डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

वास्तविक ब्राझीलपुढे अनेक ऐहिक प्रश्न आहेत. जल, जंगल, जमीन आणि जैविक संपत्ती असूनही हा देश गरीब आहे. देशात लोह, झिंक, बॉक्साईट, टिन, सोने, हिरे, कोळसा यांच्या खाणी आहेत. तेलाच्या विहिरी आहेत. संत्री, ऊस, तंबाखू, सोयाबीन, कॉफी ही पिके आहेत. ब्राझील हा जगातील गोमांसाचा सर्वांत मोठा निर्यातदार आहे. एके काळी ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या पाच देशांना भावी महासत्ता म्हणून ओळखले जाई; पण राजकीय अस्थिरता व भ्रष्टाचार यामुळे ब्राझील मागे पडला. येथे प्रचंड आर्थिक विषमता आहे. शाळागळतीचे प्रमाण मोठे आहे. बेकारी आहे. येथील लोकांचा धर्म कॅथॉलिक असल्याने गर्भपाताला बंदी आहे, त्यामुळे गरिबीचे दुष्टचक्र चालूच राहते. घटस्फोटाचे प्रमाणही मोठे आहे. हिंसाचार व गुन्हेगारी आटोक्यात आलेली नाही. येथील समाज सांस्कृतिक व सामाजिक दृष्टीने पोखरलेला आहे.

दुसरी ॲमेझॉन आपल्याला परिचित आहे. ही सॉफ्टवेअर कंपनी- तिच्या संकेतस्थळावर जाऊन हवी ती वस्तू आपण मागवू शकता. दोन-तीन दिवसांत ती वस्तू घरपोच मिळते. पहिल्या ॲमेझॉनला आपण विसरून गेला असाल. ज्या पहिल्या ॲमेझॉनवरून दुसऱ्या ॲमेझॉनने आपले नामकरण केले, ती आहे दक्षिण अमेरिकेच्या पेरू, कोलंबिया आणि ब्राझील या तीन देशांतून वाहणारी नाईलनंतरची जगातील दुसरी लांब पल्ल्याची नदी!

पश्चिमेकडच्या पॅसिफिक महासागराजवळच्या डोंगरात तिचा उगम होतो आणि खंडप्राय दक्षिण अमेरिकेच्या तीन देशांतून प्रवास करीत पूर्वेकडच्या अटलांटिक महासागरात विलीन होताना ती ६४०० किलोमीटरचं अंतर पार करते. ॲमेझॉन नदीचे एक खास वैशिष्ट्य आहे. कोलंबियातून येणारी काळ्या पाण्याची निग्रो नदी आणि पेरूतून येणारी दुधाळ पिवळ्या पाण्याची सॉलिमॉयस नदी, या दोन नद्यांचा ब्राझीलमध्ये संगम होऊन ॲमेझॉन ही महाकाय नदी निर्माण होते. पण निग्रो नदीचे काळे पाणी आणि सॉलिमॉयस नदीचे पिवळे पाणी या दोन्हींचे तापमान, दाटपणा (व्हिस्कोसिटी) वेगळा असल्यामुळे ते तत्काळ एकमेकांत विरघळत नाही. सुमारे सहा किलोमीटर अंतरापर्यंत या दोन्ही नद्यांचे पाणी एकाच नदीच्या पात्रात वेगवेगळे वाहत जाते.

ॲमेझॉनच्या  पात्रातून प्रवास करताना तिचे हे काळे-पिवळे दुहेरी पात्र पाहून आपण अचंबित होतो. ॲमेझॉन ही काळाचे भान नसलेली गूढ नदी आहे. तिला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याचे अवधान नसावे. आपल्याला पृथ्वीच्या जन्मापासून तिच्या अंतापर्यंत फक्त वाहत राहायचे आहे, एवढेच तिला ठाऊक असावे. ॲमेझॉन ही नग्न नदी आहे. तिने कोणतेही वस्त्र नेसलेले नाही. ती चिरतरुण आहे. तिच्या तारुण्याचे काठ ओतप्रोत ओसंडून वाहत आहेत. ॲमेझॉन ही अथांग नदी आहे. पाण्याने तुडुंब भरलेली आहे. अनेक वेळा ॲमेझॉन ही, नदी आहे असं वाटतच नाही. तिचे वाहतेपण, प्रवाहीपण जाणवतच नाही. ॲमेझॉन हा शांतस्थिर जलाशय आहे, असा आभास होतो. ॲमेझॉनची ही स्थितप्रज्ञता, सजगता आश्चर्यजनक आहे.

ॲमेझॉनच्या काठावर घनदाट वर्षावने (रेन फॉरेस्ट्‌स) आहेत. ही जगातील प्राणवायूची कोठारे मानली जातात. जैविक संपत्तीचे ते आगर आहे. आमचे वास्तव्य दोन दिवसांसाठी ॲमेझॉनच्या काठावरील अशाच एका घनदाट जंगलात होते. ॲमेझॉनच्या पात्रात किनाऱ्याजवळ खांब उभारून त्यावर लाकडी कॉटेजेस बांधल्या होत्या. त्या नदीसन्मुख ‘ॲमेझॉन झुम्बा कॉटेजेस’मध्ये आम्ही दोन दिवस आणि दोन रात्री शहरी कोलाहलापासून दूर निवांतपणे घालवल्या.

मानवस शहरापासून इथे यायला आम्हाला तीन तासांचा प्रवास करावा लागला होता. त्या शहरातून अर्ध्या तासाचा बसप्रवास, मग अर्ध्या तासाचा मोटरबोटचा प्रवास, परत अर्ध्या तासाचा बसप्रवास आणि त्यानंतर दीड तास मोटरबोटने ॲमेझॉनच्या बॅकवॉटरमधून वाट काढत आम्ही इथे पोहोचलो होतो.

दुसऱ्या दिवशी पहाटे आम्हाला सूर्योदय दाखवण्यासाठी मोटरबोटने ॲमेझॉनच्या पात्रातून रम्य स्थळी नेण्यात आले. पहाटेच्या सुवर्णवर्खी, तांबूस उन्हात ॲमेझॉनचे पात्र चमकत होते. ते शीतधारा पात्र... त्यात कोणतीच खळखळ नव्हती. ते शांत होते. ॲमेझॉनच्या चर्येवर गर्भवतीचे तृप्त हास्य होते. मुळांचे पाय आणि फांद्यांचे हात पाण्यात बुडवून काठावरची झाडे बसली होती. त्यानंतर सकाळी आम्हाला गळ धरून मासे पकडण्यासाठी नदीच्या काठावरील विशिष्ट स्थळी नेण्यात आले. या ठिकाणी अंगावर लाल ठिपके असलेले पिनारा जातीचे भरपूर मासे होते. प्रत्येकाच्या गळाला तीन-चार मासे लागले. पण इथल्या मासेमारीचा नियम असा की, गळाला लागलेला मासा काढून पाण्यात सोडून द्यायचा. गळाला लागलेला तडफडणारा छोटा मासा जीवदान मिळाल्यावर पाण्यात सोडला की, जिवाच्या आकांताने सूर मारून पोहत दूरवर जाई.

संध्याकाळी आम्हाला मोटरबोटने ॲमेझॉनच्या वेगळ्या प्रवाहात नेण्यात आले. इथले पाणी पूर्णतः काळे होते. काठावरची झाडांची पाने, फांद्या, मुळे नदीच्या पाण्यात पडून त्याचा निचरा होऊन ती कुजल्यामुळे नदीचे पाणी ॲसिडिक झाले होते. त्यामुळे ते काळे दिसत होते. नदीचे पाणी ॲसिडिक झाल्यामुळे परिसरातील प्राणी, पक्षी ते प्यायला येत नव्हते. काठावरची झाडेही उजाड झाली होती. त्यांना पाने, फळे, फुले नव्हती. म्हणून या भागातील ॲमेझॉन नदीला ‘बुभुक्षित नदी’ (हंग्री रिव्हर) असे नाव ठेवले गेले आहे. तिन्हीसांजा होत आल्या, तेव्हा हा सारा परिसर सभोवतालच्या झाडांच्या कलत्या सावल्यांनी भयाण- भेसूर दिसू लागला. वातावरण गूढ बनले. ॲमेझॉन ही बहुरूपी नदी असावी. कामरूपी असावी. आपल्या पात्रावर वेगवेगळे मुखवटे चढवते.

तिन्हीसांज आणि रात्र यांच्या संधिरेषेवरील ॲमेझॉनचे रूप भीषण होते. पण त्या भीषणतेलाही सौंदर्याची किनार होती. रात्री ॲलिगेटर टूर होती. छोट्या मोटरबोटमधून सर्चलाईट घेऊन आम्हाला काळोख्या रात्री ॲमेझॉनच्या पात्रातून दीड-दोन तास सैर करवण्यात आली. ॲमेझॉनच्या किनाऱ्यावर सर्चलाईट टाकत-टाकत आमची मोटरबोट जात होती. शेवटी आमच्या गाईडला चकाकणारे दोन डोळे दिसले. मोटरबोट थांबवून तो किनाऱ्यावर गेला आणि त्याने मगरीचे एक छोटे पिल्लू पकडून आणले. ते आम्हा सगळ्यांना दाखवून मग त्याला पाण्यात सोडण्यात आले. मोठी मगर मात्र त्याला पकडता आली नाही.

दुसऱ्या दिवशी आम्हाला ॲमेझॉनच्या वर्षावनात राहणाऱ्या आदिवासी लोकांची वस्ती दाखवण्यात आली. हे आदिवासीही जमिनीवर खांब रोवून त्यावर लाकडी फळ्या ठोकून त्यावरील लाकडी घरात राहतात. कारण जमिनीवर घरे बांधल्यास सर्प, लांडगे, वाघ यांच्यापासून धोका असतो.

झुम्बा लॉज हे अतिशय सुंदर आहे. त्याचे मालक तिथेच राहतात. त्यामुळे त्याला पर्सनलाइज्ड टच आहे. तिथला स्विमिंग पूल ॲमेझॉनच्या पाण्यातच आहे. पण पोहणाऱ्याला माशांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याला खालून जाळी लावलेली आहे. या लॉजमध्ये जॅम आणि जेरी या - म्हटले तर खेळकर, म्हटले तर खोडकर- काळ्या माकडांची जोडी आहे. खरं म्हणजे सगळे झुम्बा लॉज आपल्याच मालकीचे आहे, अशा थाटात ही दोन छोटी काळी माकडे इथे वावरत असतात. ब्रेकफास्ट, लंच, डिनर टेबलवरची फळे देऊन पर्यटक त्यांची चंगळ करत असतात. झुम्बा लॉजमधल्या जेवणात स्थानिक फळांचा, भाज्यांचा व माशांचा समावेश होता. ॲवाकाडो ज्यूस, जॅकेट पोटॅटो, रोस्टेड स्वीट पोटॅटो, पम्कीन सूप, बीटरूट सॅलड, कट पायनापल, गवा डेझर्ट याशिवाय नदीतील उदंड माशांपासून केलेले ग्रिल्ड व रोस्टेड पदार्थ असायचे.

ॲमेझॉनचा निरोप घेऊन आम्ही मानवस शहरात परतलो आणि तिथून विमानाने रिओ दी जानेरो या ब्राझीलच्या राजधानीत आलो. रिओ या शब्दाचा पोर्तुगीज भाषेतील अर्थ म्हणजे नदी आणि जानेरो म्हणजे जानेवारी महिना. पोर्तुगीज खलाशांनी ब्राझीलच्या भूमीवर १५०० मध्ये पाय ठेवला, तेव्हा ब्राझीलजवळचा उपसागर (बे) त्यांना नदीसारखा वाटला. ते जानेवारी महिन्यात इथे पोहोचले म्हणून त्यांनी या शहराचे नाव रिओ दी जानेरो ठेवले. पोर्तुगीजांनी १५०० ते १८२२ अशी ३२२ वर्षे ब्राझीलवर राज्य केले. शेवटी १८२२ मध्ये ब्राझीलला स्वातंत्र्य मिळाले, ते कोणत्याही लढाईशिवाय.

पोर्तुगीज राजघराण्यातील कौटुंबिक वाटणीचा करार म्हणून ब्राझील स्वतंत्र झाले. पोर्तुगीज राजघराण्यातील एका राजपुत्राने ब्राझीलची कॉलनी सांभाळावी आणि राजा व दुसऱ्या राजपुत्राने इतर पोर्तुगीज साम्राज्य सांभाळावे, अशी ती वाटणी होती. १८२२ मधील पोर्तुगीज साम्राज्यामध्ये मोझांबिक, अंगोला, माकाव, तिमोर आणि गोवा, दमण, दीव यांचा समावेश होता. ब्राझीलवरचा पोर्तुगालचा आणि पोर्तुगीज भाषेचा प्रभाव आज पावलोपावली दिसून येतो. त्यामुळे गोमंतकीयांना ब्राझीलबद्दल खास आत्मीयता असणे स्वाभाविक आहे. कोकणी भाषेत काही अंशी पोर्तुगीज शब्द रुळल्यामुळे म्हणा किंवा गोव्याच्या स्वातंत्र्याच्या सात-आठ वर्षांपूर्वी जन्मलेल्या माझ्यासारख्याला बरीच पोर्तुगीज शब्दावली माहिती असल्यामुळे म्हणा- ब्राझीलमध्ये मला भाषेची अडचण जाणवली नाही.

ब्राझीलच्या टीव्हीवर भारतीय सोप ऑपेरावर आधारित काही सिरियल्स लोकप्रिय झाल्या आहेत. त्यामुळे ब्राझिलियन लोकांना ‘नमस्ते’ हा भारतीय शब्द माहीत आहे. आमची वेषभूषा पाहून आम्ही भारतीय आहोत याचा त्यांना अंदाज येई आणि ‘नमस्ते’ म्हणून ते आम्हाला अभिवादन करीत. आम्ही ‘कॉमिश्ता’ (कसे आहात?) असा प्रतिप्रश्न केल्यावर किंवा ‘मुय्त ओब्रिगाद’ (शतशः धन्यवाद) म्हणून शुद्ध पोर्तुगीज भाषेतून संवाद साधल्यावर ते आश्चर्यचकित होत व खूष होत. भाषा ही हृदयाचे कुलूप उघडण्याची किल्ली असते, हेच खरे!

रिओ दी जानेरो हे शहर अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. कोपा काबाना हा मुंबईतील मरिन ड्राइव्हसारखा समुद्रसन्मुख मार्ग आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या रस्त्याला समांतर असा सायकलस्वारांसाठी वेगळा आणि पादचाऱ्यांसाठी वेगळा मार्ग आखलेला आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाळूची सुंदर शिल्पे केलेली दिसतात. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रेस्टॉरंट्‌स व हॉटेल्स आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला (३१ डिसेंबर) कोपा काबाना समुद्रकिनारा हजारो स्थानिक लोकांनी आणि पर्यटकांनी खचाखच भरून जातो. रात्रभर इथे जल्लोष असतो.

रिओ दी जानेरो शहरात कोकोवाडो नावाचा ७१० मीटर उंचीचा डोंगर आहे. या डोंगरावरील झाडे काही वर्षांपूर्वी रबराची लागवड करण्यासाठी कापून टाकण्यात आली होती, पण याचा पर्यावरणीय दुष्परिणाम दिसल्यानंतर तिथे विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. ब्राझीलच्या जमिनीचा ६० टक्के भाग जंगलांनी व्यापलेला आहे, तरीही त्यांनी शहरी जंगले (अर्बन फॉरेस्ट्‌स) नावाची संकल्पना पुढे आणली. कोकोवाडो डोंगरापासून ती राबवायला सुरुवात केली आणि यशस्वी करून दाखवली. लंडन शहराने यापासून धडा घेऊन शहराचे विद्रूप महानगर होऊ नये म्हणून शहराभोवती हरित पट्टा विकसित केला आणि शहरी जंगलाच्या आत हे लंडन शहराचे ‘बेट’ सुरक्षित ठेवले. कोकोवाडो डोंगरावर जायला एक मिनी ट्रेन आहे. या डोंगरावर ख्रिस्ताचा ३८ मीटर उंचीचा आणि २८ मीटर रुंदीचा पुतळा आहे. त्याला ‘ख्रिस्तो दी रिडीमर’ असे म्हणतात. हा ख्रिस्ताचा पुतळा रिओ दी जानेरो शहरातून सगळीकडून सन्मुख किंवा पाठमोरा तरी दिसतो.

ख्रिस्ताचे हे शिल्प जगातील सातवे आश्चर्य मानले जाते. हा पुतळा १९२२ मध्ये बांधायला सुरुवात झाली. प्रत्यक्ष पुतळा स्थानापन्न होईपर्यंत वर्ष १९३१ उजाडले. फ्रेंच शिल्पकार पॉल लॅण्डव्हस्की यांनी हे शिल्प तयार केले, पण रोमेनियन शिल्पकार घेरशे होनिश यांनी ख्रिस्ताच्या शिल्पाच्या चेहऱ्यावर अखेरचा हात फिरविला. ब्राझिलियन अभियंता हॅक्टर द सिल्वा कॉश्ता आणि फ्रेंच अभियंता अल्बर्ट कॉट यांनी हा ६३५ टन वजनाचा पुतळा उभारायला तांत्रिक मदत केली. रिओ दी जानेरोमधला दुसरा प्रसिद्ध डोंगर म्हणजे शुगर लोफ माउंटन. तो गुळाच्या ढेपेसारखा दिसतो, म्हणून त्याला हे नाव पडले. या डोंगरावर केबल कारने जावे लागते. डोंगरावरून रिओ दी जानेरो शहराचे व जवळच्या अटलांटिक महासागराचे विहंगम दृश्य दिसते. लॅटिन अमेरिकेच्या माझ्या प्रवासात एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली. ती म्हणजे, इथल्या शहरात अनामिक चित्रकारांनी रंगवलेल्या चित्रांकित भिंती. रिओ दी जानेरो शहरातही अशा मॉडर्न आर्ट्समध्ये रंगवलेल्या सुंदर भिंती आहेत. शहराला त्या नक्षीदारपणा देतात. रिओ दी जानेरो शहरातील इमारतींना उबदार, तजेलदार, पिवळे, निळे, गुलाबी रंग आहेत. त्यामुळे शहर ताजे-टवटवीत वाटते. रिओ दी जानेरो शहराला चंद्राप्रमाणे दुसरी बाजू आहे.

शहरात एका बाजूला प्रचंड टोलेजंग इमारती आहेत, तर डोंगराच्या पायथ्याशी अस्ताव्यस्त पसरलेली झोपडपट्टी आहे. झोपडपट्ट्यांना इथे ‘फावेला’ म्हणतात. या शहरात अशा ४०० फावेला आहेत. फावेलातली घरे विटांची आहेत. त्यांना नळातून पाणी, वीज ही सोय आहे. म्हणजे भारतीय शहरांतील झोपडपट्ट्यांइतकी इथली परिस्थिती बिकट नाही. पण इथल्या फावेलांतून गुन्हेगारांची फौज निर्माण होते. बेकार, हिंसक तरुणांचा तांडा निर्माण होतो. त्याचबरोबर याच फावेलांतून सांबा हे ब्राझिलियन नृत्य करणारे नर्तक, नर्तिका, गायक, फुटबॉलपटूही जन्माला येतात, हेदेखील तेवढेच खरे!

रिओ दी जानेरोच्या आमच्या तीन दिवसांच्या वास्तव्यात आम्ही तिथले सांबा नृत्य पाहायला गेलो. तो अनुभव अप्रूप होता. हे फावेलात राहणाऱ्या आफ्रिकन लोकांनी विकसित केलेले नृत्य. एके काळी या नृत्यामागे कोणतेही वलय, ग्लॅमर नव्हते. आज हे ब्राझीलचे राष्ट्रीय नृत्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. सांबा नृत्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला नर्तक आणि नर्तिका प्रेक्षकांना त्याबद्दल प्राथमिक माहिती देतात आणि ते कसे करायचे याचे ढोबळ पूर्वशिक्षण देतात. मग सांबा नृत्य सुरू होते. आकर्षक संगीत आणि रंगीबेरंगी प्रकाशझोतात कमनीय देहाच्या नर्तिका मोरपिसाऱ्यासारखे पिसारे लावून संगीताच्या तालावर नाचत असतात. अवसान आल्यासारखे नर्तकही नाचत असतात. त्या नृत्यात उत्स्फूर्तता असते, स्वच्छंदता असते. क्षणभर वाटते, या नृत्याला कोणतेच यमनियम नसावेत.

प्रेक्षक नृत्यात गुंग होतात. खरी मजा तर नृत्याच्या शेवटी असते. कार्यक्रम संपल्यावर नर्तक- नर्तिका प्रेक्षागृहात येऊन प्रेक्षकांत मिसळतात. काही प्रेक्षकांना घेऊन रंगमंचावर जातात. तिथे प्रेक्षकांसह नाचू लागतात, तर काही नर्तिका प्रेक्षकांसह प्रेक्षागृहातच नाचू लागतात. रंगमंच आणि प्रेक्षागृह यातील सीमारेषा पुसून जाते. कार्यक्रमाची औपचारिकता संपून अनौपचारिकतेचा प्रांत सुरू होतो. प्रेक्षक बेहोष होतात. आपल्याला हवे तसे नृत्य करू लागतात. हा अनुभव वेगळाच असतो, अनोखा असतो. नाटकीपणा संपतो. अनुभवाचे जिवंतपण, सेंद्रियपण सुरू झालेले असते!

नृत्याप्रमाणे ब्राझीलचे फुटबॉलवरपण प्रेम आहे. निसर्गाने ब्राझिलियन माणसाला सांबा नृत्याला आणि फुटबॉल खेळायलाच पाय दिले असावेत. आज ७८ वर्षांचा पेले हा ब्राझीलचा आयकॉन आहे. ५ फूट ८ इंच उंचीचा पेले १५ व्या वर्षी फुटबॉल खेळू लागला. त्याने १६ व्या वर्षी ब्राझीलच्या संघात प्रवेश मिळवला. १९५८, १९६२ आणि १९७० चा विश्वचषक त्याने ब्राझीलला मिळवून दिला. दुखापतीमुळे १९६६ च्या विश्वचषक स्पर्धेत पेले खेळू शकला नाही, त्यामुळे त्या वर्षी ब्राझील विश्वचषक जिंकू शकला नाही. ९२ आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळताना पेलेने ७७ गोल केले. फुटबॉल या राक्षसी, हिंसक मानल्या गेलेल्या खेळाला पेलेने ‘द ब्युटिफुल गेम’ अशा सुंदर खेळात रूपांतरित केले. पेलेची देहबोली, त्याचे डोळे, बोलणे, हास्य फार ऋजु, पारदर्शी, नम्र आहे. तो श्रेष्ठ खेळाडूच नाही, तर तो सत्शील नागरिकही आहे.

दुर्गापूजेशी कोलकाता शहराचे, दसऱ्याशी म्हैसूरचे, गणेश चतुर्थीशी पुणे-मुंबईचे जे नाते आहे, तेच कार्निव्हल उत्सवाशी रिओ दी जानेरोचे आहे. कार्निव्हल उत्सवात रिओ दी जानेरो शहराला आनंदाचं उधाण येतं. शहराचा प्रत्येक रस्ता रंगमंच असतो. संध्याकाळी सांबा नृत्याचे फ्लोट्‌स शहराच्या रस्त्या-रस्त्यावरून जातात. रंगीबेरंगी इंद्रधनुष्यी वस्त्रे नेसलेल्या नर्तिका उघड्या वाहनांवर नाचत हजारो प्रेक्षकांना आणि पर्यटकांना अभिवादन करतात. कार्निव्हलच्या तीन दिवसांत शहरात सुमारे ४०० स्ट्रीट पाटर्या होतात. ताव्हेर्न्स आणि रेस्टॉरंट्‌समधून वाईनचे घुटके घेत लोक सी फूड आणि बीफ स्टेक यांचा आस्वाद घेतात.

रिओ दी जानेरोपासून दीड तासाच्या अंतरावर पेत्रोपोलीस नावाचे हिलस्टेशनवजा शहर आहे. पोलीस म्हणजे शहर. पेद्रूचे शहर म्हणजे पेत्रोपोलीस. पेद्रू राजाचे हे समर रिट्रीट. इथे आम्ही त्याचा राजवाडा पाहिला. म्युझियम पाहिलं. पोर्तुगीज आर्किटेक्चरने श्रीमंत लोकांचे बांधलेले बंगले पाहिले. पोर्तुगीज आर्किटेक्चरमध्ये एक सूक्ष्म सामाजिक अंतर्प्रवाह आहे. बंगल्यात राहणाऱ्याचा सामाजिक व आर्थिक दर्जा जेवढा उच्च, तेवढी त्या बंगल्याची प्लिंथ उंचावर हवी. त्या बंगल्याला तेवढ्या जास्त पायऱ्या हव्यात. पेत्रोपोलीस शहरात आम्ही खास ब्राझिलियन पद्धतीचे जेवण घेतले. या जेवणाला ‘चुरासकारिया’ असे म्हणतात. प्रथम आम्ही ‘ब्रह्मा’ ही स्थानिक ब्राझिलियन ब्रॅण्डची बिअर घेतली. मग टॅग सॅलड, मॅश पोटॅटो, व्हेजिटेबल सप्लीमेंट, पम्कीन सूप वगैरे पदार्थ चाखले. नंतर खरपूस भाजलेले व खमंग चिकन, बीफ, पोर्क यांचे तुकडे आम्हाला सर्व्ह करण्यात आले. मग सॉसेजीस आणि गार्लिक ब्रेड यांचा कोर्स आला. डेझर्ट म्हणून भाजलेले आणि साखरेच्या पाकाने लेपलेले केळे आणि पेरापासून बनवलेले पुडिंग या स्वीट डिशेस आल्या.

ब्राझिलियन जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यात मूळ पदार्थाची चव चाखता येते. भारतीय पाकशास्त्रात मीठ, मिरची, मसाले, तेल, तूप, साखर यांच्या माऱ्यामुळे मूळ  पदार्थाची चव हरवून जाते. अनेक वेळा पार्श्वसंगीताच्या अवडंबरामुळे मूळ संगीताची गोडी घेताच येत नाही. यामुळे एकदा गानसम्राज्ञी किशोरी आमोणकर यांनी आपल्याला कोणत्याही वाद्याशिवाय किंवा पार्श्वसंगीताशिवाय शास्त्रीय गायन करायचे आहे, असे विधान केले होते. ब्राझिलियन जेवणात पदार्थावर मसाल्यांचा वर्षाव टाळला जातो. मसाले असलेच तर ते मंद, हलकेच शिंपडलेले असतात. त्यामुळे बीफ, पोर्क, चिकन, मशरूम, एग या पदार्थांची मूळ चव अनुभवता येते.

‘चुरासकारिया’ जेवणाची तीच तर खासियत आहे. जेवणाला अग्नी जी खरपूसता देईल, तेवढीच. भाजणे किंवा उकडणे यापलीकडे पदार्थ तळणे किंवा तेला-तुपात फ्राय करणे नाही. त्याशिवाय मांसाहारी पदार्थाबरोबरच पालेभाज्या व फळे यांचा भरपूर समावेश असल्याने जेवणाची लज्जत वाढते. मद्य, खाद्य, नृत्य, खेळ, सण... ब्राझील हा जीवनावर बेहद्द प्रेम करणारा देश आहे. जॉय दी व्हिवरे (joie de vivre) हे फ्रेंच शब्द जणू ब्राझीलसाठीच घडवलेले आहेत!

वास्तविक ब्राझीलपुढे अनेक ऐहिक प्रश्न आहेत. जल, जंगल, जमीन आणि जैविक संपत्ती असूनही हा देश गरीब आहे. देशात लोह, झिंक, बॉक्साईट, टिन, सोने, हिरे, कोळसा यांच्या खाणी आहेत. तेलाच्या विहिरी आहेत. संत्री, ऊस, तंबाखू, सोयाबीन, कॉफी ही पिके आहेत. ब्राझील हा जगातील गोमांसाचा सर्वांत मोठा निर्यातदार आहे. एके काळी ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या पाच देशांना भावी महासत्ता म्हणून ओळखले जाई; पण राजकीय अस्थिरता व भ्रष्टाचार यामुळे ब्राझील मागे पडला.

ब्राझीलमध्ये आज प्रचंड आर्थिक विषमता आहे. शाळागळतीचे प्रमाण मोठे आहे. बेकारी आहे. ब्राझिलियन लोकांचा धर्म कॅथॉलिक असल्याने तिथे गर्भपाताला बंदी आहे. कुटुंबात तीनपेक्षा जास्त मुले असतात. गरीब कुटुंबात हे प्रमाण अधिक असते. त्यामुळे गरिबीचे दुष्टचक्र चालूच राहते. घटस्फोटाचे प्रमाण फार मोठे आहे. हिंसाचार व गुन्हेगारी आटोक्यात आलेली नाही. ब्राझिलियन समाज सांस्कृतिक व सामाजिक दृष्टीने पोखरलेला आहे.

अनेक वर्षांपूर्वी मॅक्स वेबरने ‘प्रोटेस्टंट इथिक्स ॲन्ड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम’ नावाचे पुस्तक लिहिले होते. त्याच्या मते, कॅथॉलिक धर्माची तत्त्वे भांडवलशाहीच्या अर्थात औद्योगिक विकासाच्या विरोधी आहेत. याउलट प्रोटेस्टंट धर्माची चौकटीबाहेर विचार करण्याची वृत्ती, साधेपणा, बंडखोरी, बचत करण्याची सवय, इहवादी दृष्टिकोन ही तत्त्वे औद्योगिक विकासाला उपयुक्त ठरतात. मॅक्स वेबरचे म्हणणे कालांतराने तंतोतंत खरे ठरले.

जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका हे प्रोटेस्टंट देश प्रगत झाले; तर पोर्तुगाल, स्पेन, आयर्लंड, ब्राझील हे कॅथॉलिक देश मागे पडले. गोव्यातही कॅथॉलिक धर्माची विकासविरोधी भूमिका मला पदोपदी जाणवते. म्हणूनच ब्राझीलच्या माझ्या वास्तव्यात गोव्याचा ब्राझील होऊ नये, असे नेहमी वाटत राहिले. कोकोवाडो डोंगरावरील ख्रिस्तो द रिडीमर आपले दोन्ही हात उभारून महाभारतकार महर्षी व्यासाप्रमाणे विचारत आहेत

ऊर्ध्वबाहूविरोम्येष न च
कश्चित्‌ श्रुणोति माम्‌

खरं म्हणजे ख्रिस्ताबद्दल पूर्ण आदर ठेवून म्हटले पाहिजे, ब्राझीलच्या लोकांनी ख्रिस्ताचे धर्मवचन ऐकले आहे. पण ते ऐकल्यामुळेच आणि पाळल्यामुळेच त्यांचे ऐहिक सुखवर्धन झालेले नाही. ब्राझीलचे वैशिष्ट्य हे की, ते परिस्थितीने गांजून गेले नाहीत. त्यांनी ‘ब्र’ काढला नाही. जीवनावर त्यांनी बेहद्द प्रेम केले. त्यांनी परलोकाची आशा ठेवली नाही. इहलोकावर त्यांचा जीव जडला. त्याही दृष्टीने त्यांनी ख्रिस्ताचा पराभवच केला!

दत्ता दामोदर नायक, गोवा
kdnaik@cdhomes.com

Tags: प्रवासवर्णन पर्यटन पोर्तुगीज सांबा नृत्य रिओ दि जानेरो ॲमेझॉन ब्राझील travelogue parytan Portuguese datta damodar nayak samba dance rio de janeiro amazone brazil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके