डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रावपर्व : अभ्यासू संवेदनशील पत्रकाराने टिपलेले

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी फार मोठ्या प्रमाणात चलनात असलेले दोन शब्द वापरून सांगावयाचे तर ‘हे या पुस्तकाचे शक्तिस्थान आहे आणि हेच या पुस्तकाचे मर्मस्थानही आहे.’ खरं तर शक्तिस्थान लेखकाने वर सांगितलेच आहे. पण ते जरा नीटपणे लक्षात घेऊ या. संदर्भासाठी उपलब्ध असलेले कोणतेही पुस्तक लेखकाने दुर्लक्षित केलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे पुस्तक वाचताना, ‘बिटविन द लाइन्स’ म्हणजे स्पष्टपणे न सांगितलेल्या- पण ‘समझनेवालों को इशारा काफी है’ म्हणून ज्या गोष्टी नोंदविलेल्या असतात, त्याही लक्षात घेतल्यात. हे सारे सुसंगतपणे सरळ, सोप्या, सुंदर, प्रवाही भाषेत सांगत असतानाच कोणताही प्रश्न मुळात जाऊन समजावून घेऊन समजावून द्यावयास हवे हे भान मनात ठेवलंय.

‘रावपर्व’! या देशाच्या चेहरामोहरा कायमचा बदलणाऱ्या दोन घटना या कालखंडात घडल्या. एक म्हणजे ‘खाउजा’ म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. दुसरी घटना म्हणजे बाबरी मशिदीचा विध्वंस. या दोन घटना या देशाच्या दृष्टीने बऱ्या, चांगल्या, वाईट की महाभयानक- याची उत्तरे मिळावयास काही दशके किंवा खरं तर दोन-तीन शतके जावी लागतील. नेहरूंनी स्वीकारलेला आणि या देशाचा सर्वांगीण, समन्यायी विकास करण्यासाठी वापरलेला ‘समाजवाद’ हा शब्द कचऱ्याच्या पेटीत टाकला गेला. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे नेहरूंनी फार सजगतेनं सामाजिक सद्‌भाव जपला होता. ‘ज्या धर्मांध शक्तींना हा देश पाकिस्तानच्या मार्गाने न्यावयाचा आहे, त्यांच्यापासून सावध राहा’, हा इशारा पुन:पुन्हा दिला होता. दि. 7 ऑगस्ट 1947 रोजी राजेंद्र प्रसादांनी नेहरूंना पत्र पाठवून ‘आता गोहत्या बंदीचा कायदा लगेच करावयास हवा. बापूजींची इच्छाही अशीच आहे’ म्हणून कळवले. नेहरूंनी त्यांना अगदी लगेच उत्तर पाठवून कळविले, ‘बापूंची इच्छा गायींचे रक्षण व्हावे, असे वाटते. त्यांना असा कायदा अजिबात नकोय. या देशातील सामाजिक सद्‌भाव कायमचा नाहीसा करून ज्यांना हा देश पाकिस्तानच्या मार्गाने न्यावयाचा आहे, त्या धर्मांध शक्तींना हा कायदा हवा आहे.’ बापूंनी आपल्याला सांगितलंय, ‘अल्पसंख्याकांना केवळ संरक्षण देऊन चालणार नाही. आपण त्यांच्या भावनांची कदर करतो, हे त्यांना समजले पाहिजे.’ त्यानंतर 2 एप्रिल 1955 रोजी शेठ गोविंददास यांनी गोहत्या बंदीचा कायदा करावा, म्हणून लोकसभेत विधेयक आणले. नेहरूंनी फार प्रभावीपणे त्याचा विरोध केला. पण नेहरू तिथेच थांबले नाहीत. भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले, ‘‘असा काही कायदा या देशात होणार असेल, तर मी या देशाचा पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळू शकणार नाही.’’ नंतर काँग्रेसचे शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, महाराष्ट्रात गोहत्या बंदीचा कायदा करण्यात आला. शंकरराव चव्हाण केंद्रीय गृहमंत्री असतानाच बाबरी मशिदीचा विध्वंस करण्यात आला. तिथे रामलल्लाची स्थापना करण्यात आली. शंकरराव चव्हाणांनी तिथे जाऊन त्याची विधिवत पूजा केली.

थोडक्यात काय, ‘काय घडले त्या रात्री....’ याप्रमाणे ‘रावपर्वा’त काय घडले, हे औत्सुक्य वाढविणारे गहन गूढ आहे. अगदी राव अचानक अकल्पितपणे पंतप्रधान कसे झाले, त्यापासून त्याची सुरुवात होते. चंद्रास्वामींची काळी-गोरी जादू, त्यापासून अमेरिकेचा एककेंद्री जगातील न टाळता येणारा दबाव अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आजही त्या घटनेच्या मागे आहेत. त्या कालखंडात मी दिल्लीत होतो. प्रशांत दीक्षित पत्रकार म्हणून दिल्लीत होते. दिल्लीत प्रत्येक भाषक विभागातील प्रमुख वृत्तपत्रांचे प्रतिनिधी असतात. म्हणजे ही संख्या तशी खूप मोठी असते. त्यात प्रशांत दीक्षित यांचे स्थान फार वेगळे होते. ते किती वेगळे होते, हे प्रथम सांगतो. विजय तेंडुलकरांच्या मनात एक भन्नाट कल्पना आली होती. विवेक पंडित यांना विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्षांचा पाठिंबा असलेला अपक्ष उमेदवार म्हणून उभे करावयाचे. आपली ही योजना व्ही.पी. सिंग, लालकृष्ण, अडवाणी, मधू लिमये, रामविलास पासवान, नानाजी देशमुख, लालू यादव यांना भेटून ती समजावून देण्यासाठी ते दिल्लीत येणार होते. तेंडुलकरांनी मुंबईहून या सर्वांच्या भेटीच्या वेळा ठरवल्या आणि एके दिवशी सकाळी ते दिल्लीला माझ्या घरी आले. दिवसभर त्या भेटीत मी त्यांच्याबरोबर असणार होतो. पण त्यांनी पुन:पुन्हा फोनवर सांगितले होते. ‘‘आपल्याबरोबर प्रशांत दीक्षित हवा. त्यांची पत्रकारिता मला तटस्थ आणि अभ्यासू वाटते.’’ त्या दिवशी आम्ही मधू लिमयेंकडे गेलो, तेव्हा ते मनातून पार कोसळले होते. त्यांच्या हातात अहवालाचे कागद येऊन महिना उलटला होता. त्यांनी राष्ट्रीय वृत्तपत्रात त्या बाबत लिहिले होते, पण त्यावर अजिबात चर्चा झाली नाही. त्यांनी रज्जूभैया, अडवाणी, फर्नांडिस अनेकांना पत्रे पाठवली. कोणीही उत्तर पाठवले नव्हते.  लिमये मला म्हणाले, ‘‘आता मी नानाजींसाठी एक पत्र लिहितोय. ते उद्या येऊन घेऊन जा. नानाजींसमोर बसून त्यांच्याकडून उत्तर घेऊनच माझ्याकडे या.’’

हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे ‘रावपर्व’ हे या देशातील नवे रामायण किंवा नवे महाभारत घडत असताना मीही दिल्लीत होतो. मी आणि प्रशांत दोघेही आपापल्या नजरेतून हे ‘रावपर्व’ अभ्यासत होतो. अर्थातच प्रशांतचा आवाका माझ्याहून मोठा होता. त्यामुळे त्यांनी या ‘रावपर्वा’वर लिहावे अशी अनेकांप्रमाणे माझीही इच्छा होती. नुकतीच आमची ही इच्छा पूर्ण झाली आहे.

‘रावपर्व’ हा प्रशांत दीक्षित यांचा ग्रंथ राजहंस प्रकाशनने नुकताच प्रसिद्ध केला आहे. लेखकाचे मोठेपण दाखवणारे एक प्रांजळ निवेदन लेखकाने मनोगतात व्यक्त केले आहे. लेखक लिहितो, ‘‘राव सत्तेवर असताना मी लोकसत्तासाठी दिल्लीचे वार्तांकन करत होतो. मात्र आर्थिक सुधारणांचा खोलात जाऊन अभ्यास करावा, असे त्या वेळी वाटले नाही. तितकी समजही तेव्हा नव्हती. बातमीदार म्हणून अर्थकारणापेक्षा राजकारणाकडे अधिक लक्ष असे. भारतावरील कर्जाचे ओझे हलके झाले आहे, हे सांगणारी अर्थखात्याची एक पत्रपरिषद लक्षवेधी वाटली, तरी त्याचे महत्त्व त्या वेळी समजले नाही. आर्थिक सुधारणांचे दूरगामी परिणाम हे अनेक वर्षांनंतर लक्षात आले. दहशतवादी हल्ले, प्रादेशिक अस्मिता, रामजन्मभूमी, प्रादेशिक अस्मिता, राजकारणांचे शह-काटशह यांमध्ये आपण गुंतून जातो. देशात त्या त्या क्षणी या घटना महत्त्वाच्या असल्या, तरी आर्थिक धोरणे त्याहून महत्त्वाची असतात. ती जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी केलेल्या वाचनातून ‘रावपर्व’ तयार झाले होते. या घडामोडींचा इतिहास नोंदवणारी मोजकी पण चांगली पुस्तके इंग्रजीत लिहिली गेली आहेत. त्या सर्व लेखकांचा मी ऋणी आहे. ती पुस्तके वाचताना बौद्धिक आनंद मिळाला व समजही विस्तारली. तो आनंद व समज वाचकांबरोबर वाटून घेण्याचा हा प्रयत्न आहे.’’

असो! सुमारे पन्नास वर्षांपूर्वी फार मोठ्या प्रमाणात चलनात असलेले दोन शब्द वापरून सांगावयाचे तर ‘हे या पुस्तकाचे शक्तिस्थान आहे आणि हेच या पुस्तकाचे मर्मस्थानही आहे.’ खरं तर शक्तिस्थान लेखकाने वर सांगितलेच आहे. पण ते जरा नीटपणे लक्षात घेऊ या. संदर्भासाठी उपलब्ध असलेले कोणतेही पुस्तक लेखकाने दुर्लक्षित केलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे पुस्तक वाचताना, ‘बिटविन द लाइन्स’ म्हणजे स्पष्टपणे न सांगितलेल्या- पण ‘समझनेवालों को इशारा काफी है’ म्हणून ज्या गोष्टी नोंदविलेल्या असतात, त्याही लक्षात घेतल्यात. हे सारे सुसंगतपणे सरळ, सोप्या, सुंदर, प्रवाही भाषेत सांगत असतानाच कोणताही प्रश्न मुळात जाऊन समजावून घेऊन समजावून द्यावयास हवे हे भान मनात ठेवलंय.

एक-दोन उदाहरणे देतो. ‘खाउजा’चे शिल्पकार म्हणून नरसिंह राव ओळखले जातात, ते पूर्णपणे खरेही आहे. पण त्या वेळी दुसरे कोणीही पंतप्रधान झाले असते, तरी त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. हे सारे सविस्तरपणे या पुस्तकात समजावून दिलंय. त्यातील दोन-तीन महत्त्वाचे मुद्दे असे आहेत.

1) ते टिपण पाहून चंद्रशेखर अधिकच वैतागले. देशातील सोने गहाण ठेवून परकीय चलन आणावे, असे टिपणात सुचविण्यात आले होते. चंद्रशेखर यांना हे सहन होणे शक्य नव्हते. ‘‘देशाचे सोने गहाण ठेवणारा पंतप्रधान अशी माझी इतिहासात नोंद व्हावी, असे तुम्हांला वाटते काय?’’ चंद्रशेखर यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. नरेशचंद्र यांनी शांतपणे उत्तर दिले, ‘‘सोने गहाण ठेवणारा पंतप्रधान की दिवाळखोरी जाहीर करणारा पंतप्रधान, हे दोनच पर्याय तुमच्यासमोर आहेत. त्यातील कोणताही एक निवडा.’’

2) भारताला अवमानित करण्याची एकही संधी धनाढ्य राष्ट्रे सोडत नव्हती. नियमाप्रमाणे सोने गहाण ठेवले, तरी ते भारतातच राहणार होते. सहा महिन्यांनी कर्ज चुकवल्यावर ते सोने पुन्हा भारताच्या नावावर होणार होते. मात्र सोन्याचा प्रत्यक्ष ताबा मिळावा अशी मागणी बँक ऑफ इंग्लंड व बँक ऑफ जपानने केली.

3) मात्र डॉलरची चणचण असतानाही नाणेनिधीकडून कर्ज मिळविण्याबाबत अर्थखात्यात दोन गट होते. समाजवादी व डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या सनदी अधिकाऱ्यांना नाणेनिधीची मदत मान्य नव्हती. चंद्रशेखर यांचे एक सल्लागार अर्थतज्ज्ञ एस. के. गोयल यांचा नाणेनिधीकडे जाण्यास कडवा विरोध होता.

शरद पवार-नरसिंह राव यांच्या अटीतटीच्या लढाईत अचानकपणे नरसिंह राव पंतप्रधान कसे होतात, हा सविस्तर पट लेखक उलगडून दाखवतो.

बाबरी मशिदीचा विध्वंस झाला, त्या घटनेमागच्या घटनांचे लेखक उत्खनन करतो. त्यातील काही घटनांची नोंद करावयास हवी.

1) ब्रिटिशकाळात म्हणजे 1885 मध्येच हे प्रकरण न्यायालयात गेले. ब्रिटिशांनी ते न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून ठेवले. मात्र त्या भोवती जनआंदोलन कधीही उभे राहिले नाही.

2) 23 डिसेंबर 1949 रोजी मशिदीत रामाच्या मूर्ती आणून ठेवल्या गेल्या. हे काम कुणी केले, याचा पत्ता लागला नाही. गोविंद वल्लभ पंत यांच्या उत्तर प्रदेश काँग्रेस सरकारने या मूर्ती हलवल्या नाहीत. उलट स्थानिक न्यायाधीशाने मशिदीतील रामाच्या दूरून दर्शनाला परवानगी दिली. कुलूपबंद लोखंडी दरवाजाच्या बाहेरून रामाच्या मूर्तीचे दर्शन घेता येत असे. रामाला बंधमुक्त करावे, अशी मागणी होत असली तरी त्यात फार जोर नव्हता.

3) शहाबानो प्रकरणातील आपल्या भूमिकेमुळे हिंदू समाजात निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस केंद्र सरकारने अयोध्यातील राम भाविकांच्या दर्शनासाठी मुक्त करण्याचा निर्णय घेतला.

4) शहाबानो प्रकरणात राजीव गांधींनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करून राजीनामा देणाऱ्या अरिफ मोहम्मद खान यांनी याला विरोध केला. त्या वेळी मुस्लीम धर्मगुरूंना विश्वासात घेऊन मी हा निर्णय घेतला, असे राजीव गांधींनी सांगितले.

5) पुढे तीन वर्षांनी बाबरी मशिदीसमोर प्रतीकात्मक करसेवा करण्यास राजीव गांधींनी मंजुरी दिली.

6) जुलै 1992 मध्ये विहिंप व उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने उघडपणे आक्रमक भूमिका घेतली. मशिदीच्या परिसरात सिमेंटचा मोठा चबुतरा बांधण्यासाठी 9 जुलै 1992 रोजी करसेवा सुरू करण्यात आली. काँग्रेसच्या वीस खासदारांनी राव यांना पत्र पाठवून यातून भयंकर घटना घडू शकतात, मशिदीच्या परिसरात ताबा घेऊन मशिदीचे रक्षण करणे गरजेचे आहे व त्यासाठी वेळ पडली तर लष्कराचे साह्य घ्या, म्हणून कळविले.

7) नरसिंह राव यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांना अयोध्येला पाठविले. त्यांनी काही सूचना केल्या व रामलल्लाचे दर्शन घेऊन पूजा केली. गृहमंत्र्यांच्या या कृतीमुळे ‘केंद्र सरकार मंदिर उभारण्याच्या बाजूचे आहे’, असा समज पसरला हे आपले मत गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले.

8) पुढे कोणता महाभयंकर अनर्थ होईल व तो कसा टाळता येईल, याचा सविस्तर अहवाल माधव गोडबोले यांनी दिला. मात्र या व त्या कारणामुळे नरसिंह राव व शंकरराव चव्हाण यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

9) गुप्तचर खात्याने दि. 1 डिसेंबरला दिलेल्या अहवालात मशीद उद्‌ध्वस्त करण्यासाठी करसेवकांचे आत्मघातकी पथक तयार असल्याचे संकेत दिलेले आहेत.

10) राव यांनी नंतर मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे प्रत्येक घटना जोडत गेलो, तर अयोध्येत जे घडले तो योजनाबद्ध कट होता हे मान्य करावे लागते. फक्त त्या कटाची आखणी आणि अंमलबजावणी कोणी केली, हे अद्याप उघड झालेले नाही.

11) बाबरी मशीद पाडण्याला राव यांनी अप्रत्यक्षपणे मदत केली. किंबहुना तोच त्यांचा उद्देश होता. चमत्कार, छूमंतर या गोष्टींवर विश्वास असणारे आणि अशा गोष्टी करणारे सत्यसाईबाबा यांना शंकरराव चव्हाण देव मानत आणि चंद्रास्वामी हे रावांचे गुरू किंवा जवळचे मित्र होते.

12) विनय सीतापती यांना रावांच्या कागदपत्रांत मिळालेले एक छोटे पुस्तक लक्ष वेधून घेणारे आहे. ब्रह्मदत्त तिवारी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव आहे- ‘व्हॅटिकॅन’- तेरेसा, सोनिया भारताला नष्ट करण्याचा कॅथॉलिक कट. पुस्तकांची नेमकी निवड, नेमक्या पुस्तकांचे वाचन आणि संग्रह या बाबत फार सजग असलेल्या रावांनी ही पुस्तिका आपल्या संग्रहात का ठेवली असेल?

त्या कालखंडातील प्रत्येक घटनेची लेखकाने सविस्तर सांगोपांग चर्चा केली आहे. त्याच वेळी आपणाला माहीत नसलेल्या पण माहीत असाव्यात असे वाटणाऱ्या अनेक गोष्टींचा उलगडा लेखकाने या पुस्तकात केला आहे. उदा. अँबॅसॅडर, फियाट यांच्यामध्ये मारुती कशी अवतीर्ण झाली? चंद्रस्वामी प्रकरण नक्की काय आहे? जैन हवाला प्रकरण, हर्षद मेहता या वेळी नक्की काय घडले? राजीव गांधी यांच्यावर पाळत ठेवली असेल का? आणि त्याच वेळी लेखक क्षुल्लक वाटणाऱ्या- पण खऱ्या अर्थाने नेमके संकेत देणाऱ्या घटनाही नोंदवतो आणि त्यांचा अन्वयार्थ लावतो. जसे, सर्वपक्षीय बैठक बोलावली, पण त्यात वाजपेयी नव्हते!

दिल्लीचे राजकारण लक्षात घेताना सर्वसामान्य वाचक ज्या दोन फार महत्त्वाच्या गोष्टी फारशा किंवा अजिबात लक्षात घेत नाही, त्या लेखकाने आपल्यासमोर ठेवल्या. बलाढ्य राष्ट्रांचे न दिसणारे हात सर्वत्र कार्यरत असतात लेखकाने नोंदविलेली ही एक घटना पाहा. 6 जून 66 म्हणजे 6-6-66 रोजी रुपयाचे योग्य मूल्य ठेवल्यासच मदत मिळेल, असे अमेरिकेने सांगितले. इंदिरा गांधींना हा देशाचा अपमान वाटत होता. मात्र परिस्थिती बिकट झाल्यावर त्यांना तो निर्णय घ्यावा लागला. त्याचा त्यांच्या मनावरील ताण विलक्षण होता. तो घालवण्यासाठी ‘डॉक्टर झिवागो’ हा चित्रपट पाहण्यात त्यांनी रात्र घालवली. ‘भीतीने मी गारठले होते’, असे इंदिरा गांधींनी स्वत:च्या मन:स्थितीचे वर्णन केले आहे... मात्र अमेरिकेने कबूल केल्याप्रमाणे फारशी मदत केली नाही. व्हिएतनाम युद्धात इंदिराजींनी अमेरिकेला जाहीर विरोध केला होता आणि त्यासाठी भारताला धडा शिकवायचा असा अमेरिकेचा विचार होता.

आणखी एक म्हणजे दिल्लीत ‘छूमंतर’ फार चालते. काळी जादू आणि कुंडली यांत अनेक भले-भले गुंतलेले असतात. लालबहादूर शास्त्री, इंदिराजी, राजीवजी यांच्या वेळी नेमके काय झाले? विश्वनाथ प्रतापसिंग आणि चंद्रशेखर यांची खुर्ची जावी म्हणून कोणते यज्ञयाग झाले, हे सांगणारे खूप भेटतात. त्यामुळे वातावरण भारून टाकता येते. यापैकी नरसिंह राव यांच्या कालखंडातली एक घटना लेखकाने नोंदवली आहे. उज्जैन येथील महांकाल शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. रावांना पंतप्रधानपदावरून दूर करण्यासाठी मध्य प्रदेशातील एक बडा नेता तिथे पुढील महिन्यात मोठा तंत्रविधी करत आहे, अशी माहिती त्या मंदिरातील पुजाऱ्यांनी पी.व्ही.आर.के. प्रसाद यांना दिली. ही माहिती खात्रीची होती. प्रसाद चिंतेत पडले. त्यांचा या तंत्रविद्येवर विश्वास होता. त्यांनी ही माहिती राव यांना दिली. रावांनी या गोष्टींवर आपला विश्वास नाही, म्हणून सांगितले. प्रसाद यांनी यापूर्वी घडलेल्या अनेक घटना सांगितल्यावर आणि प्रसाद यांनी फारच आग्रह धरल्यावर रावांनी त्यांना होम करण्यास परवानगी दिली. राव तिथे उपस्थित राहिले नाहीत. मात्र विश्वास ठरावाच्या आधी काही खास होमहवन करण्यात आले.

शिस्तबद्ध सर्वांगीण पुस्तकी अभ्यास आणि रहस्यकथेसारखी वाचकांना खिळवून ठेवणारी रचना- यामुळे ‘वाचू आनंदे’ म्हणून पुस्तक वाचताना आपण निवांतपणे पुढे सरकत असतो. मात्र त्याच वेळी लेखकाचा वैचारिक कल कोणत्या बाजूचा आहे, हे सांगणारी; असे काही सांगताना फारशी चर्चा न करणारी वाक्ये आपणासमोर यावयास लागतात. वानगीदाखल पृष्ठक्रमांकांसह काही वाक्ये पाहू या...

1) दीपक नायर यांनी मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत माँटेकसिंग अहलुवालिया यांच्याशी टोकाचा वादविवाद केला. नवे आर्थिक धोरण देशाच्या दृष्टीने कसे घातक आहे, हे सांगत राजीनामा दिला आणि डाव्या विचारांची डिबेटिंग सोसायटी असलेल्या जेएनयूमध्ये ते प्राध्यापक झाले.

2) प्रत्येक जातीचे एक वैशिष्ट्य आहे, ते वंशपरंपरेने त्या जातीत बहुधा येतेच. या वैशिष्ट्याचा उपयोग राव फार खुबीने करून घेत असत. प्रशासकीय अधिकारी कायस्थ असेल, तर काम अधिक चांगले होते, हे त्यांना माहीत होते.

3) काँग्रेसमधील बडे नेते समाजवादी किंवा डाव्या वळणाच्या धोरणाला सोडचिठ्ठी देण्यात तयार नव्हते. त्यात त्यांचे हितसंबंधही गुंतले होते. (पृ.91)

4) वाजपेयींचा पराभव हा राजकीय व्यूहरचना चुकल्यामुळे झाला होता, आर्थिक सुधारणा केल्याने नव्हे. रावांचा पराभवही याच कारणामुळे झालेला होता. दोन्ही वेळा तामिळनाडूचे राजकारण कारणीभूत होते, हे विशेष. या दोघांनीही जयललितांशी युती केली व ते फसले. (पृ.236)

5) राजीव गांधींची हत्या झाली नसती तर तेच पंतप्रधान झाले असते. पण आर्थिक सुधारणा करण्याचे धाडस त्यांनी दाखवले असते का? राजीव गांधींचा एकूण कल, समज व स्वभाव लक्षात घेता, असे धाडस त्यांच्याकडून दाखवले गेले नसते. हे धाडस नेहरू-गांधी घराण्यांबाहेरील व्यक्तीने दाखवले. कारण त्या व्यक्तीकडे अफाट कर्तृत्व होते.

6) कोणत्याही स्वाभिमानी भारतीयाला शरमिंदा करणारी ही घटना होती, राजीव गांधी सरकारचा बेशिस्त कारभार याला जबाबदार होता. (पृ.44)

7) बुद्धिमान व भेदक युक्तिवाद करणाऱ्या चिदंबरम यांना बुद्धीचा दर्प होता व आचरणात मगरुरी होती. (पृ.80)

8) हिंदू मुशीतील माणूस धर्मनिरपेक्ष कसा असू शकतो, असा प्रश्न केला जातो. परंतु हिंदू तत्त्वज्ञानाचा व धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांना असे प्रश्न पडत नाहीत. उलट हिंदू धर्मशास्त्रांचा व तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करणारेच खरे पुरोगामी होऊ शकतात. (पृ.184)

9) राजीव यांचा पाश्चात्त्य पिंड आणि रावांचा अस्सल भारतीय स्वभाव यांचे एकमेकांशी जुळणे कठीण होते. (पृ.149)

10) नेहरूंच्या नजरेतून राव भारताकडे पाहत नव्हते. रावांचे वाचन अफाट होते आणि परकीय विचार-विश्वाशी ते उत्तम परिचित असले, तरी त्यांचे मूळ संस्कार हे हिंदू चालीरीतींतून आले होते. नेहरू वा त्यांच्या प्रभावळीप्रमाणे रावांवर पाश्चात्त्य चालीरीतींचा प्रभाव नव्हता. त्यांची जडणघडण ही हिंदू संस्कारात झाली होती. (पृ.184)

लेखकाचा हा वैचारिक कल ‘खाउजा’पर्यंत जाऊन पोचलेला आहे. आपल्या मनोगतात लेखकाने सांगितले आहे. ‘‘1991 च्या आर्थिक सुधारणांचा लाभ झालेल्या मध्यमवर्गातून मी आलो आहे. कनिष्ठ मध्यमवर्गातून कोट्यवधी लोकांना जो लाभ मिळाला, मी त्यातील एक लाभार्थी आहे.’’ मात्र लेखक हे पुस्तक लिहीत होते, त्या वेळी कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीत कोट्यवधी स्थलांतरीत मजूर नरकयातना भोगत घरी परतत होते. ‘खाउजा’ ही रचना याला कारणीभूत आहे का, याचा साधा विचारही लेखकाला करावासा वाटलेला नाही. अर्थात मला व माझ्यासारखे विचार असलेल्यांना या पुस्तकात जो एकांगीपणा वाटतो, त्यामुळे या पुस्तकाला कमीपणा येत नाही, खरे तर त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व आणखी वाढते. दोन्ही बाजूंनी या पुस्तकावर परिसंवाद घेऊन साधकबाधक चर्चा करावयास हवी हे आपल्या लक्षात येते, कारण ‘रावपर्वा’वरील मैलाचा दगड म्हणून हे पुस्तक उभे आहे.

मात्र प्रथमच सांगितल्याप्रमाणे अनेक शक्तिस्थाने असलेल्या या पुस्तकाचे एक मर्मस्थान आहे. या पुस्तकात सखोल, परिपूर्ण, शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. म्हणजे हा डॉक्टरेटचा उत्कृष्ट प्रबंध आहे किंवा हस्तिदंती मनोऱ्यात बसून एखाद्याने केलेलं चिंतन! - प्रशांत दीक्षितांसारखा समोरच्या माणसांना गुगली टाकत बोलता करणारा पत्रकार दिसत नाही, त्यामुळे काय होते ते सांगतो. लेखकाने लिहिलंय, ‘‘टीव्हीच्या खाजगीकरणाला राव अनुकूल नव्हते. सरकारचे काहीच नियंत्रण राहणार नाही, हे अतिशय धोकादायक आहे, हे राव यांचे मत त्यांचे सचिव पीव्हीआरके प्रसाद यांनी नोंदवले आहे.’’ आता खरी परिस्थिती काय आहे? राजीव गांधींचे सर्वांत जवळचे मित्र आणि त्या वेळचे केंद्रातील मंत्री प्रभाकर देवधर यांची मी ‘साधना’साठी मुलाखत घेतली होती. त्यांनी जे सांगितलंय ते असं आहे : देवधरांनी दूरदर्शनच्या खाजगीकरणाची कल्पना राजीव गांधींना सांगितली. राजीव म्हणाले, ‘मला हे पटत नाही, पण तुम्ही एक सादरीकरण करा.’ देवधरांनी एक प्रभावी सादरीकरण केले. राजीव म्हणाले, ‘तुमचे सादरीकरण योजना पूर्णपणे पटवून देते, पण माझ्या व्यवहारज्ञानाला हे पटत नाही!’ राजीव यांच्या हत्येनंतर देवधर मुंबईत परत आले. त्यानंतर नरसिंह राव पंतप्रधान झाले. देवधरांनी सादरीकरण केले, तेव्हा नरसिंह राव तिथे होते. त्यांना ही योजना पटली होती. त्यांनी आग्रहाने देवधर यांना दिल्लीत बोलावून त्यांना ही योजना कार्यान्वित करण्यास सांगितले.

ही गोष्ट तशी फार महत्त्वाची नाही. पण अशाच स्वरूपाची मांडणी शरद पवारांच्या हातात येऊन सुटलेले पंतप्रधानपद आणि बाबरी मशिदीचा विध्वंस या घटनांची मांडणी करताना झाली असेल का? शरद पवारांचे पंतप्रधानपद जवळजवळ नक्की होते. शरद पवार पन्नाशीत होते. तडफदार, कुशल प्रशासक ही त्यांची प्रतिमा भारतभर होती. महत्त्वाचे म्हणजे नामवंत उद्योगपतींचा त्यांना पाठिंबा होता. टाइम्स ऑफ इंडियाने अगदी ठळक बातमी छापली होती, ‘पवारांचे आव्हान कायम आहे. खासदार ठामपणे त्यांच्या मागे आहेत.’ मात्र त्याच दिवशी संध्याकाळी पवारांनी आपले नाव मागे घेतले. या सर्वांवर भाष्य करताना लेखक लिहितो, ‘राव हसले आणि म्हणाले, वृत्तपत्र मुंबईचे आहे. त्याचा संपादक मराठी आहे व मुंबईचा वृत्तविभाग प्रमुख व दिल्ली प्रतिनिधी महाराष्ट्रीय आहे. ते दुसरे काय लिहिणार?’ दिलीप पाडगावकर त्या वेळी संपादक होते. राजदीप सरदेसाई मुंबईचे वृत्तविभाग प्रमुख होते व दिल्लीतील प्रतिनिधी किरपेकर होते; हे खरे आहे. मात्र हे तिघेही पत्रकारितेला आपला धर्म समजत होते. त्यांच्या हातातील लेखणी ही धारवाडी काटा होता.

मग काय झाले असेल? दोन शक्यता आहेत. एक मजेशीर व दुसरी अस्वस्थ करणारी. पहिली मजेशीर गोष्ट- राजधानी दिल्लीत ‘छूमंतर’ हे कसे चलनी नाणे आहे याची. लेखकाने दिलेली दोन-तीन उदाहरणे अशी आहेत. विश्वनाथ प्रतापसिंग व त्यांचे कॅबिनेट सेक्रेटरी पांडे हे पत्रिका पाहून डावपेच ठरवत. इंदिरा गांधी अनेक यज्ञयाग करीत. हैदराबाद शहरातील गणपतीशास्त्री वेदाचे गाढे अभ्यासक होते. तंत्रविद्येवर त्यांचा अधिकार होता. श्रद्धेने, प्रामाणिकपणे अचूकतेने वेदांत सांगितलेले विधी केले तर फळ मिळते, असा त्यांचा विश्वास होता. चेन्नारेड्डी यांचे धोक्यात आलेले मुख्यमंत्रिपद त्यांनी दोनदा विधी करून वाचवले होते आणि सरकार टिकवण्यासाठी राव राजकीय नेत्यांबरोबरच गुप्तचर खाते, पोलीस अधिकारी, साधू-महंत-ज्योतिषी यांचीही मदत घेत. लेखकाने न नोंदवलेली एक गोष्ट म्हणजे रावांना पंतप्रधानपद मिळावे म्हणून अगदी गुप्तपणे- पण बातमी बाहेर सर्वत्र पसरेल, याची काळजी घेत धूमधडाक्यात यज्ञयाग होत होते. चंद्रास्वामी आणि सत्यसाईबाबा देव पाण्यात बुडवून बसले होते. शाहू, फुले, आंबेडकर यांचे तप्त संस्कार असलेले शरद पवार हा भंपकपणा बहुधा हसत हसत बघत असणार. पण दिल्लीतील जनमानसावर आणि काही खासदारांच्या मनातही ‘आता राव नक्की’ अशी भावना तयार होत असणार. दुसरी गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. रशिया कोसळला होता. आता अमेरिका जगाला आपल्या तालावर नाचवावयास मोकळी होती. अगदी रशिया महासत्ता म्हणून अस्तित्वात असतानासुद्धा अमेरिकेने इंदिरा गांधींना मान्य नसलेले, अपमानास्पद वाटणारे रुपयाचे अवमूल्यन कसे करावे लागले, हे लेखकाने लिहिले आहे, हे आपण पाहिले. लेखकाने आणखीही एक गोष्ट नोंदवली आहे, ‘भारताने परदेशी वित्तसंस्थांच्या दबावाखाली आर्थिक सुधारणा केल्या होत्या. हा दबाव नसता, तर भारत बदलला नसता. पण परदेशी दबावाखाली आपण काही करीत आहोत, हे रावांना जाणवू द्यायचे नव्हते.’

ते असो! त्या वेळी एकमेव जागतिक प्रभुसत्ता असलेल्या अमेरिकेच्या मनात ‘समाजवाद’ या शब्दाबाबत ॲलर्जी होती. या शब्दाबद्दलची ती ॲलर्जी जगभर पसरवण्यात अमेरिका यशस्वी होत होती आणि शरद पवार नेहरूंना मानणारे हाडाचे समाजवादी होते. नानाजी देशमुख, मधू लिमये आणि बलराज मधोक या तिघांनीही माझ्याशी बोलताना नोंदवलेले एकमत असे आहे, ‘दिल्लीत केंद्रात राजकारण करावयाचे असेल, तर अमेरिकेत आणि रशिया वकिलातीत तुमचे मैत्रीपूर्ण संबंध हवेत. तुम्ही त्यांच्याच विचारांचे आहात ही आपली प्रतिमा तुम्ही त्यांच्या मनात तयार करावयास हवी. शरद पवारांनी आणि खरे तर यशवंतरावांनीही असे काही कधीही केले नाही आणि त्याच वेळी हा माणूस हाडाचा समाजवादी आहे, ही त्यांची प्रतिमा अमेरिकन दबावगटात निर्माण करायला राव यशस्वी झाले.’

बाबरी मशिदीबाबत लेखकाने फार सविस्तर लिहिलंय. मात्र लेखकाचा कल शेखर गुप्तांनी नरसिंह राव यांनी जे सांगितलं ते मानण्यावर आहे असे वाटते. रावांनी सांगितलंय, ‘‘आडवानी यांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि फसलो!’’ लेखकाने प्रकरणाची सुरुवात करतानाही हे प्रकरण 1885 मध्येच न्यायालयात गेले होते, असे लिहिले आहे. मात्र कळत-नकळत त्यापूर्वीचा महत्त्वाचा संदर्भ लेखकाने दिलेला नाही. 1857 च्या स्वातंत्रलढ्यापूर्वी फक्त सहा महिने आधी बाबा रामचरण दास यांच्या नेतृत्वाखालील हिंदू आणि त्या वेळचे प्रमुख जमीनदार अच्छन खान यांच्यात समझोता झाला होता. 1857 नंतर ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला भरून या दोघांना फाशी दिले. हे सांगण्याचे कारण अशा प्रकाराचा समझोता व्हावा, म्हणून त्या वेळी मोरोपंत पिंगळे आणि मधू लिमये यांच्यात अनेक बैठका झाल्या होत्या. काही बैठकींना नानाजी देशमुखही उपस्थित होते. बाबरी मशिदीचा विध्वंस झाल्यावर मला दिलेल्या मुलाखतीत नानाजींनी स्पष्टपणे सांगितलंय, ‘‘या मशिदीचा विध्वंस ही या देशाच्या दृष्टीने भयावह गोष्ट आहे. आपणाला अखंड भारत हवा आहे आणि अखंड भारत म्हणजे भारतातील मुसलमानांची संख्या वाढणार. आपण जर मुसलमानांना अशी वागणूक देणार असू, तर आपल्या मनातील अखंड भारत कसा काय साकार होणार?’’

ते असो. बाबरी मशीद का वाचवता आली नाही? शंकरराव चव्हाण, नरसिंह राव यांचे बालपण आणि तारुण्य निजामशाहीत गेले होते. मुसलमानांबद्दल त्यांच्या जागृत वा सुप्त मनात आकस होता? छूमंतर आणि तंत्रविद्या यांच्या जोरावर आपले दुकान चालविणारे चंद्रास्वामी आणि सत्यसाईबाबा यांनीं ‘बाबरी मशिदीचा विध्वंस ही तुम्हांला बरकत देणारी गोष्ट आहे का’, असे काही सांगितले होते का? मात्र या साऱ्याच जर-तरच्या गोष्टी आहेत. माझ्याशी बोलताना लिमये, नानाजी, मधोक या तिघांनीही एकमताने एक गोष्ट नोंदवली होती, ‘केंद्रीय सत्तेने जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे.’ अर्थात या तिघांचे सांगणेही अखेर तर्क असणार. त्यामुळे माधवराव गोडबोलेंनी जे लिहिलंय, ते प्रमाण मानावयास हवे. त्याच्याही पुढील एक गोष्ट करावयास हवी. व्ही.जी. वैद्य त्या वेळी आय.बी.चे प्रमुख होते. वैद्यांनी यावर काहीही लिहिलेले नाही. मात्र वैद्य अगदी रोखठोकच बोलतात आणि लिहितात, हे मला माहीत आहे. ‘साधना’ने त्यांची सविस्तर मुलाखत घ्यावयास हवी.

रावपर्व
लेखक : प्रशांत दीक्षित
राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे 243, किंमत : 375 रुपये.

(28 जून 2021 रोजी नरसिंह राव यांचे जन्मशताब्दीवर्ष संपत आहे.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके