डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘हा धंदा नाही,  व्यवसायही नाही; हा आमचा धर्म आहे.’ असे म्हणत रुग्णसेवेत असलेल्या डॉ. नावंधरांवरच सविस्तर लिहिणार होतो. पण तोपर्यंत डॉ.रवींद्र हर्षे अचानक समोर आले. कारण डॉ.नावंधर अजून साठीच्या आसपास आहेत आणि डॉ.हर्षेंचा अमृतमहोत्सव सातारकरांनी नुकताच साजरा केला. यात तसे खास काही नाही, पण त्याच वेळी आमच्या वयाचा आमचा मित्र अण्णा देशपांडे याचा रौप्यमहोत्सव आम्ही डॉ.हर्षेंच्या अध्यक्षतेखाली साजरा केला. डॉ.हर्षेंबद्दल ऐकून होतो. अधेमधे या ना त्या कारणाने ओझरता भेटतही होतो. मात्र मित्राचा हा अनोखा रौप्यमहोत्सव साजरा करायला जमलेले आम्ही पंधरा-वीस मित्र आणि अध्यक्षमूर्ती डॉ.हर्षे. मला ही संधी त्यांना मित्रांसमोर बोलते करायला चांगली वाटली. वेळ अगदी योग्य. कारण आम्ही सारेच मित्र (डॉ.हर्षे धरून) तरंगणारे नव्हे; पण अधेमधे आनंदाच्या प्रसंगी थोडे तरंगणे वाईट नाही तर चांगलेच, असे मानणारे- शरीराला आणि मनाला तरतरी देणारे.

नरेंद्र तसा कमीच भेटायचा. कायम आपली धावपळ, भ्रमंती. मात्र भेटला की गप्पा भरभरून व्हायच्या. मात्र त्यात साधना कमीच असायची. विनोदही तसा कमीच भेटतो. मात्र भेटला की, अगदी भरभरून गप्पा. आणि त्याच्या गप्पांत फक्त साधना. त्याच्याशी गप्पा मारताना आम्हा दोघांना जवळजवळ एकाच वेळी एक विषय सुचला. भोवतालचे वातावरण घुसमटणारे आहे. नैराश्यपूर्ण आणि थोडेफार काळोखीही. केवळ राजकारणात नाही, तर प्रत्येक क्षेत्रात अशीच परिस्थिती आहे. अशा वेळी प्रत्येक गावात काही माणसे दीपस्तंभाप्रमाणे उभी आहेत. आपण त्यांना समजावून घेतले पाहिजे, गावोगावच्या सजग कार्यकर्त्यांनी अशा माणसांचा प्रेरणादायी प्रवास समजावून दिला पाहिजे.

विनोद म्हणाला, ‘पहिला लेख तुम्ही लिहावयास हवा.’ विचारात पडलो. तीस वर्षांपूर्वीचा हा एक प्रसंग डोळ्यांसमोर आला. मी त्या वेळी पन्नास वर्षांचा होतो. हे फार अडनिडे वय. माणूस धड तरुण नसतो आणि धड म्हाताराही नसतो! डॉक्टरांच्या दृष्टीने या वयाचा माणूस फार योग्य सावज व्हायची शक्यता! हे मत माझे नाही, माझा मित्र डॉ.रवी बापटचे. मला त्या वेळी महाराष्ट्रातल्या एका प्रख्यात डॉक्टरने ‘बायपास सर्जरी’ त्वरित करायला सांगितले. मी घाबरलो, तयारी करायला लागलो. हे कळल्यावर रवी बापटने मला फोनवरून खडसावले. म्हणाला, ‘‘एक-दोन महिन्यांपूर्वी आपण दोघे एकत्रितपणे महाराष्ट्रातील डोंगर-कडे चढलोय. तू अगदी ठणठणीत आहेस.

तो डॉक्टर माझा विद्यार्थीच आहे, पण त्याला ड्रायव्हर चालवत असलेली मर्सिडीज गाडी लागते. तू आणि मी आपापल्या जुन्या अँबॅसेडर स्वत:च चालवत असतो. गाडी विकून पैसे गोळा करून त्याच्या जाळ्यात अडकू नकोस. मी तुला वचननामा देतो- पुढील दहा वर्षांत तुझ्या हृदयाला कोणताही धोका नाही!’’ मी मग अर्थातच शस्त्रक्रिया करण्याच्या भानगडीत पडलो नाही.

भारतभर आणि तसे जगभर भरपूर हिंडून मी सतरा वर्षांपूर्वी सातारला कायमचा स्थायिक होण्यासाठी आलो. आल्यावर मला लगेच लघवीचा त्रास सुरू झाला. पुण्यातील प्रख्यात डॉक्टर्सनी मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करायला सांगितले, शस्त्रक्रिया पोट फाडून की बाहेरून किरणे वापरून, एवढेच ठरवायचे. यातील काय करावे, हे विचारायला सातारचे प्रख्यात मूत्ररोगतज्ज्ञ डॉ.नावंधर यांच्याकडे गेलो. त्यांनी तपासले, अहवाल पाहिले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला शस्त्रक्रियेची गरजच नाही. साधी सुंता करू या आणि रोगजंतूविनाशक काही गोळ्या घ्या.’’ आता सतरा वर्षे झालीत, मला लघवीचा कोणताही त्रास नाही.

‘हा धंदा नाही, व्यवसायही नाही; हा आमचा धर्म आहे.’ असे म्हणत रुग्णसेवेत असलेल्या डॉ.नावंधरांवरच सविस्तर लिहिणार होतो. पण तोपर्यंत डॉ.रवींद्र हर्षे अचानक समोर आले. कारण डॉ.नावंधर अजून साठीच्या आसपास आहेत आणि डॉ.हर्षेंचा अमृतमहोत्सव सातारकरांनी नुकताच साजरा केला. यात तसे खास काही नाही, पण त्याच वेळी आमच्या वयाचा आमचा मित्र अण्णा देशपांडे याचा रौप्यमहोत्सव आम्ही डॉ.हर्षेंच्या अध्यक्षतेखाली साजरा केला.

डॉ.हर्षेंबद्दल ऐकून होतो. अधेमधे या ना त्या कारणाने ओझरता भेटतही होतो. मात्र मित्राचा हा अनोखा रौप्यमहोत्सव साजरा करायला जमलेले आम्ही पंधरा-वीस मित्र आणि अध्यक्षमूर्ती डॉ.हर्षे. मला ही संधी त्यांना मित्रांसमोर बोलते करायला चांगली वाटली. वेळ अगदी योग्य. कारण आम्ही सारेच मित्र (डॉ.हर्षे धरून) तरंगणारे नव्हे; पण अधेमधे आनंदाच्या प्रसंगी थोडे तरंगणे वाईट नाही तर चांगलेच, असे मानणारे- शरीराला आणि मनाला तरतरी देणारे.

मी म्हटले, ‘‘डॉक्टर, मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करू नका, फक्तच गोळ्याच घ्या असे म्हणणारा डॉक्टर मोठाच. पण त्याच्यावर असलेली जबाबदारी तशी मर्यादित. कारण उद्या त्रास फार वाढला, तर रोगी ऑपरेशन करायला मोकळा. मात्र हार्टसर्जरीची गरज नाही असे ठामपणे सांगणारे तुम्ही आणि रवी बापट म्हणजे थोर माणसे. रवी बापटांवरचे संस्कार महाराष्ट्राला माहीत आहेत; तुमचे बालपण, तुमच्यावरील संस्कार, तुमचे वैद्यकीय कार्य समजून घ्यायचंय.’’

डॉक्टर म्हणाले, ‘‘शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र कोणत्या स्थित्यंतरातून जात होता, मुले-मुली कशी घडत होती, हे आजच्या मुलांनाच काय, तरुणांना पण माहीत नाही. माझे पणजोबा कडवे सनातनी. पुण्यात एका पेठेतून निघून पाठीमागच्या दुसऱ्या पेठेत निघतो, असा प्रचंड वाडा. पण माझ्या आजोबांना वाचन आणि चिंतन करताना ख्रिश्चन धर्म पटला. त्यांनी धर्मांतर केले. ख्रिश्चन झाले. रेव्हरंड ना.वा.टिळक वगैरे मित्र. प्रशस्त वाडा सोडून छोट्या चाळीत राहायला लागले. माझ्या वडिलांना प्रश्न पडला- माझा धर्म कोणता? त्यांनी सरळ पत्र पाठवून हा प्रश्न महात्मा गांधींना विचारला. महात्माजींनी त्यांना स्वहस्तक्षरात पोस्टकार्ड पाठवले.

ते पोस्टकार्ड वडिलांनी फ्रेम करून घरात लावले होते. पानशेतच्या पुरात ते वाहून गेले, पण ते पत्र वाचलेले काही जण आजही हयात आहेत. गांधींनी लिहिले होते, ‘तुझा धर्म तू स्वीकारायचा आहेस. सर्व धर्मांचा अभ्यास कर, योग्य वाटणारा धर्म स्वीकार. मात्र कोणताही धर्म न मानणारी, पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसेही आपल्याभोवती असतात, हे समजून घे.’ नंतर विवेकानंद वाचताना मला जाणवले की, विवेकानंदांनी पण नेमके हेच सांगितले आहे. या अशा मोकळ्या वातावरणात गीता, ज्ञानेश्वरी, ख्रिस्त पुराण, येशूच्या कथा (हे आजोबांनीच लिहिलेले पुस्तक) यांच्या सहवासात मी व माझे भाऊ-बहीण वाढलो. मला एक धाकटा भाऊ राजन हर्षे, बहीण वैजयंती पंडित.’’

मी डॉक्टरांना मधेच थांबवले. म्हटले, ‘‘तुमचा भाऊ व बहीण यांची नावे ऐकून होतो. त्यांचे कामही थोडे फार माहीत आहे. पण ते तुमचे भाऊ-बहीण आहेत, हे माहीत नव्हते. त्यामागची ही कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत नव्हती. तुमची बहीण अर्थशास्त्रज्ञ आहे, अनेक मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहे. डॉ.राजन हर्षे यांचे काम तर खूपच मोठे आहे, मात्र ते महाराष्ट्राला फारसे माहीत नाहीत. बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठ ही उत्तरेतीलच नव्हे तर भारतातही अग्रक्रमात येणारी विद्यापीठे. एकही मराठी माणूस या विद्यापीठांचा कुलगुरू झालेला नव्हता.

गुरुदेव रानडे काही काळ या विद्यापीठात होते, पण त्यांनाही कुलगुरुपद हुलकावणी देऊन गेलंय. मात्र डॉ.राजन हर्षे- ज्यांनी आपले शिक्षण जेएनयूमधून पुरे केलेय ते- अलाहाबाद विद्यापीठाचे सलग पाच वर्षे कुलगुरू होते, ही गोष्ट सांगण्यासारखी आहे. कारण या विद्यापीठांमधील राजकीय हस्तक्षेप आणि उग्र विद्यार्थी आंदोलने यांमुळे गेल्या वीस वर्षांत दुसऱ्या कोणत्याही कुलगुरूंचा तेथे एक-दीड वर्षांपेक्षा अधिक निभाव लागलेला नाही. याचे श्रेय डॉ.राजन हर्षेही यांच्या विलक्षण प्रशासकीय कौशल्याला जाते. खरे तर मी त्यांच्यावर सविस्तर लिहिणार होतो. पण साधनाचे लेखक संकल्प गुर्जर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केलाय, ते सविस्तर लिहू शकतील म्हणून थांबलो. तर मनात येणारा प्रश्न- समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे विषय सोडून तुम्हाला डॉक्टर व्हावेसे का वाटले?’’

डॉक्टर म्हणाले, ‘‘तसे काही खास कारण सांगता येणार नाही. त्या वेळचे शिक्षण फार स्वस्त होते. मुंबई सोडून महाराष्ट्रात बी.जे.मेडिकल कॉलेज हे एकच वैद्यकीय महाविद्यालय होते, तेही पुण्यात होते. सहजपणे प्रवेश मिळत होता म्हणून 1962 मध्ये मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. आपण आजारी माणसांची सेवा करू शकू, ही एक तरल भावना मनात असेल; पण खरे तर कोणत्याही माध्यमातून तुम्ही समाजाच्या उपयोगी पडू शकाल असे संस्कार होते. एम.बी.बी.एस. झालो, नंतर एम.डी. पण झालो.

‘‘मी पुण्याऐवजी साताराला आलो याला एक कारण आहे. माझ्या आईचे वडील म्हणजे सातारचे त्या वेळचे प्रख्यात डॉक्टर. सातारला येऊन प्रॅक्टिस करणारे ते पहिले एम.बी.बी.एस. डॉक्टर होते. मात्र आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा संगम व्हावा म्हणून त्यांनी सातारला आर्यांग्ल महाविद्यालय स्थापन केले. आयुर्वेद अर्कशाळेची निर्मिती केली. चिरमुलेंनी सुरू केलेली सातारची विमा कंपनी आणि हिंगणे शिक्षणसंस्थेची कन्याशाळा सुरू करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यामुळे सातारा शहराबद्दलचे एक आकर्षण मला होते, पण मी माझा दवाखाना मात्र वेगळा सुरू केला. येथील सरकारी हॉस्पिटलमध्येही जाणे-येणे सुरू केले. त्या वेळचे वातावरण वेगळे होते.

सरकारी हॉस्पिटलेही खूप चांगली होती, सेवाभावी होती. ज्यांनी रवी बापट यांनी लिहिलेले ‘केईएम वॉर्ड नंबर पाच’ हे आत्मचरित्र वाचले असेल, त्यांना याची कल्पना असेल. आयुष्य सरळ, संथ आणि सुंदर होते. डॉक्टरने सायकलने वा पायी जाणे हा रिवाज होता. स्कूटर लांबूनही खुणावत नव्हती.’’

मी संवादाचा धागा तोडला. म्हटले, ‘‘डॉक्टर तुम्ही परकाया प्रवेश करता, असे तुमचे अनेक पेशंट म्हणतात.’’ डॉक्टर हसले. म्हणाले, ‘‘मी पण ते ऐकलंय. पण डॉक्टरलाच नव्हे तर प्रत्येकाला समोरच्या माणसाशी वाद घालताना हे जमायला हवे. तुम्ही क्षणभर स्वत:ला विसरून त्या रोग्याच्या ठिकाणी स्वत:ला उभे करा. त्याच्या आर्थिक, पारिवारिक, सांस्कृतिक आणि शारीरिक समस्या क्षणभर तरी तुमच्याच होतात. मग मी समोरच्या रोग्याला त्याच्या समस्येवर असलेले वेगवेगळे पर्याय समजावून सांगतो. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करतानाही माणसे दगावलीत. खुद्द डॉ.नीतू मांडके अँजिओप्लास्टी करताना गेलेत. बायपास सर्जरी केलेल्या आणि ती नाकारलेल्या रुग्णांपैकी किती जातात, किती तगतात- ही आकडेवारी धूसर आहे, असे मला वाटते.

आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा फक्त ईसीजी होता, स्ट्रेस-स्ट्रेन ईसीजीसुद्धा माहीत नव्हता, बायपास सर्जरी तर ऐकलीही नव्हती. हे सर्व सांगतो आणि शांतपणे निर्णय घ्यायला रुग्णाला सांगतो. त्यामुळे ‘बायपास सर्जरी करू नका’ असे मी सांगितलेली किमान शंभर माणसे सातारा शहराच्या अवतीभोवती असतील, असे माझ्याबद्दल बोलताना एक जण म्हणाले, ते अतिशयोक्तीचे नाही. तीन महिन्यांपूर्वी माझा अमृतमहोत्सव सातारा येथे साजरा केल्यावर मी एक उपक्रम सुरू केलाय. गेले तीन महिने 90 वर्षांवरील किती माणसे आऊट डोअर पेशंट म्हणून माझ्याकडे येतायत यांची नोंदणी करतोय.

असे दरमहा सरासरी 40 रुग्ण आहेत. फार पूर्वी ‘बायपास वगैरे करू नका’ असे सांगितलेली खेड्यातील माणसे योग्य आहार, शेतातील छान श्रम यांच्या जोरावर ठणठणीत दिसतात. ही माणसे कधी एकटी येतात, कधी आधारासाठी नातू किंवा पणतू असतो. मला वाटते, हे सर्वच आजारांबाबत आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम, मानसिक संतुलन यामुळे ‘क्रॉनिक ल्युकेमिया’ (पांढऱ्या पेशींचा कॅन्सर) यातून वाचलेली दहा-बारा माणसे साताऱ्यात आहेत, ती तुमच्या माहितीचीही आहेत. त्यांना असला काही आजार होता किंवा आहे याचीही कल्पना तुम्हाला नाही.

‘‘डॉक्टर म्हणून मी आणि माझे काही सहकारी डॉक्टर मित्र आणखीही काही गोष्टी करतो. ‘जेनेरिक मेडिसिन’ ही संकल्पनासुद्धा मोठ्या औषधी कंपन्यांनी आज हास्यास्पद ठरवली आहे. याच कंपन्या ही ‘जेनेरिक मेडिसिन’ बनवतात. फार कमी किंमत न ठेवता. याबाबत डॉक्टरांनी सजग असले पाहिजे. परवाच माझ्याकडे एक वृद्ध दांपत्य आले होते. पुरुषाला मधुमेह, पण तो औषधे घेणे थांबवणार म्हणत होता, कारण त्याला डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची किंमत दरमहा पाच हजार रुपये होत होती. मी त्यांच्याबरोबर बसलो. महिन्याला केवळ चारशे रुपये लागतील आणि त्याला मधुमेहाचा त्रास होणार नाही अशी औषधे लिहून दिली.’’

मी म्हटले, डॉक्टर, ‘‘या अशा बातम्या उडत-उडत गावभर फिरत असतात, त्या सर्वांनाच आशादायक वाटतात; पण त्याचबरोबर डॉक्टर म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’, डॉक्टर म्हणजे फार महागड्या टेस्ट कारण नसताना करायला लावणारे, ही प्रतिमा समाजमानसात तयार झाली आहे. हे असे का होतेय?’’

डॉक्टर थोडे गंभीर झाले. म्हणाले- ‘‘कट प्रॅक्टिस आहे, ती घृणास्पद आहे. पण ती सार्वत्रिक आहे, असे मला किमान सातारा शहराबद्दल वाटत नाही. पण ती होऊ नये असे वाटत असेल, तर त्यामागच्या कारणांचीही सर्व स्तरांवर शांतपणे चर्चा व्हावयास हवी. सर्वच मानवी समाज चंगळवादात गुंतत चाललाय, हे त्यामागचे कारण नाही. मला वाटते, चार प्रमुख कारणे आहेत, आणखीही असतील.

‘‘खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची गरज आहे, की वैद्यकीय शिक्षण ही सरकारचीच जबाबदारी आहे, ही चर्चा बाजूला ठेवली तरी; आज खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण प्रचंड महाग आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण मागासवर्गीयांच्या आवाक्याबाहेरचे आहे. ‘खाउजा’पूर्वी परिस्थिती वेगळी होती. माझ्या मुलीने 1990 मध्ये सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. आज खरेही वाटणार नाही, वसतिगृहातील राहणे आणि महाविद्यालयाची फी म्हणून पहिल्या वर्षी मला अकराशे चाळीस रुपये भरावे लागले. आज प्रचंड पैसे खर्च करून मुले डॉक्टर बनतात. त्यातून शहरी मानसिकता एवढी वाढली आहे की, शहरात सर्दी-पडसे झाले तरी एमबीबीएस डॉक्टर चालत नाहीत आणि एम.डी.,एम.एस.  होण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात.’’

‘‘हे केवळ इथेच थांबत नाही. तपासण्याची अत्याधुनिक साधने आली आहेत. ती गरजेची आहेत, मात्र त्यांच्या किमती कोटीच्या कोटी उड्डाणे अशा आहेत. सातारला आम्ही काही डॉक्टर मित्रांनी मिळवून अशी उपकरणे विकत घेतली. घर तारण ठेवून बँकेतून कर्जे काढली. त्याचा संपूर्ण अहवाल माझ्याकडे आहे, तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. मात्र त्यातून ही उपकरणे काही वर्षांत कालबाह्य होतात. आपले अडकलेले पैसे तरी मोकळे व्हावेत म्हणून आपल्या भोवतालच्या डॉक्टर्सना ‘ही वापरा, पैसे घ्या, कट घ्या’ ही कटकट सुरू होते. त्यातून एकदा ही उपकरणे वापरण्याची सवय लागली की, आपण रोग्याला तपासले पाहिजे, त्याच्याशी बोलले पाहिजे- हेच डॉक्टर विसरून जातात.

‘‘रोटी-कपडा-मकान या मानवी समाजाच्या मूलभूत गरजा आहेत, असे आपण नेहमी म्हणतो. पण शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या मानवी समाजासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी आहेत. वैद्यकीय क्षेत्राबद्दल बोलावयाचे तर वैद्यकीय शिक्षण मोठ्या प्रमाणात व परवडणारे हवे. ती शासनाची वा सेवाभावी सामाजिक संस्थांची जबाबदारी हवी. ज्या भावनेने डेक्कन एज्युकेशन सोसायटी वा रयत शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, ती सामाजिक बांधिलकी यामागे हवी. वैद्यकीय पदवी मिळाल्यावर ग्रामीण भागात किमान दहा वर्षे सेवा देण्याचे बंधन हवे. त्याची अंमलबजावणी करण्याची कुवत असलेले प्रशासकीय कौशल्य हवे.

अगदी आजही गावात जसे शासकीय रुग्णालय असते, त्याप्रमाणे तपासणी करणारी अतिमहाग उपकरणे स्वस्त दरात सहज उपलब्ध करून देणारी शासकीय सेवाकेंद्रे हवीत. एके काळी डॉक्टर हा घराच्या व समाजाच्या दृष्टीनेही देव होता, आज तो राक्षस बनतोय. हे असे का होतेय? मला वाटते, आजचे वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय व्यवसाय व व्यवस्था यावर व्यापक विचारमंथनाची गरज आहे.’’

मी म्हटले, ‘‘डॉक्टर, थोडे विषयांतर. शेवटचा प्रश्न- सातारचे लोक सांगतात- सातारला व्यवसाय करायला आलात तेव्हा तुम्ही कडवे कम्युनिस्ट होता. नगरपालिकेच्या निवडणुकीत आपले कॉम्रेड मित्र पडणार, हे नक्की माहिती असूनही तुम्ही घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करायचात, तर आज तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रवचने देता. हा एवढा बदल कसा झाला?’’

डॉक्टर हसले. म्हणाले- ‘‘हा बदल नाही, खरं तर त्या वेळीही मी कडवा कम्युनिस्ट नव्हतो. कुठल्याच पक्षाचा साधा सभासदही नव्हतो. पण मी तेव्हा आणि आजही आतून व बाहेरूनही अगदी अंतर्बाह्य समाजवादी आहे. समाजवादाची माझी जाणीव धर्मग्रंथ अधिक समृद्ध करतात, असे मला वाटते.’’

Tags: संकल्प गुर्जर राजन हर्षे साधना शस्त्रक्रिया डॉक्टर विनोद शिरसाठ डॉ.नरेंद्र दाभोळकर sankalp gurjar rajan harshe sadhna shasrakriya doctor vinod shirsath dr. narendra dabholakar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके