डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पिकासो - 'मेटॅमॉर्फोसिस'च्या निमित्ताने...

जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या निवडक चित्रकृतींचे प्रदर्शन अलीकडेच मुंबईत भरले होते. त्या प्रदर्शनाच्या संदर्भातील खास लेख. 

विसाव्या शतकातील कलानिर्मितीवर पिकासोचा एवढा प्रभाव पडलेला आहे की तसा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा अथवा वादाचा क्वचितच पडला असेल. त्यामुळे पिकासो तुम्हाला आवडो अथवा न आवडो, त्याची दखल तुम्हाला घ्यावीच लागते. पिकासोला जाऊन आता पाव शतक उलटले तरी त्याच्याबद्दलचे औत्सुक्य अजून कमी झालेले नाही. म्हणूनच मुंबईत त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरले, तेव्हा या प्रतिभावंताच्या कलाकृती प्रत्यक्ष बघण्याची दुर्मीळ संधी इथल्या रसिकांना प्रथमच लाभली. अशा प्रकारे पाश्चात्त्य प्रतिभावंताच्या मोठ्या प्रमाणावर कलाकृती बघण्याची संधी फक्त रोदांच्या शिल्पाकृतींनी मुंबईकरांना दिलेली होती, हेन्री मूरची शिल्पे दिल्लीला येऊन तिथूनच परत गेली; मुंबईत त्याचे भरलेले प्रदर्शन अगदीच जुजबी होते. पिकासोचे एखाददुसरे मुद्राचित्र प्रदर्शनात पाहिलेले आठवते, तेवढेच.

'मेटॅमॉर्फोसिस' या नावाचे पिकासोचे हे प्रदर्शन एकूण १२२ कलाकृतींचे असून पिकासोच्या कामाची व्याप्ती, त्याचा झपाटा आणि माध्यमांची विविधता याचा एक प्रातिनिधिक आलेख त्यातून उभा राहतो. त्याच्या गाजलेल्या सर्वोत्तम कलाकृती या प्रदर्शनात नाहीत. त्याची दुय्यम आणि काही तिय्यम दर्जाचीही चित्रे यात आहेत. पण तरीही ती त्याच्यातला प्रतिभेचा अंश दाखवतात. शतकभराचा कलेचा प्रवास आणि त्याची अनुभूती तुम्हाला देतात. या प्रदर्शनातील सर्वोत्तम कलाकृती जर कुठच्या असतील तर त्या रेखाचित्रे आणि मुद्राचित्रे या आहेत. काही शिल्पेदेखील आपले लक्ष वेधून घेतात; ज्यांत सायकलचे हँडल आणि सीट यांचा वापर करून बनवलेले 'बुल' हे प्रसिद्ध शिल्पही आहे. या चित्रांमध्ये एकीकडे आकार आणि अवकाशाचा विविध माध्यमांतून घेतलेला शोध आहे, त्याला व्यक्तिगत आणि सामाजिक संदर्भ आहेत; त्याचवेळेस उत्तरायुष्यातील मृत्यूला थोपवू पाहणारी अर्धी कच्ची निर्मिती करणारी अस्वस्थ ऊर्जाखील आहे.

'मेटॅमॉर्फोसिस' हे प्रदर्शनाचे नाव अन्वर्थक आहे. मेटॅमॉर्फोसिस म्हणजे रूपांतर. इथे त्याचे अनेकवचन वापरल्यामुळे ते पिकासोच्या बाबतीत अधिक अर्थपूर्ण झालेले आहे. कारण पिकासोच्या बाबतीत रूपांतर त्याच्या आयुष्यात अनेकदा झाले; नव्हे, सतत बदल हा त्याच्या कलात्म जीवनाचा अविभाज्य भाग होता. बहुरूपी हा शब्द सोंग आणणे या अर्थाने वापरल्यामुळे त्याचा अर्थ आपण संकुचित करून टाकला आहे. पिकासोचे बहुरूपीपण हे ग्रीक देवता प्रोटिअससारखे आहे. प्रोटिअसला विविध रूपे घेण्याची कला अवगत होती, आकाशातील ढग जसे क्षणाक्षणाला आपला आकार बदलतात, तसे पिकासोच्या ऊर्जस्वल प्रतिभेने आयुष्यात अनेक रूपे घेतली म्हणून ती रूपांतरे! पिकासोचे मेटॅमॉर्फोसिस म्हणजे फुलपाखराचे सुरवंटात रूपांतर अशी बाष्कळ टीका काहींनी आपल्याकडे केली. त्याला संदर्भ होता पिकासोच्याच उद्गारांचा. राफाएलसारखी चित्रे आपण लहानपणीच काढत होतो पण लहान मुलांसारखी चित्रे काढायला मला आयुष्य घालवावे लागले, अशा आशयाचे उद्गार त्याने काढले होते.

फुलपाखरांचे सुरवंट होण्याला आणि मेटॅमॉर्फोसिस या संज्ञेला आधुनिक साहित्यकला विचारात एक वेगळा अर्थ आहे. तो लक्षात घेतला नाही तर आधुनिक कलेचा रसास्वाद हा वरवरचा राहील. मेटॅमॉर्फोसिस या शब्दाने आपल्या डोळ्यासमोर काफ्काची कथा वा कादंबरीच उभी राहते, जिचा नायक एक क्षुद्र कीटक बनून साऱ्या जगाकडे पाहतो. विसाव्या शतकाचा एकूण इतिहास पाहिला तर महायुद्ध, नरसंहार, सत्तापालट यांनी प्रत्यक्ष वा मानसिकदृष्ट्या विस्थापित झालेल्या समाजाने संग्रामात हरवलेल्या निर्व्याजतेचा शोध घेतल्याचे जाणवते. रेनेसान्सकालीन अथवा सौंदर्यवादी कलावंतांनी जीवनाचा वेध घेतला तो आदर्श भव्य दिव्यतेच्या आकर्षणातून. याउलट पिकासोच्या पिढीने शोध घेतला तो विघटनाच्या आणि विरूपतेच्या, क्षुल्लक भासेल अशा तिरकस दृष्टिकोनातून: निजितेचा शोध घेताना या कलावंतांना, लेखकांना शोध लागला तो मनाच्या अंधाऱ्या स्तरांचा, अस्वस्थचित्त करणाऱ्या संवेदनांचा. निर्व्याजता हे स्वप्न राहिले; त्यांनी अनुभवले आणि व्यक्त केले ते मात्र बहुस्तरीय वास्तव. कुणी याला विसाव्या शतकातील कलावंतांची शोकांतिका म्हणतील. पण थोड्याफार फरकाने प्रत्येक कालखंडातील कलात्मक आत्मशोधाची हीच गत झालेली दिसेल. मेटॅमॉर्फोसिस संज्ञेला हे सारे संदर्भ आहेत.

चार विभाग

स्थूलमानाने या प्रदर्शनाचे चार भाग पडतात. ब्ल्यू पिरीयड आणि रोज पिरीयड. दुसरा क्युबिझमचा कालखंड, तिसरा गेर्निका आणि युद्धोत्तर कालखंड. आणि चौथा साठ आणि सत्तरच्या दशकातला अखेरचा कालखंड. ब्ल्यू आणि रोझ पिरियडमध्ये काढलेली चित्रे या प्रदर्शनात जवळजवळ नाहीतच. 1907 च्या आसपास काढलेली चित्रे प्रदर्शनात सुरुवातीला लावलेली आहेत तेवढीच. त्यातील एक व्यक्तिचित्र आहे, दुसरे पेन्सिलमध्ये काढलेले एका नग्न युवतीचे चित्र आहे आणि तिसरे एका स्त्रीचे व्यक्तिचित्र आहे, 'ले दम्बाझेल दाव्हियाँ' या क्रांतिकारक चित्रासाठी पूर्वतयारी म्हणून केलेले. याच कालखंडातील दरबारी विदूषकाचा चेहरा असलेले शिल्प वरच्या हॉलमध्ये ठेवलेले आहे. म्हणजे प्रदर्शनाची सुरुवात होते ती मानवी आकृतींचा भरीवपणा आणि मुखवट्यांची आठवण करून देणाऱ्या पिकासोच्या शैलीपासूनच. यातूनच पुढे क्यूबिझम अथवा घनवादाचे तंत्र पुढे आले आणि ब्राक या आपल्या सहकारी चित्रकाराबरोबर त्याने घनवादी शैलीतील अनेक चित्रे काढली.

घनवादी चित्रशैलीच्या चित्रांमध्ये स्थिरचित्रांचा समावेश आहे. त्यांत टेबलावरील वस्तू, पाव इत्यादींच्या आकृत्या एकमेकांत मिसळलेल्या आहेत. त्यांतील एक चित्र सेझानच्या शैलीतील आहे तर दुसरे ब्राकची आठवण करून देते. घनवाद म्हणजे वास्तवातल्या त्रिमितीपूर्ण वस्तूंची सपाट कॅनव्हासवर भरीव अशा भौमितिक आकारांचा वापर करून पुनर्रचना करणे. त्यात वरून, बाजूने अशा विविध पातळ्यांवरचे परिप्रेक्ष्य एकत्र गुंतलेले असेल आणि बघणाऱ्याच्या नजरेप्रमाणे या चित्रातील भरीव आकार व त्यांचे परिप्रेक्ष्य बदलेल. याची सुरुवात सेझाननेच आपल्या भरीव सफरचंदांच्या चित्रांमधून आणि त्रिकोणासारख्या भौमितिक आकारांचा निसर्गचित्रांमध्ये उपयोग करून केलेली होती. पिकोसोने त्याच शक्यतांचा घनवादाच्या शैलीत उपयोग करून घेतला.

गेर्निका आणि युद्धोत्तर कालखंडातील काही चित्रे या प्रदर्शनात आहेत, यादवी युद्धाचा परिणाम आणि त्यातून येणाऱ्या यातना आणि दुःख यांचे चित्रण पिकासोच्या चित्रांमधून आणि प्रतिमांमधून दिसते. एका मेंढीचे तासलेले मुंडके एका चित्रात दाखवलेले आहे. पिकासोने त्याच्या सहवासात आलेल्या अनेक स्त्रियांची व्यक्तिचित्रे काढली, तीदेखील या प्रदर्शनात आहेत. डोरा मार, मारी थेरेस वॉल्टर यांची व्यक्तिचित्रे, 'टर्कीश हॅट घातलेली स्त्री', 'स्लीपिंग न्यूड' ही चित्रे लक्ष वेधून घेतात ती पिकासोच्या खास तंत्रामुळे. मारी थेरेसच्या चित्रामध्ये पिकासोने कमनीय आणि गोलाकार रेषांचा वापर केला आहे. 'रेक्लाईनिंग वूमन' या चित्रात निसर्गचित्र आणि मानवाकृती दोन्हींचा मिलाफ आहे. या आणि इतर काही चित्रांत मानवी चेहऱ्याचे समोरून आणि बाजूने चित्रण एकाच चित्रात साधलेले आहे. आकारांची सापेक्षता आणि बदलते परिप्रेक्ष्य या चित्रांना कलात्मक पातळीवरची संदिग्धता देते. घनवादाचाच धागा या संदिग्धतेमागे दडलेला आहे. अन्य चित्रांमध्ये मात्र पिकासोने जणू काही पुरुषी खुनशीपणाने आपल्या आवडत्या स्त्रियांचे आकारांच्या पातळीवर विच्छेदन केले आहे; इतके की हे अमुक एका व्यक्तीचे व्यक्तिचित्र आहे हे सांगावे लागते! पिकासो घनवादी चित्रशैलीतच अडकून पडला नाही.

अतिवास्तववाद, अभिजात चित्रशैली आणि सेझान, एदुआर्द, माने अशा पूर्वसूरींच्या चित्रांचा ‘अभ्यास’ त्याने आपल्या चित्रांमधून नव्याने मांडला. त्यांतून परंपरेशी असलेले पिकासोचे नाते अधिक स्पष्ट होते. अशा चित्रांपैकी मानेच्या 'पिकनिक' (Dejeuner surtherbe) या चित्रावर आधारित पिकासोने काढलेले चित्र प्रदर्शनात ठेवलेले आहे. माने याच्या मूळ चित्रात नदीच्या किनाऱ्यावर सहलीला आलेले दोन तरुण आणि त्यांच्यासोबत बसलेली अनावृत स्त्री दाखवलेली आहे. या चित्राने मानेच्या काळात मोठे वादळ उठवले होते. माने हा इंप्रेशनिस्ट चित्रकारांचे प्रेरणास्थान मानला जातो. पिकासोने या चित्राचा अन्वयार्थ आपल्या पद्धतीने लावला आहे. मानेच्या चित्राच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीतून व्यक्त होणारा अबोध आशय पिकासोने अधिक स्पष्ट केला आहे. त्यामधील तरलता अभ्यासण्यासारखी आहे. अशा दुसऱ्या चित्रांवर आधारित चित्रांना स्वयंभू कलाकृतीचे मोल क्वचितच लाभते. पण चित्रकाराला आपले विचार स्पष्ट होण्यासाठी जशी अशा 'सरावांची' गरज असते, तशीच ही चित्रे पाहणाऱ्यालाही पिकासोवर झालेले संस्कार समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. या व्यतिरिक्त काही व्यक्तिचित्रांमध्ये पिकासोने ग्रीक वा रोमन शिल्पकलेतील अभिजात शैलीचा उपयोग केला आहे. उदाहरणार्थ पुस्तक वाचणाऱ्या स्त्रीचे व्यक्तिचित्र किंवा 'पोर्ट्रेट ऑफ फ्रॅन्कॉईस'मधील केशरचनेचे केलेले चित्रण.

माध्यमांची विविधता

पिकासोच्या अखेरच्या कालखंडाकडे वळण्यापूर्वी त्याने जी विविध प्रकारची माध्यमे वापरली आणि शिल्पकलेतही त्याने जी महत्त्वाची कामगिरी केली ती पाहणे आवश्यक आहे. त्या बाबतीत या प्रदर्शनात भरपूर विविधता आहे; आणि या माध्यमांचे रंग आणि पोत प्रत्यक्ष पाहणे हादेखील एक वेगळा अनुभव आहे. पिकासोच्या तैलचित्रांमधील मानवी आकृतींना सुरुवातीपासूनच एक ठाशीव आकार असल्याचे जाणवते. शिल्पसदृश असलेल्या या आकृती नंतरच्या काळातल्या हेन्री मूरच्या शिल्पाकृतींची आठवण करून देतात. पिकासोने पेन्सिल, शाई, खडू, तैलरंग, कागद, कॅनव्हास, लाकूड, कापड, लोखंडी जाळ्या, वर्तमानपत्रांचे कागद अशा अनेक गोष्टी वापरल्या. शिल्प तयार करण्यासाठी भंगारातल्या वस्तूही उपयोगात आणल्या. याशिवाय सेरेमिक, मुद्राचित्रे या माध्यमांतून काम केले ते वेगळेच. प्रदर्शनात गिटार वाद्यावरील काही चित्रे आहेत. त्यात पिकासोने कापडाचे तुकडे, जाळ्या यांचा वापर करून पृष्ठभागांचे थर आणि विशिष्ट पोत यांचा मेळ साधला आहे. वृत्तपत्रांचे कागद डकवून केलेली कोलाजेस, बटणे, दोरा, कापडाचे तुकडे इत्यादींचा वापर हे त्याने शिल्पकलेसाठी जी कन्स्ट्रक्शन्स केली, त्याचीच एका अर्थाने संक्रमणावस्था होती. सेरॅमिक डिशेसवर त्याने काढलेली चित्रे प्राथमिक रंग आणि रेषांचा कमीत कमी वापर असलेली आहेत. प्रदर्शनात असलेले शेळीचे शिल्प किंवा पाण्याची झारी आणि इतर शिल्पे विविधतापूर्ण आहेत.

प्रदर्शनातील रेखाचित्रे आणि मुद्राचित्रे हा विभाग पिकासोच्या रेषेची ताकद आणि प्रतिभाशक्तीचा उत्कट आविष्कार दोन्हीचा मिलाफ असलेल्या चित्रांनी परिपूर्ण आहे. व्होलार्द नावाच्या चित्रविक्रेत्याने पिकासोकडून काही मुद्राचित्रे तयार करून घेतली. धातूच्या पत्र्यावर उत्कीर्णन करून त्यावरून घेतलेली मुद्रिते म्हणजे ही मुद्राचित्रे. तरल काव्यात्म रेषा आणि काळ्या रंगाच्या विविध छटा यांचा सुयोग्य मेळ या चित्रांमधून दिसतो. ग्रीक मिथ्यकथांमधला बैलाचे धड असलेला मिनोटॉर हा या मुद्राचित्रांमधून आलेला आहे. कधी युवतींबरोबर क्रीडा करताना, कधी आंधळा बनून एका लहान मुलीचा आधार घेऊन चालताना, कधी आखाड्यात हतबल झालेला असा हा मिनोटॉर अनेक चित्रांमधून दिसतो. काही मुद्राचित्रांमध्ये चित्रकार आणि त्याचे मॉडेल असा विषय आलेला आहे. राहता राहिला अखेरचा कालखंड. मृत्यूच्या अखेरच्या क्षणापर्यंत पिकासो कार्यरत राहिला. या अखेरच्या काळातल्या असंख्य चित्रांपैकी काही चित्रे इथे बघायला मिळतात. 1970 साली काढलेले 'द फॅमिली' हे चित्र. 1972 मधील निसर्गचित्र यांमध्ये आधीच्या काळातील शैलीची वैशिष्ट्ये आढळतात पण ती परिपूर्ण वाटत नाहीत. व्यक्त होण्याची अनामिक उर्मी हाच त्यांचा प्रधान विशेष आहे. आकाराने मोठी असली तरी ती प्रभावित करीत नाहीत. मात्र चित्र कोणतेही असो; पिकासोचे झपाटलेपण त्यातून व्यक्त झाल्याशिवाय राहात नाही.

सर्वोत्तम कलाकृती

'मेटॅमॉर्फोसिस' प्रदर्शनातील चित्रे ही पिकासोच्या असंख्य चित्रांपैकी केवळ एक अंश आहेत. त्याच्या चित्रांची प्रदर्शने जगभर कुठे ना कुठे चालूच असतात.  1980 मध्ये न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पिकासोच्या सुमारे एक हजार कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते आणि जवळपास दहा लाख लोकांनी ते पाहिले. कलाकृतींची उपलब्धता, क्यूरेटरचा निवडीमागचा दृष्टिकोन आणि अशा प्रदर्शनांसाठी लागणाऱ्या व्यावहारिक गोष्टींची उपलब्धता यामुळे या प्रदर्शनांना मर्यादा पडतात. आपल्यासारख्या विकसनशील देशात तर विशेषच. म्हणूनच पिकासोच्या या प्रदर्शनात नसलेल्या, पण पिकासोचे प्रतिभावंत म्हणून कलेच्या इतिहासातील स्थान निश्चित करणाऱ्या काही कलाकृतींचा इथे उल्लेख केला पाहिजे. पिकासोने सर्वोत्तम कलाकृती निर्माण केल्या त्या मुख्यतः 1907 ते 1917 या दशकात. ‘ले दम्वाझेल दाव्हियाँ’ हे क्रांतिकारक चित्र पिकासोने 1907 साली काढले. त्यात स्वतःच्या देहाचे प्रदर्शन करणाऱ्या पाच स्त्रिया दाखवलेल्या होत्या. वेश्या वस्तीतील स्त्रिया चित्रविषय म्हणून निवडणे यात चित्राचे क्रांतिकारकत्व नाही. ते पिकासोने ज्या पद्धतीने रंगवले ती शैली अधिक धक्कादायक होती. त्याच्या चित्रकार मित्रांनी ते प्रथम पाहिले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काहीतरी भयंकर पाहिल्याची आणि उपहासाची होती. पण हळूहळू, पिकासोने त्यात वापरलेले बदलते परिप्रेक्ष्य असलेले घनवादाचे तंत्र, आफ्रिकन मुखवट्यांचा केलेला वापर, फळांच्या स्थिरचित्रातून साधलेली प्रतीकात्मता यांच्यातील अर्थपूर्णता प्रस्थापित झाली. आजही हे चित्र प्रथमदर्शनी तिरस्कार निर्माण करते; पण नंतर त्यातील कलेचे संचित, कथन पद्धतीतील वैशिष्ट्य आणि आधुनिक कलेमागच्या प्रेरणा आपल्या लक्षात येऊ लागतात.

पिकासोची दुसरी अशीच महत्त्वाची कलाकृती म्हणजे 'गेर्निका'. स्पेनची यादवी आणि फ्रैंकोने चालवलेला निर्दय सत्तासंघर्ष यात स्पेनमधील गेर्निका हे छोटे गाव बेचिराख झाले, त्याची पार्श्वभूमी या चित्राला लाभलेली आहे. सव्वीस फूट लांब आणि साडेअकरा फूट उंच अशा भव्य चित्रफलकावर काढलेले हे चित्र म्हणजे मानवी संहार, वेदना आणि त्यातही टिकून राहणारी विजिगीषू वृत्ती यांचा उत्कट आविष्कार आहे. पिकासोने त्यात केलेला करड्या रंगाचा वापर, बैलाचे मुंडके, घोडा, डोळा आणि विजेचा बल्ब इत्यादी प्रतिमा, चित्राचा पोत याबद्दल बरेच काही लिहिले गेले. या दोन चित्रांबरोबरच 'द थ्री म्युझिशियन्स' (1921) 'द डान्स' (1925) या चित्रांमदल्या प्रतिमांनी आधुनिक चित्रकलेची 'भाषा' घडवली. येणाऱ्या चित्रकारांसाठी ती कलेचे मानदंड ठरली. 'मेटॅमॉर्फोसिस' प्रदर्शन बघताना पिकासोच्या एकूण व्याप्तीचे हे भान ठेवणे आवश्यक आहे.

पिकासोच्या कलानिर्मितीतून त्याचे जे व्यक्तिमत्त्व प्रकट होते त्याला 'प्रोटिअन मोन्स्टर' म्हणजे बहुरूपी राक्षस असे म्हटले जाते. त्याने संस्कृतीची आणि सांस्कृतिक संघर्षाची कधी पर्वा केली नाही. त्याच्यामध्ये बालसुलभ आणि संहारक अशी प्रचंड ऊर्जा दडलेली होती. तिला कलेद्वारा मुक्त करणे हीच त्याची खरी प्रेरणा होती. प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेणे आणि मग त्या टाकून देणे, हे त्याच्या आत्मरत वृत्तीला साजेसे होते. म्हणूनच प्रत्येक माध्यम, प्रत्येक शैली त्याने आत्मसात केली, वाकवली आणि त्याची उपयुक्तता संपताच ती टाकून तो दुसऱ्या शैली वा माध्यमाकडे वळला. स्त्रियांच्या बाबतीतही त्याची वृत्ती पुरुषी वर्चस्वाची होती. त्याच्या आयुष्यात ज्या ज्या स्त्रिया आल्या, त्या एखादा अपवाद वगळता 'देवतांपासून पाय पुसण्यापर्यंत' वागवल्या गेल्या. पिकासोने स्वतःच्या कलेचे तत्त्वज्ञान कधी मांडले नाही. ते मांडले इतरांनी. पिकासोच्या व्यक्तिमत्त्वात अनेक विरोधाभास दडलेले होते. त्याच्या एकूण आविष्कारात एक विलक्षण रांगडेपण होते, पण त्याने जे जे केले ते उच्चभ्रू कलासमीक्षकांनी कलेचा उच्चतम आविष्कार म्हणून वाखाणले. त्याचा कलाविष्कार हा व्यक्तिगत निर्मितीच्या ध्यासातून झालेला होता पण तो आधुनिक कलेचा आविष्कार म्हणून प्रातिनिधिक ठरला. पिकासोच्या अंतरंगात असुरक्षिततेची भावना, मृत्यूबद्दलची भीती अशा अनेक गोष्टी दडलेल्या होत्या, पण त्यांचा आविष्कार करताना आपली प्रतिमा डागाळेल अशी भीती त्याला कधी वाटली नाही.

पिकासो अमूर्त चित्रशैलीच्या वाटेला कधी गेला नाही. त्याच्या चित्रांमध्ये वास्तवातल्या प्रतिमा अनेकदा येतात. सुरुवातीच्या काळात त्याच्या चित्रांमध्ये सर्कशीतील विदूषक, कसरती करणारे, सामान्य स्त्री-पुरुष यांचे चित्रण असे. नंतरच्या काळात ग्रीक, रोमन कलेतील अभिजाततेच्या खुणा, आफ्रिकन मुखवट्यांमधून आदिम कलेचे संस्कार आणि बैलाच्या चेहऱ्याचा सांगाडा, ‘मिनोटॉर’सारख्या प्रतिमा येऊ लागल्या. बुल फाईट्स अथवा बैलांच्या झुंजी हा स्पेनमधील लोकप्रिय आणि प्रातिनिधिक प्रकार. माणसामधील पाशवी शक्ती आणि आंधळी वासना यांचे प्रतीक म्हणजे वृषभाचे धड असलेला 'मिनोटॉर'. पिकासोने लैंगिक वासना आणि पाशवी शक्ती यांचा आपल्या कलेद्वारे जो आविष्कार घडवला त्याचे 'मिनोटॉर' हे उत्तम प्रतीक आहे. आयुष्यभर कामरत आणि कार्यरत राहिलेल्या पिकासोचे मिथ्यरूप म्हणजे मिनोटॉर असे म्हटले तरी चालेल!

आधुनिकतावादाची प्रखर जाणीव

'मेटॅमॉर्फोसिस' प्रदर्शनाच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात, ते असे. पिकासोच्या कलानिर्मितीची सामाजिक फलश्रुती काय? आणि भारतीय कलेच्या संदर्भात पिकासोच्या कलाविष्काराचे महत्त्व किती? विसाव्या शतकात वाङ्मयीन आणि कलाविषयक अभिरुचीत आमूलाग्र परिवर्तन घडून आले, ते घडविण्यात पिकासोचा महत्त्वाचा वाटा होता. हे परिवर्तन वैज्ञानिक संकल्पना, तंत्रज्ञानातील प्रगती, राजकीय सत्तांतर या सर्वच बाबतीत होणाऱ्या बदलांशी संबंधित होते. आधुनिकतावादाने संघर्षमय परिस्थितीत आशेचा किरण दाखवला; आणि निराशेचे तत्त्वज्ञानही बनवले. नीलोच्या तत्त्वज्ञानापासून ते काफ्फाच्या अतिवास्तव जगापर्यंत आणि हेमिंग्वेच्या रांगड्या भाषेपासून हे जेम्स जॉईसच्या दुर्बोध भासणाऱ्या भाषेपर्यंत कलेच्या क्षेत्रात पिकासोच्या चित्रांमध्ये आढळून येणारी भयप्रद आणि भंगलेली, कोमल आणि तरीही संस्कारांनी विरूप झालेली अशी वास्तवाची वेदना दिसते. हे वास्तव धीटपणे मांडण्याचे कार्य आधुनिकतावादाने केले.

प्रतिष्ठितपणाचा बुरखा बाजूला ठेवून जीवन आहे तसे स्वीकारणे आणि त्याच्या मुळाशी जाणे हादेखील आधुनिकतावादाचा एक प्रयत्न होता. त्यासाठी पर्यायांची अनेकता पिकासोसह सर्व आधुनिक प्रतिभावंतांनी स्वीकारली. जपानची मुद्राचित्रे, आदिम कलांचा आविष्कार, पौर्वात्य कलाविचार हा विविध पर्याय शोधण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग होता. म्हणजेच हा मेटॅमॉर्फेसिस सामान्य गोष्टीत अर्थ शोधणारा, तथाकथित परिपूर्णतेपासून खालच्या मूलस्रोतापर्यंत जाणारा असा होता. फुलपाखराचे सुरवंट होण्यात अधःपतन वा आकुंचन नव्हते तर आत्मशोधाचा तो एक मार्ग होता. भारतीय कलेच्या संदर्भात बोलायचे झाले तर पिकासोचे संस्कार इथल्या अनेक चित्रकारांनी घेतले. पण भारतीय कलाजाणिवेचा, तिच्या मूलस्रोताचा आधुनिकतावादाच्या नव्या जाणिवेने ज्यांनी प्रामाणिकपणे शोध घेतला तेच थोड्याफार प्रमाणात यशस्वी झाले. अन्यथा अंधानुकरण करणारे स्वतःचे स्वत्व गमावून बसले.

Tags: चित्रकार मेटॅमॉर्फोसिस चित्रशैली काफ्का अमूर्त पाब्लो पिकासो abstract painting Garnica Henry Moore Metamorphosis Picasso Deepak Ghare गार्निका हेन्री मूर मेटामॉर्फॉसिस पिकासो दीपक घारे साधना पिकासो अमूर्त चित्रकला चित्रकला weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके