डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धर्माने मूल्ये दिली आणि त्यासोबत कर्मकांडांचे ओझेही लादले!

माझ्या पूर्वजांचे ख्रिस्ती धर्मांतर हे स्वेच्छेने नाही, तर सक्तीचे होते हा एक क्लेशदायक इतिहास समजून घ्यावा लागला. धर्मसंस्थापक, धर्मग्रंथ आणि त्यावर मालकी सांगणाऱ्या धर्मसंस्था ह्यांचे खरे रूप अधिक जवळून समजून घेण्यासाठी आंधळेपणाचा चश्मा डोळ्यांवरून उतरविण्याचे धाडस मिळाले. येशूची मानवतावादी शिकवणूक,  तत्कालीन धर्मसत्ता, राजसत्ता यांनी सोयीनुसार बायबलमध्ये केलेले फेरफार आणि चर्च ह्या मोठ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेची काळी बाजूही आता स्पष्टपणे दिसू लागली. मूल्यांबरोबरच धर्माने कर्मकांडाचे बोजेही अलगदपणे कसे पाठीवर लादलेले आहे तेही उमजू लागले. गंमत म्हणजे धर्माने चुकीचे काय दिले ह्याची शहानिशा करताना अगोदर न गवसलेली धर्माची खरी मूल्येही गवसली.  धर्माची खरी व्याख्याही कळू लागली.

‘धर्माने मला काय दिले?’ ह्या विषयावर लिहिताना बालपण, तारुण्य आणि प्रौढत्व अशा जीवनाच्या विविध टप्प्यांतून ह्या प्रश्नाचा वेध घ्यावा लागेल. तसेच धर्माने जे जे काही दिले त्याची यादी करताना त्यातील मुद्द्यांची बरी आणि वाईट अशी विभागणीही करावी लागेल. वैयक्तिक आणि सामाजिक ही परिमाणेही विचारात घ्यावी लागतील.   

लहानपणी धर्म म्हणजे नाताळचा सण, त्या निमित्ताने मिळणाऱ्या भेटवस्तू, आईवडिलांनी आणलेले नवीन कपडे, विविध गोडधोड जिनसांची रेलचेल, घरात  आणि ख्रिस्तीबहुल परिसरात असलेले उत्सवाचे वातावरण अशा घरगुती आणि सामाजिक आनंदाच्या क्षणापर्यंतच धर्माचरण सीमित होते. त्याचबरोबर ‘स्वर्ग, देवदूत, चमत्कार’ असे धार्मिकतेचे रुपडे पांघरलेल्या रम्य काल्पनिक गोष्टी त्या बालसुलभ वयात एका वेगळ्याच जादूई विश्वात घेऊन जायच्या. धर्म, त्याची शिकवणूक ह्या खोलीत शिरण्याचे काही ते वय नव्हते. त्यामुळे सांस्कृतिक करमणुकीसाठीच धर्माशी माझा त्या वयात संबंध येत राहिला.

पुढे युवक म्हणून घराबाजूलाच असलेल्या चर्चच्या प्रांगणात हुंदडण्यास मिळाले. आपल्या परिसरातील समवयस्क तरुणांना एकत्र भेटण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे चर्चमधील युवक संघटना. मग त्या संघटनेत बरीच वर्षेर् रमलो. चर्चमधील युवक संघटनेच्या निमित्ताने बऱ्याच मित्रमैत्रिणीही मिळाल्या. आणि त्यांच्यासोबत विविध सहली, पाटर्या- असे मौजमजेचे क्षण उपभोगण्यास मिळाले. युवक संघटनेत असतानाच चर्चमधून प्रकाशित होणाऱ्या एका वार्षिक अंकासाठी काम करण्याची आवड निर्माण झाली आणि ‘आपण लिहू शकतो’ ही स्वतःची ओळखही तिथेच गवसली. तर दुसऱ्या बाजूला चर्चच्या आवारात जास्तच रेंगाळल्याने मेणबत्तीखालील काळोखही नजरेच्या कक्षेत येऊ लागला.   

गरजेप्रसंगी एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाणे, आपल्यात असलेल्या बलस्थानांचा वापर करून दुसऱ्यांची सेवा करणे आणि मानवतेप्रति करुणा बाळगणे ही ख्रिस्ती मूल्येही वेळोवेळी कानांवर पडत राहिली. मांगल्याचे, काम-क्रोध-लोभ-मोह-मत्सरविरहित जीवनाचे धर्म देत असलेले आश्वासन हे त्या जाणत्या वयात मोहित करू लागले. दुसऱ्या बाजूला ह्याच तरुण वयात कॉलेज/नोकरीच्या निमित्ताने मोठ्या विश्वात पाऊल टाकल्यावर ‘ख्रिस्ती’ आणि ‘अल्पसंख्याक’ म्हणून एका विशिष्ट चौकटीत बसणे माझ्याकडून अपेक्षित आहे ह्याची जाणीव होऊ लागली. ख्रिस्ती नाव म्हणून ‘इंग्रजी आलेच पाहिजे’ ह्याचं मराठी माध्यमातून शिकलेल्या मला दडपण येऊ लागलं. ‘पाव खाऊन बाटलेले ख्रिस्ती’ म्हणून हेटाळणीही ऐकावी लागली. आणि हे सर्व अनुभवताना मग ‘आम्ही आणि ते’ अशा एका कट्टर सामूहिक धार्मिक ओळखीची जाणीवही ह्याच काळात तीव्रपणे मनात आकार घेऊ लागली. ‘कोऽहम’ हा प्रश्नही मनात अधिकच मोठा होऊ लागला. ह्याच गर्तेत असताना मग अचानक आजूबाजूला असलेला ख्रिस्ती समाज हा मला ‘माझा’ वाटू लागला. आणि त्या समाजात 'fit in' होण्यासाठी मग माझीही धडपड सुरू झाली. दर रविवारी चर्चमध्ये जाणे, धर्माचा अभिमान बाळगणे हे नेणिवेच्या पातळीवर होत राहिलं.

आणि ह्याच स्थितीत पाच-सहा वर्षे राहिल्यावर 2013 मध्ये जीवनप्रवासात विवेकाचे एक अनपेक्षित वळण आले. परिसरातील विवेकवाद्यांच्या ‘विवेक मंच’ ह्या गटात सामील झालो. धर्माची निकोप चिकित्सा ऐकण्यास मिळाली. प्रथम हे सारे ‘धर्मविरोधी’ म्हणून पचण्यास जड गेले, पण औषधाच्या कडू गोळीप्रमाणे त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागला. वैचारिक घुसळण झाली.

आणि मग धर्माने मला काय चुकीचे दिलेय हेही आता उमजू लागले! मंचाच्या चिकित्सक मुक्त चर्चेने जितके अंतर्मुख केले तितके अगोदर कोणाही धर्मगुरूंच्या प्रवचनाने केले नव्हते हा विरोधाभासही लक्षात आला. विवेकामुळे धर्माकडे मी आता अधिकच गांभीर्याने पाहू लागलो.

माझ्या पूर्वजांचे ख्रिस्ती धर्मांतर हे स्वेच्छेने नाही, तर सक्तीचे होते हा एक क्लेशदायक इतिहास समजून घ्यावा लागला. धर्मसंस्थापक, धर्मग्रंथ आणि त्यावर मालकी सांगणाऱ्या धर्मसंस्था ह्यांचे खरे रूप अधिक जवळून समजून घेण्यासाठी आंधळेपणाचा चश्मा डोळ्यांवरून उतरविण्याचे धाडस मिळाले. लिओ टॉलस्टॉय यांचे ‘गॉस्पेल इन ब्रीफ’ हे पुस्तक वाचले. या पुस्तकाने खूप प्रभावित केले. मानवतावादी शिकवणूक, तत्कालीन धर्मसत्ता, राजसत्ता यांनी सोयीनुसार बायबलमध्ये केलेले फेरफार आणि चर्च ह्या मोठ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेची काळी बाजू आता स्पष्टपणे दिसू लागली. मूल्यांबरोबरच धर्माने कर्मकांडाचे बोजेही अलगदपणे कसे पाठीवर लादलेले आहे तेही उमजू लागले. गंमत म्हणजे धर्माने चुकीचे काय दिले ह्याची शहानिशा करताना अगोदर न गवसलेली धर्माची खरी मूल्येही गवसली.  धर्माची खरी व्याख्याही कळू लागली.

‘मंच’ पुस्तकातील स्वधर्म चिकित्सा वाचून जवळच्या लोकांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाराजी ओढवून घ्यावी लागली. एका बाजूला जवळची माणसे लांब जाताना पाहिली, तर त्याच वेळी कळपापल्याडचे किती तरी जास्त प्रमाणात समविचारी लोक भेटले, भावले व जोडले गेले. क्षितिजापलीकडचं मोठं दालन खुलं झालं. ‘ख्रिस्ती’ ही चौकट मोडून व्यापक मानवतावादी दृष्टिकोनाकडे वाटचाल सुरू करण्याचे धैर्य मिळाले. थोडक्यात, विवेकाच्या अनपेक्षित वळणामुळे धर्मप्रवास अधिक मुक्त दिशेने सुरू झाला. धर्माने मला आतापर्यंत काय दिले ह्याची अशी ही व्यक्तिगत यादी करताना साहजिकच आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्या समाजाला धर्माने काय दिले ह्याचाही लेखाजोखा मांडणे महत्त्वाचे ठरते.

धर्म हा समाजाचा हजारो वर्षांपासून भाग असल्याने, जगभरात सर्वत्रच तो अगदी घट्ट पाय रोवून उभा आहे. धर्माने समाजाला काय दिले हे पाहावे तर आधुनिक न्यायव्यवस्था येण्याअगोदर, नीती-नियमांची एक चौकट दिली (धर्माचरण आणि नीती ह्याचा प्रत्यक्ष संबंध नसला तरीही!). जीवनातील दैनंदिन संघर्षाने त्रस्त असलेल्या जनतेला ‘चांगले करा-चांगले होईल’ असा एक आशावाद दिला. त्यातून काहींनी प्रेरणा घेत काही समाजोपयोगी कामेही झाली. आज कोरोना साथीमध्ये गेल्या एक-दोन वर्षांत कितीतरी आपली आजूबाजूची माणसे अचानक गुडूप झाल्याचे आपण पाहिले. ह्या आपल्या जवळच्या माणसांना साधे भेटताही आले नाही. त्यांना अखेरचा नीट निरोपही देता आला नाही. अशा वेळी मृत व्यक्तींच्या दुःखात बुडालेल्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ‘मृत्यू म्हणजे शेवट नाही’ अशी आशा- मग ती फसवी का असेना धर्माने समाजाला दिली.

त्याचबरोबर धर्मामुळे बरीच युद्धे झाली. रक्ताचे पाट वाहिले गेले. जातिव्यवस्था आणि पुरुषसत्ताक ह्या व्यवस्थेमार्फत बहुसंख्यांवर अन्याय-अत्याचार झाले. वेळ, मनुष्यबळ अशा महत्त्वाच्या विविध संसाधनांची बरीच हानीही झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेलं मनुष्यबळ, आर्थिक निधी, ह्यांसारखी संसाधने विज्ञानास धर्माच्या प्रभावामुळे मुबलकपणे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विज्ञानात क्षमता असूनही अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण मिळवू शकलो नाही. आणि म्हणून मानवी जीवनातील अशी उघडी छिद्रे झाकण्यासाठी अजूनही आपल्याला परंपरागत धार्मिक उत्तरांचाच आसरा घ्यावा लागत आहे. थोडक्यात, विज्ञानाच्या पिछेहाटीमागचं कारणही परत धर्मच! एका विचित्र चक्रात आपण अडकलो.   

धर्माने समाजाला एकत्र आणण्यासाठी किंवा जीवनात सुखशांती प्रस्थापित करण्याऐवजी जी काही दुही माजवलेली आहे ती पाहता मग शांततापूर्ण जीवन कसे जगावे? ह्या ‘योग्य’ प्रश्नावर मानवजातीने शोधलेले ‘धर्म’  हे उत्तर ‘अयोग्य’ तर नाही ना? अशी शंका मनात उभी राहते. धर्माने मला काय दिले, समाजाला काय दिले ह्या बरोबरच मग धर्माने देशाला काय दिले हाही प्रश्न विचारावा लागतो आणि त्याची उत्तरे आपल्याला अस्वस्थ, भयभीत, चिंताग्रस्त करतात. भाषा, संस्कृतीबरोबरच राष्ट्रवादही धर्माचा आधार घेऊ पाहतोय. ‘आपण आणि ते’ अशी नागरिकांची भीतिदायक विभागणी करू पाहतोय.

मग मनात विचार येतो- हा गुंता आपल्याच्याने सुटेल की नाही? नाही म्हणायला गेल्या 100 वर्षांत धर्मातील कितीतरी रीती आपण सोडून दिल्या आहेत किंवा त्याच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. तसं पाहिलं तर धर्माच्या प्रभावाचा आलेख हजारो वर्षांच्या टाइमलाईनवर नक्कीच खालच्या दिशेने झुकणारा आहे.  हा पेच सोडविण्यासाठी देव आहे की नाही, आस्तिक- नास्तिक अशी चर्चा करूनही जास्त काही साध्य होणार नाही. देवळात जाण्यासाठी वा धर्माचरण करण्यासाठी जी दहा कारणे असतात त्यांचे निरीक्षण केल्यास असे दिसून येईल की पहिली बहुतांश कारणे ही भलतीच सामाजिक, मनोरंजक, भावनिक वगैरे असतात आणि ‘आध्यात्मिक’तेचं कारण हे असलंच तर खूप शेवटी असतं.

दोन वर्षांपूर्वी (2019) पॅरिस येथील ‘नॉट्रेडॅम’ हे 700 वर्षे जुने चर्च आगीत भस्मसात झाले. तेव्हा ह्या प्रसंगाने व्यथित होऊन कितीतरी फ्रेंच तरुण-तरुणी साइन नदीच्या किनाऱ्यावर अश्रू ढाळताना दिसले. ही सर्व तरुणाई प्रखर नास्तिक आहेत. फ्रान्समध्ये चर्चमध्ये जाणाऱ्यांची संख्या जी 50 वर्षांपूर्वी 37 टक्के होती ती आता 6 टक्के आहे. फ्रान्स आज जरी निधर्मी राष्ट्र असलं तरी कधी काळी ते कॅथॉलिक राष्ट्र होतं. बहुतांश फ्रेंचांनी चर्चमध्ये जाऊन धर्माचरण करण्याचं कधीच सोडून दिलेलं असलं तरी त्यांच्या दैनंदिन संस्कृतीवर अजूनही कॅथॉलिक धर्माचा पगडा आहे. त्यामुळे धर्माचे काहीतरी नुकसान झाले म्हणून ही तरुणाई नक्कीच उदास झाली नसावी; तर आपल्या देशाच्या संस्कृतीचं एक प्रतीक आगीत भस्मसात झालं म्हणून ह्या तरुणाईने अश्रू ढाळले. थोडक्यात, एखादा समाज हा जरी बहुतांशी निधर्मी बनला तरी त्यांच्या सामूहिक ओळखीवर (आयडेंटिटी) मात्र अजूनही धर्माचा पगडा असू शकतो.

1960 पर्यंत जगभरातील चर्चमध्ये प्रार्थनाविधी ‘लॅटिन’ ह्या भाषेत केले जायचे. सर्वसामान्य भाविकांना मग ते इंग्रजी असो वा मराठी, कोणालाच त्यातले काही कळायचे नाही. धर्मगुरूही चर्चमध्ये भाविकांपुढे पाठमोरे देवाच्या मूर्तीकडे पाहत पौरोहित्य करायचे. कित्येक हजारो वर्षांपासूनची ती पद्धत होती. 1963 मध्ये जी तृतीय व्हॅटिकन परिषद भरली त्यात त्यांनी चर्चचे प्रादेशिकीकरण झाले पाहिजे, सर्वसामान्य लोकांना कळेल अशा स्थानिक भाषेत धर्मगुरूंनी बोलले पाहिजे, असा बदल करण्यात आला. आणि त्याचबरोबर धर्मगुरूंनी भाविकांपुढे पाठमोरे उभे न राहता त्यांच्या दिशेने तोंड करून उभे राहिले पाहिजे असे काही मोठे बदल करण्यात आले. पण आश्चर्य म्हणजे तेव्हा जगभरातील बऱ्याच ख्रिस्ती लोकांना हा बदल आवडला नव्हता. काहींचं त्यावरील विश्लेषण असं की, बऱ्याच लोकांना, विशिष्ट धार्मिक गणवेशामध्ये असलेल्या धर्मगुरूंचं लॅटिन (किंवा व्यापक अर्थाने संस्कृत/अरेबिक) भाषेतील अनाकलनीय बोलणं (आध्यात्मिक वाटो न वाटो, पण गूढ असल्याने) रंजक वाटते. कारण त्यांच्यासाठी ते फक्त ‘पौरोहित्य’ नसतं तर तो एक ‘नाट्याविष्कार’ असतो. मग ते अंगावर पाणी शिंपडणे असो, मंत्र पुटपुटणे, डोळे बंद करणे असो किंवा घंटानाद, ह्यांतील ‘नाट्य’ लोकांना मोहित करतं. लॅटिन भाषेतील प्रार्थनेऐवजी अमेरिकेतील चर्चमध्ये जेव्हा इंग्लिशमध्ये प्रार्थना होऊ लागल्या तेव्हा बऱ्याच अमेरिकन ख्रिश्चनांनी त्याला नाके मुरडत चर्चकडे पाठ फिरवली होती. आध्यात्मिक गरजेबरोबरच धर्माचरण करणे ही बहुतांश लोकांची सांस्कृतिक गरजही असते.

आम्ही विवेकी विचारांचं शेअरिंग करण्यासाठी एक व्हॉट्‌सॲप ग्रुप चालवतो. त्या ग्रुपमध्ये परिसरातील सर्वच विचारणसरणींचे लोक जोडून घेतलेले आहेत. ह्यात विवेकाला विरोध करणारेही आहेत. गंमत म्हणजे ह्यात जे प्रखर नास्तिक आहेत त्यांनी काही धर्मचिकित्सेचं काही फॉरवर्ड केलं तर सनातनी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण एक धर्मगुरू मात्र जेव्हा त्यांचे धर्मसंस्थेतील चिकित्सक अनुभव ह्या ग्रुपवर शेअर करतात तेव्हा मात्र हेच लोक त्यांच्यावर तुटून पडतात. ‘त्यांनी धर्मगुरुपद सोडून बोलावं’ म्हणून त्यांच्यावर टीका होते. ‘तुम्हांला धर्मसंस्थेतील अमुक बाब खटकत असेल तर तुम्ही अजून धर्माची वस्त्रे का पांघरलीयेत’ म्हणून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो. धर्मगुरूंच्या धर्मटीकेचा ‘धोका’(!) ह्या लोकांना माहीत असावा का? जर हेच धर्मगुरू धर्मत्याग करून बाहेर पडलेच तर परत हे लोक ‘नास्तिक’ (पक्षबदल) म्हणून त्याच्याकडे ढूंकूनही पाहणार नाहीत.

हे सर्व समजून घेतल्यावर मग धर्मामागची व्यामिश्रता अधिकच गहिरी होते. धर्माने मला काय दिले ह्याची गोळाबेरीज केली तर धर्माने जितके वैयक्तिक पातळीवर दिले त्याच्या कित्येक पटींनी समाज आणि देशपातळीवर आपल्याकडून ओरबाडून घेतले.

धर्म जरी चटकन नाहीसा होणार नसला तरी धर्मचिकित्सेच्या आधारे त्याचा सामाजिक जीवनातील प्रभाव कमी करणे खूप गरजेचे झाले आहे.  सरसकट अशा चिकित्सेला धर्मविरोधी म्हणण्याऐवजी, हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले धर्मग्रंथ, त्यांतील कालातीत विचार आणि  कालबाह्य विचार; धर्मसंस्था, त्यांत काम करणारे धर्मगुरू अशी गुंतागुंतीची उकल आपण आता सर्वांनी करण्याची हीच योग्य वेळ आहे. आज कोरोनाच्या कालखंडात आपण सर्व घरात अडकलेलो आहोत. आणि ह्याच नाजूक कालखंडात धर्मासंबंधी, अशा विविध बाबींना तपासून घेण्याची वेळ आली आहे.

‘कोरोना’, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ वा ‘पेगासीस’,  या दहा  वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल किंवा संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका ठरू शकेल, अशा वेगवेगळ्या पातळींवरच्या समस्यांतून संपूर्ण जग सध्या जात आहे. आधीच गुंतागुंतीच्या असलेल्या ह्या प्रश्नांवर उत्तर शोधायचे असेल तर धर्मातील मानवतावादी मूल्ये तेवढी वेचून बोजड धर्माचे कर्मकांडी गाठोडे खाली ठेवण्याशिवाय पर्याय नाही.

साने गुरुजींचे ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत आपण सर्वांनी एकत्र आळविण्याची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झाली आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके