डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भारतात नेत्रदान, अवयवदान, देहदान करणाऱ्या दात्यांना मृत्यूपूर्वी योग्य हमीपत्र (ॲफिडेव्हिट) तयार करून आपल्या नातेवाइकांकडे ठेवावे लागते. श्रीलंकेत त्याची गरज नाही. प्रत्येक मृतदेहावर (पार्थिवावर) सरकारचा अधिकार आहे, असा कायदा श्रीलंकेत आहे. त्यामुळे पार्थिवाचे नेत्र, ब्रेन डेड झालेल्यांचे अवयव व गरज असल्यास मृतदेह सरकार ताब्यात घेऊ शकते. ज्या नागरिकाची याला हरकत असेल, त्याला निगेटिव्ह हमीपत्र करावे लागते. या प्रागतिक कायद्यामुळे श्रीलंकेत फारसे आंधळे नाहीत

श्रीलंकेचे मूळ नाव सिंहलद्वीप. इंग्रजीतील Serendipity या शब्दाचा जन्म सिंहलद्वीपवरून झाला. Serendipity म्हणजे अचानक लागलेला सुखकारक शोध. अरबी समुद्रातून जाणाऱ्या नाविकांना सिंहलद्वीप या बेटाचा शोध अचानक लागला, त्यावरून Serendipity या शब्दाचा जन्म झाला, असे म्हणतात. भाषेतून देशाच्या संस्कृतीबद्दल माहिती मिळते याचे दुसरे उदाहरण म्हणजे भारताचा उल्लेख पूर्वी पाश्चात्त्य देशांत नेहमीच ’Indias’ असा बहुवचनात केला जायचा. याचे कारण भारतीय संस्कृती बहुपदरी आहे, बहुवचनी आहे. ती एकांगी नाही, एकवचनी नाही. Serendipity शब्दाला जागून श्रीलंका हा देश अचानक सुखद आश्चर्य देणारा देश आहे. आपल्या जवळच्या या शेजारी देशाला आपण भेट देत नाही, हे आपले कर्मकट्टेपण आहे. म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश, भूतान आणि जमल्यास पाकिस्तान, इराण व अफगाणिस्तान हे आपले शेजारी देश आपण आवर्जून पाहिले पाहिजेत.

इ.स.पूर्व  सहाव्या शतकात उत्तर प्रदेशमधून श्रीलंकेत भारतीय लोकांनी स्थलांतर केले असावे. हेच सिंहली लोकांचे पूर्वज असावेत. त्यानंतर काही शतकांनी तमिळ लोक श्रीलंकेत गेले. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा बौद्ध धर्माचाप्रसार करण्यासाठी बोधिवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेत गेले. बौद्ध हा श्रीलंकेतील प्रमुख धर्म आहे आणि बौद्ध धर्मातील थेरावाद पंथ ते मानतात. भारतातून नामेशेष झालेले बौद्ध ग्रंथ शोधण्यासाठी आणि पाली भाषा शिकण्यासाठी भारतातून आचार्य धर्मानंद कोसंबींना श्रीलंकेत जावे लागले. श्रीलंकेने बौद्ध धर्म जतन केल्यामुळे त्यांचे खरे स्वरूप जगापुढे येण्यास मदत झाली. श्रीलंकेतूनच बौद्ध भिक्षू पुढे बर्मा, थायलंड, जपान या पौर्वात्य देशांत गेले.

अनेक शतके श्रीलंकेचा व्यापार अरबांशी चालायचा. सोळाव्या शतकापासून पोर्तुगीज, डच व ब्रिटिश यांच्याशी श्रीलंकेचे व्यापारी संबंध आले आणि त्यानंतर या राष्ट्राकडे श्रीलंकेची राजकीय सत्ताही गेली. फेब्रुवारी 1948 मध्ये श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले. तांदूळ, नारळ, रबर आणि चहा ही श्रीलंकेची प्रमुख पिके आहेत. त्याशिवाय पर्यटन हा येथील मोठा व्यवसाय आहे. श्रीलंकेत 74 टक्के सिंहली, 18 टक्के तमिळ आणि 8 टक्के मुस्लिम आहेत. मध्यंतरी जाफना भागात तमिळ लोकांनी स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीसाठी सुरू केलेल्या हिंसक आंदोलनामुळे श्रीलंकेत युद्धसदृश धुमश्चक्री चालू होती. सुदैवाने आता हा देश शांत आहे, सुरक्षित आहे, विकासाच्या मार्गाला लागला आहे.

श्रीलंकेच्या बौद्ध धर्मीयांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, ते  जहाल बुद्धिस्ट आहेत. म्यानमारमध्येही कट्टर हिंदुत्ववाद्यांना लाजवण्याएवढा कट्टर बुद्धिझमचा नमुना पाहायला मिळतो. तो पाहून माझ्यासारख्या विचाराने आणि मनाने बौद्ध झालेल्यांना मान शरमेने खाली घालावी लागते. शेवटी बुद्धाच्या सर्वमंगल करुणेलाही माणसातील पशुत्व नष्ट करता येत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. जपानमध्येही हेच चित्र आहे. पुण्यश्लोक बुद्धाचे डोळे तिथे अश्रूंनी डबडबलेले आहेत!

कोलंबोत माझे वास्तव्य ‘ताज समुद्रा’ हॉटेलमध्ये होते. जिथे जिथे ‘ताज’ची हॉटेल्स आहेत, तिथे तिथे मी ‘ताज’शिवाय दुसऱ्या हॉटेल्समध्ये राहत नाही. हॉटेल्सच्या यशाचे गुपीत त्याच्या स्थानात असते. ’What is key of success of the hotel’ असा प्रश्न प्रख्यात हॉटेल उद्योजकाला विचारला असता, त्याचे उत्तर होते, Location, Location, Location!  ताज ग्रुपची हॉटेल्स मोक्याच्या स्थानी असतात. मग मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापुढे असलेले ताजमहाल असो, उदयपूरच्या तळ्यातील लेक पॅलेस असो, गोव्यातील आग्वादच्या किल्ल्यातील फोर्ट आग्वादा रिसॉर्ट असो, कोचीच्या वेलिंग्टन बेटावरचे ताज मलबार असो.... ताज हॉटेल्ससंबंधी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. टाटा उद्योगसमूह नैतिकतेबद्दल अतिशय दक्ष असतो. ताज हॉटेल्समध्ये सिगारेट व मद्य यांची जी विक्री होते, त्यावर जो नफा होतो; तो नफा मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलला दान केला जातो. इंडिया हॉटेल्स या ताज हॉटेल्सच्या कंपनीत अनेक वर्षे व्यवस्थापकीय संचालक गोव्याचे अजित केरकर होते. टाटा उद्योगसमूहात सुमंत मुळगावकर, जे.ई.तळावलीकर अशा अनेक गोमंतकीय व्यवस्थापकांनी उच्चपदी व्यवस्थापकीय स्थान भूषविले आहे.

कोलंबो शहर फार मोठे नाही आणि अतिशय छोटेही नाही. कोलंबोच्या मध्यभागी बेरा तळे आहे. त्यात सीमा मलाकाचे बुद्धिस्ट देऊळ आहे. तो परिसर फारच रमणीय आहे. कोलंबो शहराला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. शिवाय ते एक गजबजलेले बंदर आहे. कोलंबो बंदराचे महत्त्व एका कारणामुळे वाढले आहे. यूपीए सरकारने भारत आणि श्रीलंका यामधील समुद्राच्या खाडीमधील गाळ खणून त्यामधून मोठी जहाजे जायचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. हा प्रकल्प कार्यान्वित झाला असता, तर मुंबई बंदरातून कोलकाता बंदरात जाणारी जहाजे श्रीलंकेला वळसा घालून जातात किंवा आफ्रिकेहून किंवा युरोपहून पूर्वेकडील देशाला जाणारी जहाजे श्रीलंकेला वळसा घालून जातात, ती बंगालच्या उपसागरातून गेली असती आणि कोट्यवधी डॉलर्सची ऊर्जा व प्रवासाचा वेळ वाचला असता आणि कोलंबोचे महत्त्व कमी झाले असते. पण ‘या खाडीतील रामसेतू तुम्ही उद्‌ध्वस्त करता’ असा गहजब संघ परिवाराने केला आणि या प्रकल्पाला धार्मिक व राजकीय वळण दिले. त्यामुळे यूपीए सरकारला हा प्रकल्प गुंडाळून ठेवावा लागला. सागरमाला प्रकल्पाची घोषणा करणारे मोदी सरकार या प्रकल्पाविषयी एक शब्दही बोलत नाही, यातील गोम आपण समजून घेतली पाहिजे.

जेफरी बावा हे श्रीलंकेचे विख्यात वास्तुशिल्पज्ञ होते. त्यांनीच श्रीलंकेच्या पार्लमेंट हाऊसच्या वास्तूचा आराखडा तयार केला. श्रीलंकेचे हे पार्लमेंट हाऊस श्रीलंकन वास्तुशिल्पाची सर्व वैशिष्ट्ये सांभाळून बांधलेले आहे. जेफरी बावाने डिझाईन केलेल्या पॅरेडाइझ कॅफेलाही आम्ही भेट दिली. श्रीलंकेच्या पुढील सर्व वास्तव्यात मी जेफरी बावाने ज्यांचे आराखडे केले, ते दाम्बुलाचे कंदलम हॉटेल, बेलटोटाचे सेरेन्डीपिटी हॉटेल आणि गालेचे लाईट हाऊस हॉटेल इथे राहणार होतो. उंच कलती छपरे, लाकूड व कौलांचा वापर, आतील परिसर व बाहेरचा निसर्ग यांचा समन्वय, मोकळे अंगण, पाण्याचे हौद आणि तळी, त्यात फुललेली निळी-गुलाबी कमळे, त्याभोवतालची पुष्पजडित चाफ्याची झाडे, अंगणाभोवतीचे चौक, मोठ्या खिडक्या व दारे, त्यातून येणारा भरपूर उजेड व वारा, सौंदर्यदृष्टी व उपयुक्तता यांचा संगम आणि सर्वांत शेवटी सेरेन्डीपिटी- अर्थात अचानक आश्चर्यचकित करीत येणारा सुखद अनुभव ही जेफरी बावाच्या वास्तुशिल्पांची वैशिष्ट्ये आहेत. नकळत चार्ल्‌स कुरैया आणि जेफरी बावा यांच्या वास्तुशिल्पांमधील साम्य व फरक यांचा मी मनातल्या मनात विचार करू लागलो आणि दोघांपैकी श्रेष्ठ वास्तुशिल्पज्ञ कोण, असा प्रश्न मला पडला. शुद्ध कलेच्या दृष्टीने विचार केला, तर जेफरी बावा चार्ल्‌स  कुरैयापेक्षा कांकणभर सरस ठरतात; पण चार्ल्‌स कुरैयांनी वास्तुशिल्पाचे तत्त्वज्ञान या दृष्टीने जो विचार केला, तसा जेफरी बावांना करता आला नाही, हेदेखील तेवढेच खरे. चार्ल्‌स कुरैयांनी वास्तुशिल्पाचे तत्त्वज्ञान सांगताना नॉन- बिल्डिंग अर्थात अ-वास्तू, नवग्रह संकल्पना, झीरो व्हॉल्युम किंवा शून्य खंड अशा अनेक मौलिक संकल्पना मांडल्या.

कोलंबोहून आम्ही पिनावाला एलिफंट ऑर्फनेज कॅम्पला  भेट दिली. नदीच्या काठी असलेल्या ह्या हत्तींच्या अनाथाश्रमात अनाथ हत्तींच्या पिल्लांची निगा राखली जाते. असे हे जगातील एकमेव हत्तींचे अनाथालय आहे. तिथून आम्ही सिगिरिया इथे आलो. सिगिरिया हे सिंहगिरीचे भ्रष्ट नाव! इथे डोंगरमाथ्यावर कश्यप या सिंहली राजाचा राजवाडा होता. आता तिथे राजवाड्याचे अवशेष फक्त आहेत. पायऱ्यांकडे सिंहाची दोन मोठी पावले तेवढी शाबूत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी सुंदर बाग आणि बागेत कमळांनी प्रफुल्लित असे तळे आहे. सिंहगिरी पाहिल्यानंतर आम्ही रात्रीचे वास्तव्य कंडलमला केले. इथे डोंगराच्या कपारीत आर्किटेक्ट जेफरी बावाने डोंगर न कापता हॉटेलची रचना केली आहे.

त्यानंतरचा आमचा थांबा होता कँडी हे श्रीलंकेचे शहर. पण कँडीला शहर म्हणता येणार नाही. तो अर्धोन्मीलित डोळ्यांचा गावच होता. बुद्ध मंदिरांसाठी हा गाव प्रसिद्ध आहे. इथेच सुविख्यात टेंपल ऑफ टूथ आहे. इथे गौतम बुद्धाचा दात ठेवण्यात आलेला आहे, अशी बौद्ध भाविकांची श्रद्धा आहे. दर दिवशी या दाताला अत्तराने स्नान घातले जाते. कँडीजवळच डाम्बुलाचे केव्ह टेंपल आहे. तिथे बुद्धाचे 150 पुतळे आहेत. त्यातील पहुडलेला निद्रिस्त बुद्धाचा पुतळा अतिशय सुरेख आहे. इथे गणपती, विष्णू या हिंदू देवांच्याही मूर्ती आहेत.

संध्याकाळी आम्ही घाटातला रस्ता चढत-चढत नुवारा आलिया या हिल स्टेशनवर आलो. नुवारा आलिया हे डोंगरमाथ्यावरील चहाच्या मळ्यात असलेले रमणीय हिल स्टेशन आहे. आमचे बुकिंग ज्या हॉटेलमध्ये होते, ते हॉटेल पूर्वी एक चहापत्ती बनवण्याची फॅक्टरी होती. ती वास्तू त्याच स्थितीत ठेवून त्याचे हॉटेल बनविण्यात आलेले आहे. मी भल्या पहाटे उठलो आणि चहाच्या मळ्यातून मनसोक्त फिरलो. हवा सुखद होती. ओणवमुखी स्त्रिया चहाच्या मळ्यात चहाची पाने खुडत होत्या, अनामिक पाखरे मळ्यात निर्भीडपणे उडत होती.

नुवारा आलियाहून घाट उतरून आम्ही गालेला आलो. गाले हे समुद्रकिनाऱ्यावरचे शहर. श्रीलंकेत 2004 मध्ये त्सुनामी आली. तिचा सर्वाधिक फटका गाले शहराला बसला. सुमारे 30 हजार लोक मरण पावले. येथील समुद्रकिनाऱ्यावर डच लोकांनी बांधलेला किल्ला व लाईट हाऊस आहे. तिथून जवळच जेफरी बावांनी बांधलेल्या लाईट हाऊस या सुंदर हॉटेलात आम्ही रात्र घालवली.

गाले शहरात क्रिकेटचे स्टेडियम आहे. साऱ्या श्रीलंकेला क्रिकेटचे वेड किंवा व्यसन आहे. भारतात एके काळी क्रिकेट हा उच्चभ्रू लोकांचा म्हणजे राजेरजवाड्यांचा,  नबाबांचा खेळ होता. क्रिकेटचे हळूहळू लोकशाहीकरण झाले. भोपाळचा संस्थानिक नबाब ऑफ पतौडी ते झारखंडमधील एका खेड्यातील महेंद्रसिंह धोनी असे हे फार मोठे स्थित्यंतर भारतात झाले. श्रीलंकेतही कोलंबोच्या सेंट थॉमस, रॉयल कॉलेजमधील तथाकथित उच्च वर्गातील तरुण एके काळी क्रिकेट खेळायचे. अचानक तथाकथित कनिष्ठ वर्गातून अर्जुन रणतुंगा श्रीलंकन क्रिकेट संघात आला आणि संघाचा कर्णधारही झाला. ‘मातारा’तून सनथ जयसूर्या आणि कॅन्डीजवळच्या डोंगराळ भागातून पुढे जगातला सर्वोत्कृष्ट ऑफ स्पिनर ठरलेला मुरलीधरन हे श्रीलंकन टीममध्ये आले आणि श्रीलंकन संघातील एलिट मुलांची मोनोपॉली संपली. एवढ्यात श्रीलंकेत तमिळ आणि सिंहली यामधील वांशिक वाद चिघळून धुमश्चक्री सुरू झाली. देशभर निराशेचे आणि वैफल्याचे वातावरण झाले. एवढ्यात 2004 मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकन संघाने वर्ल्ड कप जिंकला आणि हे वातावरण क्षणार्धात बदलले. देशात चैतन्याचे वारे वाहू लागले. तरुणांना आशादायक, सकारात्मक, प्रेरक, पूरक असे जीवनसत्त्व क्रिकेटने पुरवले. या पार्श्वभूमीवर कुमार संगकारा श्रीलंकेच्या संघात आला. त्याने कसोटीत 38 शतके, तर वनडेत 25 शतके झळकावली. एकूण 11 द्विशतके काढत प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये 12000 हून अधिक धावा काढल्या. यात 319 या त्याच्या सर्वोच्च धावा होत्या. महेला जयवर्धनेबरोबर कुमार संगकाराने 626 धावांची सर्वोच्च धावांची भागीदारी केली. कुमार संगकाराने कॉलीन कॉड्रे व्याख्यानमालेत भाषण करताना सांगितले की, विश्वचषक जिंकल्यानंतर जगाची श्रीलंकेकडे पाहायची आणि श्रीलंकेची स्वत:कडे पाहायची दृष्टी बदलली. श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ लागल्या. देशात प्रेक्षपणाचा पैसा येऊ लागला. श्रीलंकन खेळाडूंना मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. विश्वचषकाने देशाचा आत्मविश्वास वाढविला. क्रिकेटचे स्पिरिट देशासाठी एवढे चांगले ठरू शकते, याचे याहून चांगले उदाहरण नसेल.

गालेहून आम्ही कोलंबोला परतलो. श्रीलंकेच्या वास्तव्यात उपाली हा आमचा श्रीलंकन टॅक्सी ड्रायव्हर होता. रात्री तो भरपूर दारू प्यायचा. व्यसनाधीनता ही श्रीलंकेची फार मोठी समस्या आहे. बुद्धाचा मध्यम मार्ग तो राखू शकला नाही.

कोलंबोहून परतताना मला राजीव गांधींची आठवण झाली. श्रीलंकेला भारतीय शांती सैनिक पाठवण्याचा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींचा निर्णय मुत्सद्दीपणाचा होता काय, याचे उत्तर इतिहास यथावकाश देईल; काळाने मात्र राजीव गांधींची हत्या करून त्याचे उत्तर दिले आहे.

श्रीलंकेत एक अतिशय चांगला कायदा आहे. भारतात नेत्रदान, अवयवदान, देहदान करणाऱ्या दात्यांना मृत्यूपूर्वी योग्य हमीपत्र (ॲफिडेव्हिट) तयार करून आपल्या नातेवाइकांकडे ठेवावे लागते. श्रीलंकेत त्याची गरज नाही. प्रत्येक मृतदेहावर (पार्थिवावर) सरकारचा अधिकार आहे, असा कायदा श्रीलंकेत आहे. त्यामुळे पार्थिवाचे नेत्र, ब्रेन डेड झालेल्यांचे अवयव व गरज असल्यास मृतदेह सरकार ताब्यात घेऊ शकते. ज्या नागरिकाची याला हरकत असेल, त्याला निगेटिव्ह हमीपत्र करावे लागते. या प्रागतिक कायद्यामुळे श्रीलंकेत फारसे आंधळे नाहीत आणि श्रीलंकेतून इतर देशांत कॉर्निया निर्यात केला जातो. श्रीलंकेतील कायद्याची ही माहिती मिळाल्यानंतर मी श्रीलंकेला त्रिवार सलाम केला.

Tags: सिंहलद्वीप श्रीलंका सेरेन्डीपिटी दत्ता नायक श्रीलंकेची सफर shri lanka Serendipity Datta Nayak Shrilankechi safar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके