डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नरेंद्र मोदींच्या विजयाने मरगळलेल्या भाजपास उभारी येण्यास मदत होईल.यानंतर येणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या निवडणुका भाजपकरिता महत्त्वपूर्ण असतील. आज मोदी भाजपच्या दुसऱ्या फळीतील प्रभुत्वशाली नेते बनवले आहेत, पूर्वीच्या वाजपेयी-अडवाणी या सलामीच्या जोडीत आता अडवाणी-मोदी असा बदल होत आहे. अडवाणी व मोदी हे प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात. हिंदुत्वाच्या जोरावर सत्ता मिळविता येत असली तरी ती टिकविण्यासाठी विकास हा करावाच लागतो असे गुजरातच्या निवडणूक निकालावरून म्हणता येईल.

विविध वाहिन्यांनी आपल्या सर्वेक्षणातून व्यक्त केलेले अंदाज चुकवत नरेंद्र मोदी काँग्रेसचा सरळ पराभव करून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाले.काँग्रेसने पूर्ण ताकदीनिशी केलेला प्रचार, पक्षातील अंतर्गत बंडाळी, विरोधातील प्रसारमाध्यमे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेची नाराजी या सर्वांवर मात करीत मोदींनी भाजपला ११७ जागा मिळवून दिल्या. या यशाने मोदी ‘विजयाचे सौदागर’ ठरले आहेत. उत्कृष्ट प्रशासनाच्या साहाय्याने गुजरातचा केलेला विकास आणि लोकांच्या भावनिकतेला घातलेली साद याच्या जोरावर मोदींनी गुजरातची सत्ता पुन्हा काबीज केली आहे. मोदींच्या विजयाकडे वळण्यापूर्वी गुजरातची राजकीय पार्श्वभूमी पाहूयात.

काँग्रेसकडून भाजपकडे...

अहमदाबादमधील साबरमती आश्रम गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र होते. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा विस्तार गुजरातमध्ये झाला. १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ११३ जागा मिळवून काँग्रेस पक्ष सत्तेवर आला.या निवडणुकीमध्ये ५० टक्के मते काँग्रेस पक्षास मिळाली. १९६७च्या निवडणुकीत स्वतंत्र पक्षाने काँग्रेसला चांगली टक्कर दिली. काँग्रेसची सत्ता टिकली, मात्र वीस जागांचा फटका काँग्रेसला बसला. स्वतंत्र पक्ष हा श्रीमंत शेतकरी, सरंजामदार, ब्रिटिश परंपरेतील नोकरशहा, संस्थानिक यांच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करीत होता. गुजरातच्या राजकारणात उजव्या पक्षांना नेहमीच वाव राहिल्याचे दिसून येते.बांगला देश युद्धातील विजयाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १४०जागा मिळाल्या. १९७५ ची निवडणूक मात्र बहुरंगी आणि गुजरातमध्ये काँग्रेसचा पहिला पराभव करणारी ठरली. इंदिरा गांधींच्या काँग्रेस (आय)ला पराभूत करून जनता मोर्चा, भारतीय जनसंघ, लोकदल, किसान मजदूर पक्ष यांचे संयुक्त सरकार सत्तेवरआले.

१९८० नंतर काँग्रेसने गुजरातमध्ये ‘खाम’ नामक यशस्वी प्रयोग केला. खामचा प्रयोग म्हणजे क्षत्रिय (राजदूत व कोळी),दलित, आदिवासी आणि मुस्लिम युतीच्या माध्यमातून ब्राह्मण, बनिया व पाटीदार यांच्या सत्तेला शह देण्याचा प्रयत्न केला.१९८०च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत दहाने वाढ झाली. १९८५च्या निवडणुकीत काँग्रेसने १४९ जागा पटकावीत सर्वोच्च यश संपादित केले.

१९८५ नंतर मात्र काँग्रेस पक्ष उतरणीला लागला. १९८५ मधील विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळविलेल्या काँग्रेस पक्षास त्यानंतर लगेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये भाजपकडून पराभव स्वीकारावा लागला. शहरी भागामध्ये वर्चस्व स्थापित करीत भाजपने महत्त्वाच्या महानगरपालिका ताब्यात घेतल्या.

गुजरातमध्ये शहरी भागात २५% लोकसंख्या एकवटलेली आहे. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत जनता दल आणि भाजपने मिळून काँग्रेसचा पराभव केला.१९९१च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २६ पैकी २४ जागांवर विजय मिळवून काँग्रेसला हादरा दिला. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत १२२ जागा मिळवून भाजप पहिल्यांदा स्वबळावर सत्तेवर आला. १९९८ च्या काँग्रेस, भाजपआणि शंकरसिंग वाघेलांचा राष्ट्रीय जनता पक्ष यांच्यात झालेल्या लढतीत भाजप पुन्हा सत्तेवर आला. भाजपच्या गुजरातमधील स्थान बळकटीस अनेक पदर होते. विश्व हिंदू परिषदेने हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची कट्टर फळी उभी केली. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघटनात्मक पातळीवर कार्याची उभारणी केली. आदिवासी भागांकडे विशेष लक्ष केंद्रित केले.२००२च्या निवडणुकीमध्ये दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिळविलेला विजय तर सर्वश्रुतच आहे. दंगलीच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांमध्ये भीतीची भावना निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरला आणि त्याच्याच जोरावर भयमुक्त गुजरातची घोषणा करून सत्तेवर आला.

मोदींचा विजय 

भाजपने २००२ च्या निवडणुकीत मिळविलेल्या जागांच्या तुलनेत यंदा १० जागांची घट झाली आहे, तर काँग्रेसच्या जागांमध्ये ११ जागांनी वाढ झाली आहे, तरीही मोदींचा हा विजय खूप मोठा मानला गेला आहे. २००२च्या निवडणुकीला गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलींची पार्श्वभूमी होती. दंगलीनंतर सुशिक्षित शहरी मध्यमवर्गीयांबरोबरच ओबीसी, दलित आणि आदिवासी भाजपच्या बाजूने उभे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व परिषदेने आपली सर्व ताकद भाजपच्या बाजूने लावली होती. भाजपमधील सर्व गटांनी एकदिलाने कामकरून विजय मिळवला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीतील परिस्थिती वेगळी होती.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंपने मोदींच्या मनमानीला वेसण घालण्याचे ठरविले होते. सौराष्ट्रात केशुभाई पटेल यांनी मोदींची तुलना हिटलरशी करून उघड उघड बंड पुकारले होते. सात बंडखोर आमदार भाजपमधून बाहेर पडून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवीत होते.कांशीराम राणा, सुरेश मेहता हेदेखील मोदीविरोधी अभियानात सामील झाले होते, या सर्वांवर मात करीत मोदींनी गुजरातमधील विजय साकारला.

मोदींनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासाचा मुद्दा प्रभावीपणे प्रचारात मांडलाहोता. खाजगीकरणाच्या माध्यमातून उपलब्ध केलेली मुबलक वीज, गुजरातभर विनलेले रस्त्यांचे जाळे, जकात रद्द करण्याचा घेतलेला निर्णय, शेती व आरोग्य यांकरिता राबविलेल्या विविध योजना या बाजू प्रचारात ठळकपणे समोर आणल्या.सोनिया गांधींनी केलेल्या ‘मौत का सौदागर’या टीकेचे भांडवल करण्यात मोदी यशस्वी ठरले. भावनातून संवाद साधण्याच्या त्यांच्या शैलीने जनतेतील आणि त्यांच्यातील अंतर कमी झाले.काँग्रेसविरुद्ध मोदी अशा रंगलेल्या लढ्यात मोदी यशस्वी ठरले.

सौराष्ट्रात तारले, पण मध्यगुजरात निसटले 

केशुभाई पटेलांच्या नाराजीमुळे सौराष्ट्रात काँग्रेसला जोरदार विजय मिळण्याच्या शक्यता वर्तविल्या जात होत्या, मात्र प्रत्यक्षात भाजपने बाजी मारली. सौराष्ट्रातील मागील जागांच्या तुलनेत भाजपच्या जागा ३ ने वाढल्या.भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मध्य गुजरातमध्ये यंदा काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. मध्य गुजरातमध्ये भाजपला २२ जागांचा मोठा फटका बसला तरकाँग्रेसच्या १५ जागा वाढल्या. उत्तर गुजरातमधील भाजपच्या जागांत ५ जागांची वाढ झाली, तर दक्षिण गुजरातेत २ जागांचा फटका बसला.

बहुजन समाज पक्षाने ११६ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, मात्र बसपाला कच्छ-सौराष्ट्र वगळता इतर ठिकाणी फारशी मते मिळाल्याचे दिसत नाही. कच्छ-सौराष्ट्र मध्ये बसपाने भाजपाच्या विजयास हातभार लावला आहे. भाजप बंडखोरांची मदार असणाऱ्या लेवा पाटीदार आणि कोळी समाजाची मते बहुजन समाज पक्षाकडे वाढल्याने अप्रत्यक्षपणे भाजपचा फायदाच झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मध्य गुजरातमध्ये दोन आणि सौराष्ट्रात एक अशा तीन जागा मिळवत गुजरातमध्ये आपले खाते खोलले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा झाला आहे. मतविभाजन टाळल्याने मध्य गुजरातमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळविता आले. शिवसेनेने नरेंद्र मोदींच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला, शिवसेना नेते मनोहर जोशी नरेंद्र मोदींच्या शपथविधीस उपस्थित राहिले, तरी शिवसेनेने भाजपच्या तीन उमेदवारांच्या पराभवास हातभार लावल्याचे दिसून येते.

मोदी जिंकले आता पुढे काय?

गुजरातमधील विजय केवळ मोदींचा असल्याचे चित्र प्रसारमाध्यमांकडून रंगविण्यात येत होते. राष्ट्रीय पातळीवरील भाजपा नेत्यांनी हा विजय भाजपचा असल्याची विधाने केली होती, त्यावर प्रतिक्रिया देताना ‘मी पक्षापेक्षा मोठा नाही, आईपेक्षा मुलगा मोठा होऊ शकतो काय?’असे भावस्पर्शी उद्गार मोदींनी काढले.केशुभाई पटेलांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावरून मोदींनी विजयाने हुरळून न जाता सर्वांशी जमवून घेण्याची भूमिका स्वीकारल्याचे दिसून येते.

मोदींच्या विजयाने मरगळलेल्या भाजपास उभारी येण्यास मदत होईल.यानंतर येणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेशआणि छत्तीसगढच्या निवडणुका भाजपकरिता महत्त्वपूर्ण असतील. आज मोदी भाजपच्या दुसऱ्या फळीतील प्रभुत्वशाली नेते बनवले आहेत, पूर्वीच्या वाजपेयी-अडवाणी या सलामीच्या जोडीत आता अडवाणी-मोदी असा बदल होत आहे. अडवाणी व मोदी हे प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात.हिंदुत्वाच्या जोरावर सत्ता मिळविता येत असली तरी ती टिकविण्यासाठी विकास हा करावाच लागतो असे गुजरातच्या निवडणूक निकालावरून म्हणता येईल.

काँग्रेस मोदींना पराभूत करू शकली असती तर मध्यावधी निवडणुका अटळ होत्या, आता तो प्रश्न मोदींच्या विजयाने मिटला आहे. गांधी घराण्याची पुण्याई प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवून देईलच असे नाही. विकास घडवून येण्याकरिता निर्णयक्षम प्रशासनाची आवश्यकता असते, याउलट चित्र 
काँग्रेसशासित राज्यांमध्ये दिसते. काँग्रेस मुख्यमंत्र्याला साधे साधे निर्णय घेण्यासाठीही दिल्लीवारी करावी लागते यामुळे चुकीचा संदेश जनतेमध्ये जातो, काँग्रेसला या परंपरेत बदल करावा लागेल.

मागील गुजरात निवडणुकीतील पराभवानंतर विलासरावांना हटवून सुशिलकुमारांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आणले गेले होते. आता नारायण राणेदेखील हा मुहूर्त साधण्यास उत्सुक आहेत, याचा निकाल काँग्रेस नेतृत्वाला लावावा लागणार आहे.

राजधर्माचे पालन 

निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने हिटलर, मुसोलिनी यांसारखे हुकूमशहादेखील विजयी झाले होते, मात्र त्यांना त्यांच्या दुष्कर्माची फळे शेवटी भोगावीच लागली. मोदींना विकासाची ढाल पुढे करून मानवतेला काळीमा फासता येणार नाही. विकास नेमका कुणाचा करायचा, हेदेखील ठरवावे लागेल.सर्वसामान्यांना फायदा होईल असाच विकास गुजराती जनतेला अपेक्षित असेल, नाहीतर जनता जितक्या सहजपणे डोक्यावर घेते तितक्याच सहजपणे पायउतार होण्यासदेखील लावते, याचे भान मोदींना ठेवावे लागेल.

Tags: दि. शि. जाधव निवडणूक गुजरात भाजप नरेंद्र मोदी 2008 elections in gujrat report gujrat bjp elections narendra modi in 2008 bjp weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके