या नाटकाच्या संदर्भात जरा वेगळी आठवण आहे- नाट्यसमीक्षेबद्दलची. नाटकाचं लेखन एकांगी म्हटलं जातं. अभिनय अतिरेकी ठरवला जातो समीक्षकांकडून. पण कधी कधी समीक्षकांचाही नाटक मापण्यात अतिरेक होऊ शकतो, हे या नाटकाच्या दोन परिक्षणांवरून लक्षात आलं. दोन ज्येष्ठ आणि अभ्यासू नाट्यसमीक्षकांची या नाटकावरील मतं अगदी दोन टोकांची कशी असू शकतात, याचं अनेकांना नवल वाटलं. कमलाकर नाडकर्णींनी 'महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये लिहिताना या नाटकाची खूप स्तुती केली, तर माधव वझेंनी 'साप्ताहिक सकाळ’ मध्ये दोषच दोष दाखवले. आणि वर म.टा. मधलं परीक्षण 'इतर नाटकातले 'कुसळ’ दिसते पण या नाटकातले 'मुसळ' कसे दिसत नाही.' असा प्रश्न विचारून मोडीत काढलं.
निरनिराळ्या भूमिका करताना वेगवेगळ्या प्रकारांनी, अनेक पद्धतींनी स्टेजवर माझी एन्ट्री झालेली आहे. पण एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण एण्ट्री 'जावई माझा भला' नाटकात होती. प्रदीप मुळ्येच्या सुरेख नेपथ्यरचनेत आमच्या फ्लॅटमधला दिवाणखाना दिसायचा. आणि प्रेक्षकांच्या उजव्या बाजूला असलेल्या लिफ्टचा दरवाजा उघडून मी प्रवेश करायचो. लिफ्ट खालून वर आल्याचा 'इफेक्ट' होता. थेट प्रेक्षकांशीच बोलायला लागायचो. मग त्यांच्यासमोरच ‘लॅच की’ ने दरवाजा उघडून आमच्या घराच्या दिवाणखान्यात प्रवेश करायचो. या नाटकाची कल्पना 'फादर ऑफ द ब्राईड' या हॉलिवूडच्या चित्रपटावरून घेतली असली, तरी रत्नाकर मतकरींनी लिहिलेलं हे नाटक अगदी इथलं, या मातीतलं, एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या घटनांचं झालं होतं. एका कुटुंबवत्सल माणसाचा माझा रोल. कोट, टाय, हातात बॅग, अशी झोकात एण्ट्री घेऊन मी थेट प्रेक्षकांशीच बोलत असे. ‘आलात? नमस्कार!' असं म्हणून त्यांचं स्वागत करत असे. आमच्या कुटुंबात घडणाऱ्या घटनांचे त्यांना साक्षीदार करत असे. स्वतःवर कोसळलेल्या कौटुंबिक आपत्तीबद्दल त्यांना खोट्या गांभीर्याने सांगत असे.
नाटक पुढे सुरू झालं की, नाटकातल्या घटनांमध्ये सामील होऊन, मी करत असलेल्या अविनाश घाटपांडे या व्यक्तिरेखेच्या सुख-दुःखांशी समरस होऊन, मधेच बाहेर पडून मी प्रेक्षकांशी थेट संवाद साधत असे. त्यात ‘माझ्यावर जो प्रसंग गुदरला तो तुम्ही पाहिलात ना? तुम्हांला काय वाटतं?’ वगैरे विचारत असे. बऱ्याचदा हे गंमतीचं असे. कधी गंभीर तर कधी भावनावश अवस्थेत. या अविनाश घाटपांडेचा (नाटक सुरू होतं तेव्हा) पन्नासावा वाढदिवस आहे आणि त्यांची लाडकी लेक रजत आपल्या वडिलांना वाढदिवसाचं प्रेझेंट म्हणून एक 'सरप्राईझ गिफ्ट' काय देते? तर जावई! आपण लग्न जमवल्याचं सांगते. हे 'प्रेझेंट' आणि ही बातमी इतकी अनपेक्षित असते की, अविनाश हबकतो. त्याचं मन हे स्वीकारायला तयार होत नाही. मुळात आपली मुलगी लग्न करण्याच्या वयाची झाली आहे, हेच त्याला मान्य नाही. आणि लग्न करायचंच झालं तर तिचा नवरा शोधायची जबाबदारी बाप म्हणून आपली आहे; आपल्या परवानगीशिवाय, माहितीशिवाय आपल्या मुलीला आपल्यापासून हिरावून न्यायला कोणी येऊ शकत नाही; असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून स्वतःला 'बुद्धिजीवी' समजणारा हा अविनाश आपल्या अत्यंत उमद्या, सुस्वभावी, बिझनेसमन जावयाच्या विरोधात जातो.
नाटकाची सुरुवातच अशी गंमतीची होते. माझा बाप म्हणून केलेला त्रागासुद्धा गंमतीचा (आणि तरीही खरा) वाटेल, याचं भान ठेवायचं होतं. या साऱ्या प्रकारात प्रेक्षकांना आपली बाजू सांगून त्यांनाही घडणाऱ्या घटनांमध्ये गुंतवायचं होतं. अविनाशची गोड आणि लाघवी मुलगी रजत (शिल्पा तुळसकर), संसारसुख अंगावर चढलंय असं वाटावं अशी गृहकृत्यदक्ष पत्नी आसावरी (अमिता खोपकर), आपल्या पद्धतीने बिनधास्तपणे जगणारा मुलगा चिन्मय (सचिन वैद्य), आदर्श वाटावा असा जावई उत्पल (महेश फडणीस), त्याचे आई-वडील, प्रेमळ राजाभाऊ आणि गर्विष्ठ राणी रामाणी (श्रीराम रानडे आणि राजश्री बोरकर), बॉस गडकरी (वसंत बर्वे), आणि लग्नाचा आगाऊ कॉन्ट्रॅक्टर शेवडे (वसंत सोमण) या सगळ्या मंडळींशी वागण्याच्या, 'रिअॅक्टिंग’ च्या अविनाशच्या पद्धती वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण होत्या. आणि त्या पद्धतींवरून माझ्या भूमिकेचं व्यक्तिमत्त्व उभं राहायला, ती विकसित व्हायला मला मदत झाली. या सगळ्याच व्यक्तिरेखा मतकरींनी फार छान रेखाटल्या होत्या. त्यांची भाषाही नेहमीच्या बोलण्यातली, त्या त्या व्यक्तीच्या तोंडी नैसर्गिक वाटेल अशी, पटकन पटणारी होती. त्या नाटकात नट म्हणून गंमतीचा आणि आव्हानात्मक प्रकार असा होता की, यातल्या माझ्या एका कुटुंबवत्सल माणसाच्या घरातल्या वास्तवदर्शी घटना आणि त्याला सामोरं जाताना होणारी अवस्था प्रेक्षकांना मजेशीर आणि हास्यकारक वाटण्यासाठी एकूण 'बेअरिंग'ला एक किंचित तिरकस अँगल लावलेला होता.
म्हणजे गंभीरपणे बोलून, वागूनही त्याचा त्रागा, राग, 'बुद्धिजीवी' असल्याचा आव, हे विनोदी अंगाने जाण्यासाठी सूक्ष्म अतिशयोक्त, खोटा स्वर लावायचा होता. पण मुलीबद्दलच्या जवळीकीतून उमटलेल्या व्यथा मात्र खऱ्याखुऱ्या तळमळीच्या, आतून आलेल्या वाटायला हव्या होत्या. तिच्याबाबतचा हळवेपणा, वात्सल्य, तिने अबोला धरल्यावर भावविवश होणं वगैरे अगदी परिणामकारक करायचं होतं. बापाची वेदना सांगणारा एक फार छान उतारा होता. ‘लग्न साधेपणानं करू या, खर्च कमी करू या', असं अविनाश (मी) म्हणतो. रजत (शिल्पा तुळसकर) वडिलांना कठोरपणे बोलून आत निघून जाते. तेव्हा अविनाश स्तंभित होतो आणि म्हणतो, “तुम्हांला आपलं उगाचंच वाटत असतं की, तुम्ही आपल्या संस्कारात मुलांना वाढवलंय.. तुमची मतं तीच मुलांची मतं बनली आहेत. तुमची मूल्यं तुमची मूल्यंच मानताहेत. पण एखाद्या वेळी हा भ्रमाचा बुडबुडा एकदम फाटदिशी फुटतो आणि मग लक्षात येतं की, आपल्याच घरात वाढलेली ही कुणी दुसरीच माणसं आहेत. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचे विचार, स्वतःची मूल्यं असलेली ही तरुण मुलंमुली ही जणू स्वयंभू आहेत. त्यांना कुणी घडवलं नाही. निदान तुम्ही तर नाहीच नाही. मग ती... ती गेली कुठं?" अविनाश त्या बालपणीच्या, हरवलेल्या मुलांना शोधू पाहतोय. ही व्यथा, हे विचार मतकरींनी अगदी अचूक शब्दांत मांडले होते.
योग्य प्रकारे अभिनीत करताना त्याला दादही मिळायची. त्याच्याहीपेक्षा जास्त दाद मिळायची ती जावयाबरोबर व्हिस्की पीत बसण्याच्या प्रवेशात, उत्कटतेने व्यक्त होणाऱ्या बापाच्या भावनेला. दारूच्या अंमलाखाली लाडक्या मुलीच्या नवऱ्याला एकदम. आजवर मी तिची काळजी घेतली-तिच्यासाठी जे सहन केलं. आणि तिच्यावर जे प्रेम केलं, ते तसंच पुढं चालत राहायला हवं. फक्त ते सारं करायला यापुढे माझ्या जागी तू असणार आहेस. तू नुसताच तिचा नवरा झालास तर मला समाधान मिळणार नाही उत्पल. तू तिचा बापदेखील व्हायला हवंस असं अविनाश म्हणतो. आधीच्याच प्रसंगात लग्नाच्या तयारीचा खर्च बघून त्रासलेल्या अविनाशला हसणारे प्रेक्षक एकदम गलबलायचे. हसू आणि आसू यांचा पाठशिवणीचा खेळ नटाचीही परीक्षा पाहतो. कंठ दाटून आल्यासारखा आवाज काढून (प्रत्यक्षात दाटला नसताना) मी आवाज किंचित कापरा करायचो. चढत जाणाऱ्या व्हिस्कीचे डोस हालचालीत, नजरेत दिसायचे. त्याच प्रवेशात पुढे अविनाश आपली मुलगी आपल्याशी बोलत नसल्याची व्यथा जावयाला सांगतो. तिच्या बालपणीच्या आठवणीने हळवा होतो. “तिच्या पुस्तकातल्या कविता मी म्हणायचो. मधेच विसरल्यासारखं दाखवायचो. मग छोटी रजत येऊन म्हणायची,” असं म्हणून तो त्यावेळची ती कविता म्हणायला लागतो. विसरतो. अडकतो. आतून रजत येते आणि पुढच्या ओळी सांगते.
मग दोघं मिळून 'बसे फुलावर फुलपाखरू मला सांगते मौज चल करू-थांब पावसा, ऊन पडू दे गाता गाता मला खेळू दे!' या ओळी एकत्र म्हणतात. रजत बापाला मिठी मारते. बाप-मुलीचं नातं सांगणारा हा मतकरींनी लिहिलेला अप्रतिम काव्यात्म प्रसंग नाटकाला वेगळ्याच उंचीवर न्यायचा. विजय केंकरेने नाटक फार छान बसवलं होतं. पात्रांच्या हालचाली, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं, नाटकाचा प्रवाहीपणा या साऱ्यांवरच खास लक्ष दिलं होतं. त्यातले भावनाप्रधान संवाद, प्रसंग जसे परिणामकारक व्हायचे, तसेच सूक्ष्म विनोद आणि क्वचित कधी असणारं फार्सिकल नाट्यसुद्धा. या नाटकाच्या संदर्भात जरा वेगळी आठवण आहे- नाट्यसमीक्षेबद्दलची. नाटकाचं लेखन एकांगी म्हटलं जातं. अभिनय अतिरेकी ठरवला जातो- समीक्षकांकडून. पण कधी कधी समीक्षकांचाही नाटक मापण्यात अतिरेक होऊ शकतो, हे या नाटकाच्या दोन परिक्षणांवरून लक्षात आलं.
दोन ज्येष्ठ आणि अभ्यासू नाट्यसमीक्षकांची या नाटकावरील मतं अगदी दोन टोकांची कशी असू शकतात, याचं अनेकांना नवल वाटलं. कमलाकर नाडकर्णींनी 'महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये लिहिताना या नाटकाची खूप स्तुती केली, तर माधव वझेंनी 'साप्ताहिक सकाळ’ मध्ये दोषच दोष दाखवले. आणि वर म.टा. मधलं परीक्षण 'इतर नाटकातले 'कुसळ’ दिसते पण या नाटकातले 'मुसळ' कसे दिसत नाही.' असा प्रश्न विचारून मोडीत काढलं. म्हणजे एकाला या 'असामान्य' आणि 'ग्रेट' नाटकातली प्रत्येक व्यक्तिरेखा, घटना 'ग्रेट' वाटली. असं नाटक मराठी रंगभूमीवर दीर्घ काळानंतर जन्माला आलंय, असं वाटलं तर दुसऱ्याला काहीच चांगलं वाटलं नाही आणि त्याने नाटक सामान्य ठरवलं. म्हणजे, रंगभूमीच्या मूलतत्त्वांचा अभ्यास वगैरे असणाऱ्या समीक्षकांचे असे दोन अगदी विरुद्ध टोकांचे अभिप्राय असू शकतात? आस्वादनक्षमतेत एवढी तफावत? (परीक्षणं वाचणाऱ्या) नाट्यरसिकांच्या डोक्यात गोंधळ उडू शकतो. पण नाटकाचा 'आतून' अनुभव घेणाऱ्या नटाच्या डोक्यात तो असण्याचं कारण नव्हतं. मला स्वतःला नाटक करताना, अविनाश घाटपांडेची व्यक्तिरेखा साकारताना खूप आनंद मिळाला. माझ्या सहकलाकारांनाही.
[क्रमशः]
Tags: Madhav Vaze Kamalakar Nadkarni Vijay Kenkare Amita Khopkar Shilpa Tulaskar Ratnakar Matkari Pradip Mulye Javai Maza Bhala Dilip Prabhavalkar माधव वझे कमलाकर नाडकर्णीं विजय केंकरे अमिता खोपकर शिल्पा तुळसकर रत्नाकर मतकरी प्रदीप मुळ्ये 'जावई माझा भला' दिलीप प्रभावळकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या