डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

थोडा वेळ विसावा घेऊन तो आळस चढलेल्या शरीराने तसाच उठला आणि बैलाला शेजारच्या खदाणीकडं पाण्यावर घेऊन गेला. बैलाला पाणी पाजून त्यानं औत जुंपलं. आज सगळं उरकलं पाहिजे म्हणून बैलाच्या पाठीवर अधूनमधून आसूडाचे फटके देत त्याने दिवस मावळेस्तोर सगळं रान काळं खाप करून सोडलं. दिवस मावळाला होता. दुपारी पाऊस येईल असं वाटतं होतं, पण नाही आला. सगळं आवरून तो गाडीबैलं घेऊन घराकडे निघाला. घरी जाऊन हाता-पायावर पाणी घेतलं. बायकोने केलेला गरम चहा पिऊन त्याने परत बैलाला वैरण टाकली आणि सखाराम सोबत्याजवळ गप्पा मारल्या. नंतर घरी येऊन जेवण करताना बायकोला रानात मारलेल्या सापाचा किस्सा सांगितला. त्यावर बायको म्हणाली, ‘आज सोमवार होता, महादेवाचा वार, अन्‌ तुम्ही साप मारून आलात व्हय... अरे देवा!’ तिने बसल्या जागेवरूनचं महादेवाच्या मंदिराकडे हात जोडले आणि मनात काहीतरी पुटपुटली.

सूर्याचं दोन दिवसांपासून दर्शन झालं नव्हतं पावसाळ्याच्या दिवसात हे नेहमीचंच. उगीच एकदा सवयीप्रमाणे आभाळाकडे डोळे फिरवले आणि दुपार झाली असावी असा अंदाज बांधून औतं सोडलं अन्‌ न्याहारी करावी म्हणून बैलाच्या गळ्यातले जोते सोडून मानेवरंच जू खाली उतरून ठेवलं.

बैलाला शेजारच्या पडकात चरायला सोडलं आणि हा वरलाकडच्या कवटीवाल्या खोड्यातून काळं रानं तुडवीत विहिरीकडं निघाला.

विहिरीवर येताना मध्येच एक काळा साप एका भेगळीत घुसला. याच्या नजरेने ते अचूक हेरलं. चारपाच फूट लांब, जाडजूड, पाठीवर पांढरे चट्टे असं जनावर पाहताच काळजाला धसका बसतो. असं जनावर दिसलं की, भल्या-भल्यांचा थरकाप उडतो. पण पठ्ठ्या मात्र त्याच्यावर नजर ठेवून होता.

इकडे-तिकडे नजरं फिरवून कुठे एखादी दणकट काठी, लाकूड काही मिळतं का ते शोधत होता. जवळच बाभळीचं अर्धवट जळालेलं लाकूड दिसलं. लाकूड उचलेस्तोर तो मनाशीच बोलतं होता.

‘आता जर का नाही मारलं तर उद्या आपल्याच मुळावर उठंल, त्यापेक्षा दोन फटक्याची काय बाबत.’

लाकूड हातात घेतलं आणि अर्ध भेगळीत घुसलेल्या सापावर जोरात टप्पू मारायला सुरू केलं, साप मात्र ढिल्ल होऊन तसाच पडून होता. कदाचित भेगळीत पुढे जायला वाटच नसावी. याने मात्र चार पाच ठोक्यात काम फत्ते केलं.

मेलेला साप लाकडावर उचलला आणि शेजारच्या झुडपात फेकून दिला. नंतर साप मारलेल्या लाकडाला लिंबाच्या झाडावर दोन-तीनदा मारलं. विषाला विष मारतं म्हणून त्यानं लाकूड लिंबाच्या झाडावर मारलं. बापजाद्यांपासून बघत आलेला हा प्रकार त्याच्या मनावर संस्कारासारखा घट्ट चिकटलेला होता.

सकाळची न्याहारीची भाकर रामफळाच्या झाडाला बांधून ठेवलेली. त्यात चटणी-भाकर अन्‌ खाराच्या दोन फोडी होत्या. झाडाची भाकर सोडली आणि विहिरीवरच्या फुटक्या डबड्यात पाणी घेऊन त्याने तोंडावर मारलं. जेवणाला सुरुवात केली.

तोपर्यंत आकाशात काळे ढग जमू लागले होते. वातावरणात गारवा पसरला होता. पाऊस येण्याची चिन्ह दिसू लागली होती. घाईने जेवण उरकलं आणि बैलापाशी जाऊन बसला. बैलं चरण्यात धुंद झालेली होती. चार-पाच दिवसांपासून सारखं औत सुरू असल्याने काल रात्रीपासून हाता-पायाला गोळे येऊ लागले होते. थकलेल्या शरीराला थोडा विसावा मिळावा म्हणून त्याने गवतावर अंग टाकलं.

थोडा वेळ विसावा घेऊन तो आळस चढलेल्या शरीराने तसाच उठला आणि बैलाला शेजारच्या खदाणीकडं पाण्यावर घेऊन गेला. बैलाला पाणी पाजून त्यानं औत जुंपलं. आज सगळं उरकलं पाहिजे म्हणून बैलाच्या पाठीवर अधूनमधून आसूडाचे फटके देत त्याने दिवस मावळेस्तोर सगळं रान काळं खाप करून सोडलं.

दिवस मावळाला होता. दुपारी पाऊस येईल असं वाटतं होतं, पण नाही आला. सगळं आवरून तो गाडीबैलं घेऊन घराकडे निघाला.

घरी जाऊन हाता-पायावर पाणी घेतलं. बायकोने केलेला गरम चहा पिऊन त्याने परत बैलाला वैरण टाकली आणि सखाराम सोबत्याजवळ गप्पा मारल्या. नंतर घरी येऊन जेवण करताना बायकोला रानात मारलेल्या सापाचा किस्सा सांगितला.

 त्यावर बायको म्हणाली, ‘आज सोमवार होता महादेवाचा वार, अन्‌ तुम्ही साप मारून आलात व्हयं... अरे देवा!’ तिने बसल्या जागेवरूनचं महादेवाच्या मंदिराकडे हात जोडले आणि मनात काहीतरी पुटपुटली. त्याने तिचं काही मनावर घेतलं नाही. जेवण करून तो अंगणात टाकलेल्या बाजेवर आडवा झाला. अंग जड पडलेलं त्याला जाणवत होतं. म्हणून त्याने पडल्यापडल्या डोळे बंद केले. बायकोने सगळी आवराआवर केली अन्‌ त्याच्याशेजारी खेटून बाज टाकली. दोघेही झोपी गेले.

सकाळी नेहमीप्रमाणे ती उठली. दारात झाडझूड करून सडा टाकला. तो मात्र अजून उठला नव्हता. तिला वाटलं कामाने थकले असतील, झोपू दे थोडा वेळ. तिने तोपर्यंत दुसरे काम हाती घेतले.

तिचं सगळं काही आवरलं होतं, तरीपण हा काही उठला नव्हता. म्हणून मग ती न राहून त्याला उठवायला गेली. त्याच्या अंगावरची चादर ओढत तिने त्याला आवाज दिला. मात्र तो काहीच बोलला नाही. तिने त्याच्या हाताला स्पर्श केला तेव्हा त्याचं अंग थंडगार पडलेलं तिला जाणवलं. तिने त्याला जोरजोरात हलवलं मात्र त्याचा काहीच प्रतिसाद येत नव्हता.

ती मात्र आता चांगलीच घाबरली होती. तिने घाबरलेल्या अवस्थेत शेजाराच्या अंबादासभाऊला आवाज दिला. तिचा आवाज ऐकून अंबादास आणि त्याची बायको गडबडीने पळत, तिच्या अंगणात आले. अंबादासला सगळा प्रकार लक्षात आला. त्याने गाडीवाल्या बापूला फोन केला. गाडी काही मिनिटांत दारात आली.

अंबादासने त्याला उचललं आणि गाडीच्या मधल्या सीटावर ठेवलं. अंबादास आणि ती गाडीत बसले बापूने गाडी सुसाट तालुक्याच्या हॉस्पिटलच्या दिशेने सोडली.

ती हुंदके देत रडत होती. अंबादास तिची समजूत काढत होता आणि मधेच बापूला गाडी पळव असं सांगत होता. सगळेच घाबरलेले होते. खड्ड्याचा रस्ता तुडवीत गाडी आदळत बापू अर्ध्या तासात हॉस्पिटलला टच झाला.

अंबादासने त्याला गाड़ीतून उचललं आणि डॉक्टरसमोरच्या टेबलावर मांडलं. डॉक्टरने हात हातात घेतला, गळ्यातला स्टेथोस्कोप त्याच्या छातीला लावून चेकअप केलं आणि चेहरा गंभीर करत अंबादासला बाजूला बोलावलं. डॉक्टर म्हणाले, ‘तुम्हाला पेशंट घेऊन यायला उशीर झालाय. सॉरी, पण पेशंट दगावलाय. सगळे रिपोर्टस्‌ तयार करतो आणि कळवतो’ अंबादासला हे ऐकून जोराचा झटकाच बसला, तो पूर्णतः हादरला होता. स्वतःला सावरत त्याने तिच्याकडं बघितलं, आणखी ती रडत होतीच.

डबडबल्या डोळ्याने कसं सांगावं तिला याचा विचार तो करत होता. शेवटी पाच मिनिटानंतर डॉक्टरनेच तिला सांगितलं. ते ऐकून तिच्या डोळ्यांसमोर अंधार उभा राहिला. रडूनरडून घसा कोरडा पडलेला असल्याने तिला चक्कर आली आणि ती धाडकन खाली कोसळली. तिला सिस्टरने धरून पलंगावर झोपवलं, ती बेशुद्ध होती. डॉक्टरने तिला पाणी दिलं, दहा मिनिटाने ती दचकून शुद्धीवर आली. तिने एकच हंबरडा फोडला.

अंबादास रडत-रडत तिचं सांत्वन करत होता, सगळं हॉस्पिटल तिच्या आवाजाने दणाणून निघालं होतं. ती स्वतःच्या छातीवर जोरजोरात हात बडवीत रडत रडत म्हणत होती. ‘महादेवाला चुकलं म्हणलं होतं म्या. तरीपण नाही ऐकलं मोहं देवाने, पुढच्या हाप्ती नारळ फोडणार होते ना.’ ‘अरे इतका कसा निष्ठुर निघालास रं...’ ती रडत होती.

खिन्न मनाने बापूने गाडी वळवून हॉस्पिटलच्या दारात लावली. चार-पाच जणानी त्याचं जड पडलेलं मृत शरीर गाडीत नेऊन मांडलं. अंबादास तिला घेऊन गाडीत बसला, बापूने गाडी गावाच्या दिशेने सुसाट सोडली. गावात तोपर्यंत सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. तिच्या तोंडून महादेवाला शिव्या सुरू होत्या. गाडी गावात आली तोच लोकांची गर्दी तिच्या दारापुढे जमली.

त्याचं मृत अवस्थेतलं शरीर अंगणात मांडलं गेलं. ती शेजारी बसून मोठमोठ्याने रडत होती, अन्‌ पुन:पुन्हा महादेवाच्या नावाने शिव्या देत होती. शेजारच्या बायका तिला सावरत होत्या. लोकांनी गडबड करून त्याचा अंत्यविधी पार पाडला. पुढे अनेक दिवस ‘सोमवारी साप मारला म्हणून तो मेला’ अशी चर्चा गावभर सुरू होती. डॉक्टरने दिलेला रिपोर्ट बापूच्या गाडीतल्या सीटच्या खोळीत बरेच दिवस तसाच पडून होता. त्याच्याकडं कोणाचंच साधं लक्षसुद्धा गेलं नाही.

एके दिवशी पावसाच्या थेंबाने बापूच्या गाडीची काच ओली झाली. गाडीचं वायपर बंद पडलेलं, म्हणून बापूने कागद शोधण्यासाठी खोळीत हात घातला, त्याला तो रिपोर्ट तिथं सापडला. अडाणी असलेल्या बापूनं त्या रिपोर्टने कचाकचा काच साफ केली. पाण्याच्या बारीक बारीक थेंबात मिसळून कागदाचे तुकडे झाले. त्या कागदाच्या तुकड्याने त्याच्या मरणाचं रहस्य पाण्यात मिसळून चिखलात विरून गेलं.

Tags: ग्रामीण कथा कथा धनंजय सानप मरणव्यथा पेशंट रुग्ण डॉक्टर स्टेथोस्कोप रुग्णालय अंबादास गवत भाकरी चटणी रामफळ लिंबू झाड विहीर दुपार मंदिर महादेव न्याहारी पावसाळा वैरण साप बैल Wife Crying Cry Crowd Patient Doctor Stethoscope Hospital Ambadas Grass India Bread Bhakari Chutney Ramfal. Ramphal Lemon Tree Well Afternoon Mahadev Mahadeo Lord Shiva Lord Shiv Rain Snake Buffello weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

धनंजय सानप
dhananjaysanap1@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके