डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

न्यूझीलंडची ही ‘समुद्रवसना पर्वतस्तनमंडला’ अशी समुद्राचे वस्त्रे नेसलेली आणि डोंगराचे स्तन असलेली सुजलाम्‌-सुफलाम्‌ सस्यश्यामलाम भूमी आणि तिच्या लंपट ओल्या वस्त्राकडे फ्लर्टिंग करणारा हा मस्तवाल मवाली वारा! न्यूझीलंडला एकाच दिवशी चारही सीझन्स दिसू शकतात. समर, विन्टर, रेनी सीझन आणि ऑटम. अशा चारही ऋतूंची सरमिसळ झालेला निसर्ग अंतरा-अंतरावर दिसतो. म्हणून ह्या देशाला शतवदन- शंभर मुखांचा देश असेही म्हणतात. न्यूझीलंडच्या निसर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कौमार्य- त्याची व्हर्जिनिटी! आदिम काळात निसर्गाच्या संगतीने मानव जसा राहत असेल, ते चित्र आपल्याला न्यूझीलंडच्या खेड्यात आजही जसेच्या तसे पाहायला मिळते. 

मी न्यूझीलंड पाहायचा बेत एका मित्राला सांगितला तेव्हा तो म्हणाला, ‘‘न्यूझीलंडला का जातोस? नॉर्वेला गेला आहेस ना? मग नॉर्वे आणि न्यूझीलंड या देशांत काहीएक फरक नाही.’’

वास्तविक, मला हा उपदेश करणाऱ्या मित्राने नॉर्वेलाही भेट दिली नव्हती आणि न्यूझीलंडही पाहिला नव्हता.

मी हसलो. मनातल्या मनात म्हटले, ‘परत नॉर्वेला गेल्यावर एकदा पाहिलेला नॉर्वेसुद्धा वेगळाच दिसेल.’ मला बुद्धाचा ‘अनित्यबोध’ सिद्धांत आठवला. जगात सनातन म्हणजे न बदलणारे- शाश्वत असे काहीच नसते. सगळे सतत बदलत असते. विज्ञान तर म्हणते, ‘ज्या वेगाने जग बदलते, तो वेगदेखील बदलत असतो.’

‘एकाच नदीत तुम्ही दोन वेळा अंघोळ करू शकत नाही’ अशी झेन म्हण आहे. पहिल्या वेळी नदीच्या ज्या पाण्यात तुम्ही अंघोळ करता, ते पाणी दुसऱ्या वेळी वाहून गेलेले असते; दुसऱ्या वेळी तुम्ही नव्या पाण्यात अंघोळ करता!

नव्या देशात जाताना तुम्ही नवी नजर घेऊन जायला हवे. लिओनार्दो द व्हिन्सी यांनी सौंदर्याची उपासना करताना ‘आपली पंचेंद्रिये तल्लख असायला हवीत’ असा उपदेश केला आहे. कला, साहित्य आणि सैम (निसर्ग) यातील  सौंदर्याचा आस्वाद घेताना आपले डोळे लहान मुलासारखे उत्सुकतेने, कुतूहलाने शिगोशीग भरून गेले पाहिजेत. आपले नाक नव्या वास-सुवासांची तरलता हुंगायला तत्पर हवे. आपले कान नव्या देशातील पक्ष्यांचे कूजन ऐकण्यासाठी कानस व्हायला पाहिजेत. आपल्या जिभेचे कळे नव्या देशांतील पाककलेचे सारे रस चाखायला आतूर व्हावेत आणि आपले स्पर्श फुलांच्या पाकळ्यांचा मुलायम स्पर्श, काट्याचे काटेरीपण, खडकांचे खडबडीतपण, वाहत्या पाण्याचे झुळूझुळू ओलसरपण यांचे स्पर्शसुख घ्यायला उतावीळ झाले पाहिजेत.

न्यूझीलंडसारख्या देशांत कंडक्टेड टूरने जाणे म्हणजे मूर्खपणा आहे. एखाद्या सुगरणीने सुग्रास जेवण न करता मॅगीचे ‘मिनिट्‌स न्यूडल्स’ आणून उकळून खाण्यासारखे ते आहे. अशा देशाच्या प्रवासाची आखणी आपण इंटरनेटच्या आधारे किंवा ह्या देशात जाऊन आलेल्या मित्रांची मदत घेऊन केली पाहिजे.

न्यूझीलंडसारख्या देशात एका शहरातून दुसऱ्या शहरात विमानाने जाणेही चुकीचे आहे. या देशाचा प्रवास मोटारीने किंवा बसने केल्याशिवाय या देशाचा बहुविध निसर्ग आपल्याला दिसणार नाही.  निसर्गसौंदर्याने नटलेला न्यूझीलंड हे ऑईल पेंटिंगमध्ये केलेले चित्र नाही. ते ताज्या, वाहत्या वॉटर कलर, जलरंगांत केलेले आहे आणि ते अजून पूर्ण झालेले नाही. कोणी अज्ञात-अनामिक चित्रकार अजून ते चित्र रंगवतोच आहे. क्षणाक्षणाला, ऋतू-ऋतूत त्यात बदल करतो आहे.

 न्यूझीलंड हा दोन बेटांचा देश आहे. उत्तर न्यूझीलंड आणि दक्षिण न्यूझीलंड. ऑकलंड, रोटोरुआ आणि न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन ही शहरे उत्तरेच्या बेटांत; तर ख्राइस्ट चर्च, क्वीन्सड्युनेडीन आणि ड्युनेडीन ही शहरे दक्षिण बेटात येतात. न्यूझीलंड पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात आहे. त्यामुळे उत्तर गोलार्धात असलेल्या आपला देशांत हिवाळा सुरू होतो, तेव्हा तिथे वसंत ऋतूचे दिवस असतात. म्हणूनच सूर्य दक्षिणायनात असताना आम्ही न्यूझीलंडला जायचे ठरवले.

दि.21 मार्च ते 21 सप्टेंबर हा सूर्याचा उत्तरायणाचा काळ, तर 22 सप्टेंबर पासून 20 मार्चपर्यंत सूर्याचे दक्षिणायन चालू असते.

आम्ही ऑकलंडला पोचलो, तेव्हा पाऊस नुकताच पडून गेला असावा. हवेत गारवा होता. तिन्हीसांजा झाल्या होत्या. आकाश नारिंगी रंगाचे झाले होते. इंग्रजीत अशा आकाशाला ‘मार्मालेड स्काय’ अशी समर्पक संज्ञा आहे. पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरचे ऑकलंड शहर म्हणजे न्यूझीलंडमधले मोठे बंदरच आहे. त्याला खलाशांचे शहर अर्थात ‘सेलिंग सिटी’ म्हणतात. ऑकलंडमधला प्रत्येक तरुण पोहायला शिकतो. होड्या हाकायला शिकतो. बहुतेक तरुण जहाजावर नोकरी धरतात आणि सातासमुद्रावर आपले अर्धे-अधिक जीवन घालवतात. न्यूझीलंडचे रहिवासी हे साहसी आहेत. बंगी जंपिंग म्हणजे उंच इमारतीवरून कमरेला दोरी बांधून उडी मारण्याचा खेळ येथे खूप लोकप्रिय आहे. न्यूझीलंडमध्ये बर्फाच्छादित पर्वत आहेत. तिथे गिर्यारोहण करण्याचा त्यांना छंद आहे. माऊंट एव्हरेस्टवर शेर्पा तेनसिंगसमवेत सर्वप्रथम पाय ठेवण्याचा मान मिळवणारे सर एडमंड हिलरी हे न्यूझीलंडचे सुपुत्र आहेत. माऊंट कुकच्या पायथ्याशी त्यांचा पुतळा आहे. न्यूझीलंडच्या नोटांवर त्यांचा फोटो आहे. राष्ट्रीय नेत्याएवढा सर एडमंड हिलरींना इथे मान आहे.

आम्ही न्यूझीलंडमध्ये होतो, तेव्हा तिथे जागतिक रग्बी स्पर्धा चालली होती. त्यांत भाग घेतलेल्या न्यूझीलंडच्या टीमचे नाव होते ‘ऑल ब्लॅक्स’. संपूर्ण काळ्या रंगाचे टी शर्ट घालून या टीमचे खेळगडी खेळत होते. शेवटी अंतिम स्पर्धेत याच टीमने वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा न्यूझीलंडमध्ये एकच जल्लोष झाला. पंतप्रधान जॉन कॅरीने त्या दिवशी सुटी जाहीर केली. हजारो लोक नाचत-गात रस्त्यावर आले. शॅम्पेनच्या बाटल्या फोडत न्यूझीलंडच्या लोकांनी रात्रभर उत्सव साजरा केला. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी पर्यटन खाते स्वत:कडे ठेवून पर्यटनाला हा देश किती महत्त्व देतो ते अधोरेखित केले आहे.

सकाळी टीव्ही लावला तेव्हा आधी इंग्रजीतून आणि मग न्यूझीलंडच्या आदिवासी लोकांच्या मावरी भाषेतून बातम्या सांगण्यात आल्या. त्यानंतर लगेच मूक-बधिर लोकांसाठी चिन्हांकित भाषेतून बातम्या प्रसारित झाल्या. आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट ही की- न्यूझीलंडने इंग्रजी, मावरी व चिन्हांकित अशा तिन्ही भाषांना राज्यभाषेचा दर्जा दिलेला आहे! ऑकलंड शहराला मोकळे, स्वागतशील (ओपन सिटी) शहर असे म्हणतात, कारण जगभरातील कुठलेही लोक इथे स्थलांतर करून राहू शकतात. मुळात न्यूझीलंडला मानवी संसाधन बळाची गरज आहे. त्यामुळे सर्व देशांतील अकुशल, निम्न-कुशल व कुशल मानवी बळाचे हा देश स्वागत करतो.

गौतम व अनिता आणि त्यांचा मुलगा विदीत हे माझे नातेवाईक ऑकलँडला राहतात. गौतम सोलर एनर्जीच्या क्षेत्रात संशोधन करतो, तर अनिता डॉक्टर आहे. न्यूझीलंड पर्यटनाबरोबरच पर्यावरणाला खूपच महत्त्व देते. इथे अणुविद्युत केंद्र नाही. ‘क्लीन एनर्जी’ हे या देशाचे ब्रीदवाक्य आहे, त्यामुळे सौरशक्तीच्या आधारे वीजनिर्मिती करणाऱ्या संशोधनास हा देश खूप अनुदान देतो. त्याशिवाय हायड्रल पावर, कोळसा, तेल व वारा यांपासून न्यूझीलंडमध्ये वीजनिर्मिती होते.

गौतमने न्यूझीलंडविषयी खूप माहिती सांगितली. या देशात एकही सर्प नाही. मगरी नाहीत, माकडे नाहीत. कुठलेही सरपटणारे किंवा उडणारे भक्षक प्राणी-पक्षी नाहीत. त्यामुळे येथील इतर प्राणी, पक्षिजीवन भयविरहित वाढले आहे. किवी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे. म्हणून या देशाला आणि देशाच्या क्रिकेट संघाला किंवीज म्हणत असावेत.

गौतमच्या घरी वाईनबरोबर वेगवेगळ्या चीजचा आस्वाद घेतला. न्यूझीलंडमध्ये दुग्धव्यवसाय फार जोरात चालू आहे. येथील चीज अतिशय पौष्टिक आणि रुचकर आहे. भारतात अमुल तशी येथील फॉन्तेरा ही कंपनी दुग्धव्यवसायात अग्रेसर आहे. तिचा ‘कापिती’ हा ब्रॅन्ड फार लोकप्रिय आहे. दर पर्यटक न्यूझीलंडहून परतताना कापिती चीज घेऊन जातो.

 न्यूझीलंडमध्ये माणसांपेक्षा मेंढरे जास्त आहेत. त्यांच्या लोकरीपासून वुलनचे कपडे बनवतात. ते इथे स्वस्त मिळतात. त्याशिवाय न्यूझीलंडमध्ये अनेक फळे वर्षभर मुबलक प्रमाणात मिळतात. क्रॉमवेल हे खेडे तर फळफळावळीसाठी प्रसिद्ध आहे. या खेड्यात प्रवेश करताना वेगवगळी फळे असलेल्या एका फळाच्या टोपलीच्या शिल्पाने आमचे स्वागत केले. क्रॉमवेलात सगळी फळे पिकतात. ॲपल आणि पायनापल, ॲप्रिकॉट आणि ऑरेंजेस, पीच आणि पेअर, लेमन्स, ग्रेप्स आणि वेगवेगळ्या बेरीज- रासबेरीज, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरीज, क्रेनबेरीज. क्रॉमवेलमध्ये फळांपासून कॅन्डीज, जॅम्स, ड्रायफ्रूट्‌स, ज्यूस, आइस्क्रीम, सिरप्स, हनी असे अनेक पदार्थ बनवतात. क्रॉमवेलच्या दुकानात जाणे हे नेत्रसुखच असते. रंगीबेरंगी फळांचा डिस्प्ले एका बाजूला असतो आणि दुसऱ्या बाजूला फळांपासून बनवलेल्या पदार्थांचा काऊंटर असतो. दुकानदाराने आम्हाला सांगितले- येथील बागायतदारांकडे तीन-चार तरी हेलिकॉप्टर्स असतात. पहाटे तापमान 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली उतरतले आणि बागेवर धुके पसरू लागले की, बागायतदार आणि त्याचे कर्मचारी एकेक हेलिकॉप्टर घेऊन फळबागांवर वाऱ्याचा फवारा उडवतात आणि धुके व दव यांपासून पिकांचा सांभाळ करतात. या देशात माकडे नसल्यामुळे बागायतदार निर्धास्त असतात. 

न्यूझीलंडमध्ये फळांप्रमाणे सर्व प्रकारचे मासे मुबलक मिळतात. त्यामुळे मासेमारीचा धंदा जोरात चालतो. ऑकलंडचे ॲक्वेरियम जगप्रसिद्ध आहे. तिथे जाताना एका बोगद्यातून जावे लागते. बोगद्याच्या तिन्ही बाजूने आरसे लावलेले आहेत. आरशांमागे पाणी आणि पाण्यात वेगवेगळे रंगीबेरंगी लहान-मोठे मासे स्वच्छंदपणे पोहत असतात. हे छोटे-मोठे मासे म्हणजे दर्याच्या सामुद्रिक भाषेतील विरामचिन्हे! आभाळात पक्षी, तसे समुद्रात मासे.

न्यूझीलंडात पेंग्विन पक्षी नाहीत. हे पक्षी दिसतात ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर. आम्ही न्यूझीलंडला गेलो त्याच्या दोनेक महिने आधी एक पेंग्विन पक्षी पोहत चुकून न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर पोचला. 20 जून 2011 ची संध्याकाळची वेळ. क्रिस्टीन विल्टन नावाची स्त्री आपल्या कुत्र्याला घेऊन वेलिंग्टनच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला  गेली होती. तिचा कुत्रा अचानक भुंकायला लागला, तेव्हा क्रिस्टीनचे लक्ष एका तीन फुटांच्या छोट्या पेंग्विन पक्ष्याकडे गेले. पेंग्विन खूप अशक्त झाला होता आणि भुकेला होता. क्रिस्टीनने लगेच पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पेंग्विनला जनावरांच्या हॉस्पिटलात दाखल केले. पेंग्विनचे वय साडेतीन वर्षांचे असावे. वेलिंग्टनपासून 3000 किलोमीटर दूर असलेल्या अंटार्क्टिकाच्या पेंग्विन कॉलनीतून पोहत तो एवढ्या दूर आला असावा. येताना त्याला खायला फारसे काही मिळाले नसावे. हॉस्पिटलात एण्डोस्कोपी करून पेंग्विन पक्ष्याचे पोट साफ केले. मग माशांचा मिल्कशेक सतत दोन महिने त्याला देण्यात आला. पेंग्विन पक्ष्याला बर्फाच्या थंडगार लाद्यांवर झोपवण्यात आले. हळूहळू पेंग्विन सशक्त झाला. तोपर्यंत तो साऱ्या देशाच्या उत्सुकतेचा विषय झाला. त्याला ‘हेपी फीट’ असे नाव ठेवण्यात आले. पेंग्विन 28 किलो वजनाचा झाल्यानंतर त्याला समुद्रात सोडण्यास हरकत नाही, असे सर्टिफिकेट डॉक्टरांनी दिले. मग जहाजात बसवून त्याला 1000 किलोमीटर दूर समुद्रात सोडण्यात आले. तिथून त्याची कॉलनी 2000 किलोमीटर्स दूर होती. हा प्रवास हॅपी फिट पेंग्विनला एकट्याने पोहत करायचा होता. दि.4 सप्टेंबर 2011 ला हॅपी फीटला समुद्रात सोडण्यात आले. त्याच्या पंखांना इलेक्ट्रॉनिक सेन्सर लावण्यात आले. दि.9 सप्टेंबरपर्यंत सेन्सर येत राहिले. दि.10 सप्टेंबरला ते बंद झाले. हॅपी फीट पेंग्विनचे काय झाले? त्याच्या पंखावरचा सेन्सर बंद पडला, का त्याला महासागरातील शार्कने खाऊन टाकला? की हॅपी फीट आपल्या कॉलनीत जाऊन पोचला? कोणालाच काहीच कळले नाही. हॅपी फीट वाचावा आणि आपल्या कॉलनीत पोचावा, म्हणून न्यूझीलंडच्या लोकांनी चर्चमध्ये प्रार्थना केली. हॅपी फीटच्या कहाणीचा हॅपी एन्ड व्हावा, असे येसू ख्रिस्ताकडे मागणे केले.

ऑकलंडहून रोटोरुआला जायला निघालो. तेव्हा पहाटे दवाने सुस्नात न्हाऊन गेलो होतो. या प्रवासात पहिल्याच वेळी न्यूझीलंडची कंट्रीसाईड पहायला मिळाली. लहान लहान डोंगर त्याच्या सभोवताल सर्वदूर हिरवेगार कुरण, ह्या कुरणांवर स्वच्छंद चरणारी शेकडो मेंढरे.... नुकताच हिवाळा संपला होता. वसंत ऋतू सुरू झाला होता. निष्पर्ण झाडांना पालवी फुटली होती. चेरीची झाडे गुलाबी फुलांनी गच्च फुलली होती. हिरवा निसर्ग वस्त्रगाळ हळदीच्या उन्हाने भिजला होता. भूमितीचे, त्रिमितीचे, कलनशास्त्राचे सारे नियम तोडून या छोट्या डोंगरांनी विविध विलोभनीय आकार धारण केले होते. त्यामधून वाट काढत आमची बस पुढील वाटचाल करत होती. डोंगरांमधून मंद-शीतल वारा वाहत होता.

न्यूझीलंडमध्ये वाऱ्याची अनेक रूपे पाहिली. पर्वतीय वारा, सामुद्रिक वारा, थंड वारा, उष्ण वारा, धारोष्ण वारा, समशीतोष्ण वारा, मऊ-मुलायम-मखमली वारा, रौद्र, क्रूद्ध वारा! आणि प्रत्येक वाऱ्याला इथे वेगळे नाव. एस्किमोंच्या प्रदेशात बर्फाच्या वेगवेगळ्या स्थितीला वेगवेगळे नाव, तसे न्यूझीलंडमध्ये वेगवेगळ्या वाऱ्यांना वेगवेगळी नावे. 40 अक्षांशावरून येणारा वारा घोंगावत येतो, म्हणून त्या वाऱ्याचे नाव रोअरिंग फॉर्टीज. 50 अक्षांशावरून येतो तो क्रुद्ध भडक वारा- त्याचे नाव फ्युरियस फिफ्टीस. आणि 60 अक्षांशावरून झणझणत येतो त्या आक्रंद करत येणाऱ्या वाऱ्याचे नाव स्क्रीमींग सिक्टीज!

न्यूझीलंडची ही ‘समुद्रवसना पर्वतस्तनमंडला’ अशी समुद्राचे वस्त्रे नेसलेली आणि डोंगराचे स्तन असलेली सुजलाम्‌-सुफलाम्‌ सस्यश्यामलाम भूमी आणि तिच्या लंपट ओल्या वस्त्राकडे फ्लर्टिंग करणारा हा मस्तवाल मवाली वारा! न्यूझीलंडला एकाच दिवशी चारही सीझन्स दिसू शकतात. समर, विन्टर, रेनी सीझन आणि ऑटम. अशा चारही ऋतूंची सरमिसळ झालेला निसर्ग अंतरा- अंतरावर दिसतो. म्हणून ह्या देशाला शतवदन- शंभर मुखांचा देश असेही म्हणतात. न्यूझीलंडच्या निसर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कौमार्य- त्याची व्हर्जिनिटी! आदिम काळात निसर्गाच्या संगतीने मानव जसा राहत असेल, ते चित्र आपल्याला न्यूझीलंडच्या खेड्यात आजही जसेच्या तसे पाहायला मिळते.

रोटोरुआ शहराला थर्मल सिटी म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखी जागृत होऊन ही भूमी वर आली. अजूनही या भूमीच्या पोटात अग्नी धगधगत आहे. या शहरात उष्ण पाण्याचे झरे (गिझर्स) आहेत. पर्यटकांना ही उष्ण पाण्याची कारंजी व त्यावरचे वाफाळ पांढरे धुके पाहायला नेतात. तिथेच उष्ण पाण्याचे तरणतलाव आहेत. त्या धारोष्ण पाण्यात पोहणे, हा एक अप्रूप अनुभव असतो. या शहराचा परिसर हा न्यूझीलंडच्या मूळ मावरी लोकांचे मूळ स्थान. शेकडो वर्षांपासून ते या परिसरात राहत आहेत. असे म्हणतात की, सुमारे 1000 वर्षांपूर्वी होड्यांत बसून ही जमात न्यूझीलंडमध्ये आली असावी. त्या रात्री आम्हाला मावरी लोकांचा गाव दाखवण्यात आला. त्यांची  घरे, त्यांची राहण्याची पद्धत, त्यांची वेषभूषा, त्यांची वस्त्रे हे पाहिल्यानंतर मावरी लोकांनी आपले परंपरागत संगीत व नाच यांचे दर्शन घडवले. त्यानंतर मावरी जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला. मावरी लोकांची जेवण करण्याची पद्धत म्हणजे एका खड्‌ड्यात लाकडे जाळायची आणि त्यावर मांस, भाज्या, बटाटे भाजायचे. त्यावर मीठ-मसाले घालून ते खमंग करून खायचे. हे मावरी जेवण आम्ही जेवलो आणि मध्यरात्री रोटोरुआला परतलो.

कॅप्टन कुक हा ब्रिटिश जहाजाचा कप्तान न्यूझीलंडला 1778 मध्ये पोचला आणि ब्रिटनला न्यूझीलंडचा शोध लागला. त्यानंतर ब्रिटनमधून शेकडो ब्रिटिश न्यूझीलंडमध्ये आले. येथील मावरी लोकांशी त्यांचे युद्ध झाले. मग तह झाला. तहाच्या अटींतही ब्रिटिशांनी मावरी लोकांची फसगत केली. आज न्यूझीलंडमध्ये 13 टक्के मावरी लोक आहेत. त्यांच्यासाठी राखीव जागा आहेत. त्यांची भाषा राजभाषा झाली आहे. मावरी लोक शिकून सर्व क्षेत्रांत पुढे आलेले आहेत. त्यांच्यात आणि मूळ ब्रिटिश वंशाच्या लोकांत लग्नेही आता होत आहेत. रोटी-बेटी व्यवहार सुरू झाले आहेत. पूर्वीचे वैर संपले आहे.

वेलिंग्टनला पोचलो तेव्हा दिवेलागण झाली होती. वेलिंग्टन ही न्यूझीलंडची राजधानी. क्वीन्स वॉर्फवरून रमत-गमत आम्ही डॉकयार्डमध्ये गेलो. इथे रांगेने अनेक रेस्टॉरंट्‌स आहेत. येथील एका समुद्राभिमुख रेस्टॉरंटमध्ये बसून आम्ही थंडगार बिअर घेतली आणि स्टेक खाल्ली. वेलिंग्टनच्या रित्या-सुन्न रस्त्यावरून वाट शोधत त्या काळोख्या रात्री हॉटेलवर आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे वेलिंग्टन सोडायचे असल्यामुळे शहराचा फेरफटका मारता आला नाही. वेलिंग्टन शहर हे न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरच्या दक्षिण टोकावर आहे.

दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही तिथून फेरीबोटीने दक्षिण बेटावरच्या पिक्टन गावात यायला निघालो. वेलिंग्टन ते पिक्टन ही समुद्रसफर नेत्रसुखद होती. वर गडद निळ्या-निळ्या आभाळाचा घुमट आणि सभोवती निळ्या निळ्या लाटांचा झोपाळा हलवणारा पॅसिफिक महासागर. निळ्या रंगाच्या किती छटा... गडद निळी, फिकट निळी. कृष्ण निळी, श्यामल निळी, श्वेत निळी, रक्त निळी, जांभूळ निळी, साळीक निळी, कमळ निळी! निळ्या न्यूझीलंडचे ते निळे-निलांगी नयनमनोहर रूपलावण्य! हे सगळे पाहायला डोळेही निळे हवेत आणि मनही मनस्वी निळे हवे! दर्याचे निवळशंख आरस्पानी पाणी कापत फेरीबोट पिक्टनच्या धक्क्याला लागली आणि तिथून तीन तासांच्या बसमधल्या प्रवासातून आम्ही कायकोराला पोचलो.

कायकोरा हा तसा लहानसा गाव आहे. ह्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे- हा गाव पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर आहे, तसाच एका उंच बर्फाच्छादित डोंगराच्या पायथ्याशी आहे. वॉलनट ब्राऊनीवर व्हॅनिला आइस्क्रीमचा स्कूप घालावा, तशी ती बर्फाच्छादित पर्वतशिखरे दिसत होती. कायकोरा गावात त्या रात्री राहिलो. दुसऱ्या दिवशी पहाटे समुद्रातील देवमासे (व्हेल्स) पाहण्यासाठी लाँचने बाहेर पडलो. देवमासा बुद्धिमान आहे. तो आकाराने मोठा असतो. काही देवमासे विमानाएवढे महाकार असतात. सुमारे दोन तासांनी खोल समुद्रात देवमाशांचा ‘कळप’ दिसला. मधेच एखादा देवमासा पाण्याबाहेर येऊन आपले तोंड दाखवत असे, तर कधी एखाद्याची शेपटी दिसत असे. ह्यातील एखाद्या देवमाशाने आमच्या लाँचला धडक दिली तर...? पोटात भीतीचा गोळा आला, पण आमचा गाईड म्हणाला, ‘‘आजवर तरी असे कधीच झालेले नाही.’’

दुसऱ्या दिवशी कायकोराहून निघालो. ख्राइस्ट चर्चला पोचेपर्यंत संध्याकाळ झाली. वाटेत दिसली न्यूझीलंडची छोटी-मोठे तळी, नद्या आणि सतत संगत देणारा समुद्र. जीवनदायी सलीलाचा वरदहस्त असलेला हा देश आहे, याचा सतत प्रत्यय येत होता. आपल्या देशात नद्यांची सुकलेली पात्रे पाहून मन खंतावते. न्यूझीलंडमधील नद्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या, पातेल्यातून ऊतू जाणाऱ्या दुधाप्रमाणे ओतप्रोत वाहत असतात. ख्राइस्ट चर्चला पोचलो, तेव्हा त्या शहराच्या चेहऱ्यावर भूकंपाची अवकळा होती. काही महिन्यांपूर्वी ह्या शहराला भयानक भूकंपाचा धक्का बसून अर्धे-अधिक शहर जमीनदोस्त झाले होते. शहराच्या पुनर्वसनाचे काम जोरात चालू होते. पर्यटकांना शहराच्या डाऊन टाऊनमध्ये व मेन स्वेअरमध्ये जायला बंदी होती. नगरनियोजन खात्याने शहराचे लाल, नारिंगी आणि हिरवे असे तीन विभाग केले होते. हिरवा विभाग सगळ्यांत सुरक्षित होता. नारिंगी विभागात योग्य काळजी घेऊन नवी घरे व इमारती बांधण्यास परवानगी देण्यात येणार होती आणि लाल ह्या भूकंपप्रवण भागात नवी घरे बांधायला पूर्ण बंदी होती. भूकंपाच्या भीतीने ख्राइस्ट चर्चचे रहिवासी वेलिंग्टन, ऑकलंड या शहरांत स्थलांतर करीत होते. ख्राइस्ट चर्चमध्ये आम्ही एका तळ्याच्या किनाऱ्यावर ‘पेपर्स क्लिअरवॉटर रिसॉर्ट’ या तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केले. आम्हाला लेक व्ह्यू रूम मिळाली होती. समोर सर्वदूर पसरलेले निळे शांत तळे होते आणि मागे हिरवागार गोल्फ कोर्स होता. भूकंप झाल्यास काय करावे, त्याच्या सूचना खोलीत भिंतीवर होत्या. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, कारण दिवसभराच्या प्रवासाने आम्ही थकलो होतो. आम्ही आरामात झोपेच्या अधीन झालो.

ख्राइस्ट चर्चहून निघाल्यानंतर आमचा पुढचा थांबा होता माऊंट कुक. माऊंट कुकला आमचे हॉटेल होते- ‘हॉटेल हर्मिटेज’. चेक-इन झाल्यावर खोलीचा पडदा उघडला, तर पुढे दृष्टीला पडली- सर्वांगावर बर्फाचे शुभ्र वस्त्र परिधान केलेली उंच पर्वतशिखरे. नेचर वॉज स्टँड स्टिल लाईक अ पेंटिंग. दुपारोत्तर आम्ही हेलिकॉप्टरने पर्वतशिखरांवर गेलो. अर्धा तासभर बर्फाच्या डोंगरावर, बर्फावर मनमुराद फिरण्याचा, बर्फाचे गोळे करून एकमेकांवर फेकण्याचा आनंद घेतला. संध्याकाळ होत आली तशी सरत्या उन्हांत ती हिमशिखरे वेगळ्या तेजाने चकाकू लागली. हेलिकॉप्टरने खाली उतरताना आम्ही त्यांना अलविदा केला. रात्री थंडीचा कडाका वाढत गेला. पहाटेच्या साखरझोपेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नात आली- हिमगौरी आणि सात बुटके. सात बुटके माझ्या कानात काही पुटपुटून गेले. जाग आली तेव्हा मी आठवू लागलो- मला काहीच आठवेना! स्वप्ने अर्थहीन असतात, स्वप्नांना ताळमेळ नसतो. माऊंट कुकच्या त्या पर्वत- शिखरांनी माझे लहानपण जागे केले असावे, एवढे मात्र खरे!

माऊंट कुकवरून क्वीन्सलँडला जाताना मधे एक स्टॉप होता- चर्च ऑफ लिटल शेफर्ड. तळ्याच्या किनाऱ्यावरील लहानशी डगज (चर्च) होती. स्थानिक दगडी वास्तुशिल्प. इगर्जीत पाच-दहा बाके. पुढे छोटा सुरीस. त्याच्यामागे पारदर्शी आरसा. आणि आरशामागे आरस्पानी पाण्याचे तळे. एवढे छोटे, सुंदर गिरिजाघर मी कधीच, कुठेच पाहिले नाही. क्वीन्सलँडला जाताना एक दफनभूमी दिसली. तिथे किती तरी थडगी होती. विश्राम बेडेकरांच्या ‘रणांगण’मधील वाक्य मला आठवले- मृत्यूने घातलेली ती रांगोळी होती. मेंढरामागे जाणाऱ्या कुत्र्यांना जेव्हा मरण येत असे, तेव्हा ह्या दफनभूमीत त्यांना खेडुत पुरत असत. कुत्र्यांची ही जगातील एकमेव दफनभूमी असावी. म्हणून तिचे नाव शिपडॉग्स ग्रेव्हयार्ड!

क्वीन्सलँडला पोचेपर्यंत न्यूझीलंडची कॅन्ट्रीसायड पाहण्यात मी मग्न झालो. नितळ पाण्याची तळी, खळखळ वाहणाऱ्या छोट्याशा नद्या, उंच विलोभनीय वृक्ष, गुलाबी फुलांनी फुललेली चेरीची झाडे, हिरवी कुरणे, चरणारी मेंढरे, घंटानाद करीत फिरणाऱ्या पुष्ट गाई, केसाळ कुत्रे, कटन्या घेऊन फिरणारे दणकट धनगर... न्यूझीलंड हा परिकथेत शोभण्यासारखा सुरेख देश आहे. ती एक दंतकथाच आहे, मिथककथा आहे. फॅन्टसी आहे. क्वीन्सलँडला पोचलो तेव्हा गुप्प काळोख झाला होता. न्यूझीलंडचे रूप तसे शहरी नाही. ह्या देशाची शहरेही खेडवळ म्हणजे रूर्बन आहेत. आमच्या हॉटेलचे नाव होते- मिलेनियम. विस्तृत तळ्याच्या किनाऱ्यावर एका उंचवट्यावर हे हॉटेल दिमाखात वसले आहे.

दुसऱ्या दिवशी क्वीन्सलँडला एक आगळाच अनुभव घेतला. क्वीन्सलँडच्या शॉर्ट ऑव्हर नदीत जेट बोटीत द्रुतगतीत सफर करण्याचा! बोटवाल्याने आम्हाला सुरुवातीलाच सांगितले- मी बोट 360 अंशाने स्पिन करेन. आहेत तिथेच रॉडला धरून बसा- आणि खरेच तो स्पीडबोट कधी 180 अंशांतून, तर कधी 360 अंशांतून स्पिन करत वळवू लागला. तो अनुभव थरारक होता, पण तेवढाच आनंददायी होता. सभोवताली गार हिरवा निसर्ग आणि मधे शुभ्र पांढऱ्या फेसाची रांगोळी. सर्वांगाला  सुखावणारा थंडगार, शीतल वारा. हे साखरस्वप्न होते की वास्तव होते, असे वाटण्यासारखी ती जलसफर होती.

त्यानंतर आम्ही गेलो मिलफॉर्ड सावण्डमध्ये. सावण्ड म्हणजे ग्लेशियरने डोंगर कापत समुद्रापर्यंत वाट करत असताना ग्लेशियर वितळून दरीत झालेली नदी. निसर्गाचा हा अद्‌भुत चमत्कारच आहे. निसर्ग शिल्पकार होऊन हातात वाऱ्याचा आणि पाण्याचा हातोडा घेऊन डोंगरात शेकडो वर्षे हे शिल्प कोरीत असतो. अशा या सावण्डमधून सफर करण्यात खूप मजा येते. ह्या हिमनदीत सफर करताना आमच्याबरोबर अनेक पिकल्या केसांचे वृद्ध पर्यटक होते. त्यांना पाहून वाटले

सैर कर दुनियाकी

जिंदगानी फिर कहाँ?

जिंदगानी भी हुई

तो नौजवानी फिर कहाँ?

हा शेर काही खरा नव्हे; नाही तर जीवनाच्या उत्तरायणात न्यूझीलंडच्या दक्षिणायनाची सफर करायला हे वृद्ध पर्यटक आलेच नसते! रूथ, सॅन्ड्रा आणि नादिया- या तीन मैत्रिणी. तिघांचे वय ऐंशीच्या जवळपास असावे. तरुणपणात यांचे रूप सुंदर असावे. म्हातारपणात अजून त्या नटून-थटून सुंदर वेष परिधान करूनच या सफरीवर आल्या आहेत. कॉलेज-कन्यकांसारख्या त्या पाहा किती मजेत हसताहेत, खिदळताहेत... नवा देश पाहायची उत्सुकता त्यांच्या डोळ्यांत शिगोशीग भरून ओसंडते आहे. आपले वार्धक्य, आपली दुखणी क्षणभर विसरून त्या सभोवतालचे निसर्गसौंदर्य पाहण्यात तल्लीन झाल्या आहेत.

दुपार होत आली. कोअरकोर्स जेवण आले. सूप, सॅलेड्‌स. मेन कोर्समध्ये- रोस्टेड चिकन, बॉइल्ड व्हेजिटेबल्स. डिझर्टमध्ये ट्रायफल पुडिंग. कॉन्टिनेंटल पद्धतीचे ते जेवण. त्याचा कसलाच हँगओव्हर नसतो. बोट महासागरापर्यंत पोचली. आता परतीचा प्रवास सुरू झाला.

त्या रात्री आमचे वास्तव्य निआनो या छोट्या गावात होते. या गावाची लोकसंख्या दोन-तीन हजार होती. तळ्याच्या काठावरचा तो गाव होता. पहाटे तळ्याच्या काठाकाठाने मी शतपावली केली. वसंतागमन झाले होते. ते उजेडाचे दिवस होते. मुलांना सुट्या पडल्या होत्या. सायकलींना पाय फुटले होते. तळ्यावर कोणी राफ्टिंग करत होते, कोणी सर्फिंग करत होते. इतक्या थंडीत तळ्यात पोहणे शक्य नव्हते. कोणी मुले डोंगरावर हायकिंगला जात होती. ते साहसाचे दिवस होते. आता दोन-तीन महिन्यांनी ख्रिसमस येणार होता, मग ईस्टर. तेवढ्यात सूर्य उत्तरायणात जाणार होता. न्यूझीलंडमधला उन्हाळा संपणार होता, हिवाळा सुरू होणार होता.

आम्ही सकाळी निआनोहून निघालो आणि दुपारी ड्युनेडीन शहरात पोचलो. या शहरात आम्ही फुलपाखरांचा ओपन एअर झू पाहिला. बागेतील विविध प्रकारची फुले आणि फुलाफुलांवरून बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे... दुर्गा भागवतांच्या मते, संस्कृतमध्ये फुलपाखरांना शब्द का नाहीत, हे फार मोठे गूढ आहे! क्रॉमवेल हा जसा फळांचा गाव होता, तसा ड्युनेडीन हा फुलांचा गाव. किती प्रकारची फुले... ऑर्किड्‌स, डॅफोडिल्स, जरबेरा, कॉर्नेशन्स, मॅगनॉलिया, मेरी गोल्ड, रोझस... इथे ब्लॉसम फेस्टिव्हल होतो, तेव्हा फुलांनी सजवलेल्या फ्लोट्‌सची परेड येथील रस्त्यावरून जाते तेव्हा स्थानिक लोक आणि पर्यटक ती पाहायला प्रचंड गर्दी करतात. या शहरात बाल्डवीन स्ट्रीट आहे. तो जगातला सर्वांत अधिक चढणीचा आणि अर्थात उताराचा रस्ता आहे. ड्युनेडीन शहरात कॅडबरी कंपनीचा कारखाना आहे. ईस्टरच्या परेडला कॅडबरी कंपनी बाल्डवीन स्ट्रीटच्या उतारावरून शेकडो रंगीबेरंगी चॉकलेट पॅबेल्स (इथल्या चॉकलेट जेम्सप्रमाणे) ओतते, ते दृश्य पाहण्यासारखे असते. या चॉकलेट पेबल्स जमवण्यासाठी असंख्य मुले बाल्डवीन स्ट्रीटच्या दोन्ही बाजूने गर्दी करतात. ड्युनेडीनहून ख्राइस्ट चर्चला आलो आणि तिथून मुंबईला जाण्याचे विमान पकडले. तुम्ही न्यूझीलंड सोडू शकता; न्यूझीलंड तुम्हाला सोडू शकत नाही. न्यूझीलंडचे बेट तुमच्या मनात कायमचे, चिरस्थायी होते.

म्हणूनच मार्क ट्वेन न्यूझीलंडला पोचला, तेव्हा त्याच्या तोंडून उच्चार आले- ‘दे लॅण्डेड हियर ऑन देअर वे टू हेवन फ्रॉम देअर होम अण्ड दे फेल्ट दे हॅव अराइव्हड.’ आपल्या घरातून स्वर्गात जायला ते निघाले आणि ते इथे (न्यूझीलंडला) पोचले आणि इथे पोचल्यावर त्यांना वाटले- ‘अरे, आपण पोचलो- आपण स्वर्गात पोचलो!’

Tags: प्रवास वर्णन न्यूझीलंड देश-विदेश दत्ता दामोदर नायक New zealand Desh – Videsh Datta Damodar Nayak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके