दोन्ही हंगामांतील शिफारशींमध्ये बाह्य घटकांची भूमिका महत्त्वाची आहे. जसं की, हवामानातील बदल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या शिफारशींचा अवलंब करूनही शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता अधिक असते. याबद्दल शेतकरी हरी जाधव (ता. मानवत, जि. परभणी) सांगतात, "रब्बीचा हंगाम ज्वारीसाठी चांगला असतो. म्हणून विद्यापीठाच्या शिफारशी अनुसार सर्व गोष्टींची काळजी घेतली. पण पीक कणसात असताना अवकाळी पावसानं गाठलं. त्यामुळं दाणे काळे पडले. एकरी उत्पादन घटलं." अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या फेऱ्यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी अधिकाधिक उपयुक्तता असणाऱ्या पद्धतीचं आणि धोरणांचा अवलंब करावा लागेल.
राज्यात ज्वारी पीक प्रामुख्यानं खरीप आणि रब्बी हंगामांत घेतलं जातं. कोणत्याही पिकाची उत्पादकता प्रामुख्यानं अवलंबून असते ती जमिनीची प्रत, पाण्याची उपलब्धता, हवामान आणि पीक व्यवस्थापन या घटकांवर. त्यामुळे या प्रकरणात ज्वारीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतची प्रक्रिया आणि अधिक उत्पादकतेसाठी पीक व्यवस्थापन कसं केलं पाहिजे यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आहे. कारण, अनेकदा प्रतिकूल घटकांमुळे उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे पीक शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांच्या सूचना यांचा या प्रकरणात आढावा घेणार आहोत. ज्वारी पीक राज्यातील चारही विभागांत घेतलं जातं. त्यासाठी विविध शिफारशी करण्यात आलेला आहेत.
रब्बी ज्वारी :
रब्बी ज्वारी पिकाला उष्ण आणि कोरडं हवामान पोषक ठरतं. 200 ते 300 मि.मी. पाऊस पडणाऱ्या भागात ज्वारीची लागवड केली जाते. मात्र, ज्वारीच्या उत्पादकतेवर 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तपमान असेल तर ज्वारीचे दाणे भरत नाहीत. तसेच धुक्याचं प्रमाण अधिक म्हणजे 85 टक्के राहिल्यास ज्वारी पिकावर परिणाम होतो. त्यामुळे राज्यातील सोलापूर, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, छत्रपती संभाजीनगर इत्यादी जिल्ह्यांत रब्बी ज्वारीची लागवड केली जाते. कारण या जिल्ह्यांत पावसाचं प्रमाण कमी असतं. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आकडेवारीअनुसार, 29 टक्के ज्वारी भारी जमिनीवर पेरली जाते, तर 48 टक्के मध्यम आणि 23 टक्के रब्बी ज्वारी हलक्या जमिनीवर घेतली जाते. रब्बी ज्वारीसाठी 5.5 ते 8.5 सामू असणारी जमीन योग्य ठरते. खरीपातील पावसावर घेण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं हलक्या जमिनीसाठी फुले माउली, फुले अनुराधा आणि सिलेक्शन 3 वाणांची शिफारस केली आहे. यामध्ये वाणांच्या लागवडीतून हलक्या जमिनीवरही चांगलं उत्पादन आणि कडबा मिळतो. मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा, फुले चित्रा, परभणी मोती आणि फुले माउली या वाणांची लागवड केल्यास उत्पादन चांगलं मिळतं. तसेच भारी जमिनीसाठी फुले यशोदा आणि फुले वसुधा यांसारखे वाण घेण्याची शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राकडून करण्यात आली आहे. या वाणांची निवड जमिनीअनुसार करण्यात आली आहे. जमिनीची प्रत आणि त्यासाठीचे वाण विकसित करून शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीपासून चांगलं उत्पादन मिळवता येऊ शकतं.
रब्बी ज्वारीच्या उत्पादकतेत घट येण्यामागे प्रामुख्याने चार कारणं आहेत. त्यामध्ये जमिनीची निवड, खरिपाच्या ओलाव्यावर पेरणी, शेतकऱ्याकडे उपलब्ध वाणांची लागवड आणि पीक व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष. ज्वारीच्या पिकासाठी विशेष लक्ष देण्याची गरज नाही, अशी धारणा शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे पेरणीपासून अयोग्य पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे उत्पादकता घटते. याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख सांगतात, “एकूण ज्वारी पिकाच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचं आहे. शेतकरी बीज प्रकियेपासून ते खतांच्या वापरापर्यंत अनेकदा अयोग्य पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे उत्पादकता घटत आहे. रब्बी ज्वारीचे एकरी भरघोस उत्पन्न देणारे वाण आम्ही विकसित केले आहेत. परंतु पीक व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही तर उत्पादकता कमी येते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे विद्यापीठांनी किंवा तज्ज्ञांनी सुचवलेल्या पद्धतीचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे".
कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी पंचसूत्री :
1) पाणी व्यवस्थापन रब्बी ज्वारीची पेरणी - जमिनीची नांगरट करून करावी. त्यामुळे जमिनीत पाणी अडून राहण्यास मदत होते. तसेच पाणी अडून ठेवण्यासाठी जमिनीची बांधणी करावी. 10 बाय 12 चौ.मी. आकाराचे वाफे तयार करावेत. ज्वारीच्या दोन ओळींतील अंतर 45 सेंमी ठेवावं. तसेच हेक्टरी 10 किलो बियाणं वापरावं. पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान करावी. जेणेकरून पाण्याचे व्यवस्थापन होऊन 30 टक्के उत्पादनात वाढ होते.
2) जमिनी अनुसार वाणांची निवड राज्यातील रब्बी ज्वारीसाठी प्रामुख्याने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन केलं जातं. आजवर जमिनीच्या प्रकारानुसार विविध वाण कृषी विद्यापीठानं विकसित केले आहेत. त्यामध्ये हलक्या, मध्यम आणि भारी या कोरडवाहू जमिनीच्या तीन प्रकारांनुसार वाणांची निवड केली तर 25 टक्के उत्पादनात वाढ येते. यावर आधारित प्रयोग कृषी विद्यापीठातील ज्वारी सुधार प्रकल्पाद्वारे करण्यात आले आहेत.
3) पेरणीनंतर ओलावा पेरणीनंतर गवत आणि - पिकामध्ये वाढीची चढाओढ लागते. त्यामुळे पहिला एक ते सव्वा महिना पीक गवत होऊ नये याची काळजी घ्यावी. जेणेकरून पोषक अन्नद्रव्यं पिकाला मिळतील. पेरणीनंतर दोन आठवड्यांनी विरळणी करून एका जागी एकच ठोंब राहील अशी व्यवस्था करावी. त्यानंतर पहिली कोळपणी 21 दिवसांनी आणि दुसरी कोळपणी 35 दिवसांनी करावी. गरज असेल तर 1 ते 2 वेळा खुरपणी करावी. ज्वारी पीक 30 दिवसांचं झाल्यास पहिलं पाणी द्यावं. तर दुसरं पाणी 55 दिवसांचं झाल्यास द्यावं. या दोन्ही कालावधीत पाणी दिल्यास उत्पादनात 20 टक्के वाढ होते. बागायती क्षेत्रात 75 आणि 90 दिवसांचं पीक झाल्यास पाणी द्यावं.
4) अन्नद्रव्य नियोजन जीवाणू खतांचा वापर करताना 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम ॲझोस्पिरिलम किंवा पी. एस. बी. प्रक्रिया करावी. त्यामुळे 10 ते 15 टक्के उत्पादनात वाढ होते. तसेच रासायनिक खतांच्या मात्रेत खाली दिलेल्या तक्त्यानुसार वापर करण्याचा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठानं दिला आहे. रासायनिक खतांचा याप्रमाणे वापर केल्यास 10 टक्के उत्पादनात वाढ होते.
5) पीक संरक्षण ज्वारी पिकावर कीडरोगाचा - प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी असते. त्यामुळे पीक संरक्षण महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी. तसेच पेरणीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया करून रोग नियंत्रणात ठेवता येतात. खोडमाशी, खोडकिडा, मावा यांपासून संरक्षण करणं गरजेचं आहे. पीक संरक्षणातून उत्पादनात 10 टक्के वाढ होते.
वरील पंचसूत्री महात्मा फुले कृषी विद्यापीठानं ज्वारी सुधार प्रकल्पातंर्गत ठरवली आहे. त्याचा वापर करून रब्बी ज्वारीची उत्पादकता वाढवता येते. रब्बी ज्वारीच्या कणसांची वाणांनुसार 110 ते 130 दिवसांत कापणी करावी. कापणीनंतर 8 ते 10 दिवस उन्हात वाळवून मग मळणी करावी. धान्य उफणणीनंतर धान्य साठवून ठेवावं.

खरीप ज्वारी :
खरीप ज्वारीची पेरणी प्रामुख्याने 500 ते 900 मी. मि. पाऊस पडणाऱ्या भागात केली जाते. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये खरीप ज्वारीची पेरणी केली जाते. परंतु, खरिपातील ज्वारीला पावसाचा मोठा फटका बसतो. त्यामुळे ज्वारीच्या दाण्याची गुणवत्ता घसरते. खरीप ज्वारीच्या उत्पादनात घट येते. यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं खरीप ज्वारी पेरणी, मशागत, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण यांवर मूलभूत शिफारशी सुचवल्या आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्रात प्रामुख्याने खरीप ज्वारीवर संशोधन केलं जातं. आजवर या संशोधन केंद्रानं ज्वारीचे परभणी मोती, परभणी शक्ती यांसारखे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले आहेत. वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. के. आर. कांबळे सांगतात, "खरिपातील ज्वारीवर ग्रेन मोल्ड (ज्वारी काळी पडणे) रोग पडतो. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना ही समस्या भेडसावते. थोडा पाऊस पडला किंवा वातावरणात आर्द्रता आली तर ज्वारीवर बुरशी येते. शेतकऱ्याने खरीप ज्वारीकडे पाठ फिरवली आहे. यावर आमचा प्रतिकारशक्ती असलेला वाण विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नैसर्गिक घटक जसे की, दाट धुकं, जोरदार पाऊस आला की, खरीप ज्वारीवर ग्रेन मोल्ड रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे धान्यांवर परिणाम होतो. परंतु, तरीही खरीप ज्वारीचं उत्पादन वाढवण्यासाठी ज्वारी संशोधन केंद्रानं जमीन, हवामान, पाणी, अन्नद्रव्ये आणि पीक व्यवस्थापन यांवर शिफारशी केल्या आहेत. त्याचा अवलंब केला तर खरीप ज्वारीचं उत्पादन चांगलं येतं."
जमीन आणि हवामान :
खरीप ज्वारीचा कालावधी मान्सूनचा असतो. त्यामुळे पिकाला पाणी उपलब्ध होतं. परंतु हवामानातील घटकांचा पिकावर परिणाम होतो. पोटरीअवस्थेत असताना पडणाऱ्या पावसाचा फटका खरिपात ज्वारीला बसतो. त्यामुळे ग्रेन मोल्ड प्रतिकारशक्ती असणारा वाण निवडावा. मध्यम, भारी आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत खरीप ज्वारीची उत्पादकता उत्तम येते. तसेच जमिनीचा सामू 6 ते 7 असावा. कमी पाण्यावर उगवून येणारं पीक असल्यामुळे खरिपात पाण्याची गरज सहज पूर्ण होते.
वाणांची निवड :
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथील ज्वारी संशोधन केंद्रानं निर्माण केलेल्या परभणी शक्ती या ज्वारीच्या वाणाची शिफारस केली आहे. परभणी शक्ती 5 ते 6 फूट वाढणारा वाण आहे. त्याच्या कणसांचा परिपक्वतेचा काळ समान आहे. तसेच त्याचं ताट उंची मर्यादित असल्यानं जमिनीवर पडत नाही. काढणीच्या वेळी पडलेल्या ताटाची काढणी कशी करायची, अशी समस्या शेतकऱ्यांसमोर उभी असते. त्यामुळे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्रानं परभणी शक्ती वाण विकसित केले आहे. तसेच कमी आणि मध्यम कालावधीत येणाऱ्या खरीप ज्वारीच्या वाणांची शिफारस केली आहे. त्यामध्ये कमी कालावधीसाठी संकरित वाणांमध्ये सीएसएच 14, सीएसएच 17, सीएसएच 01, सीएसएच 06 आणि सीएसएच 23 या वाणांची निवड करता येते. साधारणात 95 ते 105 दिवसांत काढणीला येणारे वाण आहेत. तर सरासरी 11 ते 20 एकरी उत्पादन या वाणातून मिळते. तसेच कडबा सरासरी 32 ते 35 क्विंटल उत्पादन मिळतं. मध्यम कालावधीसाठी सीएसएच 09, सीएसएच 05, सीएसएच 10, सीएसएच 11, सीएसएच 18, सीएसएच 16, सीएसएच 840, सीएसएच 25 इत्यादी 100 ते 120 दिवसांमध्ये काढणीस येणाऱ्या संकरित वाणाची शिफारस करण्यात आली आहे. या वाणांची सरासरी एकरी उत्पादकता 18 ते 20 क्विंटल आहे. तर सरासरी एकरी कडबा उत्पादन 35 ते 40 क्विंटल आहे. तसेच काही सुधारित वाणही कृषी विद्यापीठाने सुचवले आहेत. त्यामध्ये पीव्हीके 400, पीव्हीके 801, एसरीव्ही 462, एसपीव्ही 1616, पीव्हीके 809 आणि पीव्हीके 23 या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. या वाणांचे सरासरी एकरी उत्पादन 14 ते 15 क्विंटल आहे. तर कडब्याचं उत्पादन सरासरी एकरी 35 ते 50 क्विंटल आहे.
खरीप ज्वारीची पेरणी आणि मशागत :
खरीप पेरणीच्या पूर्वीच उन्हाळ्यात शेताची नांगरणी करून घ्यावी. तसेच आडव्या आणि उभ्या औताच्या पाळ्या कराव्यात. पिकाला पोषक सेंद्रिय अन्नद्रव्यासाठी शेवटच्या पाळीपूर्वीच 12 ते 15 गाड्या शेणखत जमिनीत टाकावं. त्यामुळे पेरणीनंतर कुजलेल्या शेणखताचा वापर पिकाला होतो. मान्सूनच्या पावसाचं आगमन झाल्यानंतर साधारण वाफसा येताच पेरणी करावी. उशिरा पेरणी टाळावी. जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पेरणी केली तर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता येतो. संकरित वाणाची निवड केली तर हेक्टरी 7.5 किलो बियाणे वापरावं. सुधारित वाण असेल तर 10 किलो बियाणे वापरावं. पाभरीच्या साहाय्याने पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 45 सें.मी., तर दोन रोपांतील अंतर 15 सें.मी. ठेवावं. तर हेक्टरी रोपांची संख्या 1 लाख 80 हजारांपर्यंत ठेवावी, अशी शिफारस ज्वारी संशोधन केंद्र परभणी प्रमुख डॉ. कांबळे यांनी केली आहे.
खरीप ज्वारीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावं. पेरतेवेळी अर्धे नत्र आणि संपूर्ण पालाश जमिनीत पेरावं. तर नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर 1 महिन्यानं द्यावी. आंतरमशागत करताना खरिपात वारंवार तणाची वाढ होत राहते. पिकावर परिणाम होतो. त्यामुळे दीड महिन्याच्या कालावधीत दोन खुरपणी आणि कोळपणी करावी. खरिपात पावसानं दडी मारल्यास पिकाला ताण पडू न देता पाणी द्यावं. पिकाची काढणी कणसातील दाणे परिपक्व झाल्याशिवाय करू नये. कणसाचा दांडा पिवळा झाला की पीक पक्व होतं. दाण्यामध्ये 25 ते 30 टक्के ओलाव्याचं प्रमाण असताना कापणी करून घ्यावी. ज्वारीच्या दाण्याचा ओलावा कमी झाला की त्याची मळणी करून करून घ्यावी. खरिपातील ज्वारीची साठवणूक करण्यापूर्वी उन्हात वाळवत घातल्यास बुरशीजन्य किडीचा प्रादुर्भाव होत नाही, अशी शिफारस परभणी येथील ज्वारी संशोधन केंद्राकडून करण्यात आली आहे.
ज्वारीच्या दोन्ही हंगामांतील चांगल्या उत्पादनासाठी वरील पद्धतीचा वापर केला तर शेतकऱ्यांना एकरी धान्य आणि कडबा उत्पादन चांगलं मिळू शकतं. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. परंतु, यातील वरील दोन्ही हंगामांतील शिफारशींमध्ये बाह्य घटकांची भूमिका महत्त्वाची आहे. जसं की, हवामानातील बदल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या शिफारशींचा अवलंब करूनही शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता अधिक असते. याबद्दल शेतकरी हरी जाधव (ता. मानवत, जि. परभणी) सांगतात, "रब्बीचा हंगाम ज्वारीसाठी चांगला असतो. म्हणून विद्यापीठाच्या शिफारशीअनुसार सर्व गोष्टींची काळजी घेतली. पण पीक कणसात असताना अवकाळी पावसानं गाठलं. त्यामुळं दाणे काळे पडले. एकरी उत्पादन घटलं." अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या फेऱ्यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी अधिकाधिक उपयुक्तता असणाऱ्या पद्धतीचं आणि धोरणांचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाची आणि संशोधन संस्थेच्या आधुनिकतेची सांगड घालून यातून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी कल्याणकारी राज्यव्यवस्थेला सक्रिय भूमिकेत राहावं लागेल. संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे,
'पिकवावे धन ज्याची आस करी जन
पुरोनि उरे खाता देत नव्हते खंडन मविता
खोलीं पडे ओलीं बीज तरीच हाती लागे निज'
पेरणी करताना चांगलं बियाणे आणि मशागत किती महत्त्वाची असते, याचं वरील वर्णन तुकोबांनी करून ठेवलं. त्याचा ध्यास शेतकऱ्यांनीही ठेवला पाहिजे.
(यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने 2021 मध्ये शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप ललित वैचारिक (नॉनफिक्शन) अभ्यास-संशोधनासाठी तीन तरुणांना दिली होती. त्यातील एक असलेल्या धनंजय सानप याने 'ज्वारी' या पिकाचा विविधांगी अभ्यास केला असून, त्यावर आधारित लिहिलेली 10 ते 12 भागांची मालिका साधनातून 'ज्वारीची कहाणी' या नावाने पुढील अडीच-तीन महिन्यांत क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या