डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रधानसरांची पहिली अविस्मरणीय भेट

उठून दरवाजा उघडला तो माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसू नये असे वाटले. पांढऱ्या शुभ्र खादीच्या कपड्यातील प्रसन्न चेहऱ्याचे हसरे व्यक्तिमत्त्व असणारे शुभ्र चांदणे उभे होते. मी सरांचे स्वागत केले. सर बसले; पण लगेच उठले. घरभर लहान मुलासारखे फिरले. पत्नीशी, मुलांशी बोलले. पुस्तकाचं कपाट उघडून पुस्तकं पाहिली. फराळाचं दिल्यावर बाउल हातात घेऊन फिरता फिरता बोलत बोलत खात होते. एवढी मोठी व्यक्ती, पण किती अनौपचारिकपणे वागत होती व अनेक वर्षांचा परिचय असल्यामुळे आमच्याशी समरस झाली होती! स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात एक स्वातंत्र्ययोद्धा माझ्या घरी आल्याचा मला झालेला आनंद सरांच्या अनौपचारिक वागण्यामुळे औपचारिकपणे साजरा करता आला नाही.

ग. प्र. प्रधानसरांनी विविध क्षेत्रांत अत्यंत मनस्वीपणे मुशाफिरी केली व आपल्या यशस्वी कर्तृत्वाची प्रत्येक क्षेत्रावर मोहोर उमटवली. स्वातंत्र्यसैनिक, प्राध्यापक, समाजवादी पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते, राष्ट्र सेवा दलातील प्रबोधनकार, विधिमंडळ सदस्य, ललित तसेच वैचारिक लेखन करणारे लेखक- असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत. माझा सरांशी जो अप्रत्यक्ष परिचय झाला तो त्यांच्या ‘साता उत्तराची कहाणी’ या राजकीय बखरीच्या वाचनामुळे! सन 1986 मध्ये मी ही राजकीय कादंबरी वाचली व माझ्या राजकीय सामान्यज्ञानात भर पडल्यामुळे भारावून गेलो. परिणामत: मी सरांना पत्र पाठवले. त्यांचे लगेच उत्तर आले. ते उत्तर माझ्या अंगावर मूठभर मांस चढवणारे होते. प्रस्तुत कादंबरीच्या माझ्या आकलनाची प्रशंसा करण्याबरोबर माझे अक्षर व मांडणी यांबद्दलही कौतुकाचे चार शब्द लिहिलेले होते. पुढे मी सरांचे लेखन जसजसे मिळत गेले व जसजसे प्रसिद्ध होत गेले तसतसे वाचत राहिलो. त्यांच्या लेखनातील स्फटिकवत सुस्पष्टता व प्रासादिकता हे महत्त्वपूर्ण गुण मला त्यांचे लेखन वाचायला प्रवृत्त करत होते.

त्यांच्या लेखनाशी मी परिचित होण्याअगोदर त्यांच्या एका पुस्तकाबद्दल माध्यमिक विद्यालयात असताना ऐकले होते. ते पुस्तक त्यांनी व प्रा.अच्युत केशव भागवत यांनी मिळून लिहिलेले होते. म.गांधींवरचे हे पुस्तक गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने 1969 मध्ये लिहून प्रकाशित केले असणार! एस.एस.सी. बोर्डाने ते ‘रॅपिड रीडर’ म्हणून अकरावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नेमलेले होते. पुस्तक मला पाहायला मिळाले तेव्हा मी आठव्या इयत्तेत होतो. नियंत्रित शब्दसंग्रहाचा वापर करून म. गांधींजीचे जीवन परिचित करून देण्याचा पुस्तक लेखनामागील हेतू होता, हे मला कळले होते. थोडक्यात, सरांच्या इंग्रजीतील लेखनाशी मी त्यांच्या मराठीतील लेखनाआधी परिचित झालो होतो. ते पुस्तक वाचून पाहिल्याचेही मला स्मरते. इंग्रजीतील ते लेखन कितपत कळले असेल हा मुद्दा अर्थातच अलाहिदा!

2004 मध्ये सरांचे Pursuit of Ideals नावाचे इंग्रजीत लिहिलेले आत्मचरित्र (मराठीत ते ‘माझी वाटचाल’ या नावाने आले आहे.) प्रसिद्ध झाले. मी ते लगेचच वाचले. त्या पुस्तकाविषयी लिहावे असे मला तीव्रतेने वाटले. मी इंग्रजीत लिहिले व तो लेख Brain Tonic या डॉ. मंगला वरखेडे यांनी संपादित केलेल्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. नंतर मी Makers of Indian Literature या मालेतील साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेले व 1995 मध्ये प्रसिद्ध झालेले सरांचे Sane Guruji या शीर्षकाचे इंग्रजी पुस्तक वाचले. त्याही पुस्तकावर इंग्रजीत लिहिलेला लेख वरील नियतकालिकाने प्रसिद्ध केला. याप्रमाणे मी प्रधानसरांचे लेखन लळा लागल्यासारखे वाचत राहिलो. यामध्ये सुमारे साडेसहाशे पानांचा Lokmanya Tilak A Biography हा अ. के. भागवत यांच्यासमवेत सरांनी लिहिलेला ग्रंथ, Indias Freedom struggle : An Epic of Sacrifice and Suffering हा त्यांचा स्वतंत्र ग्रंथ (मराठीत हा ‘स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत’ या नावाने आला आहे) वाचले. साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेला ‘आगरकर लेखसंग्रह’ हा सरांनी संपादित केलेला ग्रंथ, ‘टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद’ व ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शब्दांत’ इत्यादी पुस्तकांचा समावेश होतो.

सरांचा प्राध्यापक पेशाचा वीस वर्षांचा काळ सोडला तर समाजवादी पक्ष व विधिमंडळाचे काम यासाठी त्यांना जो वेळ द्यावा लागला असेल, त्याचा हिशोब करता त्यांनी आपले वाचन-संशोधन व लेखन यातील सातत्य बिघडू दिलेले नाही, असे स्पष्ट दिसते. याचे मुख्य कारण वाचन-संशोधन व लेखन ही त्रयी त्यांनी ‘मर्मबंधातील ठेव’ म्हणून जपलेली होती. साधना साप्ताहिकाचे संपादकपद व त्या निमित्ताने केलेले लेखन हे त्यांच्या मूळ प्रकृतीला अनुरूप होते.

सरांच्या लेखनाशी असा अप्रत्यक्ष जोडला गेलेला मी त्यांच्याशी प्रत्यक्ष परिचित झालो, ती हकिकत मला फारच सुखावणारी आहे. सन 1997 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्या वर्षी सरांनी काही कार्यक्रमानिमित्ताने नाशिक व धुळे जिल्ह्यातील साक्री असा दौरा केला होता. नाशिक येथे गोविंदराव तळवलकर यांच्या ‘सत्तांतर’ या पुस्तकाच्या तिसऱ्या खंडाचे प्रकाशन प्रधानसरांच्या हस्ते ठेवलेले होते. सायंकाळच्या त्या कार्यक्रमानंतर सरांचा नाशिकला मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी साक्रीला प्रस्थान ठेवले.

साक्रीला शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे यांच्या तीन वर्षांच्या विधिमंडळातील वृत्तान्ताचे प्रकाशन सरांच्या हस्ते होणार होते. जयवंतराव ठाकरे यांनी सरांना सोबत व्हावी म्हणून नाशिकस्थित एका शिक्षक कार्यकर्त्याची योजना केलेली होती. सरांची गाडी सटाणामार्गे साक्रीला जाणार होती. सटाण्याच्या वेशीत गाडी शिरताच सरांनी मला भेटण्याचा बेत संबंधित शिक्षकांना सांगितला. योगायोगाने ते शिक्षक मला ओळखत होते (तेव्हा मी तिथे प्राध्यापक होतो.) गावात येताच त्यांनी माझा पत्ता काढला व सकाळी नऊच्या सुमारास दारावरची बेल वाजली. तो दिवस रविवारचा होता, सुट्टी असल्यामुळे मी ‘वेध महामानवाचा’ हे श्रीनिवास सामंत यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तक वाचत होतो. उठून दरवाजा उघडला तो माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसू नये असे वाटले. 

पांढऱ्या शुभ्र खादीच्या कपड्यातील प्रसन्न चेहऱ्याचे हसरे व्यक्तिमत्त्व असणारे शुभ्र चांदणे उभे होते. मी सरांचे स्वागत केले. सर बसले; पण लगेच उठले. घरभर लहान मुलासारखे फिरले. पत्नीशी, मुलांशी बोलले. पुस्तकाचं कपाट उघडून पुस्तकं पाहिली. फराळाचं दिल्यावर बाउल हातात घेऊन फिरता फिरता बोलत बोलत खात होते. एवढी मोठी व्यक्ती, पण किती अनौपचारिकपणे वागत होती व अनेक वर्षांचा परिचय असल्यामुळे आमच्याशी समरस झाली होती! स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात एक स्वातंत्र्ययोद्धा माझ्या घरी आल्याचा मला झालेला आनंद सरांच्या अनौपचारिक वागण्यामुळे औपचारिकपणे साजरा करता आला नाही. त्या वेळी मोबाइल नव्हते, फोटोग्राफरला बोलावून सरांचा सत्कार करून कुटुंबीयांसमवेत ग्रुप फोटो घ्यायची चालून आलेली नामी संधी आमच्या भारावलेपणात आमच्याकडून हुकली. सरांना साक्रीला वेळेवर पोहोचायचे असल्यामुळे त्यांनी थांबावे अशी माझी तीव्र इच्छा असूनही आग्रह करता आला नाही. त्यांना माझी घालमेल लक्षात आली असावी. म्हणून वेळ असल्यास मी त्यांच्या सोबत साक्रीला यावे असे त्यांनी सुचवले. मी क्षणार्धात होकार दिला.

प्रवासात प्राधान्याने शेक्सपियरच्या नाटकांबद्दल मला सरांच्या मुखाने ऐकायला मिळाले. शेक्सपियर समजून घेण्यासाठी प्राथमिक पातळीवरचे उपयुक्त पुस्तक म्हणून त्यांनी Tales from Shakespeare या Charles Lamb यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. वाटेत नदी पाहायला मिळाली की, सर हात जोडून वाहत्या नदीला वंदन करत. वाटेत पारनेर नावाच्या गावाची पाटी वाचली, पुढे तादाराबाद नावाचे गाव लागले, नंतर पिंपळनेर! सरांना मौज वाटली व नगर जिल्ह्यात याच नावांची गावं असल्याची आमची चर्चा रंगली. महपतीबुवा कांबळे तादाराबादकर हे आमच्या इकडच्या तादाराबादचे असावेत असे मला त्यांच्या भाषेवरून वाटते, असे त्यांना सांगितल्यावर सरांना कुतूहलजनक वाटले. अर्थात त्या काळच्या भाषिक एकजिनसीपणामुळे मी माझे निरीक्षण मांडले असावे.

तर अकरा वर्षांपूर्वी मी पाठवलेल्या पत्राचे स्मरण जागृत करून सर मला घरी येऊन भेटले होते. नंतर मात्र सरांना मी वेळोवेळी पत्रं पाठवत राहिलो. त्यांच्या पुस्तकांवरचे माझे लेखनही पाठवत राहिलो. सरांचे पोस्टकार्डवर आनंद प्रकट करणारे उत्तर यायचे. आपल्या अंगीकृत कार्यात रममाण होऊन आनंदात जगायचे हा त्यांचा आमच्यासारख्यांपुढचा आदर्श म्हणजे आहे. इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांवरचे प्रभुत्व त्यांनी संशोधनपर, वैचारिक लेखनाद्वारे प्रकट करून आजन्म व्यासंगाचे दर्शन घडवले, हा बोध घेण्याचा प्रयत्न शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींनी करायला हवा. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि पारदर्शक आचरणशैली यांचा त्रिवेणी संगम असलेल्या प्रधानसरांच्या अनेकानेक स्मृतींना मी वंदन करतो.
 

Tags: प्रधान जन्मशताब्दी प्रारंभ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके