डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ही लेखमाला सत्य घटनांवर आधारित आहे, यात आलेली पात्रेही खरीखुरी आहेत.अर्थात त्या व्यक्तींचे वर्णन मी त्यांना जसे  पाहिले, अनुभवले त्यावर आधारित आहे.  परंतु त्यामुळे ते परिपूर्ण असेलच असे नाही, हेही प्रांजळपणे इथे नमूद करावेसे वाटते. आज धर्म हा कळीचा मुद्दा बनलाय. आपल्या भावना चटकन दुखावल्या  जातायेत. तू माझ्या धर्माविषयी काही वाईट  बोलू नको, मीही बोलणार नाही ही सोईस्कर भूमिका आपण सोडून दिली पाहिजे.  धर्मातील कर्मकांडाचा पगडा, प्रभाव जर  कमी करायचा असेल तर आज एक नवीन भूमिका अंगिकारण्याची गरज आहे. ‘मी माझ्या धर्मातील काही खटकणाऱ्या गोष्टी सांगतो, तू तुला तुझ्या धर्मातील खटकलेल्या काही बाबी सांग’ असे म्हणून आपण तरुणांनी आज एका नवीन संवादाला सुरुवात करणे गरजेचे आहे. 

मी खरे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेला  एक संगणक अभियंता. कोणत्या तरी सामाजिक कार्यात  भाग घेऊन आपलं छोटेखानी का असेना एक सामाजिक  जीवन बनवावं असं मनोमनी इच्छिणारा. त्यामुळेच मी कधी  फेसबुकवर लॉगिन करून सोशल होऊ पाहायचो तर कधी  बोलीभाषेच्या संवर्धनासाठी जाऊ पहायचो. कधी  संस्कृतीरक्षणात भाग घ्यायचो,  तर कधी स्थानिक सामाजिक  मंडळातही उपस्थिती लावायचो. पण या कशातच माझे मन  रमले नाही. आणि अशातच एके दिवशी ‘ती’ घटना घडली.  ती घटना माझ्या आयुष्यात किती दूरगामी परिणाम घडवून  आणणार आहे,  याची मला तेव्हा कल्पना नव्हती. ती घटना  म्हणजे ‘डॉ नरेंद्र दाभोलकर’ यांची दिवसाढवळ्या झालेली  हत्या. अपघाताने मी परिसरातील एका विवेकवादी ग्रुपच्या  संपर्कात आलो. याअगोदर विविध उपक्रमात चटकन ‘बोअर’ होणारा,  मी,  इथे मात्र रेंगाळलो व नंतर रमलो.  येथील चर्चेमुळे हळूहळू माझ्या विचारांच्या कक्षा रूंदावू लागल्या. विविध मतांची तपासणी या विवेकवादी  ग्रुपमुळे मला करावीशी वाटली. कधीकधी उत्तरं मिळाल्याच्या समाधानापेक्षा,  वारंवार प्रश्न विचारण्याचे  कुतूहलही जागृत असणे तेवढेच महत्त्वाचे असते हे हळूहळू  उमजू लागले.  विवेकी विचार ऐकणे,  ते आवडणे,  ते मनास पटणे व  हळूहळू नेणिवेच्या पातळीवर झिरपून ते कृतीत उतरविणे  असा माझ्यातील सूक्ष्म बदल मला जाणवत होता. हा बदल लिखाणाच्या माध्यमातून टिपावा आणि विवेकी विचाराचा  हा आनंद इतरांसोबतही वाटावा असं वाटू लागलं आणि  यातच या पुस्तकाची बीजे रोवली गेली.

जे काही  आपल्याला आपल्या मर्यादित दृष्टीने जाणवलंय,  उमजलंय  ते मनापासून,  कोणाचीही पर्वा न करता,  हवं तसं आणि मुख्य  म्हणजे आपणा स्वतःला वाचावं वाटेल असं लिहावंसं  वाटलं. लिहिण्यास वर्ष-दीड वर्ष वेळ घेऊन एप्रिल 2018  मध्ये ड्राफ्ट फायनल केला.  त्याच एप्रिल महिन्यात ‘साधना’च्या पुण्याच्या  कार्यालयात पहिल्या-वहिल्या पुस्तकाचे बाड घेऊन मी  गेलो. साधना साप्ताहिकाच्या व इतर कामात इतके व्यग्र असूनही संपादक,  विनोद शिरसाठ यांनी 15 दिवसात संपूर्ण  ड्राफ्ट एकहाती वाचून भेटण्यासाठी बोलावलं. हे लिखाण  ‘साधना साप्ताहिकात’  प्रथम लेखमालिकेच्या स्वरूपात व  नंतर पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याची कल्पना त्यांनी  मांडली व तात्काळ जून महिन्यापासून ‘मंच’ ही लेखमाला सुरू झालीही. लेखमाला अगोदर प्रकाशित करण्यासंबंधीची  विनोदसरांची कल्पना अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरली.  महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरूनही वाचकांचा भरभरून  प्रतिसाद ‘मंच’ या लेखमालेला लाभला. प्रतिक्रियेचा  अक्षरशः पाऊस पडला. 

‘साधना’चा वाचक वर्ग किती चोखंदळ आहे याचीही प्रचिती यानिमित्ताने मला आली.  तेव्हा सर्वप्रथम मी विनोदसरांचे ‘साधना’ हे व्यासपीठ  माझ्यासारख्या नवलेखकाला उपलब्ध करून दिल्याबद्दल  आभार मानू इच्छितो. या पुस्तकाचे सुरुवातीचे हस्तलिखित  वाचून अमूल्य सूचना,  प्रतिक्रिया देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक  वीणा गवाणकर,  स्टॅन्ली गोन्साल्विस,  जीवन विकास  मंडळाच्या ‘विवेकमंच’ या विभागाचे फ्रान्सिस आल्मेडा व  ॲड.अतुल आल्मेडा;  माझ्या मराठीच्या शिक्षिका लुईझा डिसोजा तसेच पत्नी अर्लिना मस्करणीस या सर्वांचा मी खूप  ऋणी आहे.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यस्त करिअर,  दर  आठवड्याचा मुंबई-पुणे प्रवासाचा व्याप व कुटुंब सांभाळून  पुस्तक लिहिण्यासाठी वेळ कसा काढावा या विवंचनेत मी पडलो नाही आणि याचे कारण माझे प्रेरणास्थान,  माझे  मम्मी-पप्पा. इतकी वर्षे मुंबईला रोज तीन-चार तास प्रवास  करून त्यांनी मन लावून सरकारी नोकरी केली आणि घरस संसाराबरोबर परसदारातील शेतीही तेवढ्याच मेहनतीने,  जिव्हाळ्याने फुलविली. मला तर फक्त कुदळ- फावड्याऐवजी पेनच काय ते हातात घ्यायचं होतं!

लिखाणासाठी मला हवी असलेली स्पेस प्रेमाने  उपलब्ध करून दिल्याबद्दल माझी सुविद्य पत्नी अर्लिना हिचेही आभार मानावे तितके थोडेच आहेत.  मुखपृष्ठ करणारे गिरीश सहस्रबुद्धे व निर्मिती  व्यवस्थापक सुरेश माने,  साधना परिवारातील सर्व सदस्य व  प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्या सर्व हितचिंतकांचेही  खास आभार.  ही लेखमाला सत्य घटनांवर आधारित आहे,  यात  आलेली पात्रेही खरीखुरी आहेत. अर्थात त्या व्यक्तींचे वर्णन  मी त्यांना जसे पाहिले,  अनुभवले त्यावर आधारित आहे. परंतु त्यामुळे ते परिपूर्ण असेलच असे नाही,  हेही प्रांजळपणे  इथे नमूद करावेसे वाटते.  आज धर्म हा कळीचा मुद्दा बनलाय. आपल्या भावना  चटकन दुखावल्या जातायेत. तू माझ्या धर्माविषयी काही  वाईट बोलू नको,  मीही बोलणार नाही ही सोईस्कर भूमिका  आपण सोडून दिली पाहिजे. धर्मातील कर्मकांडाचा पगडा, प्रभाव जर कमी करायचा असेल तर आज एक नवीन भूमिका  अंगिकारण्याची गरज आहे. 

‘मी माझ्या धर्मातील काही खटकणाऱ्या गोष्टी सांगतो, तू तुला तुझ्या धर्मातील खटकलेल्या काही बाबी सांग’ असे म्हणून आपण तरुणांनी आज एका नवीन संवादाला सुरुवात करणे गरजेचे आहे. पुरोगामी महाराष्ट्रात व एकंदरीतच भारतभूमीत  धर्मचिकित्सेचा आवाज अधिक प्रबळ होण्यासाठी  लोकशाही मार्गाने धर्माशी निगडित विविध मतप्रवाह बिनदिक्कतपणे चर्चिले जाणे गरजेचे आहे. वसईतील, ‘निर्मळ’ या ख्रिस्तीबहुल गावात सुरू झालेल्या एका  स्थानिक पातळीवरच्या उपक्रमाचा हा लेखाजोगा वाचकांना  त्या दिशेने विचारप्रवृत्त करेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. 

(मागील वर्षभर साधना साप्ताहिकातून ‘मंच’ ही लेखमाला प्रसिद्ध झाली. अनोखा विषय व तितकीच अनोखी लेखनशैली यामुळे वाचकप्रिय ठरलेल्या या लेखमालेचे पुस्तक 25 जानेवारी 2020 रोजी, वसई, जि.पालघर येथे कुमार  केतकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या पुस्तकाला लेखकाने लिहिलेले हे मनोगत.) 

Tags: मंच तंत्रज्ञान सत्यकथा आभार मनोगत डॅनिअल मस्करणीस manch tantradnyan satykatha abhar manogat Danial muscarines weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॅनिअल मस्करणीस,  वसई
Danifm2001@gmail.com

'मंच' या पुस्तकाचे लेखक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके