डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शेवटी प्रत्येक गोष्टीकडे पाहायचा विशिष्ट दृष्टिकोन असतो. लहानपणी मी बेडकाचे मांस खायचो. पुढे बेडकाचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन मी बेडकाचे मांस खाणे बंद केले. पूर्ण शाकाहारी माणसांना आमच्यासारखे लोक खेकडे, कोळंबी, कालवे खातात याचे आश्चर्य वाटत असावे. कदाचित शिसारीही येत असावी. जैन धर्मीयांना तर कांदा-लसूणही नाका-तोंडापुढे नको असतो. कंबोडिया हा तर पूर्णपणे बौद्ध धर्मीय देश आहे, पण इथे खुले आम मांसाहार चालतो. दक्षिण-पूर्वेकडच्या सर्व बौद्ध देशांत बौद्ध भिक्षूही मांसाहार करतात. गौतम बुद्धाच्या उपदेशानुसार बौद्ध भिक्षूंनी प्राण्याची हत्या करू नये, पण गृहस्थाने भिक्षूंना भिक्षेत मांस वाढले तर त्याचे भक्षण करण्यास हरकत नाही. बुद्धाने यज्ञात पशूंची हत्या करू नये, असा नियम केला; पण त्याने पशूंच्या पूर्ण हत्येचा नियम का नाही केला? कारण गौतम बुद्ध कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करत नसत. ते मध्यम मार्ग स्वीकारत असत.

थायलंडमधून कंबोडियात पोचल्यावर थोडासा विचित्र अनुभव येतो. थायलंड हा विकसित देश आहे. श्रीमंत, समृद्ध देश आहे. थायलंडच्या मानाने कंबोडिया कंगाल,  फारच गरीब देश आहे. हा फरक लगेच जाणवतो. थायलंडची राजधानी बँकॉक हे व्यापारी शहर आहे. ते दिवसरात्र जागेच असते. ते मौजमजा करणारे रंगेल शहर आहे. त्याच्या तुलनेत कंबोडियातले सियाम रिप शहर सुस्त आणि मिणमिणते आहे. तिन्हीसांजेला मंद प्रकाशातील या काहीशा अंधाऱ्या शहरात प्रवेश करताना मन अचानक उदास होते. प्रकाशात एका प्रकारची ऊर्जा असते. उत्साह असतो. अंधारात अनुत्साह असतो. निराशा, वैफल्य यांच्या नकारात्मक छाया असतात.

सियाम रिपमध्ये आम्ही वास्तव्य करीत असलेले हिलॉक रिसोर्ट हे तारांकित हॉटेल होते, पण तिथल्या रिसेप्शनकडेही काळोखी वातावरण होते. दिवे मंदावलेले होते. कसलाच थाटमाट नव्हता. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे अंधार पडला होता. हॉटेलमधून बाहेर पडावेसे वाटले नाही. एकूण कंबोडियाविषयी प्रथमदर्शनी आमचे मन सकारात्मक झाले नाही.

सियाम रिप शहरात तसे पाहण्यासारखे काहीही नाही, तरीही कंबोडियाला भेट देणारे 60 लाख पर्यटक सियाम रिप शहरात राहणे पसंत करतात; कारण अंगकोरवटमधली जगप्रसिद्ध देवळे सियाम रिप शहरापासून जवळच आहेत.

ख्मेर वंशाच्या राजाच्या राजवटीत इसवी सनच्या नवव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत 600 वर्षांत ही अंगकोरवटची देवळे बांधली गेली. योगायोगाने भारतात खजुराहोची देवळे बांधण्याचा काळ हाच होता. या काळात ख्मेर राजांची युद्धे लगतच्या थायलंड व ब्रह्मदेशच्या राजांशी व्हायची आणि युद्धांतील विजयानंतर देवळे बांधून विजय साजरा करणे ही प्रथा आहे. ज्या काळात लंडन शहरात फक्त 50,000 लोक राहत होते, त्या काळात अंगकोरवट आणि त्याच्या सभोवतालच्या भागांत 10 लाख लोकसंख्या होती.

नागरिकांची घरे आणि राजांचे राजवाडे लाकडाचे असायचे, पण देवांची देवळे मात्र दगडांची बांधली जायची. त्यामुळे कालांतराने पुरातन घरे व राजवाडे मोडून पडले किंवा आगीत भस्मसात झाले. पण पाषाण किंवा सॅण्डस्टोन-भक्कम वाळूच्या दगडांत बांधलेली देवळे शाबूत राहिली.

इतिहासकाळात राजा देवळे का बांधत असत, याला धार्मिक कारणापेक्षा मानसशास्त्रीय कारणे आहेत. राजाचे अहंकारवर्धन किंवा प्रसिद्धीची हाव, हे वैयक्तिक किंवा मानसशास्त्रीय कारण देवळाच्या प्रचंड व शोभिवंत वास्तू बांधण्यामागे असे. शत्रू देवळे का फोडत असे? यात परधर्मीय शत्रूसमवेत स्वधर्मीय शत्रूचाही समावेश होतो. अर्थात त्यामागे धार्मिक कारण नसे, हे उघड आहे. पराजित राजाच्या अहंकाराचे हरण करणे, हे देवळे फोडण्यामागचे प्रमुख कारण होते.

इतिहासकाळात राजांनी आपली संपत्ती लोकोपयोगी कामांत गुंतवली नाही. आपल्या अहंकारवर्धनासाठी देवळांच्या अवाढव्य वास्तू बांधल्या. त्यामुळे वास्तुशिल्पाला प्रोत्साहन मिळाले. मजुरांना मजुरी मिळाली. पण शेती, व्यापार, उद्योग, रस्तेबांधणी, पाटबंधारे या क्षेत्रांत राजांनी गुंतवणूक केली नाही. खजुराहो, कोणार्क, अंगकोरवट येथील देवळे, ताजमहालसारख्या वास्तू भान विसरून पाहताना आपण हे कटू समाजवास्तव विसरता कामा नये.

थायलंडच्या बँकॉक शहरात अनेक बौद्ध मंदिरे आहेत. त्यांचा थाट शाही, राजेशाही, बादशाही आहे. ही देवळे सुवर्णवर्खी रंगात मढवलेली, रंगीत, भरजरी, संगमरवरी देवळे आहेत. या देवळांतल्या बुद्धाचे रूप राजस, राजबिंडे आहे. याउलट अंगकोरवट येथील बौद्ध मंदिरातला बुद्ध! तो साधा आहे. संन्यस्त, गरीब आहे. अंगकोरवटमधली देवळे आदिवासी, वनवासी रुपांत आहेत. काही देवळे पडकी आहेत. काही भग्न आहेत. थायलंडमधल्या नागरी बौद्ध मंदिराची आठवण केली, तर ह्या अंगकोरवटमधल्या देवळांचे रूप आणि स्वरूप पूर्णपणे अनागरी आहे.

बँकॉक आणि अंगकोरवट येथील दोन्हीकडील देवळांत हिंदू देवता दृष्टोत्पत्तीस पडतात. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून दक्षिण-पूर्व आशियात हिंदू व्यापारी शेकडो वर्षांपूर्वी आले, तेव्हा त्यांनी आपला धर्मही इथे रुजवला. पुढे बौद्ध भिक्षूही इथे पोचले. हे देश बौद्ध बनले. अंगकोरवटमधल्या देवळात हिंदू आणि बौद्ध देवता, रामायण व महाभारत ही भारतीय महाकाव्ये आणि बौद्ध जातककथा यांचा संगम, यांचे फ्युजन पाहायला मिळते. अंगकोरवटमधील शिल्पांचा बारकाईने अभ्यास केल्यास एक राजकीय वास्तव लक्षात येते. ते हे की, येथील राजवटीने हिंदू धर्माकडून उत्तरोत्तर बौद्ध धर्माला राजाश्रय दिला आहे.

अंगकोरवटमधले प्रमुख देऊळ तीन मजली आहे. पण हे तिन्ही मजले एकात एक अशा रीतीने सामावले आहेत की, ही वास्तू एकजिनसी वाटते. या मंदिराचा आवाका आणि भव्यता आश्चर्यजनक आहे. या मंदिराची वास्तू वास्तुशिल्पज्ञाच्या आखणीनुसार पूर्णत्वास आली नसावी, असा अभ्यासकांचा कयास आहे. ती मूळ आखणीप्रमाणे पूर्ण झाली असती तर याहून भव्य-दिव्य झाली असती! ही वास्तू बांधण्यास तीन लाख मजूर आणि 6000 हत्ती सुमारे 30 वर्षे राबत होते. यावरून या मंदिराच्या भव्यतेचा अंदाज येतो. अंगकोरवटचे हे मंदिर म्हणजे अभियांत्रिकीचा चमत्कार आणि वास्तुशिल्पातला अतुलनीय दागिना आहे.

अंगकोरवटच्या या देवळाच्या चारी बाजूला पाण्याचा कालवा आहे. पाणी व जमीन यांच्या संगमातून आणि संतुलनातून स्थापत्यकारांनी सौंदर्यनिर्मिती केली आहे. आकाश किंवा अवकाश हे पंचमहाभूतांपैकी तिसरे महत्त्वाचे महाभूत आहे. स्थापत्यकारांनी अंगकोरवटचे मंदिर बंदिस्त किंवा कोंदट केलेले नाही. त्यांनी भिंती-भिंतीमध्ये आणि खांबा-खांबामध्ये पुरेसा अवकाश ठेवलेला आहे. त्यामुळे वारा आणि प्रकाश ही पंचमहाभूतांपैकी दोन महाभूते खेळती राहतील, अशी योजना केली आहे.

बाराव्या शतकात बांधलेले हे अंगकोरवटचे मंदिर हे महाविष्णूचे असून त्यात सव्वातीन मीटर उंचीची महाविष्णूची अष्टभुजा मूर्ती आहे. पण या मंदिराचे प्रवेशद्वार हिंदू मंदिराच्या प्रथेप्रमाणे पूर्व दिशेला नाही, ते पश्चिमाभिमुख आहे. त्यामुळे अभ्यासक गोंधळून गेले आहेत. मुळात अंगकोरवटची ही वास्तू मंदिर म्हणून बांधली नसावी; तर राजा सूर्यवर्धन याने आपल्या जीवनकाळात आपल्या मृत्यूनंतर हे आपले स्मृतिस्थळ व्हावे म्हणून बांधली असावी, असे त्यांना वाटते. राजा सूर्यवर्धन यांना परदेशात मृत्यू आल्यामुळे त्यांचे पार्थिव अंगकोरवट येथे आणणे शक्य झाले नाही, त्यामुळे ही वास्तू राजाचे स्मृतिस्थळ करण्याची योजना बारगळली आणि या वास्तूचे मंदिरात रूपांतर करण्यात आले, असा अभ्यासकांचा कयास आहे.

अंगकोरवटमधल्या या वास्तूची संकल्पना हिंदू देव शिवाचे वास्तव्य असलेल्या मेरू पर्वतावर आधारित आहे. मंदिराच्या भिंतीवर महाभारतातील युद्धाच्या प्रसंगांची शिल्पे आहेत. विशेषतः शरशय्येवर पहुडलेल्या भीष्म पितामहाचे शिल्प फार प्रत्ययकारी आहे. रामायणातील कथाप्रसंगांवरीलही शिल्पांनी या मंदिराच्या भिंती व्यापल्या आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर्स दूर असलेल्या कंबोडियात एका सहस्रकापूर्वी पडलेला हा भारतीय महाकाव्यांचा प्रभाव पाहून मन उंचावते.

एका भिंतीवर समुद्रमंथनाचे शिल्प सर्व बारकाव्यांसह कोरले आहे. 88 असुरांनी वासुकी नागाचे तोंड पकडले आहे, तर 92 देवांनी त्याचे शेपूट धरले आहे. नागाने मेरू पर्वत गुंडाळला आहे. असुर आणि देव समुद्र घुसळत आहेत.

अंगकोरवटच्या देवळात सुमारे 2000 अप्सरांची शिल्पे आहेत. त्यांच्या वेषभूषा व केशभूषा वेगवेगळ्या आहेत. अप्सरांनी 37 वेगवेगळ्या केशभूषा केलेल्या आहेत, असे अभ्यासकांनी शोधून काढले आहे. 

अंगकोरवटनंतर अंगकोर थोमचे मंदिर महत्त्वाचे आहे. तेथे जाताना तिथला पूल व प्रवेशद्वार पुलाच्या कठड्यावर असलेल्या बैठ्या दगडी पुतळ्यामुळे आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या दगडी द्वारपालांमुळे आपले लक्ष वेधून घेतात. अंगकोर थोमच्या मंदिराला 54 मनोरे असून या मंदिरात 216 भव्य पुतळे आहेत. शिव, विष्णू, बुद्ध आणि राजा यांचे हे पुतळे प्रत्येक दिशेकडे तोंड करून आसनस्थ आहेत. अंगकोरवटच्या मंदिराप्रमाणेच अंगकोर थोमचे मंदिरही तीन मजली आहे. या मंदिराच्या भिंतीवर ख्मेर राजा व आक्रमकांशी झालेल्या युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत.

अंगकोर थोमच्या देवळाच्या प्राकारातच ख्मेर राजाचा लाकडी राजवाडा होता. तो आगीत भस्मसात झाल्यामुळे आज अस्तित्वात नाही. इथे टेरेस ऑफ लेपर किंग हे स्थळ आहे. तिथे लेपर किंगचा छोटा पुतळा आहे. ख्मेर राजाच्या वंशात एखाद्या राजाला कुष्ठरोग झाला असावा, त्याचा हा पुतळा असावा किंवा मृत्युदेवता यमाचा हा पुतळा असावा, असे अभ्यासकांना वाटते. तिथून जवळच टेरेस ऑफ एलिफन्ट्‌स म्हणजे रांगेने उभ्या हत्तींची शिल्पे असलेली भिंत आहे. या भिंतीवर बसून सैनिकांचे संचलन किंवा अप्सरांचे नाच राजपरिवार पाहत असावा, कारण भिंतीवरची जागा ऐसपैस आहे.

टॉम्ब रेडर्स या प्रसिद्ध हॉलीवुडच्या सिनेमाचे शूटिंग जिथे झाले, ते ता प्रोहूम येथील देऊळ पाहणे हा वेगळा अनुभव आहे. कारण तेथील देवळांच्या भिंतींना वृक्षांच्या मुळांनी वेढले आहे. एके काळी जंगलातील वृक्ष कापून निर्जन स्थळी हे देऊळ बांधले असावे. खरे म्हणजे बौद्ध भिक्षूंसाठी एकांतात शांतपणे ध्यानधारणा करण्यासाठी बांधलेला तो विहार होता. मग शेकडो वर्षे या विहाराकडे किंवा देवळाकडे दुर्लक्ष झाले. भिक्षूंचे येणे-जाणे बंद झाले. तेव्हा निसर्गाने ताबा घेतला. देवळाच्या आवारातच वृक्ष प्रचंड वाढले. त्यांच्या मुळांनी देवळांच्या भिंतींना वेढा घातला. वृक्षांच्या फांद्या भग्न देवळाच्या भिंतींवर पसरल्या. वृक्षांच्या मुळांनी आणि फांद्यांनी त्या पुरातन, पडक्या देवळाला सेंद्रिय रूप दिले. त्याला एक गूढ, गहन आयाम दिला.

आम्ही ता प्रोहूमच्या देवळात पोचलो तेव्हा उन्हे उतरत होती. तिन्हीसांज होत होती. सूर्यास्त झाला तरी तिथून माझे पाय हलले नाहीत. मी एकटाच होतो. एकाकी होतो. सूर्यास्तानंतरच्या प्रकाशमिश्रित अंधारात किंवा अंधारमिश्रित प्रकाशात तिथे मी गहन-गूढ परम शांतीचा अनुभव घेतला.

हल्लीच मी जर्मन कवी रिल्केची कविता वाचत होतो. रिल्के आपल्या कवितेतून अशाच एकाकीपणाचा शोध घेत होता. त्याला आत्ममग्नता हवी होती. अलिप्तता हवी होती. एकांतातली शांती हवी होती. ती इथे होती. ता प्रोहूमच्या देवळाच्या अवकाशात मला गवसली होती.

गौतम बुद्धही अशाच शांतीच्या शोधात होता. बुद्धाचे तत्त्वज्ञान शेवटी शून्यवादाकडे पोचते. हिंदू तत्त्वज्ञान पूर्णत्वाचा ध्यास घेते.

ॐ पूर्णम्‌ इदम्‌

पूर्णम्‌ अदः

पूर्णात्‌ पूर्णम्‌ उदच्यते

पूर्णस्य पूर्णम्‌ आदाय

पूर्णम्‌ एव अवशिष्यते

हे पूर्ण आहे. ते पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण निर्माण होते. पूर्णातून पूर्ण काढल्यास पूर्णच राहते.

बुद्धाला असे पूर्ण कलशाचे पूर्णत्व नको होते. त्याला रित्या घड्याची रिक्तता हवी होती. बौद्ध तत्त्वज्ञान रिक्ततेचा शोध घेते. त्याला शून्यत्वाचा शोध आहे. त्याच्या मते -

हे सगळे शून्य आहे. शून्यातून शून्य निर्माण होते. शून्यातून शून्य काढल्यास शून्यच बाकी राहते.

अंतरिक्षात जी अपरंपार, सर्वदूर रिक्तता आहे त्याचे प्रतिबिंब बुद्धाने आपल्या मनात पाहिले होते, तर ता प्रोहूमचे देऊळ हा त्या रिक्ततेचा, शून्यतेचा दृश्यावतार होता.

अंधार वाढत गेला तेव्हा मनात भीतीची लाट पसरली. वाटले- ही वृक्षांची मुळे व फांद्या आपल्यालाही वेढून टाकतील आणि आपलेही पाषाणाचे एक शिल्प होऊन जाईल. पण क्षणभरच! दुसऱ्याच क्षणी, त्या भीतीचे रूपांतर सुखद शांतीत झाले. सगळीकडे निवळशंख, आरस्पानी शांती होती. त्या शांतीला सखोल गडद निळा रंग होता. सगळीकडे काळोख होता आणि वस्त्रगाळ रिक्तता होती. जगाचे भान नव्हते. मनसोक्त एकांत होता. मी माझ्या देश-विदेशांतल्या प्रवासात अनेक देवळे, मशिदी, कॅथेड्रल्स पाहिल्या; पण कंबोडियातील ता प्रोहूमचे देऊळ पाहणे हा मन हेलावून टाकणारा अनुभव होता.

मला आग्रयाच्या ताजमहालापेक्षा गोलघुमट अधिक आवडतो. ताजमहालामध्ये केवळ बाह्य सौंदर्य आहे. ते गोलघुमटापेक्षा अधिक सुंदर असेलही पण गोलघुमटाचे आंतरिक गूढ-गहन सौंदर्य ताजहालापेक्षा अधिक सरस आहे. ता प्रोहूमच्या देवळाचे तसेच आहे. ते मायावी देऊळ आहे. त्याचे ‘चेटुक’  वेगळेच आहे. पाहता-पाहता ते तुमच्या अंतरंगात भिनून जाते.

अंगकोरवटमध्ये स्त्रसंगा नावाचे एक तळे आहे. तिथे राजपरिवार स्नानासाठी येत असे. तळ्याच्या किनाऱ्यावर काही सुबक शिल्पे आहेत. याशिवाय अंगकोरवट गावांत अनेक छोटी-मोठी देवळे आहेत. काही बौद्ध विहार आहेत. ग्रंथालय आहेत. गरुडधारी विष्णूचे छोटे देऊळ आहे. ब्रह्मा-विष्णू-शंकराचे देऊळ आहे. अंगकोरवट हा देवळांचा गाव आहे.

अंगकोरवटच्या देवळात खजुराहो, कोणार्कच्या देवळांप्रमाणे कामक्रीडांची शिल्पे नाहीत. खजुराहो, कोणार्क येथील देवळांत हिंदू धर्मातील तांत्रिक पंथ व शाक्त धर्माच्या प्रभावामुळे ही शिल्पे तिथल्या देवळांच्या भिंतीवर कोरली गेली. शाक्त धर्माचा किंवा तांत्रिक पंथाचा प्रभाव कंबोडियापर्यंत पोचला नसावा, हेच कारण असे एखादेही शिल्प इथल्या देवळांच्या भिंतीवर नसण्यामागे असावे.

सियाम रिप शहरात आम्ही तेथील एका हॉटेलात स्थानिक लोकनृत्याचा कार्यक्रम पाहिला. लोकसंगीताच्या साथीवर कंबोडियन तरुणींनी अप्सरांचा नाच सादर केला. या नाचाला हिंदू पुराणातील कथेची पार्श्वभूमी होती. मधेच मारुतीचे पात्रही येऊन गेले. याच कार्यक्रमात बोकाटोर या स्थानिक मार्शल आटर्‌सची प्रात्यक्षिके झाली. या युद्धसदृश खेळाला सुमारे 1000 वर्षांची परंपरा आहे.

या कार्यक्रमानंतर आम्ही खास कंबोडियन पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. कंबोडियात तांदळाचे भरपूर उत्पादन होते. त्यामुळे भात हा त्यांच्या जेवणाचा प्रमुख घटक असतो. किंबहुना, कंबोडियन भाषेत ‘खाणे’ या क्रियापदाचा अर्थच मुळी ‘भात खाणे’ असा होतो, एवढा भात त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. सगळीकडे तळी असल्यामुळे त्यांच्या जेवणात ताजे मासे असतात. नारळ व मिरची घालून केलेला, केळीच्या पानात उकडलेल्या माशांचा आमोक हा पदार्थ इथे लोकप्रिय आहे. खेकडे व कोळंबी इथल्या लोकांना फार आवडतात. एवढेच काय- विंचू, साप, कीटक, मुंग्या- जे-जे जिवंत प्राणी, पक्षी, कीटक-आहेत ते ते कंबोडियन लोक आवडीने खातात. आम्ही दुधी भोपळ्याचे सूप, रोस्टेड चिकन, भाजलेले मासे आणि नारळाचे पुडिंग असे जेवण मागवले. जेवणाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आणि रंगांचे सॉस आमच्या टेबलावर आले. दक्षिण-पूर्व देशांतील सॉसेस फार रुचकर असतात. विशेषतः माशांपासून करण्यात येणारे फिश सॉस फार स्वादिष्ट असते. आम्ही टेबलावर ठेवलेल्या एका लाल सॉसबद्दल चौकशी केली तेव्हा ‘ते लाल मुंग्यांचे सॉस आहे. ते फार छान आहे. तुम्ही ते घ्याच’ अशी त्यांनी शिफारस केली. पण ‘मुंग्यांचे सॉस’ हे शब्द कानी पडताच आम्ही दचकलो. कंबोडियन जेवणात विंचू, साप, कीटक यांचा समावेश असतो, हे ऐकून आम्ही आधीच सावध झालो होतो. त्यामुळे त्यानंतर आमची कंबोडियन जेवणावरची वासनाच उडून गेली.

शेवटी प्रत्येक गोष्टीकडे पाहायचा विशिष्ट दृष्टिकोन असतो. लहानपणी मी बेडकाचे मांस खायचो. पुढे बेडकाचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन मी बेडकाचे मांस खाणे बंद केले. पूर्ण शाकाहारी माणसांना आमच्यासारखे लोक खेकडे, कोळंबी, कालवे खातात याचे आश्चर्य वाटत असावे. कदाचित शिसारीही येत असावी. जैन धर्मीयांना तर कांदा-लसूणही नाका-तोंडापुढे नको असतो. 

कंबोडिया हा तर पूर्णपणे बौद्ध धर्मीय देश आहे, पण इथे खुले आम मांसाहार चालतो. दक्षिण-पूर्वेकडच्या सर्व बौद्ध देशांत बौद्ध भिक्षूही मांसाहार करतात. गौतम बुद्धाच्या उपदेशानुसार बौद्ध भिक्षूंनी प्राण्याची हत्या करू नये, पण गृहस्थाने भिक्षूंना भिक्षेत मांस वाढले तर त्याचे भक्षण करण्यास हरकत नाही.

बुद्धाने यज्ञात पशूंची हत्या करू नये, असा नियम केला; पण त्याने पशूंच्या पूर्ण हत्येचा नियम का नाही केला? कारण गौतम बुद्ध कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करत नसत. ते मध्यम मार्ग स्वीकारत असत. पशूंच्या हत्येला पूर्ण बंदी घातल्यास निसर्गात असमतोल निर्माण होईल आणि समाजातील हजारो लोक रोजगाराला मुकतील, हे बुद्धाला ठाऊक होते.

थायलंड, कंबोडिया ह्या आग्नेयेकडील देशांतील बौद्ध लोक बौद्ध भिक्षूंना मिठाई, मांसाहारी जेवण यांची भिक्षा देतात. त्यांच्या सेवनाने बौद्ध भिक्षूंत लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कारण हे भिक्षू केवळ ध्यानधारणा व हलकीफुलकी कामे करत असल्यामुळे त्यांना विशेष व्यायाम घडत नाही. यामुळे त्यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग ह्या रोगांनी त्यांना ग्रासले आहे. बौद्ध भिक्षूंच्या तांड्यात सगळेच गलेलठ्ठ भिक्षू दिसू लागले आहेत. सडपातळ बौद्ध भिक्षू दिसणे दुर्मिळ झाले आहे.

सियाम रिप शहरात पब स्ट्रीट आहे. या शहरातील हा अपवादात्मक असा माहोल आहे. इथले वातावरण युरोपमधल्या कुठल्याही शहरासारखे झगमगते आहे. विशेषतः दिवेलागणीला इथे दिव्यांचा लखलखाट असतो. पब्स, ताव्हेर्न्स, रेस्टॉरंट्‌स उघडलेली असतात. मद्यपींना आणि खवय्यांना धुंद संगीताची साथ असते. पब स्ट्रीटवर कंबोडियन, थाई, व्हिएतनामी, चायनीज, इंडियन, जपानीज, फ्रेंच, काँटिनेंटल असे सर्व प्रकारचे जेवण मिळते.

सियाम रिप शहरापासून जवळच टोनले सॅप नावाचे तळे आहे. या विस्तीर्ण तळ्याचे क्षेत्रफळ 2700 चौरस किलोमीटर्स आहे. निळ्या, नितळ पाण्याचे हे तळे सर्वदूर पसरलेले आहे. या तळ्यात तरंगणारी खेडी आहेत. ह्या खेड्यांत खांबांवर घरे बांधून लोक राहतात. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. तळ्याच्या काठावर ते शेतीही करतात. तळ्यात तरंगणारी शाळा, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, प्रार्थना मंदिर अशी सर्व व्यवस्था आहे.

तळ्यात होडीतून जलसफर केल्यावर आम्ही तळ्याच्या काठावर ताजे फडफडीत मासे चुलीतील इंगळ्यावर भाजले होते, त्यांचा रुचकर फिश सॉस व सॅलेडबरोबर आस्वाद घेतला.

कंबोडियन घरांपुढे आपल्या तुळशी वृंदावनाप्रमाणे एक छोटी घुमटी असते. त्याला ते स्पिरिट हावस म्हणतात. भुताखेतांनी घरात प्रवेश करू नये, म्हणून ही देवाची घुमटी त्यांनी घराबाहेर बांधलेली असते.

कंबोडियन सर्कसदेखील फार लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. पण ती पाहण्याची संधी आम्हाला मिळाली नाही.

कंबोडियात आम्ही फूट मसाज, हेड मसाज, शोल्डर मसाज, फुल बॉडी मसाज या प्रकारे दर दिवशी वेगवेगळे मसाज करून घेतले. हे मसाज आग्नेयेकडील देशांचे वैशिष्ट्य आहे. हळुवार हातांनी गरम खोबरेल तेल अंगाला लावत हा मसाज करण्यात इथल्या कंबोडियन तरुणी पटाईत आहेत. हा मसाज केल्यावर शरीरातला सगळा ताण निघून जातो आणि शरीर कापसासारखे हलके होऊन जाते.

अमेरिकेविरुद्धच्या युद्धात व्हिएतनामने कंबोडियातून उत्तर व्हिएतनाममध्ये व तिथून दक्षिण व्हिएतनाममधल्या आपल्या सैनिकांना रसद पुरवण्यास सुरवात केली. या रस्त्याला हो चि मिन्ह ट्रेल म्हणू लागले. ही रसद तोडण्यासाठी अमेरिकेने कंबोडियावर बॉम्बफेक केली. त्यात कंबोडियाचे हजारो नागरिक बळी पडले.

पॉल पोट हा मार्क्सिस्ट हुकूमशहा कंबोडियाच्या राज्यावर 1975 ते 1979 ह्या काळात आला. त्याने आपल्या जुलमी राजवटीत सुमारे 20 लाख नागरिकांचे हत्याकांड केले.

सध्या कंबोडियात राजेशाही आहे. तिथे सरकारने लोकांच्या विकासाकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे कंबोडियाचे औद्योगिकीकरण झाले नाही. शेती, मासेमारी, पर्यटन व वस्त्रोद्योग हेच देशाचे प्रमुख व्यवसाय आहेत. लाकूड, तंबाखू व सोने यांची निर्यात करून कंबोडिया परकीय चलन मिळवतो. देशाची लोकसंख्या दीड कोटी आहे. देश अजूनही गरीब व कंगाल आहे.

शेजारच्या भांडवलशाही थायलंडचा किंवा आर्थिक धोरण खुले केलेल्या साम्यवादी व्हिएतनामचा आदर्श कंबोडियाने गिरवला नाही. अंगकोरवटमधल्या देवळांप्रमाणे जंगल-वृक्षांनी वेढलेला कंबोडिया हा पुरातन, भग्न देश आहे. कंगाल कंबोडियाची करुण कहाणी आठवून मन उदास होते.

Tags: अंगकोरवट पर्यटन व वस्त्रोद्योग मासेमारी शेती औद्योगिकीकरण पॉल पोट कंबोडिया थायलंड देश विदेश weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके