डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधना नक्षलवादावर विशेषांक काढत आहे याचा मला आनंद झाला व त्यात हे सर्व लिहावेसे वाटले. आजच्या परिस्थितीत सर्व बाजूंनी कोंडमारा होतो, त्यावेळी ती कोंडी फोडावी, मग त्यात शस्त्रबळाचा वापर करावा लागला तरी करावा अशी सामाजिक परिवर्तनासाठी मनोधारणा झाली तर त्यात दोष त्या परिस्थितीला दिला पाहिजे अशी माझीही धारणा आहे. विनोबाजी म्हणाले होते, “माझी जर आयुष्यावर श्रद्धा नसती तर मीही नक्षलवादीच झालो असतो.” या विधानाच्या कसोटीवर आपले जीवन तपासून पाहण्यास आजही कितीजण तयार होतील?

1971 साली बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर लादेशमधील आमच्या रोमहर्षक प्रवासात शिरुभाऊ लिमये, ग. प्र. प्रधान, दत्ता जगताप व मी असे चौघेजण होतो. बांगलादेशमध्ये होत असलेली क्रांती आम्ही डोळ्यांनी पाहिली. माणसांच्या कवट्यांच्या शेजारी माझे काही फोटोही आम्हांला मिळाले, ते नंतर बांगलादेशच्या आमच्या सफरीचा वृत्तांत लिहिताना केसरीने छापलेही. मी केसरीचा वार्ताहर या नात्यानेच बांगलादेशमध्ये जाण्याची परवानगी मिळवली होती.

ढाक्क्यात आमचा मुक्काम तेथील विद्यापीठातील भूगोल शाखेच्या प्रमुखाच्या घरी होता. मी तर ढाक्क्यात प्रत्यक्ष विद्यापीठाच्या आत पाहिलेल्या परिस्थितीचा संपूर्ण निरीक्षक होतो. त्यावेळी संपूर्ण विद्यापीठ व विद्याकेंद्रे, साहित्यसंस्था, वर्तमानपत्रे, ग्रंथालये, विचारवंत या सर्वांवरच आक्रमक पाकिस्तानी सैन्याचा हल्ला होता. त्याची पुष्कळच हृदयविदारक दर्शने मला घडली. सुदैवाने मी ज्या प्राध्यापकाकडे उतरलो होती तो वाचला होता व त्याने अशा सर्व गटांची व त्यांच्या प्रमुखांची प्रत्यक्ष भेटही घडवून दिली.

त्यातच डॉ.कमरुद्दीन हे नामांकित बंगाली वकील व विचारवंत होते. त्यांची सर्व स्थिती चांगली होती. प्रॅक्टिसही उत्तम होती. शेख मुजिबुर रहमान त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी अनेकदा त्यांच्या घरी येत. त्यांची माझी भेट सकाळी 9 वाजता ठरली होती. मी अर्थातच बरोबर 9 वाजता त्यांच्या कार्यालयात गेलो. तेथे डॉ. कमरुद्दीन अजून आले नव्हते. ते 10.30 वाजता आले. त्यांची भेट माझ्या दृष्टीने महत्त्वाची होती, म्हणून मी तेथेच थांबून राहिलो. ते पूर्वीच्या काळात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री होते. शांत, तल्लख असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

आल्या आल्या त्यांनी त्यांना झालेल्या उशिराबद्दल माझी माफी मागितली. ते मला म्हणाले, ‘‘मला अक्षम्य उशीर झाला आहे. परंतु निघता निघता काही लोक माझ्या बायकोला भेटावयास आले आणि ती पुन्हा ‘मेरा आझाद कहाँ गया’ असे म्हणून गुप्तपणे काम करताना आमच्या नक्षलवादी मुलाला आलेल्या मृत्यूबद्दल शोक करू लागली. तिचा शोक थोडा ओसरल्यानंतरच मला इकडे येता आले.” नंतर अर्धा तास ते बोलत होते आणि मी ऐकत होतो. त्या कहाणीने माझ्या हृदयाला देखील आपले अश्रू आवरणे कठीण झाले. ते म्हणाले, “माझा मुलगा आझाद हा नेहमी आपल्या विचारात असावयाचा. माझ्याकडे तर तो आजकाल बाजूला फिरकतच नसे. त्याची आई त्याला एकदा म्हणाली, ‘अरे, मुजिबुर रहमान तुझ्या वडिलांशी चर्चा करण्यासाठी आपल्या घरी येतात आणि तुला साधे त्यांच्याशी बोलावेसेही वाटत नाही.’ ते पुढे म्हणाले, ‘मी त्याला एकदा फारच छेडले तेव्हा तो मला म्हणाला,  'Father, you are a social democrat. I am not, does that settle the issue’ त्यानंतर तो भूमिगत झाला आणि तिथेच काम करीत असताना मारला गेला. कमरुद्दीन मला म्हणाले, “मी त्याला मार्क्सवरील पुस्तकांचा संपूर्ण संच दिला होता. लास्की व बर्ट्रांड रसेल यांचेही संपूर्ण संच दिले होते व त्याला सांगितले होते, हे सर्व नीट अभ्यास आणि नंतर तुला योग्य वाटेल ते कर. माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि तुला कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करावयाची गरज नाही. परंतु त्याचे समाधान एवढ्याने झाले नाही व त्याने आपला हट्ट शेवटपर्यंत पूर्ण केला.”

मी त्यांना विचारले, “तो माओवादी होता का? ‘ Power grows out of the barrel of a gun’ यावर त्याचा विश्वास होता का?” ते म्हणाले, “तसे काहीसे असावे असे मला वाटते.”

साधना नक्षलवादावर विशेषांक काढत आहे याचा मला आनंद झाला व त्यात हे सर्व लिहावेसे वाटले. आजच्या परिस्थितीत सर्व बाजूंनी कोंडमारा होतो, त्यावेळी ती कोंडी फोडावी, मग त्यात शस्त्रबळाचा वापर करावा लागला तरी करावा अशी सामाजिक परिवर्तनासाठी मनोधारणा झाली तर त्यात दोष त्या परिस्थितीला दिला पाहिजे अशी माझीही धारणा आहे. विनोबाजी म्हणाले होते, “माझी जर आयुष्यावर श्रद्धा नसती तर मीही नक्षलवादीच झालो असतो.” या विधानाच्या कसोटीवर आपले जीवन तपासून पाहण्यास आजही कितीजण तयार होतील?

Tags: शेख मुजिबुर रहेमान डॉ. कमरुद्दीन ढाक्का   केसरी बांग्लादेश दत्ता जगताप ग. प्र. प्रधान शिरुभाऊ लिमये देवदत्त दाभोलकर Shekh Mujibur Raheman. Dr. Kamaruddin Dhakka Kesari Bangladesh Datta Jagtap G. P. Pradhan Shirubhau Limaye Devdatta Dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके