डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जातीय दंगलींच्या जखमांनी घायाळ भारत

'पूज्य साने गुरुजींच्या 'भारतीय संस्कृती'शी परिचित असलेल्या साधनाच्या बव्हंशी वाचकवर्गाला खास रुचतील असेच विचार सुप्रसिद्ध पत्रकार श्री. दिलीप पाडगावकर यांनी आपल्या 'टाईम्स ऑफ इंडिया तील 'इंडिया इंज्युअर्ड' या लेखात मांडले आहेत. त्याचा प्रभा पुरोहित यांनी केलेला अनुवाद.

स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरसुद्धा एक राष्ट्र म्हणून गणले जाण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत तरतुदींबाबत आजदेखील भारतात एकवाक्यता नाही. दुःस्वासाने भरलेली कांगावखोर भाषा, संयम व सहनशीलतेचा पूर्ण अभाव असलेले वातावरण आणि त्या पश्चात घडलेले गुजराथमधील हत्याकांड वरील वास्तवाची हिंसक आठवण करून देतात. ‘सर्वांचे भले' कशात आहे याबाबत एकमत होत नाही. आमची राष्ट्रीयता आणि आमची संस्कृती म्हणजे नक्की काय, हे अजून डळमळीत आहे. एक विचाराने, एक मताने ना आम्हाला इतिहासाचा आढावा घेता येत; ना भविष्याचा वेध. कमालीची दुष्मनी असलेल्या भिन्न विचारसरणींचा पगडा येथील राजकीय जीवनावर आहे. आम्हाला भेडसावीत आहेत ते त्याचे दुष्परिणाम, न संपणारे झगडे, कमालीची अस्थिरता आणि ठप्प पडलेला कारभार. यातूनच समाजातील दुफळी वाढीस लागते; आणि त्याचे पर्यवसान माणसाचा हिंस्र पशू बनविण्यात होते. हेच चित्र आज आपल्याला गुजरातमध्ये दिसत आहे.

श्री.के.आर.मलकानी यांचे ‘India First’ नावाचे एक पुस्तक अलीकडेच पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित झाले. वरील नावाशी निगडीत अशा विविध विषयांवरील लेख ह्या पुस्तकात आहेत. वर उल्लेखिलेली दोन विचासरणीतील कमालीची भिन्नता कुठल्या टोकाला पोचली आहे, ह्याचा प्रत्यय हे पुस्त वाचताना येतो. तसे पाहता श्री. मलकानी हे संघपरिवारात आणि बाहेरही बीजेपीच्या तत्त्वप्रणालीचे उद्गाते मानले जातात. आज श्री.मलकानींचा रा.स्व.संघाबरोबर साठ वर्षांहून अधिक काळचा संबंध आहे. त्यांच्या विचाराचे काळजीपूर्वक परीक्षण करणे जरूरीचे ठरते.

‘धर्म हा भारताचा आत्मा आहे' या वाक्याने मलकानींचा पहिला लेख सुरू होतो. इथे धर्माची बरोबरी हिंदुत्वाशी केली जाते. ते पुढे म्हणतात की, हिंदू संस्कृती आणि भारतीय संस्कृती दोन्ही एकच आहेत किंवा एक असायला हव्यात. आणि ही संस्कृती म्हणजेच आपल्या राष्ट्रीयत्वाचा संपूर्ण ढाचा आहे किंवा ढाचा मानायला हवी. आपल्या विधानाच्या पुष्टीकरणासाठी मग ते विदेशी तसेच भारतीय लेखकांना उद्धृत करतात. त्यांत महात्मा गांधींचे अवतरण पण येते. 'धर्मविरहित राजकारण हे एखाद्या कलेवराप्रमाणे आहे; आणि त्याला अग्नी देणेच योग्य होय.’

खरे पाहिले तर गांधीजींची धर्माकडे बघण्याची दृष्टी आणि मलकानींची दृष्टी यात महद्अंतर आहे. गांधीजी एकदा म्हणाले होते, “माझी धर्माबद्दलची संकल्पना काय आहे, हे मला स्पष्ट करू दे. हिंदू धर्म जरी मला सर्व धर्माहून मोलाचा वाटत असला, तरी मला जो धर्म अभिप्रेत आहे, तो हिंदू धर्माच्याही पलीकडे जाऊन व्यक्तीच्या स्वभावधर्मातच बदल घडवून आणणारा, तिला सत्याशी एकरूप व्हायला लावणारा, तिचे मन विशुद्ध करणारा असा धर्म आहे.” आपले राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्याकांनी हिंदू प्रतिकांचा, चिन्हांचा स्वीकार करावा, अशी पूर्वअट श्री.मलकानी आणि त्यांचा परिवार घालतो; किंवा राम आणि कृष्ण यांना ईश्वरीय मानण्याचा आग्रह ते धरतात; परंतु अशा प्रकारचा अधिकार गांधीजींनी अल्पसंख्याकांवर कधीही गाजविला नाही. आपल्या सुरक्षिततेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी अल्पसंख्याकांनी बहुसंख्याकांची मर्जी संपादन केली पाहिजे, असे आवाहन आपल्या विपुल लेखनात गांधीजींनी कुठेही केले नाही. काहीशा पुष्टीकरणाने श्री.मलकानी प्रतिपादन करतात की, “निधर्मवाद हा धर्माच्या विरोधात आहे आणि त्याचा वापर राजकीय हेतूने अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्यासाठी केला जातो. यात काही तथ्य आहेही; परंतु ह्याच रीतीने सांस्कृतिक राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली दडणारे, मिथ्या वर्चस्व आणि वृथा अभिमानाने भारलेले एक धार्मिक तत्त्व म्हणून बऱ्याच मोठया प्रमाणावर हिंदुत्वाकडे बघितले जाते. या तर्ककुंठिततेतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे काय? याबाबत युरोपमधील विविध वांशिक, विविध धर्मीय आणि सांस्कृतिक विविधता असलेल्या समाजात सध्या चर्चिले जाणारे काही विचारप्रवाह आपल्याला कदाचित मार्गदर्शक ठरू शकतील.

उदाहरणार्थ, आजकाल फ्रान्समध्ये असा एक प्रयत्न केला जात आहे की, धार्मिक शिक्षणाऐवजी सर्व प्रमुख धर्माच्या मूलतत्वांचे शिक्षण सर्व शैक्षणिक स्तरांवर दिले जावे. त्यात कालानुसार धर्मकल्पना कशा विकसित झाल्या, ह्यावर भर दिला जावा. आणि ह्याहूनही अधिक महत्त्वाचे हे की, ह्या विविध धर्मांतील नैतिक, आध्यात्मिक आणि सद्विवेकाच्या आशयाचा अभ्यास व्हावा. ह्या आशयाची मांडणी कशी कलात्मकतेने केली हे पारखण्यास उत्तेजन दिले जावे. ह्या प्रयत्नातील पहिल्या भागाला काहीसा विरोध दर्शविला जात आहे. आक्षेप असा आहे की, हे सर्व धर्माचे शिक्षण कधी नकळत एका दुर्बल, अक्षम, बेगडी धार्मिक एकात्मतेप्रत घसरेल ते सांगता येणार नाही. परंतु ह्या प्रयत्नामधील दुसरा भाग बऱ्याच जणांना मान्य आहे. ह्यात निधर्मवाद एका वेगळ्या प्रकारे पुढे केला जातो; आणि हा भाग आपल्याला रुचेल असे वाटते.

कव्वाली आणि कीर्तन, गझल तसेच ठुमरी, ध्रुपद आणि दादरा वा लावणी आणि कजरी ह्यांतून ‘एकसमयान्वये करून आकार घेणारी संस्कृती' अशी भारतीय संस्कृतीची ओळख देणे, खरोखरच कठीण आहे काय? एवढेच कशाला; गीत-गोविंद आणि कबीर, गालीब, मीरा, फैझ, टागोर अथवा नझरूल इस्लाम ह्या सर्वांची मिळून घडलेली भारतीय संस्कृती अशक्य कोटीतील आहे काय? तंजावर तसेच वेरूळमधील शिल्पकला, ताजमहाल आणि राजस्थानमधील सोनार किल्ला ह्या सर्वांची मिळून ही संस्कृती बनू शकत नाही का? साहित्य, नाट्य, सिनेमा, चित्रकला या क्षेत्रांतील उत्तमोत्तम कलाकृती मिळून जित्याजागत्या निधर्मवादाचा संपन्न ठेवा बनू शकत नाही का? खरे तर ह्यावरून असे दिसून येते की, सांस्कृतिक, वांशिक आणि धार्मिक विविधतेच्या वातावरणातच राष्ट्राभिमान अधिक बहरास येतो,

वर उल्लेखिलेल्या तर्ककुंठिततेतून बाहेर पडण्याचा दुसरा अधिक प्रभावी मार्ग म्हणजे आपणा सर्व नागरिकांना एकत्र आणणाऱ्या प्रजासत्ताकाच्या धारणेशी असलेली आपली बांधिलकी अधिक मजबूत करणे. कशाची बनली आहे ही धारणा? भारतीय संविधानाप्रती निष्ठा आणि अभिमान, कायद्याच्या अधिपत्याबद्दल अतीव आपुलकी; लोकसभा व न्यायालये यांना डावलणारी कुठल्याही प्रकारची निष्ठा बाळगण्यास आग्रही नकार, आर्थिक आणि सामाजिक अन्यायाबद्दल चीड, तसेच भ्रष्टाचार आणि हिडीसपणाचा तिटकारा, या सर्वांची मिळून बनली आहे ही धारणा. संघ परिवारातील काही घटक या बांधिलकीच्या विरोधात असतील तर त्यांना ही धारणा मान्य करायला लावणे हे राज्यकत्वाचे कर्तव्य आहे.

श्री.मलकानी ह्यांच्या पुस्तकात बरेच काही पटण्यासारखे आहे. विशेषतः त्यांचे आरक्षण आणि समान नागरी कायद्यासंबंधीचे विचार. परंतु यासाठी मुस्लिम समाजाने जोर लावणे गरजेचे आहे. ह्या पुस्तकात मनाला न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टी पण आहेत. आर्थिक सुधारणांबद्दल आणि अमेरिकेबद्दलची श्री.मलकानींनी व्यक्त केलेली आत्यंतिक नापसंतीची भावना वाजपेयी सरकारच्या आर्थिक धोरणांच्या आणि विदेशनीतीच्या विरोधात आहे; परंतु सरकारची ही धोरणे प्रासंगिक अपयश बगळता प्रभावी ठरली आहेत.

परंतु ह्या पुस्तकातील बीजनिबंध राष्ट्रीयता आणि सांस्कृतिक राष्ट्रीयता ह्या विषयावरील चर्चेशी निगडित आहेत. लोकजीवनातून धार्मिक मूलतत्त्ववादाची हकालपट्टी करून एकदिलाने भारताच्या बुद्धिसंपदेची जोपासना करणे, हे किती कठीण काम आहे हेच या चर्चेतून दिसून येते. स्वतः श्री.वाजपेयींना पण हे खचितच जाणवले असावे. ज्या आत्मीयतेने आणि समर्पितपणे श्री.मलकानी आंतर्देशीय तसेच देशांतर्गत राजकारणावर टीका-टिप्पणी करतात, ह्याची योग्य दखल श्री.वाजपेयी यांनी प्रकाशनप्रसंगी घेतली. पण त्याबरोबरच लेखकाच्या सर्वच विचारांना मान्यता देणे त्यांना कसे कठीण जात आहे याबाबत त्यांनी संशयाला थोडीदेखील जागा ठेवली नाही. पुढे जाऊन श्री.वाजपेयींनी असे निक्षून सांगितले की, 'काही लोक हिंदुत्वाची व्याख्या अशा प्रकारे करतात की, त्यांच्यापासून थोडे दूरच असलेले बरे!

कदाचित् ह्या सर्वांचा लागाबांधा संघ परिवारातील त्याचप्रमाणे कदाचित सरकारांतर्गत सत्तासंघर्षाशी पण असावा. अयोध्या प्रकरणातील ताण-तणाव आणि गुजरातमधील जातीय दंगलीमुळे पंतप्रधान ह्या जाणिवेपर्यंत पोचले, अशी पण एक शक्यता असू शकते. श्री.मलकानींचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जन्म देईल केवळ एका भयंकर उत्पाताला. आणि तो उत्पात आहे एका देशाचा चक्काचूर', जातीय दंगलीच्या जखमांनी विद्ध अशा भारताच्या जखमांवर श्री. वाजपेयी मलमपट्टी करणार काय? की ते एक दिवास्वप्नच राहणार?

अनुवाद : प्रभा पुरोहित

Tags: इंडिया फर्स्ट के. आर. मलकानी भारतीय संस्कृती साने गुरुजी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ प्रभा पुरोहित दिलीप पाडगावकर India first K. R. Malkani Indian culture ‘Times of India’ Sane Guruji Prabha Purohit Dilip Padgaonkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिलीप पाडगांवकर

1944 - 2016

माजी उपसंपादक 'टाइम्स ऑफ इंडिया', माजी प्रमुख 'सिंबायोसिस इंटरनॅशनल  युनिव्हर्सिटीचे आर.के. लक्ष्मण अध्यासन'


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके