डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मेघ:श्याम रेगे : विचारशीलाची जीवनसाधना

रसेल एकदा हटवादी आशावादाने म्हणाला होता, ‘‘'माझा विवेक मला वेगळंच सांगतो. परंतु माझी श्रद्धा व मानवता यातून तरून जाईल असं मला सांगते.’’  रेगे यांचीही आंतरिक श्रद्धा याच स्वरूपाची होती असे मला वाटते. त्या श्रद्धेच्या प्रकाशात त्यांची कृतिशील वाटचालही सुरू होती. दलित पँथर्सपासून सर्व डाव्या गटांशी त्यांचा संपर्क होता व त्या सर्वांना रेगेंविषयी प्रेमादर होता, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. प्रा. गं. बा. सरदार यांच्याखेरीज अन्य कोणाला महाराष्ट्रात हे भाग्य लाभले नाही.

‘‘ हा लेख मी लिहिला नसता. परंतु नरेंद्रने विचारल्यानंतर 'नाही' असे म्हणणेही मला उचित वाटेना. आता काही विचार केल्यानंतर असे वाटू लागले की, हा लिहिलाच पाहिजे आणि 'साधने’त तो विस्ताराने लिहिणे या प्रसंगी उचितही होईल. 'साधना' परिवारात त्यांना किती आदराचे आणि प्रेमाचे स्थान होते हे मला माहीत आहे.’’

रेगेंचा आणि माझा परिचय गेल्या सुमारे पाच दशकांचा. डेक्कन एज्युकेशन सोसायटीत सहकारी आजीव सदस्य म्हणून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये सहकारी म्हणून आणि या सर्व कालखंडात एरवीही निकटचे स्नेही म्हणून. वीस वर्षांपूर्वी माझा मुलगा प्रसन्न आणि त्यांची मुलगी चित्रा यांनी आपण विवाह ठरविल्याचे सांगितले, त्या वेळी आम्हां दोन्ही कुटुंबीयांना या आंतरिक जिव्हाळ्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद झाला. रेगे आपल्या अनेक व्यापांतून सवड मिळेल तेव्हा आपल्या सुगत, सुजन या नातवंडांना भेटावयास येत, राहत. तो त्यांचा विरंगुळा होता, आणि सुगत, सुजन यांना इतरांनी वाटून घेतल्यास राग येई; असा आनंद होता. रेगे गेल्याचे आकस्मिक वृत्त चित्रा, सुगत, सुजन यांनी ज्या जिव्हाळ्याच्या संयमाने सहन केले, त्यात रेगेंच्या व्यक्तिमत्त्वाचा स्पष्ट वारसा होता.

महाविद्यालयीन कार्यक्षेत्राखेरीजही आम्ही अनेक कार्यक्रमांत एकत्र असू. समाजप्रबोधन संस्थेच्या कार्यात ज्येष्ठांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात त्या काळात तिशीच्या अलीकडे-पलीकडे असलेल्या काही प्राध्यापकांचा गट कार्यरत झाला. यापैकी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात काही ठसा उमटवला. रेगे या गटाचे एक प्रमुख सदस्य होते. लेखन, चर्चासत्रे, परिसंवाद, शिबिरे, यांतून हे कार्य चाले. लवकरच पन्नालाल सुराणा, वसंतराव पळशीवर हेही या गटात सामील झाले. वसंतरावांचा विवाह सुमारे चाळीस वर्षांपूर्वी माझी बहीण वेणू हिच्याशी हैदराबाद येथे झाला. त्या वेळी रेगे व मंजुताई आवर्जून हैदराबादला आले होते. या सर्व स्नेहबंधनाच्या मागे एक भावनेचा प्रवाह होता तसाच वैचारिक समानतेचाही धागा होता, स्थूलमानाने सांगावयाचे तर हा धागा लोकशाही समाजवादाचा होता.

काही जण लोकशाहीचे आग्रही होते, काही जण समाजवादाविषयी अधिक उत्सुक होते, असे म्हणता येईल. परंतु सामाजिक न्याय, आर्थिक विषमतेचे निराकरण, लोकशाही स्वातंत्र्य, सर्वधर्म समभाव, मानवतावाद, यांचे मिश्रण असलेली अशी ही बैठक होती. हा वारसा समाजप्रबोधन संस्थेला श्री. शंकरराव देव, आचार्य भागवत, आचार्य जावडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडून मिळाला होता असे म्हणता येईल. समाजप्रबोधन संस्थेच्या ध्येयधोरणात या सर्वांचे प्रतिबिंब आहे व त्याचे प्रकटन श्री. शंकरराव देव यांनी सुरू केलेल्या ‘नवभारत’ मासिकाच्या एक ऑक्टोबर 1947 च्या अंकात आहे व ते आजही ‘नवभारत’ ची भूमिका म्हणून प्रत्येक अंकात देण्यात येते. त्यातील त्रिविध सूत्रे अशी :-

1. मानवाच्या व मानवी संस्कृतीच्या विकासास व उन्नतीस पोषक असे कार्य.

2. कोणत्याही विशिष्ट मताचा, वादाचा, पक्षाचा किंवा पंथाचा प्रचार करण्याचा हेतू नाही.

3. व्यक्ती-व्यक्तीमधील वैशिष्ट्ये व विचारस्वातंत्र्य यांचा विनाश न होता विकास व्हावा या दृष्टीनेच त्यांचे सहकार्य.

रेगे आणि आम्ही काही मित्र समाजप्रबोधन संस्थेच्या व 'नवभारत' मासिकाच्या कार्याकडे आकृष्ट झालो, त्यामागेही अशाच स्वरूपाची मनोधारणा होती. परंतु एकत्र येईपर्यंतचा प्रवास मात्र प्रत्येकाने स्वतंत्रपणे किंवा एखाद्या समवृत्तीच्या संघटनेतून केला होता. स्वतंत्रपणे या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचलेल्या सदस्यांमध्ये रेगे होते. यानंतरही आपला वैचारिक व कार्यशील प्रवास त्यांनी शेवटपर्यंत स्वतंत्रपणेच- परंतु या अनुषंगानेच केला. साधना परिवाराला त्यांच्याविषयी आत्मीयता होती हे मी सांगावयास हवे असे नाही. त्यामागचे बंध हे होते आणि ते दृढ होते. याला सर्व परिवार साक्ष आहे.

रेगेंचा हा प्रवास सरळ-साधा झाला असेल असे कोणाला वाटले तर ते मात्र खरे नाही. त्यांना त्यासाठी आर्थिकदृष्ट्यादेखील खूप सोसावे लागले, हे मला माहीत आहे. खूप म्हणजे खूपच. परंतु त्यांनी याविषयी एक चकार शब्दही कोणाकडे काढला नाही किंवा एका अक्षरानेदेखील त्याविषयी कधी माझ्याशी बोलले नाहीत. प्रारंभी एकदा मीच त्यांना अशा संदर्भात ‘‘मी तुम्हांला येथे ओढावयास नको होते,’’ असे म्हटले.
 

Tags: समाजप्रबोधन संस्था मे. पु. रेगे नरेंद्र दाभोलकर प्रासंगिक samaj prabodhan sanstha. m. p. rege narendra dabholkar incidental weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके