डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एक सेवाभावी, व्रतस्थ व्यक्तिमत्त्व...

सांगली जिल्ह्यातील वेरळा विकास संस्था  व कोल्हापूर जिल्ह्यातील ‘अवनि’ स्वयंसेवी संस्था यांचे अध्यक्ष प्रा. अरुण चव्हाण यांचे वयाच्या नव्वदीत असताना नुकतेच निधन झाले. या दोन्ही संस्थांच्या वतीने त्यांनी विविध प्रकल्प राबविले. महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून आणि विद्यापीठात सहायक कुलसचिव पदावर कार्यरत असताना ऐन उमेदीच्या काळात नोकरी सोडून सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या या ध्येयवादी वृत्तीच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या वाटचालीचा वेध.

कोल्हापूरच्या ‘अवनि’ संस्थेचे अध्यक्ष व सांगलीच्या ‘वेरळा विकास संस्थे’चे मानद सचिव व अध्यक्ष प्रा. अरुण चव्हाण यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रातील या दोन अग्रगण्य स्वयंसेवी संस्थांची उभारणी करणारे प्रा. चव्हाण हे एक पुरोगामी विचारांचे सुसंस्कृत व सेवाभावी व्यक्तिमत्त्व होते. या दोन्ही संस्थांचे काम वेगळ्या स्वरूपाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. वेरळा विकास संस्था ही सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करणारी, तर ‘अवनि’चे कार्य कोल्हापूर परिसरातील नागरी भागात. तथापि, दोन्ही संस्थांचे उद्दिष्ट मात्र समाजविकासाचे. वेरळा विकास संस्था प्रामुख्याने शेतकरी व ग्रामीण भागातील कमकुवत वर्गासाठी शेती, पाणी, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांत काम करते, तर समाजातील उपेक्षित, निराधार व कमकुवत वर्गातील महिला, मुली, बालकामगार यांच्या पुनर्वसन व विकासासाठी ‘अवनि’ कार्यरत आहे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून ज्यांनी प्रचंड पसारा उभा केला, त्यांची दूरदृष्टी, विचार आणि कार्यपद्धती विलक्षण कौतुकास्पद म्हणावी लागेल.

वेरळा विकास संस्थेची स्थापना 2 ऑक्टोबर 1969 ची. आजकाल स्वयंसेवी संस्थांचा अगदी सुळसुळाट झालेला दिसतो आणि त्यात हौशी स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या दिखाऊ संस्थांचाच भरणा अधिक असतो. मात्र, प्रा. चव्हाण यांनी वेरळा विकास संस्थेची स्थापना केली, त्या काळी संस्था ही संकल्पना फारशी परिचित नव्हती. शिवाय ज्या ग्रामीण भागात तिचे कार्य सुरू केले, तो सारा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा, कमी पावसाचा आणि पाण्याची तीव्र टंचाई असणारा. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान असले तरी त्यांचे वास्तव्य व शिक्षण कोल्हापूर व मुंबईत झालेले. शिवाय ते प्रतिष्ठित अशा घरंदाज व संपन्न कुटुंबात जन्मलेले आणि उच्चशिक्षित; तेव्हा खानापूर तालुक्यातील दुष्काळी टापूत त्यांची संस्था कशी काय कार्य करणार आणि ते स्वत: तरी कितपत आणि किती काळ सक्रिय राहणार, असे शंकास्पद प्रश्न संस्था उभारण्याच्या प्रारंभीच उपस्थित करण्यात आले; पण प्रा. चव्हाण यांनी विचारपूर्वक निर्णय घेऊनच हे पाऊल उचलले होते. आपल्या निश्चयावर ते ठाम होते. त्यांच्या या निर्धारामागे एक विशेष पार्श्वभूमी होती.

1940 ते 50 या कालखंडात प्रा. चव्हाण कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी वास्तव्यास असताना डाव्या विचारांच्या काही कार्यकर्त्यांच्या ते संपर्कात आले. त्या काळात त्यांचे वाचन अफाट होते. डाव्या विचारांचा प्रभाव जगातील अनेक देशांत वाढत होता. वाचनातून मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा तसेच अन्य मार्क्सवादी विचारवंतांच्या लेखनाचा त्यांना चांगल्या प्रकारे परिचय झाला होता. त्याच वेळी महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्व व विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव पडला होता. अशा परिस्थितीत निर्माण झालेल्या काहीशा वैचारिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ते वेगळ्या वाटेचा शोध घेत होते. इंग्रजी साहित्य या विषयात मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी घेऊन औरंगाबाद व सांगली येथे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काही वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केले. त्यांतर औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तसेच कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात प्रशासकीय विभागात सहायक कुलसचिव म्हणूनही काही काळ त्यांनी जबाबदारी पार पाडली. इंग्रजी विषयाचे ‘विद्यार्थिप्रिय प्राध्यापक’ अशी त्यांची ओळख निर्माण झालेली होती आणि प्रशासकीय अनुभवही गाठीस होता. त्यामुळे विद्यापीठात वा अन्यत्र नोकरीच्या अधिक चांगल्या संधी समोर दिसत असतानाही, समाजासाठी काही वेगळे काम करण्याच्या अंतर्गत ऊर्मीपोटी त्यांनी शिक्षणक्षेत्राकडे पाठ फिरविली; आणि कसलीही शाश्वती नसलेल्या ग्रामीण विकास सेवाकार्यात स्वत:ला झोकून दिले. खानापूर तालुक्यातील आळसंद या गावात वेरळा विकास संस्थेची पायाभरणी केली.

परिसरातील सहा-सात गावांतील लोक एकत्र आणून विविध प्रकारची कामे सुरू केली. त्या मागासलेल्या भागात रस्ते, वीज, पाणी, शिक्षण व आरोग्याच्या सोयीसुविधा आदी बाबतींत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने विहिरींची खुदाई, रस्तेरुंदी, जमीन सुधारणा व जलसंधारण, उपसा सिंचन, नवीन पीक पद्धती, क्षारपड जमीन सुधारणा, वनीकरण- यांसारख्या योजना राबविण्याबरोबरच प्रौढ शिक्षण अभियान, महिला शिक्षण, आरोग्य सेवा आणि समाज प्रबोधनविषयक कामेही सुरू ठेवली. विविध प्रकल्प राबविताना ग्रामस्थांचा सहभाग आणि बाह्य संस्थांची मदत यांचा समन्वय साधून ही कामे सातत्याने सुरू राहतील याची काळजी घेतली. 1972 च्या दुष्काळी परिस्थितीत संस्थेने केलेले काम लाख मोलाचे ठरले. सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील सहा तालुक्यांतील सुमारे 20 हजार लोकांना चार महिने संस्थेच्या वतीने रोजगार पुरविण्यात आला. सुकडी वितरणाची जबाबदारीही संस्थेने उत्तम प्रकारे पार पाडली. दुष्काळी परिस्थितीत संस्थेने जसे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य केले, तसेच गुजरातमध्ये भूकंपानंतर भूकंपग्रस्तांसाठी गृहबांधणी प्रकल्प व अन्य मदतकार्य पुरविण्याचेही उल्लेखनीय कार्य केले. वेरळा विकास संस्थेच्या पुढाकारामुळे खानापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाचा तर गेल्या तीन-चार दशकांत अक्षरश: कायापालट झाला. कोल्हापुरात ‘अवनि’चे कार्यही श्रीमती अनुराधा भोसले यांच्या नेतृत्वाखाली जोमाने सुरू आहे. तेथील मुलींच्या शाळा व वसतिगृहाचे काम अलीकडेच पूर्ण झाले असून, अन्यही विविध प्रकल्प सुरू आहेत. या साऱ्या कामांमागे मुख्यत्वे त्यांचे नियोजन आणि प्रेरणा होती.

प्रा. चव्हाण हे इंग्रजी विषयाचे व्यासंगी अभ्यासक होते. त्यांना विविध विषयांत रस होता. त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा होता आणि ते लेखनही करीत. ‘तिमिरवेध’ ही कोल्हापूर संस्थानच्या पार्श्वभूमीवरील त्यांची कादंबरी अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. इंग्रजीतील ललित आणि वैचारिक वाङ्‌मयाचेही त्यांचे वाचन विविधांगी होते. भारतीय व विदेशी राजकारणाचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांचे वाचन अद्ययावत होते आणि इंग्रजी वृत्तपत्रांतून ते पत्रलेखनाद्वारे मतप्रदर्शन करीत असत. अत्यंत ताज्या विषयावरही त्यांचे वाचन अद्ययावत असे आणि ते उत्साहाने लेखनही करीत. गांधीजींचे नातू अरुण गांधी हे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे सहसंपादक होते तेव्हापासून त्यांच्याशी त्यांचे निकट मैत्री-संबंध प्रस्थापित झाले होते; ते गेल्या चार दशकांच्या काळात अधिकाधिक दृढ होत गेले. गेली काही वर्षे अरुण गांधी अमेरिकेहून दर वर्षी खास भारतभेटीसाठी येत. त्या वेळी त्यांची कोल्हापूर, सांगलीत ‘अवनि’ व ‘वेरळा विकास संस्थे’ची भेट ठरलेली असे. अनेक अमेरिकन मित्र व कार्यकर्ते या निमित्ताने ग्रामीण भारताच्या दर्शनासाठी म्हणून आवर्जून येत. त्यांच्या या भारत दौऱ्याचे नियोजन प्रा. चव्हाण मोठ्या उत्साहाने करीत असत.

मराठीतील ख्यातनाम कवी अरुण कोल्हटकर हे प्रा. चव्हाण यांचे वर्गमित्र. ते कोल्हापूरचे. त्यांचे कोल्हापुरात स्मारक व्हावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. केवळ त्यांच्यामुळे कोल्हटकर स्मारकाचे काम मार्गी लागले असून, आता ते जवळजवळ पूर्ण होत आले आहे. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता आणि त्यात विविध क्षेत्रांतील नामवंतांचा समावेश होता. प्राचार्य म. द. हातकणंगलेकर, कृषितज्ज्ञ प्र. शं. ठाकूर, प्रयोग परिवाराचे श्रीपाद दाभोलकर, डॉ. गो. मा. पवार, डॉ. सुधीर रसाळ, प्राचार्य पी. बी. पाटील, ग. प्र. प्रधान, बाबा आढाव, आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील, चित्रकार बाबूराव सडवेलकर, प्रा. द. ना. धनागरे, कॉ. गोविंद पानसरे, बापूसाहेब पाटील, प्राचार्य लीला पाटील, रवींद्र मेस्त्री अशा अनेकांशी त्यांचे व्यक्तिगत मैत्री-संबंध होते. याशिवाय देश-विदेशांतील अनेक मित्रांशी त्यांचा पत्रमित्र संबंध होता. अरुण गांधी यांच्यामुळे गांधी परिवारातील सर्वांशी त्यांचे ऋणानुबंध जोडले गेले होते. त्याचप्रमाणे कोल्हापुरातील काही राजघराण्यांशी व राज्यातील राजकीय घराण्यांशीही त्यांचे निकट संबंध होते. राजर्षी छत्रपती शाहूमहाराज हे त्यांचे आदर व प्रेरणास्थान होते. राजकीय नेत्यांपैकी वसंतदादा पाटील, अण्णासाहेब शिंदे, मधुकरराव चौधरी, स्वातंत्र्य चळवळीतील आदरणीय नेते क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापू लाड, भगवान बाप्पा मोरे यांच्याशी त्यांची जवळीक होती. विविध कार्यांत ते त्यांचे मार्गदर्शन घेत असत. किर्लोस्कर घराण्याशी त्यांचा स्नेह होता. शंकरराव किर्लोस्कर तसेच मुकुंदराव व मालतीबाई किर्लोस्कर यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते.

मित्रमंडळींच्या बैठकीत मनसोक्त गप्पागोष्टी करणे हा त्यांचा विरंगुळा असे. एरवी मितभाषी असणारे प्रा. चव्हाण मित्रांच्या मैफलीत अगदी रंगून जात. विविध क्षेत्रांतील विपुल माहितीचा त्यांच्याकडे खजिना होता. कोल्हापूरच्या राजघराण्यातील व्यक्तींच्या ‘पडद्याआड’च्या अनेक गुपितांचा ‘मैफल ठेवा’ही त्यांच्या पोतडीत असे. मुख्य म्हणजे त्यांची स्मरणशक्ती चांगली होती. खास बैठकीत राजकारण्यांशी संबंधित किती तरी रंगतदार किस्से ते सांगत असत. त्यांच्याकडे एक प्रकारची मिश्कील विनोदबुद्धी (सेन्स ऑफ ह्युमर) होती आणि दर्जेदार विनोदाला दाद देण्याची अभिजातच रसिक वृत्तीही त्यांच्या ठायी होती. एक बहुआयामी, संपन्न असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. आकर्षक आणि रुबाबदारपणाची त्याला जोड लाभली होती. त्यामुळे प्रथमदर्शनीच त्यांचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडत असे. अत्यंत मृदू आवाजात आणि हळुवारपणे ते बोलत; पण आपले म्हणणे मुद्देसूदपणे पटवून सांगण्याची त्यांची वेगळी हातोटी होती. जाहीर समारंभ आणि भाषणबाजीचा त्यांना सोस नव्हता आणि प्रसिद्धीचीही हाव नव्हती. उलट प्रसिद्धीपासून दूर राहूनच आपण आपले काम करत राहावे, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व दीर्घ काळ सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत राहूनही त्यांना व त्यांच्या कार्याला व्यापक प्रसिद्धी लाभली नाही. किंबहुना जाणीवपूर्वकच ते अशा प्रसिद्धीपासून दूर राहिले.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निकटचे अनेक नातेवाईक व स्नेहीमंडळी राजकारणात असूनही आणि बड्या राजकीय नेत्यांशी स्नेहसंबंध असूनही राजकारणाच्या धबडग्यापासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवले. त्यापेक्षा आपण व आपले कार्य यांतच ते आनंद मानत राहिले. सतत नवनवे प्रयोग आणि नवनव्या कंपन्यांचा ते पाठपुरावा करीत असत. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करताना अनेक अडीअडचणींना  राजकीय-सामाजिक अडथळ्यांना त्यांना तोंड द्यावे लागले; पण ते कधीच निराश झाले नाहीत. सतत नव्या उत्साहाने व उमेदीने काम करत राहिले. बाहेरचा मदतीचा ओघ थांबल्यामुळे काही काळ त्यांना प्रचंड आर्थिक समस्यांनाही तोंड द्यावे लागले. वीस-पंचवीस लाखांच्या कर्जाचा भार संस्थांवर पडला; पण तो स्वत: सोसून त्यांनी संस्थांची कामे पुढे सुरू ठेवली. विशेष म्हणजे उत्तम पगाराच्या व प्रतिष्ठेच्या नोकऱ्या सोडून आपण सार्वजनिक सेवेच्या ओढीने भलत्याच मार्गाने वाटचाल केली किंवा काय, या प्रकारचे प्रश्न त्यांना कधी पडले नाहीत आणि स्वत: घेतलेल्या धाडसी निर्णयांचा कधीच पश्चात्ताप वगैरे झाला नाही. जो मार्ग निवडला त्यावरून ते मोठ्या उत्साहाने व आनंदाने अखेरपर्यंत चालत राहिले. त्यांच्या परिवर्तनाच्या चळवळीत आणि ग्रामीण विकासाच्या कार्यात अनेक गुणी कार्यकर्त्यांची त्यांना साथ लाभली. ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांपासून ते अनेक बड्या अधिकाऱ्यांचा व नेत्यांचा त्यांनी ग्रामीण  विकासाच्या विविध कार्यांत उत्तम पद्धतीने उपयोग करून घेतला. मैत्री आणि स्नेहसंबंधाचा चांगला उपयोग केला आणि हाती घेतलेली कामे पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या कार्यात मोठे योगदान दिले. हा सामूहिक प्रयत्न होता. आणि त्यातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे तर उभी राहिली; पण कार्यकर्त्यांची फळीही तयार झाली. महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रियेत माणसे घडविण्याचे आणि मानवी संबंध दृढ करण्याचे फार मोठे कार्य नकळत पार पडले. हे सारे घडले त्यामागे प्रा. चव्हाण यांची प्रेरणाशक्ती, त्याग आणि सेवाभावी वृत्ती यांचे सुप्त पाठबळ होते, हे महत्त्वाचे.

प्रा. चव्हाण यांचा सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात मी पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होतो. पुढे पत्रकारितेत आल्यानंतर त्यांच्या ग्रामीण विकासकार्यातील वाटचालीचा प्रत्यक्ष साक्षीदार बनण्याचा योग आला. या आणि नंतरच्या काळात त्यांच्याशी असलेले स्नेहबंध अधिक दृढ होत गेले आणि प्राध्यापक-विद्यार्थी या आमच्या नात्याचे मैत्रीत रूपांतर झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याशी कोल्हापुरात वारंवार भेटी होत असत. सरांच्या डोक्यात सतत नवनव्या कल्पना येत. अरुण गांधी यांच्या नव्वदीनिमित्त त्यांनी त्यांचा कोल्हापुरात सत्कार घडवून आणला. त्या निमित्त एक पुस्तिका इंग्रजी-मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये तयार करून ती निवडक संस्था व व्यक्तींकडे त्यांनी पाठविली. कोरोनाची लागण होण्यापूर्वी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे कार्यालयात येणे-जाणे सुरू होते. त्यांनीही नव्वदी गाठली होती; पण वयाचा त्यांच्या दैनंदिन कामावर कसलाच परिणाम झालेला नव्हता. भेटी-गाठी, लेखन, पत्रव्यवहार हे सारे अखेरपर्यंत सुरू होते. अगदी रुग्णालयात असतानाही त्यांचे लेखन-वाचन सुरूच होते. त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती. ‘‘मी शंभरी पार करणार,’’ असे ते मोठ्या आत्मविश्वासाने व सहजपणे सांगत; पण दुर्दैवाने ते घडू शकले नाही. विशिष्ट ध्येयवादाने झपाटलेले व अर्धशतकाकडून अधिक काळ ग्रामीण विकासकार्यात रमलेले हे सेवाव्रती व्यक्तिमत्त्व अनपेक्षितपणे काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या चाहत्यांच्या मनात त्यांच्या असंख्य आठवणी दीर्घ काळ राहतीलच; पण त्यांनी उभ्या केलेल्या कार्याच्या रूपाने त्यांच्या स्मृतीही सतत प्रवाही व टिकून राहतील, अशी आशा करू या!

----

दोन पुस्तके येण्याला कारणीभूत

डिसेंबर 2018 च्या पहिल्या आठवड्यात एक भले गृहस्थ साधना कार्यालयात अचानक आले आणि म्हणाले,  ‘‘अरुण गांधी यांनी लिहिलेले Legacy of Love हे पुस्तक मला विशेष आवडले आहे, सोनाली नवांगुळ या तरुणीकडून मी त्याचा अनुवाद करून घेतला आहे. आमच्या संस्थेच्या कार्यकारिणी बैठकीत अशी इच्छा व्यक्त झाली आहे की, ते पुस्तक प्रकाशित करण्यासाठी सर्वप्रथम साधना प्रकाशनाला विचारावे, त्यांनी नकार दिला तर अन्य प्रकाशनाला विचारावे.’’ दहा मिनिटे त्यांच्याशी बोलणे झाले, मूळ पुस्तक व त्याचा अनुवाद यांचा अंदाज पटकन्‌ घेतला. त्याचवेळी हेही कळले की, पुढील महिन्यात अरुण गांधी भारतात येत असून कोल्हापुरात त्यांच्या ‘अवनि’ संस्थेला भेट देणार आहेत. मग काय, लगेच निर्णय घेतला. पुढील तीन आठवड्यांत पुस्तक तयार करायचे आणि अरुण गांधींच्या उपस्थितीत ते प्रकाशित करायचे. त्याप्रमाणे सर्व काही जुळवून आणले आणि 5 जानेवारी 2019 रोजी कोल्हापूर येथे त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या वेळी तुषार गांधी व सुनीलकुमार लवटे हेही उपस्थित होते. ‘वारसा प्रेमाचा’ हेच ते पुस्तक.

यानंतर असे लक्षात आले की, अरुण गांधी यांचेच Gift of Anger हे  पुस्तक Legacy of Love  चे भावंड आहे. त्यामुळे पुढील वर्षी अरुण गांधी पुन्हा कोल्हापुरात आले तेव्हा सोनाली नवांगुळ व अरुण चव्हाण यांना सांगून त्या पुस्तकाच्या अनुवादासाठीही परवानगी मागितली. आणि मग 2 ऑक्टोबर 2020 रोजी त्या पुस्तकाचा सोनालीनेच केलेला मराठी अनुवाद ‘वरदान रागाचे’ या नावाने प्रकाशित केला. सांगायचे काय तर, ही दोन्ही पुस्तके साधना प्रकाशनाकडून येण्याला कारणीभूत ठरले अरुण चव्हाण. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

- संपादक, साधना

Tags: कोल्हापूर ग्रामीण विकास विद्यार्थिप्रिय प्राध्यापक क्षारपड जमीन सुधारणा नवीन पीक पद्धती उपसा सिंचन जमीन सुधारणा व जलसंधारण दशरथ पारेकर अरुण चव्हाण weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके