डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भूतान हा ऐहिक व सांस्कृतिक दृष्टीने सुखी आणि समाधानी देश आहे. तृप्त, संतुष्ट देश आहे. सुख आणि समाधान ह्या दोन्हींमध्ये बौद्ध संकल्पना फरक करते. सुख ही ऐहिक संकल्पना आहे, तर समाधान ही मानसिक संकल्पना आहे. भूतानचे वैशिष्ट्य हे की, भूतानी माणूस सुखी आहे तसा समाधानीही आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मातीतून भूतानमध्ये एक नवा आर्थिक विचार अंकुरला आहे. भूतान हा जगातला एकमेव देश आहे, जो ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे एकूण संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्न मोजत नाही, तो ग्रोस नॅशनल हॅपिनेस- संपूर्ण राष्ट्रीय समाधान मोजतो.

माझ्या आठवणीतील भूतान हे एका देशाचे नाव नाही, भूतान हा एक अनुभवही नाही; भूतान हे अनुभूतीचे संचित आहे. दर दिवशी आपण वेगवेगळे अनुभव घेतो, पण दुधाचे फर्मेन्टेशन होऊन लोणी व्हावे, तसे काही अनुभव स्मृतिकोषात जाऊन त्याच्या अनुभूती होतात.

जो आपण जमवतो, तो साठा. उदा- पुस्तके, स्टॅम्प किंवा पैसा. जे आपल्या नकळत आपल्या सुप्त मनात साठत जाते ते संचित.

भूतानच्या प्रवासाचे अनुभव अनुभूतीचे संचित होऊन माझ्या स्मृतिकोषाच्या तळाशी आहेत. निसर्गाचे कोवळे, ताजे, टवटवीत, मऊ, मुलायम, मखमली रूप पाहावे ते भूतानमध्ये! निसर्गाचे सारे कौमार्य, सारी व्हर्जिनिटी त्याच्या आद्य-आदिम रूपात भूतानमध्ये पाहायला मिळते. भूतानच्या पारो विमानतळावर ड्रक एअरचे विमान उतरत होते. दुपारची वेळ होती. मी विमानाच्या खिडकीतून खाली पाहिले. दुपारच्या कर्पूरी उन्हात भूतानचा गार हिरवा निसर्ग मांजरासारखा आपले अंग चाटत बसला होता. तीन रंग... मळभाचा निळा रंग, उन्हाचा पिवळा रंग आणि शेताचा हिरवा रंग.

डोंगराच्या कडेवर पायऱ्या-पायऱ्यांनी केलेली ही शेतांची रांगोळी आणि त्यामध्ये विखुरलेले हे घरांचे ठिपके अन्‌ मधेच एखादी बुद्धविहाराची घुमटी.

ड्रक एअरचे छोटे विमान पारो विमानतळावर पक्ष्यासारखे अलगद उतरले. भूतानच्या विमानतळाची छोटी, सुबक, सुरेख वास्तू. जगात कुठल्याच एअरपोर्टची एवढी सुंदर वास्तू... मी याआधी पाहिली नव्हती. सभोवतालच्या डोंगरांचे सौंदर्य ती वास्तू बिघडवत नव्हती, उलट त्या निसर्गातूनच उगवल्याप्रमाणे ती तिथे उभी होती.

पारो हे छोटेसे शहर पाचू नदीच्या काठावर वसले आहे. नदीचे निळे, नितळ, निवळ, आरस्पानी पाणी खळाळत वाहत होते. नदीवरचा छोटा साकव पार करून आम्ही पलीकडे आलो. सगळीकडे नि:शब्द मोनेळ. कुठे आवाज नाही. नदीच्या काठावर अनामिक पक्षी बसले होते. तेसुद्धा कसलाच चिवचिवाट करत नव्हते. केवळ नदीच्या पाण्याचा मंदसा खळखळाट तो काय ऐकू येत होता.

छोट्याशा जीपमधून आम्ही थिंपूला चाललो आहोत. वसंत ऋतूचे नुकतेच आगमन झाले असावे. वाटेवर जांभळी, गुलाबी, पिवळी रानफुले फुलली आहेत. दूरवर गोव्यातल्या अनंताच्या झाडासारख्या श्वेतधवल फुलांनी गच्च फुललेले एक छोटेसे झाड आहे.  

तिन्हीसांजेची वेळ झाली आहे. डोंगर-उतारावरील घराघरांत मिणमिणता उजेड दिसतो आहे. हे पाहा- थिंपू शहर जवळ आले आहे. आता सगळीकडे गच्च काळोखच आहे. थिंपू शहराचे दिवे लुकलुकत आहेत. थिंपू ही भूतानची राजधानी. चोंग्येल लाम नदीच्या काठावरचे हे शहर. चारी बाजूंना डोंगर आणि मधे नदी, ह्याच्या संगतीने थिंपू शहर वसले आहे.

भूतानमधील घरांचे एक वैशिष्ट्य आहे. ह्या घरांनी आपले पुरातन वास्तुशिल्प सांभाळून ठेवले आहे. भूतानी माणूस घर बांधत नाही; तो लाकडात घर कोरून काढतो. ही लाकडात कोरून काढलेली शोभिवंत घरे- त्यांची रंगीत छपरे, त्यांचे लाल-पिवळे-हिरवे रंग, छतांखालची सुरेख लाकडी सुंदर पट्टी... जी बाशिंगासारखी घराला रमणीय शोभा आणते!

भूतानी सगळ्या घरांचे सुंदर लेणे म्हणजे त्यांच्या खिडक्या. प्रत्येक खिडकी ही नक्षीदार लाकडी फुलावेलींच्या किनारींनी कमनीय केलेली असते. भूतानी घरांचे दार हीसुद्धा एक खिडकीच असते. जणू ते दार आहे असे वाटतच नाही!

वैविध्यात आणि वैचित्र्यात सौंदर्य आहे, तसेच पुनरावृत्तींतूनही सौंदर्यनिर्मिती करता येते. रवींद्रनाथांनी ‘जय हे जय हे’ ह्या शब्दांच्या पुनरावृत्तींतून आपल्या राष्ट्रगीतात अशी सौंदर्यनिर्मिती केली आहे. सगळी भूतानी घरे ही एकसारखी असतात. तोचतोपणा येऊन कंटाळा येत नाही, उलट ते दृश्य फार रम्य वाटते. कुठेच विसंगती नाही, बेसूर नाही. कवितेत जशा छंदोबद्ध ओळी याव्यात, तशी ही भूतानी घरे. भूतानचे वैशिष्ट्य हे की, सगळ्या सरकारी इमारती आणि हॉटेल्स यांनीसुद्धा हे भूतानी घरांचे वास्तुशिल्प जपले आहे. भूतान हा असा ‘घरावा’ देश आहे.

माझे थिंपूमधील वास्तव्य होते ताण ताझीमध्ये. ताण ताझीच्या वास्तूवर हॉटेलच्या वास्तूची कसलीच असेंद्रिय, इनऑर्गेनिक सया नव्हती. हॉटेलमध्ये भूतानी चालीरीतीप्रमाणे आमच्या खांद्यावर पांढरे वस्त्र घालून आमचे स्वागत करण्यात आले. ताणताझीच्या लॉबीत रेस्टॉरंटमध्ये, खोलीत सगळीकडे रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ होते. जणू काही कहाणीतील फुलपरिचे घर होते ते!

फुलांचे रंग आणि फुलांचा सुवास वातावरण सुरंगी आणि सुवासिक करतो. ताणताझीमध्ये सगळीकडे मंद उजेड होता. दिव्यांचा लखलखाट कुठेच नव्हता आणि मंद-सुखद संगीताची धून होती.

दुसऱ्या दिवशी थिंपूची सैर केली. थिंपू ही जगातली कुठल्याही राष्ट्राची अशी एकमेव राजधानी आहे, जिथे एकही ‘ट्रॅफिक सिग्नल’ नाही. थिंपू शहरात लाखभर लोक राहतात, तशा गाड्याही खूप आहेत; पण रहदारीची शिस्त आहे. त्यामुळे तिथे ट्रॅफिक लाईट्‌स नाहीत.

काटकोनी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वच्छ- मोकळे फुटपाथ. रस्त्यावरून शाळेत आरामात जाणारी सफरचंदी गालांची, गुटगुटीत, हसरी मुले. जवळच त्यांची  शाळा. शाळेपुढे विस्तृत पटांगण. पलीकडे फळे, भाज्या यांचा बाजार. थिंपूमध्ये माशांचा बाजार नाही. मी गोमंतकीय असल्यामुळे ‘नुस्त्याचा बाजार कुठे?’ ते विचारत माझे पाय तिकडे वळतात. त्यामुळे थिंपूत नुस्त्याचा बाजार नसल्यामुळे माझी निराशा झाली. मग कळले- भूतानचा धर्म बौद्ध. त्यामुळे तिथे मासेमारीवर बंदी आहे. शिकारीवर बंदी आहे, पण भारतातून आयात केलेले मासे व मांस रेस्टॉरंटमध्ये मिळते. मांसाहार करायला येथील बौद्ध धर्माची बंदी नाही. बौद्ध धर्म मध्यम मार्ग मानतो. मांसाहार बंदी न करताना, गौतम बुद्धाने कदाचित मांसाहार संबंधित व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या लोकांचा विचार केला असावा. स्वत: बुद्धाने डुकराचे मांस खाल्ले व त्याला अतिसार झाला, तद्‌नंतर त्याचे निर्वाण झाले- असा काही बुद्धचरित्रात उल्लेख आहे. बुद्ध भिक्खू प्राण्याची हिंसा स्वत: करत नसत, पण भिक्षेतून मांस वाढल्यास त्याचे भक्षण करत असत.

भूतानी लोकांच्या जीवनात बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब ठायी-ठायी दिसते. देवमंदिरे, कर्मकांडे, सण, उत्सव हा धर्माचा दृश्यावतार असतो. पण धर्मविचाराचे आंतरिकीकरण झाले, इंटरनलायझेशन झाले की मग तो धर्म मानवी जीवन अंतर्बाह्य समृद्ध करतो.

भूतान हा ऐहिक व सांस्कृतिक दृष्टीने सुखी आणि समाधानी देश आहे. तृप्त, संतुष्ट देश आहे. सुख आणि समाधान ह्या दोन्हींमध्ये बौद्ध संकल्पना फरक करते. सुख ही ऐहिक संकल्पना आहे, तर समाधान ही मानसिक संकल्पना आहे. भूतानचे वैशिष्ट्य हे की, भूतानी माणूस सुखी आहे तसा समाधानीही आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मातीतून भूतानमध्ये एक नवा आर्थिक विचार अंकुरला आहे. भूतान हा जगातला एकमेव देश आहे, जो ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे एकूण संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्न मोजत नाही, तो ग्रोस नॅशनल हॅपिनेस- संपूर्ण राष्ट्रीय समाधान मोजतो.

‘जीएचपी’ ही अर्थशास्त्राला भूतानने दिलेली अभिनव देणगी आहे, इनोव्हेशन आहे. अर्थशास्त्राचा व गणिताचा पदवीधर या नात्याने मीसुद्धा जीएचपीची संकल्पना सखोल समजून घेतली. भूतानने संपूर्ण राष्ट्रीय समाधानाचे चार आयाम किंवा चार परिमाणे मानली आहेत. देशाचा सामाजिक आणि आर्थिक विकास हे पहिले परिमाण. यामध्ये समाजाचे शिक्षण, आरोग्य, रोजगार योग्य कौशल्य निर्मिती, त्यांना मिळणारा रोजगार, घरांची मुबलकता, पौष्टिक खाण्याची उपलब्धता, कपड्यालत्त्याची याची उपलब्धता, स्त्री-पुरुष समानता, वृद्धांची सुरक्षितता यांचा विचार होतो.

दुसरे परिमाण सुशासनाचे. यात भ्रष्टाचारमुक्त, कार्यक्षम व लोकाभिमुख प्रशासन देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य मानले जाते. भूतानला राजा-राणी आहेत, पण राजाने आपले अधिकार स्वेच्छेने सोडले आहेत आणि लोकशाहीने निवडलेले सरकार भूतानमध्ये राज्यावर आहे.

राष्ट्रीय समाधान संकल्पनेचा तिसरा आयाम आहे पर्यावरणाचे संवर्धन. भूतानमधील ६०% जमीन वनक्षेत्राखाली असावी, असा भूतानच्या राज्यघटनेचा कायदा आहे. प्रत्यक्षात भूतानमधली ७२% जमीन वनक्षेत्राखाली आहे. भूतानचे पंतप्रधान शेरिग तोब्गे यांचे भाषण  http:/www.ted.com/talks/tshering-tiong this-country-isn't-just-carbon-negative ह्या लिंकवर आपल्याला ऐकता/पाहता येईल. हे भाषण नरेंद्र मोदींच्या भाषणासारखे नाटकी, कृत्रिम, बेगडी नाही. अतिशय मनमोकळेपणाने, दिलखुलासपणाने भूतानच्या पंतप्रधानांनी आपल्याशी या भाषणातून संवाद साधला आहे.

भूतानची लोकसंख्या ७ लाखांच्या आसपास आहे आणि भूतानने पर्यावरण व विकास यांचा सुवर्णमध्य साधला आहे. भूतानचे राष्ट्रीय उत्पन्न दर वर्षी २०० कोटी डॉलर्स आहे. भूतानमध्ये प्रत्येकाला शिक्षण व आरोग्यसेवा मोफत आहे. इथे ग्रामीण शेतकऱ्यांना वीज फुकट दिली जाते, कारण त्यामुळे ते इंधनासाठी जंगलात जाऊन झाडे कापत नाहीत. भूतानमध्ये सर्वत्र एलईडी दिव्यांचा वापर केला जातो. येथील वाहने इलेक्ट्रिकवर आहेत. भूतान येथील नद्यांतील पाण्याचा वापर करून हायड्रो-इलेक्ट्रिक पद्धतीने वीजनिर्मिती करते. यातील बहुतांश वीज भारतात निर्यात होते.

भूतान हा कार्बन निगेटिव्ह देश आहे. भूतान प्रतिवर्षी २.२ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जित करतो, पण ६ दशलक्ष टन कार्बनचे शोषण करतो. सन २०२०पर्यंत भूतान १७ दशलक्ष टन आणि २०५०पर्यंत ५० दशलक्ष टन कार्बनचे शोषण करेल.

सन २०२०पर्यंत भूतान पूर्णपणे सेंद्रिय शेती असलेला देश बनेल, तर २०३०पर्यंत भूतानमधून ० टक्के ग्रीन गॅस उत्सर्जित होतील, असा भूतानच्या पंतप्रधानांना आत्मविश्वास आहे.

भूतानच्या राष्ट्रीय समाधानाच्या संकल्पनेचे चौथे  परिमाण आहे सांस्कृतिक मूल्याचे जतन. यात भूतानी भाषा, साहित्य, लोकवेद, लोककला, शिल्पकला, पाककला, सण-उत्सव, खेळ यांचे जतन व संवर्धन करण्यावर भर दिला जातो.

भूतानचे राजे जिगो सिंग्यो यांनी राष्ट्रीय समाधानाचा निर्देशांक मोजण्याची संकल्पना १९७०मध्ये मांडली. त्यानंतर खूप संशोधन करून जीएचपी मोजण्याचे संख्याशास्त्रीय अंकगणित भूतानने शोधून काढले. भूतानने शून्य आणि शंभर ह्या आकड्यांचे चार विभाग केले. त्याआधी दोन गृहीत तत्त्वे भूतानने मान्य केली. ती म्हणजे सगळ्यात असमाधानी माणसांना ० हा निर्देशांक द्यायचा आणि सगळ्यात समाधानी माणसांना १०० हा निर्देशांक द्यायचा. जे अतिशय दु:खी किंवा समाधानी आहेत, अशा लोकांना ० ते ५० ह्या विभागात टाकायचे. साधारण समाधानी लोकांना ५० ते ६६ ह्या विभागात मोजायचे. आपण खूप समाधानी आहोत असे समजणाऱ्या भूतानी लोकांना ६६ ते ७७ या गटात टाकायचे आणि जे भूतानी लोक आपण अतिशय समाधानी आहोत असे समजतात, त्यांना ७७ ते १०० ह्या गटांत टाकून त्यांची मोजदाद करायची. हे ठरविल्यानंतर भूतानने आपल्या देशात जे सर्वेक्षण केले, त्यात भूतानच्या सर्वेक्षकांना दिसून आले की- भूतानमधले १०% लोक असमाधानी आहेत म्हणजे ते ० ते ५०% या वर्गात मोडतात. ४९% लोक साधारण समाधानी असल्यामुळे सर्वेक्षकांनी त्यांचा समावेश ५०% ते ६६% या गटात केला. ३३% लोक खूप समाधानी असल्याचे दिसून आल्याने ते ६६% ते ७७% ह्या विभागात गेले. अतिशय समाधानी अशा भूतानी लोकांचे प्रमाण ८% असल्याने ते ७७% ते १००% ह्या वर्गात गेले. यानंतर भूतानी अर्थतज्ज्ञांनी एक तक्ता केला.

० ते ५० – १०%

५० ते ६६ – ४९%

६६ ते ७७ – ३३%

७७ ते १०० – ८%.

मग संपूर्ण राष्ट्रीय समाधानाचा निर्देशांक काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले गेले. भूतानच्या राष्ट्रीय समाधानाचा निर्देशांक

- (०:५० * ०.१०) + (०.६६ * ०:४९)

+ (०.७७ * ०:३३) + (१.०० * ०:०८)

= ०:०५ + ०:३२ + ०:२५ + ०:०८

= ०:७०

यावरून भूतानचा राष्ट्रीय समाधानाचा निर्देशांक ०:७० असे ठरले. ० हा अतिशय वाईट निर्देशांक आणि १ हा चांगला निर्देशांक असल्यामुळे ०:७० हा निर्देशांक असलेले भूतान हे समाधानी राष्ट्र समजले जाते.

राष्ट्रीय समाधानाचा निर्देशांक ठरवताना भूतान आपल्या लोकांच्या नऊ गोष्टी विचारात घेतो. पहिली गोष्ट म्हणजे भूतानी लोकांचा निवारा. प्रत्येक भूतानी रहिवाशाला राहण्यासाठी योग्य घर आहे काय, ह्या घरांत संडास- बाथरूमची व्यवस्था आहे काय, देशांतील किती लोक बेघर आहेत याचा विचार केला जातो. याशिवाय प्रत्येक भूतानी माणसाला योग्य रोजगार आहे काय, यातून त्याला पौष्टिक जेवणखाण करण्याएवढी मिळकत आहे काय, देशात बेकार लोक किती आहेत याची पाहणी केली जाते.

दुसरी बाब म्हणजे, लोकांचे आरोग्य. यात अपंग किती, वृद्ध किती, साधारण माणूस वर्षातील किती दिवस आजारी असतो, स्त्रियांना वैद्यकीय सुविधा सोपेपणाने उपलब्ध होतात का याचा विचार होतो. तिसरी गोष्ट म्हणजे, लोकांचे मानसिक आरोग्य. भूतानी लोकांना कौटुंबिक स्वास्थ्य आहे काय, भूतानी माणसांत मनोरुग्णांचे प्रमाण किती याचे सर्वेक्षण केले जाते. चौथी गोष्ट म्हणजे, भूतानी लोकांना नोकरी-व्यवसायासाठी दिवसांतील किती तास काम करावे लागते, त्यांना फुरसतीचे (लिजर) तास किती मिळतात, त्यांना आठवड्याला सुट्टीचे दिवस किती असतात, हे दिवस ते कसे घालवतात याची पाहणी केली जाते.

शिक्षण ही पाचवी गोष्ट. साक्षरता, सामान्य ज्ञान, मूल्यशिक्षण, कौशल्यनिर्मिती, शाळा-कॉलेजांची संख्या या सगळ्या गोष्टींचा विचार यात होतो. सांस्कृतिक समृद्धी ही सहावी गोष्ट. यात भूतानी भाषा, कला, साहित्य, गीते, कहाण्या, नाटक, उत्सव यांचे योग्य संवर्धन केले जाते काय, यावर लक्ष दिले जाते. सातवी गोष्टी सुशासनाची. लोकांचे मूलभूत हक्क, त्यांना मिळणाऱ्या सरकारी सोई, सरकारी योजनांचा लाभ, भ्रष्टाचारमुक्त व कार्यक्षम प्रशासन या बाबी यात येतात.

सामाजिक सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था ही आठवी गोष्ट. ग्रामीण आणि शहरी भूतानी लोकांचे संरक्षण, गुन्ह्यांचे प्रमाण, सामाजिक शांती, कुटुंबनियोजन या गोष्टी यांत येतात. पर्यावरण ही नववी आणि शेवटची गोष्ट. यात निसर्ग, वनक्षेत्रे, पशु, पक्षी, नद्या, तळी, शेते, फळबागा यांचे संरक्षण, जैववैविधता शहरात जास्तीत जास्त मोकळ्या जागा ठेवणे, रहदारीत सुसूत्रता, देश कार्बनमुक्त करण्याकडे भर ह्या सर्व बाबी येतात.  

भूतानमध्ये सहसा परराष्ट्रातील लोकांचे स्थलांतर होत नाही, झाले नाही. वर्षाला किती पर्यटक यावेत यावर भूतानने बंधन घातले आहे. भूतान असा ‘मर्यादा पुरुषोत्तम’ देश आहे.

१३०० वर्षांपूर्वी भूतानमध्ये बौद्ध धर्म पोचला आणि तेथील मातीत रूजला. 

भूतानमधील बुद्धमंदिरे पाहणे हा एक अप्रूप अनुभव आहे. थिंपूच्या लहानशा डोंगरावर बोधिसत्त्वाचे एक देवमंदिर आहे. हा बोधिसत्त्व लहान मुलांना आशीर्वाद देतो. त्यामुळे भूतानी लोक नवजात मुलांना आणि अन्य छोट्या- छोट्या मुलांना घेऊन ह्या मंदिरात येतात. या बोधिसत्त्वाला वाहायला फुले, धान्याची कणसे, पुऱ्या, मिठाई, चॉकलेट्‌स, बिस्किटे आणतात. मग लहान मुलांना हा प्रसाद वाटला जातो. बुद्धमंदिराच्या चारही बाजूंनी पांढरे, लाल, हिरवे, पिवळे, निळे ध्वज लावलेले असतात. त्यामुळे तो परिसर अतिशय शोभिवंत वाटतो.

थिंपूच्या दुसऱ्या डोंगरावर ध्यानस्थ बुद्धाची भव्य मूर्ती आहे. ह्या मूर्तीची उंची ७० फूट आहे. तिच्यावर कसलाच घुमट नाही. वर आहे मोकळे आभाळ!

त्या रम्य सकाळी बुद्धाच्या अर्धोन्मीलित डोळ्यांवर आणि मुमुरख्या ओठांवर सकाळच्या उन्हाची सया   पडली होती. अष्टदिशांतून येणारा झणझण वारा बुद्धाच्या केसांतून मायेचा हात फिरवत होता. बुद्धाची ही थिंपू शहराला अभिमुख असलेली मूर्ती शहराच्या सर्व भागांतून दिसते, हे तिचे वैशिष्ट्य आहे. थिंपू शहरात बौद्ध धर्मगुरूंचा विहार आहे. गडद तांबड्या वेषातले हे बौद्ध भिक्खू गंभीर सुरात  बुद्धप्रार्थना करतात. त्यांच्या चेहऱ्यावर निर्मळ, निरागस सदाफुली हास्य आहे.

बौद्ध विहाराच्या परिसरातच भूतानची लोकसभा व मंत्रालयाची वास्तू आहे. पुढे अलीकडेच बांधलेली सुप्रीम कोर्टाची वास्तू आहे. ह्या सरकारी इमारती आहेत, असे बिलकुल वाटत नाही. परंपरा आणि नवता, सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि आधुनिक कलाविचार यांचा संगम असलेली ही वास्तुशिल्पे आहेत. ह्या वास्तूंत कसलाच बंदिस्तपणा नाही. त्यात एक मोकळेपणा आहे. सभोवती परिसराचा अविभाज्य भागच असल्याप्रमाणे ह्या वास्तू इथे उभ्या आहेत. दिवेलागणीच्या वेळी ह्या वास्तूंवर रोषणाई केली जाते. गर्द काळोखात मग ती दिव्यांची लखलख दिवाळी डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.

त्या रात्री हॉटेलमध्ये भूतानी लोकनृत्य पाहिले. वाघ, सिंह, हरणे, ड्रॅगन यांचे मुखवटे घालून भूतानी संगीताच्या तालावर हे लोकनृत्य होते. नृत्याअखेर वाघ आणि हरिण, माणूस आणि ड्रॅगन यांची मैत्री होते.

भूतानमध्ये पक्ष्यांच्या जीवनावरचे एक म्युझियम पाहिले. भूतानमध्ये पक्ष्यांच्या ७७० जाती आहेत. प्रत्येक पक्ष्याचा रंगीत फोटो या म्युझियममध्ये पाहायला मिळतो. त्याचा आवाज ऐकायला मिळतो, त्याची सर्व माहिती मिळते. म्युझियमबाहेर सोव्हिनिएरचे दुकान होते. तिथे भूतानचे थ्रीडी (थ्री डायमेन्शनल) स्टॅम्प घेतले. अशा प्रकारचे स्टॅम्प फक्त भूतानच काढते. पक्ष्यांचे, फुलपाखरांचे, फुलांचे, प्राण्यांचे, झाडाचे हे त्रि-आयामी रंगीत स्टॅम्प महाग असतात, पण खूप सुरेख असतात. आपल्या स्टॅम्पच्या आणि आठवणींच्या आल्बममध्ये ते हवेतच!

रात्री भूतानी रेस्टॉरंटमध्ये जेवण घेतले. तांदळाची वाईन, सूप, कोबीची भजी, उकडलेल्या मशरूमचे मोमोज, चिकन स्ट्यू, चीज न्यूडल्स, व्हेजिटेबल आग्रातीन असे हे जेवण होते. प्रत्येक पदार्थात मिरचीचा खूप वापर केला होता.

दुसऱ्या दिवशी थिंपूहून पुनाखाला जायला निघालो. वाटेत १०८ छोट्या-छोट्या स्तुपांचे व्हिक्टोरिया स्मारक पाहिले. भूतानी राजाने शेजारी राज्यावर मिळवलेल्या विजयाचे हे स्मारक. दुधातल्या फराळासारखे हे छोटे-छोटे रांगेत बसलेले श्वेतधवल १०८ स्तूप! त्यांच्या सभोवती पांढरे, तांबडे, पिवळे, हिरवे, निळे, बावटे. पाठीमागे डोंगर. डोंगरांवर जांभळ्या, पिवळ्या रानफुलांचा चवर.

वाटले- आपणही इथे ध्यानस्थ बसावे आणि आपलाही एक स्तूप व्हावा- जसा स्तूप झाला ध्यानाला बसलेल्या या १०८ भिक्खूंचा! चार तासांनी पुनाखाला पोचलो, तेव्हा दुपार झाली होती. पुनाखा हा पुनातांछु या नदीकाठचा गाव. डोंगराखाली वसलेला आहे.

पुनाखा हा वाऱ्याचा गाव आहे. पृथ्वी, जल, अग्नी, अवकाश आणि वायू ही पंचमहाभूते. यातील वायू म्हणजे वाऱ्याचे खास वैशिष्ट्य आहे. दशदिशांतून येणारा हा वारा कधी थंड, शीतल आणि सुखद असतो; तर कधी रौद्र, क्रुद्ध आणि भयाण असतो. पुनाखाच्या हिरव्यागार शेतांवरून आणि झाडांच्या पाना-फुलांतून अलगद वाहणारा त्या दिवशीचा मुलायम वारा- त्याला एक अनाहत नाद होता, अनाघ्रात वास होता आणि एक अदृश्य रूपही होते. नदीच्या किनाऱ्यावरील सर्वदूर पसरलेली शेतांची फेर संपली की, एक चढण लागायची. चढण लागताच पिंपळाच्या पानांची  सळसळ ऐकू यायची. छोट्या डोंगरावर एक पुरातन पिंपळ होता. पिंपळाच्या पारासमोर एक लहान बुद्धमंदिर ध्यानस्थ भूमिस्पर्श मुद्रेत बसले होते. पिंपळाला संस्कृतात अश्वत्थ आणि इंग्रजीत टेंपल ट्री ही समर्पक नावे आहेत.

पिंपळ हा केवळ वृक्ष नाही, तो पुरातन संस्कृतीचा आदिम ध्वजदंड आहे. पुनाखा गावाजवळ पुनाखा किल्ला आहे. ह्या किल्ल्याला फोर्ट म्हणत नाहीत, त्याला फोर्ट्रेस असे फेमिनीन नाव आहे. किल्ल्याची वास्तूही तशीच ‘रमणी’य आहे. किल्ल्याच्या दोन्ही बाजूला पुनातांछु नदीचे दोन फाटे होतात. नदीचे एक रूप पुरुषी मानतात आणि एक स्त्री रूप. त्यामधील बेटावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या प्रांगणात जांभळ्या अनामिक फुलांचे वृक्ष रांगेने उभे आहेत. त्यांच्यामध्ये बुद्धमंदिर आहे. बुद्धमंदिरात मंद वातींच्या उजेडात ध्यानस्थ बुद्धाची मूर्ती आहे. बौद्ध भिक्खूंचे मंत्रपठण चालू आहे. सगळीकडे धूपारतीचा वास दरवळत आहे. बुद्धाला भक्तांनी फुले, फळे अर्पण केलेली आहेत. देव न मानणाऱ्या बुद्धालाच इथे देवरूप दिले आहे.

पुनाख्याहून थिंपूला पोचेपर्यंत रात्र झाली. दुसऱ्या दिवशी थिंपूहून पारोला आलो. पारोला आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो, त्या हॉटेलची वास्तू पूर्णपणे लाकडी होती. सायंकाळी पारोची फोर्ट्रेस पाहिली. तिथे कसला तरी भूतानी उत्सव चालला होता. सगळे लोक नटून-थटून पारंपरिक वेषात आले होते. मुखवट्यांचा नाच रंगात आला होता. वेळ-काळ विसरून लोक नाचत होते. हसत-खिदळत होते.

काळ इथे गोठून गेला होता. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ- सगळे काही थांबले होते. बुद्धाचा अनित्यबोधही संदर्भहीन झाला होता. सगळे काही फॉसिलाइझ्ड झाल्यासारखे वाटत होते. वर्षानुवर्षे हे असेच चालेल, बदलणार नाही.

बुद्ध म्हणतो, बदल हेच सनातन सत्य. आधुनिक विज्ञान तर म्हणते- What is changing is rate of change.

भूतानमध्ये काहीच का बदलत नाही? की, भूतानमधला बदल भूमिगत आहे? सेंद्रिय आहे?

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून टायगर नेस्टला जाण्यासाठी बाहेर पडलो. टायगर नेस्ट म्हणजे उंच डोंगराच्या कड्यावर बांधलेले बुद्धमंदिर. इथे शेकडो वर्षांपूर्वी एक बौद्ध भिक्खू वाघावर स्वार होऊन गेला आणि तिथे त्याने हे मंदिर बांधले, म्हणून त्याचे नाव ‘टायगर नेस्ट’ असे पडले. 

टायगर नेस्टवर जाताना आम्ही घोड्यावर बसून गेलो, एका ठरावीक उंचीपर्यंत घोड्यावर बसून जाता येते, मग डोंगर चढावा लागतो. दमछाक होते, पण एकदा वर पोहोचल्यावर सगळा शीण जातो. टायगर नेस्टवरून भूतानच्या निसर्गाचे विहंगम रूप दिसते. आभाळ डोंगरमाथ्याला टेकल्यासारखे वाटते. ढगांचा कधीही आपल्याला स्पर्श होईल, असा भास होतो.

टायगर नेस्टवरील बुद्धमंदिरात मंद उजेड होता. मी बुद्धाच्या आत्ममग्न मूर्तीसमोर काही क्षण ध्यानस्थ बसलो. बुद्धाची मुदिता, बुद्धाची करुणा, बुद्धाची चिद्‌घनचपला प्रज्ञा, बुद्धाचा ईहवाद, बुद्धाचा अज्ञेयवाद आणि ‘सर्व भवतु मंगलम्'‌ ही बुद्धाची सर्वमंगल प्रार्थना... ह्या साऱ्याचे मनोमन स्मरण केले. चित्त स्थिर झाले. मन शांत झाले, निवांत झाले.

कार्तिकी नवमीच्या चांदण्यात घनदाट रानातल्या नि:स्तब्ध तळ्याचे शांत पाणी... तृप्त-समाधानी अवस्थेत निळ्या-निरभ्र आकाशाच्या घुमटाकडे पाहत सारी रात्र प्रशांत समाधी अवस्थेत बसावे, अशी मनाची तंद्री लागली.

माझे मन आंतरिक समाधानाने भरून वाहू लागले. मनात काठोकाठ एक सामुद्रिक शांती पसरली. हा अनुभव अपूर्व होता. टायगर नेस्टच्या बुद्धमंदिरात काही क्षण मी ‘सातोरी’ अवस्थेत गेलो. टायगर नेस्टचा डोंगर मूकपणे चालत मी खाली उतरलो.

संध्याकाळी पारोच्या विक-एंड मार्केटमध्ये काही खरेदी केली. बौद्ध तत्त्वज्ञानावरील काही पुस्तके खरेदी केली. भूतानी सोव्हिनिअर्स घेतले. आमची भूतानी सफर संपत आली होती. भूतानच्या विमानळावर लहानसा बोर्ड होता...

Leave nothing but foot prints,

Take nothing but memories.. ...

इथे काहीच ठेवू नका, केवळ पाऊलखुणा तेवढ्या ठेवा, इथून काहीच घेऊ नका, फक्त येथील आठवणी तेवढ्या घेऊन जा!

Tags: ग्रोस नॅशनल हॅपिनेस ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट भूतान दत्ता नायक टायगर नेस्ट फोर्ट्रेस पुनाखा व्हिक्टोरिया स्मारक थ्री डायमेन्शनलस्टॅम्प थ्रीडी स्टॅम्प पक्षांचे म्युझिअम जिगो सिंग्यो जीएचपी गौतम बुद्ध ताण ताझी घरावा चोंग्येल लाम पाचू नदी थिंपू ड्रक एअर पारो विमानतळ संचित संपूर्ण राष्ट्रीय समाधान Birds museum tigers nest Punakha Victoria monument Three Dimensional Stamp GHP Gautam Buddh Chogyal Lam Gharava Pachu river Thimphu Paro Airport Sanchit Gross National Happiness Gross National Product Bhutan Datta Nayak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके