डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मनोज बोरगावकरांची भाषा मराठी, तेलुगू, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या भाषांच्या शब्दकळांतून तयार झाली आहे. पाठंगुळीवर, बाळंतिणीची वज, पोहण्याचा किरम्या, इतल्ला, आसार, साफसुथरी माणसं, मारीयिले, कातिल अशांसारख्या शब्दांत बोरगावकरांचे स्वतंत्र भाषाविश्व निर्माण होते. मराठीतली ही आजची प्रायोगिक कादंबरी आहे. माणसांचे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक असा जीवनाधार न घेता व्यक्तिरेखांच्या माध्यमातून शापित व्यक्तिरेखांचे आयुष्य उभे करणे तसे अवघड असते. पण हे अवघड काम मनोज बोरगावकरांनी सुकर केले आहे.
आजच्या समाजापासून तुटलेली नदी, तिच्याभोवतीचा समाज, त्याची मूल्यव्यवस्था अर्थाशी निगडित झालेली असताना, नदीचे मातृत्वही लोप पावलेले असताना तिच्याशी एकरूप झालेला ‘नदीष्ट’ हा मराठी कादंबरीच्या सीमारेषा मोडणारा कादंबरीकार आहे.
 


‘नदीष्ट’ ही मनोज बोरगावकरांची पहिलीच कादंबरी. ती सर्वार्थाने वेगळी आहे. म्हटलं तर तिला सांगण्यासारखं एक कथानक आहे, म्हटलं तर नाही. कादंबरीला तसा नायकही नाही, परंतु अनेक व्यक्ती आणि त्यांचे मन पोखरून टाकणाऱ्या जीवनकथा यात आहेत. नदीची व्यक्तिरेखा त्यात महत्त्वाची. ही नदी म्हणजे गोदावरी. यातील व्यक्तींच्या जीवनप्रवासामुळे ती लक्षात येते. या नदीभोवती सारी कथानके घडत जातात, व्यक्तिरेखा उभ्या राहतात.
‘नाद’चा उत्पत्तिकोशातील अर्थ ध्वनी, आवाज आणि छंद असा आहे. मराठी भाषेत नाद हा शब्द अनेकार्थाने वापरला जातो. घंटानाद, पिण्याचा नाद, संगीताचा नाद, पत्त्यांचा नाद, बाईचा नाद- असा. तसेच तो फार नादिष्ट आहे, तो तिच्या नादी लागला, भजनाच्या नादी लागला, त्याला चित्रकलेचा नाद आहे- अशा आशयाची विविध वाक्ये-शब्द मराठीत वापरले जातात. नदी, नादी आणि नदीष्ट अशा आशयाने ही कादंबरी व्यापलेली आहे. निवेदकाला नदीचे- पोहण्याचे वेड आहे. तो नदीचा वेडा आहे. नदीचा नादिष्ट आहे. तो नदीष्ट आहे. त्याला नदीवर पोहण्याचे प्रचंड वेड आहे. नाद आहे. त्याच्या बॅगेत नेहमी स्विमिंग कॉश्चुम असतो. तसा हा निवेदक कोणत्या तरी ऑफिसमध्ये कामाला जातो. नोकरीच्या ठिकाणी तो रेल्वेने अप-डाऊन करतो. घरी जाण्यापेक्षा नदीवर पोहण्यासाठी जातो. एखादा दारुडा घरी जाण्यापूर्वी दारूच्या अड्‌ड्यावर जावा तसा हा नदीवर जातो. या पोहण्याच्या नादातून कादंबरीतील व्यक्तिरेखा साकार होतात आणि कथानके उभी राहत जातात. निवेदकाला नदी म्हणजे आईच वाटते. दहा वर्षांपासून तो नदीष्ट आहे. 


नदीचा डोह म्हणजे नदीचे गर्भाशय. जे आईचे गर्भाशय असते ते भीतिदायक नसते, त्यामुळे नदीत बिनधास्त पोहता येते. नदी आईच. मग भीती कसली. पण त्याला ती वाटते. कधी कधी. म्हणून तो आपण नदीवर मेलो तर कुणी तरी बातमी पोहोचवेल घरी, निदान पुजारी- असे म्हणतो.

या नदीवर त्याला काही व्यक्तिरेखा भेटतात. कुरूप भिकारीण सकिनाबी, स्टेशनवर दिवसरात्र भीक मागणारी. रेल्वे स्टेशन आणि नदी यांचा काहीएक संबंध लेखकाने जुळवला आहे. स्टेशनवर भेटलेल्या व्यक्तिरेखा त्याला नदीवर भेटतात. या ना त्या निमित्ताने स्टेशनवर भेटलेल्या व्यक्ती नदीवर येतात. नदीवर वावरणाऱ्या व्यक्तींना दिसतात आणि त्या काही तरी निमित्ताने संबंधित होतात. त्या-त्या व्यक्तीची एक-एक कथा असते. त्यातीलच सकिनाबी, तृतीयपंथी सगुणा, साप पकडणारा प्रसाद, भिकारी भिकाजी आणि नदीकाठावरील वयाची शंभरी ओलांडलेले चिंचेचे झाड व नदी. 


सुरुवातीला या नदीवर पोहणारा एक ग्रुप होता. हळूहळू तो कमी झाला. त्यातला दादाराव, जनावरं चरायला आणणारा काळुभैय्या आणि त्याची काळी कुरूप प्रेयसी, मासे पकडण्यासाठी येणारा पुरभाजी झिंगाभोई बामनवाड, मंदिराचा पुजारी हे आणि झाडाझुडपांनी विस्तीर्ण पसरलेला नदीचा किनारा व नदी. हे नित्यनेमाने निवेदकाला भेटलेले सवंगडी. पावसाळा असो की उन्हाळा- सर्वकाळ नदीशी एकरूप होऊन एक-दीड किलोमीटर पोहणारा निवेदक. तसं निवेदकाला कोणतेही नाव नाही. सगुणा त्याला जान म्हणते, दादाराव त्याला बापू. अशी नावे येतात. तीही क्वचित. आणि ती त्या व्यक्तीपुरती. ‘घरचे लोक’ असा तो घरच्यांविषयी उल्लेख करतो. त्याच्या बायकोचा एकदाच उल्लेख येतो तो पौर्णिमेला हलका मातीचा दिवा, तेलवात आणि काड्याची पेटी, ती देते तेव्हा. ‘‘ती गोदामाय तुमचे एवढे रक्षण करते. आज पौर्णिमा आहे. माझ्यासाठी एवढा दिवा सोडा नदीच्या पात्रात.’’ असे एका ठिकाणी ती म्हणते. बस्स. तसा निवेदक एकटाच कादंबरीभर वावरतो- गो.नी. दांडेकरांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ या कादंबरीतील नर्मदा परिक्रमा करणाऱ्या नायकासारखा. नर्मदा परिक्रमेत त्याला अशाच व्यक्तिरेखा भेटतात. त्यांचे कथानक येते. त्यांचे अद्‌भुत जीवन येते. माचीवरला बुधा जसा एकटा एकाकी आयुष्याशी झुंजतो, तसा नदीष्ट एकटाच असतो. खरं तर नदीष्ट हेच या निवेदकाचे नाव. नदीष्ट हेच सत्य. आणि कादंबरीभर हेच नदीष्ट नाव योग्य वाटते. योग्य आहे.

 ‘जैत रे जैत’ या कादंबरीत जसा लिंगोबाचा डोंगर एक व्यक्तिमत्त्व घेऊन उभा असतो, तशीच या कादंबरीत नदीला एक व्यक्तिमत्त्व मिळते. कधी ती दुथडी वाहणारी असते. कधी उन्हाळ्यात स्वच्छ पाणी गायब होते. तिचा वाळू उपसा होतो. हा वाळूचा उपसा नदीच्या गाभ्याला जखम करणारा असतो- ॲबॉर्शनमुळे होणाऱ्या इजेसारखा. नदीष्टला वाटते, ‘आपल्यालाही स्त्रीच्या गर्भापर्यंत जाता आले; पण गाभ्यापर्यंत कुठे पोहोचता आले? पण आईसाठी मात्र आपण अख्खे काळीज! एवढाच काय काळीजभर फरक आपल्या आणि आईच्या प्रेमात.’

माझंही नातं तसं याच गोदामायशी आहे. पैठणला मीही तिच्यात डुंबायचो. पट्टीचा पोहणारा नाही. पुरात तर मुळीच नाही. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी नदी. नदीच्या काठावर उभं राहून भयभीत होऊन पाहणं, एवढंच होतं. त्याची आठवण आली. अशाच पुरात 60 वर्षांपूर्वी कांदे नावाचा वर्गमित्र गेल्याची आठवण ताजी झाली.

बामनवाडचा तात पट्टीचा पोहणारा. एकदा बामनवाडने सांगितले, ‘‘नदीच्या अन्जान जाग्यावरची तळाची वाळू काढून जीवाजवळच्या माणसाला दिली, तर त्याच्या जिन्‌गानीची मनशा पुरी व्हते.’’ असे सांगितल्यावरून नदीष्ट पार दूरवर जाऊन नदीच्या व्हर्जिन जागेवरील वाळू 14-15 फूट खोल पाण्यातून काढतो. हा प्रसंग गूढतेकडे जातो. आपणही स्तिमित होऊन वाचत राहतो. पण प्रश्न उभा राहतो- नदीष्ट कोणाच्या जिन्‌गानीची मनशा पुरी करण्यासाठी हे मृत्यू-धाडस करतो? त्याविषयी नदीष्ट म्हणतो- ‘‘वाळू एवढी मोलाची... लाखमोलाची असू शकते, हे पहिल्यांदाच उमजले. माझ्यासाठी माझ्यापुरती शारीर व मानसिक पातळीवरची एक अविश्वसनीय लढाई संपली होती अन्‌ ती मी जिंकली होती.’’ यातून स्वत:च्या मानसिक आणि शारीर पातळीवरची ही लढाई होती त्या जिनगानीची, हीच नदीष्टची मनशा लक्षात येते. केवळ नदीष्ट असल्यामुळे तो हे धाडस करतो. असा हा नदीवेडा नदीष्ट.

सकिनाबी भिकारीण कुरूप असली तरी स्त्री असते. नदीष्टला ती स्टेशनवर दिसायची. ‘बहुत पाटेकूच आया तू! मर जार्इंगांना नदी में बहकर’- असं म्हणणारी. स्वत: मात्र पहाटेच नदीवर यायची. कुरूप असलं तरी आपलं सौंदर्य कुणी पाहू नये म्हणून. एकदा ती नदीष्टला म्हणते, ‘‘माटी मिले, रोज ठेसन पे आते गलेमें की सोने की चैन निकालके येत जा.’’ तिच्याजवळचे पोट्टेपाट्टे त्याची जान भी घेतील, म्हणणारी. रेल्वेखाली मरते. सकिनाबीची कथा संपते.

अशा व्यक्तिरेखा नदीष्टला भेटतात. या ना त्या कारणाने त्याच्यावर प्रेम करतात. आपली जीवनकथा सांगतात. नदीष्ट त्यांना ती त्यांच्याविषयी आपुलकी, आपलेपणामुळे सांगण्यास भाग पाडतो. त्यांनाही आपलं मन पोखरणारं दु:ख त्याला सांगावं वाटतं. नवरा दारू पितो. त्याची दारू सुटावी म्हणून चांगल्या घरातली बाई सांच्याला नदीवर येते. टुकार पोरं बेसरमाआड तिची इज्जत लुटतात. ते बामनवाड पाहतो. पण तो टुकार पोरांच्या भीतीमुळे काहीही करू शकत नाही, याचं त्याला अपार दु:ख होते. ‘‘आयुष्य म्हणजे तुटलेल्या नात्यांची अजीबोगरीब कहाणी’’- ही त्यावरची नदीष्टची अगतिक प्रतिक्रिया. इरबा अशीच व्यक्तिरेखा. स्वत:ची शहाणीसुर्ती मुलगी विषारी औषध पिऊन मरून जाते, त्याचे अपार दु:ख असलेली इरबा. कुणी तरी इरबाला सांगतं- मंदिराची सेवा कर, दु:ख कमी होईल. तेव्हा मुलीच्या मृत्यूचे दु:ख मंदिरात झाडलोट करून विसरू पाहते. 


नदीष्टसारखीच सगुणाही या कादंबरीतील महत्त्वाची व्यक्तिरेखा. किंबहुना, मनोज बोरगावकरांनी या कादंबरीत तृतीयपंथीयांचे वेदनीय विश्व आपल्यासमोर मांडण्यासाठी, आपल्या साऱ्या संवेदना पार आतून फुलवल्या. त्यातून त्याचीही एक वेदना त्याच्या मनात रुतत-भळभळत असेल. सगुणा तृतीयपंथी. रेल्वे स्टेशनभर दिसायची. तशीच नदीवर येते. तिचं नदीवर येणं बामनवाडला आवडत नाही. सगुणा नदीष्टला बिनधास्त विचारते, ‘क्या बोलते तुम हमको?’ तृतीयपंथीयाचं मन व्यथित करणारं जीवनवास्तव आपल्यासमोर साकार होत जाते. ‘‘आज्जी मला अनशापोटी-निहारपोटी जास्वंदाची फुलं खायाला घालायची आणि पुटपुटायची, ‘बाबा, तुझ्या आज्ज्यासारखी तुझी नको ढकलस्टार्ट गाडी व्हायला.’’ सगुणाच्या चड्डीत हात घालून त्याला जाणवते ‘युनक’ आणि ‘पुरुष’ यांच्यातील सीमारेषा. सगुणा मूळची महाराष्ट्रातल्या सीमाभागातील. जीव तोडणारी तृतीयपंथीय दीक्षा घेतल्यानंतर गुरूबरोबर गोरखपूर, कानपूर, अहमदाबाद, दिल्ली अशी भटकणारी. घरून पळून गेल्यावर गोटीसह लिंग कापून टाकण्याचा दीक्षा विधी किती भयानक... अमानवी! दोन हिजडे तोंड दाबून दोन्ही पाय दाबून धरून धारदार सुऱ्याने गोट्यांसह अवयव कापून टाकतात. ‘रक्त तसेच वाहू दिले. रक्ताबरोबर उरलेसुरले पुरुषत्वही वाहून गेले पाहिजे!’ जखम बरी व्हावी म्हणून जखमेवर उकळते तेल टाकणे आणि वनस्पतीची पेस्ट बांधणे. यावर सगुणाची व्यथा- ‘‘आता आपला वर्तमान कोठल्याही भूतकाळाशीच मोहताज असणार नाही. आईपासून नाळ तोडताना कोणीही लहान मूल ते पाहू शकत नाही. मी अभागी की, माझी नाळ तुटताना मी माझ्या डोळ्यानं पाहिली होती. ही भळभळणारी जखम आता आयुष्यभर वागवावी लागणार!’’ आईच्या भेटीसाठी तळमळणारी सगुणा आणि आईला परत दु:ख नको, तिची वेदना पुन्हा भळभळायला नको म्हणून तिला न भेटता हृदयावर वेदनेचा दगड ठेवून जाणीवपूर्वक दूर जाणारी सगुणा... आपल्या मनात वेदनेचा कल्लोळ उठवून जाते.

सगुणाच्या निमित्ताने तृतीयपंथीयांचे आपल्यासमोर उभे केलेले दु:ख, वेदनाविश्व आणि समाजाने त्यांना नाकारावे, त्यांची अवहेलना करावी- ही भळभळती जखम नदीष्टने आपल्यासमोर उभी केली आहे. सगुणाची कथा ऐकून आपण पार आतून हादरतो. येथे मला हेन्री शेरिअरच्या पॅपिलॉनची आठवण येते. समाजाने तोडलेल्या आणि स्वत: समाजापासून दूर जाऊन कुष्ठरोग्यांचं एक विश्व निर्माण करणाऱ्याचं बेटावरचे विश्व. अवयव गळालेले, विद्रूप झालेले कुष्ठरोगी. मात्र माणुसकी न हरवलेले. ते पॅपिलानला मदत करतात. शारीरिक व्यक्तिमत्त्व हरवलेल्या व्यक्ती आणि समाजात असूनही समाजाने नाकारलेल्या तृतीयपंथीय समाजाच्या दु:ख-वेदनांची आठवण येते.

सगुणाची कथा सर्वार्थानं वेगळी असली तरी ती नदीकाठी घडत नाही. ती नदीकाठी येते. समाजापासून नदीष्ट तुटू नये म्हणून काळजी घेते. नदीष्टही तिला नदीकाठी ‘तृतीयपंथीय’ भीतीपोटी एकांतात बोलावतो. तिचे नाते नदीष्टशी आहे. ते त्याच्याशी एकरूप होते. त्यांच्यात एक सुप्त ‘बाँडेज’ तयार होतो. ‘‘ती पूर्वाश्रमीचा पुरुष होता म्हणून, की मी सुप्त हिजडा होतो म्हणून?’’ हा प्रश्न स्वाभाविकपणे नदीष्टच्या मनात उभा राहतो. पण सगुणा इन्टलेक्च्युअल आहे. तो इन्टलेक्ट कोरा, सिद्धांतीय पठडीतला नाही. जीवनाचे कटू अनुभव पचवून-रिचवून तयार झालेला एक अनुभवसिद्ध ‘इंटलेक्ट’ तिच्यात आहे, अशी अनुभूती नदीष्टला येते. हिजड्याचे बीभत्सपण- ‘तिच्या आयुष्याच्या पानापानांतून जीवघेणे कारुण्य आणि तशाही परिस्थितीत तिने जपून ठेवलेल्या जगण्यातले उदात्तपण’ नदीष्टला भारावून टाकते. नदीष्टला सोडून जाताना तिनं त्याची काढलेली समजूत, आईला न भेटण्याविषयी तिनं केलेला विचार याने तो अस्वस्थ होतो.

यापूर्वी मराठी कादंबरीत तृतीयपंथीयांचे चित्रण आलेले नाही असे नाही; परंतु ते वरवरचे, प्रचारकी आणि एकांगी वाटते. मनोज बोरगावकरांनी सगुणाच्या माध्यमातून साकार केलेले तृतीयपंथीय विश्व मन पोखरणारे आणि कमालीच्या तटस्थतेने रेखाटलेले आहे. सगुणाची मैत्रीण मालाडीची कथाही अशीच पण वेगळी आहे. मालाडी या नावात तिची अपार वेदना दडलेली आहे. मालाडी पुरुष ठेवते. त्याला गिरिया म्हणतात. त्यापासून आपल्यास गर्भधारणा होऊ नये म्हणून रोज माला-डीची गोळी ती घेत असते. पुढे तेच नाव तिला पडते. मालाडी ही तृतीयपंथी व्यक्तिरेखा. तिच्या या मानसिक अवस्थेनं आपण हादरून जातो.

तुरुंगातला रौनक त्याच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराने आत्महत्या करतो. नदीवर आलेला प्रसाद, त्याची सर्प पकडण्याची कथा येते. कथा आणि साप पकडण्याचे कौशल्याचे निवेदन इतर वर्णनाप्रमाणे छान झाले आहे. बोरगावकरांच्या भाषाशैलीमुळे ते नदीष्टमध्ये एकरूप झाल्यासारखे वाटते. पण तसे ते नाही. नदीष्टमधील सारे प्रसंग, व्यक्तिरेखाअंतर्गत एकमेकांशी एकरूप झालेले आहेत. त्याचे जीवन दु:ख आणि वेदनेने भरलेले आहे. फक्त ‘प्रसाद-साप’ कथा इतर व्यक्तिरेखांप्रमाणे नदीष्टशी एकरूप होताना दिसत नाही. ही कथा वगळली असती, तरी आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने गालबोट लागले नसते. अशा व्यक्तिरेखा आपल्याला कादंबरीत भेटतात, आपल्या मनात वावरतात. त्यांचं दु:ख, वेदना आपल्या मनात उतरवून निघून जातात. ही मनोज बोरगावकरांची लेखनशैली मराठी कादंबरीत फारशी कुठं आलेली दिसत नाही. त्यामुळे नदीष्ट ही फक्त नदीष्ट म्हणून आपल्या मनात कायम रेंगाळत राहते.

मूळ कोकणातला भिकारी- भिकाजीची कथा. नियतीनं त्याच्यावर केलेला अन्याय... चांगली नोकरी असलेला. मांजर समजून स्वत:च्या मुलीचा त्याच्याकडून झालेला खून, त्याला झालेली शिक्षा... सुटका झाल्यानंतर घरी जाण्याचे सारे मार्ग थांबलेले... गोदाकाठाने भिकारी म्हणून झालेला प्रवास... या भिकाजीची कथाही अशीच दु:खद आहे. या साऱ्या कथांत प्रसादची कथा तेवढी वेगळी वाटते. अशी अनेक पात्रे नदीष्टच्या आयुष्यात येतात. नदीच्या काठी त्यांचा नदीष्टशी संबंध येतो. त्यांच्या कथा मांडल्या जातात. त्यातून व्यक्तिरेखा उभ्या राहतात. या व्यक्तिरेखांबरोबर नदीष्टची व्यक्तिरेखाही उभी राहते. नोकरी करणारा, कुटुंब असलेला, रेल्वेनं अप-डाऊन करणारा, हळव्या मनाचा, जिद्दी- अशी ही निवेदकाची व्यक्तिरेखा नदीवर अपार प्रेम करणारी आहे. ‘नदीचा तळ लागतो कधी कधी, पण तिची खोली सापडणे मात्र दुरापास्त असते.’ इवल्याशा माणसाचे अंतरंग हाती लागत नाही, तर एवढ्या सखोल नदीचे अंतरंग कसे हाती लागतील बरे- हे नदी आणि मानवी जीवनसत्य शेवटी शिल्लक राहते. नदी आणि नदीष्ट यांचं नातं अतूट आहे. त्याच्या अस्तित्वातच नदी एकरूप होताना दिसते.

कादंबरीतील शेवटचे प्रकरण थोडे निष्कर्षासारखे जाणवते. ते टाळता आले असते, तर कादंबरी योग्य ठिकाणी संपली असती. अर्थात, हे माझं मत.
मनोज बोरगावकरांची भाषा मराठी, तेलुगू, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या भाषांच्या शब्दकळांतून तयार झाली आहे. पाठंगुळीवर, बाळंतिणीची वज, पोहण्याचा किरम्या, इतल्ला, आसार, साफसुथरी माणसं, मारीयिले, कातिल अशांसारख्या शब्दांत बोरगावकरांचे स्वतंत्र भाषाविश्व निर्माण होते. मराठीतली ही आजची प्रायोगिक कादंबरी आहे. माणसांचे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक असा जीवनाधार न घेता व्यक्तिरेखांच्या माध्यमातून शापित व्यक्तिरेखांचे आयुष्य उभे करणे तसे अवघड असते. पण हे अवघड काम मनोज बोरगावकरांनी सुकर केले आहे.

आजच्या समाजापासून तुटलेली नदी, तिच्याभोवतीचा समाज, त्याची मूल्यव्यवस्था अर्थाशी निगडित झालेली असताना, नदीचे मातृत्वही लोप पावलेले असताना तिच्याशी एकरूप झालेला ‘नदीष्ट’ हा मराठी कादंबरीच्या सीमारेषा मोडणारा कादंबरीकार आहे.


नदीष्ट (कादंबरी)
लेखक : मनोज बोरगावकर
ग्रंथाली, मुंबई
पृष्ठे : 164, किंमत : 200 रुपये

 

Tags: NewBook dadagore मनोज बोरगावकर दादा गोरे नदीष्ट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दादा गोरे
gore.dada@gmail.com | Mob. 9422206820


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके