डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ध्येयनिष्ठ व आशादायी : विलेपार्ल्याच्या आशा गांधी

आशाने कुटुंब, चूल, मूल, नोकरी व सामाजिक काम यांची सुरेल सांगड घातली. विस्तारित कुटुंबातील अन्य 13 मुलांच्या शिक्षणासाठी आपलं घर खुलं ठेवतानाच वेळप्रसंगी हातातल्या सोन्याच्या बांगड्या व मंगळसूत्र मोडून निष्कांचन योग साधला. स्वत:च्या पसंतीने रेशमी काय साधी साडी खरेदीही न करणाऱ्या आशाला ध्यास होता तो तळागाळातील मुलांच्या जीवनात शिक्षणाचा दिवा कसा लावता येईल याचा! याच प्रेरणेतून तिने पार्ल्यातील रात्रशाळा उभारली.

आशा गांधी म्हणजे पूर्वाश्रमीची किशोरी पुरंदरे. नाशिकच्या पुरुषोत्तम विद्यालयात असतानाच ती राष्ट्र सेवादलाच्या शाखेत जाऊ लागली व 1942च्या लढ्यात सहभागी झाली. मॅट्रिकनंतर 1949-51 दरम्यान बार्शीतून ही राष्ट्र सेवादलाची सर्ववेळ कार्यकर्ता, भंगीवाड्यातून व कलापथकातून लोकशिक्षणाचे धडे गिरवत होती. कलापथकातील सहभागामुळे किशोरीला कांदिवलीच्या शारीरिक शिक्षण संस्थेतून सीपीएड करताना रिदमिक शिक्षिका म्हणूनही अनुभव मिळाला.

सेवादलाच्या 1950 मे च्या प्रांतिक शिबिरात साने गुरुजींशी बोलताना आम्हा दोघांचा झालेला परिचय पुढील दोन वर्षांत सदानंद वर्दे यांनी माझ्यासाठी किशोरीला लग्नाचा प्रस्ताव मांडण्याइतपत बहरला. पहिला चक्क नकार! पण वडील कुणाशीही गाठ बांधतील या भीतीने आणि माझ्या भावूक पत्राने शेवटी होकार मिळाला. एस.एम. जोशी आणि भाऊ रानडे यांच्या साक्षीने आम्ही रजिस्टर लग्न केले व किशोरी माझी आशा बनली. 1946 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या ‘जनेऊ तोडो व जाती मोडो’ या संदेशाचा प्रभाव, सेवादलाची समाजवादी विचारसरणी यामुळे किशोरीसह पुरंदरे कुटुंबातील तीन युवतींनी त्या काळी आंतरजातीय विवाह केले. मी, पन्नालाल सुराणा व दशरथ पाटील साडू झालो.

पुढे एकमेकांच्या साथीने आम्ही दंपती बी.ए. बी.एड. झालो. आशाने 22 दिवसांच्या स्मिताला मांडीवर दूध पाजीत पेपर्स लिहिले आणि एस.एन.डी.टी.चे इतिहासाचे सुवर्णपदक पटकावले! खारच्या बी.पी.एम. शाळेत शिक्षिका, पर्यवेक्षिका आणि मुख्याध्यापिका अशा विविध भूमिकांतून आशा गांधींनी 1952 ते 1989 या तब्बल 34 वर्षांत अनेक शालेय प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चौफेर फुलवले.

आशाने कुटुंब, चूल, मूल, नोकरी व सामाजिक काम यांची सुरेल सांगड घातली. विस्तारित कुटुंबातील अन्य 13 मुलांच्या शिक्षणासाठी आपलं घर खुलं ठेवतानाच वेळप्रसंगी हातातल्या सोन्याच्या बांगड्या व मंगळसूत्र मोडून निष्कांचन योग साधला. स्वत:च्या पसंतीने रेशमी काय साधी साडी खरेदीही न करणाऱ्या आशाला ध्यास होता तो तळागाळातील मुलांच्या जीवनात शिक्षणाचा दिवा कसा लावता येईल याचा! याच प्रेरणेतून तिने पार्ल्यातील रात्रशाळा उभारली. महापालिकांच्या शाळांमध्ये पूरक शिक्षण व गुणवत्तावाढीसाठी धडपडली. झोपडपट्टीमध्ये प्रौढ साक्षरता वर्ग चालू केले. 13 स्त्री संघटनांची सामूहिक महिला आघाडी तयार केली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो वा निवडणुका किंवा शहर सफाई मोहीम प्रत्येक मोर्च्यावर ती सक्रीय राहिली. त्यामुळे राष्ट्र सेवादल, आपलं घर, नर्मदा बचाव आंदोलन, साधना साप्ताहिक इत्यादी अनेक संस्था व संघटनांना मिळून आतापर्यंत 90 लाख रुपयांचे अर्घ्य वाटू शकलो.

आमच्या 69 वर्षांच्या सहजीवनात ना विसंवाद ना परस्पर संघर्ष! माझ्या 98 वर्षांच्या जीवनाची ‘आशा’ बनलेल्या आशा गांधी यांनी 15 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री वाशीच्या महात्मा गांधी इस्पितळातून 90 व्या वर्षी अखेरचा निरोप घेत आपल्या ध्येयनिष्ठ वाटचालीची सांगता केली.
 

Tags: किशोरी पुरंदरे ​​​​​​​आशा गांधी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके