डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खरं तर आयुष्याच्या वाटचालीत दीपस्तंभ वाटावेत अशी काही माणसे आपणा सर्वांसमोर येतात. काही वेळा आपण त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही आणि काही वेळा त्यांना समजावून घेऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला, तरी तो प्रयत्न ‘झापडबंद’ असतो. आपल्या विचारधारेत न बसणारी किंवा आपल्या विचारधारांना विरोध करणारी माणसे आपण खड्यासारखी आपल्या मनातून हद्दपार करतो! या पुस्तकात संपूर्ण वेगळ्या किंवा विरोधी विचारधारा घेऊन, आयुष्य पणाला लावून झपाटल्यासारखे काम करणारी माणसे आपल्यासमोर येतात. ‘शंभर फुले फुलू देत’ हा मंत्र एकदा एस. एम. यांनी आपल्याला का दिला होता, हे समजते. ‘साता उत्तराची कहाणी’ या प्रधान मास्तरांच्या कादंबरीत वेगवेगळ्या विचारधारांत स्वत:ला झोकून देणारे मित्र आपल्यासमोर येतात, तसे काहीसे. 

भानू काळे म्हटले की- आपणाला त्यांची साधी, सोपी, सरळ, प्रसन्न, ओघवती शैली आठवते. आपला मित्र आपल्याशी गप्पा मारतोय असे वाटावे, अशी शैली. ‘सांस्कृतिक संवर्धनासाठी’ मुंबईतील आपला फार सुस्थितीत असलेला व्यवसाय बंद करून पुण्यात येऊन त्यांनी व वर्षा काळे यांनी अर्धनारीनटेश्वराप्रमाणे एकरूप होऊन, पदरचे पैसे खर्च करून तेवीस वर्षे चालविलेले ‘अंतर्नाद’ आठवते. त्यामुळे नाही म्हटले तरी ‘भानू काळेंचा पोर्टफोलिओ’ असे म्हटले की, आपण चक्रावतोच!

कारण म्हातारपणाची तरतूद आणि इतरही अनेक कारणांनी आपल्यापैकी प्रत्येक जण जमेल तशी, जमेल त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. आताच्या आपल्या मराठीत अशा अनेक ठिकाणच्या गुंतवणुकीला एकत्रितपणे ‘पोर्टफोलिओ’ असे म्हणतात. आता अशा या पोर्टफोलिओ या प्रकरणाबद्दल भानू काळे काय सांगणार? कारण तुकारामांच्या व्यापाराची आठवण करून देणारा ‘अंतर्नाद’ नावाचा आतबट्ट्याचा व्यवहार, व्यवसाय किंवा धर्म त्यांनी थांबवूनही आता तीनेक वर्षे मागे पडलीत.

त्यामुळे ‘आम्ही लटके न बोलू’ म्हणून अगदी समंजसपणे भानू काळे आपणाला सांगताहेत : एक गोष्ट लक्षात घ्या- आर्थिक गुंतवणुकीसाठी ‘पोर्टफोलिओ’ महत्त्वाचाच. पण अशा आर्थिक गुंतवणुकीइतकीच, खरं तर त्याहूनही अधिक महत्त्वाची आहे माणसा-माणसांमधील गुंतवणूक. भोवतालची चांगली माणसे पाहणे, त्यांना वाचणे, त्यांच्याशी आपण जोडले जाणे- हे सुखी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. अशी माणसे आपले जीवन अनेक अर्थांनी समृद्ध करतात. आपल्या जगण्यातला ‘अर्थ’ आपणाला समजतो.

पुढे जाण्यापूर्वी या पुस्तकाचे वेगळेपण आणि मोठेपण आपण लक्षात घ्यावयास हवे. नुकतेच मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले भानू काळे यांचे ‘वेगळ्या वाटा शोधताना’ हे जे पुस्तक आहे, त्यापेक्षा हे पुस्तक वेगळे का आहे, हे त्यातून लक्षात येईल. खरं तर आयुष्याच्या वाटचालीत दीपस्तंभ वाटावेत अशी काही माणसे आपणा सर्वांसमोर येतात. काही वेळा आपण त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही आणि काही वेळा त्यांना समजावून घेऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला, तरी तो प्रयत्न ‘झापडबंद’ असतो. आपल्या विचारधारेत न बसणारी किंवा आपल्या विचारधारांना विरोध करणारी माणसे आपण खड्यासारखी आपल्या मनातून हद्दपार करतो! या पुस्तकात संपूर्ण वेगळ्या किंवा विरोधी विचारधारा घेऊन, आयुष्य पणाला लावून झपाटल्यासारखे काम करणारी माणसे आपल्यासमोर येतात. ‘शंभर फुले फुलू देत’ हा मंत्र एकदा एस. एम. यांनी आपल्याला का दिला होता, हे समजते. ‘साता उत्तराची कहाणी’ या प्रधान मास्तरांच्या कादंबरीत वेगवेगळ्या विचारधारांत स्वत:ला झोकून देणारे मित्र आपल्यासमोर येतात, तसे काहीसे. या सर्वांचे अस्वस्थ आणि प्रेरणादायी आयुष्य एकापाठोपाठ पाहावयाचे म्हणजे अनेक रंगांची गुंफण करणारे प्रेरणादायी व मनमोहक इंद्रधनुष्य आपणासमोर येते.

या पुस्तकात एकूण 26 व्यक्तिचित्रे आहेत. त्यात आजन्म ‘ताजमहाल म्हणजे तेजोमहाल, आमच्या राजपूत राजांचा महाल’ म्हणून सांगणारे पु. ना. ओक आहेत आणि ‘कार्ल मार्क्स ते गांधी’ असा प्रवास करणारे रावसाहेब शिंदे पण आहेत. व्रतस्थ संपादक राम पटवर्धन, देव न मानणारा देवमाणूस नरेंद्र दाभोलकर, वंचितांसाठी आयुष्य वेचणारे विलास चाफेकर आणि ग्रंथालयासाठी जगणारा माणूस शाम जोशी- अशी अनेक माणसे आहेत. उद्योजक जे. आर. डी. टाटा आहेत आणि त्याच वेळी शून्यातून प्रवास सुरू करून फक्त 100 कोटी रुपयांच्या उलाढालीवर जाऊन थांबलेले किंवा अडखळलेले सुरेश हुंदरेसुद्धा आहेत. या सुरेश हुंदरेंनी काय केले होते, ते ऐकून आपण विस्मयचकित होतो. त्यांनी आपल्या कंपनीच्या दारावर भली मोठी पाटी लावली होती- ‘येथे लाच दिली वा घेतली जात नाही.’ आत गेल्यावर हुंदरे कुठे आहेत, हे शोधणे कठीण. कारण सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर मधेच एक टेबल-खुर्ची टाकून ते बसलेले. कुणी केव्हा आणि किती सुट्टी घ्यावयाची ते आपापसात चर्चा करून इतरांना त्रास होणार नाही, कामाचा खोळंबा होणार नाही, हे पाहून ठरवावयाचे!

महत्त्वाचे म्हणजे, हे पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यांवरची झापडे गळून पडतात. मनातले अडथळे- म्हणजे आजच्या मराठीत ‘मनातले ब्लॉक्स’- विरघळून नाहीसे होतात. पु. ना. ओक म्हणजे ‘खोटं बोला, पण रेटून बोला’ असे काही करत ‘ताजमहाल म्हणजे तेजोमहाल’ असे सांगत भारतभर हिंडणारा एक माणूस- अशी माझी कल्पना होती. पु. ना. ओक फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापक होते. वीर सावरकरांची ‘सैन्यात शिरा’ ही हाक ऐकून ते सैन्यात गेले. तिथून ते आझाद हिंद सेनेत दाखल झाले. ते नेताजींचे निकटचे सहकारी बनले. नेताजींच्या स्वत:च्या ऑफिसात ओकांना टेबल-खुर्ची दिलेली होती. व्हिएतनाममधील सायगाव येथील फ्री इंडिया रेडिओचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. सन 1947 ते 1974 अशी सुमारे तीस वर्षे ओक दिल्लीत होते. ‘हिंदुस्थान टाइम्स’ आणि ‘स्टेट्‌समन’ या नामांकित दैनिकाच्या संपादकीय विभागात त्यांनी काम केले. त्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालय विभागात क्लास वन गॅझेटेड ऑफिसर म्हणून आणि युनायटेड स्टेट्‌स इन्फर्मेशन सर्व्हिसेस म्हणजे युसिसमध्ये काम केले. मात्र त्यांची खरी आवड किंवा वेड इतिहास-संशोधनाचे. ‘वर्ल्ड वाईड हेरिटेज’ या नावाचे एक चौदाशे पानाचं पुस्तक ओकांनी 1964 मध्ये प्रसिद्ध केले. त्याच वर्षी ‘इन्स्टिट्यूट फॉर री-रायटिंग वर्ड हिस्ट्री’ या नावाची एक संस्था स्थापन केली. मात्र खरा ध्यास ताजमहालाचा. आपण गोळा केलेले 118 पुरावे बरोबर घेऊन ओक आजन्म भटकले. या देशात एक वेळ वातावरण किती मैत्रीपूर्ण होते, हे आपल्या लक्षात येते. जनता सरकारच्या काळात अडवाणी आणि वाजपेयींनी पु. ना. ओक यांना ‘तुमचे पुरावे आम्हाला मान्य नाहीत, हे तुमच्या मनाचे खेळ आहेत’, म्हणून सांगितले. सारे वाचत असताना आपल्या मनात मात्र पाल चुकचुकतेच- आता उद्या काय होईल?

माणसे किती मोठी असतात आणि किती प्रामाणिक असतात, हे आपल्याला शिवशंकरभाऊ यांच्यावरील लेख वाचताना समजते. शिवशंकरभाऊंचा जन्म 1940 मधला. घरची मोठी जमीन म्हणजे दोन-तीन हजार एकरांची. मात्र मॅट्रिकची परीक्षा दिल्यावर दुसऱ्या दिवशी भाऊंचे लग्न झाले आणि तिसऱ्या दिवशी भाऊ शेगाव संस्थानाच्या सेवेत रुजू झाले. ही परंपरा त्यांच्या घराण्याची होती. प्रथम म्हणजे 1958 मध्ये त्यांना मंदिरात फरशा बसवण्याचे काम देण्यात आले. भाऊ 1962 मध्ये संस्थानाचे एक ट्रस्टी बनले आणि 1978 मध्ये संस्थानाचे प्रमुख म्हणून त्यांची एकमताने निवड झाली. ‘संपूर्ण जबाबदारी बिनपगारी’ म्हणून त्यांनी पुढील काही काळात तिथे नंदनवन फुलवले. 76 एकरांवर पसरलेले अभियांत्रिकी महाविद्यालय, आरोग्य विभाग, मतिमंद मुलांसाठी शाळा आणि सुमारे तीनशे एकरावर पसरलेला आनंदसागर जलाशयाचा विशाल प्रकल्प. हे सारे थक्क करणारे आहे, समजण्यासारखे आहे. मात्र अजिबात न समजण्यासारखी एक गोष्ट आहे. अनेक कामांसाठी संस्थेला पैशांची निकड होती. बुलढाणा जिल्ह्यातील पंडित नावाचे एक गृहस्थ अमेरिकेतील सिटी बँकेचे चेअरमन होते. संस्थेला पैशांची गरज आहे, हे त्यांना समजले. त्यांनी अमेरिकन डॉलर्समध्ये धनादेश पाठविला. भारतीय रुपयांत त्याची किंमत सातशे कोटी रुपये होती! भाऊंच्या लक्षात आले, संस्थेची गरज फक्त सत्तर कोटी रुपयांची आहे, तर कारण नसताना उगीच पैसे कशाला जवळ ठेवायचे? त्यांनी 630 कोटी रुपये पंडितांना परत पाठवले!

रावसाहेब शिंदे आपल्याला तसे माहीत आहेत. त्यांचे वडीलबंधू अण्णासाहेब केंद्रात सलग पंधरा वर्षे कृषिमंत्री होते, हे आपणाला माहीत आहे. मात्र तरुण वयात रावसाहेब शिंदे साम्यवादी क्रांतिकारी होते. ते 1949 ते 51 ही तीन वर्षे भूमिगत होते. त्यांच्यावर दहा हजारांचे बक्षीस होते, हे आपल्याला माहीत नाही. यशवंतराव चव्हाणांनी वैचारिक चर्चेत केलेले त्यांचे मतपरिवर्तन, नंतर त्यांनी घेतलेले शिक्षण आणि विधायक कार्यात विस्मयचकित होऊन पाहावे असे त्यांनी केलेले बहुआयामी काम आपणाला माहीत नसते. माणूस प्रत्येक टप्प्यावर बदलू शकतो, हे आपल्याला प्रेरणादायी वाटते.

आपल्याला फारसा किंवा अजिबात माहीत नसलेला, चटका लावून अकाली जाणारा भारतीय व्यंग्यचित्रकार ‘विन्स’ भेटतो. आता परिस्थिती अशी आहे की, भारतीय म्हणून सांगितले नाही, तर अनेक जण त्यांना नावावरून परदेशी माणूस समजतील! आपल्याला थोडे फार रामकृष्ण नायक माहीत आहेत. त्यांनी व त्यांच्या हिंदू गोवा असोसिएशनने केलेल्या खूप गोष्टी आपणाला माहीत आहेत. पण त्यांनी व त्यांच्या संस्थेने केलेल्या इतर काही गोष्टी आपल्यासमोर येतात. भोवताली अंधार असला, तरी त्यात प्रकाशाची बेटे पण आहेत, हा आधार आपल्याला मिळतो. त्यांनी केलेली एक गोष्ट अशी आहे की, फोंड्यापासून पाच किलोमीटर अंतरावर सहा-सात एकर डोंगर उतारावर त्यांनी स्नेहमंदिर हा वृद्धाश्रम उभारला आहे. पायाभरणी कुसुमाग्रज आणि पु. ल. यांनी केली. नाना पालखीवाला यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. चाळीसएक वृद्धांची अगदी वाजवी दरात राहावयाची सोय. भोजन, औषधोपचार, करमणूक या सर्व गोष्टींची सोय. प्रत्येक घरकुलाला फुलाचे नाव. पायी जाता येतील अशा अंतरावर चार देवळे. अतिवृद्धांसाठी शेजारीच एक वेगळी इमारत. तिचे नाव सायंतारा. तिचे उद्‌घाटन गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते. तिथला परिसर, स्नेहमंदिर आणि सायंतारा ही नावे आपल्या मनावर नकळत एक वेगळा परिणाम करतात.

आपल्याला मुकुंदराव किर्लोस्कर, देवकिसन सारडा, ज्ञानेश्वर मुळे, गिरीश प्रभुणे आणि ‘हरी ओम्‌’ या नावाने कार्यरत असलेला एक अवलिया- असे अनेक जण भेटतात. खरे तर हे सर्व जण आपल्याला ऐकून माहीत असतात. त्यांच्याबद्दलची खूप माहितीही तशी आपल्याकडे असते. मात्र ही व्यक्तिचित्रे वाचताना, ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ म्हणजे काय, हे आपल्याला समजते. भानू काळे आपल्याला माहीत नसलेली त्या व्यक्तीबाबतची अशी एखादी गोष्ट सांगतात की, त्या व्यक्तीचे खरे मोठेपण समजते. आपल्यालाही आयुष्यात असे काही जमले पाहिजे, असे नकळत वाटते.

आपण यास्मिन शेख यांचे उदाहरण घेऊ. वयाच्या 95 व्या वर्षी पण तेच मन प्रसन्न करणारे सौंदर्य, तोच कामाचा उरक, शत-प्रतिशत शाबूत असलेली स्मरणशक्ती आणि बोलताना शब्दांची अगदी नेमकी निवड व शब्दांची फेक. मराठी भाषेचे मोठेपण आणि त्यातील तरल छटा सांगताना त्या एकदा म्हणाल्या होत्या, ‘‘आपण ‘अजिबात पटत नाही’ असे म्हणतो; ‘अजिबात पटतंय’ असे का म्हणत नाही? या भाषेचे मोठेपण आणि सामर्थ्य समजावून घ्या.’’ या ज्यू मुलीचे मराठी भाषेवर आणि मराठी व्याकरणावर असलेले प्रभुत्व पाहून तिचे प्राध्यापक श्री. म. माटे म्हणाले होते, ‘‘पोरी, मला जर तुला अनुरूप मुलगा असता, तर मी तुला सून करून घेतली असती.’’ पु.ल. देशपांडे व वसंत कानेटकर यांनी तिच्यासाठी एक देखणा, धडपड्या शेख नावाचा मुसलमान मुलगा निवडला. लव्ह जिहादच्या काळात आपण महाराष्ट्राचा हा समृद्ध वारसा विसरून गेलोय. ते असो! यातील काही गोष्टी आपल्याला माहीत असतात वा नसतात, पण भानू काळे यास्मिन शेख यांच्या आयुष्यातील एक वेगळी गोष्ट सांगतात आणि आपण अवाक्‌ होतो. महाराष्ट्रात पूर्वीच्या पिढीत केवढी व्रतस्थ माणसे होती, हे आपल्याला समजले.

गोष्ट अशी आहे : बाईंचे वय त्या वेळी 70-75 च्या दरम्यान. पुण्याला आपल्या सदनिकेत त्या एकट्या राहताहेत. दिवाळीत त्यांना भेटायला त्यांची आठ वर्षांची लाडकी नात ऑस्ट्रेलियातून भारतात आली आहे. मुंबईच्या विमानतळावरून त्या वेळी उपलब्ध असलेल्या एस.टी.डी. बूथमधून ती आजीला फोन करते. ‘‘उद्या सकाळी तुला भेटायला येते आहे. खूप धमाल करू. माझी चित्रे, माझ्या कविता तुला दाखवायच्या आहेत.’’ आणि फोनवर आजी सांगते, ‘‘बाळा, उद्या नाही, एक आठवड्याने ये. माझ्याकडे आत्ताच अंतर्नादच्या दिवाळी अंकाच्या पानांची प्रूफे आलीत. त्यातील शब्दन्‌ शब्द मी तपासणार. त्यात माझा हा आठवडा जाणार.’’ खरं तर अंतर्नादच्या प्रूफरीडिंगचे हे काम यास्मिन शेख कोणतेही मानधन न घेता करत होत्या. मराठीतील एक तरी मासिक व्याकरणाचे नियम पूर्णपणे पाळणारे असावे, म्हणून! यास्मिन शेख यांची नव्वदी अंतर्नाद परिवाराने साजरी केली. त्या वेळी ही आठवण सांगताना त्यांची नात म्हणाली, ‘‘आजीने फोनवर हे असे सांगितल्यावर मी तिच्यावर खूप-खूप चिडले. खूप-खूप रडले. आजीशी आता आयुष्यात कधीच बोलायचे नाही, म्हणून ठरवले. आता जाणवतंय, आजीने त्या क्षणी माझ्या मनाला एक परिसस्पर्श केलाय. माणूस म्हणून आपल्याला जगायचे असेल, तर आपण स्वीकारलेले काम आणि दिलेला शब्द याच्याबरोबर कोणती बांधिलकी असावी, हे मी त्या वेळी शिकले.’’

या पुस्तकात दत्ता हलसगीकर आपल्यासमोर येतात. मराठीतील हे एक श्रेष्ठ कवी. मात्र आज कविता न आवडणारे आपल्याभोवती खूप जण आहेत. आणि आपल्याला कविता आवडते-समजते असे म्हणणाऱ्यांचेही आज काही खरे नाही. बैठकीत, चर्चेत, भाषणात त्यांच्या ओठांवर असतात गुलजार आणि बच्चन! त्यांच्या त्याच त्या कविता ते आपल्या तोंडावर फेकतात आणि अगदी फारच झाले, तर गेला बाजार वापरून गुळगुळीत झालेला एखादा उर्दू शेर आपल्याला ऐकवतात. मग आपण ‘वाऽहऽऽ वा, वाऽहऽऽ वा’ किंवा ‘क्या बात है’ असे म्हणावे अशी त्यांची अपेक्षा असते. कारण त्यांनी आपले दत्ता हलसगीकर वाचलेले नसतात. अंतर्नादने एकदा मुखपृष्ठावर चित्र वगैरे न छापता त्यांची एक कविताच छापली होती. भानू काळे यांनी त्यांच्या स्मृतिदिनी करून दिलेला त्यांच्या आयुष्याचा आणि कवितांचा परिचय खरं तर आपल्या पाठ्यपुस्तकात असायला हवा. आपले कविपण हलसगीकरांनी कधी अलंकाराप्रमाणे मिरवले नाही. एकांताच्या मनोऱ्यात ते कशिदाकामही करत बसले नाहीत. सगळ्यांमध्ये ते मिसळत. त्यांची कविता भयाण अंधारात खेड्यातील एखाद्या घराच्या कोनाड्यात शांतपणे तेवत राहणाऱ्या पणतीसारखी. हे समजावे, म्हणून या लेखात हलसगीकरांच्या निवडक कविता दिलेल्या आहेत. कवितेच्या साह्याने कवी समजावून घ्यावा आणि कवीच्या मदतीने कविता समजावून घ्यावी, असा हा दुपेडी पेच आहे. सारे पुस्तक वाचून संपवताना, आपण थोडे समृद्ध किंवा समंजस झालोय असे वाटत असताना, आपल्या ओठांवर आणि मनात असतात या लेखात दिलेल्या हलसगीकरांच्या कवितेतील काही ओळी.

सूर्यफुलांशी ज्यांचे नाते

त्यांनी थोडा उजेड द्यावा

प्राक्तनाच्या अंधारात

प्रकाशाचा गाव न्यावा

मन थोडे ओले करून

आतून हिरवे हिरवे व्हावे

मन थोडे रसाळ करून

आतून मधुर मधुर व्हावे

लेखकाच्या प्रसन्न, प्रवाही शैलीमुळे पुस्तक कधी वाचून संपते, ते कळत नाही. एवढ्या लवकर पुस्तक वाचून संपले, म्हणूनही थोडी चुटपूट लागते. पण पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचल्यावर आपण त्यातून बाहेर पडतो. लेखकाने पुस्तक अर्पण केलंय ‘ज्यांच्याविषयी लिहायचा योग कधी आला नाही, पण ज्यांच्याशी जुळलेला स्नेह मला कायमच खूप मोलाचा वाटत आला आहे, अशा अनेक सुहृदांना-’ म्हणजे लेखकाने आता पोर्टफोलिओचा दुसरा भाग लिहावयास घेतला पाहिजे. म्हणजे अंतर्नाद बंद केले तरी ‘सांस्कृतिक समृद्धीसाठी’ असलेली दमदार वाटचाल सुरू राहावयास हवी!

पोर्टफोलिओ
लेखक - भानू काळे
प्रकाशक - उन्मेष प्रकाशन, पुणे
पृष्ठे - 210, मूल्य 250/- रुपये.
 

Tags: पोर्टफोलिओ यास्मिन शेख रावसाहेब शिंदे दत्ता हलसगीकर दत्तप्रसाद दाभोळकर अंतर्नाद वाचन पुस्तक भानू काळे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके