डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

व्यासंगी संशोधक, मर्मग्राही संपादक

विद्यापीठाच्या कारभारात शासनाच्या अशा हस्तक्षेपाविरोधात प्रथम डॉ.टिकेकरांनी दै.लोकसत्तेत दोन-तीन अग्रलेख लिहिले. त्यापैकी एका अग्रलेखात, त्या वेळचे कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर बाबूराव फरास यांनी माझ्या विरोधात लिहिलेल्या (किंवा त्यांना लिहून दिलेला, पण त्यांच्या नावावर प्रसिद्ध झालेल्या) दै.लोकसत्तेतील प्रदीर्घ लेखाला टिकेकरांनी उत्तर दिले होते. दै.लोकसत्तेने माझ्या समर्थनार्थ असे लेख लिहिलेले पाहून, नंतर तेव्हाचे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक कुमार केतकरांनीही माझी बाजू घेऊन अग्रलेख लिहिला. दै.लोकमतचे सांगलीस्थित सहसंपादक राजा माने यांनी तर पाच-सहा लेखांची लेखमालाच प्रसिद्ध केली. अगदी पहिल्या पानावर ते लेख प्रसिद्ध झाले होते आणि राज्य शासन व माझ्या विरोधकांचे पितळ उघडे पाडले होते.

माझा डॉ. टिकेकरांशी प्रथम परिचय झाला तो पुण्यातील श्री गंधर्ववेद प्रकाशनसंस्थेच्या एका बृहद्‌-प्रकल्पाच्या कामकाजादरम्यान. 19व्या आणि 20 व्या शतकातील महाराष्ट्रातील निवडक बुद्धिमान, प्रतिभावान आणि समाजधुरीण व्यक्तींच्या चरित्रलेखनासाठी ह्या प्रकल्पाचे काम 2005 ते 2010 या पाच वर्षांत पूर्ण करून अशा 65 व्यक्तींच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीचे हे काम होते. त्या प्रकल्पाची संकल्पना जरी मुळात प्रकाशकांनी मांडली होती; तरी पण अशा व्यक्तींची निवड करण्याचे, त्यासाठी सुयोग्य लेखकां(चरित्रकारां)ची निवड करणे- एवढेच नव्हे, तर 65 चरित्रग्रंथांच्या मालिकेतील एक चरित्र लिहिणाऱ्या लेखकांकडून काय अपेक्षा आहेत यासंबंधीचे टिपण लेखकांना देण्याचे काम आधी करायचे होते. या प्रकल्पासाठी प्रकाशकांनी डॉ.अरुण टिकेकर, मी आणि प्रा.प्र.ना.परांजपे अशा तिघांची प्रमुख संपादक म्हणून आमची पूर्वसंमती घेऊन नेमणूक केली. त्याचप्रमाणे डॉ.प्र.ल.गावडे, प्रा.रा.ग.जाधव, डॉ.शं.ना.नवलगुंदकर अशा चार-पाच जणांचे एक सल्लागार मंडळही नेमले.

प्रकल्पात संपादक म्हणून जबाबदारी पार पाडताना मला डॉ.टिकेकरांकडून अनेक गोष्टी शिकता आल्या, त्या वेळोवेळी झालेल्या चर्चा-बैठकांमधून. ज्या महनीय व्यक्तींसंबंधी चरित्रलेखन होणार होते, त्यांपैकी अनेकांच्या कार्यकर्तृत्वासंबंधी त्याआधी चरित्रे लिहिली गेली होती, उदा.- न्या.महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले आदींवर अनेक ग्रंथ उपलब्ध होते आणि त्यांबद्दल मराठी वाचकवर्गाला माहिती होती, त्यामुळे त्यांच्यासंबंधी वेगळे चरित्रलेखन करताना लेखकाने अशा थोर व्यक्तींचे वैचारिक योगदान नेमके काय आहे, तसेच विविध सामाजिक चळवळी आणि  उपक्रमांद्वारे त्यांनी कोणत्या स्वरूपाचे समाजपरिवर्तन घडवून आणले, त्यांचे वेगळेपण नेमके कशात आहे याचा शोध घेतला पाहिजे; शक्य तिथे नवी साधने, माहिती, दस्तावेज, पत्रव्यवहार आणि दुर्लक्षित ग्रंथ व इतर सामग्रीचा उपयोग करून चरित्रनायकांसंबंधी नव्याने काही सांगण्याचा, अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न चरित्रलेखकाने करावा, अशी अपेक्षा होती- ते डॉ. टिकेकरांनी अधोरेखित केले.

त्या प्रकल्पासाठी चरित्रलेखन करणाऱ्या लेखकांची निवड तितकीच महत्त्वाची होती. तसेच प्रत्येकाची लेखनशैली जरी भिन्न असली तरी संदर्भ, टीपा देणे, अकारण वाद निर्माण होतील अशी विधाने टाळणे इत्यादी बाबतींत विविध ग्रंथांमध्ये किमान समानता असणे अपेक्षित होते. म्हणून या प्रकल्पासाठी निवडलेल्या सर्व चरित्रकारांना उपयुक्त असे एक टिपण आम्ही संपादक त्रयींनी तयार केले. त्यातील टिकेकरांनी दिलेले मुद्दे मार्गदर्शक तर होतेच; पण त्याहूनही कोणत्याही सामाजिक शास्त्राच्या संशोधकाने, अभ्यासकाने कायम लक्षात ठेवावेत असे होते. उदा.- ‘प्रत्येक पिढी इतिहासाकडे नव्या दृष्टीने पाहत असते आणि ऐतिहासिक घटना, व्यक्ती, चळवळी यांचे पुनरावलोकन करताना त्यांची वर्तमानकालीन प्रस्तुतता काय आहे यावर भाष्य करीत असते किंवा ते करायला हवे. नेमके यालाच ‘इतिहासाची समकालीनता’ किंवा ‘गतकाळाची वर्तमानता’ असे टिकेकर मानीत असत.

त्यात चरित्रनायकाच्या कार्यकर्तृत्वाचे सातत्याने पुनर्मूल्यांकन होणे आणि त्यात् या ऐतिहासिक घटना अथवा व्यक्तीसंबंधी हाती लागलेल्या दस्तावेजांचा पत्रव्यवहार किंवा तथ्यांच्या आधारे नव्याने अन्वयार्थ लावणे हे अपेक्षित असते- हे  डॉ. टिकेकर अगदी मोजक्या, पण समर्पक शब्दांत सर्व चरित्रकारांच्या मेळाव्यात आवर्जून सांगायचे. त्याचप्रमाणे संशोधन आणि वाचनीयता हे परस्परविरोधी नसून संशोधनावर आधारलेल्या लेखनाची वाचनीतता जोपासता येते, यावर टिकेकरांचा दृढ विश्वास होता; तसा त्यांचा सदैव आग्रह असे.

चरित्रलेखनाला एक शिस्त असावी लागते. चरित्रनायकाच्या व्यक्तिगत गुणगानात भावनिकपणे अडकून न राहता लेखकाने तत्कालीन समाजकारण, राजकारण व अर्थकारणाविषयी चरित्रनायकाने घेतलेली भूमिका किंवा मांडलेले विचार समकालीन व्यक्तींच्या वैचारिक मांडणीपेक्षा वेगळे कसे होते, हे सांगण्यावर भर द्यावा; व्यक्तिमाहात्म्य सांगणे हा चरित्रलेखनाचा हेतू नसावा, याबाबत टिकेकर फार आग्रही होते. ‘टिकेकर फक्त ग्रंथालय-संदर्भतज्ज्ञ होते, ते कधी पत्रकार नव्हतेच.’ असे कुचेष्टेने चर्वितचर्वण करणाऱ्यांचा एक गट होता; विशेषत: मुंबईत टिकेकरांवर अशी टीका करण्याचा त्यांनी उद्योग केला. मात्र त्या टीकाकारांपैकी कोणाबद्दल अनादर किंवा अपशब्द त्यांनी माझ्याशी झालेल्या चर्चा-गप्पा-गोष्टींत कधीही काढला नाही.

विरोधासाठी विरोध नसावा, तसाच तो व्यक्तिकेंद्रित नसावा; वैचारिक भूमिका न पटणारी असल्यास तिचा त्याच पातळीवर विरोध व्हावा, हे मूल्य टिकेकरांनी सदैव जोपासले आणि आचरणातही आणले. तसेच वाद-चर्चांमध्ये आपला मुद्दा मांडताना आक्रमक होणे जरी स्वाभाविक असले तरी त्याचे आक्रस्ताळेपणात रूपांतर होऊ देता कामा नये, असा समंजसपणा आपल्या वागण्या-बोलण्यात तसेच लेखनातसुद्धा टिकेकरांना अपेक्षित असे. सभ्यता आणि सुसंस्कृततेच्या मर्यादा नेहमी पाळल्याच गेल्या पाहिजेत, अशी मूल्यधारणा ठेवूनच त्यांनी त्यांची पत्रकारिता केली.

संशोधनपर लेखनातसुद्धा तथ्ये नीट तपासून घेतली पाहिजेत, त्यांच्या सत्यासत्यतेबाबत काही शंका असल्यास किंवा प्रवाद असल्यास तसा उल्लेख निदान तळटीपांत होणे टिकेकरांना गरजेचे वाटे. संदर्भ देतानासुद्धा त्याचा नेमका स्रोत काय, कोणत्या ग्रंथातून, लेखांमधून किंवा कागदपत्रांमधून तो संदर्भ मिळवलाय, हे लेखकाने स्पष्टपणे सांगितले पाहिजे. दुसऱ्या कुणाच्या ग्रंथात असलेला संदर्भ आपणच शोधलाय किंवा मिळवलाय, अशा अविर्भावात ‘सेकंड हॅन्ड’ संदर्भ देणाऱ्या तथाकथित संशोधक- तज्ज्ञांबद्दल टिकेकरांना घृणा वाटे. विशेषत: संदर्भचौर्य करून मूळ स्रोताचा किंवा लेखकाचा कृतज्ञतापूर्वक नामोल्लेख न करणाऱ्या लेखकांबद्दल जाहीररीत्या तिरस्कार व्यक्त करायला ते मागे-पुढे पाहत नसत. पुण्यात झालेल्या एका पुरस्कार-प्रदान सोहळ्यात घडलेला प्रकार यासंदर्भात बराच बोलका आहे.

प्रा.मा.पं.मंगुडकरांच्या संस्थेने जाहीर केलेला ‘न्या.महादेव गोविंद रानडे पुरस्कार’ एका ज्येष्ठ शास्त्रज्ञांना दिला जाणार होता. त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून यायचे होते. कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता सुरू व्हायचा होता. प्रमुख वक्ते म्हणून डॉ.अरुण टिकेकरांना विशेष निमंत्रण देऊन बोलावण्यात आले होते. एकंदर एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन-युगासंबंधी, विशेषत: न्या.म.गो.रानडे यांच्या योगदानाविषयी- अधिकारी व्यक्ती म्हणून डॉ.टिकेकरांना भाषणासाठी एक तास वेळ देण्याचे ठरले होते. मात्र जसा मुख्यमंत्र्यांना उशीर होऊ लागला तसे ‘तुम्ही एक तासाऐवजी 50 मिनिटेच बोला’ असे काही वेळाने टिकेकरांना सांगण्यात आले. मुख्यमंत्री येण्याची चिन्हे दिसेनात; तेव्हा 50 मिनिटांऐवजी ‘फक्त अर्ध्या तासात भाषण उरका’, असे सांगितले गेले!

शेवटी मुख्य पाहुणे संध्याकाळी साडेसात वाजता म्हणजे अडीच तास उशिरा आल्याने टिकेकरांनी रानड्यांबद्दल फक्त 10 मिनिटांत थोडे सांगावे, असे आयोजकांनी सुचविले. टिकेकर मूळ सोलापूरचे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गावचे! त्यांच्या मित्रपरिवारातलेच. त्यामुळे मुख्य पाहुण्यांना संकोच किंवा अवघडल्यासारखे वाटावे असा उद्देश न ठेवता, झालेला प्रकार टिकेकरांनी श्रोत्यांना प्रथम स्पष्टपणे सांगितला आणि नंतर केवळ 10 मिनिटांत पण तयार केलेल्या टिपणाच्या आधारे न्या.रानडे यांच्या वैचारिक भूमिकेचे आणि समाजसुधारणा चळवळीतील योगदानाचे वेगळेपण मुद्देसूदपणे विशद केले.

एकंदरच सैद्धांतिक आणि विचारधारांच्या चर्चाविश्वात टिकेकरांची नेमकी भूमिका काय होती, यासंबंधी मतमतांतरे होती. भांडवलशाही (पूँजीवाद), साम्यवादी, समाजवादी, गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि उदारमतवादी-समाजसुधारणावादी अशा विशिष्ट तात्त्विक गटांपैकी कोणत्याही विचारवंताला- वैचारिक लेखकाला एखादे बिरूद लावल्याखेरीज त्याची/तिची ओळख नीट होत नाही, असे प्रसारमाध्यमांना वाटते. विविधांगी अफाट  वाचन आणि त्यावर मर्मग्राही भाष्य किंवा विवेचन करणाऱ्या टिकेकरांना असे कुठले ‘लेबल’ लावताना पत्रकारांची/समीक्षकांची अडचण होत असे.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिकास्थित) आणि साधना ट्रस्ट यांच्यातर्फे दिला जाणारा ‘साहित्य जीवनगौरव’ आणि ‘समाजकार्य जीवनगौरव’ पुरस्कार गो.पु.देशपांडे, पुष्पा भावे, बाबूराव बागुल, रावसाहेब कसबे अशा लेखकांना दिला गेला होता. याच मालिकेत एक वर्षी अरुण टिकेकरांना हा पुरस्कार (साहित्य जीवनगौरव) दिला गेला, तेव्हा टिकेकर डाव्या विचारसरणीकडे झुकलेले, निदान समाजवादी वैचारिक परंपरेशी जवळीक असणारे लेखक आहेत म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली गेली, असा गैरसमज अनेकांचा झाला. टिकेकर निर्विवादपणे विवेकवादी तसेच परिवर्तनशील, पुरोगामी मांदियाळीत बसणारे लेखक होते. धर्म, जात, पंथ इत्यादींच्या कर्मकांडांत न अडकणारे असे विशुद्ध सामाजिक न्यायाची भूमिका घेणारे होते, हे कोणीही मान्य करील. मात्र आधुनिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीत एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनकारांचे- विशेषत: न्या.रानडे, गोपाळ गणेश आगरकर आणि नामदार गोखले यांच्यासारख्या उदारमतवादी नेत्यांचे- योगदान महत्त्वाचे होते, असे टिकेकर मानीत.

संघर्ष अटळ असला तरी तो वैचारिक पातळीवर सीमित असावा, अशी त्यांची नि:संदिग्ध भूमिका होती. कुठलाही झेंडा हातात घेऊन त्यांनी चळवळी केल्या नाहीत; उलट प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे आणि त्यांच्या विरोधकाचाही तो हक्क टिकेकरांनी कधी अमान्य केला नाही. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे माझा टिकेकरांशी परिचय 2005 मध्ये झाला आणि गेल्या दहा वर्षांत आमचा घनिष्ठ संबंध आला.

त्याआधी 1995 ते 2000 या पाच वर्षांत शिवाजी विद्यापीठातील माझ्या कुलगुरुपदावरच्या कार्यकाळात माझ्याविरोधात मोठे संघर्षपर्व घडले. माझ्या विरोधात संप, धरणे, काम बंद इत्यादी आंदोलन करणाऱ्या संघटनांना फार मोठे राजकीय पाठबळ होते. विद्यापीठ कायदा 1994 आणि विविध परिनियमांच्या चौकटीत प्रशासकीय कारभार व्हावा, अशी माझी भूमिका होती. मात्र माझ्या विरोधकांना प्रसारमाध्यमे अधिक प्रसिद्धी देत होती.

त्याच सुमारास सेना-भाजप युतीचे सरकार (डिसेंबर 1999) जाऊन आघाडी सरकार सत्तेत आले, तसे माझ्या विरोधकांनी सातत्याने सुरू ठेवलेल्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत उमटू लागले. त्या वेळी तर माझा टिकेकरांशी परिचयच नव्हता, कधी भेटही झालेली नव्हती. कुलगुरुपदावरून मला कसे हटविता येईल, त्यासाठी जमेल तर विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून, ‘कुलगुरूंना पदावरून हटविण्यासंबंधी राज्यपालांच्या अधिकारांबाबत तरतुदींमध्ये कसा बदल करता येईल’- अशा प्रयत्नांत तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री दिलीप वळसे-पाटील व्यग्र होते.

मात्र विद्यापीठाच्या कारभारात शासनाच्या अशा हस्तक्षेपाविरोधात प्रथम डॉ.टिकेकरांनी दै.लोकसत्तेत दोन-तीन अग्रलेख लिहिले. त्यापैकी एका अग्रलेखात, त्या वेळचे कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर बाबूराव फरास यांनी माझ्या विरोधात लिहिलेल्या (किंवा त्यांना लिहून दिलेला, पण त्यांच्या नावावर प्रसिद्ध झालेल्या) दै.लोकसत्तेतील प्रदीर्घ लेखाला टिकेकरांनी उत्तर दिले होते. दै.लोकसत्तेने माझ्या समर्थनार्थ असे लेख लिहिलेले पाहून, नंतर तेव्हाचे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक कुमार केतकरांनीही माझी बाजू घेऊन अग्रलेख लिहिला. दै.लोकमतचे सांगलीस्थित सहसंपादक राजा माने यांनी तर पाच-सहा लेखांची लेखमालाच प्रसिद्ध केली. अगदी पहिल्या पानावर ते लेख प्रसिद्ध झाले होते आणि राज्य शासन व माझ्या विरोधकांचे पितळ उघडे पाडले होते.

या संपादकीय मंडळींपैकी कुमार केतकर एका व्याख्यानासाठी कोल्हापूरला आले असताना शिवाजी विद्यापीठात निदान येऊन विद्यापीठाने सुरू केलेल्या अनेक चांगल्या उपक्रमांबद्दल माहिती घेऊन गेले होते. मात्र इतर पत्रकारांशी तर माझा परिचय नव्हता, भेट झाली नव्हती. अशा तटस्थ वृत्तीने, व्यक्तिनिरपेक्ष भूमिका घेऊन डॉ. टिकेकरांनी माझी पाठराखण तेव्हा केली होती, याचे आज कृतज्ञतापूर्वक स्मरण होत आहे.

Tags: मृत्युलेख कुमार केतकर कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ धनागरे अरुण टिकेकर लोकसत्ता Obituary Kumar Ketkar Kolhapur Shivaji University Dhanagare Loksatta Aroon Tikekar Arun Tikekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

द. ना. धनागरे

(1936 - 2017) समाजशास्त्राचे अभ्यासक, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु,भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव. ‘भारतातील शेतकऱ्यांच्या चळवळी (1920-50)’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. 30 वर्षे विदर्भातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके