डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘कलादर्पण’ संग्रहात नुसता कलाविचार नाही,  तर ज्या राजकीय-सामाजिक पर्यावरणात कला आकाराला येते, तो काळही पाटकर स्पष्ट करतात. त्या दृष्टीने हा काळाचाही आरसा आहे.  पाटकरांचं कलेबद्दलचं आकलन नेहमीच समाजसापेक्ष राहिलेलं आहे. कारण कलेला  राजकीय संदर्भ असतात- मग ते पिकासोचं ‘गेर्निका’ असो वा फ्रान्सिस्को गोयाची स्पेनमधल्या यादवीवरची चित्रे असोत. आधुनिक कलाप्रवाहांना पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे संदर्भ आहेत. विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान यांचेही संदर्भ पाटकर देतात. गोयाचा काळ वर्णन करताना तत्कालीन तंत्रज्ञान, बाल कामगारांना मनाई करणारे सुधारित कायदे  आणि ज्ञानयुगाचा (एज ऑफ एन्‌लायटन्‌मेंटचा) उदय हे तपशीलही ते पुरवतात. 
 

एकोणीस आणि विसाव्या शतकातील कलाविचारांचा मागोवा रमेशचंद्र पाटकर सातत्याने घेत आलेले आहेत; मग तो मराठी नियतकालिकांतील दृश्यकला विचार असो,  अथवा अमृता शेरगिल यांचा पत्रव्यवहार असो. कलादर्पण हे त्यांचं नवं पुस्तक.

या लेखसंग्रहात कलाविषयक तसेच नियतकालिकांमध्ये अथवा त्यांच्या अन्य पुस्तकांच्या निमित्ताने लिहिलेले लेख  एकत्रित केलेले आहेत. त्यातील काही परिचयात्मक, काही रसग्रहणपर, तर काही सामाजिक अंगाने कलामाध्यमाचा विचार करणारे आहेत. त्यामुळे पिकासो, रवींद्रनाथ यांच्याबरोबर गोपाळ गणेश आगरकर व जॉन केनेथ गालब्रेथ हेही त्यात येऊ शकतात.

या संग्रहात एकूण अठरा लेख आहेत. आकलनाच्या सोईसाठी खरं तर त्यांची चार भागांत विभागणी करायला हवी. पहिल्या भागात महाराष्ट्रातील चित्रकला, गोपाळ गणेश आगरकरांच्या ‘भारतीय कलांचे पुराणत्व’ या लेखासंबंधी तसेच नियतकालिके व गोंधळेकरांची कलासमीक्षा यावरचे लेख येऊ शकतात.  यापैकी ‘प्राचीन व मध्ययुगीन महाराष्ट्रातील चित्रकला’ हा परिचयपर लेख आहे. प्रागैतिहासिक काळापासून महाराष्ट्रातील चित्रकलेचे पुरावे आता सापडलेले आहेत. कशेळी, रत्नागिरी येथील कातळशिल्पे हे त्याचं एक उदाहरण. सावळदा, जोर्वे, तेर अशा संस्कृतींच्या काळातील मातीची भांडी, स्त्री-शिल्पे कलेचा प्रारंभकाळ सूचित करतात. त्यातूनच लोककला विकसित झाल्या.

सातवाहनांच्या काळात महाराष्ट्राचे नागरीकरण झाले आणि सांस्कृतिक जीवनाला प्रारंभ झाला. भाजे, कार्ले, अजिंठा येथील लेणी खोदली गेली. त्यानंतर वाकाटक, देवगिरी अशा राजवटींमध्ये शिल्पकला आणि वास्तुकला बहरली. पाटकरांच्या मते, महाराष्ट्रातील वास्तुकलेमुळे शिल्पकला व चित्रकला यांचा विकास झाला. धर्माबद्दलची उत्कट ओढ ही त्यामागची प्रमुख प्रेरणा होती- मग ती बौद्ध धर्माची असो वा हिंदू धर्माची. कामसूत्र अथवा विष्णुधर्मोत्तर पुराणात सांगितलेली कलेची अंगे अजिंठा येथील चित्रांना कशी लागू पडतात, ते पाटकरांनी सांगितलं आहे. दृश्य-कथनपरता आणि त्यात साधलेला घटनाक्रम व चित्ररचना (काँपोझिशन) यांचा समतोल यांचाही ते उल्लेख करतात. तेराव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत बहामनी राजवटीचा प्रभाव राहिला. राजकीय अस्थिरतेच्या या काळात मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव वास्तुकलेवर पडला. चित्रकलेवर पटचित्रे, लघुचित्रे यांच्या रूपाने पर्शियन कलेचा पडलेला प्रभाव हा अधिक महत्त्वाचा होता. शिवकालातील म्हणजे सतराव्या शतकातील चित्रकलेचे पुरावे फारसे उपलब्ध नाहीत. पण शाहूमहाराजांच्या काळात आणि त्यानंतर पेशवाईच्या काळात- म्हणजे अठराव्या शतकात भित्तिचित्रे व लघुचित्रे निर्माण झाली. सवाई माधवरावांच्या काळात जेम्स वेल्स या ब्रिटिश चित्रकाराने पुण्यात तैलरंगांतील व्यक्तिचित्रे पाश्चात्त्य शैलीत केली आणि गंगाराम चिंतामण नवगिरे, तांबट यांच्यासारखे शिष्य निर्माण केले. या सर्व शतकांमध्ये एकीकडे कारागिरी व कौशल्याच्या वस्तू निर्माण होत होत्या व वारली चित्रे, चित्रकथी यांसारख्या लोककलाही होत्या. या सगळ्याचा विचार पाटकरांनी या लेखात केला आहे.

याला दुसरा पूरक लेख म्हणजे ‘मराठी नियतकालिकांतील चित्रकलाविचार’. पाटकरांचे यावर स्वतंत्र पुस्तकच आहे. आपल्याला वाटतं त्यापेक्षा अधिक प्रमाणात चित्रकलेवर पूर्वीच्या काळात लेखन झालेलं आहे. पाटकर सांगतात की- 1800 ते 1950 या काळात मराठी नियतकालिकांतून चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, कलेचे तंत्रज्ञान आणि कारागिरी यावरही विपुल प्रमाणात लेखन झालं. कलाविषयाला वाहिलेल्या अनेक नियतकालिकांची नावंही त्यांनी दिली आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत झालेल्या कलाविषयक लेखनातून चित्रकलेबद्दलची अभिरुची कशी तयार झाली, ते आपल्या लक्षात येतं. कारण या कालखंडात कलाप्रकार, भारतीय व आधुनिक पाश्चात्त्य कला, कलेची मूलतत्त्वे,  कला-समाज व कलावंत यांचं नातं अशा विविध स्वरूपाचं लेखन झालं. ‘ओलेती’ चित्राच्या निमित्ताने श्लील- अश्लीलतेवर जोरदार चर्चा झाली. त्याचेही तपशील पाटकरांनी दिले आहेत. त्या काळातील काही सूत्ररूप वाक्येही तत्कालीन कलाविषयक जाणिवांवर प्रकाश टाकतात. उदाहरणार्थ- एका अज्ञात लेखकाने उत्तम चित्रकाराची व्याख्या पाश्चात्त्य यथार्थवादाला साजेशी केलेली आहे : जो सृष्टीत किंवा संसारात दिसणाऱ्या पदार्थाचे यथार्थ स्वरूप पुढे आणून दाखवितो, तो उत्तम चित्रकार. ना.म. भिडे ह्यांनी ‘साधनाच्या द्वाराने साध्याचा शोध घेणारा मनोव्यापार म्हणजे कला होय’ अशी कलेची समर्पक व्याख्या केलेली आहे. शिल्पकार करमरकर  ह्यांनी पौर्वात्य, पाश्चात्त्य व आधुनिक या तीनही मार्गांचं साध्य एकच असून मनोभाव व्यक्त करणं हे कलेचं साध्य असतं, असं सांगितलं आहे.

ज.द. गोंधळेकर आणि नी.म. केळकर ही कलाविचार सातत्याने मांडणारी या काळातली महत्त्वाची नावं. त्यापैकी गोंधळेकरांवर या पुस्तकात स्वतंत्र लेख आहे. गोंधळेकर चित्रकार तर होतेच, पण ते व्यासंगी अभ्यासक व कलासमीक्षकही होते. सामाजिक परिस्थितीचा व कलानिर्मितीचा जवळचा संबंध आहे आणि त्यांच्या  काळातील कला ही संक्रमणकाळातील आहे, असं ते म्हणत. ‘महाराष्ट्रातील चित्रकला’ हा लेख व अठराव्या शतकातील महाराष्ट्रातील भित्तिचित्रकलेबद्दलचा अहवाल  हे त्यांचं महत्त्वाचं लेखन. त्यातून त्यांच्या संशोधनवृत्तीचा प्रत्यय येतो. (या इंग्रजी अहवालाचा पाटकरांनी केलेला मराठी अनुवाद ‘खेळ’ च्या 2014 मधल्या तीन अंकांमधून प्रसिद्ध झालेला आहे.)

या संग्रहातील गोपाळ  गणेश आगरकरांवरील लेख हा एका दुर्मिळ लेखाकडे लक्ष वेधणाऱा आहे. ‘भारतीय कलांचे पुराणत्व’ हा आगरकरांचा लेख आहे तो सर जॉर्ज बर्डवूड यांच्या हस्तकलेशी संबंधित 1890 मधील लेखाच्या संदर्भात. त्या निमित्ताने हस्तोद्योग क्षेत्राची परिस्थिती आगरकरांना सांगायची आहे. औद्योगिक क्रांतीमुळे युरोपात यंत्रोत्पादित वस्तूंना बाजारपेठेत मोठी मागणी होती. त्यातून औद्योगिक कला हा एक नवा कलाप्रकार उदयाला आला. आटर्‌स अँड क्राफ्ट्‌स मूव्हमेंट 1880 ते 1910 या काळात विल्यम मॉरिस यांच्यामुळे फोफावली. पारंपरिक कारागिरी आणि कलाकौशल्याचा पुरस्कार करणारी ही चळवळ होती. भारतीय कारागिरांना बदललेल्या परिस्थितीत प्रशिक्षण व काम मिळावे, या उद्देशाने ब्रिटिशांनी कलाशाळा आणि अभियांत्रिकी शिक्षणसंस्था सुरू केल्या, तो हा काळ. आगरकरांच्या लेखाला हे सारे संदर्भ आहेत. आगरकरांनी आपले म्हणणे पुढील शब्दांत सूत्ररूपाने मांडले आहे- ‘आमच्या हस्तकौशल्याचा युरोपीय बाष्पशक्तीशी व यंत्रशक्तीशी  विवाह होऊन त्यांच्या समागमापासून उत्पन्न झालेली संताने जिकडे-तिकडे फडकू लागली पाहिजेत!’

पाटकरांनी या लेखात नोंदवलेली निरीक्षणं  महत्त्वाची आहेत. औद्योगिकीकरणामुळे भारतीय कलेने आपले स्वरूप बदलावे पण आपले स्वत्व गमावू नये, असं आगरकरांना वाटत होतं. भौगोलिक व भौतिक परिस्थितीवर तसेच परदेशी व्यापारावर कलेचा विकास अवलंबून असतो. मूलभूत गरजा भागवल्यानंतर शिल्लक राहिलेली ऊर्जा कलानिर्मितीसाठी आवश्यक असते, याचंही भान त्यांना होतं. भारतात औद्योगिक कलेचा विकास नजीकच्या काळात झालाच. पण जर्मनीत बाहौस स्कूलने भौतिक जीवनात सौंदर्यपूर्णता आणि उपयुक्ततेची सांगड घातली, त्या डिझाइन संकल्पनेची बीजं आगरकरांच्या विचारात आढळतात.

 पाटकरांनी परिशिष्टात दोन लेख दिले आहेत. एक आहे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जॉन केनेथ गालब्रेथ यांचा, तर दुसरा आहे पीटर बिवेल यांचा. गालब्रेथ ह्यांनी सांगितलं आहे की, आपली उत्पादने ही कौशल्यपूर्ण हवीत, अशी मागणी फक्त गरीब समाज करू शकतो. पण श्रीमंत समाजाला अभियांत्रिकी कौशल्याबरोबरच सौंदर्याचीही गरज आहे. औद्योगिकीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अभियांत्रिक महत्त्वाचा असतो. नंतरच्या टप्प्यात मात्र कलावंताला महत्त्व द्यायला हवं. गालब्रेथ ह्यांचे हे विचार 1970 च्या दशकातील आहेत, जेव्हा अमेरिकन उत्पादनांपेक्षा युरोपातील उत्पादने ही डिझाईनच्या दृष्टीने अधिक सरस होती आणि अमेरिकेत सौंदर्यदृष्टीपेक्षा जाहिरातींची आक्रमक कुरूपता अधिक होती. मार्केट रिसर्चच्या तज्ज्ञांकडून कलात्मक सत्य सांगितले जाऊ लागले की- अर्थसत्ता आणि निखळ कलात्मकता यात दुरावा निर्माण होतो, असा त्यांच्या सांगण्याचा मथितार्थ आहे. बिवेल ह्यांचा लेख जागतिकीकरण आणि अर्थकारण या संदर्भातला आहे. जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून कलेच्या नकाशात आशियापासून ते अरब देशांपर्यंत  साऱ्या देशांचा बरोबरीच्या नात्याने समावेश झाला. आधुनिक कला ही संज्ञा जाऊन समकालीन ही संज्ञा प्रचारात आली. जागतिकीकरण हे वसाहतवादाचे सुधारित रूप आहे आणि जागतिकीकरणाच्या विळख्यातून संस्कृतीची व कलेची सुटका नाही, असं हा लेख सांगतो. आगरकरांचा वसाहतवादाचा काळ  असो, अमेरिकन भांडवलशाहीचा असो अथवा जागतिकीकरणाचा; अर्थकारण, सत्ता व कला यांचे संबंध संस्कृतीचे स्वरूप ठरवत असतात, याचा प्रत्यय या लेखांमधून येतो.

या संग्रहाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे बंगाल स्कूलवरील लेख. बंगालच्या सांस्कृतिक जीवनावर टागोर घराण्याचा प्रभाव नेहमीच राहिलेला आहे. त्यापैकी रवींद्रनाथ टागोर हे या कलाजाणिवेचे मूलस्रोत आहेत. रवींद्रनाथ ह्यांच्याकडे कलेबद्दलची एक व्यापक दृष्टी होती. त्यामुळे भारतीय कलेबरोबरच त्यांनी जपानी चित्रकला, युरोपातील आधुनिक प्रवाह, बाहौस कला चळवळ याबद्दल शांतिनिकेतनचे विद्यार्थी आणि कलाशिक्षक यांच्यात जागरूकता निर्माण केली. भगिनी निवेदिता, स्टेला क्रॅमरीश, डॉ.आनंद कुमारस्वामी यांसारख्या अभ्यासकांनी कलेला विचारांची जोड दिली. रवींद्रनाथ हे राष्ट्रीयतेच्या संकुचित विचारांपेक्षा कलेच्या वैश्विकतेला महत्त्व देणारे होते. त्यामुळे वासाहतिक वारशातून आलेली  ब्रिटिशांची ॲकॅडेमिक शैली आणि भारतीय कलेचा वारसा यांच्या द्वंद्वातून बंगालमधील चित्रकार लवकर  बाहेर पडू शकले.

अवनींद्रनाथ टागोर हे बंगाल स्कूलचे जनक मानले जातात. वॉश टेक्निकने जलरंगांत केलेली पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवरील चित्रे हे बंगाल पुनरुज्जीवन शैलीचं वैशिष्ट्य होतं. रोमँटिक वृत्तीचं दर्शन अवनींद्रनाथांच्या चित्रांमध्ये होतं.  गगनेंद्रनाथ  टागोर हे आधुनिक भारतीय अर्कचित्रांचे जनक म्हणून ओळखले जातात. गगनेंद्रनाथांनी तत्कालीन सुधारणावादी ब्रिटिशधार्जिणा वर्ग आणि सनातनी मध्यमवर्ग दोन्हींना आपल्या टीकेचं लक्ष्य बनवलं आणि उपरोधिक शैलीतील अर्कचित्रं काढली. पाटकर म्हणतात त्याप्रमाणे ॲकॅडेमिक शैली आणि बंगाल स्कूलच्या शैलीतील रेषेचा वापर करून मुद्रणयोग्य अशी ग्राफिक आर्ट शैली गगनेंद्रनाथांनी यशस्वीपणे रूढ केली. या दोघांवरचे लेख माहितीपूर्ण आहेत. नंदलाल बोस हेदेखील या परंपरेतले एक महत्त्वाचे चित्रकार. लोकसंस्कृतीबद्दलचं आकर्षण, राष्ट्रवादी विचार आणि कलाशिक्षणाबद्दलची आस्था हे त्यांचे विशेष ‘बहुआयामी’ या लेखात आले आहेत. कारागिरांची एक संघटना- कारू संघटना- त्यांनी तयार केली होती. सर्वांनी एकत्र येऊन एकाच ठिकाणी कामं करावीत आणि मोबदला वाटून घ्यावा, अशी ती योजना होती. ती फार काळ चालली नाही. पण चोलामंडल या पुढील काळात दक्षिण भारतात चेन्नई येथे 1967 मध्ये  यशस्वी ठरलेल्या कलाग्रामापूर्वी असा प्रयोग बंगालमध्ये झाला होता, हे विशेष.

‘दक्षिण भारतातील आधुनिक दृक्‌ कलेची वाटचाल’ या लेखात पाटकरांनी मद्रास (तमिळनाडू), आंध्र, केरळ व कर्नाटक या राज्यांमधील दृश्यकलेचा प्रवास सांगितला आहे. बंगालच्या तुलनेत हा प्रवास दुर्लक्षित राहिला आहे. मद्रासमध्ये कलाशिक्षणाला 1850 पासून सुरुवात झाली. हंटर, हॅवेल, देवी प्रसाद रॉय-चौधरी, के.सी.एस. पणिक्कर यांनी चित्र-शिल्पकलेत एका वेगळ्या पद्धतीने भारतीयत्व आणलं. विशेषत: पणिक्कर, जी.एस. वासुदेव, पी.व्ही. जानकीरामन यांनी लोककला, तंत्र आर्टमधील प्रतीक-चिन्हांचा वापर करून आधुनिक भारतीय कलेत 1960 च्या दशकात एक नवी दृश्य भाषा निर्माण केली.    

भारतात जेव्हा ब्रिटिशांची ॲकॅडेमिक परंपरा आणि कलेतील भारतीयत्वाची चर्चा होत होती, तेव्हा युरोपात अनेक आधुनिक कलाप्रवाह आपला प्रभाव पाडत होते. या संग्रहात मार्सेल  दुशां, मार्क शगाल, जोन मिरो, पिकासो, दाली यांच्यावर लेख आहेत. ‘दे स्टील’ या नियतकालिकावर आणि चळवळीवर स्वतंत्र लेख आहे. लेखांचा हा तिसरा भाग म्हणता येईल. आधुनिक कलाप्रवाहातील विचारांची आणि आविष्काराची विविधता अभ्यासण्याच्या दृष्टीने हे लेख महत्त्वाचे आहेत. साल्वादोर दाली आणि जोन मिरो दोघेही अतिवास्तववादी चित्रकार, पण दोघांच्या चित्रशैलीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. दालीच्या चित्रांमधील चमत्कृतीची जागा मिरोच्या चित्रांमध्ये एक स्वप्नील जग घेते. त्यातील रंग-रेषांनी बनलेलं अवकाश चिन्हार्थांनी परिपूर्ण असतं. मार्क शगालच्या आयुष्यातील रशियन क्रांती व नाझी राजवटीचे संदर्भ आणि त्याच्या संघर्षमय आयुष्याचे चित्रांमध्ये उमटलेले पडसाद याबद्दल पाटकरांनी लिहिलं आहे. पण मार्सेल दुशां याच्यावरचा लेख त्यातील कलाविषयक क्रांतिकारक भूमिकेमुळे अधिक वाचनीय झाला आहे. क्युबिझम, दादाइझम, अतिवास्तववादी चळवळींच्या संपर्कात दुशां आला. त्याने सायकलचं चाक, युरिनल पॉट या रेडिमेड वस्तूंचा वापर शिल्प म्हणून केला. त्यातून कलाकृतीबद्दलचे अनेक गंभीर प्रश्न त्याने उपस्थित केले. हस्तकौशल्यापेक्षा निवडीचं महत्त्व अधोरेखित केलं. कला आणि व्यवहार यांच्यातील विरोधाभासात्मक नातं दाखवून दिलं. पाटकर सांगतात की, दुशांच्या ‘रेडिमेड्‌स’चं नातं एका बाजूने व्यापारी कलेशी आणि दुसऱ्या बाजूने ग्राहक भांडवलशाहीशी आहे.

या संग्रहात ‘दे स्टील’ या डच नियतकालिकावर लेख आहे. वास्तुकलाकार, संकल्पनाकार (डिझाईनर्स) आणि चित्रकार-शिल्पकार यांनी कलाविचार मांडण्यासाठी ते सुरू केलं. लवकरच त्याला आधुनिक कलाविचारात मानाचं स्थान मिळालं. हे नियतकालिक 1917 मध्ये थिओ वन दुईसबर्ग याने सुरू केलं, तर एक कलाविचार म्हणून तो 1930 च्या सुमारास प्रस्थापित झाला. वास्तुकला, डिझाईन आणि चित्रकला यांचा समन्वय त्यात साधला होता. उभ्या-आडव्या घटकांची भौमितिक पद्धतीने केलेली रचना आणि योग्य पद्धतीने केलेली सांधेजोड हे या शैलीचं वैशिष्ट्य होतं. त्यात भावनेपेक्षा रचनेला अधिक महत्त्व होतं. यातूनच कन्स्ट्रक्टिव्हिझम उदयाला आला. चित्रकार मॉन्द्रियन, वास्तुरचनाकार एच.पी. बरलॅग हे या विचारांचे प्रमुख प्रणेते होते. विशेष म्हणजे, मॉन्द्रियन व दुईसबर्ग दोघांनाही थिऑसॉफी आणि हेगेलच्या तत्त्वज्ञानाचं आकर्षण होतं. खरं तर हेगेलचं विरोधविकासाचं तत्त्वज्ञान  आणि थिऑसॉफीचा पौर्वात्य गूढवादी आध्यात्मिक दृष्टिकोन यांचा तसा संबंध नाही. पण पाटकर यांच्या मताप्रमाणे कलेच्या विकासाची बीजं अशा विरोधी मतांच्या मंथनातच असतात. दुईसबर्ग जेव्हा सांगतो की, आधुनिक कला ही  प्रयोगांतून आणि घडामोडींमधून विकासाचे नवे टप्पे गाठेल आणि तिची विकासप्रक्रिया अखंड चालू राहील; तेव्हा तो हेगेलचे विचारच सांगत असतो.

‘कलादर्पण’ संग्रहात नुसता कलाविचार नाही, तर ज्या राजकीय-सामाजिक पर्यावरणात कला आकाराला येते, तो काळही पाटकर स्पष्ट करतात. त्या दृष्टीने हा काळाचाही आरसा आहे. पाटकरांचं कलेबद्दलचं आकलन नेहमीच समाजसापेक्ष राहिलेलं आहे, कारण कलेला  राजकीय संदर्भ असतात- मग ते पिकासोचं ‘गेर्निका’ असो वा फ्रान्सिस्को गोयाची स्पेनमधल्या यादवीवरची चित्रे असोत. आधुनिक कलाप्रवाहांना पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे संदर्भ आहेत. विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान यांचेही संदर्भ पाटकर देतात. गोयाचा काळ वर्णन करताना तत्कालीन तंत्रज्ञान, बाल कामगारांना मनाई करणारे सुधारित कायदे  आणि ज्ञानयुगाचा (एज ऑफ एन्‌लायटन्मेंटचा) उदय हे तपशीलही ते पुरवतात. हेगेलचा उल्लेख वर आलाच आहे. हे लेख विखुरलेले आहेत. एकसूत्रता आणण्याच्या दृष्टीने  त्यावर संपादकीय संस्कार होणं जरुरीचं होतं. तरीही त्याचा आवाका लक्षात येतो. यातले काळाचे समांतर प्रवाह पाहिले तर असं लक्षात येतं की- गोया जेव्हा ज्ञानयुगात वावरत होता, तेव्हा 1791 मध्ये पेशवाईच्या काळात जेम्स वेल्सची शनिवारवाड्यातील पहिली कलाशाळा सुरू झाली. आगरकरांना हस्तकौशल्य आणि यंत्रशक्ती यांचा जो समागम अपेक्षित होता, तो इंडस्ट्रियल आर्टच्या रूपाने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात अस्तित्वात आला होता. इंग्लंडमध्ये हस्तकला आणि यंत्रयुग यांच्यात आर्ट अँड क्राफ्ट्‌स मूव्हमेंटमुळे थोडा संघर्ष निर्माण झाला. हॉलंडमध्ये मात्र चित्रकला, डिझाईन आणि वास्तुकला यांचा एकत्र विकास झाला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपात जेव्हा आधुनिक कला बहरात होती, तेव्हा ‘ब्रिटिश कला की भारतीयत्व?’ या द्वंद्वात आपण अडकलेलो होतो. इथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. तो म्हणजे, मुद्राचित्रे आणि ग्राफिक आर्टचा. ग्राफिक आर्ट हे माध्यम सामाजिक स्थितीवर भाष्य करण्यासाठी अनेक चित्रकारांनी वापरलं. त्याची दखल पाटकरांनी गगनेंद्रनाथांच्या अर्कचित्रांच्या निमित्ताने घेतली आहे.

‘कलादर्पण’ वाचत असताना कलाविषयक काही प्रश्न पडतात आणि काहींची उत्तरेही मिळतात. कला आणि समाज यांचे संबंध, कला आणि अर्थकारण, कारागिरी आणि अभिजात कला, कलेच्या विकासाचे स्वरूप अशा अनेक मूलभूत प्रश्नांचं भान या लेखांमधून येतं. पाटकरांची भूमिका इथे कलेचा सामाजिक भाष्यकार म्हणून राहिलेली आहे.

कलादर्पण : कलाविषयक लेखसंग्रह

रमेशचंद्र पाटकर
लोकवाङ्‌मय गृह, मुंबई,
पृष्ठे - 258, मूल्य - 350 रुपये

Tags: कला चित्रकला पिकासो पुस्तक परिचय रमेशचंद्र पाटकर साहित्य लोकवाङ्मय weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके