डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रत्येकाने अभ्यासावे, संग्रही ठेवावे असे पुस्तक (पूर्वार्ध)

या ग्रंथासाठी खरं तर दुसरेही नाव योग्य वाटते, ‘दोन महामानवांचा संवाद, संघर्ष आणि समन्वय’. असो! हे मला जे वाटते ते बरोबर का चूक हे प्रत्येकाने पुस्तक अभ्यासल्यावर आपापल्या मनाशी ठरवावे. माझे वाचन कमी नाही, पण मला माहीत नसलेला माहितीचा खजिना रावसाहेब या ग्रंथात माझ्यासमोर उलगडत जातात. माझ्या वाचनाचा वेगही चांगला आहे. मात्र हे आठशे पानी पुस्तक वाचायला मला एक महिना लागला. प्रत्येक पानावर मी अडखळलो. खुणा केल्या, टिपणे काढली. अस्वस्थ होऊन काही काळ फक्त विचार करत बसावेसे वाटले. ग्रंथात टोकाची वैचारिक घुसळण आहे. आपणाला न पटणारी, अस्वस्थ करणारी पण त्यामुळे विचार करायला प्रवृत्त करणारी विधाने आहेत.   

महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरीलसुद्धा अनेक वाचकांप्रमाणे रावसाहेब हे माझेसुद्धा आवडते आणि मार्गदर्शक लेखक आहेत. किंबहुना कन्नड, हिंदी, इंग्रजीत त्यांचे ग्रंथ भाषांतरित झालेले असल्यामुळे अन्य भाषक विभागात त्यांचे वाचक अधिक असावेत, असा माझा मर्यादित अनुभव आहे. ‘गांधी आणि आंबेडकर - संघर्ष आणि समन्वय’ असा त्यांचा नवा ग्रंथ येणार ही बातमी भोवताली खूप काळ होती. हे आपले शेवटचे पुस्तक असेल, असे रावसाहेबांनी मित्रमंडळीत सांगितल्यामुळे त्यांच्या वाचकांच्या मनातील औत्सुक्य अधिकच वाढलेले होते. पुस्तक खरं तर मार्च 2020 मध्येच प्रसिद्ध व्हावयाचे, मात्र कोरोनामुळे ते ऑक्टोबर 2020 मध्ये प्रसिद्ध झाले. नोव्हेंबर महिन्यात दुसरी आवृत्ती बाहेर आली. तिसरी आवृत्ती हे परीक्षण प्रसिद्ध होईपर्यंत बाहेर आलेली असेल. कन्नड, हिंदी, इंग्रजी या आवृत्त्यांमध्येही तोवर प्रसिद्ध झालेल्या असणार. 

हे सारे सांगण्याचे कारण या पुस्तकावर मराठीतील प्रमुख वृत्तपत्रांत अजून अभिप्राय आलेले नाहीत. कारण, आज महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात ध्रुवीकरण झाले आहे. अगदी आ. ह. साळुंखे यांच्या गौतम बुद्धावरील ग्रंथावर किंवा त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्राच्या सर्व आवृत्त्यांचा अभ्यास करून लिहिलेले ‘पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर’, या पुस्तकाची प्रमुख वृत्तपत्रांनी दखल घेतलेली नाही आणि हे महाराष्ट्राच्या वातावरणात सर्वत्र भरलंय. ‘चतुरंग’ म्हणजे नुसते उजवे आणि ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ म्हणजे नुसते डावे- असा सगळा प्रकार! 

मी मात्र या पुस्तकाला वेगळ्या कारणामुळे दूर ठेवत होतो. माझ्या मनात रुतून बसलेला एक विनोद सांगतो. एकदा एक बोट बुडाली. बोटीवरची माणसे कुठल्यातरी बेटावर पोहोचली. ही बातमी दिल्लीतील वार्ताहरांकडे एका वर्षाने पोहोचली. त्या माणसांना भेटायला काही वार्ताहर त्या बेटावर पोहोचले. ते एका आलिशान हॉटेलात उतरले. त्यांनी गावातील लोकांना विचारले, ‘‘बोटीवर काही मद्रासी माणसे होती ना, ती कुठे आहेत?’’ गावातील लोक म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या हॉटेलात उतरलाय ते हॉटेलच त्या मद्रासी माणसांनी येथे आल्यावर सुरू केलंय!’’ वार्ताहरांनी विचारलं, ‘‘काही सरदारजी होते ते आता कुठे आहेत?’’ गावातले लोक म्हणाले, ‘‘गावात येतानाच ते बोटीची लाकडे घेऊन आले. त्यांनी गावात फर्निचरचे मोठे दुकान टाकलंय. तुमच्या हॉटेलातील सर्व फर्निचर त्यांनीच बनवलंय!’’ वार्ताहरांनी विचारलं, ‘‘काही बंगाली माणसे होती, त्यांना कुठे भेटता येईल?’’ गावातील लोक म्हणाले, ‘‘त्यांना भेटता येणार नाही. ते सारे जण आता राजांच्या दरबारात सचिव किंवा सल्लागार म्हणून काम करतात.’’ 

वार्ताहरांनी विचारले, ‘‘काही मराठी माणसे बोटीवर होती, ती माणसे कुठे आहेत?’’ गावातील माणसे म्हणाली, ‘‘बोटीवर आणखी कुणी नव्हतेच.’’ तेवढ्यात एक मुलगा म्हणाला, ‘‘नाही, आणखी काही माणसे होती. पण ती अजून त्या बोटीवरच आहेत. सकाळी उठल्यापासून ‘टिळक बरोबर होते की आगरकर?’ हा त्यांचा वाद सुरू असतो.’’ असो! टिळक आणि आगरकर या दोघांबद्दलही माझ्या मनात अतीव आदर आहे. ते महामानव आहेत, असे मी मानतो. पण आमचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवायचे असतील, तर आज ते दोघेही संदर्भहीन आहेत, असे मी मानतो. 

मात्र हे पुस्तक खूप काळ मी हातात घेत नव्हतो, त्याचे प्रमुख कारण हे नव्हे. हा ग्रंथ आठशे पानी आहे. ऋणनिर्देश जवळजवळ तीस जणांचा. त्यात रामदास भटकळापांसून भालचंद्र कांगोंपर्यंत अनेक जण. तळटिपा चाळीस पानी. संदर्भ ग्रंथ इंग्रजी ऐंशी, मराठी वीस. म्हणजे पुस्तक वाचून समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा असेल, तर प्रत्येक वाचकाने सलग मोकळा वेळ काढावयास हवा. पुस्तकात आहे माहितीचा खजिना. आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी. टोकाची पण अभ्यासपूर्ण विधाने. अस्वस्थ करणारी वैचारिक घुसळण, आपल्याला विचार करावयास प्रवृत्त करणारी आणि पुस्तकाच्या दृष्टीने गरजेची नसलेली शेरेबाजीसुद्धा! हे आहे रावसाहेबांचे मुक्त चिंतन. 

मी वर टिळक-आगरकर यांच्याबाबत जो विनोद सांगितलाय, तो या पुस्तकाला लागू होत नाही, हे रावसाहेबांनी अगदी सहजपणे सांगितलंय. पुस्तकात तीन विभाग आहेत. पाहिल्या विभागातील दुसरा लेख आहे ‘सफाई कामगार ते संत’. त्या लेखात त्यांनी सांगितलंय, ‘‘काळाच्या ओघात अनेक महापुरुष संदर्भहीन होतात. गांधी याला अपवाद आहेत. ते जिवंत असताना, त्यांची जेवढी चरित्रे लिहिली गेली आहेत, त्यापेक्षा अधिक त्यांच्या मृत्यूनंतर लिहिली गेली आहेत. त्यात युरोपातील विविध भाषांतील जवळजवळ पाचशे चरित्रे आहेत. सर्व भारतीय भाषांमधील छोट्या-मोठ्या चरित्रांची संख्या याहूनही अधिक असेल. गांधींच्या लिखाणाचे स्वतंत्रपणे संकलित केलेले शंभर खंड आहेत. बराक ओबामांपासून नेल्सन मंडेलांपर्यंत सारे जण आपल्या भाषणात त्यांचे स्मरण करतात. त्यांना वंदन करतात. हे आहे तरी काय? आज मी गांधीजींबद्दल जे काही लिहीत आहे, तो या कुतूहलाचा विषय आहे.’’ रावसाहेबांनी आंबेडकरांबद्दल तरल शब्दांत याचीच नकळत आठवण करून दिलेली आहे- ‘‘या देशातील सनातन घृणास्पद जातिव्यवस्थेने ज्यांना पिढ्यान्‌पिढ्या नरकयातना भोगायला लावलंय.’’ (हे वाक्य रावसाहेबांचे नाही, विवेकानंदांच्या पत्रातील आहे.) त्यांच्यातील शेवटच्या माणसाला पुन्हा माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी नवी रचना शोधून आपण ती कार्यान्वित करत नाही, तोवर आंबेडकर कालातीत आहेत. पुन:पुन्हा वाचन, चिंतन, मनन करून आपणांला त्यांची रचना समजावून घ्यावयास लागेल आणि रावसाहेब या ग्रंथात तेच करताहेत. म्हणजे खरं तर या ग्रंथाचे शीर्षक हवे होते ‘गांधी आणि आंबेडकरांना समजावून घेताना’ किंवा ‘समजावून घेऊ या’. या ग्रंथासाठी खरं तर दुसरेही नाव योग्य वाटते, ‘दोन महामानवांचा संवाद, संघर्ष आणि समन्वय’. असो! हे मला जे वाटते ते बरोबर का चूक हे प्रत्येकाने हे पुस्तक अभ्यासल्यावर आपापल्या मनाशी ठरवावे. 

माझे वाचन कमी नाही, पण मला माहीत नसलेला माहितीचा खजिना रावसाहेब या ग्रंथात माझ्यासमोर उलगडत जातात. माझ्या वाचनाचा वेगही चांगला आहे. मात्र हे आठशे पानी पुस्तक वाचायला मला एक महिना लागला. प्रत्येक पानावर मी अडखळलो. खुणा केल्या, टिपणे काढली. अस्वस्थ होऊन काही काळ फक्त विचार करत बसावेसे वाटले. ग्रंथात टोकाची वैचारिक घुसळण आहे. आपणाला न पटणारी, अस्वस्थ करणारी. पण त्यामुळे विचार करायला प्रवृत्त करणारी विधाने आहेत,  याचा अंदाज यावा, म्हणून पुस्तकात जी छत्तीस पानांची प्रस्तावना आहे, त्यातील काही उदाहरणे देतो. 

1) गांधीजींना सर्वांत छळले ते त्यांच्यात असलेल्या तीव्र स्वरूपाच्या कामवासनेने. म्हणून त्यांना सिग्मंड फ्रॉइड समजून घेण्याची इच्छा होती. 

2) कोणत्याही महापुरुषाला त्याच्या ताकदीचा समकालीन विरोधक लाभल्याशिवाय महापुरुष होता येत नसते आणि आपले श्रेष्ठत्वही टिकवता येत नसते. त्याच्याविना ते अनेकदा अहंकारी, स्तुतिप्रिय, आत्ममग्न आणि हुकूमशाही बनत असतात. असा विरोधक गांधींना 1930 सालापर्यंत ना दक्षिण आफ्रिकेत लाभला ना भारतात. गांधीजींच्या सुदैवाने त्यांना भारतात डॉ. आंबेडकरांच्या रूपाने एक समंजस विद्वान परंतु तितकाच कडवा विरोधक लाभला. त्यामुळे त्यांच्यातील महात्म्याचे सारे अहंकार गळून पडण्यास सुरुवात झाली आणि ते आदर्श महात्मा बनू शकले. 

3) आंबेडकरांच्या घणाघाती टीकेमुळे काँग्रेसमधील पहिल्या पिढीतील नेतृत्व खुजे बनण्याऐवजी विकसित होत गेले. सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी ही त्याची उदाहरणे आहेत. 


4) त्या काळात गांधी आणि लेनिन हेच दोन महापुरुष जागतिक राजकारणात तेजाळत होते. गांधी मुसोलिनीला भेटत होते; परंतु लेनिनला नाही. कारण गांधी भारतातील ज्या प्रस्थापित शक्तीवर स्वार झाले होते, तिचे लेनिन हे सर्वांत मोठे शत्रू होते. गांधींनी मार्क्स-एंगेल्स यांचे वाङ्‌मय फारसे वाचलेले असावे, असे दिसत नाही. अर्थात त्या काळात ते उपलब्ध होणेही कठीणच होते. 

5) 1910 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘हिंद स्वराज’मध्ये गांधीजींनी पाश्चात्त्य संस्कृतीवर जेवढी टीका केली आहे, तेवढी ती भ्रष्ट नव्हती. तिच्यात ग्रीक चैतन्य आणि आधुनिक ज्ञान-विज्ञानाचा संगम झालेला होता, म्हणून तर ती माणसाला केंद्र मानून पुनरुज्जीवन आणि प्रबोधनाची, रेनेसाँची चळवळ उभी करू शकली. तिची गांधींनी फारशी दखल घेतली नाही. गांधींनी हिंद स्वराजमध्ये केलेली पाश्चात्त्य संस्कृतीवरील टीका ही मूलत: भांडवलशाहीविरुद्ध केलेली होती. गांधी जिला पाश्चात्त्य संस्कृती म्हणत होते, वस्तुत: ती भांडवलशाही होती. परंतु ते खुलेआम भांडवलशाही हा शब्द वापरत नव्हते. कारण त्यांना भारतीय स्वातंत्र्याची चळवळ पुढे न्यायची होती आणि त्यासाठी भांडवलदारांजवळची संपत्ती वापरावयाची होती. 

6) गांधी-आंबेडकर संघर्षात आंबेडकरही बदलले. त्यांनी समाजातील एका गटाचे राजकारण करण्याऐवजी ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचाही विचार करू लागले. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून ते कामगार नेते बनले. त्यांनी त्यांच्या राजकीय विचारांचा पाया ‘स्टेटस अँड मायनॉरिटीज’ या आपल्या अहवालात घातला. 1940च्या दशकाच्या सुरुवातीलाच त्यांनी भारताच्य फाळणीनिमित्ताने लिहिलेल्या ‘पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया’ या ग्रंथात भारताच्या राजकीय इतिहास आणि राजकीय समस्यांची मूलभूत मांडणी केली आहे. जीना आणि गांधी पाकिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा करताना त्याच ग्रंथाचा आधार घेत होते. 

7) पुणे कराराची कथा गांधी आणि आंबेडकर या दोघांनी मिळून लंडनमध्येच लिहिली. त्याचा विस्तृत तपशील या ग्रंथात वाचावयास मिळतो. असो! रावसाहेबांचा वैचारिक क्षेत्रातला अधिकार कोणीच नाकारत नाही. मात्र या पुस्तकातील पुढील प्रकरणात तो ‘प्रेषिताचा अहंकार’ म्हणून आपणांसमोर येणार आहे. रावसाहेबांचे शब्द आहेत, ‘‘हा माझा ग्रंथ लवकरच इंग्रजी, कन्नड, हिंदी आणि इतर भारतीय भाषांत येणार आहे आणि त्यामुळे त्या वेळी अन्य भाषांतील संशोधक आणि अभ्यासक यांना जुन्या मांडणीतील चुका आणि मर्यादा यांची पुनर्मांडणी करण्यासाठी आणि नव्या मांडणीसाठीची सर्व दालने खुली होतील, असा विश्वास वाटतो.’’ 

मी वर प्रस्तावना सविस्तर सांगितलेली नाही. वानगीदाखल फक्त काही उदाहरणे दिलीत. पुढील तीन भागांत आपणांला काय वाचावयाचे आहे, हे लक्षात यावे. पानापानांवर अस्वस्थ होऊन विचार करावयाची तयारी ठेवून वाचन सुरू करायला हवे! 

पुस्तक तीन विभागांत आहे. पहिल्या विभागाचे नाव ‘सत्यशोधक राजकारणी’. त्यात तीन प्रकरणे आहेत. गांधीपूर्व भारत, सफाई कामगार ते संत आणि शेतकरी नेते ते महात्मा. तिसऱ्या विभागाचे नाव आहे, ‘रक्तज्वालांत अंतहीन प्रवास’. या विभागात तीन लेख आहेत. पहिला, स्त्रियांच्या सहवासात, दुसरा अखंड वेदनादायी स्वातंत्र्य आणि तिसरा ‘वन मॅन आर्मी’. खरं तर पहिला आणि तिसरा एकमेकांत मिसळलेले आहेत किंवा ते एकच आहेत. यात प्रामुख्याने गांधी आहेत. पुढे जाण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रावसाहेबांनी ‘रक्तज्वालांत अंतहीन प्रवास’ यात ‘स्त्रियांच्या सहवासात’ हे प्रकरण ठेवलंय! मात्र खरा महत्त्वाचा आहे विभाग दुसरा. खरं तर हा या पुस्तकाचा गुरुत्वमध्य आहे किंवा ‘एवढ्याचसाठी केला होता अट्टाहास’ म्हणून रावसाहेबांनी हे पुस्तक लिहिलंय असे वाटावे, असा हा विभाग. 

प्रथम पहिला आणि तिसरा विभाग विचारात घेऊ. हे दोन विभाग गांधींबद्दल आहेत, पण गांधींपूर्वीच्या भारताचा धावता आढावा या दोन प्रकरणांचा पाया आहे. आपल्या आजवरच्या विचारांना छेद देणारे अनेक संदर्भ त्यात आहेत. 

1) प्लासीची लढाई म्हणजे केवळ एका युरोपिअन कंपनीने एक प्रांत जिंकून घेतला आहे एवढेच नव्हे. व्यापारास लागणाऱ्या शांततेच्या दृष्टीने स्वदेशी व्यापाऱ्यांनी, सावकार वर्गांनी आणि इंग्रजांनी एक होऊन एक मुसलमानी राजवट उलथून पाडली. 

2) याचे दोन अर्थ निघतात. पैकी एक भारतीय समाजाने वर्गीय रूप धारण केले होते. इथे जाती प्रबळ होत्या, तरी ब्रिटिशांच्या आगमनाने प्रत्येक जातीत एक नवा वर्ग तयार होत होता. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनतेत स्वराज्यापेक्षा स्वधर्म म्हणजे स्वजात अधिक श्रेष्ठ होती. 

3) भीमा कोरेगावचा 1818चा निर्णायक विजय महार पलटणीने केला, हे आपणांला माहीत आहे. 1817 ची खडकीची लढाई तेवढीच नसली तरी तशीच महत्त्वाची आहे. त्यात व्यापारी वर्गाचा (पेढीवाल्याचा) इंग्रजांच्या विजयात फार मोठा वाटा आहे. प्रत्येक जात, वर्ग आपापल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यात गुंतलेले होते. 

1857 चे बंड आणि त्याबाबत लोकमान्य टिळकांचे विचार रावसाहेबांनी दिलेत ते असे आहेत. ‘झाशीच्या राणीचा इतिहासही पाहाल तर तिने इंग्रज सरकारकडे अर्ज करण्याकरता जितकी लेखणी झिजविली, तितकी काही धार येण्यासाठी 1857 पर्यंत तरवार घासली नव्हती. पण प्रसंग आला, तेव्हा ती वीरा ठरली की नाही? इतिहासातील पुष्कळ बंडांचे असेच असते, ती ‘उद्‌भवतात.’ हल्लीच्या काळी जे बंड होईल किंवा न होईल त्याची तयारी म्हणजे आजच्या आज पिस्तुले आणून तरुणांना वाटणे किंवा बॉम्बचे कारखाने काढणे नव्हे, तर सार्वत्रिक व सामुदायिक असंतोष निर्माण करणे ही होय... आजच्या बंडाची माझी कल्पना इतकीच आहे की, देशातील शक्य तितक्या अधिक लोकांनी सकारण रीतीने असंतुष्ट बनावे आणि जो लहानसहान स्वार्थत्याग करावा लागेल, तो करण्यास तयार असावे.’ 

गांधींकडे वळण्यापूर्वी रावसाहेब एक विलक्षण गुगली टाकतात. आपणांला फारसे किंवा अजिबात माहीत नसलेले 30 जानेवारी 1894 रोजी चार्ल्स अँड्र्युज यांनी गोखलेंना पाठवलेले पत्र देतात. त्या पत्रात अँड्र्युज यांनी लिहिलंय, ‘गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील काम आता संपलेले आहे. तसे काम यापूर्वी कोणीही केलेले नाही. परंतु सध्याच्या काळात ते मोडकळीला आलेले आहे. गांधी आता आपली शक्ती पूर्णपणे गमावून बसलेले आहेत, हे केवळ माझे मत नाही तर त्यांचे व माझे मित्र पोलॅक, कालनबाख आणि रीच यांनाही वाटते. त्यांनी आता स्वत:साठी आणि समाजासाठी दक्षिण आफ्रिका सोडलीच पाहिजे. जर ते येथे राहिले, तर येथील प्रत्येकाला ते खुजे बनवतील. त्यांना भारतात तुमच्या सहवासात येऊ द्या... त्यांनी आता येथे काम करणे मला करुणाजनक वाटते. ते काळजीपूर्वक, फारसा विचार न करताच घाईने निर्णय घेतात... त्यांनी इथून पुढे जर एखादा महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊन मोठी चूक केली, तर त्यांच्या संपूर्ण कामावर पाणी फिरेल आणि हा विचार मनात येताच तो मला सहन होत नाही...’ - या पत्रावर रावसाहेबांनी नोंदविलेले मत असे आहे की - गांधींजींच्या व्यक्तिमत्त्वाचे इतके सटीक विश्लेषण त्यांच्या चरित्रकारांपैकी कोणालाही करता आलेले नाही. - पुढील प्रत्येक पानावर माहितीचा खजिना आहे, हे खरं; मात्र हे पत्र व त्यावरचे रावसाहेबांचे भाष्य यांमुळे चकव्यात सापडल्याप्रमाणे या पत्रातील आशय शोधत आपण हे पुस्तक वाचत राहतो, हा एक धोका संभवतो. 

तिसऱ्या विभागात म्हणजे रावसाहेबांनी ज्याचे नाव ‘रक्तज्वालांत अंतहीन प्रवास’ असं ठेवलंय त्यातील ‘अखंड वेदनादायी स्वातंत्र्य’ आणि ‘वन मॅन आर्मी’ या दोन प्रकरणांत भारताच्या स्वातंत्र्याचा किंवा खरं तर फाळणीचा इतिहास सांगतात. या काळात गांधींनी केलेली धरसोड वृत्ती, त्यांचे भांबावलेपण, गोंधळलेपण, अगतिकता रावसाहेबांनी सविस्तर सांगितलेली आहे. मात्र रावसाहेबांनीही नरेंद्रसिंग सरिला यांच्या ‘अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज पार्टिशन’ या पुस्तकाचा आधार घेऊन साधकबाधक चर्चा केलेली नाही. त्यांनी ती करावयास हवी होती. किमान पुढील आवृत्तीत ती असावी. 

गुप्ततेच्या कालखंडातून मोकळी झालेली सर्व कागदपत्रे अभ्यासून त्यांनी हा ग्रंथ लिहिलाय. इंग्रज स्वातंत्र्य देणार होते, आपण ते घेणार होतो. जगभरच्या सर्व वसाहती त्यांना सोडाव्या लागणार होत्या. त्यातील एक भाग होता, इंग्रजांकडून स्वातंत्र्य हिसकावून घेण्याएवढ्या गांधींच्या चळवळी मोठ्या नव्हत्या. 42 च्या लढ्याबाबत चर्चिल यांनी रूझवेल्ट यांना लिहिलंय, ‘या लढ्यामुळे गांधीजींच्या मर्यादा तुमच्या लक्षात आल्या असतील. हा लढा सुरू झाला, त्या दिवशीसुद्धा आपल्या सैन्यात सामील होण्यासाठी हिंदू, मुसलमान तरुण रांगा लावून उभे होते. हा लढा तीन-चार महिन्यांत संपलाय आणि त्या चार महिन्यांतसुद्धा बहुतेक ठिकाणी शाळा, कॉलेजेस, न्यायालये, दुकाने सुरू होती. शेतकरी शेतात होते. मात्र या लढ्याने एक चांगली गोष्ट झाली. गांधींच्या शांततेचा मंत्र वरवरचा असेल, हे तुमच्या लक्षात आले असेल. या चार महिन्यांत जमावाने अनेक ठिकाणी हिंसा केली.’ 

स्वातंत्र्य कसे द्यावयाचे हे इंग्रज ठरवणार होते. खलिस्तान आणि द्रविडीस्थान शक्य होते. पंजाब व बंगाल प्रांतांचे मुख्यमंत्री असलेले सिंकदर हयातखान आणि फजल उल हक फाळणीला विरोध करत होते. त्यांना हे संघराज्यातील स्वायत्त विभाग असावेत असे वाटत होते आणि मुस्लीम लीगचे सुऱ्हावर्दी व सुभाषबाबूंचे भाऊ शरत्‌चंद्र संयुक्तपणे अखंड बांगला राष्ट्राची मागणी करत होते. इंग्रज यापैकी काहीही करू शकले असते. पण त्यांच्या उद्याच्या व्यूहरचनेसाठी त्यांना पाकिस्तानची निर्मिती गरजेची का होती आणि त्यांनी कूटनीती वापरून ही अवघड गोष्ट का व कशी केली, याचा अस्वस्थ करणारा वृत्तान्त त्या पुस्तकात आहे. गांधींचे अलौकिक मोठेपण हे आहे, की या खंडप्राय देशात धर्म, पंथ, जात, भाषा, लिंग यांच्या पलीकडे असलेली शांततामय मार्ग आणि लोकशाही यांवर पूर्ण विश्वास असलेली आणि लोकशाही पद्धतीने या देशाचा कारभार करावयास पूर्णपणे सक्षम असलेली एक संघटना त्यांनी उभी केली. नेहरू, पटेल, राजाजी, लोहिया, राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश अशी अफाट कर्तृत्वाची माणसेगांधीजींनी ज्यांना खुजेपण न देता फार मोठे केले- या संघटनेत होती. सांगण्याचा मुद्दा, रावसाहेबांनी हे पुस्तक व ही वस्तुस्थिती मांडून या पुस्तकात त्यावर भाष्य करावयास हवे. असो! 

महत्त्वाचे म्हणजे गांधी हा केंद्रबिंदू मानून अनेक नवे-जुने संदर्भ आपणांला देत असतानाच, गांधींचा एकेक खरा-खोटा पैलू आपणांसमोर ठेवत त्यावर रावसाहेबांनी केलेले मुक्त चिंतन आपल्यासमोर येते; ते किती टोकाचे आहे, हे लक्षात यावे म्हणून त्यातील फक्त एक चिंतन सांगतो. ‘गांधी ज्या अंतर्विरोधात- ज्या चक्रात अडकले होते, त्यातून बाहेर पडण्याचे भारतीय परंपरेत दोन मार्ग उपलब्ध होते- पहिला भक्तीचा. अहंकाराचे पूर्ण विसर्जन आणि ईश्वरापुढे पूर्ण आत्मसमर्पण. त्यातून बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग होता ध्यानाचा. तिथं ईश्वर नसतो. आत्मा नसतो. स्वर्ग नसतो आणि नरकही.’ आणि या गृहिताची चर्चा करताना कबीर, छांदोग्य, उपनिषदे, बुद्ध अशा अनेक गोष्टी रावसाहेब आपल्यासमोर उलगडतात. बोधिसत्वाने माराशी केलेले युद्ध हे स्वत:च स्वत:शी केलेले महायुद्ध आहे. हे महायुद्ध महाकाव्याचा विषय आहे आणि माराच्या पूर्ण पराभवाशिवाय कोणताही बोधिसत्व बुद्ध होऊ शकत नाही.’ रावसाहेबांचे मुक्त चिंतन किती टोकाचे असते याचे आणखी एक उदाहरण- ‘नेहरू अतिशय अल्प मतात असूनही लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून गांधींनी जवाहरलाल नेहरूंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गांधी  आपल्या ‘राजकीय’ आयुष्यातील सर्वांत मोठी आणि प्रभावी खेळी खेळले होते. तिचे दूरगामी परिणाम होणार होते. गांधींनी जवाहरलाल नेहरूंकडे काँग्रेसची सूत्रे देऊन आणि आपला राजकीय वारसदार जवाहरलाल आहेत, हे घोषित करून एका दगडात दोन पक्षी मारले. पहिले कम्युनिझमचे आणि दुसरे फॅसिझमचे, भारतात येणारे सर्व रस्ते त्यामुळे कायमचे बंद करून टाकले.’ 

या पुस्तकातील फार महत्त्वाचे आणि स्फोटक प्रकरण म्हणजे, ‘स्त्रियांच्या सहवासात’ रावसाहेबांनी हे प्रकरण ‘रक्तज्वालांत अंतहीन प्रवास’ या विभागात ठेवलंय. महात्मा गांधींच्या आयुष्यातील स्त्रिया ही कुजबूज आघाडीतील एक नेहमीची खवट चर्चा असते. आपण तो विषय म्हातारीने कोंबडे झाकावे, त्याप्रमाणे दुर्लक्ष करून विसरता येईल असे समजत होतो. सुदैवाने मराठी भाषेत प्रथमच ‘साधना’त संयत शब्दांत या विषयावर गेल्या वर्षी संजीवनी खेर यांची एक लेखमाला आली त्यामुळे त्यातील अंगोरेकंगोरे आपल्या लक्षात आलेत. 

रावसाहेबांनी पंचाहत्तर पानी लेखात या प्रश्नाची एक व्यापक, भेदक मांडणी केली आहे. गांधीजींच्या आयुष्यातील स्त्रिया, आयुष्याच्या शेवटी त्यांनी केलेला स्फोटक प्रयोग या सर्वांकडे जाताना रावसाहेब प्रास्ताविक म्हणून राजवाडे यांपेक्षा सविस्तर असा विवाहसंस्थेचा इतिहास सांगतात. त्यानंतर प्राणिशास्त्रज्ञांच्या मते, ‘सर्व प्राणिमात्रांत सर्वाधिक कामवासना असलेला प्राणी म्हणजे माणूस’ याची नोंद करतात. मग एकापाठोपाठ फ्रेझर, फ्रॉइड, मार्क्स आपल्यासमोर येतात. विवेकानंद नाहीत, पण जे.कृष्णमूर्ती आणि ओशो आहेत. 

या पंचाहत्तर पानांत फार मोठी वैचारिक घुसळण आहे. काही वेळा अजिबात न पटणारी विधाने समोर येतात. 

1) गांधी जर सरलादेवींच्या आध्यात्मिक प्रेमात अखंड बुडाले असते, तर गांधींचे ब्रह्मचर्य सोन्याप्रमाणे चकाकले असते. गांधी 1920 मध्ये करत असलेला हा प्रयोग आध्यात्मिक होता. परंतु त्याला घृणास्पद, अनैतिक आणि विकृत मानून गांधींना पुन्हा सामान्य माणसांच्या पातळीवर आणले गेले. राजाजी आदींनी असे केले नसते तर गांधींचे मार्गदर्शन जगाने स्वीकारले असते. 

2) जी व्यक्ती स्त्रीचा उपभोग एक मालकीची वस्तू म्हणून घेते, ती स्वत:च एक हिणकस वस्तू बनलेली असते. त्यालाच मार्क्सवादी भाषेत 'Men's debasement and reduction to thing' असे म्हटले जाते. कार्ल मार्क्स खाजगी मालकीहक्काच्या विरुद्ध इतके पोटतिडिकीने आणि कळवळून बोलत होते, याचे कारण हेच होते. 

मात्र, ही अशी टोकाची विधाने या प्रकरणात फार थोडी आहेत. खूप वैचारिक घुसळण आहे. गांधीजींना स्त्री-पुरुष समागम ही समस्या का वाटत होती? त्याबद्दल त्यांच्यात आणि जे.कृष्णमूर्ती यांच्यात जी प्रश्नोत्तरे झालीत, तीही दिलीत- काम ही केवळ मानवी जीवनातीलच नव्हे तर सर्व सजीवांच्या जीवनातील सर्वांत प्रबळ प्रेरणा आहे. ती नसेल, तर सजीवांचे सातत्य संपते- धर्म, तत्त्वज्ञान, राजकारण, मानसशास्त्र, शरीरशास्त्र अशा अनेक अंगांनी रावसाहेबांनी या अंगाला स्पर्श केला आहे. आपण अस्वस्थ होऊन चिंतन करावे, असे हे प्रकरण आहे. 

पुस्तकाच्या नावात आंबेडकर नाहीत, हे खरे. पण खरे तर हे पुस्तक आहे, हा देश घडविणाऱ्या एका अस्वस्थ कालखंडात एकमेकांचा अंदाज घेत, एकमेकांशी संवाद साधत, संघर्ष करत नंतर नकळत समन्वय साधणाऱ्या दोन महामानवांबद्दल. त्यामुळे ‘गांधी आणि आंबेडकर’ हा दुसरा विभाग सर्वांत महत्त्वाचा आहे किंवा तेच या पुस्तकाचे प्रयोजन आहे. 

मात्र, या विभागाकडे जाण्यापूर्वी काही गोष्टींची नोंद करावयास हवी. पुस्तक आठशे पानी आहे. हातात धरून वाचावयास खूपच अडचणीचे. दोन खंड का केले नाहीत? ते असो. प्रत्येक पानावर चारही बाजूंना जवळजवळ एक इंच जागा सोडली आहे. कारण नसताना केलेली ही गोष्ट टाळली असती, तर दीड-दोनशे पाने कमी झाली असती. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सिंगल डेमीऐवजी सिंगल क्राऊन हा पानांचा आकार ठेवला असता, तर पुस्तक चारशे-पाचशे पानांत बसले असते. सिंगल क्राऊन म्हणजे पुस्तकाचा आकार सदानंद मोरे यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकाचा हवा होता. या पुस्तकाची आठवण एवढ्यासाठीच आली की, या दोन्ही पुस्तकांच्यात माहितीचा खजिना आहे. त्यामुळे मतमतांतरे पटली नाही, तरी ही दोन्ही पुस्तके संग्रही हवीत. 

गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा
लेखक : रावसाहेब कसबे

प्रकाशक : लोकवाङ्मय गृह, मुंबई
पृष्ठे : 800 मूल्य : रुपये 1000/-

(या लेखाचा उत्तरार्ध पुढील अंकात) 

Tags: महात्मा गांधी मराठी पुस्तके नवे पुस्तक गांधी आणि आंबेडकर रावसाहेब कसबे साहित्य weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके