डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धर्म हे स्वयंभू नाहीत आणि धर्मावर अवलंबून असलेले धर्मग्रंथ अपरिवर्तनीय, शाश्वत असे अजिबात नाहीत. कारण धर्म धर्मग्रंथांच्यावर अवलंबून नाहीत, तर धर्माने काळाच्या एका चौकटीत अध्यात्माने त्याला जे सांगितले, ते लोकांना समजावून देण्यासाठी धर्मग्रंथ निर्माण झाले. काळाची ती चौकट बदलली, तर त्या चौकटीत धर्माने काय सांगितले असते, हे धर्मग्रंथांनी सांगितले पाहिजे. मात्र, तसे होत नाही. त्यातून मानवजातीचे काय अपरंपार नुकसान होतंय, ते विवेकानंदांनी सांगितलंय. त्यांनी 7 जून 1896 रोजी मार्गारेट नोबल म्हणजे नंतरच्या भगिनी निवेदिता यांना पत्र पाठवून सांगितले, ‘‘आपल्या समोरची खरी अडचण समजावून घ्या. आज जगातील सर्व धर्म निर्जीव विडंबनाच्या रूपात उरले आहेत. सर्व धर्मांना आज जळजळीत शब्दांची आणि त्याहूनही जळजळीत कृतीची आवश्यकता आहे.’’

विज्ञान आणि धर्म यांतील बरोबर कोण आणि चूक कोण? की आपल्या साहित्य सम्राट न. चिं. केळकरांच्या शब्दांत म्हटले, तर दोघेही चूक आणि म्हटले, तर दोघेही बरोबर! म्हणजे तुमच्या-माझ्या सोप्या मराठीत दोघेही थोडे बरोबर आहेत आणि दोघेही थोडे चूक आहेत. खरं तर आपला प्रश्न थोडा वेगळा आहे. या दोघांच्यात कायम भांडण, शत्रुत्व, दुरावाच असेल, की त्यांच्यात सहकार्य शक्य आहे, की विवेकानंद सांगतात त्याप्रमाणे ‘या दोघांच्यात सहकार्य नव्हे, तर समन्वय हवा.’ तो सहज शक्य आहे आणि आवश्यक आहे. किंवा शाश्वत सुखी-समाधानी असलेला मानवी समाज निर्माण करण्यासाठी ही पूर्वअट आहे. आणि धार्मिक माणसांना प्रथम एक गोष्ट समजावून घ्यावी लागेल. एक धर्म स्वीकारला तर तुम्हांला सारे धर्म स्वीकारावे लागतात आणि एक धर्म नाकारलात तर तुम्हांला सारे धर्म नाकारावे लागतात. आणि कोणताही धर्म न मानणारी पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसे आपल्या भोवताली असतात, हे सत्य स्वीकारावे लागेल. आणि त्याच वेळी अनादी काळापासून धर्म माणसाबरोबर आहे आणि तो कायम माणसांच्या बरोबर राहणार आहे, हे मान्य करून विज्ञानाने धर्म समजावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.

विज्ञान कार्यकारण भाव मानते आणि धर्मसुद्धा कार्यकारण भावच मानतो. मात्र, विज्ञान का आणि कसे हे सांगते. धर्म का आणि कशासाठी हे सांगतो. यामुळे या दोघांच्यात एक असमान स्पर्धा सुरू होते. विज्ञान मला ठामपणे एवढेच सांगते, की जन्माला येण्यापूर्वी तू माती होतास आणि मृत्यूनंतर माती बनून कायमचा नाहीसा होणार आहेस. हे खरे, की खोटे हा वाद बाजूला ठेवू या. पण 99 टक्के माणसे हे स्वीकारू शकत नाहीत. अशा वेळी माणसाच्या अशाश्वत जीवनातील त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे असतात. सर्व धर्म त्याला ठामपणे सांगतात, की जन्माला येण्यापूर्वी तू होतास. मृत्यूनंतर तू असणार आहेस. तुझे ताटातूट झालेले जिवलग तुला भेटणार आहेत. तुझ्या बऱ्यावाईट गोष्टींबद्दल तुला शिक्षा आणि बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे 99 टक्के लोकांना धर्म हवा असतो. शिक्षा/बक्षीस यामुळे एक स्वयंशासित व्यक्ती, स्वयंशासित समाज निर्माण होऊ शकतो. किंवा विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे व्यक्ती आणि समाज यांच्या जीवनात धर्म संप्रेरक असतो. संप्रेरक म्हणजे काय हेपण आधी जरा नीटपणे लक्षात घेऊ या. समजा, आपण एक रासायनिक प्रक्रिया करतोय. शंभर किलो ‘अ’ हा पदार्थ घेतलाय, शंभर किलो ‘ब’ हा पदार्थ घेतलाय. आपणांला त्यांच्यापासून रासायनिक प्रक्रिया करून त्यातून ‘क’ हा पदार्थ बनवायचा आहे. अशा वेळी ‘अ’ आणि ‘ब’ हे दोन्ही पदार्थ एखाद्या तरल पदार्थात मिसळून त्यांच्यावर खूप भार देतो. त्यांना खूप तापमान देतो. नंतर खूप काळाने त्यांचे काही प्रमाणात ‘क’ मध्ये रूपांतर होते. मात्र, ‘अ’ आणि ‘ब’ एका तरल पदार्थात मिसळून आपण त्यात चिमूटभर संप्रेरक टाकला, तर ही सारी प्रक्रिया फार कमी वेळात, कमी भार देऊन, कमी तापमान देऊन पूर्णत्वाला जाते आणि महत्त्वाचे म्हणजे हा चिमूटभर ‘क’ त्याच्यात काहीही बदल न होता तसाच उरलेला असतो. म्हणजे पुढील प्रत्येक प्रक्रियेत आपण तो पुन:पुन्हा वापरू शकतो. समजायला सोपे जावे म्हणून सांगतो. या संप्रेरकाला आपण आज आपल्या मराठीत ‘कॅटॅलिस्ट’ म्हणतो. ते असो! प्रश्न वेगळा. धर्म हा व्यक्ती आणि समाज यांच्या जीवनात संप्रेरक आहे असे विवेकानंद का म्हणतात? आणि तसे सांगताना पूर्वअट कोणती व का घालतात?

प्रथमच एक गोंधळ दूर करू या. जो करावयास हवा हे विवेकानंदांनी सांगितलंय. विज्ञान स्वयंभू आहे, धर्म स्वयंभू नाहीत. सर्व धर्म अध्यात्मावर अवलंबून आहेत. अध्यात्मावर आधारित आहेत. त्यामुळे सर्व धर्मांचा पाया एकच आहे. पण धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे. ज्याप्रमाणे तंत्रविज्ञान विज्ञानावर अवलंबून असते, पण तंत्रविज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे. त्याप्रमाणे हे आहे. विज्ञान आपणांला एका नगण्य अणूमधील अपरंपार विस्मयजनक ऊर्जेचे दर्शन घडवते. ती ऊर्जा वापरून कर्करोगी बरा करावयाचा, अणुऊर्जा घ्यावयाची की अणुस्फोट करून एक महानगर क्षणात भस्मसात करावयाचे हे तंत्रविज्ञान ठरवते. तंत्रविज्ञानाबरोबर शुद्ध रूपातील धर्म असेल, तर तंत्रविज्ञान यातील फक्त मानवी समाजाच्या शाश्वत विकासासाठी आणि सुखासाठी आवश्यक असलेली गोष्टच स्वीकारेल, असा विश्वास विवेकानंदांन वाटतो. पण त्यासाठी ते एक पूर्वअट धर्मावर घालतात आणि विज्ञानावरही.

त्या पूर्वअटी नीटपणे लक्षात घ्यावयास हव्यात. धर्म हे स्वयंभू नाहीत आणि धर्मावर अवलंबून असलेले धर्मग्रंथ अपरिवर्तनीय, शाश्वत असे अजिबात नाहीत. कारण धर्म धर्मग्रंथांच्यावर अवलंबून नाहीत, तर धर्माने काळाच्या एका चौकटीत अध्यात्माने त्याला जे सांगितले, ते लोकांना समजावून देण्यासाठी धर्मग्रंथ निर्माण झाले. काळाची ती चौकट बदलली, तर त्या चौकटीत धर्माने काय सांगितले असते, हे धर्मग्रंथांनी सांगितले पाहिजे. मात्र, तसे होत नाही. त्यातून मानवजातीचे काय अपरंपार नुकसान होतंय, ते विवेकानंदांनी सांगितलंय. त्यांनी 7 जून 1896 रोजी मार्गारेट नोबल म्हणजे नंतरच्या भगिनी निवेदिता यांना पत्र पाठवून सांगितले, ‘‘आपल्या समोरची खरी अडचण समजावून घ्या. आज जगातील सर्व धर्म निर्जीव विडंबनाच्या रूपात उरले आहेत. सर्व धर्मांना आज जळजळीत शब्दांची आणि त्याहूनही जळजळीत कृतीची आवश्यकता आहे.’’ त्यापूर्वी 21 मार्च 1895 रोजी श्रीमती सारा ओली बूल, म्हणजे धीरामाता यांना पत्र पाठवून कळवलंय, ‘‘ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान ही धर्मांची नावे आज माणसामाणसांत बंधुभाव निर्माण करण्याऐवजी शत्रुभावना निर्माण करताहेत. या शब्दांमधील शुभ शक्ती आता पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत. आज या शब्दांच्या प्रभावामुळे चांगली चांगली माणसेसुद्धा सैतानाप्रमाणे वागताहेत. आटोकाट प्रयत्न करून यश मिळवावयाचे आहे.’’ 28 जानेवारी 1900 रोजी अमेरिकेत पॅसाडेना येथे दिलेल्या भाषणात त्यांनी सांगितले, ‘‘धर्मामुळे मानवाला जेवढी सुखशांती लाभली, तेवढी दुसऱ्या कशानेही लाभली नाही. हे खरे आहे. पण त्याचबरोबर हेही खरे आहे, की या धर्मांच्यामुळे मानवांना जेवढे दु:ख व यातना भोगाव्या लागल्या, तेवढ्या दुसऱ्या कशामुळेही भोगाव्या लागलेल्या नाहीत.’’ रासायनिक प्रक्रियेत संप्रेरकात काही वेळा दोष निर्माण होतात. ते काढून टाकावे लागतात. एखाद्या संप्रेरकात पुन:पुन्हा दोष निर्माण होत असतील, तर नवा संप्रेरक शोधावा लागतो.

हे माणसांचा आधार असलेल्या धर्मांच्याबाबतही होते. विवेकानंदांनी हिंदू धर्माबाबत हे माझ्या लक्षात आणून दिले. त्यांनी प्रथम आपल्या गुरुबंधूंना आणि शिष्यांना कळविले. ‘‘हिंदू धर्म चांगलाच आहे. मात्र, आपल्याला त्यातील पुरोहितशाही आणि कालबाह्य रूढी आणि परंपरा काढून टाकाव्या लागतील. धर्माच्या नावावर आपल्याला सांगण्यात येणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करावा लागेल.’’ मात्र, हे साध्य होण्यासारखे नाही; हे लक्षात आल्यावर बेलूर मठ स्थापन करत असताना 5 मे 1897 रोजी धीरामाता यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘‘आजचा हिंदू धर्म जो अनेक घृणास्पद गोष्टींनी भरलेला आहे, तो दुसरे तिसरे काही नसून अवकळा प्राप्त झालेला बौद्ध धर्म आहे; हे आपण हिंदूंना समजावून देऊ शकलो, तर तो न कुरकुरता टाकून देणे त्यांना सोपे जाईल.’’ मात्र, हिंदू धर्म नाकारणे म्हणजे पोकळी निर्माण करणे नव्हे. त्यापूर्वी 27 एप्रिल 1896 रोजी आपल्या सर्व गुरुबंधूंना उद्देशून त्यांनी जे पत्र लिहिले, त्यात त्यांनी सांगितले, ‘‘आपले देव आता जुने झालेत. आपल्याला आता नवे देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.’’

म्हणजे माझ्याबरोबर धर्म हवाच. म्हणून तर माझ्या महात्मा फुलेंनी सत्यधर्म सांगितला. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी. धर्म ही केवळ माणसाच्या अशाश्वत जीवनातील शाश्वत अस्तित्वाचा आधार नाही; तर ती मानवी मनाची भूक आहे. कोणताही धर्म न स्वीकारता खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसे आपल्या भोवती असतात, हे खरे आहे. पण शरीराची भूक नियंत्रित करून किंवा ती नियंत्रित केली, असे सांगून काही ब्रह्मचारी आपल्याभोवती असतात तसे हे आहे!

आणखी एक म्हणजे सर्वच धर्म आज गोंधळलेत. कारण धर्म अध्यात्मावर अवलंबून आहेत आणि अध्यात्म पंचेंद्रियांच्या साहाय्याने नव्हे तर अतींद्रिय शक्तींच्या मदतीने निर्माण झालंय. अतींद्रिय शक्तींच्या जोरावर धर्माने सांगितलेल्या गोष्टी पंचेंद्रियांच्या साहाय्याने विज्ञान आज हास्यास्पद ठरवीत आहे. हे काय झालंय ते विवेकानंदांनी परदेशातून परत आल्यावर एका भाषणात सांगितलंय. ते सांगतात, ‘‘विज्ञानाच्या अविरत माऱ्यामुळे सर्व स्वमतांध धर्मांचे बुरुज धडाधडा कोसळून पडत आहेत. पृथ्वी स्थिर आहे, सूर्य फिरतोय असल्या अवैज्ञानिक भाकडकथा सांगत धर्म उभे आहेत, असं विज्ञान सांगतय. गोंधळलेले धर्म काही मजेशीर उत्तरे देण्याचा प्रयत्न करताहेत आणि त्यामुळे आणखीनच हस्यास्पद बनताहेत. यातील खरा धोका आपण ओळखला पाहिजे. यामुळे आज मानव धर्माच्या ऐवजी धर्माच्या सांगाड्याला धर्म समजून कवटाळून बसत आहे. आज धर्म देवघरातून दिवाणखान्यात जाऊन बसलाय. ही गोष्ट धर्म आणि मानवसमाज दोघांच्यासाठीही भयावह आहे. आणि याला धर्म जबाबदार आहे. धर्मातील मिथककथा, रूपककथा, भाकड कथा व काळविसंगत व्रतवैकल्ये यांच्याशी धर्माचा म्हणजे धर्म ज्या अध्यात्मावर अवलंबून आहेत, त्याच्याशीही काहीही संबंध नाही, म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपात जनमानसात रुजण्याची ही संधी आहे, असे धर्माने समजले पाहिजे.’’ सिंगारवेलू मुदलियार यांना 3 मार्च 1894 रोजी पाठवलेल्या पत्रात विवेकानंद आणखी पुढे जातात. ते सांगतात, ‘‘धर्माचा संबंध आत्म्याशी आहे. समाज नियमनाचे कायदे करण्याचा धर्माला काही अधिकार नाही. तसे धर्माने केले, ही धर्माची मोठी चूक झाली, हे धर्माने मान्य केले पाहिजे. हे करणे धर्माला वाटेल तेवढे कठीण नाही. कारण धर्म हे ग्रंथावर अवलंबून नाहीत, तर ग्रंथ हे धर्मावर अवलंबून आहेत. काळाच्या एका चौकटीत धर्माने काय सांगितले, हे सांगत धर्मग्रंथ उभे आहेत. काळाची ती चौकट बदलली, तर आज धर्माने काय सांगितले असते, ते धर्मग्रंथांनी सांगितले पाहिजे.’’

मात्र, त्याच वेळी विज्ञान जन्माला येण्यापूर्वी धर्म माणसांच्या बरोबर होते आणि ते कायम माणसांच्या बरोबर असणार आहेत; हे लक्षात घेऊन विज्ञानाने धर्म समजावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. पंचेंद्रियांच्या पलीकडे विश्व नाहीच, असे आज विज्ञानही म्हणून शकणार नाही. आत्मा, ईश्वर आणि धर्म या आपल्या भाषणात विवेकानंदांनी सांगितले की, माझ्या लक्षात आणखी एक गोष्ट आली आहे. माणसाला नाक, कान, डोळे आहेत तसेच त्याच्या स्वभावाला बाहेरून दिसून न येणारे चैतन्याचे प्रवाहसुद्धा आहेत. हे थोडे सोपे करून सांगतो. आपल्याला चुंबककेंद्र नाही, चुंबकलहरी नाहीत, भोवताली लोहचुंबक नसेल, तर त्या आहेत हे सिद्ध करणेपण अशक्य.

विज्ञानाने धर्म समजावून घ्यायचा प्रयत्न करावयाचा म्हणजे काय हे विवेकानंदांनी एक मजेशीर उदाहरण देऊन सांगितलंय. ‘‘तुम्ही एखाद्या फार मोठ्या धर्मगुरूला प्रयोगशाळेत नेऊन ग्रहगोलांचे दर्शन घडविता. खरे तर तुम्ही त्याला फिरणारे काही ठिपके दाखवीत असता. मात्र, तो ते मान्य करतो. कारण त्याने दुर्बिणीची रचना मान्य केलेली असते. तुम्हांला धर्म सजावून घ्यायचा असेल, तर अध्यात्माची मूलभूत रचना समजावून घ्यावी लागेल.’’

गुरुत्वाकर्षण दिसत नाही, पण ते असते आणि ते असते म्हणून तर मी अवकाशात उडत नाही. जमिनीशी घट्ट नाते जोडून उभा असतो. श्रद्धा, विश्वास या अशा गोष्टी आहेत; ज्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बाह्य पुराव्याची गरज नसते आणि असा पुरावा मागणे कठीण देणे भयावह आणि उद्‌ध्वस्त करणारे असते. एक मजेशीर उदाहरण घेऊ या. ‘‘माझी मुलगी माझी आहे यासाठी माझ्याजवळचा पुरावा कोणता? माझा माझ्या बायकोवर विश्वास आहे आणि समजा तो विश्वास शतप्रतिशत खरा असला, तरी हॉस्पिटलमध्ये कुणी हातचलाखी करून माझा मुलगा बदलून तेथे दुसरी मुलगी कशावरून ठेवली नाही? आणि माझे असो. माझ्या मुलीसाठी तर फक्त मी तिचा बाबा आहे, हा विश्वास आहे- मला आणि माझ्या मुलीला डीएनए टेस्ट करायला सांगायचे का? त्याची काही गरज आहे का? श्रद्धा आणि विश्वास समाजासाठी आणि व्यक्तीसाठी हानिकारक नसतील, तर विज्ञानाने त्या स्वीकारल्या पाहिजेत.

विज्ञान आणि धर्म यांनी एकमेकांना आदर करत एकमेकांना समाजवून घ्यावयास हवे. मग त्यांच्यात केवळ सहकार्य नसेल, तर समन्वय असेल. लंडनमध्ये ‘धर्माची आवश्यकता’ या विषयावर भाषण देताना विवेकानंदांनी सांगितले, ‘‘आज जगात जे काही चांगले आहे, या सर्वांचा अंतर्भाव असलेला नवा धर्म आपणांला हवा आहे. विज्ञान हा त्याचा सहप्रवासी असेल, त्यामुळे तो स्थीतिशील नसेल, तर गतिशील असेल.’’ आणि ‘ब्रह्म आणि जगत’ या विषयावर लंडन येथे भाषण देताना त्यांनी सांगितले, ‘‘विज्ञान आणि धर्म एकत्र येतील. काव्य आणि तत्त्वज्ञान मित्र बनतील. सर्व धर्मांच्यावर आणि विज्ञानावर आधारित असा नवा धर्म प्रत्यक्षात येईल, यावर माझा विश्वास आहे.’’

असो! संपादकांचा विषय होता ‘धर्माने मला काय दिले?’ मी जन्मल्यापासून किमान जाणतेपण आल्यावर कायम या ना त्या स्वरूपात धर्म माझ्याभोवती भरभरून वाहत होता. त्यामुळे धर्म समजावून घ्यावासा वाटला. नकळत धर्माबद्दल वाचन, चिंतन, मनन करत राहिलो. त्यामुळे जे काही समजले जाणवले असे जे वाटले त्याचे हे शब्दांकन- संपादकांनी दिलेली शब्दमर्यादा 1500 शब्द म्हणून थोडे विस्कळीत किंवा कटोरीमे गंगा असे काहीसे!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके