डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कृतार्थतेने व कृतज्ञतेने आयुष्य जगलेले विक्रम साराभाई

श्रीमंत कुटुंबात जन्मलेले साराभाई यांनी अवकाशविज्ञान, संज्ञापन, हवामानशास्त्र, कृषी, भूमिउपयोग योजना, आपत्तीशोध, शिक्षण, वैद्यक इत्यादी क्षेत्रांत पायाभूत काम करून नवभारताचे स्वप्न साकार करण्याचे वयाच्या बावन्न वर्षांपर्यंत अथक प्रयत्न केले. डॉ.होमी भाभांप्रमाणेच साराभाई अल्पायुषी ठरले, नाही तर या दोघांनी भारताला वेगळाच चेहरा मिळवून दिला असता. पहिले पंतप्रधान पं.नेहरूंना या दोन्ही शास्त्रज्ञांचा मोठा अभिमान वाटत होता. प्रचलित अत्याधुनिक तंत्रज्ञानात्मक साधनांचा वापर करून भारताचा जलद गतीने विकास घडवून आणण्याचे साराभाईंचे ध्येय होते. त्या ध्येयपथावरून प्रत्येकाने जमेल तशी वाटचाल करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

‘करंट सायन्स’ या पाक्षिकाच्या 25 एप्रिल 2020 च्या अंकात (खंड 118, क्रमांक 8) नेहमीच्या सदरांबरोबर विख्यात भौतिकी, अणुऊर्जा शास्त्रज्ञ, अवकाश शास्त्रज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ, व्यावसायिक, नवभारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक संस्थांचे संस्थापक अशा विविध नात्यांनी दिगंत कीर्ती प्राप्त केलेले विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (जन्म : 12 ऑगस्ट 1919, मृत्यू : 31 डिसेंबर 1971) त्यांच्या बहुआयामी कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या साराभाईंबरोबर काम करण्याची संधी प्राप्त झालेल्या थोर व्यक्तींनी लिहिलेल्या सेहेचाळीस पृष्ठांचा एक विशेष विभाग समाविष्ट केला आहे. त्यामध्ये चार पृष्ठे ही साराभाई यांच्या बालपणापासून निधनापर्यंत विविध आठवणी जागृत करणाऱ्या छायाचित्रांची आहेत. ‘करंट सायन्स’ हे पाक्षिक करंट सायन्स असोसिएशन आणि इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसद्वारा बेंगळुरू येथून प्रकाशित केले जाते.

या विशेष विभागात एकूण तेरा लेख आहेत आणि इस्रोचे (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) माजी अध्यक्ष के.कस्तुरीरंगन यांची प्रस्तावना आहे. इस्रो ही संस्था हे साराभाईंच्या सर्जनशील विचारांचे अपत्य (ब्रेन चाइल्ड) असल्याचे सर्वविदित आहे. ई.व्ही. चिटणीस हे यूआरएल : फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, अहमदाबाद येथे कार्यरत होते. नंतर ते साराभाईंचे इस्रोतील निकटतम सहकारी होते. त्यांच्या लेखात त्यांनी सारभाईंचे वर्णन ‘शास्त्रज्ञ, व्यावसायिक, दूरदृष्टीने संस्था उभ्या करणारे’ असे केले आहे. इस्रोच्या अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन केंद्राचे निवृत्त संचालक प्रफुल्ल भावसार यांनी साराभाईंच्या सामूहिक (कॉर्पोरेट) कार्यपद्धतीविषयी प्रकर्षाने लिहिले आहे. अशा कार्यपद्धतीत कोणी राजा नसतो, कोणी प्रजा नसते, कोणी गुन्हेगार नसतो, कोणाला शिक्षा होत नसते. सर्व धर्माचरण (रिईच्युअल्स) करून एकमेकांचे संरक्षण करत असतात, असे एका संस्कृत श्लोकाच्या आधारे स्पष्ट केले आहे. ‘वैज्ञानिक समूहात काम करताना साराभाईंएवढ्या गुणवत्तेच्या कोणाही व्यक्तीला मी भेटू शकलो नाही,’ अशी प्रतिक्रिया साराभाईंच्या काही आठवणी नमूद करून भारतरत्न सी.एन.आर. राव यांनी व्यक्त केली आहे.

कृषितज्ज्ञ एम.एम. स्वामिनाथन यांनी साराभाईंचा उल्लेख वैज्ञानिकांचे वैज्ञानिक असा केला आहे. दिल्ली राज्यातील गव्हाची शेते पाहिल्यावर (1967 मध्ये) स्वामिनाथन यांना साराभाई म्हणाले की, हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. दूरदर्शनच्या साधनांचा व रिमोट सेन्सिंगचा वापर करून हे सहज शक्य वाटल्यामुळे त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटून दूरदर्शनवरील ‘कृषिदर्शन’ कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक प्रमोद काळे यांनी साराभाईंचा उल्लेख ‘दूरदृष्टीची प्रेरणा देणारी व्यक्ती’ असा केला आहे. साराभाईंच्या भाषणांमधील विचार खूपच प्रेरणादायी असल्याचे त्यांचे प्रतिपादन महत्त्वपूर्ण आहे.

पुणे येथील ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स’ संस्थेत सध्या कार्यरत असलेले व उटी येथील उंच टेकडीवर रेडिओ टेलिस्कोप बसवणारे गोविंद स्वरूप यांनी साराभाईंबरोबर ज्या चर्चा झाल्या होत्या, त्या नमूद केल्या आहेत. गोविंद स्वरूप हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत असताना साराभाईंनी त्यांच्यावर रेडिओ टेलेस्कोप बसवण्याची जबाबदारी सोपवली होती. मोठी स्वप्ने पाहणाऱ्या व त्यामुळे आपल्याला चंद्राकडे जाता येत आहे असे वर्णन करून अमृता शाह यांनी नावीन्यपूर्णता, उपक्रम, सुधारणा ही साराभाईंच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये नमूद केली आहेत. आर.बी. ग्रोव्हर (होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई येथील ॲटोमिक एनर्जी कमिशनचे सदस्य) व एम.आर. श्रीनिवासन (उटकमंड येथील ॲटामिक एनर्जी कमिशनचे माजी चेअरमन) यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या लेखात भारतातील अणुऊर्जा विकासासाठी साराभाईंची जी दृष्टी होती, तिचा ऊहापोह केला आहे. 

अभिजित सेन (गांधीनगर येथील प्लाझ्मा रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत) यांनी भारतीय एकसंधन (फ्युजन) कार्यक्रमाच्या साराभाईंच्या अकथित वारशाबद्दल लिहिले आहे. अवकाशशक्तीबद्दलची साराभाईंची दृष्टी व त्यासाठी केलेले काम याबद्दल बेंगळुरू येथील इस्रोत काम केलेले शास्त्रज्ञ आर.अरावमुदन यांनी लिहिले आहे. इस्त्रोतील यच्चयावत उपक्रमांबद्दल त्यांच्या लेखात माहिती मिळते. अरावमुदन यांनी ‘इस्रो : अ पर्सनल हिस्टरी’, हार्पर कॉलिन्स, 2017 हे पुस्तकही लिहिले आहे. हे पुस्तक त्याच वेळी मी मोठ्या कुतूहलाने वाचले होते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर अरावमुदन व भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे उकाड्यामुळे सदरा काढून बनियनवर प्रॉपेलंट बनवतानाचे छायाचित्र आहे. सुरुवातीला इस्रोमध्ये पंखे नव्हते. सार्वजनिक बस वा सायकलीने शास्त्रज्ञ ये-जा करत असत.

कार्तिकेय साराभाई (साराभाईंचे सुपुत्र व अहमदाबाद येथील पर्यावरण शिक्षण केंद्रात कार्यरत असलेले) व पद्मनाभ जोशी (अहमदाबाद येथील नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंटच्या विक्रम साराभाई पुराभिलेखागारमध्ये कार्यरत) यांच्या संयुक्त लेखात विकसनशील राष्ट्रांसाठी विज्ञानाच्या योगदानाबद्दलचा ऊहापोह केला आहे. आपले पुत्र कार्तिकेय यांनी मानव आणि निसर्ग यांच्या संतुलनासाठी संस्था काढावी यासाठी साराभाईंनी प्रेरणा दिली. इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात कार्यरत असलेल्या जोसेफ फ्रैंकोब यांनी साराभाईंच्या ‘क्षितिजसमांतर नियंत्रण’ प्रशासनपद्धतीचा परिचय करून दिला आहे. अहमदाबाद येथील भारतीय व्यवस्थापन संस्था व इतर सर्व संस्था यांमध्ये या पद्धतीनेच कार्यसंस्कृती विकसित केली. टी-ग्रुप म्हणजे निरीक्षणातून परस्परसंबंध व संज्ञापनकौशल्ये विकसित करणे. भाभांनी रुजवलेली अंतर्निहित नियंत्रण आणि अंगीकृत कार्याशी बांधिलकी व पर्यवेक्षणाची खुली पद्धत याचेच साराभाईंनी क्षितिजसमांतर नियंत्रण प्रशासनपद्धतीत विकसन केले.

श्रीमंत कुटुंबातील साराभाई यांनी अवकाश-विज्ञान, संज्ञापन, हवामानशास्त्र, कृषी, भूमिउपयोग योजना, आपत्तिशोध, शिक्षण, वैद्यक इत्यादी क्षेत्रांत पायाभूत काम करून नवभारताचे स्वप्न साकार करण्याचे वयाच्या बावन्न वर्षांपर्यंत अथक प्रयत्न केले. साराभाईंचा मृणालिनी स्वामिनाथन या शास्त्रीय नर्तक यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. कार्तिकेय हा मुलगा व मल्लिका ही मुलगी. कुटुंबातील चारही व्यक्तींना भारत सरकारने त्यांच्या योगदानाबद्दल पद्म पुरस्काराने सन्मानित केले. डॉ.होमी भाभांप्रमाणेच साराभाई अल्पायुषी ठरले, नाही तर या दोघांनी भारताला वेगळे स्थान मिळवून दिले असते. पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरूंना या दोन्ही शास्त्रज्ञांचा मोठा अभिमान वाटत होता.

प्रचलित अत्याधुनिक तंत्रज्ञानात्मक साधनांचा वापर करून भारताचा जलद गतीने विकास घडवून आणण्याचे साराभाईंचे ध्येय होते. त्या ध्येयपथावरून प्रत्येकाने जमेल तशी वाटचाल करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Tags: जवाहरलाल नेहरू शास्त्रज्ञ दिलीप धोंडगे तंत्रज्ञान विज्ञान विक्रम साराभाई weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके