डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नक्षलवाद्यांच्या दहशतीने या भागातील तरुणाईला व्यापलेले आहे. एखाद्या घटनेत केवळ पोलिसांचा साक्षीदार झाला म्हणून नक्षलवाद्यांनी अनेकांचे जीव घेतले आहेत. पोलीस दलात सामील होऊ न शकलेले असंख्य तरुण रात्री गावात थांबत नाहीत. अनेक खबरे तर वर्षानुवर्षे ठाण्यातच झोपत आहेत. एखादा दिवस चुकवला तरी त्यांचा मृत्यू ठरलेला असतो, थोडीशी दिरंगाई जिवावर बेतते. जे तरुण पोलीस दलात आहेत त्यांना गाव विसरावे लागले आहे. पोलीस व नक्षलवाद्यांच्या या संघर्षात काहीतरी करू इच्छिणारी, विकासाच्या प्रवाहात येऊ पाहणारी एक नवी पिढीच होरपळली जात आहे.

एटापल्ली तालुक्यात कांदोडी नावाचे गाव आहे. आडवळणावर असलेल्या या गावातली कमला नावाची मुलगी शाळेत शिकत असतानाच गाणे छान म्हणायची. ती आठवीत असताना नक्षलवाद्यांची नजर तिच्यावर गेली. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात समोर वावरणाऱ्या कमलाला नक्षलवाद्यांनी एक दिवस जबरीने उचलले. आई-वडिलांनी विरोध केला, पण त्यांचे काही एक चालले नाही. चळवळीत कमलाकडे कलापथकाची जबाबदारी देण्यात आली. क्रांतीची महती सांगणारी गाणी म्हणायचे, लोकांचे प्रबोधन करायचे काम कमला करू लागली. सुमारे तीन वर्षे चळवळीत काढल्यावर कमलाचा भ्रमनिरास झाला. लैंगिक शोषणासकटच्या तिथल्या दाहक अनुभवांना सामोरे जाणाऱ्या कमलाने एक दिवस संधी साधली, पळ काढला आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

कमलाची कथा ऐकून पोलिसांनी तिला आलापल्लीच्या प्राणहिता मुख्यालयात खबरी म्हणून ठेवून घेतले आणि पोलीस दलाच्या वतीने नेहमी आयोजित होणाऱ्या जनजागरण मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी दिली. आधी नक्षलवाद्यांचे गोडवे गाणारी कमला आता पोलिसांचे गोडवे गाऊ लागली. त्यामुळे खवळलेल्या नक्षलवाद्यांनी कमलाच्या आई-वडिलांना त्रास देणे सुरू केले. कमलाला मात्र मुख्यालय सोडून जाता येत नव्हते. त्यामुळे चार वर्षे कमला गावाकडे फिरकलीच नाही. गेल्या वर्षी ‘‘आई शेवटच्या घटका मोजत आहे, एकदा तरी येऊन जा’’ असा निरोप मिळाल्यावर कमलाला राहवले नाही. एक दिवसासाठी म्हणून ती गावात गेली आणि जणू तिच्या पाळतीवरच असलेल्या नक्षलवाद्यांनी डाव साधला. त्याच रात्री नक्षलवाद्यांनी घरात घुसून कमलाला गोळी घातली आणि ती मेली असे समजून निघून गेले. नेमके इथे कमलाचे नशीब मदतीला धावून आले. पोटातून आरपार गोळी जाऊनसुद्धा कमला जिवंत राहिली. चंद्रपूरच्या रुग्णालयात सलग दोन महिने उपचार घेतल्यानंतर बरी झालेली कमला आता पुन्हा प्राणहिता मुख्यालयात परतली आहे. सांगायचे तात्पर्य हेच की नक्षलवादी कधीच आपले ‘‘टार्गेट’’ विसरत नाहीत. त्यामुळे शासकीय नोकरीत जाऊ इच्छिणारे, पोलीस दलात सहभागी होणारे, शासकीय योजनांचा लाभ घेणारे, एकूणच शासनाच्या जवळ जाणाऱ्या साऱ्यांना दहशतीच्या छायेत लपतछपत जगावे लागते.

नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या या भागातील तरुणाईची अवस्था मोठी बिकट झाली आहे. शिक्षण घेण्याची इच्छा असलेले, नव्याने काहीतरी करू पाहणारे, नोकरीची आशा बाळगणारे शेकडो तरुण या भागात जीव मुठीत धरून जगत आहेत. या भागात उद्योग नसल्याने रोजगार नाही. शासनाच्या सेवेत जायचे म्हटले तर तेवढी शैक्षणिक पात्रता नाही. अशा वेळी ही तरुणाई पोलीस दलात दाखल होता यावे म्हणून निवडप्रक्रियेच्या वेळी झुंबड करते. या प्रक्रियेत जे यशस्वी होतात त्यांना खाकी वर्दीचे संरक्षण मिळते, पण जे अयशस्वी होतात त्यांना गावात परत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि इथेच त्यांच्या आयुष्याच्या दोरीवर गंडांतर आलेले असते. अशा अयशस्वी तरुणांवर नक्षलवादी सतत नजर ठेवून असतात आणि वेळ मिळाला की अगदी ‘वेचून’ ठार करतात. नक्षलवादी एकाच वेळी अनेक तरुणांना ठार करत नाहीत. ठराविक अंतराने एकेकाचे गळे कापत असतात. यामुळे दहशतीचा थरार नेहमी कायम राहत असतो. तीन महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातून तब्बल 12 जणांचे अपहरण केले, त्यात राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी होता आणि पोलीस दलात सहभागी होऊ न शकलेला मनोज कांदो हा तरुणसुद्धा होता. एरवी अशा अपहरणाकडे पोलीस लक्ष देत नाहीत. कारण भीतीपोटी कुणी तक्रारच करत नाही.

या प्रकरणात राजकीय पुढारी असल्याने पोलिसांनी तक्रार नसतानासुद्धा शोधमोहीम राबवली. त्यामुळे पुढाऱ्यासोबत मनोजची सुटका होऊ शकली. त्यामुळे हे अपहरण बरेच गाजले पण अशी कुणाला माहिती न होणारी अपहरणे नक्षलवाद्यांकडून सातत्याने केली जातात व अपहृत व्यक्तीची हत्या झाल्यावरच त्याचा उलगडा होत असतो. तरीही जिवावर उदार होऊन या भागातील तरुणाई नोकरीसाठी धडपडत असल्याचे चित्र आता नेमाने दिसू लागले आहे. नोकरीसाठी धडपडताना या तरुणाईला नेमक्या कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते या प्रश्नाचे उत्तर अंगावर काटा आणणारे आहे. दोन महिन्यांपूर्वी गडचिरोलीत पोलीस निवडप्रक्रिया राबवली गेली. अंतिम निवड यादी जाहीर झाल्यावर यात राजकारण शिरले आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यामुळे संतापलेल्या आबा पाटलांनी प्रक्रियेला स्थगिती दिली. आता त्याची चौकशी मंद गतीने सुरू आहे. नेमकी हीच बाब या प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या आठशे स्थानिक तरुणांचे जिणे सैरभैर करणारी ठरली आहे.

या आठशेपैकी सहाशे तरुण आता गडचिरोलीत अडकून पडले आहेत. ते गावी परत गेले तर त्यांचे मरण ठरलेले आहे, कारण नक्षलवाद्यांना कुणाची निवड झाली ते कळलेले आहे. जणू हे तरुण गावी परत येण्याची वाटच बघत ते थांबले आहेत. दुर्ग भागात अशी स्थिती आहे. एटापल्लीच्या जवळ असलेल्या एका गावातून आलेल्या सूरजला आता या स्थगितीमुळे एका किराणा दुकानात नोकरी धरावी लागली आहे. पोलीस दलात संधी मिळते म्हणून त्याने तंत्रनिकेतनचे शिक्षण अर्धवट सोडून दिले. अंतिम यादी जाहीर झाल्यावर सारी कागदपत्रे पोलीस मुख्यालयात जमा केली. आता ‘‘ना घर का ना घाट का’’ अशी सूरजची अवस्था झाली आहे. सूरजचे वडील मोलमजुरी करतात. बहीण अहेरीला डी.एड.चे शिक्षण घेत आहे. आता नक्षलवाद्यांनी गावात जाऊन सूरजच्या आईवडिलांना बंदुकीचा धाक दाखवणे सुरू केले आहे. मुलगा पोलिसांना दिला, आता भरपाई म्हणून मुलगी चळवळीला दे असा आग्रह नक्षलवाद्यांनी धरला आहे. त्यामुळे हे बहीणभाऊ धास्तावून गेले आहेत. दोघेही गावाला जाऊच शकत नाहीत, अशी स्थिती आहे.

भामरागडजवळ असलेल्या ताडगावच्या राजेशला गस्तीवर येणाऱ्या पोलिसांशी गप्पा मारायला आवडायचे. ह्या गप्पाच त्याच्या अंगलट आल्या. नक्षलवाद्यांनी धमकी देताच राजेश तीन वर्षांपूर्वी गडचिरोलीत पळाला. तिथे मजुरी करून जीवन जगणाऱ्या राजेशला तिसऱ्या प्रयत्नांत पोलीस दलात नोकरी मिळाली. आता आईवडिलांना गडचिरोलीत आणू असे स्वप्न त्याने रंगवले, पण स्थगितीमुळे ते भंगले आहे. भामरागडच्या पुढे आरेवड्डा नावाचे गाव आहे. या गावातून आलेल्या मनीषचे वडील पोलीसदलातच साहाय्यक फौजदार आहेत. मनीष काकासोबत गावात राहत होता. वडील पोलीस आहेत हे कळले तर नक्षलवादी जीव घेतील हे ठाऊक असल्याने काका व मनीषने आडनावच बदलून घेतले. पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मनीष सहाव्या प्रयत्नात यावेळच्या निवडप्रक्रियेत यशस्वी झाला. आता तो गावाला जाऊ शकत नाही, पण आडनावे बदलण्याची त्यांची युक्ती नक्षलवाद्यांना कळली आहे, त्यामुळे संतापलेल्या नक्षलवाद्यांनी गावात असलेल्या त्याच्या काकांना मारझोड करणे सुरू केले आहे.

कोरची तालुक्यात अगदी छत्तीसगडला लागून असलेल्या एका गावातून आलेल्या सुरेंद्रला एका चहाच्या टपरीवर काम करावे लागत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला तो गावातला एकमेव तरुण. त्याच्या वर्गात असलेल्या एका तरुणाला नक्षलवाद्यांनी नुकतेच जबरीने चळवळीत ओढले. त्याचा मेहुणा मानसिंग होडी नक्षलवाद्यांच्या दलमचा कमांडर आहे. सुरेंद्र पोलीस होणार हे ठाऊक होताच संतापलेल्या होडीने काही दिवसांपूर्वी गावात जाऊन सुरेंद्रच्या आईवडिलांना धमकी दिली. त्यामुळे हादरलेला सुरेंद्र गडचिरोलीत असूनसुद्धा रोज झोपण्याच्या जागा बदलतो आहे. याच तालुक्यातला आनंद पोलीस दलात जायला मिळाले म्हणून आनंदला होता. आता स्थगितीमुळे तो धास्तावला आहे. नक्षलवाद्यांनी मोलमजुरी करणाऱ्या त्याच्या आईवडिलांना गेल्या काही दिवसांतच एवढा त्रास दिला की त्यांना वडसा या शहरात स्थलांतर करावे लागले.

एका नोकरीमुळे हे संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर आले आहे. तरुणांपेक्षा तरुणींची अवस्था तर आणखी वाईट आहे. या वेळी पोलीस दलात दोनशे तरुणींची निवड झाली. यापैकी दुर्गम भागातून आलेल्या सुमारे दीडशे तरुणींना अगदी लैंगिक शोषणालासुद्धा सामोरे जावे लागत आहे. ज्यांचे कुणीही नातेवाईक शहरात नाहीत त्यांना जगण्यासाठी, आसरा मिळावा म्हणून अनेक तडजोडी कराव्या लागत आहेत. काही मुलींनी कापडाच्या दुकानात नोकरी धरली आहे. मुरुमगाव जवळच्या एका गावातून आलेल्या मुलीला अशीच नोकरी मिळाली, पण असहायतेचा फायदा घेणारे अनेकजण भेटले. अगदी रडून रडून व्यथा सांगणारी ही मुलगी स्थगिती उठेल व हक्काची नोकरी मिळेल या आशेवर आक्षेपार्ह तडजोडींना सामोरी जाते आहे. ‘मलाच नाही तर अनेकींना असेच अनुभव येत आहेत’ असे ती जेव्हा सांगते तेव्हा मेंदू बधिर व्हायला होते. या साऱ्या तरुणांच्या गावातील घरात सध्या नक्षलवाद्यांनी धडका देणे सुरू केले आहे. एकदा खाकी वर्दी मिळाली तर गाव कायमचे सुटेल, पण कुटुंबाचे भले करता येईल या आशेवर ही तरुणाई तग धरून आहे.

नक्षलवाद्यांच्या दहशतीने केवळ या भागातल्या तरुणाईलाच व्यापलेले नाही तर इतर अनेकांची अशीच अवस्था आहे. एखाद्या घटनेत केवळ पोलिसांचा साक्षीदार झाला म्हणून नक्षलवाद्यांनी अनेकांचे जीव घेतले आहेत. पोलीस दलात सहभागी होऊ न शकलेले असंख्य तरुण रात्री गावात थांबत नाहीत. झोपण्यासाठी पोलीस ठाण्याचा आश्रय घेतात. अनेक खबरे तर वर्षानुवर्षे ठाण्यातच झोपत आहेत. एखादा दिवस चुकवला तरी त्यांचा मृत्यू ठरलेला असतो. थोडीशी दिरंगाई जिवावर बेतते. जे तरुण पोलीस दलात आहेत त्यांना गाव विसरावे लागले आहे. स्थानिक असलेले शेकडो जवान वर्षानुवर्षे गावात जाऊ शकलेले नाहीत. गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांचा खानसामा गेल्या 17 वर्षांपासून गावाला जाऊ शकलेला नाही. पोलीस व नक्षलवाद्यांच्या या संघर्षात काहीतरी करू इच्छिणारी, विकासाच्या प्रवाहात येऊ पाहणारी एक नवी पिढीच होरपळी जात आहे.

Tags: police nivadprakriya पोलीस निवडप्रक्रिया gadchiroli गडचिरोलीत nakashalvad नक्षलवाद्य kandodi कांदोडी devendra gavande देवेंद्र गावंडे eka navi pidhich horapalali jat ahe एक नवी पिढीच होरपळली जात आहे! dandakaranyatun दंडकारण्यातून. weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

देवेंद्र गावंडे,  नागपूर

आवृत्ती प्रमुख -लोकसत्ता, नागपूर 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके