डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘तारांगण’ पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभात केलेले भाषण

मागील वर्षभर सुरेश द्वादशीवार यांची ‘तारांगण’ ही लेखमाला साधना साप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध होत होती. त्या लेखमालेत प्रसिद्ध झालेल्या सर्व म्हणजे 16 व्यक्तिचित्रांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन, राजहंस प्रकाशनाचे प्रकाशक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते 1 फेब्रुवारी 2012 रोजी, साधनाच्या पुणे येथील साने गुरुजी सभागृहात झाले. प्रकाशन समारंभात माजगावकरांनी केलेले भाषण 19 फेब्रुवारीच्या ‘दै. लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ या पुरवणीत प्रसिद्ध झाले आहे, पण ‘तारांगण’ लेखमालेत असलेली साधना वाचकांची भावनिक व वैचारिक गुंतवणूक (आणि ‘तारांगण’ पुस्तकाची दीड महिन्याच संपलेली पहिली आवृत्ती) लक्षात घेता, ते भाषण पुनर्मुद्रित करणे औचित्यपूर्ण वाटते. - संपादक  

समारंभाचे अध्यक्ष रा.ग.जाधव, ‘तारांगण’ पुस्तकाचे लेखक सुरेश द्वादशीवार, साधनाचे संपादक नरेंद्र दाभोलकर आणि मित्रहो... सुरुवातीलाच एक गोष्ट मोकळेपणाने सांगतो की, या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी यावं म्हणून मला डॉ. दाभोलकरांचा फोन आला, तेव्हा इतर काही अडचणींमुळे मी येऊ शकणार नाही असं त्यांना सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी माझ्याकडे विनोद शिरसाठ आले आणि त्या वेळी झालेल्या गप्पांमध्ये त्यांनी माझ्या नकाराचा ‘होकार’ करून घेतला. आता मी न येण्यामागचं खरं कारण काय होतं ते सांगतो... एखादी मुलगी आपल्याला आवडावी, नजरेत भरावी, तिच्याविषयी आपण काही विचार करावा आणि तिचं कोणाशी तरी लग्न व्हावं, इथपर्यंत ठीक आहे. कारण असे अनुभव अनेकांना येतातच. पण त्याच मुलीच्या लग्नाला मंगलाष्टकं म्हणण्यासाठी जाण्याची आपल्यावर वेळ यावी हा खरोखर कठीण प्रसंग असतो. या पुस्तकाच्या बाबतीत असंच काहीसं झालं. म्हणजे ‘तारांगण’ ही लेखमाला गेल्या वर्षी साधना साप्ताहिकातून क्रमश: येत होती, तेव्हा मी ती वाचत होतो आणि दोन-चार व्यक्तिचित्रं वाचून झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, इथे व्यक्तिचित्रणातला काहीसा वेगळा बाज, काहीसा वेगळा ऐवज आहे आणि हा दागिना आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून मग (द्वादशीवारांचं लेखन आधीपासून मी वाचत आलोय, पण त्यांच्याशी माझा परिचय आजच झालाय) माझ्या ओळखीच्या मृणाल नानिवडेकर यांच्या माध्यमातून द्वादशीवारांना एकदा फोन केला आणि म्हणालो, मला ही लेखमाला आवडतेय, इतर कोणाशी तुमचं बोलणं झालेलं नसेल तर मला हे पुस्तक ‘राजहंस’ प्रकाशनाकडून करायला आवडेल. पण द्वादशीवार म्हणाले, अलीकडेच माझं ‘मन्वंतर’ हे पुस्तक साधनाने प्रकाशित केलंय आणि याही पुस्तकात त्यांनी रस दाखवलाय, त्यामुळे साहजिकच हे पुस्तक त्यांच्याकडून येईल. तर अशा पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दाभोलकरांनी मला बोलावलं हे माझ्या नकारामागचं कारण होतं. पण ते काहीही असो, साधनाने हे पुस्तक चांगलं केलंय. मुलगी खऱ्या अर्थाने सुस्थळी पडली असं मी मनापासून म्हणतो आणि द्वादशीवारांना आनंद वाटावा अशी गोष्ट सांगतो की, आजकाल बहुसंख्य प्रकाशकांना प्रकाशनासाठी आलेली हस्तलिखितं परत कशी करावी ही विवंचना असताना, त्यांचं पुस्तक दोन-तीन प्रकाशनसंस्थांना प्रकाशित करावंसं वाटणं ही ‘तारांगण’च्या वाङ्‌मयीन गुणवत्तेची पावती आहे असं त्यांनी समजावं.

‘तारांगण’ हा 16 व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. (अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, सुरेश भट, बाबा आमटे, राम शेवाळकर, मारोतराव कन्नमवार, प्रमोद महाजन, जर्नेलसिंग भिंद्रानवाले, तारकेश्वरी सिन्हा, सविता डेका, राजे विश्वेश्वरराव, चौधरी चरणसिंग, विष्णुदत्त शर्मा, एम.एफ.हुसेन, जनार्दन पांडुरंग). सुंदर व्यक्तिचित्रं कसं असतं तर ती त्या व्यक्तीची लेखकाने वाचकांशी घडवून दिलेली ‘थेट भेट’ असते. त्या भेटीत लेखक उपस्थित असतो ते केवळ त्या दोघांची ओळख करून देण्यापुरता, किंवा गरज पडली तर ती ओळख पुढे सरकवण्यापुरता. माझ्या कल्पनेप्रमाणे, चांगल्या व्यक्तिचित्रणात लेखक एका मर्यादेपेक्षा जास्त स्वत:ला वाचकांवर लादत नाही किंवा त्या व्यक्तीच्या बुरख्याआडून स्वत: वारंवार डोकावूनही बघत नाही. या दोनही निकषांवर द्वादशीवारांची व्यक्तिचित्रं फार सरस उतरली आहेत.

आपल्याला माहीत आहे की, मराठीत व्यक्तिचित्रांची मोठी परंपरा आहे. अगदी चारसहा नावं सांगायची म्हटली तर श्री.म.माटे, व्यंकटेश माडगूळकर, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई, विजय तेंडुलकर, ह.मो.मराठे अशी सांगता येतील. अलीकडच्या काळात विनय हर्डीकर, रामदास भटकळ यांनीही चांगली व्यक्तिचित्रं लिहिली आहेत. या सर्व लेखकांनी सातत्याने लेखन करून व्यक्तिचित्रांची ही परंपरा सकस, समृद्ध आणि वाहती ठेवली आहे. या प्रत्येकाचं त्या व्यक्तीकडे बघणं वेगळं आहे, लेखन वेगळं आहे. त्यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत. या पाहण्यात व दृष्टिकोनात कसा फरक पडतो हे चटकन समजून घ्यायचं असेल तर एक उदाहरण देतो. माधव आचवल यांच्यावर जवळपास एकाच काळात पु.ल.देशपांडे, सुनीताबाई व विजय तेंडुलकर या तिघांनी लिहिलं आहे. ही तीनही व्यक्तिचित्रं एकाच वेळी व सलग वाचा म्हणजे मग मला काय म्हणायचंय ते नेकेपणाने समजून येईल. ही तीनही व्यक्तिचित्रं उत्तमच आहेत. व्यक्ती एकच आहे, बघणारे तिघे आहेत. तिघेही साहित्यातील मातब्बर आहेत. पण तिघांच्या बघण्यात, दृष्टिकोनात व लिहिण्यात फरक आहे. पु.लं. ना माधव आचवल त्यांच्या आंतर्बाह्य गुणदोषांसकट नक्कीच समजलेले असणार. (कारण पु.लं.चं व्यक्तिनिरीक्षण, बारकाईने पाहणं, हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे असं नाही). पण तरीही, का कोण जाणे लेखनापुरती पु.लं.नी ‘गुण गाईन आवडी’ अशी भूमिका ठेवलेली असल्याने, त्यांच्या लेखनात एक सरळपणा व साधेपणा आणि आज तर काही प्रसंगी भाबडेपणा वाटावा असा भाग वाटतो. तर माधव मला असा दिसला, तो असा होता आणि तो असाच होता असा काहीसा आग्रही व थोडासा उंच स्वर सुनीताबार्इंच्या लेखात दिसतो. आणि माधव असा असावा, निदान मला तो असा दिसला आणि मला दिसला त्यापलीकडे तो बरंच काही होता, पण मला तो समजला नाही, मी जे काही मांडलंय ते तुम्हाला पटतंय का बघा अशी तेंडुलकरांची भूमिका दिसते. मला व्यक्तिश: तेंडुलकरांची भूमिका आवडते आणि द्वादशीवारांची भूमिका तेंडुलकरांच्या भूमिकेसारखी आहे, म्हणूनही कदाचित ‘तारांगण’मधील व्यक्तिचित्रं मला अधिक आवडली असतील.

आपल्या भूमिकेबाबत द्वादशीवारांनी प्रस्तावनेतच एक वाक्य असं लिहिलंय की ‘मला माणूस समजून घ्यायला आवडतो आणि  त्यासाठी मी त्याच्या भूमिकेत जाऊन त्या माणसाच्या आनंदाच्या, दु:खाच्या, अडचणीच्या, तडजोडीच्या, महत्त्वाकांक्षेच्या ज्या काही जागा असतील त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो...’ माणसं समजून घेण्याची द्वादशीवारांची ही समज फार प्रगल्भ आहे. ते माणसाकडे एकाच खिडकीतून, एकाच कोनातून बघत नाहीत. ते अनेक कोनांतून बघतात. इतकंच नाही तर वाचकालाही ते व्यक्तिचित्र वाचून झाल्यावर त्या व्यक्तीविषयी विचार करण्यासाठी अनेक दिशा मोकळ्या ठेवतात. त्यांच्या व्यक्तिचित्रणात त्या व्यक्तीच्या बाह्य जीवनाचा तपशील तर वाचकाला मिळतोच, महत्त्वाच्या घडामोडीही मिळतात, पण त्याही पलीकडे जाऊन त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा शोध द्वादशीवार घेताना दिसतात. आपल्या सगळ्यांनाच दुसऱ्या व्यक्तीविषयी एक प्रकारचं कुतूहल असतं. त्यात ती व्यक्ती दिसते कशी, वागते कशी, बोलते कशी, त्याही पलीकडे ती व्यक्ती एखाद्या प्रसंगात- एखाद्या घटनेच्या वेळी- विचार कसा करते, त्या वेळी त्या व्यक्तीचं मानसिक चलनवलन कसं चालतं हे जाणून घेण्याविषयी अधिक कुतूहल असतं. याच कुतूहलातून द्वादशीवारांसारखा लेखक जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या अंतरंगात जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते व्यक्तिचित्रण आपल्याला अधिक भावतं, मनावर अधिक परिणाम करून जातं.

चांगलं व्यक्तिचित्रण कसं असतं याविषयीची या पुस्तकाबाहेरची दोन उदाहरणं सांगतो.

नेपोलियनचं चरित्र आपण सर्वांनीच त्या-त्या काळात वाचलेलं असतं. नेपोलियन, त्याच्या लढाया, त्याचं सहकाऱ्यांबरोबरचं वागणं याची ढोबळमानाने माहिती आपल्याला असतेच. पण हा नेपोलियन त्याच्या जनरल्सची निवड कशी करायचा या संदर्भातील एक मार्मिक आठवण त्याच्या एका चरित्रकाराने सांगितली आहे. तो त्याच्या जनरलची निवड करताना उमेदवाराचा बायोडाटा मागवून घ्यायचा. त्याने केलेल्या लढाया, त्याची घरची परिस्थिती, त्याचं जगणं-वागणं यांचा बारकाईने अभ्यास करायचा. पण अंतिम निर्णय घेताना मात्र तो त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्याला विचारायचा, Tell me, is he lucky? तो नशिबवान आहे का हे मला सांग, बाकी मला सर्व कळलं.

आता ही साधी आठवण नेपोलियनच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन जाते. दुसरा एक प्रसंग पुपुल जयकर यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या चरित्रातील आहे. इंदिरा गांधींची इंग्रजीत अनेक चरित्रं आहेत, पण इंग्रजीमध्येसुद्धा पुपुल जयकरांनी लिहिलेलं चरित्र विशेष उजवं समजलं जातं. याची दोन कारणं आहेत, एक तर त्या इंदिरा गांधींच्या निकट होत्या आणि दुसरं म्हणजे त्या जे.कृष्णमूर्तींच्या सहवासात असल्याने त्यांच्या विचारांना फिलॉसॉफीची भक्कम बैठक होती. त्या वैचारिक बैठकीतूनच त्या दुसऱ्या व्यक्तीकडे बघत असत. त्यामुळे ते चरित्र दर्जाच्या दृष्टीने इतर चरित्रांपेक्षा उजवं वाटतं. त्या पुस्तकातला एक प्रसंग आहे. संजय गांधींचं विमान अपघातात निधन झाल्यावर त्यांच्या शवाशेजारी इंदिराजी उभ्या आहेत. मोठमोठे लोक शोकसमाचाराला येत आहेत, नमस्कार करताहेत, इंदिराजी त्यांच्याशी उपचाराची एक-दोन वाक्यं बोलताहेत आणि मग ते लोक निघून जाताहेत. आता अटलबिहारी वाजपेयी येतात आणि कसं कोण जाणे, वाजपेयींच्या बोलण्यातून इंदिराजींना असं जाणवलं असावं की, आपल्यावर कोसळलेल्या या प्रसंगामुळे वाजपेयींना आपली कीव येतेय की काय, दया वाटतेय की काय! तेव्हा त्याही प्रसंगात आपली कोणी कीव करावी, दया करावी हे मानी स्वभावाच्या इंदिरा गांधींना आवडलं नाही आणि त्यामुळे त्यांना आलेला राग त्यांच्या गॉगलमधल्या डोळ्यांतून जवळच उभ्या असलेल्या पुपुल जयकरांनी बरोबर टिपला. इतकंच नाही तर, आपण किती नॉर्मल आहोत हे वाजपेयींना कळावं म्हणून इंदिराजींनी वाजपेयींकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या चंद्रशेखर यांच्याशी त्यानंतर दोन दिवसांनी होणाऱ्या एका मीटिंगबद्दल जुजबी बोलणं केलं. आता क्षणार्धात घडून गेलेली ही घटना, पण पुपुल जयकर ज्या पद्धतीने बघतात व लिहितात - त्यातून इंदिराबार्इंच्या व्यक्तिमत्त्वातला संपूर्ण पीळ त्या वाचकांसमोर उभा करतात. ही व्यक्तिचित्रणाची खरी ताकद असते.

‘तारांगण’ पुस्तकाबाहेरचे हे दोन प्रसंग मी यासाठी सांगितले की, द्वादशीवारांच्या लेखनातसुद्धा अशा अनेक जागा त्या ताकदीने पकडलेल्या आहेत... त्या दृष्टीने नरहर कुरुंदकर, सुरेश भट, अनंतराव भालेराव, बाबा आमटे यांच्यावरचे लेख वाचण्यासारखे आहेत.

या पुस्तकातील बहुतेक व्यक्ती तुमच्या-आमच्या माहितीतील आहेत, परिचयाच्या आहेत. थोड्याफार फरकाने प्रसिद्ध आहेत. व्यक्तीचित्रण केलेली व्यक्ती जेव्हा वाचकांना अनोळखी असते किंवा पूर्णत: काल्पनिक असते तेव्हा त्याचा एक फायदा असा असतो की, वाचकांच्या मनाचा कॅनव्हास त्या व्यक्तीबाबत पूर्ण कोरा असतो. पण ती व्यक्ती माहितीची असेल किंवा प्रसिद्ध असेल तर वाचकांच्या मनावर त्या व्यक्तीविषयीचं काही ना काही रेखाटन झालेलं असतं. त्यातून ती व्यक्ती कौतुकाची, प्रेमाची, अतीव आदराची असेल, तर त्या व्यक्तीबद्दलचा एखादाही विपरीत सूर वाचकांच्या मनावर लहानसा ओरखडा उमटवून जाऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीच्या राजकीय विचारामुंळे, सामाजिक पार्श्वभूीमुळे, कौटुंबिक परिस्थितीमुळे वाचकांच्या मनात राग असेल तर त्या व्यक्तीविषयी लिहिताना लेखकाची कसोटी असते. या पुस्तकातील बहुसंख्य व्यक्तिचित्रणाच्या बाबतीत या कसोटीला द्वादशीवार उत्तम पद्धतीने उतरले आहेत. उदाहरणार्थ, या पुस्तकातील जर्नेलसिंग भिंद्रानवाले हे व्यक्तिचित्रण वाचा.  द्वादशीवारांच्या लेखणीची ताकद काय आहे ती या व्यक्तिचित्रात दिसते. भिंद्रानवाल्याचा तो वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळातील पंजाबमधील दहशतीचं वातावरण आठवा. त्या वातावरणात घडत गेलेली भिंद्रानवाल्याची मतं आणि त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या बोलण्यातला प्रेमळपणा तसाच खुनशीपणा या सर्वांचे तपशील तर द्वादशीवार देतातच. पण मध्येच विचारांचा रूळ झटकन बदलतात आणि लिहून जातात- ‘आतापर्यंत खोमेनीच्या शीख अवताराची जागा एका सामान्य शीख गृहस्थानं घेतल्याचं लक्षात येतं. त्याच्या शस्त्रांची आता वाद्यं झालेली असतात. आईच्या हाताला असलेल्या चवीची आठवण मनात ठेवणारा तो सामान्य मुलगा झालेला असतो. भिंद्रानवाल्यांचा हा हळवा क्षण पकडायला एखादा गांधी असता तर...’

द्वादशीवारांच्या व्यक्तिचित्रणातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची शैली. कोणीतरी जाणकार समीक्षकाने द्वादशीवारांच्या लेखनशैलीचा अभ्यास करायला हवा, त्यावर चांगलं लेखन करायला हवं. एकच वैशिष्ट्य त्या शैलीचं सांगतो. एखाद्या व्यक्तीचं मोठेपण सांगताना ही लेखणी जशी तालेवार भाषा वापरते, तीच लेखणी त्या व्यक्तीचा हळुवारपणा, खेळकरपणा सांगताना त्याच्या चांगल्या खोड्याही काढू शकते. त्यांच्या शैलीचं सामर्थ्य दाखवणारं या पुस्तकातील सर्वांत चांगलं व्यक्तीचित्र जनार्दन पांडुरंग यांचं आहे (त्यांच्या वडिलांचं). या पुस्तकात हे व्यक्तिचित्र सर्वांत शेवटी आहे. हे जाणीवपूर्वक शेवटी टाकलंय काय हे मला माहीत नाही, पण ते शेवटी टाकलंय हे फार चांगलं केलं आहे. कारण ते व्यक्तिचित्र वाचल्यावर खरोखरच पुस्तक बंद करून आपण थांबावं असं वाटतं. ‘जनार्दन पांडुरंग’ हे औपचारिक नाव द्वादशीवारांनी घेतलंय, यातून त्यांचे वडिलांबरोबरचे संबंध लक्षात येतात. या व्यक्तिचित्रणातील अनेक जागा सांगता येतील. उदाहरणार्थ, या व्यक्तिचित्रणाची सुरुवातच किती मनात घुसणारी केली आहे ते पहा... ‘जनार्दन पांडुरंग हे अपयशाचं नाव आहे’ या वाक्याने या व्यक्तिचित्रणाची त्यांनी सुरुवात त्यांनी केली आहे. मी तुम्हाला सांगतो, भल्याभल्या लेखकांना हे वाक्य लिहिता येणार नाही. पुढे ते लिहितात, ‘‘जनार्दन पांडुरंग हे अपयशाचं नाव आहे. प्रखर बुद्धिमत्ता आणि तिला लीलया पेलून धरणारा दांडगा उत्साह, आपल्या लहानखुऱ्या देहयष्टीत धारण करणाऱ्या या माणसात वाहून जाण्याचा दोष होता.’’ या दोन वाक्यांत पुढे काहीतरी वेगळं वाचायला मिळणार याच्या खुणा मिळून जातात आणि खरोखरच पुढे हे व्यक्तिचित्रं अनेक वाटा-वळणांनी वाहत राहतं आणि शेवटी एका जागी तर अंतर्मुख करून जातं. द्वादशीवार लिहितात, ‘तुरुंगात शिक्षेत सूट मिळाल्यावर जनार्दन पांडुरंग एका मध्यरात्री अचानक घरी आले. येताना त्यांनी तुरुंगात स्वत: विणलेल्या जाडजूड सतरंज्या बरोबर आणल्या होत्या, त्यातल्या प्रत्येकीवर माझं नाव कोरलेलं होतं.’

या व्यक्तिचित्रात द्वादशीवारांचा प्रत्येक शब्द तर आपल्याशी बोलतोच बोलतो, पण त्या वाक्यातील विरामसुद्धा एक प्रकारचा संवाद साधतात, इतकं ते प्रभावी झालं आहे. हे व्यक्तिचित्र वाचताना मनाला खूप उदासी वाटते, कारण जनार्दन पांडुरंगांच्या आयुष्यात अनेक उलटसुलट घटना घडत गेल्या. पण त्या घटना वाचतानाही असं वाटतं की, द्वादशीवार आपल्या वडिलांचं चित्रण करतानाही विनाकारण हळवेपणाचं ओझं आपल्या लेखणीवर ठेवत नाहीत. किंवा नाटकी वाटावं, खोटं वाटावं, बेगडी वाटावं असा दूरस्थपणाही त्यांची लेखणी धारण करत नाही. त्यांची लेखणी त्यांच्या स्वभावातला हळुवारपणा, समजूतदारपणा फार चांगल्या पद्धतीने टिपत पुढे जाते आणि आपल्याला अंतर्मुख करून टाकणारं काहीतरी त्यातून मिळतं. या पुस्तकातील कुरुंदकरांचं व्यक्तिचित्र वाचताना माझ्या मनात अशी शंका होती की, यात आता द्वादशीवार वेगळं असं काय लिहिणार आहेत? कारण कुरुंदकरांबद्दल इतकं लिहून- सांगून झालेलं आहे! कुरुंदकर गेल्यावर मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्यावर एक स्मृतिग्रंथ काढला होता. स्मृतिग्रंथ अथपासून इतिपर्यंत वाचनीय कसा असू शकतो याचा आदर्श वाटावा असा तो अडीचशे-तीनशे पानांचा ग्रंथ होता. त्यामुळे यापलीकडे कुरुंदकर या लेखातून काही दिसतील का असं वाटले होतं. पण त्यातही दोन-चार जागा अशा आहेत की, द्वादशीवारांनी माझा अंदाज खोटा ठरवला. विशेषत: मुस्लिम विद्यार्थ्यांसमोर भाषण करायला उभे राहिल्यावर कुरुंदकर पहिलं वाक्य काय बोलले तो प्रसंग किंवा कॉलेजमध्ये एक मोठ्या विदुषी आल्या असताना छायाचित्राच्या निमित्ताने एक विनोदी घटना घडली त्यावेळचं कुरुंदकरांचं बोलणं आणि वागणं... हे प्रसंग कुरुंदकरांच्या स्वभावातील विक्षिप्तपणा आणि बौद्धिक शार्पनेस दाखवणारे आहेत.

द्वादशीवारांच्या इतर व्यक्तिचित्रांतील अशा अनेक प्रसंगांबद्दल बोलता येईल. पण त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना संयम फार चांगला कळतो. प्रत्येक व्यक्तिचित्र वाचताना असं वाटत राहतं की, द्वादशीवारांना या व्यक्तीची यापलीकडे माहिती आहे, पण ती ते सांगत नाहीत. कोणाविषयी, काय, किती आणि केवढं लिहावं याचं भान त्यांना पक्कं राहिलेलं आहे. त्यामुळे कोणतंही व्यक्तिचित्र पाल्हाळीक झालेलं नाही आणि आता हे संपावं असं न वाटता ‘अरे आता एकच पान राहिलं का?’ असं वाटून व्यक्तिचित्र संपतं. ही त्यांच्या लेखणीची जागरूकता लक्षात घेता, त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलताना मी तो संयम पाळायला हवा, नाही तर त्यांच्या पुस्तकाने मला काहीच दिलं नाही असं म्हणावं लागेल.    

Tags: जे.कृष्णमूर्ती पुपुल जयकर इंदिरा गांधी नेपोलियन माधव आचवल व्यक्तिचित्रं साधनाचे संपादक नरेंद्र दाभोलकर सुरेश द्वादशीवार ‘तारांगण’ पुस्तक रा.ग.जाधव J. Krishnamurthy Pupul Jayakar Indira Gandhi Napoleon Madhav Achwal Editor of Sadhana Narendra Dabholkar Suresh Dwadshiwar ‘Tarangan’ book R.G. Jadhav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके