डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कित्येक वर्षांपासून मनात एक सुप्त अशी भावना होती की, सर्व विषयांवर बोलावं, सगळं जे काही आहे ते खरे-खरे, फक्त एका बाजूनं नाही तर दोन्ही बाजूनं चर्चा करावी. अर्थात त्यासाठी विविध अंगांनी चर्चा करणारी अशी माणसे भेटावीत, धर्मासह संस्कृती, भाषा, राजकारण, कोणताही विषय असो, त्यावर अतिशय खोलपणे जाऊन, विविध अंगांनी चर्चा करून, त्याचं खरं स्वरूप समजावून घ्यावं. त्यामुळेच असेल कदाचित, मी कधी फेसबुकवर ज्या पोस्ट यायच्या त्यावरील चर्चेत सहभागी व्हायचो, तर कधी ‘कुपारी अड्डा’ या सभेत भाग घेत होतो; पण कुठंतरी ती तहान अपुरी राहत होती. आणि आज प्रथमच एखाद्या पक्ष्याला बऱ्याच वर्षांनी जसं आपल्या घरट्यात परतल्याची अनुभूती मिळावी, तसं काहीसं माझं झालं होतं. I had finally come home... परंतु धर्माविषयी जसं चांगलं वाचणं, बोलणं सर्वांनाच आवडतं, तसंच धर्मातील कर्मकांडे, अंधश्रद्धा यावरही बोलायला सगळ्यांनाच आवडतं; फक्त तो धर्म तुमचा नसतो तोपर्यंतच! स्वतःचा धर्म कसा चांगला, वेगळा, भव्यदिव्य असाच समज आपण कुरवाळत असतो.

आता प्रत्येक रविवारी विवेकमंचात येण्याची ओढ लागायची. मुक्त व्यासपीठ असल्यानं कोणत्याच विषयाचं बंधन इथं नव्हतं आणि त्यात डिसोझा सर व ॲड. अनुप यांच्यासारखी अफाट वाचन असणारी विभूती असल्यानं कोणताच विषय चर्चेस वर्ज्य नव्हता. इतकी चांगली माहितीपूर्ण आणि मनातल्या विविध शंका व्यक्त करण्याची संधी मिळणारी चर्चा इथं होत आहे, हे माझ्या परिचितांना मी सांगू लागलो. या सभेस त्यांनीही यावं असं वाटायचं. त्यामुळे माझ्या माहितीतील ज्यांना असे वेगळे विचार मांडण्याची व ऐकण्याची आवड होती, त्यांना मी तसं सुचविलंही. पण नेहमीप्रमाणे ‘वेळ मिळत नाही, रविवारी मी बिझी असतो’ या कारणांचा अडसर मध्ये यायचा.

तरीही मंचात मी प्रथम आणलं ते ग्रॅहम या माझ्या मित्रास. तो माझ्यापेक्षा वयानं लहान असला तरी ‘संगीत’ हा आम्हाला जोडणारा सामायिक दुवा होता. लहानपणी तिसऱ्या वाढदिवशी त्याच्या वडिलांनी त्याला पियानो भेट म्हणून दिला आणि त्याचं अवघं आयुष्यच बदलून गेलं. लहानपणापासूनच त्याला संगीताची खूप आवड निर्माण झाली. चर्चमधून क्वायरसाठी पियानो वाजवत असताना त्याची संगीताची आवड अधिकच तीव्र झाली. त्याच्या बोटात जादू तर होतीच, पण हळूहळू त्याचा गळाही तयार झाला. गायन आणि संगीत यांनी त्याचं आयुष्य व्यापून टाकलं. संगीत हा त्याचा श्वास बनला. चर्चमधील भक्ती त्याच्या संगीतानं एक वेगळीच उंची गाठायची. चर्चमध्ये पियानो वाजवत असल्यानं त्याच्या परिसरात तो खूपच प्रसिद्ध झाला.

कॉलेजमध्ये गेल्यावर त्या कलेला आणखीनच धुमारे फुटले. पालकांच्या आग्रहाखातर त्यानं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली खरी; पण कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम करण्यापेक्षा म्युझिकल नोट्‌सच्या प्रोग्रामिंगमध्ये त्याला जास्त रस निर्माण झाला होता. सावळा रंग, सहा फूट उंच, एखाद्या चित्रपटात हिरोला शोभून दिसेल असंच ग्रॅहमचं व्यक्तिमत्त्व होतं. तो जेव्हा मंचात आला तेव्हा आयुष्याच्या एका नाजूक वळणावर उभा होता. सरळधोपट आयटीमधील जॉब करायचा की म्युझिकमधील पॅशन फॉलो करायची, आणि या कारणामुळे त्याच्या घरातील वातावरणही काहीसं तंग झालं होतं.

तरुण, तडफदार, बंडखोर असा ग्रॅहम मंचात आला. त्याच्याही मनात इतर तरुणांप्रमाणे बरेच प्रश्न होते.  मी ग्रॅहमला घेऊन आल्यावर मग ग्रॅहम त्याचा मित्र जॅक याला घेऊन आला. एव्हाना फेसबुकवर विवेकमंचाचं एक पेज ओपन केलं गेलं होतं, जेणेकरून मंचात होणारी चर्चा सगळ्यापर्यंत पोहोचवावी. त्यावरील अपडेट्‌स वाचून रॉकी परेरा नामक विनोदी लेख व कविता रचणारा लेखक आला. रॉकी त्याच्या परिचयातील एकाला घेऊन आला. अशा प्रकारे एक-एक करीत बरीच तरुण मंडळी खुल्या चर्चेच्या आकर्षणातून विवेकमंचाकडे आकर्षिली गेली. वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले लोक या मंचात येत होते. त्यामुळे शिक्षण, राजकारण, समाजकारण, विज्ञान, अध्यात्म, धर्म, लैंगिकता अशा तरुणांना कुतूहल असणाऱ्या सर्वच विषयांवर इथं मुक्त चर्चा चालायची.

वसईतील एक फादर युरोपमध्ये काही वेळेसाठी उच्चशिक्षणासाठी गेले होते. तेव्हा ते तिथे पार्टटाइम समुपदेशकाचीही नोकरी करत होते. एकदा त्यांच्याकडे एक युरोपिअन तरुण आला,

‘फादर माझे लवकरच लग्न होणार आहे आणि मी या नवीन वैवाहिक आयुष्याविषयी काहीसा चिंतेत आहे.’

‘कोणत्या बाबतीत?’

‘जोडीदारासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासंबंधी’ तो तरुण उद्गारला.

फादरला भारतात अशा प्रश्नाची सवय असल्यानं त्यानं पठडीतलं उत्तर देत म्हटलं,

‘नव्यानं लैंगिक संबंध प्रस्थापित करताना प्रॉब्लेम येणारच. आपण सायकल चालविणं काही एका दिवसात शिकत नाही..’

तोच तो युरोपिअन पठ्ठा म्हणाला,

‘तिला लग्नाअगोदर कसलाच अनुभव नाही, याची मला चिंता वाटतेय. तिच्या आयुष्यात आलेला मी पहिलाच पुरुष. ती अजूनही virgin आहे!’

देशा-देशामध्ये बदलत जाणाऱ्या लैंगिकतेसंबंधीच्या दृष्टिकोनाचा हा भन्नाट किस्सा मी येथे मंचात लैंगिक विषयावरच्या चर्चेत ऐकला.

पालकत्व तसा खूप महत्त्वाचा विषय. पण या बाबतीत कोणतंच अधिकृत प्रशिक्षण पालकांना मिळत नाही. आपल्या आई-वडिलांनी जसं आपल्याला वाढवलं तसंच आपण आपल्या मुलांनादेखील वाढवतो. आपल्या आई-वडिलांनीही त्यांच्या आई-वडिलांप्रमाणे आपल्याला वाढविलेलं असतं. असं करत करत आपण जर मागे गेलो तर लक्षात येईल पालकत्व पूर्वापारपासून जसं आहे तसंच राहिलेलं आहे. कालानुरूप त्यात बदल करणं गरजेचं आहे. पालक जर खूपच हुकूमशाही वा कडक वृत्तीचे असतील तर मुलं एक तर खूप शांत (submissive) होतात किंवा खूप बंडखोर (rebellious) होतात. त्यामुळे ‘पालकत्व हे मुलांना, पती-पत्नीला त्यांचे विचार समानतेनं मांडू देण्याचा हक्क देणाऱ्या लोकशाहीसारखं असलं पाहिजे.’ राम देशमुख यांनी ‘पालकत्व कसं असावं’ याविषयीच्या मंचातील एका चर्चेदरम्यान मांडलेल्या या विश्लेषणानं मला अंतर्मुख केलं होतं.

विज्ञान किती मुक्त करणारं असू शकतं हे विज्ञानविषयक विविध भन्नाट किश्श्यांतून कळायचं. विज्ञानाचा इतिहास कसा धर्म, जात, देशाच्या पलीकडे जाणारा असतो, हे येथील विज्ञानाशी निगडित अनेक चर्चांद्वारे कळत होतं. मानवजातीचा पाळणा हा आफ्रिकेत हलला. म्हणजे एके काळी जे युरोपियन लोक, आफ्रिकन लोकांना तुच्छ लेखीत ते लोकही आफ्रिकेतीलच की! शाकाहारी आहार चांगला की मांसाहारी आहार? असा भेद करत न बसता, विज्ञान या दोन्ही प्रकारच्या मानवजातीकडून कसं शिकत आलेलं आहे व त्या त्या अनुरूप, मानवावर खाद्याद्वारे सकारात्मक परिणाम करणाऱ्या वनस्पती व प्राण्यांवर प्रयोग करून विविध उपयुक्त औषधांचा विज्ञानानं कसा शोध लावलेला आहे, याविषयीची माहिती विज्ञानाविषयी खूप कुतूहल निर्माण करायची.

‘मानवतावाद’ हे एकच मूल्य विज्ञानाला माहीत असतं. विश्व किती मोठं आहे, ते किती चिरकाल अनंत काळापासून इथं आहे. हे ऐकून मग विश्वाच्या तुलनेत आपल्या आयुष्याचा कालखंड किती नगण्य आहे याची जाणीव व्हायची. मंडळाच्या बाजूलाच राहणाऱ्या, खूप फर्डा इंग्रजी बोलणाऱ्या व अफाट वाचन असणाऱ्या राहुल या तरुणाकडून ‘"We are like butterflies who flutter for a day and think it is forever.’ हे कार्ल सेगनचं वाक्य ऐकल्यावर मग दैनंदिन आयुष्यातील प्रश्नांचा विसर पडायचा. ‘पाचामुखी परमेश्वर’. पाच लोक आपापसात चर्चा, विचारविनिमय करून जो निर्णय घेतात तो बहुतांशी ideal स्वरूपाचा योग्यच निर्णय असतो. असे निर्णय एकट्यानं घेतलेल्या निर्णयापेक्षा खचितच चांगले असतात. त्याचप्रमाणे, वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी पार्श्वभूमी व वय असलेली व्यक्ती जेव्हा कोणत्याही विषयावर चर्चा करतात, तेव्हा ती चर्चा कधीच एकसुरी होत नसते.

मंचात  एकाच विषयाचे कितीतरी वेगवेगळे आयाम उलगडले जायचे. विषय मग तो कोणताही असू दे, त्याला सर्व अंगांनी स्पर्श करण्याची जणू सर्वांना एक नशाच जडली होती. बोलण्याचा आत्मविश्वास वाढला होता. मुद्देसूद कसं बोलावं, एखादा मुद्दा नाही पटला तरी पुढच्याला वाईट वाटून न देता, शांतपणे त्याच्यासमोर कसं व्यक्त व्हावं. असं चर्चा करण्याचं प्रत्येकाचं तंत्रही वारंवार चर्चा करत असल्यानं हळूहळू विकसित होत होतं. 

‘चर्चा’ म्हटली की, आपल्याला आठवतात ते म्हणजे, ‘चर्चा आणि खुर्च्या’ याचा प्रभाव असलेलं क्षेत्र ‘राजकारण’. ‘राजकारणी फक्त चर्चाच करतात; कामं काही करत नाही’, असा सर्वसाधारण नाराजीचा सूर आपल्या इथं असल्यानं चर्चा मग राजकारण सोडून दुसरीकडे का असेना आपण त्याला नाकेच मुरडतो. पण चर्चा गरजेची असते. चर्चेद्वारे आपले विचार आपण इतरांबरोबर शेअर करू शकतो, त्याचबरोबर इतरांचेही विचार आपल्या पोतडीत येत असतात व आपलं अनुभवविश्व समृद्ध करत असतात. असाच आयुष्य समृद्ध करणारा एक अनुभव म्हणजे अल्बर्ट एलिस या अवलियाची मंचात आल्यावर झालेली ओळख.

एके दिवशी सभेमध्ये कॅलेट हिनं ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेवीयरल थेरपी’ किंवा आरईबीटी या अल्बर्ट एलिस यांच्या थिअरीवर एक सेशन घेतलं. मंचामध्ये ती इतर उपस्थित सदस्यांना या अनोख्या विषयावर माहिती देत होती. ‘‘प्रत्येक क्रियेला (A : action)एक प्रतिक्रिया (C : consequence) असते, हे आपणा सर्वांना माहीत आहेच. परंतु या क्रिये आणि प्रतिक्रियेमध्ये किंवा A -आणि C मध्ये एक अदृश्य ‘B’देखील असतो, हे मात्र बहुतांश लोकांना माहीत नसतं. तो B म्हणजे ‘बिलिफ’. ‘बिलिफ’ म्हणजे आपला दृष्टिकोन. आणि हा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. हा दृष्टिकोन कसा बनतो? तर आपलं आयुष्य कोणत्या वातावरणात, कसं आणि कुठं गेलं आहे, आपलं शिक्षण काय झालेलं आहे, हे सर्व मुद्दे विविध घटनेप्रती आपला विशिष्ट दृष्टिकोन तयार करण्यासाठी मदत करत असतात.

स्वतःच्या सावळ्या कांतीला कॉम्प्लिमेंट करेल असा पिवळ्या रंगाचा स्लिव्हलेस टॉप व जीन्स परिधान केलेली कॅलेट, लॅपटॉप टेबलवर ठेवून पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमधील स्लाइड एक- एक करत उपस्थित टीमला शांतपणे समजावत होती. ‘‘एक उदाहरण सांगते, जर कोणा लहान मुलानं माझ्या थोबाडीत मारली तर मी त्यावर दुर्लक्ष करीन; पण जर कोणा मोठ्या माणसानं माझ्या थोबाडीत मारली, तर मात्र मला त्या क्रियेचा राग येईल. तसं पाहिलं तर या दोघांचीही क्रिया सारखीच आहे, आणि ती म्हणजे ‘थोबाडीत मारणं’; पण त्याला माझी जी प्रतिक्रिया आहे ती वेगळी आहे. कारण यामागे माझा लहान मुलाकडे किंवा मोठ्या माणसाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्याने मोठी भूमिका निभावलेली आहे. ‘लहान आहे तो, त्याला काय कळतंय?’ किंवा ‘हा मोठा आहे, हा मला कसा मारू शकतो?’. थोडक्यात, आपण जर दृष्टिकोन बदलला तर आपण आपल्या बऱ्याच अशा भावना नियंत्रणात आणू शकतो.’’

स्पष्ट आवाज व चेहऱ्यावरील झळकणारा आत्मविश्वास यामुळे नाजूक बांध्याच्या कॅलेटनं सर्वांचं लक्ष आपणाकडे खेचून घेतलं होतं. ती बोलत असताना संपूर्ण विवेकमंच शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. दहावीला ती शाळेतून प्रथम आली होती. पण तरीही तिनं सायन्स, इंजिनियरिंग, मेडिकल असा सरळधोपट मार्ग सोडून आर्ट्स या शाखेत प्रवेश घेतला होता व सायकॉलॉजी या विषयात बी.ए. पूर्ण करून अल्बर्ट एलिस याच्या ‘आरईबीटी’ (Rational Emotive behavioral theory) या थिअरीवर विशेष असा अभ्यास केला होता.

विवेकमंचात नेहमीप्रमाणे वीसेक सदस्य उपस्थित होते. ‘‘थोबाडीत मारणं’ हे फक्त एक सोप्पं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण म्हणजे समजा एक जण खूप स्थूल आहे, आणि तिला लहानपणापासून ‘तू खूप जाडी, मोटी आहेस’ असं ऐकावं लागलं आहे किंवा या बाबतीत तिला आजूबाजूच्या लोकांनी खूप अपमानास्पद वागणूक दिली आहे. जेव्हा ती मोठी होते तेव्हा ‘तू ओव्हरवेट आहेस’ असा हलकासा शब्दप्रयोग जरी कोणी केला तरी तिला तो खुपणार; कारण तिच्या ज्या भावना आहेत त्या स्वतःला स्थूल वाटू न देण्याच्या आहेत. पण तिला जर हे कळलं की, की मला राग येण्यात समोरच्याचं ‘जाडी’ म्हणणं याचा भाग खूप छोटा आहे, आणि मला आतापर्यंत जे अनुभव आलेले आहेत त्यांचाच वाटा जास्त आहे. तर त्या व्यक्तीप्रती तिची प्रतिक्रिया सौम्य होऊ शकते. पुढे जाऊन तर तिनं तिचा आहे तसा स्वीकार केला, तर मग ‘तू जाडी आहेस’ याकडे ती फक्त एक वर्णन  म्हणून दुर्लक्ष करू लागेल व रागाची भावना तिच्या आसपासही येणार नाही. तसंच उगाच अनावश्यक ताणही तिच्या मनावर येणार नाही.’’

‘‘थोडक्यात, आरईबीटी आपल्याला हे शिकवितं की एखाद्या घटनेप्रति आपल्या मनात ज्या नकारार्थी भावना येतात, त्यात त्या प्रत्यक्ष घटनेचा खूप थोडा वाटा असतो व आपण जो त्या घटनेप्रती दृष्टिकोन बाळगलेला आहे तोच त्या प्रतिक्रियेला कारणीभूत असतो. एकदा हे कळलं की, मग आपण आपला दृष्टिकोन बदलून आपल्या प्रतिक्रियेवर कंट्रोल करू शकतो. आता हा दृष्टिकोन कसा बदलायचा तर ‘स्वतःचा गुणदोषांसहित आहे तसा स्वीकार करणं’. आपण माणूस आहोत व परफेक्ट असूच शकत नाही, हे स्वीकारणं. मी नेहमी चांगलंच वागलं पाहिजे, नाहीतर मी चांगला नाही’ म्हणून स्वतःला दोष देणं थांबविणं. तसंच इतर लोकांनी नेहमी आपल्याशी चांगलंच वागलं पाहिजे ही अवास्तव अपेक्षाही सोडून देणं. या दोन बाबींमुळे आपण विविध लोकांशी संवाद साधताना योग्य तऱ्हेनं प्रतिसाद देऊ लागू व आपल्या आयुष्यातील बराच unproductive तणावही नियंत्रणात आणू शकू.’’ असं म्हणत कॅलेटनं आपला लॅपटॉप बंद केला व आरईबीटी संबंधी उपस्थितांचे प्रश्न घेऊ लागली.

लिमिटेड वेळात मंचातील सर्व वयोगटांतील व विविध बॅकग्राऊंडच्या लोकांना कळेल अशा साध्या भाषेत तिनं अगदी प्रभावीपणे आरईबीटी चं महत्त्व विशद केलं होतं. यानंतर सरांनी त्यांचे विचार व्यक्त करताना म्हटलं, ‘अल्बर्ट एलिस हे तुकारामाप्रमाणे होते. कधी-कधी आपला जो राग असतो त्यामागे आपल्या अविवेकी भावना असतात, बिलिफ्स असतात, त्या कारणीभूत असतात. आपण जर त्या ताब्यात ठेवल्या तर हा जो आपला राग आहे किंवा आपल्या भावनांचा जो कधी- कधी उद्रेक, स्फोट होतो तो आपण थांबवू शकतो आणि आपली विवेकी बाजू सक्रिय करू शकतो.’ बहुतांश वेळेला एखाद्या व्यक्तीनं प्रत्यक्ष काय म्हटलं आहे यापेक्षा ‘त्याला खरं म्हणजे असं सांगायचं होतं’ असा आपणच आपला गैरसमज करून स्वतःला ताण देत असतो.

ग्रीक तत्त्वज्ञ एपिक्टेटस यानं म्हटल्याप्रमाणे, ‘माणूस प्रत्यक्ष घटनेमुळे नाही तर त्यानं त्या घटनेप्रती बाळगलेल्या दृष्टिकोनामुळे व्यथित होत असतो’, Men are disturbed not by things but by the views which they take of them. आणि ते किती खरं आहे! मानवी मन हे कधीच वर्तमानात स्थिर न राहणारं. त्यामुळे माणूस चिंताग्रस्त, भयग्रस्त तसंच रागात असतो. तेव्हा या सर्व नकारार्थी भावनांचं नियंत्रण कसं करावं यासंबंधी कॅलेटनं कंडक्ट केलेलं हे सेशन म्हणजे डोळे उघडणारं ठरलं. आपलं दुःख हे आपण निर्माण करतो. आपल्याला जे दिसतं, जे वाटतं, ते आपल्या पूर्वग्रहावर अवलंबून असतं. हे मला प्रथमच या आरईबीटीच्या सेशनमध्ये कळलं. नकारात्मक विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण प्रयत्नांनी बदलू शकतो आणि मनात असलेल्या भावनांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो.

या सेशननंतर अल्बर्ट एलिसच्या या भन्नाट थिअरीबद्दल मग खूप कुतूहल निर्माण झालं. यानंतर मग जेव्हा जेव्हा मला कोणाच्या एखाद्या विधानाचा वा कृत्याचा राग यायचा तेव्हा मी त्या विधानाकडे व कृत्याकडे तटस्थपणे पाहू लागलो. असं त्या विधानात वा कृत्यामध्ये काय आहे, की ज्यामुळे मी माझा मूड रागावून खराब करावा? हळूहळू मग कळू लागलं की, राग येण्यासाठी त्या व्यक्ती वा प्रसंगाचा फक्त 10 टक्के भाग असतो. 90 टक्के भाग हा आपल्या मनात आपणच धरून ठेवलेल्या belief चा असतो. विवेकमंचात आल्याआल्या अल्बर्ट एलिस यांच्या थिअरीची झालेली ओळख मला खूप काही शिकवून गेली. या थिअरीचा राग नियंत्रणात आणण्यासाठी मला बराच फायदा झाला. अचानक खूप शांत वाटू लागलं. माझ्या वैयक्तिक आयुष्यात एक मुलगा, भाऊ, पती, बाप म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारताना लोकांशी संवाद साधताना या थिअरीची मला मदत झाली.

धर्मनिरपेक्षतेविषयी चर्चा करत असताना, आपण त्याची कशी सोईस्कर व्याख्या केली आहे, याची सुंदर माहिती रॉयलनं एकदा सांगितली होती. ‘धर्मनिरपेक्ष याची व्याख्या अशी आहे, की सर्व धर्म समान आहेत. कोणत्याच धर्माला राजकारणात किंवा सत्ताकारणात महत्त्व नाही. बाहेरील प्रगत देशात असंच राजकारण केलं जातं, कोणत्याच धर्माला तिथं महत्त्व नसतं. परंतु आपल्याकडे त्याउलट परिस्थिती आहे. आपल्या इथं धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मांना महत्त्व आणि त्यामुळे हा सर्व गोंधळ माजलेला आहे.’ खूपच सुंदर असा तो मुद्दा होता. विवेकमंचाच्या सभेत प्रत्येक जण असा समृद्ध व्हायचा.

एकदा ग्रॅहमनं त्याला आवडलेल्या ‘Thepower of subconscious mind या पुस्तकाविषयी माहिती दिली. तर एकदा रॉयलनं प्रभावी व्यक्ती त्यांच्या कोणत्या सवयीमुळे प्रभावी होतात ह्यावरील ‘सेव्हन हॅबिट्‌स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ हे एक चर्चासत्र घेतलं. मीही एकदा ‘transactional analysis’ म्हणून एका थिअरीविषयी एक सेशन घेतलं. आपल्या सर्वांमध्ये ‘मूल’ (what I feel), ‘प्रौढ’ (what I think), व ‘पालक’ (what I teach) या तीन अवस्था असतात आणि प्रत्येक व्यक्तीगणिक त्या अवस्था कशा बदलत जातात, याविषयी त्यात माहिती होती. तर कधी ॲड.अनुप, डिसोझासर हे त्यांना आवडलेल्या एखाद्या पुस्तकाविषयी सांगत.

चांगले विचार ऐकण्याची व त्याचे देवाण-घेवाण करण्याची मुळातच सर्वांना आवड असते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत सर्व सदस्यांची एक वेगळीच वैचारिक मशागत झाली. मंचात येणारे लोक हे वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडित असल्यानं वैचारिक चर्चासत्राबरोबरच इतर निसर्ग, आरोग्य व इतर सामाजिक प्रश्नावरही मंचात बरीच खुली चर्चा चाले. सचिन पेन नावाचा एक पक्षिप्रेमी या सभेत येऊन पक्ष्यांच्या अद्‌भुत जगाविषयी माहिती सांगत असे. डॉ.सचिन चौधरी या तरुण डॉक्टरांची प्रथमोपचार कसे करावे याविषयी माहिती देणे असो वा फ्लोरीनं तिच्या कॉलेज फेस्टिवलमध्ये पाहिलेल्या एखाद्या डॉक्युमेंटरीविषयी माहिती. सुमित मर्तीसारखा पाणीप्रश्नावर काम करणारा कार्यकर्ता. मंचाच्या सभा नेहमीच वेगवेगळ्या विषयामुळे इंटरेस्टिंग होत होत्या.

मंचातील सदस्यांशी हळूहळू जवळून ओळख होत होती.

विनोदी व हॅप्पी-गो-लकी अशा स्वभावाचे तात्या, तोंडातून एक चकार शब्दही न उच्चारणारे पण मंचातील चर्चा शांतपणे ऐकणारे फ्रेडरिक मस्करणीस. आपले मत articulate पणे व्यक्त होते आहे की, नाही याची तमा ना बाळगता, अडखळत का होईना चर्चेत समरसून भाग घेणारे सॅबेस्टियन अंकल. असे हे ‘रिटायर्ड बट नॉट टायर्ड’ त्रिकूट दर रविवारी न चुकता मंडळात मंचातील चर्चेस नेहमी हजेरी लावायचं. फ्लोरी, सोनल, कॅलेट, प्रिया हे सर्व एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. सामाजिक विषयावर आपलं मत मांडण्याची या सर्वांना असलेली आवड विविध चर्चेतून दिसत होती. परीक्षेच्या काळात गुणी मुलींसारख्या या मंचाच्या सभेतून गायब व्हायच्या व परत रुटीन सुरू झालं की, मंचात येऊन आपल्या किलबिलाटानं सगळं वातावरण गजबजून टाकायच्या.

रॉयल तसा माझा शालेय मित्र असला तरी बऱ्याच वर्षांनी एक प्रौढ म्हणून नव्यानं माझी त्याच्याशी ओळख होत होती. शाळेत असल्यापासूनच रॉयल खूप बुद्धिमान होता. खुद्द सी.ए. असूनही केवळ इतिहासामध्ये आवड आहे म्हणून कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्यानं नुकताच M.A.- साठीही फॉर्म भरला होता. किंबहुना ग्रॅहम, मी आणि रॉयल असं आमचंही एक छान ट्युनिंग जमलं होतं. मंचातील चर्चेबरोबरच बिअर हा आमचा वीकपॉइंट होता. कित्येक वेळा मंडळात जरी मंचाची सभा आटोपली असली तरी आमची चर्चा मात्र त्यानंतरही बिअरबारमध्ये सुरूच राहायची!

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून शिकलेला व कितीही गंभीर चर्चा असू दे आपल्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम ठेवणारा दीपेश जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सभेस येत असे. काहीसा भारदस्त बांधा असलेला, पण त्यामानानं खूपच शांत, नेमस्त स्वभाव असलेला दीपेश याच्याशीही आता बऱ्यापैकी ओळख झाली होती. मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता पीटर हा कधीकधी रियोना या आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलीस घेऊन येई. सुरुवातीला नव्याची नवलाई चटकन ओसरून न जाता या सभेस येणारे तरुण-तरुणी नेहमी येत राहावे म्हणून डिसोझा सर सर्वांना वैक्यतिकरीत्या फोन करत असत. एके दिवशी सरांचा मला फोन आला, ‘डेव्हिड, मी तुला एक ई-मेल पाठवला आहे, तो वाचून पुढच्या सभेस ये. आपण त्यावर चर्चा करू’. प्राज्ञपाठशाला यांच्या वतीने वाई येथे ‘धर्म व विज्ञान’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं. डॉ. शि. स. अंतरकर यांचं बऱ्याच वर्षांअगोदर ‘धार्मिक जीवन व वैज्ञानिक दृष्टिकोन’ यावर जे व्याख्यान झालं होतं, त्याची कॉपी सरांनी मला ई-मेल केली होती.

ॲड.अनुप व डिसोझासर दोघांनाही या चर्चेचं आमंत्रण होतं व त्याची पूर्वतयारी म्हणून त्यांना प्राज्ञ पाठशालेच्या वतीनं हे भाषण अभ्यासण्यासाठी पाठविण्यात आलेलं होतं. एक युवक म्हणून धार्मिक जीवन, धार्मिक दृष्टिकोन, अस्तित्वात असलेले विविध धर्म, तसंच एका बाजूनं धर्माच्या नावाखाली चाललेलं धार्मिक शोषण, तर  दुसऱ्या बाजूनं धर्मानं प्रेरित होऊन झालेली चांगली कार्य या सर्वांमुळे मनात खूप प्रश्न उपस्थित होते. त्यामुळे घाईघाईनं मी तो ई-मेल उघडला. जवळजवळ 40-50 पानांचं ते व्याख्यान होतं. 1979 साली ते व्याख्यान डॉ.शि.स. अंतरकर यांनी दिलेलं होतं. मी ते संपूर्ण व्याख्यान अधाश्यासारखं वाचून काढलं. खूपच किचकट अशी त्या व्याख्यानाची भाषा होती. उच्च पातळीवरचे खूपच मोठे मोठे शब्द त्यामध्ये वापरले गेलेले होते. तो वक्ता नक्कीच एखादा धर्मपंडित असावा. धर्माचा, विज्ञानाचा खूप सखोल अभ्यास करून या दोन स्वतंत्र विषय वा दृष्टिकोनाप्रति कोणताही पूर्वग्रहदूषितपणा न ठेवता, वस्तुनिष्ठपणे त्यावर चिंतन करून त्यातून जे काही निष्पन्न होईल असं ते व्याख्यान होतं. ते व्याख्यान मी वाचून संपवलं. ‘पुढच्या सभेत यावर चर्चा करायची आहे तेव्हा हे भाषण वाचून ये’ हा सरांचा शब्द शिरसावंद्य मानून जे मुद्दे मला आवडले होते, ते मी नोंद करून घेतले. इतकं मोठं किचकट व पांडित्यपूर्व भाषण मी माझ्या शब्दांत लिहून घेतलं आणि जे काही चांगले मुद्दे होते ते माझ्या भाषेत एका कागदावर लिहून घेऊन विवेकमंचाच्या पुढच्या मीटिंगसाठी तयार झालो.

इतक्या पांडित्यपूर्ण भाषणातील गाभा लोकांपर्यंत पोहोचविणं हे एक मोठं दडपण मनावर होतं. मंचाची मीटिंग सुरू झाली. सरांनी सांगितल्याप्रमाणे ‘धर्म व विज्ञान’ याच्याशी निगडित चर्चा सुरू केली गेली. मी बोलण्यास सुरुवात केली, ‘1979 साली डॉ.शि.स. अंतरकर यांनी ‘धार्मिक जीवन व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान दिलं होतं. त्यांचं मुख्य ध्येय हे होतं की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा त्याग न करता खऱ्या अर्थानं धार्मिक जीवन जगणं शक्य आहे का? आणि शक्य असल्यास ते कसं?’ असं म्हणत मी माझ्याजवळील कागद काढले व त्यावरील लिहिलेले मुद्दे एक-एक करून बोलण्यास सुरुवात केली,

‘प्रथम धार्मिक जीवन यावर त्यांनी जी मते मांडली होती ती आपण जाणून घेऊ या. आज कोणताही धर्म घ्या, हिंदू वा मुस्लिम वा ख्रिश्चन त्या धर्मामध्ये तीन बाबी आहेत. पहिली बाब म्हणजे त्या त्या धर्माचे विचार जसे पवित्र ग्रंथ, धर्मसंस्थापक वगैरे, दुसरी बाब म्हणजे त्या त्या धर्माचे आचरण जसे सण, कर्मकांडे, देवळे, तीर्थस्थाने वगैरे आणि सर्वांत महत्त्वाची तिसरी बाब म्हणजे हे धर्म आपल्याला देत असलेले ‘परमोच्च अवस्थेचे आश्वासन’. आता ही परमोच्च अवस्था म्हणजे काय? एक तर आपण माणूस आहोत आणि इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये मन आहे आणि हे मन कधीच स्थिर नसते. ते कधी भूतकाळात जाऊन व्यथित होत असते, तर कधी भविष्यकाळात उडून चिंताग्रस्त होते. ते कधीच वर्तमानकाळात जगत नाही आणि यामुळेच माणसाचं आयुष्य भीती, चिंता, संघर्ष, काम- क्रोध-लोभ-मोह-मत्सर अशा विकारांनी गढूळ बनले आहे. तेव्हा, या सर्वांवर मात करून प्रेम, अहिंसा, शांती, चिंतामुक्ती अशी परमोच्च अवस्था गाठू शकेल अशी मुक्ती माणसाला मिळू शकेल का? असा प्रश्न डॉ.अंतरकर उपस्थित करतात.

प्रत्येक धर्म हा या परमोच्च अवस्थेचं आश्वासन देत असतो. याउलट वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपण बघितला तर त्यामध्ये विश्वाच्या विविध अंगांचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करून त्याचे नियम समजावून घेणं हे विज्ञानाचं ध्येय आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा बुद्धिवादी, चिकित्सक आणि तटस्थ असतो. मग भले सत्य कितीही अप्रिय वा कठोर असो, ते विज्ञान मांडत असते. दोन्ही दृष्टिकोन, मग ते धार्मिक जीवन असो वा वैज्ञानिक दृष्टिकोन हे काही माणसाला जन्मतःच उपजत नसतात. परंतु ते मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. पण या दोन्ही वैज्ञानिक वृत्ती व धार्मिक वृत्तीमध्ये काही फरक आहेत. वैज्ञानिक ज्ञान हे तात्पुरतं व परिवर्तनीय असतं. सत्य झाकून न देणं हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया आहे. याउलट धर्मामध्ये धार्मिक धारणा या निश्चित आणि अंतिम सत्य मानल्या जातात. वैज्ञानिक सत्य मानवाला रुचेलच असं नसतं तर धार्मिक सत्य ही कितीही अशक्य, अतार्किक वाटली तरी मानवी आशा-आकांक्षा पूर्ण करणारे व त्याला सुखावणारे आहे.

वैज्ञानिक वृत्ती ही बुद्धिवादी, चिकित्सक असते, तर धार्मिक वृत्ती ही भावनिक आणि श्रद्धाळू असते. मग यापैकी कोणता दृष्टिकोन चांगला? यासंदर्भात डॉ. राधाकृष्णन यांनी असं म्हटलं आहे की, जर धर्माचा आपण सर्वस्वी त्याग केला आणि त्याचा पर्याय म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला तर काय होईल? परंतु अशी अवस्था ही खूप निराशाजनक आणि माणसाला खचवून टाकणारी आहे. अधार्मिकता हा काही उपाय नाही, मग यावरचे उपाय काय? दोन्ही  दृष्टिकोनातला सुवर्णमध्य कोणता? तर तो म्हणजे उच्च धर्म स्वीकारणे. वैज्ञानिक दृष्टिकोनही स्वीकारणे आणि उच्च धर्म जीवन जगणे. आता उच्च धर्म म्हणजे काय? तर धर्मात जे काही कर्मकांड आहे, जी काही सांप्रदायिकता चिकटलेली आहे ती बांडगुळासारखी नष्ट करणं. धर्म हा धर्ममंदिरात म्हणजे मंदिर, मस्जिद व चर्चमध्ये जो कोंडून राहतो, तो स्वच्छ वातावरणात रुजला पाहिजे आणि तरच तो चांगला बहरू शकतो. असं जर उच्च धर्माचं आचरण केलं तर मानवी जीवनात शांती, प्रेम, दया, करुणा, अभय, पावित्र्य, मांगल्य हे आपण आणू शकू.

विज्ञान व तंत्रज्ञान यात एवढी प्रगती झालेली आहे की, जगाच्या ज्या काही भौतिक समस्या आहेत, दारिद्र्य, रोगराई, विषमता. जर चांगला धार्मिक दृष्टिकोन असेल तर विज्ञान व तंत्रज्ञानानं आपण जगातील सारे प्रश्न नाहीसे करू शकू. देश-परदेश हा भेद न पाहता सकळ माणूसजात एकच आहे, अशी उच्च धार्मिक भावना जर विज्ञानाच्या मनात असेल तर हे सहजशक्य आहे. विज्ञान ही एक शक्ती आहे; पण त्याचा चांगला वापर केला गेला पाहिजे. विनोबा भावे असं म्हणायचे की, विज्ञान व राजकारण एकत्र आलं तर सर्वनाश होऊ शकतो. पण जर विज्ञान आणि आत्मज्ञान एकत्र आलं तर मात्र सूर्योदय होतो. त्याचबरोबर विज्ञानातील ज्ञानाचे दुष्परिणामही होऊ शकतात. निसर्ग समजावून घेणं, त्याची रचना त्यामागील नियम समजावून घेणं ही विज्ञानाची मूळ प्रेरणा होती. परंतु त्या ज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञान जन्माला आलं व मग विज्ञानाचा हेतू हा ज्ञानार्जन राहिला नाही, तर निसर्गावर ताबा मिळविणं, सत्ता गाजविणं, निसर्गाला ताब्यात ठेवणं ही विज्ञानाची प्रेरणा झाली.

म्हणजे मूळच्या ज्ञान- जिज्ञासेच्या जागी सत्तापिपासूपणा आला आणि वैज्ञानिक नम्र होण्याऐवजी त्यांना स्व-सामर्थ्याचा गर्व वाटू लागला. त्यामुळे ही विज्ञानाची अवस्था काही मानवाला तारणारी नाहीये. तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगताना उच्च धार्मिक दृष्टिकोन ठेवणं हेच माणसाच्या कल्याणासाठी उदात्त असं आहे. ज्याप्रमाणे विज्ञानातील दोष व चुका स्वीकारून आपण प्रगती करत आहोत, त्याचप्रमाणे आपण आपलं धर्मचिंतन सुधारून कायम प्रगती करत राहिलं पाहिजे. ज्ञान व शक्ती देणारं विज्ञान आणि शांती व प्रेम करण्याची आशा देणारी धर्म युती हे जर एकत्र आलं तर माणसाला सुखकर जीवन जगता येईल.’’

एवढं बोलून मी माझं बोलणं थांबविलं. मंचात पूर्णपणे शांतता होती. डिसोझासर म्हणाले, ‘वा! खूपच छान. मी स्वतः ते व्याख्यान वाचलं होतं. खूपच मोठ्या आणि जड अशा शब्दांत ते व्याख्यान डॉ.शि.स. अंतरकर यांनी लिहिलेलं होतं, परंतु तू याचा खूपच सुंदर गोषवारा आपल्या मंचात सांगितला आहे. डेव्हिड तुझे अभिनंदन!’ असं बोलून सरांनी माझे अनपेक्षितरीत्या अभिनंदन केले. मलाही खूप छान वाटलं. इतकी तटस्थ, वस्तुनिष्ठपणे अशी माहिती मिळवणं, त्यातील चांगले विचार वाचणं आणि ते माझ्यापरीनं लोकांपर्यंत पोहोचवणं असा दुहेरी आनंद मी उपभोगत होतो.

कित्येक वर्षांपासून मनात एक सुप्त अशी भावना होती की, सर्व विषयांवर बोलावं, सगळं जे काही आहे ते खरे- खरे, फक्त एका बाजूनं नाही तर दोन्ही बाजूनं चर्चा करावी. अर्थात त्यासाठी विविध अंगांनी चर्चा करणारी अशी माणसे भेटावीत, धर्मासह संस्कृती, भाषा, राजकारण, कोणताही विषय असो, त्यावर अतिशय खोलपणे जाऊन, विविध अंगांनी चर्चा करून, त्याचं खरं स्वरूप समजावून घ्यावं. त्यामुळेच असेल कदाचित, मी कधी फेसबुकवर ज्या पोस्ट यायच्या त्यावरील चर्चेत सहभागी व्हायचो, तर कधी ‘कुपारी अड्डा’ या सभेत भाग घेत होतो; पण कुठंतरी ती तहान अपुरी राहत होती. आणि आज प्रथमच एखाद्या पक्ष्याला बऱ्याच वर्षांनी जसं आपल्या घरट्यात परतल्याची अनुभूती मिळावी, तसं काहीसं माझं झालं होतं. I had finally come home...

परंतु धर्माविषयी जसं चांगलं वाचणं, बोलणं सर्वांनाच आवडतं, तसंच धर्मातील कर्मकांडे, अंधश्रद्धा यावरही बोलायला सगळ्यांनाच आवडतं; फक्त तो धर्म तुमचा नसतो तोपर्यंतच! स्वतःचा धर्म कसा चांगला, वेगळा, भव्यदिव्य असाच समज आपण कुरवाळत असतो.

Tags: अल्बर्ट एलिस विवेक मंच मंच डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस vivekmancha manch daniel Mascharnes weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके