"राणी साहिबा आपके लिये हेलिकॉप्टर तयार है! आपके पास 45 मिनिटका समय है! लाखो लोग आपके महलपर हमला करेंगे. सब कूच खतम हो जायेगा. आपकी जान हमे बचानी है. आपका समय शुरू होता है अब! आप राजा को फोन कर सकते है." काही दिवसांपूर्वीच याच देशाच्या नव्वद टक्के लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. मग अचानक असे कसे झाले? राणी पूर्णपणे दुःखी पुरस्कार मिळाल्यागत! ती लाखो लोकांची झुंड खरेच आपल्याला जिवंत जाळेल? राणीचे शरीर थरथर कापू लागते. हळूच ती एक फोन लावते आणि हेलिकॉप्टरमध्ये बसते. शहाण्या मुलागत! आता मात्र फारच मोठी पंचाईत झालेली असते. राणीकडून भरपूर पैसे कमवायचे आहेत, त्या देशाला पूर्णपणे लुटायचे आहे, सगळे काही ओरबाडायचे आहे अशा मोठमोठ्या योजना केलेला राजाचा मित्र एकदम थंडगार! काय करावे त्याला काही सुचत नाही. राजाही परेशान!
एक राजा असतो. असतो मोठा पराक्रमी. गरिबी त्याने पाहिलेली असते. गरिबांचे दुःख त्याला माहीत असते. आपल्या अक्कलहुशारीने, आपल्या पराक्रमाने त्याने राज्य जिंकलेले असते. आपल्यावर लोक जीव तोडून प्रेम करतात, हे त्याला माहीत असते. गोरगरिबांना फक्त कसेबसे जिवंत राहता येईल इतकंच अन्नधान्य तो लोकांना देत असतो. तरीही लोक खूश असतात. दिवसेंदिवस अशाच प्रजेची संख्या वाढत असते. तसे पाहिले तर, राज्य फार मोठे असते. खनिजे, शेतीबाडी, उद्योगधंदे जोरात चालू असतात. राज्याच्या बाजूला समुद्रकिनारा असतो. जहाजे येत जात असतात. राज्यात मोठमोठाले विमानतळ असतात. चांगले रस्ते, रेल्वे, सर्व काही असते. खऱ्या अर्थाने समृद्धी असते. पण प्रजा मात्र दिवसेंदिवस गरीब होत असते.
लोक म्हणतात, 'राजाचा एक मित्र आहे. तो खूप श्रीमंत आहे. त्यानेच राजाला 'राजा' बनण्यासाठी मदत केली.' आता राजा तसा जिगरबाज. दोस्ती निभावणारा माणूस! मित्रासाठी काहीही करायला तयार. लोकसुद्धा राजाच्या मागे उभे. हा राजाचा मित्र खूप खूप श्रीमंत असतो. पण खूप महत्त्वाकांक्षीसुद्धा असतो. त्याला आणखी श्रीमंत व्हायचे असते. त्याचे स्वप्न असते, जगातील सर्वात श्रीमंत माणूस व्हायचे. राजा त्याच्यासाठी काहीपण करायला तयार असतो. त्याला समुद्रातले बंदर पाहिजे - बंदर देतो. त्याला कोळशाच्या खाणी पाहिजे - खाणी देतो. जंगल पाहिजे जंगल देतो. विमानतळ पाहिजे - विमानतळ देतो. रस्ते तोच बनवतो. सिमेंटचे कारखाने त्याचेच. वीज पुरवठा करायचा कर बाबा. त्याची नजर ज्या धंद्यावर पडेल ते त्याचेच होते. मोठमोठ्या शहरांतील जमिनी त्याला मिळतात. तो हळूहळू आपले स्वप्न पूर्ण करत असतो.
राज्यातले जवळपास सगळेच मोठाले धंदे राजाच्या मित्राने ताब्यात घेतलेले असतात. आता त्याची नजर जगभर पसरलेल्या वेगवेगळ्या देशांवर पडते. मग तो राजमित्र राजाच्या मागे लागतो. दुसऱ्या देशांतही धंदा करायचा. मदत करा. राजा तसा हुशार. जगाच्या तुलनेत सगळ्यात जास्त मनुष्यबळ त्याच्याच राज्यात. मग आता इतक्या मोठ्या राज्याचा राजा म्हणले तर इतर देशांचे राजे, राण्या त्याला टरकून असतात. त्याच्याबद्दल आदरयुक्त भीती बाळगून असतात. बाहेरील सर्वच देशांना माहीत असतं की, जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या राज्याचा हा प्रमुख आहे. तिथले लोक गरीब असले, तरी जगभरातील अनेक राज्यांना श्रीमंत करण्याची ताकद असलेली बाजारपेठ तिथेच आहे. मग ते राजाला खूश करतात.
राजा पृथ्वीचा गोल हातात घेतो. आता कुठल्या देशात जायचे ते ठरवतो. मग आपल्या अधिकाऱ्यांना सांगतो, या देशांकडून आपण आपल्या देशासाठी काय काय विकत घेऊ शकतो. त्याची यादी तयार होते. मग त्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या आपल्या राज्यातील मूळ लोकांची यादी तयार केली जाते. आपल्या राज्यातील हजारो लोकांना तिकडे महिनाभर आधीच पाठवले जाते. राजा तेथे गेला की परकीय धोरण, वगैरे फालतू गोष्टींवर चर्चा करण्याऐवजी सरळ स्टेडियममध्ये हजारो लोकांना बोलावून कार्यक्रम करतो. त्याचे व्हिडिओ आपल्या राज्यातील लोकांना दाखवले जातात. त्याच्या राज्यातील लोकही आनंदाने नाचू लागतात. आपला राजा आपल्या देशातच नाही, तर जगात सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. तो आहे खरा चक्रपाणी सम्राट! असा राजा मिळणे म्हणजे आपले शंभर जन्माचे पुण्य फळास येणे. लोक खूप काही बोलत असतात.
कार्यक्रम झाल्यावर राजा चेकबुक घेऊनच तेथे गेलेला असतो. त्या देशांकडून खरेदी केली जाते. जास्त घासाघीस, सौदेबाजी होत नाही. राजाची अपेक्षा फार काही नसते. त्याच्या दोस्ताला धंदा मिळाला की झाले! एकदम सोपे काम! मग दुसऱ्या देशातील उद्योगपती राजाच्या दोस्ताबरोबरच भागीदारी करतात. आणि त्या राजाच्या राज्यालाच लागणाऱ्या वस्तू पुरवतात. मग ती शस्त्रास्त्रे असो किंवा विमाने असो. अव्वाच्या सव्वा किमती लावून राजाच्या दोस्ताला पैसे मिळवून देतात. स्वतः ही भरपूर कमावतात. नुसती मजा मजा चालू असते. मनातल्या मनात म्हणत असतात, 'बरा भेटला राव हा! एकदम मस्त!' हळूहळू अनेक देशांमध्ये त्याचा व्यापार वाढत असतो. राजाही खूश असतो. आपला मित्र जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होतो, यातच त्याची ख़ुशी!
एक दिवस राजाच्या मित्राची नजर पडते समुद्रात असलेल्या शेजारच्या छोट्याशा देशावर. मग काय? लगेच त्या देशात आपण काय करू शकतो याचे नियोजन सुरू होते. तो म्हणतो, 'आपण या छोट्याशा संपूर्ण देशाला वीज पुरवठा करू.' लगेच त्या देशाला निरोप जातो. त्या देशाचा प्रमुख एक मिनिटही लावत नाही. ताबडतोब करार मदार होतात. आजपासून संपूर्ण देशाला वीजपुरवठा राजाचे मित्र करतील, हे जाहीर होते. करारपत्र लोकांच्या समोर येते. विजेचे दर अव्वाच्या सव्वा लावलेले असतात. तसे पाहिले तर, या राजाबद्दल आणि त्यांच्या राज्यातील लोकांबद्दल त्या समुद्रातील छोट्याशा देशातील लोकांच्या मनात प्रचंड आदर असतो. पण अशा लुटीमुळे त्यांच्या मनात चीड निर्माण होऊ लागते. नेमके अशा वेळीच जगभरातील पत्रकार तिथे पोहोचतात. तेथील विद्युत बोर्डाच्या अध्यक्षाला अनेक प्रश्न विचारतात. "कुठलेही टेंडर काढले नाही, मग हा प्रकल्प कसा काय दिला?"
तो अध्यक्ष बिचारा सांगू लागतो, "हा दोन देशांच्या सरकारमधील करार आहे. ती सरकारी कंपनी आहे.”
पण पत्रकारच ते! सगळी माहिती काढलेली असते. “अरे, खरं खरं सांगा... ही तर खाजगी कंपनी आहे."
मग तो अधिकारी गोंधळतो. घाबरतो. लगेच खरे खरे सांगून टाकतो. "त्याचे असे झाले, आपल्या देशाच्या प्रमुखावर राजाचा दबाव होता. 'कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हा प्रकल्प राजाच्या मित्राला द्यावाच लागणार आहे', असं आपल्या देशाच्या प्रमुखानेच सांगितले. मग मी काय करू? देऊन टाकला त्यांना!"
याची माहिती मिळाल्यावर राजा नाराज होतो. मग त्या विद्युत बोर्डाच्या अध्यक्षाला राजीनामा द्यावा लागतो. आपला बयान बदलावा लागतो. राजा आपल्या देशातील लोकांना तर मनावतो. समजावून सांगतो. असे काही नाही, हे सांगतो. लोकही राजावर भरवसा ठेवतात. पण तिथल्या लोकांना सगळे काही समजलेले असते. तिथले लोक नाराज असतात. हळूहळू त्यांची नाराजी वाढत असते. त्यांच्या देशाच्या प्रमुखाचे उटपटांग चाळे आणि उलटेसुलटे धंदे वाढतच असतात. शेवटी लोकांची सहनशक्ती संपते. लाठ्या, काठ्या, कोयते किंवा मिळेल ते हत्यार घेऊन लोक त्यांच्या देशाच्या प्रमुखाच्या घरावर हल्ला करतात. जीव मुठीत ठेवून त्याला देश सोडून पळावे लागते. लोक त्याचा राजवाडा उद्ध्वस्त करतात. मग नवीन सरकार येते. राजाच्या मित्राचे नुकसान होते. पण तो मित्र असतो भयंकर हुशार. काहीतरी करतोच जुगाड!
आता राजाच्या मित्राची नजर पडते शेजारच्या दुसऱ्या देशावर. तेथे राज्य करत असते एक राणी! तिची चांगली मैत्री असते या राजाबरोबर. राजा तिला नेहमी सल्ले देत असतो. अडल्यानडल्या वेळी मदत करत असतो. 'विकास कसा करावा', हे सांगत असतो. 'विरोधकांना कसे काबूमध्ये ठेवावे' हेही सांगत असतो. ती राणीसुद्धा सगळे सल्ले मानत असते. उद्योगपतींना हाताशी धरून विकास करत असते. कापडाचा व्यवसाय वाढवते. लोक खूश असतात. तेथेही या राजाबद्दल लोकांमध्ये आदरभावना असते. राणीसुद्धा राजाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची इमानइतबारे अंमलबजावणी करत असते. पण होते असे की, राजाने आपल्या राज्यातील मूठभर विरोधकांना तुरूंगात टाकलेले असते. पण ती राणी फारच भारी निघते. 'दिसला विरोधक की टाक तुरूंगात! दिसला विरोधक की टाक तुरूंगात!' असे करत करत लाखो विरोधकांना जेलमध्ये पाठवते. एकही विरोधक औषधालासुद्धा बाहेर ठेवत नाही. पण आता राजाच्या मित्राची नजरच त्या देशावर पडली म्हटल्यावर काय होणार?
राजाबरोबर त्याचा धंदेवाला मित्रही तिथे जातो. राणीला सांगण्यात येते, 'दोस्ताला मोठा प्रकल्प द्या.' राजाच ज्याच्यासमोर नतमस्तक आहे, अशा श्रीमंत माणसाला नाही म्हणायची राणीची काय बिशाद! ती लगेच आपल्याकडे असलेल्या बऱ्याच उद्योगधंद्यांच्या गोष्टी सांगू लागते. कापडाचा व्यवसाय असेल किंवा इतर काही. पण राजाचा दोस्त काही साधासुधा नसतो. त्याने आधीच सगळे सेट केलेले असते. राणीच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना आपलेसे केलेले असते. लक्ष्मीची ताकद त्याला माहीत असते. तो चने-फुटाणेवाला कापडाचा बिजनेस नाकारतो. नाराज झाल्यासारखा चेहरा करतो. राजाही थोडासा नाराज दिसतो. राणी घाबरते. हात जोडून सांगते, "मग कोणता प्रकल्प करावा साहेब?"
मग आपल्या तोबऱ्या तोबऱ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलून राजाचा मित्र म्हणतो, "मी तुमच्या संपूर्ण देशाला विद्युत पुरवठा करेल."
त्याचं वाक्य ऐकून राणीला चारशे चाळीस व्होल्टचा झटकाच बसतो. राजा राणीकडे रागाने पाहतो. राणी घाबरत घाबरत सांगू लागते, "आमच्या देशात आम्हाला जितकी गरज आहे, त्यापेक्षा पन्नास टक्के जास्त वीज निर्मिती होते. महाराज, आम्ही आमच्याकडची जादाची वीज दुसऱ्या देशांना पुरवतो. मग आम्ही यांच्याकडून वीज खरेदी करून काय करणार? आमच्याकडे 97 टक्के घरांत स्वस्त दरात वीजपुरवठा केला जातो. दुसरा कुठलाही प्रकल्प सांगा. पण हा नको."
पण धंदेवाला मित्र ऐकत नाही. त्याने आधीच सर्व काही सेट केलेले असते. प्रोजेक्ट रिपोर्ट, करारपत्र आणि तिथले अधिकारीसुद्धा! मग अधिकाऱ्यांना बोलावण्यात येते. राणीला वाटते, अधिकारी समजावून सांगतील. दुसरा प्रकल्प घ्यायला सांगतील. पण कसले काय? अधिकारी बदलतात. 'आपण कोळशाने वीजनिर्मिती करत नाही', असं म्हणतात. राणी हुशार असते. "अरे, कोळशाने वीजनिर्मिती केली तर प्रदूषण होईल ना! त्याचे काय?"
मग बराच वेळ काथ्याकूट! शेवटी राजाच म्हणतो, "असं करा, वीज निर्मिती आमच्या देशात करू. प्रदूषण आमच्या देशात होऊ द्या. पण हा प्रकल्प सुरू करा."
राजाने निर्णय घेऊन टाकला. आपल्या सरदारांना सांगितले, 'शंभर टक्के निर्यात असलेला प्रकल्प आहे. आपल्या सरकारकडे विदेशी मुद्रा येतील. त्याला फुकट जागा द्या. कुठलाही कर घेऊ नका. पूर्ण सहकार्य करा.' मग काय! होते प्रकल्पाची सुरुवात. करार मदार. एका झटक्यात सगळे काही! इकडे प्रजेकडून राजाचे आणि राजमित्राचे खूप कौतुक केले जाते. 'फक्त आपल्या देशातच नाही तर, शेजारच्या देशांतील प्रत्येक घरातील अंधार दूर करणार राजाचा मित्र!' अशा बातम्या सर्वत्र प्रसिद्ध होतात. लोकही आपली छाती अभिमानाने फुगवतात. बिचाऱ्यांना काय माहीत की त्या देशात कुणाच्याच घरात अंधार नव्हता.
आता मात्र दोस्त एकदम खूश! पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागतात, तसतसे तिथल्या लोकांच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येऊ लागतात. एक तर ते स्वतःच वीजनिर्मिती करत असल्याने त्यांना त्याचा भावठाव व्यवस्थित माहीत असतो. कोळशाची किंमत काय? निर्मिती खर्च किती? विजेचा दर किती असायला पाहिजे? पण हा राजमित्र आपल्याला फसवू लागला, हे समजते. मात्र मनाला येईल तसे भाव लावतो, हे कळते. कोळशाच्या किमती जास्त लावतो. निर्मिती खर्च जास्त सांगू लागतो. 'वीज विकत घ्या किंवा घेऊ नका, अमुक अमुक रक्कम द्यावीच लागेल', असे म्हणतो. मग राणीला बसलेला चारशे चाळीस व्होल्टचा झटका हळूहळू त्या देशाच्या हुशार नागरिकांनाही बसायला लागतो. तिथले लोक राजाला खूप मानतात. राजाच्या प्रजेलाही खूप मानतात. पण आता त्या आदराची जागा राग आणि द्वेष घ्यायला लागतात. हळूहळू ते लोक चिडू लागतात. त्यात राणीचा एककल्ली कारभार त्यांना पसंत पडत नाही. पण राणी आपल्याच हस्तिदंती मनोऱ्यात सुखाने बसलेली असते. तिला माहीत असते, तिच्यामागे राजाची महाशक्ती आहे. काही जरी झाले, तरी राजाची सेना येईल. पण कसचे काय!
लोकांचा असंतोष वाढत असतो. विद्यार्थी, कार्यकर्ते, सामान्य लोक रस्त्यावर उतरतात. अचानक तिला त्या समुद्रातल्या छोट्या देशाची आठवण येते. तेथील राष्ट्रप्रमुख जीव मुठीत धरून पळाला होता, हे आठवते. मग ती पोलिसांना बोलावते. 'मारा, ठोका, काहीही करा. हे आंदोलन चिरडले पाहिजे. हे विरोधकांचे कारस्थान आहे.' पोलीस आज्ञा पाळतात. पण मनातल्या मनात विचार करतात, 'साले सगळे विरोधक तर जेलमध्ये आहेत. मग या लाखो लोकांच्या झुंडी कुठून येत आहेत?' तरीसुद्धा राणीच्या आज्ञेचे पालन करतात. काही विद्यार्थ्यांना पकडून आणतात. रात्रभर ठोकून काढतात. गोळीबार करतात. पण लोक मागे हटत नाही. लोकही हिंसक होऊ लागतात. दिसला रे दिसला पोलीस की त्याला बदडून काढतात. अनेक पोलीस ठाण्यांत जाऊन जाळपोळ करतात. पोलिसांना पोलीस ठाण्यांतच जिवंत जाळतात. पोलीस घाबरतात. सैन्याची मदत मागतात. राणी सैन्याच्या तिन्ही प्रमुखांना बोलावते. परत तीच आज्ञा 'मारा, ठोका, काहीही करा. हे आंदोलन चिरडले पाहिजे. हे विरोधकांचे कारस्थान आहे.' सेनाप्रमुख परिस्थितीचा अंदाज घेतात. मनातल्या मनात म्हणतात, 'नही गुरू! नॉट पॉसिबल!' बाहेर जाऊन परिस्थितीचा अंदाज घेतात. राणी आतून घाबरलेली असते. भेदरलेली असते. समुद्रातल्या त्या छोट्याशा देशाच्या प्रमुखाचे फुटलेले घर, त्याच्या सिंहासनावर जाऊन बसलेले सामान्य लोक, अनेकांनी केलेली तोडफोड, राजवाड्यातील सोफा, गाद्या, खुर्चा, पलंग, सामानसुमान यांची झालेली लूट, घाबरलेला राष्ट्रप्रमुख सगळ्याच गोष्टी राणीच्या समोर नाचू लागल्या. राणी गर्भगळीत! आपल्या आलिशान राजवाड्यात तिने मोठ्या चोखंदळ पद्धतीने वेगवेगळ्या देशांमधून आणलेल्या, विविध महागड्या वस्तूंवर तिची नजर पडते. परत तळपायापासून मस्तकापर्यंत एक झटका बसतो. 'आपल्याला हे सर्व सोडून तर पळावे लागणार नाही ना? आपण इतक्या प्रेमाने आणलेल्या वस्तू, आपले ऐश्वर्य, आपली सत्ता, राजगादी, मान- सन्मान, बापरे! सगळं सोडून आश्रित म्हणून जगावे लागेल? नाही... नाही... नाही! आपण आपली माणसं सैन्यप्रमुख म्हणून उगीच बसवलेली आहेत का? ते वाचवतील आपल्याला! आपल्या सत्तेला. आपण कुठेही जाणार नाही. आपल्याला तर मरेपर्यंत राज्य करायचे आहे. आपण तेच तर शिकलो राजाकडून! आपले सैन्याचे सेनापती जनरल येतच असतील गुड न्यूज घेऊन.' राणी थोडा वेळ झोपायचा विचार करते. मागच्या कित्येक दिवसांपासून झोप उडालेली असते.
थोडा वेळ वाट पाहते आणि अलगदपणे डोळा लागतो. सैनिकांनी सर्व आंदोलकांना चिरडलेले आहे. त्यांच्यावर गोळीबार झाला. सर्व लोकांनी माफी मागितली. आपले कार्यकर्ते 'राणी साहिबाकी जय' म्हणत विजय साजरा करत आहेत. तिचे सोनेरी स्वप्न तिच्या चेहऱ्यावरही दिसू लागते. ती गालातल्या गालात हसू लागते. तेवढ्यात खाट... खट... खाट... खट असा बुटांचा आवाज तिच्या कानांवर पडू लागतो. एकदम ती तिच्या स्वप्नातून बाहेर पडते. समोर सेनापतीचा चिंताग्रस्त चेहरा!
"क्या हुआ? वो लोग चले गये? आंदोलन खतम हो गया? हमारे शागिर्द लोग किधर है? हमारा जयजयकार क्यूँ सुनाई नही दे रहा? आप हमारे लोगोंको आने दो." एका झटक्यात राणी पाठ केल्यागत बऱ्याच गोष्टी बोलून जाते.
"राणी साहिबा आपके लिये हेलिकॉप्टर तयार है! आपके पास 45 मिनिटका समय है! लाखो लोग आपके महलपर हमला करेंगे. सब कूच खतम हो जायेगा. आपकी जान हमे बचानी है. आपका समय शुरू होता है अब! आप राजा को फोन कर सकते है."
काही दिवसांपूर्वीच याच देशाच्या नव्वद टक्के लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. मग अचानक असे कसे झाले? राणी पूर्णपणे दुःखी पुरस्कार मिळाल्यागत! ती लाखो लोकांची झुंड खरेच आपल्याला जिवंत जाळेल? राणीचे शरीर थरथर कापू लागते. हळूच ती एक फोन लावते आणि हेलिकॉप्टरमध्ये बसते. शहाण्या मुलागत!
आता मात्र फारच मोठी पंचाईत झालेली असते. राणीकडून भरपूर पैसे कमवायचे आहेत, त्या देशाला पूर्णपणे लुटायचे आहे, सगळे काही ओरबाडायचे आहे अशा मोठमोठ्या योजना केलेला राजाचा मित्र एकदम थंडगार! काय करावे त्याला काही सुचत नाही. राजाही परेशान! ही बाई इथेच येऊन बसली आपल्या उरावर! हे काही चांगले नाही. तिच्या विरोधातले लोक सरकार चालवतील. 'तिला आमच्याकडे पाठवा. तिने अनेक खून केलेले आहेत. तिला अटक करायची आहे. तिला शिक्षा द्यायची आहे. तिला फाशी द्यायची आहे.' अशा अनेक मागण्या आपल्याकडे करतील, हे राजा ओळखून असतो. त्या देशाच्या बांधाला बांध लागलेला असल्यामुळे दररोज किटकिट होत राहणार. ताणतणाव वाढत राहणार. राजा जगभरातील बऱ्याच देशांना विनंती करतो, 'या बाईला शरण द्या.' पण कुणीच ऐकत नाही.
एकीकडे विविध देशांच्या प्रमुखांना फोनाफोनी चालू असते. तर दुसरीकडे आपले रडके तोंड घेऊन राजमित्र समोर आलेला असतो. 'माझे तर शंभर टक्के निर्यात युनिट आहे. सगळे फायदे मी लाटले. आता राणीतर काही ऑर्डर देणार नाही. काय करू? कसे जगवू त्या युनिटला?'
परिस्थिती गंभीर असते. पण राजा खंबीर असतो. एका क्षणात आदेश काढतो 'राजमित्राकडून विजेची खरेदी आपला देशच करेल!' राजमित्र लगेच नाचायला लागतो. असा मित्र पाहिजे, काहीही झालं तरी आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही! वा!
राणी एका जेलमध्ये असल्यासारखी एका महालात राहत असते. तिच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा महत्त्वाची असते. राजाचे सल्लागार गंभीर चर्चा करत असतात. तेवढ्यात राजमित्र तेथे येतो. गंभीर वातावरण बघून घाबरतो. पण राजावर काहीच फरक पडलेला नसतो. राजमित्राकडे बघून तो पृथ्वीचा गोल हातात घेतो आणि बारीक नजर टाकून विचारतो, 'आता कोणत्या देशात जायचे आहे? बिजनेस प्लॅन काय आहे? तयार करा. आता थांबून चालणार नाही! कामाला लागू या.'
लगेच परदेश व्यवहार पाहणारे अधिकारी समोर येतात. कामाला लागतात. राजाच्या पुढच्या दौऱ्याची तयारी सुरू होते.
'साले दोन देशाचे प्रमुख तर या जोडीमुळे जीव मुठीत धरून पळाले! यांचे टार्गेट काय आहे काय माहीत! नेमके किती देशांची वाट लावणार?' मनातल्या मनात तो अधिकारी बडबडत असतो.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या