डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हजारोंच्या संख्येत होत असलेल्या या तरुणांच्या स्थलांतरामुळे नक्षलवादीसुद्धा अस्वस्थ झाले असून त्यांनी आता या तरुणांच्या कुटुंबावर राग काढायला सुरुवात केली आहे. प्रभावक्षेत्रातली नवी पिढी ऐकायला तयार नाही हे त्यांच्या लक्षात आल्याने गावकऱ्यांसोबतच्या बैठकीत ज्यांच्या मुलांनी स्थलांतर केले अशा पालकांना मारहाण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे प्रकार त्यांनी सुरू केले आहेत. हे सारे प्रकार या तरुणांच्या कानावर जात असल्याने स्थलांतरित झालेल्या तरुणांनी गावाकडे येणेच बंद केले आहे.

गोमू सुख्खा हिचामी हा सोळा वर्षांचा विद्यार्थी सध्या अकरावी सायन्सला आहे. दहावीला 75 टक्के गुण मिळवणाऱ्या गोमूला डॉक्टर व्हायचे आहे. एटापल्लीला वसतिगृहात राहणाऱ्या गोमूला अभ्यास करताना अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याचा भास होतो. त्याचे लहानपण ज्या कसूरवाही नावाच्या गावात गेले, तिथल्या साऱ्यांना गोळीबाराचे आवाज ऐकण्याची सवय झाली आहे. हे आवाज ऐकूनच मोठा झालेल्या गोमूच्या मनात आता त्याची भीती दडून बसली आहे. पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या लढाईत कधी काय होईल, कुणावर नसती आफत ओढवेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी काही घडले की गोमूच्या अंगावर थरार उठतो. अभ्यासात लक्ष लागत नाही. तरीही गोमूला शिक्षणात प्रगती करायची आहे.

गोमूच्या वडिलांकडे अवघी तीन एकर शेती आहे. त्यामुळे घरच्या पाठबळावर डॉक्टर होणे शक्य नाही याची जाणीव झालेला गोमू शिष्यवृत्तीच्या बळावर तग धरण्याची आशा बाळगून आहे. हुशार मुले नक्षलवादी चळवळीसाठी मागतात. त्यामुळे गोमूच्या वडिलांनी त्याला घराकडे फिरकू नको असे बजावून ठेवले आहे.

या हिंसाचारग्रस्त भागात हा एकटाच गोमू नाही, असे अनेक तरुण ठिकठिकाणी भेटतात. त्यातल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत दहशतीची छाया दिसून येते. या तरुणांना थोडा विश्वास दिला आणि बोलते केले की, अनेक भयकथा समोर येतात. या लढाईत सर्वाधिक होरपळ तरुणाईची होत आहे हे पोलीस निवडप्रक्रियेच्या वेळी दिसून आले होते. जे या प्रक्रियेत नव्हते, पण चांगले शिक्षण घेण्याची मनीषा बाळगून आहेत त्यांची मते या भागातल्या हिंसक वातावरणातील टप्पे उलगडून दाखवणारी आहेत.

मोरवाहीच्या लक्ष्मण गावंडे या एटापल्लीला शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या भावाला नक्षलवाद्यांनी ठार केले. तेव्हापासून पेटून उठलेल्या लक्ष्मणला आता फक्त पोलीस व्हायचे आहे. शिक्षक होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या दीपकच्या काकाला पोलिसांनी नक्षलवाद्यांना मदत करतो या संशयावरून पकडले. त्यांच्या सुटकेसाठी वकील शोधणे, धावपळ करणे, अर्ज लिहिणे ही कामे अभ्यास सोडून दीपकला करावी लागली. तो काळ अतिशय कसोटीचा होता असे सांगताना दीपकच्या डोळ्यांत आजही पाणी येते. अश्विनी अलामी ही बारावीत शिकणारी मुलगी. तिला नर्स व्हायचे आहे. नक्षलवादी कसे आहेत यावर ती काहीच बोलत नाही पण ते जेव्हा गावात येतात तेव्हा आई-वडील आम्हाला घरात लपवून ठेवतात असे सहज सांगून जाते. सुट्टी असली तरी गावाकडे फारसे येऊ नका असे अश्विनी व तिच्या सोबत असलेल्या मुलींच्या आई- वडिलांनी या सर्वांना सांगून ठेवले आहे.

भामरागडला पदवीचे शिक्षण घेणारी काही मुले भटली. नक्षलवादी चळवळ आता गरिबांच्या हिताची  राहिलेली नाही, यावर या साऱ्यांचे एकमत असते, पण आमची नावे प्रकाशित करू नका अशी विनंती ही मुले आवर्जून करतात. दहा वर्षांपूर्वी गावातल्या तरुणांना चळवळीचे आकर्षण होते आता ते राहिले नाही व त्याची जागा भीतीने घेतली आहे हे या मुलाशी बोलल्यानंतर स्पष्टपणे जाणवते. धानोरा या तालुक्याच्या स्थळी असलेल्या मुलांच्या वसतिगृहात पदवीचे शिक्षण घेणारी 25 मुले आहेत. ही मुले आधी रोज सायंकाळी धावण्याचा सराव करायची. त्यांतली पाच मुले पोलीस दलात दाखल झाली तेव्हापासून यांचा धावण्याचा सराव थांबला आहे.

एखादा तरुण रोज सराव करताना दिसला की नक्षलवाद्यांकडून बरोबर हटकले जाते असे तरुण सांगतात. शाळा, महाविद्यालयाला सुट्टी असली की गावी जावे लागते. नेमकी हीच संधी साधून नक्षलवादी गावात येतात. तीन हजार रुपये महिन्याचे आमीष दाखवतात. आम्हांला मात्र तिकडे जायचे नाही. शिकायचे आहे, पण शिकूनही नोकरी कुठे मिळते आणि मिळवायची असेल तर लाखोंची लाच कुठून आणायची असा न उलगडणारा प्रश्नही हे तरुण स्वाभाविकपणे उपस्थित करतात.

गेल्या वर्षी मरकेगावला बारा पोलिसांचे हत्याकांड घडले. नंतर पोलिसांनी अख्ख्या गावाला झोडपून काढले. अनेकांना अटक केली. त्यांत वसतिगृहात राहणाऱ्या कमलेश नैतामचे वडील, काका, भाऊ होते. हे कळताच सैरभैर झालेला कमलेश आठ दिवस जेवलाच नाही. आम्ही सारे अभ्यास सोडून त्याचे सांत्वन करत बसलो. एक महिन्यानंतर या सर्वांना पोलिसांनी सोडले, पण अंगावर केस लागली. तेव्हापासून कमलेश गावी गेलेलाच नाही. सुट्टीच्या काळात तो मित्राच्या गावी जाऊन राहतो. आता नक्षलवादी पोलिसांना काय सांगितले म्हणून या साऱ्यांच्या जिवावर उठले आहेत. या धावपळीत कमलेश नापास झाला. अशी लढाईची झळ सोसणारी असंख्य मुले या भागात आहेत.

कोरचीत साल्हे या गावातून आलेला वीरेंद्र जुडा हा बी.ए.च्या अखेरच्या वर्षाला असलेला विद्यार्थी भेटला. आता शिकायला गावाबाहेर पडल्याने नक्षलवाद्यांच्या नजरेत तो आला आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाले की, मिळेल ती नोकरी मिळवायचीच असा त्याचा निर्धार आहे. नोकरी मिळाली नाही तर गावात जाऊन राहावे लागेल व मग काय होईल ते सांगता येत नाही असे वीरेंद्र म्हणतो. शिक्षणाच्या निमित्ताने का होईना थोड्या सुरक्षित म्हणजे तालुकास्थळी वास्तव्य करून असलेल्या या तरुणांना गावातील मुलांनी शिकले पाहिजे असे वाटते. मुले शिकतील तेव्हाच त्यांना राज्यघटना कळेल ना, असे एक मुलगा सहज बोलून जातो. शिक्षणामुळे चांगल्या, वाईटातला फरक कळेल असेही हे तरुण सूचकपणे बोलतात. गावापर्यंत रस्ते झाले पाहिजेत, पिण्याच्या पाण्याच्या सोयी झाल्या पाहिजेत असे या तरुणांना वाटते. सरकार काही करत नाही. केवळ पोलीस व बंदुका यावरच खर्च करते अशी या तरुणांची भावना आहे. विकासाच्या मुद्‌द्यावर सारे सामूहिकपणे एकत्र आले पाहिजेत असे हे तरुण म्हणतात. यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे असे आग्रही मत हे तरुण मांडतात.

नक्षलवादी गावातल्या विजेच्या खांबावर साधा बल्ब लावू देत नाहीत. त्यांना अंधार हवा आहे आणि आम्हांला प्रकाश, असे मत मांडणारे हे तरुण या चळवळीला कंटाळले आहेत. त्यावर उपाय शोधणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे हे लक्षात येताच अर्धवट शिक्षण घेतलेल्या तरुणांनी आता या भागातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू केले आहे. रोजगाराच्या शोधात स्थलांतर हा नवा विषय नसला तरी नक्षलवादग्रस्त भागातील बेरोजगार तरुणांच्या या स्थलांतरामागे अनेक कारणे आहेत.

गेल्या तीन दशकांपासून हिंसक कारवाईच्या माध्यमातून आदिवासी समाजात दहशत निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी विविध विकासकामांना तसेच शासकीय योजनांना नेहमी विरोध केला आहे, त्यामुळे या दुर्ग भागातील रोजगारनिर्मितीची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून थांबलेली आहे. नक्षलवादी रोजगार हमी, वनखात्याच्या कामांना विरोध करतात. त्यांच्यामुळेच या भागात उद्योगनिर्मिती होऊ शकली नाही. अशा स्थितीत कमी व अर्धवट शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांनी या चळवळीत जाण्याच्या आग्रहाला न जुमानता थेट स्थलांतराचा मार्ग स्वीकारल्याचे दुर्ग भागात फिरल्यानंतर लक्षात आले.

एटापल्ली तालुक्यातील बोटनपुंडी, कन्हारगारव, गडपायली या गावांना जायला रस्ता नाही. या तीनही गावांतील चौदा तरुणांनी एकत्र येत रोजगारासाठी सध्या आंध्र प्रदेश गाठले आहे. हैद्राबादमध्ये हॉटेलात वेटर म्हणून काम करणाऱ्या या मुलांच्या स्थलांतराची माहिती मिळताच नक्षलवादी बोटनपुंडीचे माजी सरपंच साधू मडावी यांच्या घरी गेले. त्यांचा मुलगा नंदू हासुद्धा हैद्राबादला असल्याचे कळताच चळवळीत दाखल होण्याऐवजी तिकडे का गेला म्हणून मडावींना मारहाण केली. हे कळताच नंदू माडावीने गावात येऊन नक्षलवाद्यांची भेट घेतली व हैद्राबादला नोकरी लागली आहे असे खोटे सांगून स्वत: तसेच कुटुंबाची त्यांच्या जाचातून सुटका करवून घेतली.

गावात रिकामे फिरणारे तरुण दिसले की नक्षलवादी मागे लागतात म्हणून नाइलाजाने स्थलांतर करावे लागले असे या तरुणांचे म्हणणे आहे. याच तालुक्यातील सुकला, रोही, मोरेवाडा, पुरसलगोंदी, कांदोडी या गावांधील सुमारे चाळीस तरुण रोजगाराच्या शोधात गोवा, मुंबई या भागात गेले आहेत.

छत्तीसगडच्या सीमेला अगदी लागून असलेल्या पिपलीबुर्गी या गावातील दहा तरुण चेन्नईत मिळेल ती कामे करीत आहेत. याच गावातील रामा पुंजाटी यांनी समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ते सध्या पेपरमिलमध्ये सुपरवायझर आहेत. या भागात सरकार रोजगाराच्या संधीच निर्माण करायला तयार नाही. तिकडे नक्षलवाद्यांचा दबाव वाढत चालला आहे. अशा वेळी तरुणांजवळ स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे मत त्यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. भामरागड तालुक्यातील दुर्ग भागातील शेकडो तरुण रोजगाराच्या शोधात बाहेर पडले आहेत.

नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या नेलगोंडाचे 25 तरुण आंध्र प्रदेशात ठिकठिकाणी काम करीत आहेत. लाहेरी, फोदेवाडा तसेच नेहमी चर्चेत राहणाऱ्या बिनागुंडातील तरुणसुद्धा राज्याच्या विविध भागांत रोजगार मिळवण्यासाठी धडपडत आहेत. बिनागुंडाजवळ असलेल्या पेरेमिली बट्टी या गावची चुकली उसेंडी ही मुलगीसुद्धा मुंबई मजुरी करीत आहे. भटपरचा एक तरुण आधी नक्षलवादी चळवळीत होता. तिथून पळून आल्यावर त्याने थेट हैद्राबाद गाठले. आता नाव बदलून तो मजुरीचे काम करतो. थोडे पैसे जमा झाले की पत्नी व मुलांना या दहशतीच्या वातावरणातून बाहेर काढणार असे तो सांगतो. मोहलीचे दहा तर पन्नेाराचे बारा तरुण कर्नाटकात मजुरी करीत आहेत.

धानोरा, कोरची या नक्षलवाद्यांच्या सर्वाधिक प्रभावक्षेत्रातील शेकडो तरुणांनीसुद्धा हाच मार्ग पत्करला आहे. कोटगुल हे तसे मोठे गाव. या परिसरातील जवळजवळ शंभर मुलांनी रोजगाराच्या शोधात गाव सोडले आहे. यापैकी बहुसंख्य तरुण सुरत व गोवा येथे काम करीत आहेत. कोटगुलच्या दोन तरुणांनी नागपुरात दीक्षाभूमीजवळ अतिक्रमण करत चहाची टपरी सुरू केली आहे. कुरखेडा तालुक्यातील दुर्ग भागात स्थलांतराचे प्रमाण भरपूर आहे. सावरगावची पाच तर अरमूरकसाची आठ मुले नागपुरात मिळेल तिथे मजुरी करीत आहेत. येडापूरच्या हिरालाल पुरामला नक्षलवाद्यांनी चळवळीत येण्याविषयी खूप आग्रह केला. नंतर धमकी देणे सुरू केले. अखेर हिरालालने स्थलांतराचा निर्णय घेतला. सध्या तो गुजरातमध्ये आहे. माझा ठावठिकाणा सांगू नका असे त्याने आई-वडिलांना बजावून ठेवले आहे.

हजारोंच्या संख्येत होत असलेल्या या तरुणांच्या स्थलांतरामुळे नक्षलवादीसुद्धा अस्वस्थ झाले असून त्यांनी आता या तरुणांच्या कुटुंबावर राग काढायला सुरुवात केली आहे. प्रभावक्षेत्रातली नवी पिढी ऐकायला तयार नाही हे त्यांच्या लक्षात आल्याने गावकऱ्यांसोबतच्या बैठकीत ज्यांच्या मुलांनी स्थलांतर केले अशा पालकांना मारहाण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे प्रकार त्यांनी सुरू केले आहेत. हे सारे प्रकार या तरुणांच्या कानावर जात असल्याने स्थलांतरित झालेल्या तरुणांनी गावाकडे येणेच बंद केले आहे.

शेकडो तरुण आई-वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी गडचिरोली वा तालुक्याच्या ठिकाणी येतात व तिथेच आई-वडिलांना बोलावून घेतात. भेट झाल्यानंतर परत निघून जातात. ही बाब नक्षलवाद्यांना कळल्यावर त्यांनी आता पुन्हा गावकऱ्यांना धमकावणे सुरू केले आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावक्षेत्रातील अनेक गावांतील तरुण या स्थलांतर मोहिमेत सहभागी होत असल्याचे या भागाचा दौरा केल्यानंतर स्पष्ट झाले. हजारोंच्या संख्येत होणारे हे स्थलांतर जसे नक्षलवाद्यांना काळजीत टाकणारे आहे तसेच या भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या प्रशासनाच्या डोळ्यांतसुद्धा अंजन घालणारे आहे.

Tags: स्थलांतर नक्षलवाद तरुणाई देवेंद्र गावंडे nakshali youth youth devendra gavande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

देवेंद्र गावंडे,  नागपूर

आवृत्ती प्रमुख -लोकसत्ता, नागपूर 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके