डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एम.फिल.ला प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर गणपतने उमेद खचू न देता, विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला. त्याचवेळी खंडोजी वाघे, संदीप मराठे आणि मलाही पत्रकारिता अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्याने आमचा छान ग्रूप तयार झाला. उद्धवला काही कारणास्तव बाहेरगावी जावे लागल्याने खंडोजी गणपतला विद्यापीठातून रानडे इन्स्टिट्यूटपर्यंत सायकलवर डबलसीट घेऊन येत असे. एकदा ‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ उपसंपादक डी.आर. कुलकर्णी यांनी हे पाहिल्यानंतर, त्यांनी गणपतची सर्व माहिती जाणून घेऊन लोकसत्तामध्ये प्रसिद्ध केली. ती बातमी वाचून काही सुहृदांनी गणपतला तीनचाकी अँक्टिव्हा गाडी घेऊन दिली. याकरिता डी.आर.कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. पुढे दै.‘सकाळ’ने गणपतचा ‘सामान्यातील असामान्य’ हा पुरस्कार देऊन गौरव केला. विद्यापीठातील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी गणपतवर ‘पाऊलवाट’ ही डॉक्युमेंटरी/फिल्म बनवली. दरम्यानच्या काळात ‘सामना’, ‘लोकमत’ या वृत्तपत्रांमधूनही गणपतविषयी छापून आले. अपंगत्वावर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात करून गणपतने केलेल्या वाटचालीची चांगली दखल पुण्यातील प्रसारमाध्यमांनी घेतली.

अवघे दीड वर्षाचे वय असताना झालेल्या अपघातामध्ये उंचावरून पडल्याने ‘त्याचे’ दोन्ही पाय कायमचे अधू झाले. रांगत-रांगत चालायला शिकण्याचे ते वय, मात्र चालायला शिकण्याच्या आधीच नियतीने त्याचे पायच हिरावून घेतले. पामाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना इजा पोचल्याने कमरेपासून खालचा भाग निकामी झाला. त्यामुळे संपूर्ण आयुष्यच दुसऱ्यावर अवलंबून राहणार हे निश्चित झाले; पण लहानपणीच आलेल्या या अपंगत्वाने खचून न जाता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ‘त्याने’ जो प्रवास केला तो जितका रोमांचकारी आहे, तितकाच प्रेरणादायी आहे.

गणपत व्यंकट धुमाळे हे माझ्या या मित्राचे नाव. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातले ‘लोणी’ हे त्याचे गाव. घरामध्ये तीन भाऊ, दोन बहिणी, आई-वडील असे मोठे कुटुंब. आठ एकर जमिनीमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाची गुजराण चाललेली.

गणपतला चालता यावे यासाठी अनेक उपचार करून पाहिले, मात्र वैद्यकशास्त्राने हात टेकल्याने काही होऊ शकले नाही. दोन्ही पायांमध्ये काहीच ताकद नसल्याने ‘जयपूर फूट’ही बसविता आले नाहीत.

चुलतभावाच्या पाठुंगळीवर बसून गणपत शाळेला जाऊ लागला. बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने भावाच्या मदतीने गावातच पूर्ण केले. बारावीमध्ये गणपत कॉलेजमध्ये पहिला आला. मार्क्स चांगले मिळाल्याने त्याने डी.एड. साठी अर्ज केला. त्या प्रमाणे पहिल्याच यादीत त्याचा नंबरही लागला.  मात्र अपंगत्व जास्त असल्याने मुलाखतीच्या वेळी त्याला डी.एड. साठी प्रवेश नाकारण्यात आला. गणपतच्या बौद्धिक गुणवत्तेच्या समोर त्याचे शारीरिक अपंगत्व आडवे आले. या घटनेनंतर गणपतचे शिक्षण संपल्यातच जमा होते.

घरचे किराणा मालाचे दुकान सांभाळण्याची जबाबदारी गणपतवर आली. मनामध्ये शिकण्याची, मोठे होण्याची तीव्र आकांक्षा असली, तरी परिस्थितीपुढे त्याला झुकावे लागले होते. एक-दोन वर्षे अशीच गेली. गणपतचा लहान भाऊ उद्धव माने आयटीआयचा कोर्स पूर्ण केल्यानंतर बी.ए. करण्याचे ठरविले. बी.ए. करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी देगलूरला जावे लागणार होते. उद्धव बी.ए. करतो आहे हे ऐकून गणपतलाही आपले मध्येच थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्याची इच्छा झाली. त्याने घरच्यांकडे तसा हट्ट धरला. घरच्यांना तयार करून उद्धव व गणपत या दोघा बंधूंनी देगलूर महाविद्यालयात बी.ए. साठी प्रवेश घेतला. गणपतच्या आमुष्यातील हा टर्निंग पॉइंट म्हणावा लागेल; कारण

यानंतर गणपतने मागे वळून पाहिले नाही. महाविद्यालयात शिकत असताना खंडोजी वाघे आणि बसवंत डुमणे मा मित्रांशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीमध्ये झाले. चौघांनी मिळून देगलूरमध्ये रूम घेतली व ते एकत्र राहू लागले. महाविद्यालयात शिकत असताना गणपतच्या उपजत गुणांना चांगलेच धुमारे फुटत होते.  आपल्या विनम्र आणि गोड स्वभावामुळे धुमाळे बंधूंनी अल्पावधीतच सर्वांना जिंकले होते.

बी.ए. पूर्ण झाल्यानंतर रणखांब सरांच्या मार्गदर्शनानुसार गणपत, उद्धव, बसवंत, खंडोजी या चौघांनी पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात एम.ए. करिता प्रवेश घेतला. काहीतरी वेगळे करायचे या उर्मीनेच ते चौघे पुण्याला आले.

देगलूर महाविद्यालयात शिकत असताना केलेल्या वाचनामुळे त्यांना विविध विचारांची ओळख झाली होती. पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यानंतर या विचारांना दिशा मिळण्यास मदत झाली. येथील प्राध्यापक, मित्रमंडळी, अभ्यास वर्ग यामध्ये होणाऱ्या चर्चांमुळे चौघा मित्रांच्या विचारांना प्रगल्भता येण्यास मदत झाली.

रायगड येथे झालेल्या विचारवेध संमेलनामध्ये कॉ. विलास सोनवणे यांच्याशी या चार मित्रांचा परिचय झाला. यावेळी झालेल्या गप्पांमधून ‘सजग अभ्यास गटा’ची कल्पना पुढे आली. त्यामध्ये न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांच्या पाषाण येथील घरी आठवड्यातून एक दिवस अभ्यासवर्गासाठी भेटायचे ठरले. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी या अभ्यासवर्गाच्या निमित्ताने एकत्र जमू लागले. येथे ‘मार्क्सवादापासून ते अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्यापर्यंत’ अनेक विषयांवर साधक-बाधक चर्चा होत असे.

गणपतच्या जडण-घडणीमध्ये सजग अभ्यास गटाचा महत्त्वपूर्ण वाटा राहिलेला आहे. एकंदरीतच विद्यापीठातील पुरोगामी विचारांशी गणपतची नाळ जोडली गेली.

घरामध्ये वडील वारकरी असल्याने लहानपणापासून आध्यात्मिक विचारांचा पगडा धुमाळे बंधूंवर होता. कपाळावर गंध, गळ्यात तुळशीची माळ अशा रूपात या बंधूंनी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला होता. मात्र येथे सजग अभ्यास गटाच्या माध्यमातून पुरोगामी विचारांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप बदल झाला.

मी पुणे विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागात एम.ए. ला प्रवेश घेतला, तेव्हा गणपत एम.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. आम्हांला एक वर्षाने सिनिअर असणारे मित्र सजग अभ्यासगट चालवितात, याची माहिती मिळाल्यानंतर मीही सजग अभ्यासगटाच्या चर्चांमध्ये सहभागी होऊ लागलो. तिथे माझा गणपतशी जवळून परिचय झाला. कोणत्याही चर्चांमध्ये गणपत शांतपणे आपले मत मांडत असे. त्याच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या कायम हास्यावर आम्ही फिदा होतो. त्यामुळे आम्हा सगळ्यांना त्याच्याशी गप्पा मारायला नेहमी आवडत असे.

विविध विषयांतल्या चर्चांबरोबरच आमच्या अभ्यासातल्या अडचणी सोडविण्यासाठीही गणपत नेहमी पुढे असायचा. थिअरीमधल्या अनेक अवघड संकल्पना तो आम्हांला सोप्या मराठीतून समजावून सांगायचा. गणपतने शिकवलेले खूपच चांगल्या रीतीने समजायचे, त्यामुळे प्राध्यापकांचे लेक्चर संपले, कीनगणपतचा तास त्याच वर्गामध्ये सुरू व्हायचा.

एम.ए. पूर्ण झाल्यानंतर गणपत व उद्धवच्या हॉस्टेलची मुदत संपल्याने, ते दोघे भाऊ माझ्या रूमवर रहायला आले. त्यामुळे त्यांचा आणखीनच निकटचा सहवास लाभला.

एम.ए. नंतर गणपतने राज्यशास्त्र विभागात एम.फिल करिता अर्ज केला होता. अपंगाच्या कोट्यातून गणपत एकमेव विद्यार्थी असल्याने त्याचा एम.फिल. प्रवेश निश्चित होता. मात्र अनपेक्षितपणे राज्यशास्त्र विभागाने त्याला एम.फिल.ला प्रवेश नाकारला. हा निर्णय सर्वांसाठी धक्कादायक होता.

एम.फिल.ला प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर गणपतने उमेद खचू न देता, विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला. त्याचवेळी खंडोजी वाघे, संदीप मराठे आणि मलाही पत्रकारिता अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्याने आमचा छान ग्रूप तयार झाला. उद्धवला काही कारणास्तव बाहेरगावी जावे लागल्याने खंडोजी गणपतला विद्यापीठातून रानडे इन्स्टिट्यूटपर्यंत सायकलवर डबलसीट घेऊन येत असे. एकदा ‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ उपसंपादक डी.आर. कुलकर्णी यांनी हे पाहिल्यानंतर, त्यांनी गणपतची सर्व माहिती जाणून घेऊन लोकसत्तामध्ये प्रसिद्ध केली. ती बातमी वाचून काही सुहृदांनी गणपतला तीनचाकी अँक्टिव्हा गाडी घेऊन दिली. याकरिता डी.आर.कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. पुढे दै.‘सकाळ’ने गणपतचा ‘सामान्यातील असामान्य’ हा पुरस्कार देऊन गौरव केला. विद्यापीठातील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी गणपतवर ‘पाऊलवाट’ ही डॉक्युमेंटरी/फिल्म बनवली. दरम्यानच्या काळात ‘सामना’, ‘लोकमत’ या वृत्तपत्रांमधूनही गणपतविषयी छापून आले. अपंगत्वावर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात करून गणपतने केलेल्या वाटचालीची चांगली दखल पुण्यातील प्रसारमाध्यमांनी घेतली.

पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर गणपतला दै.‘पुढारी’मध्ये ट्रेनी उपसंपादक म्हणून नोकरी मिळाली.  नंतर ‘युनिक अँकॅडमी’मध्येही गणपत काम करू लागला. युनिक अँकॅडमीमध्ये 11 ते 5 अशी पूर्णवेळ नोकरी व त्यानंतर ‘पुढारी’मध्ये 6 ते रात्री 12 अशी अर्धवेळ नोकरी त्याने काही दिवस केली.

या व्यस्त दिनक्रमामधून अभ्यास करत गणपतने ‘सेट’ची परीक्षा दिली. अत्यंत कमी निकाल लागणाऱ्या सेटच्य़ा परीक्षेत राज्यशास्त्र विषयामधून तो उत्तीर्णही झाला. गणपतच्या सेट उत्तीर्ण होण्याने एम.फिल.ला प्रवेश नाकारणाऱ्यांना सणसणीत चपराक बसली.

शैक्षणिक पातळीवरील गणपतच्या यशस्वी कामगिरी बरोबरच त्याची सामाजिक बांधिलकीही लक्षणीय आहे. सजग अभ्यास गटामुळे त्याची स्पष्ट वैचारिक बैठक तयार होण्यास मदत झाली होती. तेथे स्वीकारलेले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी गणपत सध्या राष्ट्रीम पातळीवरील ‘युवाभारत’ या संघटनेच्या माध्यमातून काम करीत आहे. युवा भारत ही देशभरातील विविध प्रश्नांवर लढे उभारणारी संघटना आहे. डाऊ प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन, उजनी जलाशयातील परप्रांतीय मच्छीमारांच्या विरोधातील आंदोलन, मीरा-भार्इंदरमधील कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलने ही या संघटनेने महाराष्ट्रात उभारलेली प्रमुख आंदोलने आहेत. या संघटनेचे मुखपत्र असलेल्या ‘सकल’ या नियतकालिकाची जबाबदारी सध्या गणपत सांभाळत आहे. संधीअभावी खितपत पडलेल्या अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘युवा भारत’च्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गणपतची इच्छा आहे.

महाविद्यालयात नोकरी मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागण्याच्या काळात जळगावच्या ‘एम.जे. लॉ कॉलेज’ने एकरुपयाही न घेता, केवळ गुणवत्तेच्या आधारावर गणपतला नोकरी दिली आहे. नुकताच (डिसेंबर महिन्यात) तो नोकरीवर रुजूही झाला आहे. ज्याला अपंगत्वाचे कारण पुढे करून डी.एड.ला प्रवेश देण्यासही नकार देण्यात आला होता, तोच गणपत आता उद्याच्या वकिलांना राज्यशास्त्र शिकवू लागला आहे.

अनेक लोक धडधाकट शरीर, सर्व सुखसुविधा मिळाल्या असतानाही व्यवस्थेच्या वा परिस्थितीच्या नावाने बोटे मोडत असतात. पण प्रतिकूल परिस्थितीलाही झुकवून यशस्वी होता येते, हे गणपतने दाखवून दिले आहे.

गणपत, वुई सॅल्यूट यू.

(पुणे विद्यापीठातून एम.ए. राज्यशास्त्र झालेला सोलापूर येथील दीपक जाधव, सध्या दै.‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीसाठी पत्रकार म्हणून काम करीत आहे.)

Tags: पत्रकार दीपक जाधव मार्गदर्शक उच्चशिक्षित अपंगत्वावर मात आय़ुष्यकथा  जीवनदर्शन उच्चशिक्षण दिव्यांग प्राध्यापक प्राध्यापक गणपत धुमाळे life journey Lifestory SET qualified intelligent   Ganapat Dhumale Journalist. Writer deepak jadhav highly educated disable fight against disability warrior Proffesor Ganpat Dhumale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके