भाऊ हे जन्मजात खेळाडू आहेत. लोकमान्य टिळकांना एकदा कोणी विचारले होते, ‘हिंदुस्तानला स्वराज्य मिळाल्यावर तुम्ही काय कराल?’ टिळक म्हणाले, ‘मी गणिताचा प्रोफेसर होईन.’ भाऊंना तोच प्रश्न विचारला तर ते म्हणतील, ‘मी माझे जीवन खेळात घालवीन.’ भाऊंच्या जीवनातून खेळ काढून टाकलात तर भाऊ जगणार नाहीत निदान फार दिवस जगणार नाहीत..
एके दिवशी दुपारी रत्नागिरी जेलमध्ये गडबड उडाली. ब वर्गाचा कोणीतरी बडा पाहुणा येणार अशी कुजबुज सुरू झाली. कोणी वल्लभभाई येणार, कोणी जमनालाल येणार, अशी आपापल्या कल्पनेप्रमाणे चित्रे रंगवली; पण तो सारी खोटी ठरली. आलेला पाहुणा बडा होता. पण तो राजकीय नव्हता. शेवटी त्या पाहुण्याचे दर्शन झाले. नाव कळले ‘पीर पगारो’, सात वर्षांची शिक्षा त्यांना झाली होती. त्यांचे वय तेव्हा (1930) 19 वर्षांचे होते आणि वजन 200-225 पौंड होते, पहिले दिवशी तो जेवलाच नाही. त्याच्या मापाचे जेलचे कपडे मुद्दाम करवावे लागले. रत्नागिरी तुरुंगातील भात खाणाऱ्या शिपायांपैकी दोघातिघांना तो सहज उचली आणि ते अगदी पोराप्रमाणे तो तुरुंगाची दारे गदगदा हलवी आणि असे वाटे की, ही दारे हा सहज उखडून टाकील. तो प्रथम आमच्यात मिसळत नसे. खोलीत रात्रं-दिवस ‘बिसमिल्लाह’चा जप करीत बसे. त्याला सिंधी भाषेशिवाय अन्य भाषाही येत नते. ‘समझी, समझी’, (समजलं का?) असे विचारी आम्हीही त्याची ‘बोडके समजलं’ अशी चेष्टा करीत असू; पण तो लवकरच आमच्यात रुळला.
पीर पगारो x भाऊ
एकदा आमचे भाऊ दुपारी बुद्धिबळे खेळत होते. अर्थात् ते चोरूनच, कसले तरी ठोकळे तयार करायचे आणि कोणाला राजा, कोणाला वीर, कोणाला हत्ती वगैरे नावे द्यावयाची. भाऊ म्हणजे पट्टीचे खेळणारे. त्यांचा पराभव करील असा वीर आमच्यात कोणी नव्हता. पण हा ‘सतरंज’ पहात पीर पगारो उभा राहिला. आणि त्याने त्या खेळात भाग घेऊन भाऊंना पराभूत केले. बोलता बोलता पराभूत केले. भाऊंची मात्रा पीर पगारोपुढे चालेना. जे बुद्धिबळे खेळणारे होते, त्यांना भाऊचा पराभव झालेला पाहून आनंद वाटला. शेराला सव्वाशेर मिळाला म्हणजे दुबळ्यांना आनंद वाटतो. तसा तो आनंद होता म्हणा! पण पीर पगारो उत्तम खेळाडू होता. त्याने आपल्या मोडक्या भाषेत आम्हाला सांगितले की, मी आठ-आठ जणाबरोबर एकदम खेळतो आणि प्यादी क्षणाचाही विचार न करता टाकीत असतो. ते खरे असेल; पण भाऊंना मात्र त्यांनी पुढे हे पराक्रमी पीर हुराचे पुढारी झाले व त्यांना तडकाफडकी फाशीही दिले.
भाऊविना खेळ कसला?
भाऊ हे जन्मजात खेळाडू आहेत. लोकमान्य टिळकांना एकदा कोणी विचारले होते, ‘हिंदुस्तानला स्वराज्य मिळाल्यावर तुम्ही काय कराल?’ टिळक म्हणाले, ‘गणिताचा प्रोफेसर होईन.’ भाऊंना तोच प्रश्न विचारला तर ते म्हणतील, ‘मी माझे जीवन खेळात घालवीन.’ भाऊंचे सारे जीवन हे क्रीडामय आहे आणि त्यांनी आपल्या जीवनाचाही खेळ (खेळ- खंडोबा नव्हे) केला आहे. गांधी जसे म्हणत माझ्या जीवनातला परमेश्वर काढून टाकलात, तर मी जगणार नाही!’ तसे भाऊंच्या जीवनातून खेळ काढून टाकला तर भाऊ जगणार नाहीत, निदान फार दिवस जगणार नाहीत.
भाऊ हे देशी विदेशी खेळात चांगले निष्णात आहेत. मैदानी खेळ ते जितक्या सफाईने खेळतात तितकेच बैठे खेळही सफाईने खेळतात. टेनीस, व्हॉलीबॉल, हुतुतू, विटी-दांडू, लंगडी, कुस्ती, ब्रीज, बुद्धिबळे वगैरेत त्यांचे क्रीडापटुत्व असामान्य आहे. ते आता साठीच्या घरात आले आहेत. पण त्यांचा उत्साह अद्याप दुर्दम्य आहे. रात्री बेरात्री उठवून त्यांना खेळायला चला म्हटले तरही भाऊ नाही म्हणणार नाहीत. या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते तरुणात जितके प्रिय आहेत तितके पुढारलेल्या वयाच्या लोकात प्रिय नाहीत. त्यांचे बसणे, हसणे, खेळणे हे तरुणात अधिक. आणि तेथे त्यांचे ते अरेजारे म्हणून बोलणे, तरुणांनी भाऊंची टिंगल करणे आणि भाऊंनी त्यांना हासडणे हा देखावा पाहिला आणि संवाद ऐकला म्हणजे भाऊ किती प्रेमळ आहेत याची कल्पना येते. खरा खेळाडू हा कधी रागावत नाही आणि कोणाच्याही द्वेषाला पात्र होत नाही. पण भाऊ रागावतात आणि माझ्या माहितीप्रमाणे काहीजण त्यांचा द्वेषही करतात.
नारोशंकरी आवाज
पण भाऊंचा राग हा नेहमीच समुद्रावर वाऱ्याने निर्माण होणाऱ्या लघुलहरीप्रमाणे उथळ असतो. त्याला वास्तविक रागावणे म्हणावे की नाही याबद्दल मी साशंक आहे. त्याला ‘उच्चैः ख’ म्हटले तर चालेल. मी त्याला देशी शब्द मुद्दामच वापरत नाही. भाऊ असे रागावले म्हणजे त्यांची बोबडी वळते. त्यांचे नाक, तोंड आणि कपाळ यातूनही तो राग ओसंडू लागतो. पण हे किती क्षणिक! दुसऱ्या क्षणाला भाऊ हसताना दिसतील. रागाचे पटल यायला आणि ते नाहीसे व्हायला विलंबच लागत नाही. हा रागाचा पारा चढला म्हणजे भाऊंच्या आधीच नारोशंकरी आवाजात अधिक भर पडते आणि सारे आवार जणू काय कोठे खून झाला किंवा आग लागली अशा थाटात गर्जू लागते. काय आहे याची चौकशी करावी तो भाऊ बोलताहेत असे समजते आणि मग सारे किरकोळ आहे म्हणून सोडून द्यावे लागते. खेळताना भाऊ आपल्या बाजूच्या भिडूवर जास्त रागावतील चुकीचे पान टाकले किंवा चुकीचा ‘कॉल’ (ब्रीजमध्ये) दिला तर भाऊ आकाश पातळ एक करतील, सारे घर डोक्यावर घेतील आणि गडबडीच्या मोठ्या आवाजात शास्त्रीय पद्धतीने साऱ्या खेळाने विवेचन करतील. याचे कारण ते खेळात गंभीर असतात. गांभीर्याने खेळायचे, नाहीतर खेळूच नये अशी त्यांची वृत्ती आहे आणि ती खरी आहे. त्यांना रागवायला लावणे हाही एक आमच्यातील काही लोकांचा उपद्व्याप होता. भाऊ खेळत नसले म्हणजे खेळ जसा मिळमिळीत, तसे भाऊ रागावले नाहीत म्हणजेही वेळ मिळमिळीत वाटायचा.
क्रीडाक्षेत्रातील पराक्रम
भाऊसाहेब डेक्कन कॉलेजातून बी.ए. झाले. याचा अर्थ इतकाच की त्यांची सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी होती. कॉलेजात आणि विशेषतः डेक्कन कॉलेजात मित्रपरिवार कसा जडतो व आजन्म कसा टिकतो हे सांगायला नको. त्यांना काही प्रेमळ मित्राचा लाभ झाला आहे. कॉलेजात असताना भाऊंचा वेळ शरीर सुदृढ करण्यात गेला. त्यांनी खूपच मेहनत केली आहे. ते मूळ सांगली कोल्हापूर कडचे राहणारे. त्यामुळे व्यायामाचे बाळकडू त्याना मिळाले असले तर नवल नाही. डेक्कन कॉलेजात असणारे विद्यार्थी हे सामान्यतः श्रीमंत व व्यायामविरोधी असतात अशी समज आहे. भाऊ त्याला अपवाद होते. त्यांनी या क्रीडाक्षेत्रात किती पराक्रम केले, किती पेले आणि ढाली मिळावा याची मात्र कल्पना नाही. एकदा डेक्कन कॉलेजात असताना त्यांनी तेथील ‘बोटे’ पाण्यात सरळ केल्याचा विक्रम ऐकिवात आहे. तसेच समर्थ विद्यालयात असताना त्यांनी एका बेफान झालेल्या या माणसाला पकडून हाकून दिल्याचे ऐकून माहीत आहे. त्यांचे स्नायु सारे शरीर चांगले पीळदार व मजबूत आहे. आता त्यातले सौष्ठव नाहीसे होत चालले आहे ती गोष्ट वेगळी.
समर्थांची स्फूर्ती
लहानपणापासून त्यांच्यावर रामदास, शिवाजीचा आणि स्वदेशी राष्ट्रीय शिक्षणाचा पगडा बसला. आणि मग हा तरुण थोडाच सरकारी नोकरीत जातो! विजापूरकरांवर त्यांची भारी श्रद्धा. राष्ट्रीय शिक्षणात आपण आपले आयुष्य वेचावे असे त्यांनी ठरविले आणि त्या बरोबरच विवाह न करण्याचेही त्यांनी ठरविले. रामदासस्वामींप्रमाणे ‘शहाने करूनि सोडावे सकळ जन’ ही त्यांनी दीक्षा घेतली आणि आर्थिक व प्रापंचिक मोहाचा त्याग करून जीवनाला सुरुवात केली. वैवाहिक जीवनापासून अलिप्त असल्याच्या आयुष्यात एक प्रकारचा रुक्षपणा येतो, एककल्लीपणा येतो आणि पूर्वीची ताठरता जात नाही, तडजोडीची वृत्ती ही अशा जीवनात दुर्मिळच असते; पण पुष्कळांना अविवाहित जीवनात स्वतःच्या नसले तरी नातलगांच्या योगक्षेमाची विचारपूस करणे हे अटळ असते. किंबहुना अशा प्रपंच नसल्यामुळे अन्य नातेवाईक प्रापंचिक त्याच्यावर अधिक एक सांगू लागतात. अविवाहिताचे समाजात राहाणे आणि अविवाहिताचे अरण्यात राहाणे यात फार फरक असतो. जो अरण्यात गेला तो खरोखरच मुक्त झाला.
संन्याशाचा संसार
पण जो राष्ट्राच्या प्रपंचाकरिता स्वतःला सुटसुटीत ठेऊ इच्छितो, त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या कमी होत नाहीत. दुसऱ्यांचे दुःखे ती आपलीच दुःखे, दुसऱ्यांचे दारिद्र्य, आपले दारिद्र्य अशी वृत्ती राष्ट्रकार्यात काम करणाऱ्यांची होते. भावनाचा तर परिणाम अशा कार्यकर्त्यांवर होणार नसेल तर त्याला सार्वजनिक कार्यच करता येणार नाही. किंबहुना प्रापंचिकाना दुःखे वाटतात ती अप्रापंचिकाना अश्रू ढाळावयास लावतात, आणि त्यात त्यांची कठोरता, त्यांचा ताठरपणा हा सारा लुप्त होतो. शिवाय, नाही म्हटले तरी दैव जीवनात असा एक घटक आहे की त्याच्यापुढे जातोच येत नाही. ते देव प्रपंचाच्या विस्तारावर किंवा संकोचावर थोडेच अवलंबून असते? याचा प्रभाव हा पडतच असतो. त्यामुळे अंगीकृत कार्यात सुख होणे, दुःख होणे, मऊ होणे, ताठर रहाणे, समाधान वाटणे अगर असमाधान वाटणे, यश, कीर्ती लाभणे अगर न लाभणे हे या परिस्थितीवर अवलंबून न राहाता, तत्त्वज्ञानप्रधान वृतीवर अवलंबून राहाते. कधी-कधी प्रापंचिकापेक्षा अप्रापंचिक हा अधिक दुःखी असतो, त्याला कारण तत्त्वज्ञानप्रधान वृत्तीची उणीव हेच होय. याला ही प्रवृत्ती लाभली त्याला प्रपंचात नित्य दुःखे अनुभवावी लागत असूनही त्याची चित्तवृत्ती स्थिर राहाते आणि तो राष्ट्राचा संसार घरच्या संसारापेक्षाही जास्त आत्मियतेने हाकत असतो. अविवाहित हा राष्ट्राच्या उद्धाराकरिता जर अविवाहित राहात असला तर त्याला संसार नसतो असे कसे म्हणून चालेल! उलट त्याचा संसार जगव्याळ असतो आणि मग या संसारातील सुखदुःखे टक्केटोणपे त्याला खावेच लागतात.
श्री. भाऊसाहेब रानडे यांना स्वतःचा संसार नाही हे खरे आहे. पण भावांचा संसार त्यांच्यापुढे होता, मातोश्रीही अवलंबून होत्या, कुटुंबांतील बऱ्या-वाईटाच्या परिणामाची झळ त्यांनाही लागत असे. पण भाऊ हे विवेकी असल्यामुळे अशा जबाबदाऱ्यापासून अलिप्त असतात व त्याचा हर्षखेदही मानीत नाहीत. म्हणूनच त्यांची खेळाडू वृती व प्रफुल्लता टिकली आहे.
गुरुशिष्यांतील जिव्हाळा
भाऊसाहेबांच्या समर्थ विद्यालयात 1920 सालपर्यंत होते. 10/12 वर्षे त्यांनी तेथे काम केले व मुख्य अध्यापकांच्या जागेपर्यंत ते चढले. या मुदतीत समर्थ विद्यालयाची झोळी काखेत घालून त्यांना भिक्षाटन करावे लागले आणि ते सर्व हिंदुस्तान हिंडले या त्यांच्या कारकिर्दीत ते बरेच यशस्वी झाले असे वाटते. संस्था तर त्यांनी चालवलीच पण स्वतःवर अनुरक्त असणारा असा एक विद्यार्थी वर्ग त्यांनी तयार केला. बौद्धिकदृष्ट्या त्या विद्यार्थ्यावर भाऊंनी पुष्कळच संस्कार केले असतील. पण शारीरिकदृष्टया आणि चारित्र्याच्या दृष्टीने भाऊंची कामगिरी विशेष आहे. ते आपल्या विद्यार्थ्यांशी इतके एकरूप होऊन जात की तेथे गुरुशिष्य संबंध संपे आणि बरोबरीचे नाते निर्माण होई. त्या निमिताने घरोबाही वाढे. भाऊ हे त्यांच्या विद्यार्थ्यांनाच काय पण विद्यार्थ्यांच्या घरातील मंडळीना आपल्यापैकी एक वाटतात. त्या विद्यार्थ्यांच्या घरातील मुला-मुलींना भाऊ पहाटे अंथरुणातून बाहेर ओढतील, ती रडत असतानाच त्यांना घेऊन पोहायला जातील, सायकलवर बसायला शिकवतील. यामुळे एकप्रकारचा अतूट जिव्हाळा निर्माण होतो. तरुण पिढी सशक्त, सुदृढ व निरोगी झाल्याशिवाय राष्ट्राचा तरणोपाय नाही असे भाऊंना मनापासून वाटते. पाण्याची पितर राष्ट्राचा उद्धार काय करणार त्यांचे म्हणणे खरे आहे.
समर्थ विद्यालयात असताना त्यांनी आपला विद्यार्थीगण घेऊन निरनिराळ्या किल्ल्यांवर पाय स्वाऱ्या केल्या. सायकलीवरील त्यांची पर्यटन कमी संस्मरणीय नाहीत. भाऊंना तरुण पिढी तयार करण्याला समर्थ विद्यालयाचे क्षेत्रे अनुकूल होते. पण तेथील स्पर्धा, कटकटी वगैरेना कंटाळून त्यांनी त्या संस्थेचा अनिच्छेनेच त्याग केला.
1929 साली भाऊसाहेबांची व माझी गाठ प्रथम लाहोर काँग्रेसच्या तंबूत पडली. त्यांच्या डोक्यावर खादीचा भला जंगी रुमाल होता, अंगात जाड धाबळीचा कोट होता आणि खिशात आक्रोड, पिस्ते वगैरे लाहोरला मिळणारा मेवा होता. ह्या खाऊपासून भाऊंची ओळख झाली व ती 1930च्या लढ्यांत खूपच वाढली. भाऊ शिरोड्याच्या लढ्याचे दुसरे सेनापती होते आणि त्यांना पकडताच मी त्या जागी गेलो. शिरोड्याच्या लढ्यात भाऊंचे समर्थ विद्यालयीन वीर हे खरोखरच अद्वितीय होते.
भाऊंची जीवनदृष्टी
मिठाचा सत्याग्रह संपल्यानंतर भाऊ महाराष्ट्र प्रांतिकचे चिटणीस म्हणून निवडले गेले. सेनापती बापट हे अध्यक्ष होते. ही अध्यक्ष चिटणीसांची जोडी खूपच हिंडली व तिन खूपच काम केले. भाऊ हे मताने काय आहेत हे सांगण्यापेक्षा ते काय नाहीत हे सांगणे जास्त सोपे आहे. ते संपूर्णतया गांधीवादी नाहीत, तसेच समाजवादी नाहीत किंवा बापटवादीही नाहीत. पण त्यांना बापटांमधील निर्भय वृत्ती, समाजवाद्यांमधील तारुण्य-सुलभ उत्साह आणि गांधीवाद्यांमधील निष्ठा ही मान्य आहे. पण याच त्यांच्या विवेचक वृत्तीमुळे ते सर्वांचेच आहेत, कोणाचेच नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज काल राजकारणात संयम व शिस्त याला फार महत्त्व आले आहे आणि ते स्वाभाविकही आहे. मूठभर शिस्तीचे लढवय्ये हे पसाभर बेशिस्त लोकांपेक्षा जास्त पराक्रम करू शकतात. त्यामुळे राजकारणाला धर्मकारणाप्रमाणे सांप्रदायिकपणा येतो पण तो अटळ आहे. गांधीवादातील वर्गसमन्वय, समाजवादातील वर्गसंघर्ष आणि दहशतवादातील हिंसा यांचे गाठोडे कोणी कितीही कौशल्याने बांधू लागला तरी ते बांधले जाणार नाही. अन्य पक्षातील तत्त्वाबद्दल अगर आचाराबद्दल गुणग्राहकता असे निराळे आणि त्या त्या विशिष्ट गुणांशी समरस होणे निराळे त म्हटले तर भाऊ हे कडक शिस्तीने आहेत. एकदा ठराव झाल्यावर त्याप्रमाणे वागण्यात त्यांच्याकडून अणूभरही चूक होणार नाही. पण विशिष्ट तत्त्वज्ञानाशी संपूर्णतया समरस अशी त्यांची वृत्ती नाही.
सत्तेची आसक्ती नाही
महाराष्ट्र प्रांतिकची चिटणिशी सुटल्यावर ते सर्वस्व सेवा कार्य करीत राहिले आहेत. गेली दहा-बारा वर्षे त्यानी दुसरे काम केलेच नाही. या कार्याबद्दल त्यांना तळमळ व आत्मीयता आहे. डॉ. हार्डिकरांच्या हिंदुस्तानी सेवा दलापासून तो आजच्या राष्ट्रवादापर्यंतची सारी सेवा दलाची चळवळ भाऊंनी हाताळली आहे. ते मानाचे अधिकाराचे हव्यासी नसल्यामुळे आपल्याला दलाने प्रमुख नेमले पाहिजे असा त्यांचा आग्रह कधीही नसतो. पुरुष म्हणून काम करताना त्यांना जितका आनंद वाटतो, तितका दुय्यम म्हणून काम करताना वाटतो. अर्थात् एखादे वेळी त्यांच्या मनाचा खोल कप्पा उघडला व नाजुक हळुवारपणे तो तपासला तर थोडी मानवसुलभ नाराजी त्यात सापडेल, पण ती कार्याच्या आड कधीही येत नाही. हीच तर मनुष्य स्वभावाची मौज आहे. सामान्य व्यक्ती व अलौकिक व्यक्ती यांच्यातला हा फरक कसा नाकारता येइल? अलौकिक व्यक्तिनाही कुठे मान अपमान खटकत नसतो असे नाही. मात्र ते खटकणे पहायला क्ष किरणाइतके प्रखर किरण लागतात. काही मोठ्या व्यक्तीला हा असंतोष इतक्या घाणेरडेपणाने व्यक्त होतो की, त्याची शिसारीच येते. आणि काही व्यक्ती इतक्या हुर असतात की, त्या तो असंतोष सफाईदारपणे लपवून टाकतात.
बहुमोल सेवा
भाऊंनी सेवा दलात किती काम केले हे निवेदन करण्याचे स्थळ नव्हे. पण एवढे मात्र निश्चित सांगता येईल की, त्यांची सेवा बहुमोल आहे व ती चिरस्मरणीय राहील. सेवा दल किती यशस्वी झाले याचे मोजमाप लावता येणार नाही. इंग्रजीत असे म्हणतात की, Good is the enemy of the better चांगले अधिक चांगल्याचे वैरी असते. अमुक काम चांगले आहे, असे अधिक चांगले का नाही हे सांगता येणार नाही. तेव्हा सापेक्षता हा जीवनातील सिद्धान्त सर्वत्रच लागू होतो. कित्येक वेळा सापेक्ष हे निरपेक्षापेक्षा अधिक चांगले ठरते. सापेक्षाचा व्याप व व्यवहार्यता ही निरपेक्षापेक्षा अधिक स्वीकार्य वाटते. तेव्हा अमुक कार्य किती यशस्वी झाले हे परिस्थिती वरून अजमावावे लागते. या हट्टीने विचार केला तर राष्ट्रवादलाने चांगले कार्य चालविले आहे असेच म्हणावे लागते.
भाऊ सेवा दलात सर्व कामे करू शकतात. ते ड्रील, लाठी, सर्वांग सुंदर व्यायाम, खेळ घेऊ शकतात, बौद्धिकाचे वर्ग चालवतात आणि सर्वांत जास्तीत जास्त धडपड करतात. बांधकाम करायचे असो, जमीन कसायची असो, पाणी आणायचे असो, भाऊंची तडफड विलक्षण. असा तडफडीचा माणूसच पहायला मिळणे कठीण. ते स्वतः विश्रांती घेणार नाहीत किंवा दुसऱ्याला विश्रांती घेऊ देणार नाहीत. अशा कळकळीशिवाय मोठाली कामे होतच नाहीत. भाऊंना फक्त स्वयंपाक करता येत नाही. तेथे मात्र भाऊंची फजिती होते..
भाऊंच्या उग्रतेत व कठोरपणात मृदुपणा दडलेला असतो, तो मृदुपणा फार लवकर व्यक्त होतो. जरा थोडासा विनोद केला की, खरे भाऊ बाहेर पडतात. किंबहुना त्यांचे रागावणे हि विनोदाचे वाटते. आरंभी त्यांच्या गैरसमज होऊ शकतो, पण पुढे मात्र तो गैरसमज टिकू शकत नाही.
निद्रा निष्ठुर असते
भाऊ हे एक चांगले वाचक आहेत. पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे व त्यांना वेड आहे. मराठी काव्य, नाटक, लघुकथा, दीर्घकथा प्रबंध निबंध हे तर ते वाचतातच; पण इंग्रजीतील चांगले चांगले ग्रंथ वाचायचे ते सोडीत नाहीत. मूळचा शिक्षकाचा पेशा सैनिकांच्या व्यवसायात सुटलेला नाही. कित्येक वेळा भाऊंची मोठी मौज होते. ते काम करून दमलेले असतात आणि वाचनाचा मोह तर सुटत नाही. तेव्हा ऐटीने ते पुस्तक वाचावयास सुरुवात करतात आणि वाचता वाचता झोपी जातात. मग मध्येच दचकून सावध होतात, पुन्हा पान दोन पाने वाचतात आणि पुन्हा शारीरिक थकव्याला बळी पडतात. सभा चालू असताना असेच होते. विषय जर त्यांच्यासंबंधी नसला तर भाऊ घेत असलेले हटकून आढळावयाचेच. एखादा अभ्यास चालू असला तर तेथेही हाच प्रकार होतो. त्यांना याची जाणीव असते पण शारीरिक श्रमाला त्यांच्या जीवनात अधिक प्राधान्य असल्यामुळे असे प्रकार घडू शकतात.
हा भटक्या सुधारतच नाही
भाऊंच्यात मला चीड येणारी एक गोष्ट अली ते स्वतःच्या जेवणा-खाण्याबद्दलही आणि राहाण्या-सवरण्याबद्दल अत्यंत बेफकीर व अव्यवस्थित आहेत. त्याचे मूळ दारिद्र्यात आहे हे आम्ही ओळखतो व त्याबद्दल त्याची कीवही करतो. कोणा तरी मित्राकडे राहावयाचे. जे काय मिळेल ते खायचे आणि जेथे जागा सापडेल तेथे झोपायचे अशी त्यांची सवय आहे. शरीर कितीही बळकट असले तरी अशा या धबडग्यात ते बिचारे किती दिवस टिकणार? निसर्ग हा क्रूर शत्रू आहे. तो कोणाचाही मुलाहिजा ठेवीत नाही व संधी सापडेल तेव्हा सूड घेतल्याशिवाय रहात नाही. आम्ही अनेक वेळा भाऊंना त्याबद्दल बोलतो. त्यांना ते पटतेही पण ते अद्याप सुधारत नाहीत. त्याला एक कारणही आहे. त्यांचे जीवन इतर राष्ट्रीय कार्यकर्त्याप्रमाणे नोमॅडिक (भटके) आहे. आज येथे पळ आणि उद्या तेथे धाव अशा धावपळीच्या जीवनाला स्थैर्य कसे असणार? पण या धावपळीतून जे विश्रांतीचे क्षण सापडतात, त्यावेळी स्वतःची अशी एखादी झोपडी किंवा घरटे लागते की, जेथे मनुष्य सुखाने काही काळ घालवू शकेल. भाऊंना हे स्थळ सापडले नाही व त्यानी निर्माणही केले नाही. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दोन तीन वेळा तरी झाला. अॅनिमिया (रक्तनाश) ने त्यांना चांगलेच जर केले आणि आता ते शरिराशी दगा करू नये असे म्हणू लागले आहेत.
भाऊंचे जीवन असे खडतर आहे. पण त्यात ते सुखी आहेत. आमरण राष्ट्रसेवा करावी येईल त्या आपत्तींना धैर्याने, आनंदाने तोड द्यावे आणि हे सर्व कशाकरता केले तर राष्ट्राची गुलामगिरीतून मुक्तता होण्याकरता व स्वातंत्र्याचे मधुर दर्शन राष्ट्राला व्हावे म्हणून.
Tags: Satyagraha of Salt Tri. Rs. Devagirikar Bhausaheb Ranade मिठाचा सत्याग्रह त्र्यं. र. देवगिरीकर भाऊसाहेब रानडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या