबंध निदान 60-70 वर्षांपासूनचे. रामभाऊंचे आजोबा मराठवाड्यातील कळमनुरी (नांदेड जिल्हा) लगतच्या कयाधु नदीच्या तीरावर वसलेल्या शेवाळा ह्या खेड्याचे. मूळ आडनाव धर्माधिकारी. वेदशास्त्रसंपन्न भाऊशास्त्री व्यासंगी प्रवचन-कीर्तनकार. त्यांचे मंत्रमुग्ध करणारे निरुपण एकदा ऐकल्यानंतर अचलपूर (एलिचपूर) येथील श्रीमंत देशपांडे जमीनदार मंडळींनी त्यांना विदर्भात वास्तव्याला आणले आणि धर्माधिकारी पुढे ‘शेवाळकर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. माझ्या वडिलांच्या बालपणी आर्थिक विपन्नावस्थेमुळे त्यांचे शिक्षण अमरावती येथे अंजनसिंगीकर देशपांडे कुटुंबाच्या आश्रयाने झाले. त्या वेळी त्यांचे अचलपूरला अधूनमधून जाणे झाले असावे, पण शेवाळकरांशी त्यांचा संबंध बराच नंतर म्हणजे 1930 व 1940 च्या दशकात आला.

माझे आजोबा (मातामह) कविरत्न माधव नारायण (ऊर्फ बापूजी डाऊ हे दारव्हा येथे वकिली करीत असत) आणि राम शेवाळकरांचे वडील भाऊशास्त्री यांनी वेदविद्या, प्रवचन-कीर्तनाचा घराण्याचा वारसा पुढे चालविला होता. कीर्तनाच्या निमित्ताने भाऊशास्त्री यवतमाळ, पुसद, दारव्हा, दिग्रस इत्यादी ठिकाणी प्रवासात असले, की त्यांचा मुक्काम हमखास दारव्ह्याला माझ्या आजोळी असे. माझ्या पुसट स्मृतीप्रमाणे मी भाऊशास्त्र्यांना 1943-44 च्या सुमारास एकदा आणि नंतर माझ्या आजोबांच्या निधनानंतर केव्हा तरी ते दारव्ह्यात आले असताना पुन्हा पाहिले होते. सत्पुरुषांची परंपरा आणि संस्कार त्यांचे ठामी सदैव जाणवायचे. ते कमी बोलत. ध्यान-चिंतनात राहून आजोबांच्या प्रासादिक बंगल्याच्या हॉलमध्ये फेऱ्या मारीत असत. स्वत: शांत, निगर्वी, मृदुभाषी असूनही आम्हाला भाऊशास्त्र्यांशी बोलायला भीती वाटायची. माझ्या वडिलांचा आणि त्यांचा संबंध माझ्या आजोळी दारव्ह्याला प्रथम आला असावा असे मला वाटते.

राम शेवाळकरांशी जवळून परिचय झाला तो माझ्या थोरल्या बंधूंचा (प्रा. प्र. ना. धनागरे). 1948 ते 1954 दरम्यान राम शेवाळकर अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजनंतर विदर्भ महाविद्यालयामध्ये बी.ए., एम.ए., करीत होते. तेव्हा आमचा अण्णा तिथेच इंटर सायन्सला शिकत होता. शेवाळकर बी.ए. फायनलला असताना अण्णा इंटरच्या प्रथम वर्षाला होता. दोघेही वसतिगृहात, एकजण ‘पूर्व’ आणि दुसरा ‘पश्चिम’ वसतिगृहात. अण्णा सुट्टीत वाशीमला आला की राम शेवाळकरांबद्दल खूप काही सांगायचा. ते विद्यार्थी आणि प्राध्यापकवर्गात खूपच लोकप्रिय होते, भाषा-शब्दांवरचे त्यांचे प्रभुत्व साध्या संवादातसुद्धा प्रतीत व्हायचे. औपचारिक भाषणांमधून, वक्तृत्वस्पर्धेत तर ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे. ‘सभा जिंकली’ हा वाक्प्रचार बराच नंतर आला.

अमरावतीचे विदर्भ महाविद्यालय हे पुण्यातील फर्गसन किंवा नागपूरच्या मॉरिस, हिस्लॉप कॉलेजेससारखे दर्जेदार उच्च शिक्षणासाठी लौकिक मिळविलेले. त्यामुळे विदर्भातील संपन्न आणि मध्ममवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी तिथेच शिकायला जात असत. डॉ. वा. वि. मिराशी, डॉ. शब्दे, डॉ. वि. भि. कोलतेंसारखे प्राचार्य तिथे होऊन गेलेले. अशा प्रज्ञावंत आणि प्रतिभासंपन्न विद्वानांच्या सान्निध्यात राम शेवाळकरांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आणि त्याच वातावरणात त्यांच्यातील निर्माणक्षमता व सर्जनशीलता प्रथम साकार होऊ लागली. विद्यार्थीसंघटनेमध्ये तर त्यांचा सक्रिय सहभाग असेच, पण महाविद्यालयातील वाङ्‌मय मंडळातसुद्धा त्यांचा लक्षणीय पुढाकार असे. स्नेहसंमेलनाचे कार्यवाह आणि कॉलेजच्या वार्षिकांकाचे संपादक ही पदे त्यांच्याकडे अक्षरश: चालत आली होती.

त्याच काळात ते थोड्याफार कथा आणि प्रामुख्याने कविता लिहू लागले. शृंगाररसाच्या, किंवा तारुण्यसुलभ, प्रेयसीला उद्देशून लिहिलेल्या प्रेमकविता, किंवा मिष्किल, खट्याळ अभिव्यक्तीच्या काव्यरचना ते ‘शाम रेवाळकर’ या नावाने तेव्हा प्रसिद्ध करायचे. हे जवळजवळ त्यांच्या सर्वच चाहत्यांना ठाऊक होते; पण घराण्याचे संस्कार आणि वडील भाऊशास्त्रींच्या पांडित्यांचा दबदबा असा होता की, चिरंजीव ‘अशा कविता’ लिहीत आहेत हे त्यांना कळू नये या सद्‌हेतूने स्वत:चे प्रथम नाव (राम) आणि कुलनाम (शेवाळकर) यातील आद्याक्षरे ‘र’ आणि ‘श’ ची अदलाबदल करून शाम रेवाळकर अशी ओळख त्यांनी मुद्दाम धारण केली होती, पण ती काही काळच.

मराठी वाङ्‌मय आणि संस्कृत हे दोन्ही विषय त्यांनी बी.ए.साठी घेतले होते, पण त्यांनी एम. ए. प्रथम संस्कृत विषयात केले. माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा डॉ. वा. वि. मिराशी, प्रा. मधुकर आष्टीकर (नाटककार) यांच्यासारखे शिक्षक राम शेवाळकरांना लाभले. त्यांचा स्वत:चा संस्कृत वाङ्‌मय, विशेषत: नाट्यशास्त्र, काव्य आणि साहित्यशास्त्राच्या क्षेत्रात व्यासंग होता. स्वच्छ स्फटिकासारखे स्पष्ट उच्चार, अमोघ वाणी आणि विलक्षण पाठांतर ही त्यांची बलस्थाने, असे असूनही ऐन परीक्षेच्या दिवसांत (एम. ए. फायनल परीक्षेच्या वेळी, त्यांना मायग्रेनचा- अर्धे डोकेदुखीचा- त्रास उमळून आला. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांची जडणघडण झालेली. त्यामुळे परीक्षेतून ड्रॉप घेण्याचे धाडस त्यांना करवले नाही. शांतपणे पेपर सोडविण्याची अवस्था नसतानाही त्यांनी पूर्ण परीक्षा दिली. मात्र त्यामुळे त्यांना प्राध्यापकपदी नेमणुकीसाठी आवश्यक तेवढे गुण मिळाले नाहीत.

शेवाळकरांचे हे पहिले अपयश आम्हा वाशीमकरांच्या पथ्यावर पडले. कारण त्यांनी लगेचच उच्च माध्यमिक शाळेत सरकारी नोकरीसाठी ‘शिक्षक’ पदासाठी अर्ज केला. सर्वच नावाजलेल्या शाळांमधून 1950 च्या दशकात संस्कृत हा ऐच्छिक विषय शिकवला जायचा. वाशीमच्या गव्हर्नमेंट हायस्कुलात मीसुद्धा मॅट्रिक परीक्षेसाठी संस्कृत विषय घेतला होता. शेवाळकरांची पहिली नेमणूक योगायोगाने वाशीमच्या हायस्कुलातच झाली. मात्र ते 1954 साली वाशीमला आले तेव्हा माझे मॅट्रिक आटोपून मी तिथल्याच कॉलेजात इंटर आर्ट्सला प्रवेश घेतला, त्यामुळे त्यांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मला लाभले नाही.

वाशीमलाच शेवाळकरांची पहिली ‘निर्वाहयात्रा’ सुरू झाली. ‘पाणियावरी मकरी’ ह्या त्यांच्या आत्मचरित्रात हा शब्दप्रयोग (निर्वाहयात्रा) त्यांनी केलाय. ते वाशीमला जेमतेम वर्ष-सव्वा वर्षच काय ते राहिले. आमच्या गावातले साहित्यविश्व म्हणा, किंवा साहित्यव्यवहार म्हणा, तसा बेताचाच होता. द. चिं. सोमण (वकीलदादा सोमण यांचे बंधू) हे ‘अर्नाळकरी’ पद्धतीच्या गूढ कादंबऱ्या लिहीत असत, पण ते जाहीर कार्यक्रमांना कधीच येत नसत. सार्वजनिक गणेशोत्सवात बाहेर गावाहून काही अभ्यासू लेखक, कवी अधूनमधून भाषणासाठी निमंत्रित केले जायचे, पण त्याने लोकांची साहित्यजाण व अभिरुची फारशी जागवली जात नसे. गव्हर्नमेंट हायस्कुलातच ज्ञानेश्वर (ज्ञा. रा.) साधू हे संस्कृत-मराठी शिकवीत असत. वृत्तबद्ध कविता ते लिहीत. कधीकधी कार्यक्रमात ते आपली कविता गेय पद्धतीने सादर करीत. पुढे त्यांचा ‘पयोष्णी’ हा काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाला.

साहित्य क्षेत्राबद्दल अशा उदासीन, निस्तेज असलेल्या एका अर्थाने सुस्त पडलेल्या वाशीम नगरीला राम शेवाळकरांनी खडबडून जागे केले. अव्यक्त राहिलेल्या कलागुणांना आणि लेखनप्रतिभेला त्यांनी नवचैतन्य दिले. अवघ्या वर्षभरात शेवाळकरांनी तीन-चार दिवस कार्यक्रम चालणारा,  प्रथम शारदोत्सव आणि नंतर वसंतोत्सव सुरू केला. पहिल्या शारदोत्सवात प्रा. भ. श्री. पंडित, प्रा. मधुकर आष्टीकर आदींना व्याख्यानांसाठी आमंत्रित केले. मराठीतील गझल-काव्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देणारे यवतमाळचे भाऊसाहेब पाटणकरही त्या उत्सवात आले होते. माझे मामा डॉ. शंकरराव डाऊ तेव्हा वाशीमलाच डॉटरी व्यवसाय करायचे. बनारसला शिकताना त्यांनी बासरीवादनाचेही रीतसर शिक्षण घेतले होते, त्यांच्या बासरीवादनाचाही कार्यक्रम राम शेवाळकरांनी शारदोत्सवात ठेवला होता. साहित्यविषयक व्याख्याने, काव्यवाचन असे जाहीर कार्यक्रम श्री बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर किंवा टिळक स्मारक भवनात व्हायचे, त्या काळात अशा कार्मक्रमांसाठी भाडेही आकारले जात नसे.

परंपरा-आधुनिकतेचा समन्वय

माझ्या आठवणीप्रमाणे अशाच एका उत्सवात राम शेवाळकरांनी कविसंमेलन आयोजित केले. बहुधा भ. श्री. पंडित आणि पाटणकर आले असताना हा कार्मक्रम झाला. माझ्या आयुष्यात ‘काव्यवाचन-गायन’ हा प्रकार मी तेव्हा प्रथमच ऐकला/पाहिला. ज्ञा. रा. (नाना) साधूंनी त्यांची कविता गाऊन दाखवली. पाटणकरांनी त्यांच्या गझली पेश केल्या; आणि त्याच समारंभात मी शेवाळकरांना त्यांची एक कविता सादर करताना मी पाहिले. ह्या घटनेला आज 55 वर्षे झालीत, पण माझ्या मनात मराठी काव्याचा आस्वाद कसा घ्यावा याची जाण प्रथम शेवाळकरांनी अंकुरित केली. मला त्यांची ती कविता आजही आठवते, इतका मी त्यांच्या कवितेने भारावून गेलो होतो आणि मला ती मुखोद्‌गतही झाली होती. तिच्या ओळी अशा काहीतरी होत्या...

काय हवे ते मागून घे

पण मला तुझे नितनूतनपण दे ।।

कधी पोपटी रोपांवर तव

मायेची मृदु होते शिंपण

पानपान बेभान नाहते

रोमरोम जागते तरारून,

हवी तेवढी शिंपण घे

हवी तेवढी शिंपण घे

त्या रोपांतिल तारुण्य मला दे।।1।।

काय हवे ते मागुन घे...

आकाशातील आभाळांच्या

अंतरातले हळवेपण दे

सरत्या वर्षेतिल मेघांचे

भिरभिरते बावरलेपण दे,

निदान हृदयी खळखळणाऱ्या

रंगांना नाविन्य तरी दे ।।2।।

काय हवे ते मागून घे

पण मला तुझे नितनूतनपण दे।।

ह्या कवितेत बहुधा आणखी दोनेक कडवी आहेत, पण आज मला फक्त एवढीच आठवतात. ही कविता सादर करताना शेवाळकर ‘हवी तेवढी शिंपण घे’ ही ओळ ‘बजावल्यासारखा हात पुढे करून’ आवेशपूर्ण पद्धतीने दोनदा म्हणायचे आणि त्याने रसिक श्रोते तृप्त व्हायचे. शेवाळकरांच्या संपूर्ण काव्यसंग्रहांचा मी अभ्यासक नाही आणि काव्यसमीक्षा हे माझे कार्यक्षेत्र नाही, त्यात अधिकार तर मला मुळीच नाही. मात्र त्यांच्या काव्यरचनेत मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली. त्यांची प्रतिभा ‘गण, मात्रा, वृत्ते’ इत्यादींनी त्या काळी बंदिस्त असणाऱ्या कवितेला काहीसा छेद देऊ पाहत होती, तिला नवकवितेची ओढ होती. असे असले तरीही शेवाळकरांच्या कवितेची नाळ वृत्तबद्ध (छंदबद्ध) चौकटीशी कुठेतरी जोडलेलीच होती. वर उद्‌धृत केलेल्या कवितेच्या धृवपदात पहिल्या ओळीत 23 शब्द आहेत. त्यामुळे प्रचलित ‘मंदारमाला’ ह्या बावीस अक्षरी वृत्तात ती बसत नाही; तेवीस अक्षरांमुळे ती रचना ‘सुमंदारमाला’ या काहीशा अप्रचलित गणवृत्तात बसेल. मात्र हा आकृतिबंध पुढील कडव्यांच्या ओळीत शेवाळकरांनी पाळलाच असे नाही, कुठे एका ओळीत 20 तर कुठे 22 शब्द आहेत. म्हणजे त्यांचे काव्य नवकवितेच्या अंगाने जाऊ इच्छिते, मात्र तिच्यासारखे भरकटणे शेवाळकरांना आवडत नसावे.

जे जे नवीन, उत्तम, उदात्त आणि उन्नत करणारे असेल ते सहर्ष स्वीकारायचे, पण त्यासाठी ‘केवळ पुरोगामित्वा’चा शिक्का बसावा (मिळावा) म्हणून परंपरेची कास सोडायची, हे त्यांना मान्य नव्हते. ‘जुने ते सोने’ यावर त्यांची श्रद्धा होती असे नाही, पण म्हणून ‘नवे ते हवेच’ हे सूत्रही त्यांनी आंधळेपणाने कधी स्वीकारले नाही. परंपरा आणि अभिनवता/आधुनिकतेतील ‘समन्वय’ त्यांनी अतिशय डोळसपणे आयुष्यभर जपला. तोच समन्वय त्यांच्या चिंतनाचे आणि जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे सार आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.

दोन तपानंतरच्या पुनर्भेटी

1955 साली मी इन्टर (आर्ट्स) उत्तीर्ण होऊन बी.ए., एम.ए. शिक्षणासाठी गेलो आणि शेवाळकरही वाशीम सोडून यवतमाळ, नांदेड व अखेर वणी येथे गेले. मीही नोकरीच्या निमित्ताने आग्रा, कानपूर (उत्तरप्रदेश) इथे जवळपास 17-18 वर्षे होतो. त्यामुळे मी जरी त्यांचा वाढता व्यासंग, अमोघ वक्तृत्व आणि साहित्यातील योगदानाबद्दल ऐकून होतो, तरी त्यांच्या भेटीचा योग जवळजवळ दोन तपे मला आला नाही. मे 1980 मध्ये माझ्या आईचे अगदी अकाली निधन झाले. त्या वेळी शेवाळकर मुद्दामहून आमच्या सांत्वनपर भेटीसाठी आले. पुन्हा अकरा वर्षांनंतर माझे वडील गेले तेव्हाही ते असाच दुखवटा व्यक्त करायला आमच्या वाशीमच्या घरी आले होते.

वाशीम जरी त्यांनी सोडले होते, तरी तिथल्या झपाटणाऱ्या सांस्कृतिक जीवनाच्या स्मृती शेवाळकरांनी कधीच पुसट होऊ दिल्या नाहीत. साहित्यिक गप्पा, हास्यविनोद, भावगीते आणि चित्रपटगीतांची आवड असणारा असा एक तरुणांचा गट त्यांनी एकत्रित केला होता. त्यात प्रभाकर हवालदार, (प्रा.) दिनेश चरखा, गाण्याचे विलक्षण वेड असणारा धूलचंद (धुळू) वर्मा, सुधाकर आणि बाबा देशपांडे असा छोटासाच शेवाळकरांचा ग्रुप. पण त्यांच्या परिसस्पर्शाने ह्या सर्व तरुण मित्रांचे जीवनच उजळून निघाले होते. (कै.) भास्कर कविमंडन, मूळ आमच्या वाशीमचेच, पुढे अंमळनेर कॉलेजात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. तेही अधूनमधून या गटाच्या संपर्कात असायचे. शेवाळकरांना माणसे जोडण्याची फक्त कलाच अवगत नव्हती तर त्यांच्याशी ऋणानुबंध जोपासण्याचे विलक्षण वेड होते. गेल्या तीन-चार वर्षांच्या कालावधीत धुळू वर्मा आणि दिनेश चरखा यांचे निधन झाले. दोन्ही प्रसंगी राम शेवाळकरांची प्रकृती ठीक नव्हती, त्यांनी प्रवास टाळावा असा डॉटरांचाही सल्ला असताना त्यांना राहवले नाही. त्यांनी दिवंगत मित्रांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी नागपूर-वाशीम असा प्रवास केलाच.

पुण्यात व्याख्यान-कार्मक्रमांच्या निमित्ताने शेवाळकरांचे येणे व्हायचेच. मात्र काहीना काही कारणांनी त्यांची व्याख्याने ऐकण्याचा योग मला आला नाही. समाजशास्त्र हे माझे कार्यक्षेत्र, म्हणजे मराठी भाषा आणि साहित्याशी दुरावा असलाच पाहिजे असे नाही. पण तरीही थोडेफार मराठी वाचन करण्यापलीकडे मला काही साहित्यव्यवहाराशी, वाङ्‌ममीन निर्मिती प्रक्रियेशी फारसे एकरूप होता आले नाही. पण ह्या दरम्यान शेवाळकरांचे साहित्यिक योगदान आणि वतृत्व हे कथा, कविता आणि ललित लेखनापुरतेच सीमित राहिले नव्हते. त्यांची ‘प्रतिभा’ आता ‘प्रज्ञे’च्या दिशेने वाटचाल करू लागली होती. कालिदास असो वा भवभूती, शाकुंतल, उत्तररामचरित-मालविकाग्निमित्र असो, रामामण असो किंवा महाभारत यांसारख्या अभिजात ग्रंथांचा त्यांचा व्यासंग अधिकच सखोल आणि परिपक्व होत गेला. त्यांनी उपनिषदांचाही अभ्यास केला होता. मला वाटते नांदेड येथील वास्तव्यात प्रा. नरहर कुरुंदकर, डॉ. स. रा. गाडगीळ, डॉ. सुरेंद्र बारलिंगे यासारख्या विद्वान विचारवंतांशी शेवाळकरांचा जवळून संबंध आला आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला, वतृत्वाला आणि शैलीला चिंतनाची बैठक आणि शिस्त लाभली.

असे असले तरीही त्यांचे ललित लेखन सातत्याने सुरू राहिले. सारस्वताचे झाड, अमृतझरी, रुचिभेद, आकाशाचे कोंभ, पूर्वेची प्रभा, तारकांचे गाणे, अग्निमित्र इत्यादी महत्त्वपूर्ण पुस्तके शेवाळकरांनी लिहिली. त्याबरोबरच लोकनायक बापूजी अणे यांच्या समग्र लेखनाचे ‘अक्षर माधव’ असे दोन खंड आणि कवी वा. ना. देशपांडे यांच्या संपूर्ण वाङ्‌ममीन कृतींना तीन खंडात एकत्रित आणून साहित्याच्या अभ्यासकांसाठी एक नवे दालन शेवाळकरांनी खुले केले. काही संस्कृत नाटकांच्या नव्या आवृत्त्यांचे संपादन करून त्यांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या. त्यांच्या अभ्यासाची आणि व्यासंगाची क्षितिजे विस्तारत होती, त्याबरोबरच व्याख्यानांच्या विषयात आणि मांडणीमध्येसुद्धा वैविध्य येऊ लागले. त्यांच्या अमोघ वाणी आणि वतृत्वाने अक्षरश: न्हाऊन निघाला नाही असा रसिक श्रोता महाराष्ट्रात तरी दुर्मिळच असावा.

घनिष्ठ संबंध

माझे आणि राम शेवाळकरांचे स्नेहबंध खऱ्या अर्थाने जुळून आलेते माझ्या कोल्हापुरातील वास्तव्यात. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार मी 1 नोव्हेंबर 1995 रोजी स्वीकारला आणि योगायोगाने पहिल्याच आठवड्यात (किंवा दुसऱ्या) कोल्हापूरच्या महालक्ष्मी बँकेने शेवाळकरांची तीन व्याख्याने आयोजित केली होती. त्यांच्या पहिल्या व्याख्यानाचे वृत्त दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातून मी वाचले. मी आणि माझी पत्नी पहिले दोन आठवडे आम्ही विद्यापीठाच्या अतिथीगृहातच प्रथम थांबलो होतो, कारण कुलगुरु निवासाची रंगरंगोटी इत्यादी पूर्ण झालेली नव्हती. शेवाळकर त्यांच्या आवडीच्या ‘ओपल’ हॉटेलात थांबले असल्याचे मला समजले. मी त्यांना फोन करून भेटायला येण्याची माझी इच्छा बोलून दाखविली. त्यावर एरव्ही मला ‘दत्ता, अरे, का रे’ असे एकेरी हाक मारणारे शेवाळकर म्हणाले, ‘नाही, तुम्ही येऊ नका, आता तुम्ही एका पीठाचे कुलगुरू आहात, तेव्हा थोड्या वेळाने मीच तुमच्या भेटीसाठी विद्यापीठात येतो.’ पत्रकार-लेखक राम देशपांडेंना सोबत घेऊन राम शेवाळकर केवळ पुष्पगुच्छच आणून थांबले नाहीत, तर शाल आणि श्रीफळ देऊन मला त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. त्या क्षणी आनंदाश्रू आवरणे मला कठीण झाले.

पुढील दोनही दिवस मी व माझ्या पत्नीने त्यांची व्याख्याने ऐकली. ‘द्रौपदी’ आणि ‘कर्ण’ हे त्यांच्या व्याख्यानांचे विषय होते. महाभारत म्हणजे रत्ने उदरात दडलेला महासागर आहे, त्यातील एकेका पात्राचा विविध अंगांनी वेध घेणे उद्‌बोधक असते, तसेच ते संशोधकांना एक प्रकारचे आव्हान असते, हे राम शेवाळकरांच्या पांडित्यपूर्ण मांडणीतून श्रोत्यांना उमगत होते. तरुण वयात ‘त्या रोपातिल तारुण्य मला दे’ म्हणणारा एक प्रतिभासंपन्न कवी आता प्रज्ञावान विचारवंत म्हणून विकसित अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचला होता. मुख्य म्हणजे त्यांच्या वक्तृत्वात फक्त भाषा आणि शब्दसमृद्धीचा दिखावा नव्हता, तर आशयगर्भ मांडणी आणि सप्रमाणता भरभरून दिसू लागली होती.

जानेवारी 1997 ते 1998 ह्या काळात ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या वि.स.खांडेकरांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यासाठी मी एक सल्लागार समिती नेमली. त्यामध्ये प्रा. म. द. हातकणंगलेकर, प्रा. पां. ना. कुलकर्णी, डॉ. गो. मा. पवार, प्रा. राम शेवाळकर यांना आम्ही निमंत्रित केले. ह्या सर्व ज्येष्ठ साहित्यिकांचे बहुमोल मार्गदर्शन विद्यापीठाला लाभले. ‘खांडेकरांचे साहित्यातील योगदान’ या विषयावर दोन वेगवेगळी चर्चासत्रे झाली. ‘भाऊंच्या आठवणी’ सांगण्याचाही एक कार्मक्रम झाला. खांडेकर जन्मशताब्दी निमित्ताने त्या वर्षात शेवाळकर तीनदा विद्यापीठात आले. त्यापैकी फक्त एकदाच त्यांनी मुंबई ते कोल्हापूर असा प्रवासखर्च विद्यापीठाकडून घेतला. नागपूरहून मुंबईला दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी ते विमानाने आले होते. एकदा मिरजेला ते आले असताना आम्ही सल्लागार समितीची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी प्रवासखर्च घेतला नाही. इतका स्वच्छ, पारदर्शी व्यवहार अलीकडे क्वचितच पाहायला मिळतो. व्याख्यानांच्या मानधनाची त्यांची काही अट नसे. ‘अयाचित’ वृत्तीने त्यांनी सांस्कृतिक प्रबोधनाचे व्रत घेतले असेच वाटायचे. निमंत्रण देणाऱ्यांनी त्यांना मानधन दिले नाही, कधी प्रवासखर्चाबद्दलही विचारले नाही, असेही अनुभव त्यांना बऱ्याचदा आले, मात्र त्याचा विषाद त्यांनी कधी बाळगला नाही.

नर्म विनोद आणि वैदर्भीय अस्मिता

शेवाळकरांना खिन्न असलेले मी कधीच पाहिले नाही. ते अधूनमधून अंतर्मुख व्हायचे, पण स्नेहपूर्ण सहवासाचे त्यांना जणू व्यसनच जडले होते. चिंतनशील गांभीर्य आणि प्रसन्न चेहरा एकत्र सुखेनैव नांदू शकतात हे शेवाळकरांचे व्यक्तिमत्त्व पाहिले आणि अनुभवले की पटायचे. एक वर्षापूर्वी कोल्हापूरच्या ‘अरुण नरके फाऊन्डेशन’ने त्यांची दोन व्याख्याने आयोजित केली होती. शेवाळकरांनी ‘स्वा. सावरकर’ हा विषय मांडावा असे अरुण नरकेंना तीव्रतेने वाटत होते. मात्र तेजस्वी देशभक्तांचे थोरपण जातीय अस्मितांच्या तराजूत मोजण्याचा आग्रह धरणाऱ्या काही संघटनांनी ‘कोल्हापुरात आम्ही त्यांना ‘सावरकरां’वर व्याख्याने देण्याला विरोध करू.’ अशी भूमिका घेतली. संघर्ष टाळून समन्वमाचा मार्ग स्वीकारणाऱ्या शेवाळकरांनी मग ‘ज्ञानेश्वराचे पसायदान’ आणि ‘रामामण व राजकारण’ अशा दोन विषयांवर व्याख्याने दिली तेव्हा संभाव्य संघर्षाचा साधा उल्लेखदेखील त्यांनी व्याख्यानांतून केला नाही. पण त्या जातीय संघटनांच्या विरोधाला आव्हान देत, काही हिंदुत्वाभिमानी संघटनांनी शेवाळकरांच्या त्याच मुक्कामात ‘स्वा. सावरकर’ याच विषयावर व्याख्यान घडवून आणण्याचा चंग बांधला. त्यावेळी एक कार्यकर्ता त्यांना म्हणाला, ‘तुम्ही अवश्य ‘सावरकर’ हा विषय मांडा, तुमच्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.’ त्यावर शेवाळकर म्हणाले, ‘अहो, डोक्यावर केसच नाहीत तिथे केसांना कोण कसा धक्का लावणार!’ नर्मविनोदाने कोणाला न दुखावता तणाव दूर करण्याचे कौशल्य शेवाळकरांना लाभले होते. त्याच संघटनेने त्यांची ‘दोन दुर्योधन’, ‘स्वा. सावरकर’ आणि ‘मातृहृदयी साने गुरुजी’ अशी तीन व्याख्याने कोल्हापुरात त्याच मुक्कामात केशवराव भोसले सभागृहात घडवून आणली.

शेवाळकर अजातशत्रू होते असे मी म्हणणार नाही, असा कोणीही नसतो. सत्प्रवृत्त माणसालाही विरोधक भेटतातच! स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शी व्यवहाराचा आग्रह धरणाऱ्यांमुळे काहींचे हितसंबंध दुखावले जातात. त्यामुळे अजातशत्रू अशी व्यक्ती दुर्मिळ असते. मात्र शत्रूलासुद्धा ज्यांच्याबद्दल आत्मीयता व आदर वाटू लागावा असे प्रसन्न व्यक्तिमत्त्व शेवाळकरांना लाभले होते.

राम शेवाळकर हाडाचे वैदर्भीय, पण ‘विदर्भवादी’ नव्हते. विदर्भाच्या परंपरा, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, बोली, साहित्य, सणवार, खानपाना’ तऱ्हा यांचा त्यांना फार अभिमान असे. वैदर्भीय आतिथ्य म्हणजे काय याचा अनुभव, ज्यांनी त्यांच्या नागपुरातील उत्तर अंबाझरी रस्त्यावरील ‘वन्दे मातरम्‌’ निवासस्थानी भेट घेतली, त्यांना पुरेपूर आलेला असणार. ते कोल्हापुरात आलेले असताना माझ्या पत्नीला ‘झुणका-भाकरीचा बेत’ करायला त्यांनी सांगितले आणि नि:संकोचपणे कुलगुरू निवासात ते आमच्याकडे भोजनास आले होते.

गौरव आणि टीकाही

सकस साहित्यलेखन, भाषाप्रभुत्व, निर्मळ स्वभाव, वक्तादशसहस्रेषु, ऋजुता, स्नेहपूर्ण लोकसंग्रह, समन्वयवादी भूमिका आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व ही शेवाळकरांची बलस्थाने. त्यामुळे पणजी, गोवा येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड का झाली हे कळून येते. (अलीकडे प्रा. रा. ग. जाधव यांचीही अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.) नागपूर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठांनी त्यांना मानद डी.लिट्‌ प्रदान करून गौरविले होते. साहित्य विश्वातील अशी उत्तुंग शिखरे सर करीत असताना शेवाळकरांवर ‘हलक्या आवाजात’ टीकाही होत राहिली. माझ्या कानावर आलेली टीका थोडक्यात सांगतो. एकतर शेवाळकरांच्या लेखणीपेक्षा त्यांची वाणी अधिक सरस ठरली. साहित्यव्यहारातील त्यांचा दबदबा मुख्यत्वे करून वतृत्वातून निर्माण झाला होता. दुसरे म्हणजे त्यांची पुस्तके, ग्रंथ इत्यादी वैदर्भीय प्रकाशकांनी प्रकाशित केली, पुण्या-मुंबईकडच्या प्रकाशकांना त्यांनी कधी शब्द टाकला नाही. नागपूरच्या ‘विजय प्रकाशन’ संस्थेने शेवाळकरांची ‘स्नेहगोत्री’, ‘ज्ञानपूजक’, ‘उजळावया वाटा’ आणि ‘उजेडाची पालवी’ अशी चार पुस्तके प्रसिद्ध केली. (संदर्भ- तरुणभारत, नागपूर आसमंत पुरवणी, दि. 10 मे 2009, पृष्ठ 5) मात्र त्याचे फारसे वितरण पश्चिम महाराष्ट्रात झाले नाही म्हणा किंवा पुण्या-मुंबईच्या समीक्षकांनी त्यांची दखल नीट घेतली नाही असे म्हणा.

टीकेचा तिसरा मुद्दा शेवाळकरांच्या विदर्भ साहित्य संघाच्या वास्तूच्या नूतनीकरणाचा संबंधीच्या निर्णयाचा. ते काम त्यांच्या प्रभावामुळे बांधकाम व्यावसायिक असलेल्या त्यांच्या चिरंजीवांना दिले गेले आणि त्यामुळे त्या वास्तूचे स्वरूपच पार बदलून गेले. कदाचित हा निर्णय वि. सा. संघाच्या कार्यकारिणीत लोकतंत्रात्मक पद्धतीने घेतला गेला असेलही, पण टीकाकारांचे तोंड कोण बंद करणार! सरतेशेवटी शेवाळकरांनी वैचारिक पातळीवरसुद्धा प्रचलित सत्तारचनेतील राजकीय मंडळींविरुद्ध जाहीरपणे भूमिका घेतली नाही. म. गांधी, आचार्य विनोबांपासून तर संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजींपर्यंत... बाबा आमटेंपासून साने गुरुजींपर्यंत, ए. बी. बर्धन, मधु लिमये, मधु दंडवतेंपासून तर दत्तोपंत ठेंगडींपर्यंत आणि बापूजी अण्यांपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत ते सगळ्यांचीच स्तुती करायचे. प्रत्येकाच्या चांगुलपणाचा, गुणांचा शोध तेवढा घ्यावा, छिद्रान्वेषीपणा माणसाला प्रगल्भ बनवीत नाही अशी त्यांची धारणा असावी. ‘पण लक्षात कोण घेतो?’

या सर्व टीकेबद्दल शेवाळकरांची, म्हणजे दुसरीही, भक्कम बाजू असणार, पण त्याचे चर्वितचर्वण करण्याचे ते टाळीत. यासंबंधी कधीतरी त्यांना त्यांची मते विचारावीत असे मला वाटे, पण लहान तोंडी मोठा घास घेण्याचे धैर्य मला झाले नाही.

अखेरची भेट

मार्च 2009 महिन्यात प्रकृतीची तपासणी करून घेण्यासाठी ते सपत्नीक पुण्यात आले होते. श्रेयस हॉटेलात नेहमीप्रमाणे थांबले.‘विदर्भवासी पुणे निवासी’ संस्थेतर्फे त्यांना निमंत्रण द्यायला आम्ही श्रेयसमध्ये गेलो होतो. नेहमीप्रमाणे प्रसन्न मुद्रा, विनोदाने परिपूर्ण गप्पा, त्यांचे आतिथ्य- लाडू, बर्फी, बाकरवडी, शेवचिवडा- सर्व झाले. पण तरीही ‘अरे चहा आणायला सांगा, ही आपली वैदर्भीय मंडळी, चहा प्यायल्याखेरीज उठणार नाहीत!’ अशी फिरकीही त्यांनी घेतली. व्याख्यानाच्या निमंत्रणाला त्यांना ‘नाही’ म्हणवत नसे, पण वहिनींच्या चेहऱ्यावरची काळजी शेवाळकरांच्या प्रकृतीबद्दल बरेच काही सांगून गेली. 23 मे 2009 रोजी त्यांचा पुण्यात सत्कार होणार होता आणि त्यांच्या हस्ते डॉ. अशोक कामतांना ‘श्रीचतु:श्रृंगी देवी जीवनगौरव पुरस्कार’ दिला जाणार होता. मात्र काळाने हे सर्व मनसुबे 3 मे रोजी जागच्या जागीच थिजवले. प्रज्ञाप्रतिभेच्या संगमावरच्या एका प्रसन्न यात्रीची अनंताकडची यात्रा सुरू झाली होती. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली वाहतो.

Tags: अरुण नरके फाऊन्डेशन सु. गो. तपस्वी यशवंतराव चव्हाण बापुजी अणे गोळ्वलकर गुरुजी डॉ. हेडगेवार विनोबा भावे दत्तोपंत ठेंगडी मधु दंडवते मधु लिमये ए. बी. बर्धन साने गुरुजी बाबा आमटे माजी कुलगुरू द. ना. धनागरे- लेखक लेखक वक्ता राम शेवाळकर Arun Narke Foundation. S.G. Tapasvi Yashvantrao Chavan Bapuji Ane Golvalkar Guruji Dr. Hedgewar Vinoba Bhave Dattopant Thengdi Madhu Dandavate Madhu Limaye A.B. Bardhan Sane Guruji (Tribute- Sadhana article) Baba Amte D. N. Dhanagare- Writer writer Ram Shewalkar- Speaker weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

द. ना. धनागरे

(1936 - 2017) समाजशास्त्राचे अभ्यासक, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु,भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव. ‘भारतातील शेतकऱ्यांच्या चळवळी (1920-50)’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. 30 वर्षे विदर्भातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके