डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

परिचारिकांचे काम किती जिकिरीचे असते, हे गेली चार वर्षे मी अगदी जवळून पाहतो आहे. विशेषतः  वृद्धांच्या सेवा-शुश्रूषेचे काम अधिक संयमाची कसोटी पाहणारे असते. काही वेळा तर एखाद्या वृद्धाला आमच्याकडे भरती करून घेताना अशी स्थिती असते की, त्यांना अगोदर थेट बाथरूममध्ये नेऊन न्हाऊ घालून मगच भरती करून घ्यावे लागते. इथपासून ते अगदी एखाद्या वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह नीटनेटक्या पोषाखात नातेवाइकांच्या ताब्यात देण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट परिचारिका तितक्याच निष्ठेने आणि आत्मीयतेने करत असतात. बऱ्याच वेळा वृद्धावस्थेमध्ये मेंदूच्या पेशींचा ऱ्हास झाल्यामुळे काहींचे मानसिक संतुलनही हरविलेले असते. अशा वेळी आई जशी तिच्या निद्रित बाळाकडे लक्ष ठेवून असते, तसे या वृद्धांच्या बाबतीत सतत सावधचित्त असावं लागतं. ते बेडवरून पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागते. यासाठी रात्रपाळीच्या परिचारिका व मावश्या आळीपाळीने जागत असतात.

गौतम बुद्धाने म्हणे एकदा आपल्या शिष्यांना सात कोडी घातली होती. त्यांपैकी एक असे होते की, पृथ्वीतलावरील माणसाच्या सर्वांत जवळची गोष्ट कोणती? आणि त्याचे उत्तर असे दिले होते -‘मृत्यू’.

संवेदना शुश्रूषा केंद्रामध्ये अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची सेवाशुश्रूषा करत असताना हा साक्षात्कार आम्हा-लाही अधून-मधून करत होत असतो. एखादी आजी किंवा आजोबांची प्रकृती अगदी स्थिर आहे, असे वाटत असताना अचानकपणे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. दुसरीकडे एखादी अत्यवस्थ वाटणारी आजी किंवा आजोबा यांच्या प्रकृतीत कधी कधी आश्चर्यकारक रीत्या सुधारणा होऊन ते पुढे काही दिवस किंवा महिनेही व्यवस्थित राहतात. त्यामुळे अनेक वेळा अत्यवस्थ वृद्धांचे नातेवाईक ‘अजून किती दिवस?’ किंवा ‘तुमचा काय अंदाज आहे?’ वगैरे असे विचारण्याचा प्रयत्न करतात. त्या वेळी मी चुकूनही कधी कोणाच्या मृत्यूबद्दल ठामपणे काही सांगण्यास धजावत नाही. दोन्ही प्रकारचे मृत्यू सहजपणे स्वीकारण्याची मनाला सवय झाली आहे. पण असे असूनही विनयाआजींचा मृत्यू मात्र मला सहजपणे स्वीकारता आला नाही. हे खरं आहे की, त्याचं वय झालं होतं आणि गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार सुरू होते. त्यामुळे त्यांचं जाणं त्यांच्या नातेवाइकांनी सहजपणे स्वीकारले. पण माझ्या मनात मात्र त्यांची एक इच्छा अपूर्ण राहिल्याची खंत वाटत होती.

‘‘मला काही त्रास नाही, माझी कसलीही तक्रार नाही. इथं सर्व छान आहे. तुम्ही मला आता इथून कुठे दुसरीकडे पाठवू नका.’’ असे विनंतीच्या सुरात त्या पुनःपुन्हा मला बजावायच्या. एरव्ही सहसा कधी न रागावणाऱ्या आजी एकदा मात्र माझ्यावर चांगल्याच रागावल्या होत्या. नियमित तपासणीसाठी त्यांना एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पाठविले होते. रिक्षातून परत आल्यावर त्या जाब विचारत मला म्हणाल्या होत्या,‘‘ह्या सर्व तपासण्यांचा उपद्‌व्याप कशासाठी? आता कधी तरी जायचेच आहे ना?  जे जगायचे, ते माझे सर्व जगून झाले आहे आणि तुम्ही मला असे गाऊनवर कसे काय तिकडे पाठविले होते? माझ्याकडे कपाटात बॅग करून साड्या आहेत. माझ्या मुलीला सांगून त्या तेवढ्या मागून घ्या.’’ आजींची ती अपेक्षा ऐकून मला सुरुवातीला खरं तर गंमत वाटली होती. पण शेवटी-शेवटी वयोमानापरत्वे विस्मृती आणि असंबद्ध बोलणे या गोष्टींना सामोरे जात असतानाही त्यांनी पुन्हा काही वेळा मला साड्यांच्या बॅगची आठवण करून दिली होती. तेव्हा मलाही एकदा असे वाटले होते की, आजींची एक साडी मागवून त्यांना ती नेसवायला सांगावी. त्यांच्या मुलीला तसा निरोप द्यायचे मी ठरविले होते आणि आजी काल रात्री गेल्या. त्यांच्या मृतदेहासोबत त्यांचे सर्व साहित्य परत करताना, त्यांची एक इच्छा आमच्याकडून राहिली आहे, हे त्यांच्या मुलीला कसे सांगणार? गौतम बुद्धाने आपल्या शिष्यांना घातलेली ती सात कोडी खरी का खोटी, कोण जाणे! पण मला जर कोणी विचारले की, ‘पृथ्वीतलावरील स्त्रीचे सर्वांत जवळचे नाते कोणाशी असते, तर मी निःसंकोचपणे सांगेन- ‘साडी’.

विनयाआजींनी ग्रामीण भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून नोकरी केली होती. त्यांना आपल्या पेशाबद्दल व पोशाखाबद्दलही खूप आस्था आणि अभिमान वाटायचा. पांढऱ्या शुभ्र साडीतील एक फोटो त्यांनी आपल्या बेडजवळील टेबलावर मांडून ठेवला होता. त्या फोटोतील त्यांचा प्रसन्न हसरा चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा. पांढरा रंग हा निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्यांचा तो फोटो पाहिला की, त्यांच्यातील सेवावृत्तीची व समाजकार्याची आवड लक्षात यायची. स्वतः आनंदी राहणे आणि इतरांना आनंदी करण्याची त्यांची वृत्ती होती. म्हणूनच त्या गावात त्यांचा खूप नावलौकिक झाला होता. गोरगरीब लोकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा होती. तेथील लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी अनेक वर्षे त्या एकाच गावात नोकरी केली होती.

इतरांसाठी आपले आयुष्य चंदनासारखे झिजवणाऱ्या त्या माउलीच्या वाट्याला वैयक्तिक आयुष्यात मात्र फारसे कौटुंबिक स्वास्थ्य लाभले नव्हते. दारूच्या व्यसनापायी त्यांचा नवरा अकालीच वारला होता. आपल्या एकुलत्या एका मुलीस त्यांनी नर्सिंग शिकण्यासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले होते आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ती तिथेच नोकरीस लागली होती.

विनयाआजींनी आपल्या स्वावलंबी वृत्तीनुसार नोकरीतून निवृत्त झाल्यावरही एकटे राहणेच पसंत केले होते. त्या सरळ एका वृद्धाश्रमात भरती झाल्या होत्या आणि आपल्यापरीने तेथील वृद्धांची सेवा-शुश्रूषा करायला हातभार लावायच्या. त्यांची मुलगी त्यांना पुण्याला आपल्या घरी राहायला बोलवायची. पण त्या केवळ चार-आठ दिवस मुलीकडे पाहुणचार घेऊन वृद्धाश्रमात परत यायच्या. आता हा वृद्धाश्रम हेच माझं घर आहे, असं त्या म्हणायच्या.

काही वर्षांनंतर वयोमानापरत्वे त्या अधिकच थकल्यावर व अंथरुणावर खिळल्यावर त्यांच्या मुलीने त्यांना देखभाल व सेवा-शुश्रूषेसाठी आमच्या संवेदना शुश्रूषा केंद्रात भरती केले होते. आमच्याकडे भरती झाल्यानंतरही त्यांनी आपले इथले वास्तव्य आनंदाने स्वीकारले होते. विशेषतः इथल्या परिचारिका व मावश्यांशी त्यांची लगेच घट्ट मैत्री जमली होती. आपल्या नोकरीच्या काळातील अनुभव व आठवणी त्या सर्वांना सांगायच्या. त्यांना वैद्यकक्षेत्रातील बरेच ज्ञान होते. त्याबद्दलही त्या येथील परिचारिकांना मार्गदर्शन करायच्या. परिचारिकांनाही त्यांच्याबद्दल खूप आस्था वाटायची. एकदा राऊंडच्या वेळी विनयाआजी मला अडवीत म्हणाल्या होत्या, ‘‘डॉक्टर, तुम्ही फारच भाग्यवान आहात. तुम्हाला खूप प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणाऱ्या परिचारिका व मावश्या मिळाल्या आहेत.’’

विनयाआजींचे ते म्हणणे खरेच आहे. संवेदना शुश्रूषा केंद्रातील आस्थापूर्वक सेवा-शुश्रूषेबद्दल येथील वृद्धांनी व त्यांच्या नातेवाइकांनी तर वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त केलीच आहे; पण त्याचबरोबर केवळ सांगलीतीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी आमच्या शुश्रूषा केंद्रास सदिच्छा भेट देऊन ‘वेदनेच्या वाटेवर सुगंध पसरविणारं घर’ असा अभिप्राय व्यक्त केला आहे. त्याचं सर्व श्रेय अर्थातच चेहऱ्यावर सदैव हास्य फुलवत प्रेमाचा सुगंध दरवळत ठेवणाऱ्या परिचारिकांना व मावश्यांना आहे.

परिचारिकांचे काम किती जिकिरीचे असते, हे गेली चार वर्षे मी अगदी जवळून पाहतो आहे. विशेषतः  वृद्धांच्या सेवा-शुश्रूषेचे काम अधिक संयमाची कसोटी पाहणारे असते. काही वेळा तर एखाद्या वृद्धाला आमच्याकडे भरती करून घेताना अशी स्थिती असते की, त्यांना अगोदर थेट बाथरूममध्ये नेऊन न्हाऊ घालून मगच भरती करून घ्यावे लागते. इथपासून ते अगदी एखाद्या वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह नीटनेटक्या पोषाखात नातेवाइकांच्या ताब्यात देण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट परिचारिका तितक्याच निष्ठेने आणि आत्मीयतेने करत असतात. बऱ्याच वेळा वृद्धावस्थेमध्ये मेंदूच्या पेशींचा ऱ्हास झाल्यामुळे काहींचे मानसिक संतुलनही हरविलेले असते. अशा वेळी आई जशी तिच्या निद्रित बाळाकडे लक्ष ठेवून असते, तसे या वृद्धांच्या बाबतीत सतत सावधचित्त असावं लागतं. ते बेडवरून पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागते. यासाठी रात्रपाळीच्या परिचारिका व मावश्या आळीपाळीने जागत असतात.

केवळ स्पर्शाने वृद्धांशी संवाद साधण्याची कला परिचारिकांनी अवगत केलेली असते, कारण स्पर्शाविषयीचे ज्ञान हे सेवेचे आणि उपचाराचे महत्त्वाचे अंग असते. डायपर बदलणे असो किंवा ब्रश करून अंघोळ घालणे, माऊथवॉश करून स्पंजिंग करणे, ड्रेसिंग करणे, तेल, भांग, वेणी, पावडर करणे, चहा, नाश्ता, जेवण, औषध भरविणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. हे सर्व मायेने आणि आपुलकीने करावे लागते. वृद्ध आपल्या आईच्या नजरेतील प्रेमाची झाक परिचारिकांच्या नजरेत शोधत असतात.

रोज सकाळी साडेनऊ वाजता आमच्या राऊंडची सुरुवात आम्ही प्रार्थनेने करतो. या वृद्धांच्या ठिकाणी आपले आई-वडील किंवा आपणच या वृद्धांच्या ठिकाणी असतो, तर आपल्यासाठी जसं कोणी काही करावं असं आपल्याला वाटलं असतं तसं काम आपल्या हातून व्हायला हवं, याची जाणीव या प्रार्थनेच्या निमित्ताने आम्ही स्वतःला करून देत असतो. वृद्धांच्या आयुष्याच्या काल-मर्यादेसोबतच त्यांच्या जगण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही इथे प्रामाणिकपणे प्रयत्न करतो.

हल्लीचे स्पर्धेचे धावते युग आणि विभक्त कुटुंबपद्धती यामुळे अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांच्या सेवा-शुश्रूषेची समस्या सध्या अनेक कुटुंबांना भेडसावू लागली आहे. हा प्रश्न केवळ त्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता सामाजिक समस्येचे स्वरूप धारण करू लागला आहे. व्यक्ति स्वातंत्र्याच्या आजच्या जमान्यात आपल्या कुटुंबावर आपला  भार व्हायला नको, अशी धारणाही वृद्धांच्या मनात वाढू लागली आहे या निमित्ताने आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की, काही वृद्धांना आपल्या घरच्या लोकांकडून आपली सेवा-शुश्रूषा करून घेताना संकोच वाटत असतो. ज्या घरात आपण आजवर रुबाबात वावरलो, त्यांच्यासमोर आपली अवस्था केविलवाणी व्हायला नको, असेही काहींना वाटते. त्यापेक्षा परिचारिकांकडून सेवा-शुश्रूषा करून घेताना त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागत नाही. त्यामुळे या क्षेत्राची मागणी सध्या प्रचंड वाढली आहे. नर्सिंग ब्यूरोच्या माध्यमातून घरोघरी नर्सिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही मोठ्या शहरांमधून काही एजन्सी मार्फत होतो आहे. पण आपल्याकडे अजून या क्षेत्राला म्हणावी तशी प्रतिष्ठा मात्र लाभलेली नाही. आरोग्यसेवेतील परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असूनही त्यांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. आपल्या समाजाचाही या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा बरोबर नाही.

संवेदना शुश्रूषा केंद्रातील सर्व परिचारिका व मावश्यांशी माझे जिव्हाळ्याचे नाते बनले आहे. त्या आपली सुख-दुःखे मला मोकळेपणाने सांगत असतात. अभ्यासात हुशार असणारी पूनम आपली खंत व्यक्त करताना सांगते, ‘‘मला खरं तर नर्सिंग करायचे नव्हते. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला या क्षेत्रात यावे लागले.’’ व्यवस्थापिका म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पेलणारी माधुरी आपल्या लग्नाच्या बाबतीत मात्र द्विधा मनःस्थितीत दिसते. कारण सोबत काम करणाऱ्यांपैकी अनेक जण आपल्या संसारात सुखी नाहीत, हे तिला जाणवते. दुसऱ्याचे दुःख हलके करण्याची क्षमता स्त्रीकडे अधिक असते, असं म्हणतात. म्हणूनच कदाचित व्यक्तिगत जीवनात अनेक गोष्टींमध्ये तडजोड करूनही त्या हसतमुखाने सेवा-शुश्रूषा करत असतात.

मदर तेरेसांच्या देखभालीत सेवा-शुश्रूषेचे भाग्य लाभलेला एक जण असं म्हणाला होता म्हणे की, ‘मी श्वापदासारखा जगलो असेन, पण आता मरेन एखाद्या देवदूतासारखा!’ अशा प्रकारे अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तीस तिच्या उरलेल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आस्वाद मनःपूर्वक घेता यावा, यासाठी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या परिचारिकांचे योगदान किती मोलाचे असते याची जाणीव मला विनयाआजींच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली होती. विनयाआजी गेल्या तेव्हा सविता सिस्टर ड्युटीवर होत्या. मी विनयाआजींना तपासून त्या मृत झाल्याची खात्री करून घेतली व त्यांच्या मुलीला फोन करून कळविले. या वेळी सविता सिस्टरांचे डोळे पाणावले असल्याचे माझ्या लक्षात आले.

‘‘असे दुःखी होऊन कसे चालेल सिस्टर? तुम्ही सर्वांनीच किती मनापासून त्यांची सेवा-शुश्रूषा केली आहे.’’ त्यांचा रडवेला चेहरा पाहून मी त्यांचे सांत्वन करत म्हणालो.

‘‘सर, विनयाआजींनी आयुष्यभर किती तरी लोकांची सेवा-शुश्रूषा केली असेल आणि त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली, याचं समाधान तर वाटते आहे... पण हे सर्व पाहिल्यावर असे वाटते की, उद्या आपले काय होणार आहे, देव जाण!’’ त्या भावुक होऊन म्हणाल्या. त्यांची घालमेल मी समजू शकत होतो. सविता सिस्टरप्रमाणेच इतर परिचारिका व मावश्याही विनया-आजींच्या मृत्यूमुळे दुःखी झाल्या होत्या. त्या सर्वांनाच विनयाआजींचा खूप लळा लागला होता आणि आजींनाही सर्व परिचारिकांबद्दल व मावश्यांबद्दल आपुलकी वाटायची.

कधी कधी कामाच्या वेळेमध्ये काही मागे पुढे झाले तर मी आमच्याकडच्या परिचारिकांना रागवायचो. तेव्हा विनयाआजी लगेच ‘माझ्या पोरींना बोलू नका’ म्हणून माझ्यावर डाफरायच्या. विनयाआजींच्या इच्छेप्रमाणे त्यांची ती साड्यांची बॅग मागवून त्यातील एक साडी त्यांना नेसवायची राहून गेल्याची खंत माझ्या मनात सदैव राहणारच आहे. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे येथील परिचारिकांना आणि मावश्यांना मी सदैव यथोचित आदर-सन्मानाची वागणूक देऊ शकलो तर तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे मला वाटते. खरं तर आपण सर्वांनीच आपल्या या सेवाव्रती लेकींच्या योगदानाची दखल आत्मीयतेने घ्यायला हवी.

Tags: दिलीप शिंदे परिचारिका जगण्याचे भान jaganyache bhan dr dilip shinde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके