डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये सासर-माहेर आणि परंपरेच्या अशा अनेक आवाजांनी तिची समजूत काढली असणार होती. पवार सरांपाठोपाठ ती निमूटपणे निघून गेली. पवार सरांच्या मिसेसने मी तिला इंजेक्शन टोचताना आपले पाय पोटात दुडून, हात तोंडावर घट्ट दाबून धरला होता. ते पाहून माझ्या मनात अनेक प्रश्नांचा कल्लोळ सुरू झाला. तिला आपल्या मातृत्वाबद्दल काय वाटत असेल? आपल्या नवऱ्याबद्दल काय वाटत असेल? विवाहसंस्थेबद्दल काय वाटत असेल? पवार सर मात्र असे स्वस्थ आणि नामानिराळे, इतकेच नव्हे तर खूषही कसे काय राहू शकत असतील? लग्नानंतर आपल्या बायकोला गृहीत धरण्याचा हक्क नवऱ्याला प्राप्त होतो की काय? ह्या सर्व प्रकाराने मला अस्वस्थ वाटू लागले. 

पती-पत्नी हे संसार रथाची दोन चाकं आहेत, असं आपण कितीही भाबडेपणानं म्हणत असलो तरी समजूतदारपणा नसेल तर बऱ्याचजणांची अवस्था ससा आणि कासवाच्या शर्यतीसारखी होते.हे खरं आहे की पती-पत्नी नातेसंबंधांचं स्वरूप सध्या झपाट्याने बदलत चाललं आहे आणि कोणताही सामाजिक बदल हा कधी एकसंधपणे होत नसतो. समाजाच्या त्या त्या वर्गाच्या बौद्धिक व आर्थिक कुवतीनुसार बदलांचा स्वीकार होत राहतो.पण शिकले सवरलेले तरुणही कधी कधी आपली पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याच्या बाबतीत गोंधळलेले आढळतात. त्यामुळे लग्नानंतर नवेपणाचा बहर ओसरल्यावर सुरुवातीला काही वर्षं नवरोबा बायकोवर गुरगुरत राहतात आणि त्यानंतरची पुढची वर्षं बायको नवऱ्यावर खेकसून घेते असा माझा एक फॅमिली डॉक्टर म्हणून अनुभव आहे. पुन्हा पती-पत्नी नात्यामध्ये तिसरं कोणी डोकावणंही व्यवहार्य नसतं म्हणतात.

पवार सरांच्या बाबतीत माझी अवस्था अशीच झाली होती. पवार सर आपल्या मिसेसला घेऊन पहिल्यांदा माझ्या दवाखान्यात आले तो प्रसंग मला आठवला. 

‘‘डॉक्टर येऊ का?’’

‘‘या सर, बसा.’’

‘‘ओळख करून देतो, ही माझी मिसेस.’’ 

‘‘नमस्ते.’’ मी त्यांनाही बसायला सांगितलं. 

‘‘लाडू चुकवून खाल्लात सर, लग्न कधी झालं?’’ मी सरांना हसत हसत विचारलं. 

‘‘दीड-दोन महिने झाले. सुट्टीत गावी गेल्यावर सगळं अचानक ठरलं. त्यामुळे खूप गडबड झाली.’’ 

‘‘मॅडम कोणत्या शाळेत आहेत?’’ पवार सर माध्यमिक शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांच्या मिसेसही शिक्षिका असाव्यात या अंदाजाने मी त्यांना विचारलं.

‘‘हिची आत्ता बारावी झाली आहे. परवाच रिझल्ट लागला. पुढे कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं म्हणतो आहे.’’ सरांनी सविस्तर सांगितलं.

‘‘पेशंट कोण आहे?’’ मी मुद्‌द्याकडे वळलो. 

‘‘हिच्या तब्येतीची थोडी तक्रार आहे.’’ सरच मला म्हणाले.

मी सरांच्या मिसेसला तपासणी टेबलकडे जायला सांगितलं. ‘‘काय त्रास होतोय?’’

‘‘त्रास काही होत नाही. माझी एम्‌.सी. आली नाही.’’ ती काहीशी अवघडून म्हणाली.

‘‘किती दिवस झाले?’’

‘‘सात-आठ दिवस झाले.’’ 

‘‘दर महिन्याला पाळी नियमित येते का?’’

‘‘दोन-चार दिवस पुढे-मागे होते.’’ 

‘‘तुम्ही सध्या गर्भनिरोधक काही वापरता का?’’

‘‘नाही, अजून काही वापरत नाही.’’ 

‘‘बाकी मळमळ, उलटी, चक्कर आल्यासारखं वाटतं का?’’ 

‘‘नाही.’’

‘‘ठीक आहे. या.’’ असे म्हणून परत मी माझ्या खुर्चीत येऊन बसलो. पवार सरांची मिसेसही खुर्चीत येऊन बसली.

‘‘सर, ह्यांची प्रेग्नन्सी टेस्ट करून पाहायला हवी.’’ मी सरांना कल्पना दिली. सुरुवातीला त्या दोघांपैकी कुणीच काही बोलेना. सरांच्या मिसेसचा चेहरा मात्र उतरला होता. 

‘‘तुमच्याकडे तपासणीची सोय आहे का?’’ सरांनी मला विचारलं.

‘‘होय, मी सिस्टरना प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगतो. तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबा.’’ असे म्हणून मी सरांना वेटिंग हॉलमध्ये थांबायला सांगितलं. 

सिस्टरना बोलवून सरांच्या मिसेसची प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितली आणि पुढच्या पेशंटला बोलावलं. थोड्या वेळाने सिस्टर प्रेग्नन्सी किट घेऊन मला रिपोर्ट सांगत आल्या. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह होती. मी सिस्टरना त्या दोघांना केबिनमध्ये पाठवायला सांगितलं. 

‘‘सर, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे. मी गर्भवाढीसाठी गोळ्या लिहून देतो. आजपासून रोज रात्री एक गोळी सुरू करू दे. तीन महिन्यांनंतर एकदा स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटून इतर तपासण्या करून घेऊ या.’’  मी सरांना समजावून सांगितले. 

‘‘आम्हांला इतक्यात प्रेग्नन्सी नको आहे.’’ सरांची मिसेस रडकुंडीला येऊन म्हणाली.

‘‘तुम्ही अगोदर खबरदारी घ्यायला हवी होती. पहिल्या वेळी आम्ही शक्यतो गर्भ खाली करू नये असा सल्ला देतो. तुम्ही दोघे मिळून चर्चा करून काय ते ठरवा.’’

‘‘तुमचं काय मत आहे?’’ सरांनी मलाच उलट विचारलं.

‘‘ह्यांची मानसिक तयारी असणंही महत्त्वाचं आहे.’’ 

‘‘आम्हांला गर्भ खाली करायचा आहे.’’ सरांची मिसेस मधेच आग्रहाने म्हणाली. 

‘‘तू जरा थांब. डॉक्टर काय म्हणताहेत हे नीट ऐकून तरी घे.’’ सर तिला दरडावीत म्हणाले. 

‘‘हे बघा सर, ह्यांची अगदीच मानसिक तयारी नसेल तर तुम्ही गर्भ खाली करूनही घेऊ शकता.’’ 

‘‘पण डॉक्टर, पहिल्या वेळी गर्भ खाली करणं बरोबर नसतं ना?’’ सर पुन्हा मला तेच विचारू लागले. 

‘‘पहिल्या वेळी गर्भाशयाची पिशवी नाजूक असते. त्यामुळे गर्भपात करताना तिला इजा झाल्यास किंवा जंतुसंसर्ग झाल्यास पुढे अपवादाने प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तुम्ही सरळ स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटून त्यांच्याकडूनच या बाबतीत सल्ला घ्या.’’ त्या दोघांचा गोंधळ पाहून मी म्हणालो. 

‘‘आम्ही उद्या सकाळी येऊन तुम्हांला भेटतो. घरी चर्चा करून काय तो निर्णय घेतो.’’ सर मला अडवीत म्हणाले. 

‘‘अहो, तुम्ही आत्ता उगीच बदलू नका हं. मला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं कबूल केलं आहे.’’ सरांची मिसेस त्यांना बजावीत म्हणाली. 

‘‘कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा आणि प्रेग्नन्सीचा काय संबंध आहे? कॉलेज काय तुला एक्स्टर्नलही करता येईल.’’ 

‘‘पण मला इतक्यात प्रेग्नन्सी नको आहे.’’ ती ठामपणे म्हणाली.

‘‘हे बघ, तू इथं दवाखान्यात माझ्याशी वाद घालू नकोस. आपण घरी जाऊन शांतपणे विचार करून काय तो निर्णय घेऊ या.’’ सर तिची समजूत काढू लागले. 

‘‘तुम्ही मला बाकी काही सांगू नका. मला माझ्या आई- बाबांकडे सोडून या. मी तिकडे जाऊन गर्भ खाली करून येते.’’ 

‘‘मग कायमचीच तिकडे जाऊन राहा जा.’’ सर तिच्यावर वैतागून म्हणाले. त्या नवविवाहित दांपत्यातील हा कलगीतुरा पाहून मी अवाक्‌ झालो. 

‘‘आम्ही उद्या सकाळी येऊन तुम्हांला भेटतो.’’ सर स्वतःला सावरीत पुन्हा एकदा मला म्हणाले आणि ती दोघं निघून गेली. 

लग्नानंतर मूल होण्यासाठी साधारणपणे दोन वर्षं मध्ये जाऊ द्यावीत असं म्हणतात. पण बऱ्याच जोडप्यांच्या बाबतीत अजूनही पहिल्या महिन्या-दोन महिन्यांतच अशी परिस्थिती उद्‌भवत असते. लैंगिक संबंधांबाबत उघडपणे बोलण्याइतका मोकळेपणा दोघांमध्येही निर्माण झालेला नसतो आणि प्रेग्नन्सी राहिल्याचं समजल्यावर विशेषतः नवविवाहितेची अवस्था केविलवाणी होते. कधी कधी मानसिक तयारी नसतानाही मग तिला मन मारून गरोदरपणाला सामोरं जावं लागतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी पवार सर आपल्या मिसेसला घेऊन पुन्हा माझ्या दवाखान्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आईही आली होती.  ‘‘डॉक्टर, आमचा निर्णय झाला आहे. आम्ही प्रेग्नन्सी ठेवायची ठरविली आहे. त्यानुसार तुम्ही गोळ्या-औषधं सुरू करा.’’ सर उत्साहाने म्हणाले. त्या सर्वांचा निर्णय झाल्याचे ऐकून एक डॉक्टर म्हणून मलाही बरं वाटलं.  मी सरांच्या मिसेसला तपासणी टेबलकडे जायला सांगितलं. तिचं वजन व रक्तदाब तपासून पाहिला. माझ्या लक्षात आलं की ती अजूनही उदासच आहे. तिचे डोळे रडून लाल झालेले दिसत होते. 

‘‘डॉक्टर, प्लीज तुम्ही त्यांना समजावून सांगा. मला इतक्यात प्रेग्नन्सी नको आहे.’’ ती दबक्या आवाजात काकुळतीला येऊन म्हणाली. 

तिची ही अवस्था पाहून माझ्याही मनात द्वंद्व निर्माण झालं.
 
‘‘सर, तुमच्या मिसेसची अजून मानसिक तयारी दिसत नाही.’’ मी परत येऊन माझ्या खुर्चीत बसत म्हणालो.

‘‘तिला काय कळतंय डॉक्टर? ती अजून अल्लड आहे. मी तिला समजावून सांगते. तुम्ही गोळ्या-औषधं सुरू करा.’’ सरांच्या आई मध्येच मला म्हणाल्या. 

‘‘नाही काकू, हिची मानसिक तयारी नसेल तर मला गोळ्या- औषध सुरू करता येणार नाही. मी तुम्हांला पत्र देतो. तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटून त्यांच्या सल्ल्यानुसारच काय तो निर्णय घ्या.’’ असं म्हणून मी माझ्या लेटरपॅडवर स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी पत्र लिहू लागलो. 

माझ्या या भूमिकेमुळे पवार सरांच्या आई माझ्यावर नाराज होऊन आपल्या सूनबाईला पुढे घालून केबिनमधून बाहेर गेल्या.

‘‘सर, तुमच्या मिसेसची मानसिक तयारी नसेल तर तुम्ही त्यांच्यावर निर्णय लादू नका. त्यांना थोडं सावरायला वेळ द्या.’’ मी न राहवून सरांना म्हणालो. 

‘‘माझं काही नाही डॉक्टर, पण आईच ऐकायला तयार नाही. तिने काल रात्री मिसेसच्या आई-वडिलांना फोन करून इकडे येऊन जायला सांगितलं आहे. ते आल्यावर मिसेसला समजावून सांगतो म्हणाले आहेत.’’ अशा प्रकारे सर आता आपल्या आईच्या पदराआड लपू पाहत होते. मी दिलेलं पत्र घेऊन ते निघून गेले. 

पुढे आठ-दहा दिवसांनंतर पवार सर आपल्या मिसेसला घेऊन पुन्हा माझ्या दवाखान्यात आले. ‘‘तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन आलो. त्यांनी सोनोग्राफी व इतर तपासण्या केल्या. काही प्रॉब्लेम नाही म्हणाले. ही गोळ्या-औषधं लिहून दिली आहेत.’’ असं म्हणून त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञांची फाईल मला दाखवली. 

‘‘सध्या काय त्रास होतोय?’’ मी ती फाईल चाळत विचारलं. 

‘‘काल रात्रीपासून हिला उलट्यांचा फार त्रास होऊ लागला आहे. खाल्लेलं काहीच पचेना झालं आहे.’’

‘‘सुरुवातीला काही दिवस असा त्रास होत राहतो.’’ मी पवार  सरांना म्हणालो.
त्यांच्या मिसेसचा रक्तदाब तपासून पाहिला. तिला बराच अशक्तपणा आला होता. चेहरा अजूनही त्रासलेलाच दिसत होता. उलट्यांचा त्रास लगेच कमी व्हावा म्हणून मी तिला इंजेक्शन दिलं. जिभेवर विरघळणाऱ्या गोळ्याही लिहून दिल्या आणि त्या गरजेनुसार घ्यायला सांगितल्या. 

‘‘तुम्ही एकदा निर्णय घेतल्यावर पुन्हा असा त्रास करून घेऊ नका. गरोदरपणामध्ये तुमची मानसिक स्थिती चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे.’’ मी सरांसमोरच तिला समजावून सांगितलं. ते ऐकून ती केवळ उदासपणे हसली.

गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये सासर-माहेर आणि परंपरेच्या अशा अनेक आवाजांनी तिची समजूत काढली असणार होती. पवार सरांपाठोपाठ ती निमूटपणे निघून गेली. पवार सरांच्या मिसेसने मी तिला इंजेक्शन टोचताना आपले पाय पोटात दुडून, हात तोंडावर घट्ट दाबून धरला होता. ते पाहून माझ्या मनात अनेक प्रश्नांचा कल्लोळ सुरू झाला. तिला आपल्या मातृत्वाबद्दल काय वाटत असेल? आपल्या नवऱ्याबद्दल काय वाटत असेल? विवाहसंस्थेबद्दल काय वाटत असेल? पवार सर मात्र असे स्वस्थ आणि नामानिराळे, इतकेच नव्हे तर खूषही कसे काय राहू शकत असतील? लग्नानंतर आपल्या बायकोला गृहीत धरण्याचा हक्क नवऱ्याला प्राप्त होतो की काय? ह्या सर्व प्रकाराने मला अस्वस्थ वाटू लागले. 

खरं तर पवार सरांची मिसेस प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी तयार झाली किंवा तिला तयार केलं ही गोष्ट वैद्यकीयदृष्ट्या योग्यच होती. पण तरीही मला अस्वस्थ का वाटावं? माझ्या लक्षात आलं की, मी डॉक्टर नंतर आहे, माणूस अगोदर आहे. पवार सरांची ही दांडगाई आणि दुटप्पी भूमिका पाहून मला कॉलेज जीवनातली माझी पुरुषप्रधान मानसिकता आठवली. पलंगे सरांनी वेळीच माझे कान उपटले नसते तर आपणही असेच राहिलो असतो, या कल्पनेनं माझ्या पोटात गोळा आला. 

‘तू स्त्रियांचा सन्मान करायला शीक. त्याशिवाय आयुष्यात यशस्वी होणार नाहीस’ असा डायरीच्या पहिल्याच पानावर आपला अभिप्राय लिहून सरांनी त्याखाली आपली फर्डी सही केली होती. तेव्हा माझा अक्षरशः तिळपापड झाला होता. कॉलेजचं ते शेवटचं वर्ष होते. आमचा निरोप समारंभ झाला होता. कॉलेज जीवनातील मोरपंखी दिवसांची आठवण म्हणून मीही सर्वांप्रमाणे एक डायरी घेऊन त्यामध्ये सर्वांचे ऑटोग्राफ घेत होतो. मी त्या वर्षी कॉलेजचा यु.आर. होतो. त्यामुळे माझा मित्रपरिवारही मोठा होता. 
आपण प्राचार्यांचाही ऑटोग्राफ घ्यावा म्हणून सर्वांत शेवटी मी पलंगे सरांच्या केबिनमध्ये गेलो होतो आणि सरांनी असा अभिप्राय लिहिला होता. 

परीक्षा जवळ आली होती. त्यामुळे प्राचार्यांशी पंगा घेणं परवडणारे नव्हतं. मी गुमान मान खाली घालून तडक होस्टेलवर आलो होतो. ‘हा मास्तर स्वतःला समजतो तरी काय?’ असा संताप मनात धुसत होता. झालं असं होतं की, आमच्या वर्गातील एका मुलीचं नुकतंच लग्न झालं होतं. एके दिवशी तिचा नवरा तिला भेटायला कॉलेजवर आला होता आणि तिने त्या रात्री त्याला गुपचूप हॉस्टेलवर ठेवून घेतलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी लेडीज हॉस्टेलमधील एका मुलीने ही बातमी आम्हांला लीक केली होती. आमच्या हाती आयतंच कोलीत मिळालं होतं. आम्ही मुलांनी माझ्या नेतृत्वाखाली खूप हंगामा केला होता. एरव्ही मुलींच्या पालकांनाही लेडीज हॉस्टेलवर थांबायला बंदी होती. त्यामुळे तिने आपल्या नवऱ्याला लेडीज हॉस्टेलवर मुक्काम करूच कसा दिला म्हणून आम्ही तडक प्राचार्यांची केबिन गाठली होती. शेवटी कॉलेजच्या संचालकांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्या मुलीकडून लेखी माफी घेऊन तिला समज द्यायला लावली होती. एवढंच नव्हे तर पुढे काही दिवस आम्ही या विषयावरून चिडवून तिला खजीलही करायचो. आज तो प्रसंग आठवतानाही तेव्हाच्या माझ्या मानसिकतेची मला कीव करावी वाटते. मी ग्रामीण भागातून आलेलो. अशिक्षित शेतकरी कुटुंबात वाढलेलो. शहरातल्या शिकलेल्या मुली म्हणजे खूप मॉड असतात, असा समज होता. त्यामुळे आपण डॉक्टर मुलीशी लग्न करायचं नाही. एखाद्या ग्रॅज्युएट मुलीशी लग्न करायचं, असे माझे विचार होते. 

पलंगे सरांच्या त्या दोनच ओळी माझ्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरल्या आहेत. माझी मिसेस डॉक्टर आहे. आम्हा दोघांचेही स्वतंत्र दवाखाने आहेत. आमच्यात अजिबातच मतभेद होत नाहीत असं नाही. पण एका छताखाली एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आम्ही सुखाने नांदतो आहोत. माझा असा मुळीच दावा नाही की माझ्यातली पुरुषप्रधान मानसिकता मी पूर्णपणे गाडू शकलो आहे. पण आपल्या जोडीदाराच्या भावनांची कदर केल्याशिवाय आपलं जगणं परिपूर्ण होऊ शकत नाही, याची मला जाणीव झाली आहे. इतिहास असं सांगतो की स्त्रीनंच शेतीचा शोध लावला. तिने संस्कृती घडवली. आपल्याकडे म्हणे मातृसत्ताक पद्धती होती. मग आम्ही असे का झालो? 

पवार सरांना मुलगा झाला आहे. ते आणि त्यांची मिसेस आपल्या मुलाला घेऊन माझ्या दवाखान्यात येतात. तेव्हा त्यांच्या मिसेसचा तो मातृत्वसुखाने ओथंबलेला वावर पाहून माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. माते, स्त्री-पुरुष समानतेचं युग अवतरण्यासाठी तुझ्यातील हे परिवर्तनाचं सामर्थ्य आम्हा पामरांनाही लाभू दे. 

Tags: मातृसत्ताक पद्धती संस्कृती शेतीचा शोध परिवर्तन स्त्री-पुरुष समानता matriarchal practices culture agricultural exploration transformation gender equality weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके