डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपल्याकडे आता रोज रोज 'रोज डे' व्हायला लागले. बर्थ डे, वेडिंग डे, व्हॅलेंटाईन्स डे, चिल्ड्रन डे, टीचर्स डे तसा 'गुरुपौर्णिमा डे'. या दिवशी गुरुजनांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी पुष्पगुच्छ-गुलाब देणे आलेच. पुरेशा खतपाण्याअभावी शेतकऱ्यांची ज्वारी- भाताची पिकं वाळत जातात आणि दुसरीकडे कमर्शियल फार्मस् झालेल्या भांडवलदार- कारखानदारांचे गुलाबांचे मळे बहरत आहेत.

शुक्रवारचा दिवस. सकाळी खिडकीतून बाहेर पाहिले. एका हातात आईचा हात, अन् दुसऱ्या हातात टपोरा गुलाब घेतलेला एक विद्यार्थी शाळेला जाताना दृष्टीस पडला. काही वेळाने इमारतीतून खाली उतरलो. समोर मुलांची प्रचंड गर्दी दिसली. प्रत्येकाच्या हातात गुलाबच दिसत होता. शाळेच्या फाटकाबाहेर गुलाबविक्रेत्या महिला बसल्या होत्या. त्यांच्याभोवती मुलांचा-पालकांचा गराडा पडला होता. जवळच एक मुलगी आपल्या आईचा हात पकडून तिला गुलाबविक्रेत्या बाईपाशी ओढत होती, तर हाती दफ्तर घेतलेली तिची आई तिला शाळेच्या दिशेने खेचत होती. त्या दोघींची ओढाताण काय सांगत होती? 

'आई, आई मला घेऊन दे ना एक गुलाब. 
"अगं पण माझ्याजवळ पैसे नाहीत ना.
"मग आज मला नाही शाळेत जायचं. 
"काय? वेड लागलं होय तुला? चल ये."
"नाही. मी नाही जाणार. आज बघ, सगळी मुलं आपापल्या बाईंना गुलाबाचं फूल देणार आहेत आणि मीच तेवढी गुलाबावाचून जाऊ होय?" 

रडकुंडीस आलेली मुलगी रस्त्यावर पाय आपटू लागली. मग आईने तिला एक चापटी देऊन फरफटत ओढत शाळेच्या दिशेने नेले. मी गुलाबवालीकडे जाऊन गुलाबाचा भाव विचारला पाच रुपये' म्हणत तिने हातातील गुलाब माझ्यापुढे केला. मी काही विकत घेत नाही, नुसता भाव विचारतोय म्हणून एक जळजळीत कटाक्ष टाकून ती अन्य ग्राहकांकडे वळली.

पाच रुपये! पाच रुपयासाठी त्या आईनं आपल्या मुलीला हिरमुसलं करावं, चापट मारावी? पाच रुपये ही काय मोठी रक्कम झाली? 

होय! झोपडपट्टीतून येणाऱ्या पालकांना, विशेषतः आयांना पाच रुपये हे तसे मोठेच वाटतात. तेवढाच फाटक्या संसाराला हातभार. अन् तू नाही का पाच रुपये वाचवावेत म्हणून बस किंवा शेअररिक्षा सोडून पायी चालत जात?' माझ्या विवेकाने मलाच चिमटा घेतला.

आपल्याकडे आता रोज रोज 'रोज डे' व्हायला लागले. बर्थ डे, वेडिंग डे, व्हॅलेंटाईन्स डे, चिल्ड्रन डे, टीचर्स डे तसा 'गुरुपौर्णिमा डे'. या दिवशी गुरुजनांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी पुष्पगुच्छ-गुलाब देणे आलेच. पुरेशा खतपाण्याअभावी शेतकऱ्यांची ज्वारी- भाताची पिकं वाळत जातात आणि दुसरीकडे कमर्शियल फार्मस् झालेल्या भांडवलदार- कारखानदारांचे गुलाबांचे मळे बहरत आहेत.

चालतचालत मी शाळेपासून दूरवर आलो होतो. पण ती मुलगी मात्र डोळ्यापुढून जात नव्हती.  काय झालं असेल त्या मुलीचं पुढे? शाळेतील इतर मुलांनी आपापल्या बाई-गुरुजींना देण्यासाठी गुलाब-फुलं नेली आणि तीच तेवढी रिकाम्या हाताने गेली असेल का? काय वाटलं असेल त्यावेळी त्या चिमुकल्या मनाला? एका मुलानं एक गुलाब, म्हणजे वर्गात चाळीस मुलं असली तर बाईच्या टेबलावर चाळीस गुलाब? सबंध शाळेत पाचशे विद्यार्थी असले तर ५०० मुले x ५ रुपये = २५००/- रुपये गुलाबांवर खर्च! शाळा सुटल्यावर संध्याकाळी काय झालं असेल ह्या एवढ्या गुलाबांचं? पालकांच्या खिशाला चाट आणि एका गोड चिमुकल्या मुलीच्या गालावर चापट न बसता आणखी वेगळ्या पद्धतीनं 'सेलीब्रेट' करता आला नसता का हा 'गुरुपौर्णिमा डे?' प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या घराजवळच्या मोकळ्या जागेत किंवा एखाद्या डब्यात गुलाबाचं रोपटं लावावं अन् त्या रोपट्यावर फुललेला पहिला गुलाब आणून मला द्यावा, असं शिक्षकांनी मुलांना सांगितलं असतं तर? प्रश्न- प्रश्न आणि प्रश्न! 

तिकडे शिक्षकांच्या दोन्ही हातांत मावेना, तरी पण सारखे गुलाब येत होते अन् इथे माझ्या मनात त्या प्रश्नाचे काटे सलत होते.

Tags: चिल्ड्रन डे गुरुपौर्णिमा डे टीचर्स डे शिक्षक गुलाब Gurupournima Day Teachers' Day Teacher Rose weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके