डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पोर्तुगीजांनी आमचं मूळ मराठी नाव बदलून पोर्तुगीज नाव-आडनाव दिलं. बालपण गेलं वा जे शिक्षण घेतलं, ते अगदी मराठमोळ्या वातावरणात. बॉलिवुडने ख्रिश्चन किंवा कॅथॉलिक म्हणजे ब्रिटिश, इंग्रजी चालीरीतींचेच असं टाईपकास्ट करून ठेवलेलं. श्रद्धास्थानी जे बायबल आहे, ते घडलं आशिया खंडाच्या पश्चिम टोकाला असलेल्या इस्राईल या देशात. त्याचबरोबर ज्या चर्चचे आम्ही नियम पाळत आहोत व ज्या चर्चमध्ये आम्ही येशूची भक्ती करण्यासाठी जातो, ते चर्च हे व्हॅटिकन पुरस्कृत म्हणजे इटालियन व युरोपियन. म्हणजे एकाच वेळी महाराष्ट्र, भारत, पोर्तुगीज, व्हॅटिकन, इस्राईल या सर्व ओळखी सोबत घेऊन इतर वसईकरांसारखं मलाही फिरावं लागलेलं आहे. यामुळे ऑफिस, कॉलेज या ठिकाणी बरीच पंचाईत व्हायची. ‘तुझं नाव तर इंग्रजी आहे, मग तू इतकं चांगलं मराठी कसं बोलतोस?..’ ‘तुझं आडनाव तर पोर्तुगीज वाटतंय.’ अशा विविध टिप्पण्याला किंवा टाईपकास्ट केलेल्या वाक्याला मलाच नाही तर इथल्या बऱ्याच ख्रिस्ती लोकांना सामोरं जावं लागतं.

माझा जन्म वसई तालुक्यातील, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वाघोली या गावातील. वाघोलीच्या पूर्वेकडे सोपारा हे ऐतिहासिक स्थळ, तर पश्चिमेकडे निर्मळ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. मौर्यांपासून ते मुघल, पोर्तुगीज, मराठे व ब्रिटिश अशा कित्येकांनी या वसईच्या भूमीवर राज्यं केलं. १५३४ ते १७३९ ही २०५ वर्षं पोर्तुगीजांनी इथे आपली सत्ता प्रस्थापित केली. वीर चिमाजीअप्पांनी १७३९ मध्ये वसईचा किल्ला सर करून वसईवरील पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आणली व इथे पेशव्यांचे- मराठ्यांचे राज्य सुरू झाले. ब्रिटिशांनी १८५८ मध्ये परत या भूमीचा ताबा घेतला आणि १९४७ पर्यंत तो कायम होता.

सोपारा किंवा शूर्पारक हे एक अतिप्राचीन शहर. इथे काही ऐतिहासिक दस्तऐवजांतील वर्णनानुसार, बौद्ध धर्मीय सम्राट अशोकाचे राज्य होते. या परिसरात बौद्ध धर्माशी निगडित महत्त्वाचे शिलालेखही मिळालेले आहेत व हे बौद्ध धर्मीयांचे पुण्यक्षेत्र मानले जाते. तर निर्मळ म्हणजे हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र, आठवे शंकराचार्य स्वामी नित्यानंद यांची ७०० वर्षं जुनी समाधी येथे आहे. अशा या दोन ऐतिहासिक स्थळांमध्ये, शंकराचार्याच्या मंदिराच्या उत्तरेला एका लहान टेकडीवर निर्मळ इथे पवित्र क्रुसाला समर्पित ५०० वर्षं जुने व पोर्तुगीजांनी बांधलेले एक चर्च आहे. धर्मांतरित ख्रिश्चनांची संख्या वाढू लागल्यावर पोर्तुगीजांनी वसई किल्ल्याबाहेरही चर्चे बांधण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी किल्ल्याबाहेर बांधलेले वसईतील हे पहिले चर्च. येशू ख्रिस्त ३३ वर्षं जगला म्हणून प्रतीकात्मकरीत्या बरोबर ३३ पायऱ्या लागतील अशा अचूक उंचीवर स्थापत्यशैलीचा वापर करून हे चर्च बांधण्यात आलेले आहे.

येथील ख्रिश्चन समाज ५०० वर्षांपूर्वी धर्मांतरित झालेला. ख्रिश्चन धर्मात ‘रोमन कॅथॉलिक’ व ‘प्रोटेस्टंट’ हे जे दोन प्रमुख प्रवाह आहेत, त्यापैकी पोर्तुगीज ‘रोमन कॅथॉलिक’ हा पंथ पाळत असल्याने साहजिकच वसईतही ‘रोमन कॅथॉलिक’ या पंथाचा प्रसार मोठ्या प्रमाणात केला गेला. वसईत ज्या चार मुख्य जातींच्या लोकांचे धर्मांतर झाले, त्याच जातींच्या आधारे हा ख्रिश्चन समाज आजही ओळखला जातो. कोळी, कुपारी, वाडवळ आणि ईस्ट इंडियन. माझा जन्म ‘कुपारी’ म्हणून संबोधिल्या जाणाऱ्या समाजात झालेला. ‘कुपारिया’ या कोण्या पोर्तुगीज शब्दाचा तो अपभ्रंश आहे. या समाजाच्या  बोलीभाषेला ‘कादोडी’ भाषा असेही म्हटले जाते. सर्वसामान्य बोलीभाषा असतात तशी हीसुद्धा एक ओबडधोबड पण अवीट गोडवा असलेली व मराठीशी निगडित असलेली एक बोलीभाषा. या भूमीत बरीच वर्षे पोर्तुगीजांनी राज्य केले असल्याकारणाने बरेच पोर्तुगीज शब्दही या भाषेमध्ये मिसळून गेले आहेत. कुपारींना ‘सामवेदी ख्रिस्ती’ असेही संबोधिले जाते. पूर्वाश्रमी ते ‘सामवेदी ब्राह्मण’ होते, त्यावरून हे नाव. सामवेदी हे बहुतांशी वसईच्या उत्तरेला वसलेले आहेत. वसईत मूळ ख्रिस्ती रहिवाशांची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे, तर कुपारींची लोकसंख्या तीस हजारांच्या आसपास आहे. जेव्हा हा समाज धर्मांतरित झाला, तेव्हा हे नवख्रिस्ती लोक लांबून ओळखता यावेत म्हणून या समाजातील स्त्रियांना लाल रंगाची लुगडी व पुरुषांसाठी त्याच रंगाची लाल टोपी असा पेहराव देण्यात आला. पुढे हाच पेहराव मग या समाजाचा एक पारंपरिक पोशाख म्हणून मान्यता पावला.

हिंदू धर्मीयात जे चार वेद सांगितले गेलेले आहेत, त्यापैकी एक म्हणजे सामवेद. विविध विधींप्रसंगी जी गीते गावयाची असतात, त्यांची नोंद या वेदात केलेली आहे. किंबहुना, विविध कार्यक्रमांत स्तोत्रगीते किंवा गीते गाणे हे सामवेदी ब्राह्मणांचे काम. त्यामुळेच असेल कदाचित, सामवेदी ख्रिस्ती समाजामध्येही अजून त्या सामवेदी ब्राह्मणांचे तरंग काही प्रमाणात उमटलेले आहेत. सामवेदी ख्रिस्ती समाजही विविध प्रसंगी लागणारी आपल्या गाण्याची परंपरा टिकवून आहे. मयतासारख्या दु:खित प्रसंगीही इथली स्त्री आपलं दुःखं काव्यात आळविते. ती प्रथा अजूनही कायम आहे. भारताची भूमी ही धर्माला नेहमीच प्राधान्य देत आलेली आहे. विविध धर्मांसाठीही ती एक पोषक भूमी म्हणून राहिलेली आहे. अशा या भूमीत काहीसा परका असलेला ‘कॅथॉलिक’ धर्म न रुजला, तर नवलच. वसईतही ख्रिश्चन धर्माची मुळे खूपच खोलवर गेलेली आहेत. रोमन कॅथॉलिक म्हणजे व्हॅटिकनने घालून दिलेल्या नियमानुसार धर्माचरण करणारा. दर रविवारी सकाळी चर्चमध्ये मिस्सासाठी जाणे, रोज रात्री जेवणाअगोदर प्रार्थना करणे- असे सारे विधी इथला कॅथॉलिक नित्यनियमाने करीत आलेला आहे. धर्माचं आचरण इथे बऱ्यापैकी गंभीरपणे घेतलं जातं.

आपण भारतीय लोक किती तरी वेगवेगळ्या ओळखी एकाच वेळेला सोबत घेऊन वावरत असतो आणि हे वसईतील ख्रिश्चनांबाबतही लागू होतं. पोर्तुगीजांनी आमचं मूळ मराठी नाव बदलून पोर्तुगीज नाव-आडनाव दिलं. बालपण गेलं वा जे शिक्षण घेतलं, ते अगदी मराठमोळ्या वातावरणात. बॉलिवुडने ख्रिश्चन किंवा कॅथॉलिक म्हणजे ब्रिटिश, इंग्रजी चाली-रीतींचेच असं टाईपकास्ट करून ठेवलेलं. श्रद्धास्थानी जे बायबल आहे, ते घडलं आशिया खंडाच्या पश्चिम टोकाला असलेल्या इस्राईल या देशात. त्याचबरोबर ज्या चर्चचे आम्ही नियम पाळत आहोत व ज्या चर्चमध्ये आम्ही येशूची भक्ती करण्यासाठी जातो, ते चर्च हे व्हॅटिकन पुरस्कृत म्हणजे इटालियन व युरोपियन. म्हणजे एकाच वेळी महाराष्ट्र, भारत, पोर्तुगीज, व्हॅटिकन, इस्राईल या सर्व ओळखी सोबत घेऊन इतर वसईकरांसारखं मलाही फिरावं लागलेलं आहे. यामुळे ऑफिस, कॉलेज या ठिकाणी बरीच पंचाईत व्हायची. ‘तुझं नाव तर इंग्रजी आहे, मग तू इतकं चांगलं मराठी कसं बोलतोस?’.. ‘तुझं आडनाव तर पोर्तुगीज वाटतंय.’ अशा विविध टिप्पण्याला किंवा टाईपकास्ट केलेल्या वाक्याला मलाच नाही तर इथल्या बऱ्याच ख्रिस्ती लोकांना सामोरं जावं लागतं.

आता थोडे अलीकडच्या काळाकडे येऊ या. ते वर्ष होतं २०१०-२०११. इंटरनेटच्या क्षितिजावर एका आगळ्या-वेगळ्या संकल्पनेचा उदय होत होता. एक अशी संकल्पना- जी संपूर्ण जग आपल्या कवेत घेणार होती. ती संकल्पना म्हणजे ‘सोशल नेटवर्किंग’. आणि यात ज्या काही बऱ्याच वेबसाईट्‌स उदयास येत होत्या, त्यापैकी एक महत्त्वाची तग धरून राहिलेली वेबसाईट म्हणजे ‘फेसबुक’. मी आयटी क्षेत्रात असल्याने माझी या फेसबुकवर जरा अगोदरच वर्णी लागली. अगोदर ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना फ्रेंड म्हणून मी ॲड करीत राहिलो. आपले सहकारी जे आपल्याला कधीच आवडत नाहीत, त्यांना फक्त ते आपल्या बाजूला बसतात किंवा आपण त्यांच्याशी बोलतो म्हणून त्यांना ‘फ्रेंड’ म्हणून ‘ॲड’ करणं हे काहीसं अवघडल्यासारखं वाटलं होतं; परंतु नंतर लवकरच त्याची सवय झाली. ‘सोशल नेटवर्किंग साईटवर आल्यावर एरवी बोअरिंग वाटणारं आपलं सोशल लाइफ इंटरेस्टिंग होईल’ म्हणून मग कित्येक वर्षे संपर्कात नसलेले किंवा संपर्क तुटलेले शाळा-कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी यांना फ्रेंड म्हणून ॲड  करणं सुरु झालं. शाळा कॉलेजचे कितीतरी मित्र भेटले. मग स्वत:च्या परिसरात राहणाऱ्या परिचितांना मित्र म्हणून हळूहळू ॲड करण्यास सुरुवात झाली. माणसाला एकमेकांच्या आयुष्यात डोकावण्याची एक सवय असतेच. आणि ती सवय फेसबुक हे fulfill करायला लागले होते. कोणाचे आयुष्य माझ्यापेक्षा जास्त हॅपनिंग आहे किंवा कोण माझ्यापेक्षा जास्त बिचारे आयुष्य जगत आहेत. अशा vicarious thrills मिळवण्याचा तो काळ होता. अशात एके दिवशी मला एक ग्रुप जॉईन करण्यासाठी request आली. Kupari’s on facebook असं त्या ग्रुपचं नाव होतं.

जगभरात, देशभरात कामानिमित्त विखुरलेला कुपारी समाज हा या फेसबुकवर एकत्र आणावा, या हेतूने काही हौशी तरुण-तरुणींनी हा ग्रुप बनवलेला होता. काही महिन्यांतच या ग्रुपमध्ये आठ हजार सदस्य ॲड होत गेले. फेसबुक या माध्यमाचं कुतूहल खूप जास्त होतं. आपण चट्‌कन जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी सहज कनेक्ट होतोय, ही एक्साइटमेण्टच खूप मोठी होती. आणि त्यात जी पलीकडची व्यक्ती आहे ती आपल्या जातीची, आपल्या संस्कृतीची आहे- ही आणखीन दुधात साखर पडावी अशी वाटणारी भावना. त्यामुळे सुरुवातीला या ग्रुपवर खूपच शेअरिंग व्हायला लागलं. समाजाशी किंवा संस्कृतीशी निगडित ज्या काही गोष्टी आहेत, त्याविषयीच्या वेगवेगळ्या पोस्ट्‌स टाकणं किंवा विविध फोटो अपलोड करणं सुरू झालं. अशा पोस्टना हळूहळू लाइक्‌स किंवा कमेंट्‌सही येऊ लागल्या. एकंदरीत हा ग्रुप लवकरच सर्व कुपाऱ्यांचा एक व्हर्चुअल अड्डाच होऊन बसला. अर्थात या लोकांमध्ये कविमन जपणारे, कलासौंदर्याची जाण असणारे लेखक, कवी, संगीतकार, गीतकार हेही होते. तेही त्यांना आवडणाऱ्या गोष्टी त्यांच्या परीने पोस्ट करीत होते. असे विविध कलांत रुची ठेवणारे दर्दी या फेसबुक ग्रुपमुळे हळूहळू जवळ येऊ लागले आणि मग ‘वन थिंग लेड टू अनादर’. एके दिवशी त्या ग्रुपवर सुमित डिमेलो या एका युवकाने अशी कल्पना सुचवली की, आपण सर्व समविचारी- ज्यांना लिखाणात,वाचनात वा कलेत रस आहे आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण करण्याची आवड आहे- एकत्र भेटू या. फेसबुकवरील आभासी विेशामध्ये असं पोस्ट, लाईक, कमेंट्‌स करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष विचारांची देवाणघेवाण करू या.

रविवारचा एक दिवस ठरवला गेला. सुमितच्याच घरी भेटण्याचे ठरवले गेले. आम्ही १२-१३ युवक या सभेसाठी जमलो. आमच्यामध्ये काही छोटेखानी लेखक होते, काही चारोळ्या वा कविता रचणारे कवी. काही सुंदररीत्या गाणारे, तर काही चांगल्या गोष्टीची कदर करणारे. काही चांगले कान असणारे वा चांगले वाचन असणारे, तर काही दाद देणारे श्रोते. असा तो आमचा ग्रुप तयार झाला. एक-एक करून ग्रुपमधील प्रत्येक सदस्याच्या घरी दोन किंवा तीन आठवड्यांतून का होईना, पण एका रविवारी भेटायचे व विचारांची देवाण-घेवाण करायची, असे सर्वांनी ठरविले. या उपक्रमाला आम्ही ‘कुपारी अड्डा’ असे नाव दिले. आम्ही सर्व जण जरी वसईतील व एकाच कुपारी या समाजामधील असलो तरी विविध वयोगटांतील, विविध गावांतील होतो. वेगवेगळी शैक्षणिक, कौटुंबिक, व्यवसाय पार्श्वभूमी असलेले; परंतु साहित्यकलेची आवड हा एक समान धागा आम्हाला बांधणारा होता. आमच्या या कुपारी अड्‌ड्याच्या सभा अगदी वेळेवर होऊ लागल्या. मग हळूहळू कोणी लोकल गीतकार जॉईन झाले, कोणी संगीतकारही आले. अशा मीटिंगमध्ये येणं आणि आपण जे काही लिहिलेले आहे- मग ती कथा असो, कविता असो किंवा चारोळ्या असो - त्या ग्रुपमध्ये सादर करणं आणि उपस्थितांची लाइव्ह प्रतिक्रिया घेणं, फेसबुकवरील लाइक्स किंवा कमेंट्‌सपेक्षा जास्त सुखावत होतं. सर्व जण हौशे-नवशे होते. आपापले कामकाज सांभाळून, वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळून जो काही वेळ मिळेल त्यातून आम्ही कलेची हौस भागवत होतो. 

एकदा अशाच एका ‘कुपारी अड्डा’ मीटिंगमध्ये आमचे एक सदस्य निकोलस यांनी एक कल्पना मांडली की, आपली ‘कादोडी’ ही बोलीभाषा अस्तंगत होत चालली आहे. आजकाल नवे पालक त्यांच्या मुलांशी मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये वार्तालाप करीत आहेत. तेव्हा आपण त्यासाठी काही तरी केलं पाहिजे. मग या भाषेचं संवर्धन कसं करता येईल, यावर कुपारी अड्डामध्ये थोडा खल झाला. एक कल्पना अशी पुढे आली की, आपण कादोडी भाषेमध्येच एक छोटेखानी अंक प्रकाशित करू या. कादोडी तशी एक बोलीभाषा. तिला स्वत:ची अशी कोणती लिपी नाही, तेव्हा मराठी देवनागरी या लिपीचा आधार घेऊन हा अंक प्रकाशित करण्याचे ठरले. बोलीभाषा असल्याने आणि त्यात ती उच्चारतानाही काहीशी कठीण असल्याने ती कशी लिहावी तसेच लोक ती कशी वाचतील- हा थोडासा संभ्रम आमच्या मनात होताच. फेसबुकवर तोपर्यंत जे-जे कोणी असे छोटेखानी लेख पोस्ट करीत होते, त्यांना आम्ही ॲप्रोच झालो. त्यांच्याकडून काही लेख मागवून घेतले. कादोडी जरी मराठीची पोटभाषा असली आणि जरी तिच्यात बरेच पोर्तुगीज शब्दही मिसळून गेलेले असले, तरी बरेच शब्द या भाषेतही जन्माला आलेले आहेत.

उदाहरणार्थ- ‘आठवण येणे’ या प्रेमळ अवस्थेला कादोडीत ‘खित आले’ असे म्हटले जाते, तेव्हा आम्हीही या कादोडी अंकाचे ‘खित’ असे नामकरण केले. आणि १५ पानांचा अंक Contribution काढून एप्रिल महिन्यात त्या वर्षी ईस्टरच्या सणानिमित प्रकाशित केला. थोडंसं कुतूहल होतं की लोक या उपक्रमाला, या अंकाला कसं स्वीकारतील? सुदैवाने या अंकाला खूपच मोठा प्रतिसाद मिळाला. आपली नामशेष होत चाललेली कादोडी भाषा कोणी तरी वाचवू पाहतेय आणि त्या निमित्ताने हा अंक प्रकाशित केला जातोय, हे पाहून बऱ्याच जणांनी आमचं अभिनंदन केलं. वसईमध्ये प्रत्येक ख्रिश्चन गावाच्या प्रवेशद्वारापाशी एक गावकी क्रूस असतो, गावकऱ्यांचा सामाईक क्रूस. आणि या क्रुसाचा वार्षिक सण मे महिन्यात गावागावांमध्ये साजरा केला जातो. या सणानिमित्त प्रत्येक  गावपातळीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जात असतं. त्या वर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथमच कुपारी संस्कृती, कादोडी भाषा याविषयी बरेच पडसाद उमटलेले दिसले. ‘खित’ या कादोडी अंकाचं ते थोड्याफार प्रमाणात यश होतं. हा कादोडी अंक आपण वर्षातून तीन वेळा प्रकाशित करायचा, असं आमच्या टीमने ठरवलेलं होतं. त्याचबरोबर आमच्या कुपारी अड्‌ड्याच्या सभाही प्रत्येक महिन्याला घेत होतो.

अशीच एक कुपारी अड्डा सभा आम्ही रविवारी सकाळी ‘आगाशी’ या गावी घेतली होती. आमचेच एक सदस्य साल्वादोर रॉड्रिग्ज यांच्या घरी ती पार पडत होती. नेहमीच्या सदस्यांबरोबरच कलेमध्ये रुची असणारे त्या गावातील लोकही त्या सभेसाठी जमले होते. मीटिंग खूपच चांगली रंगली होती. माझी एक छोटेखानी कथा तेव्हा मी वाचून दाखवली. आमच्यातीलच एक सदस्य एडिसन याने, येशू ख्रिस्ताला क्रुसावर खिळवून ठेवणाऱ्या ‘खिळा’ या वस्तूवर एक कविता लिहिलेली होती, तिचे त्याने वाचन केले. त्यानंतर आगाशी परिसरातील जेसिका नावाच्या एक मुलीने तिच्या चारोळ्या सादर केल्या. या सभेसाठी आगाशी गावातीलच आणि वसईतील नावाजलेले सुप्रसिद्ध चित्रकार फेलिक्स मास्तर हे सुद्धा उपस्थित होते.

कुपारी अड्डा व कादोडी भाषेतील अंकाविषयी चर्चा करीत असताना हळूहळू मग ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’ किंवा जी कुपारी संस्कृती आहे त्याविषयी चर्चा रंगू लागली. विविध मतप्रदर्शन होत असताना फेलिक्स मास्तर यांनी एक मार्मिक टिप्पणी केली, ‘‘एखादं जुनं घर मोडलं, तर मला जवळचं माणूस मेल्याइतकं दु:ख होतं.’’ पारंपरिक जुन्या पद्धतीची जी घरं वसईमध्ये होती, त्यासंबंधी त्यांनी ते वक्तव्यं केलं होतं. आमच्याच सदस्यांतील वॉल्टर हे संस्कृतीचं महत्त्व विशद करताना म्हणाले, ‘‘संस्कृती समाजाला बांधून ठेवते, धर्म नाही. बाजूच्या सामवेदी ब्राह्मणाच्या घरी मयत झाल्यावर सामवेदी ख्रिश्चनाला जेवढं दुःख होईल, तेवढं कदाचित इतर जातींतील ख्रिश्चनांच्या कुटुंबाना मयताबाबत वाटणार नाही.’

त्याच कुपारी अड्डा मीटिंगमध्ये वयाच्या पन्नाशीत असलेला एक शिक्षक सॅम रॉड्रिग्ज हा उपस्थित होता. आम्ही कुपारी भाषासंवर्धनासाठी जो काही हा उपक्रम चालू केला होता, त्याचं त्याने खूप कौतुक केलं आणि असं मत मांडलं की- कुपारी जातीच्या केवळ कादोडी बोलीभाषेचेच नव्हे, तर संपूर्ण कुपारी संस्कृतीचे संघटन आणि संवर्धन झाले पाहिजे. कुपारी भाषेप्रति आम्ही जे पहिलं पाऊल उचललं होतं, त्याच्या आणखी एक पाऊल पुढे जाण्याचा मानस त्याने व्यक्त केला. ‘‘ब्राह्मण जातीचं जसं समाजमंडळ असतं किंवा कोळी वा कोकणस्थांचं जसं संस्कृती मंडळ असतं आणि त्यांचे जसे संस्कृती सोहळे होत असतात, तसं काही तरी आपण आपल्या या कुपारी समाजासाठी करू शकतो. त्याने बरेच फायदे होतील. कुपारी संस्कृतीचं संवर्धन होईल. आपला समाजही एकत्र येईल. आपल्या समाजाची एकजुटता राहील. आणि ही एकी आपण राजकारणातही वापरू शकू तसेच समाजपयोगी कार्यही आपण करू शकू.’’ असे बरेच विचार सॅमने त्या मीटिंगमध्ये मांडले. मग त्याने स्थापन केलेल्या ‘कुपारी संस्कृती मंडळामध्ये’ मी सामील झालो. त्यानंतरचे सहा महिने आम्ही हा पहिलावहिला कुपारी महोत्सव यशस्वी होण्यासाठी झटत होतो. यथावकाशाने कुपारी महोत्सव पार पडला.

समाजाला आपल्या भूतकाळातील आठवणी, स्मृती चाळवणारं सगळं भावतं. त्यामुळे त्या महोत्सवाला लोकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. परंतु, त्या संस्कृती महोत्सवादरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने खटकली. एक विशिष्ट जुन्या वळणाचा पेहराव करायचा, बोलीभाषेतील गाण्यावरचे नृत्य बघायचे आणि जे काही पारंपरिक खाद्य असेल त्याच्यावर ताव मारायचा, त्यापलीकडे लोकांना संस्कृतीत काही रस नसतो. ज्या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्याचं ठरलं होतं, ते म्हणजे- समाजाला एकत्र आणणे, समाजातील विविध समस्यांप्रति चर्चा-व्याख्याने घडवून आणणे- ते ध्येय खूपच मागे पडलं. आणि कुपारी महोत्सव हा नाचगाणे आणि पारंपरिक फूड स्टॉल्सपुरताच सीमित उरला. त्यामुळे माझा त्यामधील इंटरेस्ट लवकरच निघून गेला.

एव्हाना ‘खित’ या कादोडी अंकाचे सलग दोन वर्षं असे सहा अंक प्रकाशित झाले होते. ज्या खऱ्या जीवनोपयोगी वैज्ञानिक किंवा सामाजिक गोष्टी होत्या, त्यावर बोलीभाषेतून अंकातून भाष्य करण्यावर मर्यादा पडत होत्या. बोलीभाषा इतकी समृद्ध नव्हती की, लोकांना सहज समजेल अशा भाषेत आपण विज्ञान किंवा इतर सामाजिक गोष्टी यांची चर्चा करू शकू. त्यामुळे हा अंक चांगल्या प्रकारे बहरू शकला नाही. अंकाचं प्रकाशन  काही काळानंतर रोडावलं. कादोडी अंक आणि कुपारी अड्डा हे दोन्ही उपक्रम हळूहळू थंड पडले. तसेच कालांतराने जगातील सर्व देशांच्या बॉर्डर्स पुसून टाकणाऱ्या फेसबुकवरील Kupari’s on facebook हा ग्रुपही मला एक अलिप्त बेट म्हणून कंटाळवाणा वाटू लागला. सोशल नेटवर्किंगच्या आभासी दुनियेत लॉगिन होऊन सोशल होता येत नाही, हे कळून चुकलं. कुपारी अड्डा आणि कुपारी महोत्सव या दोन्ही गोष्टी मंदावल्याने, आता पुढे काय? जो काही आपल्याला वीकएंडला रिकामा वेळ मिळतोय, त्यात कोणत्या तरी सामाजिक कार्यात आपण गुंतून घ्यावं, असं स्वत:ला मनापासून वाटत होतं.

आणि अशातच एक नवी संधी आली.

आमच्या परिसरातच असलेल्या ‘समाज विकास मंडळ’ या सामाजिक संस्थेसाठी नवी कार्यकारिणीची निवड होणार आहे, असे कानांवर आले. ‘समाज विकास मंडळ’ म्हणजे साठ वर्षांपासून कार्यरत असलेली इथल्या समाजातील एक अग्रगण्य संस्था. या मंडळात ‘लायब्ररी’, ‘पतपेढी’, ‘कला-क्रीडा’, ‘महिला’ असे विविध विभाग कार्यरत आहेत. पतपेढीतून मिळणारा नफा हा ‘मेडिकल फंड’, ‘शिक्षण फंड’मार्फत गरजूंवर सढळ हस्ते खर्च केला जातो.

मला वाचनाची आवड आहे, हे जाणून माझ्या एका मित्राने ‘तू मंडळात लायब्ररी कमिटीवर का नाही जॉईन होत?’ म्हणून माझ्याकडे विचारणा केली. मीही तत्काळ त्याला होकार भरला. आणि कार्यकारिणीच्या लायब्ररी कमिटीसाठी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर कार्यकारिणीच्या सदस्य निवडणुकीसाठी काही दिवसांतच या मंडळातून सभेसाठी निमंत्रण आलं.

प्रथमच अशा औपचारिक सभेसाठी मी उपस्थित राहत होतो. तोपर्यंत ऑफिसमध्ये किंवा आमच्या कुपारी अड्डा किंवा इतर ज्या चर्चमधील मीटिंग्ज अटेंड केल्या होत्या, त्या काहीशा अनौपचारिक स्वरूपाच्याच होत्या, परंतु इथे मात्र सर्व काही औपचारिक शिस्तबद्ध वाटत होतं. ‘समाज विकास मंडळ’ ही एक प्रथितयश संस्था आहे. त्यांची स्वत:ची स्वतंत्र अशी एक इमारत आहे. या इमारतीमध्ये पतपेढीचा कक्ष, लायब्ररीचा कक्ष तसेच सभेसाठी एक प्रशस्त व स्वतंत्र असा हॉल आहे. या प्रशस्त हॉलमध्येच ही सभा होत होती. मंडळाचे अध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष, प्रमुख विेशस्त व कार्यकारिणीचे मावळते अधिकारी स्टेजवर बसले होते. तसेच सभेचा वृत्तांत लिहिण्यासाठी एक वृत्तांत लेखिकाही बाजूला बसली होती. मीटिंगमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अगोदरच अजेंडा डिसाईड केला गेला होता. एक-एक मुद्दा घेत मीटिंग पुढे सरकत होती. कोणाला श्रद्धांजली वाहा, तसेच एखादा मुद्दा पारित करायचा असेल तर तो पारीत करण्यासाठी ठराव मांडणे आणि मग त्याला कोणी तरी उपस्थितांपैकी अनुमोदन देणे. सर्व काही मला सुनियोजित वाटलं. अशा प्रगल्भ कार्यकर्त्यांत आपल्याला कार्य करण्यास मिळणार आहे याची उत्सुकता वाटली. नव्या कार्यकरणीवर काम करण्यासाठी थंड प्रतिसाद मिळाल्याने ज्या-ज्या नव्या लोकांनी अर्ज केले होते, त्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या कमिटीवर घेण्यात आले होते. माझीही मग लायब्ररी कमिटीवर नेमणूक झाली.

सुरुवातीच्या दिवसांत भारावून जाऊन आम्ही लायब्ररी कमिटीसाठी बऱ्याच मीटिंग्ज घेतल्या. परंतु पुस्तके वाचण्यासाठी लायब्ररीची आवड असणं आणि लायब्ररीचे जे काही प्रशासकीय भाग आहेत ते हाताळणं, या दोन्ही गोष्टी स्वतंत्र होत्या. बुकशेल्फमध्ये किती पुस्तकं ठेवावीत, त्याला कुठे वाळवी लागलेली आहे का, ते नवीन आणावेत का किंवा लायब्ररीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत का- असे सर्व admin प्रश्न सोडवणे वेगळे आणि पुस्तकप्रेमाखातर लायब्ररीत जाणं वेगळं, हे लवकरच कळून चुकलं. या दोन्ही गोष्टी भिन्न होत्या. फेसबुक, भाषा-संवर्धन, संस्कृती-संवर्धन असा प्रवास करीत-करीत मी समाज विकास मंडळात पोहोचलो खरा; पण हे काही आपल्यासाठी नाही अशी माझी मनोमन खात्री झाली. मी लवकरच लायब्ररी कमिटीचा राजीनामा देण्याच्या विचारात होतो, परंतु हे काही इतक्या लवकर होणार नव्हतं. लवकरच याच मंडळात माझ्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एका प्रवासाचा मी भाग होणार होतो.

क्रमश:

(आय.टी. क्षेत्रातील एक तरुण एका विवेकवादी गटात सामील होतो आणि मग त्या गटात होत असलेले चर्चा-मंथन व वाद-संवाद यांमुळे कसा बदलत जातो, याचे चित्रण करणारी ही लेखमाला महिन्यातून दोनदा याप्रमाणे प्रसिद्ध होत राहील. - संपादक)             

Tags: East Indian Wavdal Koli Social Networking Library Committee Library Samaj Vikas Mandal Kupari Sanskruti Andal Sopara Vasai Facebook Page Facebook Bible Khit British Catholic Daniel Fransis Maskarnis Kadodi ईस्ट इंडियन Kupari वाडवळ कुपारी कोळी समाज विकास मंडळ’ लायब्ररी कमिटी कुपारी संस्कृती मंडळ सॅम रॉड्रिग्ज सोपारा वसई फेसबुक खित बायबल ब्रिटिश कॅथॉलिक डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस कादोडी कुपारी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॅनिअल मस्करणीस,  वसई
Danifm2001@gmail.com

'मंच' या पुस्तकाचे लेखक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके