डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ह्या जमान्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन अमेरिकेच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणांना सोडाच; पण समाजसेवेचे तज्ज्ञ म्हणून सर्टिफाय झालेल्या एम.एस.डब्ल्यू. तरुणांनाही कुमार शिराळकर माहीत असण्याची शक्यता कमी आहे. पण परभणी, नगर ह्या जिल्ह्यांतील ऊसतोडणी कामगारांना, धुळे, जळगाव जिल्ह्यांतील आदिवासी  शेतमजुरांना कुमार नेहमीच्या  ओळखीतील व्यक्ती आहे. याशिवाय सातव्या दशकात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक घडामोडींत जे सहभागी होते किंवा जे ह्या घडामोडींची जागृतपणे दखल घेत होते, त्यांनाही कॉ. कुमार शिराळकर नाव माहीत आहे.

‘साधना’करता कॉ. कुमार शिराळकरवर लिहायचं कबूल तर केलं, पण कसं लिहावं ह्याचा विचार करायला लागलो तर वाटायला लागलं की, हे सोपं नाही. मग आमच्या दोघांचाही एक मित्र आहे, त्याला विचारलं, ‘‘काय करू रे? कुमार म्हणजे राजकीय कार्यकर्ता! त्याच्यावर लिहायचं म्हणजे त्यानं केलेल्या कार्यावर-राजकारणावर लिहायचं, कसं लिहू?’’ तो म्हणाला, ‘‘हे बघ, कुमार एक माणूस म्हणून काय आहे, त्याबद्दल लिहायचं. राजकारण जरा बाजूला ठेवायचं.’’ मी त्याता उत्तर दिलं नाही, पण मनात प्रश्न आला, माणूस म्हणून जगण्याचा अर्थच ज्याच्याकरिता, श्रमिकांकरता-दलितांकरता राजकारण करणं असा आहे, अशा व्यक्तीचं राजकीय जीवन वगळून त्याला माणूस म्हणून कसं रंगवणार? हा प्रश्न अनुत्तरित ठेवूनच मी कुमारची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न करीत आहे.

आजकालचा जमाना मीडियाचा जमाना आहे. एकुलत्या एका चित्रपटात काम केलेला कुणा अभिनेत्याचे काही मोजक्या दिवसांत हजारो तरुण-तरुणी फॅन होतात. एखाद्या वर्तमानपत्राने ठरवले तर एखादी व्यक्ती काही महिन्यांच्या काळात सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकप्रसिद्ध होते आणि ‘पद्मश्री’ पदाकडे यशस्वी वाटचाल करते. अशा ह्या जमान्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन अमेरिकेच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणांना सोडाच पण समाजसेवेचे तज्ज्ञ म्हणून सर्टिफाय झालेल्या एम.एस.डब्ल्यू. तरुणांनाही कुमार शिराळकर माहीत असण्याची शक्यता कमी आहे. पण परभणी, नगर ह्या जिल्ह्यांतील ऊसतोडणी कामगारांना, धुळे-जळगाव जिल्ह्यांतील आदिवासी शेतमजुरांना कुमार नेहमीच्या ओळखीतील व्यक्ती आहे. याशिवाय सातव्या दशकात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक घडामोडींत जे सहभागी होते किंवा जे ह्या घडामोडींची जागृतपणे दखल घेत होते, त्यांनाही कॉ. कुमार शिराळकर माहीत आहे. 

कुमारची आणि माझी पहिली भेट सोमनाथच्या परिसरात झाली. हे सोमनाथ म्हणजे सहाव्या शतकातील इतिहासप्रसिद्ध सोरटीसोमनाथ नाही, तर सातव्या दशकात (आणि अजूनही) दरसाल ज्या ठिकाणी विदर्भातल्या कडाडल्या उन्हात सातआठशे तरुण-तरुणी दहा दिवस श्रमदान करायचे ते श्री. बाबा आमटे यांच्या महारोगी समितीचे सोमनाथ. आमची भेट झाली तेव्हा कुमार नावाने कुमार असला तरी कुमारवयाचा नव्हता. त्या वेळी तो डोंबिवलीला प्रीमिअर ऑटोमोबाइलमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करत होता. नोकरी करून इतर नसते उद्योगही तो करत होता; त्यातील एक म्हणजे मुंबईच्या युवक क्रांती दलातील त्याचा सहभाग. त्यामुळे आमची भेट होणे साहजिकच होते. कुमारची उंची तशी सर्वसाधारण, शरीर व्यायामाचे पण नजरेत न भरण्यासारखे. त्यामुळे पहिल्या भेटीत आपण ह्या माणसासमोर ‘किस झाड की पत्ती’ अशी भावना निर्माण करणारे भारदस्त व्यक्तिमत्त्व त्याच्याजवळ नव्हते. अशी व्यक्तिमत्त्वे असलेली मंडळी त्या दिवसांत आसपास बरीच होती.

त्यांच्या गप्पागोष्टी ऐकणे हाही सोमनाथच्या युवक शिबिरातील एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. पण कुमार त्यांच्यातील नव्हता. पहिल्याच भेटीत माझ्या लक्षात आलं, हा माणूस बोलतो कमी, पण समोरची व्यक्ती काय बोलते हे लक्षपूर्वक ऐकतो आणि जेव्हा बोलतो, तेव्हा त्याच्या बोलण्यात एक ठामपणा असतो. स्वतःची काही ठाम मते बनलेली असूनही दुसऱ्याचे ऐकणारे तरुण त्या वेळीही अल्पसंख्य होते. मी त्या वेळी तिशी ओलांडली होती. चमकदार व्यक्तिमत्त्वाने भारून जाण्याचे वय संपत आले होते. मला वाटले की, ह्या माणसाशी आपले पटेल, सामाजिक, राजकीय चळवळीतील कार्यकर्ते कुमारला ओळखत असले तरी सर्वसामान्य माणसाला कुमार माहीत नसण्याचे कारण पन्नाशीच्या पुढे गेल्यामुळे कुमारची कार्यक्षमता कमी झालीय, किंवा त्याची फिरण्याची, कामाची गती मंदावली हे निश्चित नाही. कुमार तशा अर्थाने ‘लोकप्रसिद्ध’ नाही ह्याचं एक कारण आहे. 

काहीतरी ‘चमकदार’ करण्याच्या हौसेचा अभाव आणि प्रमुख कारण आहे, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहण्याचा त्याचा आग्रह. हा आग्रह सातव्या दशकाच्या काळातही होता. परंतु सातव्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात धुळे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात शोषणाविरुद्ध, सामाजिक अन्यायाविरुद्ध उभी राहिलेली आदिवासींची श्रमिक संघटना' ही तिच्या सातत्याच्या लढाऊ कार्यक्रमांमुळे आणि तिच्या वेगळेपणामुळे सतत वृत्तपत्रांमध्ये गाजत होती आणि कुमार ह्या संघटनेचा एक आघाडीचा कार्यकर्ता, प्रवक्ता होता. त्या काळी काँग्रेस पक्ष जसा इंदिरा गांधींच्या नावाने ओळखला जायचा तशाच संघटनाही आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या नावाने ओळखल्या जायच्या आणि श्रमिक संघटना ही कुमारच्या नावाने ओळखली जायची.

पण हे श्रेय कुमारला मिळावे ह्याला काही योग्य कारणेही होती. ह्या क्षेत्रातील आदिवासींना संघटित करण्यासाठी, त्यांची सामूहिक शक्ती वाढवण्यासाठी तो दिवसरात्र राबत होता. आपल्या दिवसाचा प्रत्येक क्षण योग्य प्रकारे उपयोगात आणण्याबाबत तो अतिशय काटेकोर होता. आणीबाणीच्या पूर्वीच ‘स्वयंअनुशासन’ नावाची शिस्त त्याने अंगी बाणवली होती. त्यात एक प्रकारचा कर्मठपणा होता, पण त्याचमुळे संघटनेत काम करणाऱ्या स्थानिक आणि अस्थानिक कार्यकर्त्यांनी त्याचा पुढाकार मान्य केला होता. श्रमिक संघटनेने आपली लढाऊ शक्ती कशा प्रकारे वाढविली पाहिजे, ह्याबद्दल त्याच्या मनातील संकल्पना इतर कार्यकर्त्यांच्या तुलनेत अधिक स्पष्ट आणि व्यावहारिक होत्या. शहादा क्षेत्रातील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक समस्यांबाबत त्याचा अभ्यास होताच, पण शहादा क्षेत्रातील आदिवासींतील शेकडो लोकांना तो नावाने ओळखत होता. श्रमिक संघटनेने शहादा विभागातील आदिवासी शेतकरी, शेतमजुरांच्या आदोलनांद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण कष्टकऱ्यांच्या मजुरीचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर आणलाच; पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध राजकीय, सांस्कृतिक संघर्षांतही श्रमिक संघटना इतर संघटनांच्या बरोबरीने लढ्यात उतरत होती. मुख्यतः आदिवासी कष्टकरी बहुसंख्य असलेल्या क्षेत्रात कार्य करत असूनही वर्चस्ववादी समाजव्यवस्थेत वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या, वर्चस्व टिकवून ठेवणाऱ्या ज्या ज्या रूढी, परंपरा, पद्धती, कायदे असतील- त्यांविरुद्ध सामूहिक संघर्ष करण्याची गरज आहे असे तो मानत होता. महाराष्ट्रातील मार्क्सवादी विचारांशी बांधिलकी उघड मान्य करूनही कुठल्याच डाव्या पक्षाचे संघटनात्मक बंधन नाकारणाऱ्या ‘मागोवा ग्रूप’चा तो सभासद होता. त्यामुळे सभा-शिबिरांत आपल्या खणखणीत आवाजात आपले म्हणणे साधेपणाने; परंतु सुस्पष्टपणे मांडणारा कुमार महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ्या लोकांना चांगला माहीत होता. सोमनाथमधील युवक शिबिरातील ओळख पुढे दाट होत गेली. 

71 साली त्या काळी सुधारलेल्या जगापासून दूरदूर असलेल्या भामरागडच्या दुर्गम भागाची ओळख करून घ्यायला आम्ही एक महिना त्या क्षेत्रात भटकण्याचा कार्यक्रम आखला. पावसाळा आणि हिवाळा यांच्या संधिकाळात खाण्यापिण्याचा शिधा स्वत:च्या पाठीवर घेऊन आम्ही दुथडी भरभरून वाहणाऱ्या आणि पल्याड जाण्यासाठी सेतू नसलेल्या नद्या पोहून, आमच्या उंचीपेक्षाही जास्त वाढलेल्या गवतातून वाट शोधीत, माडिया गोंडांची ओळख करीत भामरागड परिसरात भटकलो, आम्हां दोघांशिवाय तिसराही एक तरुण आमच्याबरोबर होता. दिलीप दिक्षित! गेल्या पंचवीस वर्षांपासून त्याचा संपर्क नाही. त्या एक महिन्याच्या काळात संकटप्रसंगीही मेंदू शांत राखण्याच्या आणि अत्यंत त्रासदायक परिस्थितीतही आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवण्याच्या कुमारच्या गुणाची मला ओळख झाली.

स्वतःपासून जरा वेगळे होऊन आपल्याकडे व परिस्थितीकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहण्याची त्याची कुवत पुढेही चळवळीत अनेक वेळा दर्शन देऊन गेली. कुमार त्या वेळी मुंबईत होता. तसा तो मिरजेचा. कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा, बाकी दोन बहिणी. मिरजेच्या इंजिनिअरिंग कॉलेजची डिग्री खिशात घालून पवईच्या आय.आय.टी. ला जॉइन होतानाच त्याने आपल्या वडिलांना सांगितले होते, ‘‘बहिणीचे लग्न झाले की, शिक्षण, नोकरी सोडून मी सामाजिक चळवळीत स्वतःला झोकून देणार.’’ शिराळकर कुटुंब जरी मुळापासून मिरजेचे, तरी मिरजेच्या संस्थांनी ब्राह्मणी कुटुंबांशी त्यांचे संबंध केवळ व्यावहारिक पातळीवरीलच होते. एक कारण म्हणजे शिराळकर कुळातील कुणा पूर्वजाने आपल्या रूढिप्रिय जात्याभिमानी ज्ञातिबांधवांना पसंत पडणार नाही, असा प्रमाद केला होता. त्याची आठवण ही मंडळी विसरली नव्हती. त्यामुळे ह्या कुटुंबाला वाळीत टाकले नव्हते हे खरे असले तरी सनातन ब्राह्मण कुटुंबे शिराळकर कुटुंबापासून दोन हात दूरच राहत असत. आजचे हिंदुत्ववादी एकाच वेळी हेडगेवार आणि गांधी यांना वंदनीय म्हणत असतील; पण त्या काळच्या हिंदुत्ववाद्यांच्या जिभेवर गांधी-नेहरूंचे नाव क्वचितच यायचे. मिरज म्हणजे तशा ‘अस्सल’ हिंदुत्ववाद्यांचा,  हेडगेवार-सावरकर भक्तांचा अड्डा आणि शिराळकर कुटुंब काँग्रेस व गांधी-नेहरूंचे अनुयायी. मिरजमध्ये काँग्रेस विचारसरणी मानणारे त्या काळी अल्पसंख्याकच होते. कुमारची आई कोरेगावच्या ना.ह.आपट्यांची मुलगी. कुमारच्या ह्या लेखक आजोबांनी लिहिलेल्या ‘न पटणारी गोष्ट’ या कथेवर व्ही. शांताराम यांनी ‘कुंकू’ काढला. सिनेमाची पटकथा आपट्यांनीच लिहिली होती. हे लेखक आजोबा अधूनमधून मिरजेला यायचे, कुमारही अधेमधे आजोळी जायचा. वाचनाची आवड येथूनच सुरू झाली असावी. निदान ह्या आवडीला खतपाणी तरी ह्या आजोबांकडून मिळाले असावे. जे मिळेल ते वाचायचे, हा खाक्या वादविवाद स्पर्धेत भाग घेताना ह्या वाचनाचा भरपूर उपयोग होत असे. लहानपणापासूनच कुमारचे अंबाबाई व्यायामशाळेशी नाते जुळले होते. देवपणा ल्यायलेली असली तरी बाई असलेल्या अंबेच्या नावाने असलेली ही व्यायामशाळा महाराष्ट्रात कदाचित एकमेव असावी. 

बालपणापासूनच मैदानी खेळाचा शौकिन असूनही कुमार केवळ आखाड्यात रमला नाही. मिरज विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने होणारी वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात, सामाजिक प्रबोधन करणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात कुमार पुढे असायचा. त्या वेळी वक्ते म्हणून हजर असणाऱ्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रांतील लोकांशी तो सहज संवाद साधू शकायचा तो या वाचनाच्या आवडीमुळेच. ह्या वाचनातूनच त्याची वेगवेगळ्या राजकीय विचारप्रवाहांशी ओळख झाली. मुंबईत आल्यावर असे वाद, चर्चा ह्यांत श्रोता म्हणून सहभागी होणं अधिकच सहजशक्य झालं. ह्यात क्वचितप्रसंगी स्त्रियांनी म्हणजे पुरोगामी स्त्रियांनी कुंकू लावावे वा नाही, ह्यावर घणाघाती चर्चाही ऐकायला लागली. पण विचारसरणीच्या कसोटीवर आपली मते घासून बघण्याची पद्धत अंगी बाणायला ते दिवस उपयोगी आले असणार. त्याचबरोबर कार्यक्रम आयोजनामध्ये प्रत्यक्ष जबाबदारी अंगावर घेण्याच्या सवयीमुळे वेगवेगळ्या समाजवादी विचारांच्या विचारवंतांशी, राजकीय नेत्यांशी, लेखकांशी प्रत्यक्ष बोलण्याची, त्यांना जवळून पाहण्याची संधीही मिळाली. किस्से सांगणे विशेषतः कुणा व्यक्तीच्या संदर्भातील किस्से सांगणे हे कुमारच्या स्वभावात बसत नाही. पण तरीही रात्री-बेरात्री स्टेशनवर गाडीची वाट पाहत बसलो असताना, किंवा ह्या खेड्यातून त्या खेड्यात जात असताना काही किस्से मी ऐकले आहेत. पुण्याच्या अशाच एका प्रसिद्ध साहित्यिकाचं भाषण त्यांच्या मंडळात निश्चित झालं होतं. पत्रव्यवहार झाला होता. वेळ-काळ निश्चित झाला होता.

तरीसुद्धा कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी ‘परत एकदा खुंटा हलवून पक्का करण्या’च्या दृष्टीने कुमार प्रीमिअरमधील काम संपवून तसाच पुण्यात संध्याकाळी येऊन पोहोचला. ह्या लेखकाकडे जाऊन केवळ त्याला स्मरण करून द्यायचे आणि परतायचे असा बेत होता. कुमार ह्या लेखकाच्या घरी पोहोचला, दारावरील बेल वाजवली, समोर आलेल्या लेखकाच्या पत्नीला कुमारने आपला हेतू सविस्तर विशद केला. सौभाग्यवती म्हणाल्या, "जरा इथेच थांबा. मी विचारून येते." कुमार दाराशीच उभा. काही क्षणांनंतर ह्या बाई बाहेर आल्या म्हणाल्या, "साहेबांनी सांगितलंय, साहेबांचे सामाजिक कार्य संध्याकाळी आठनंतर बंद होते." ह्याच काळात कुमारचा प्रवास व्यक्तिनिष्ठेतून विचारनिष्ठेकडे झाला असावा. आणखी एक किस्सा सांगायला हवा. बाबा आमट्यांकडे असतानाच कुलाब्यामध्ये वास्तव करणा-या माओवादी विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या एका आंग्ल महिलेला आम्ही दोघं भेटायला गेलो होती, तिच्याच इच्छेवरून कुलाब्यातील एका आलिशान दिवाणखान्यात आमची ही गुप्त मीटिंग झाली. मीटिंगमध्ये झालेली चर्चा अर्थातच आंग्ल भाषेत झाली आणि त्यात कुमारचाच मुख्य सहभाग होता. आम्ही तेथून बाहेर पडलो, तेव्हा माझ्यासारखाच कुमारनेही सुटकेचा दीर्घ सुस्कारा टाकला. आम्ही सोमनाथला परतलो, त्यानंतर काही दिवसांच्या अंतरानेच बाबांचा भिवंडीला काही कार्यक्रम होता. तेथून परत आल्यावर बाबांनी जरा वेगळ्या स्वरात आम्हांला, त्यांना ती महिला भेटल्याचे आणि ‘माय बॉइज आर वर्किंग इन चंद्रपूर’ अशी माहिती तिने त्यांना दिल्याचे सांगितलं. त्या बाईनं आम्हांला ‘माय बॉईज’ असं म्हटलेलं कुमारला आवडलं नाही. पण त्या काळात एकूण नेते मंडळीना ‘आमची पोरं’ म्हणून तरुणांना आपल्या ‘कुटुंबा’त सामावून घेण्याची स्टाइलच होती. कुमारने असं कुटुंबप्रमुखाचं नातं कुणाशी जोडलं नाही, कुणाला जोडू दिलं नाही. सामाजिक कार्यात कटू अनुभव येणारच, आणीबाणीच्या काळात मिसाखाली अटक होऊन काही दिवसांनी ‘नक्षलवादी’ नाही, म्हणून सोडून दिलं तरी कुमार भूमिगत राहून महाराष्ट्रात फिरत होता. या काळात मुंबईतील सबर्बनला एका जवळच्या आणि राजकीय समविचारी म्हणवणाऱ्या मित्राच्या घरी तो गेला असता, ह्या क्रांतिकारी मित्राने त्याला दरवाजाही उघडला नव्हता. परंतु ह्या अशा कटू अनुभवांतून जाऊनही कुमारच्या मनात कटुता निर्माण झालेली नाही.

मिरजहून मुंबईत आल्यावर चीन, रशिया, क्यूबा, इत्यादी देशांतील समाजवादी क्रांत्यांच्या इतिहासाचा आणि विचारप्रवाहांचा अभ्यास त्याने शिस्तीने सुरू केला. मुंबईच्या धामधुमीच्या जीवनात लोकलमध्ये उभ्या उभ्या केलेल्या वाचनांतून, प्लॅटफॉर्मवरील बाकावर गाडीची प्रतीक्षा करत वाचलेल्या पुस्तकावर काढलेल्या टिपणांतून, वेगवेगळ्या स्टेशनवर कुठे इंडिकेटरपाशी, किंवा कुठे घड्याळापाशी निश्चित वेळी येणाऱ्या मित्रांच्या भेटीसाठी ताटकळण्यातून, मनात ठरवलेल्या गोष्टी ठरावीक वेळी कर्तव्यकठोरपणे पार पाडण्याची सवय विकसित झाली असावी. ही सवय पुढे शहादा चळवळीत फारच फलदायी ठरली श्रमिक संघटनेच्या कार्यालयात; आजूबाजूला खेड्यांतील अनेक पीडित आदिवासी स्त्री-पुरुष छोट्या छोट्या गटांत कार्यकर्त्यांना आपल्यावरील अन्यायाच्या करुण कहाण्या सांगत असताना, किंवा कार्यकर्त्यांच्या एखाद्या तात्त्विक प्रश्नावर घणाघाती चर्चा सुरू असताना किंवा आपल्या कॉलेज-जीवनातील जीवनाविषयी कुणीतरी आपल्या रम्य आठवणी सांगत असतानाही कुमार भिंतीला टेकून पॅड मांडीवर घेऊन न सांगता, एकटाकी लेख लिहून काढीत असे, किंवा डेप्युटी कलेक्टरला एखाद्या प्रकरणाची साद्यंत माहिती देणारे निवेदन लिहीत असे. सर्व दिवसभर तहसील कार्यालय, कोर्ट, पोलीस स्टेशन आणि संघटनेचे कार्यालय येथे लोकांची अनेक गुंतागुंतीची प्रकरणे समजून घेण्यात, ती प्रकरणे योग्य प्रकारे हाताळताना मेंदू सुन्न होऊन जात असे, शरीर थकून जात असे.

जणू दिवसभर लोकांच्या व्यथा आणि अन्यायाच्या कथा ऐकून येणारा ताण आणि शीण हे त्याची लोकांसाठी धडपडण्याची जिद्द अधिकच धारदार करत असत! पण ह्याचा अर्थ कुमारचा चेहरा नेहमीच गंभीर, त्याचे वागणे इतरांपासून काहीसे अलिप्त, असे मात्र नव्हते. मुंबई-पुण्यातील वेगवेगळ्या राजकीय रंगांच्या नेत्यांचे व पुढाऱ्यांचे किस्से चांगल्या प्रकारे रंगवून सांगत असे. तो खास मूडमध्ये आला, की डाव्या विचारप्रवाहातील विचारवंतांवर, बुद्धिमंतांवर तो माफक स्वरूपाच्या परंतु मर्मभेदक कोट्या करीत असे. क्वचितप्रसंगी दिवसभर राजकीय चर्चा करून रात्री अंथरुणावर पडून चालणाऱ्या चकाट्यात तो नॉनव्हेजेटरियन जोक्सही सांगत असे. जाहीर सभेमध्ये भाषण करताना तो पूर्ण तयारीने येत असे. त्यात माहितीबरोबरच भावनांना हात घालण्याचे कार्य करणारे शब्द त्याच्या ओठांतून सहजतेने बाहेर पडत असत. 72 ते 80 या काळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पातळींवर जे सामाजिक, राजकीय, जातीय लढे, संघर्ष झाले, त्यांत श्रमिक संघटना सहभागी होत राहिली. त्या काळी वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर होणाऱ्या वादविवादांत संघदना आपली मते नोंदवत राहिली, ह्याचे बरेचसे श्रेय कुमारच्या राजकीय जागरूकतेला देणे योग्य ठरेल. 

79-80 च्या सुमारास चळवळीचे वारे ओसरू लागले. श्रमिक संघटनेच्या कार्यकर्त्यांत एका ठरावीक क्षेत्रात सीमित असलेली संघटना लढाऊ असली तरी काय करू शकते, याबद्दल शंका व्यक्त होऊ लागली. संघटनेची कार्यपद्धती बदलणे, नव्या आव्हानांना सामोरे जाणे ही गरज आहे असे काही म्हणून लागले; तर काही जण देशाच्या पातळीवरीत व्यापक डाव्या राजकीय प्रवाहाशी जोडून घेणे ही गरज आहे असे म्हणू लागले. कुमार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी श्रमिक संघटनेने नाते जोडले पाहिजे अशा मताचा होता. माझ्यासारख्या काही कार्यकर्त्यांचा याला विरोध होता. निवडणूक पद्धतीने सत्ताकारण करणाऱ्या डाव्या पक्षाशी लोकसंघटनेने बांधून घेणे म्हणजे लोकसमुदायांच्या लढ्यातील स्वयंस्फूर्त सहभागाला कुंठित करणे आहे असे माझे मत होते. श्रमिक संघटनेचा नेता म्हणून स्थानिक लोकांमध्ये आणि बाहेरही कुमारचा निश्चितच प्रभाव होता. परंतु हा निर्णय लोकसंघटनेने घ्यावयाचा आहे असे मान्य करून दोन्ही मतप्रवाहांच्या कार्यकर्त्यांना आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्याची संधी मिळावी, अशा सूचनेला कुमारने पूर्णपणे सक्रिय अनुमती दिली.

श्रमिक संघटनेशी नाते सांगणाऱ्या गावोगावच्या आदिवासी स्त्री-पुरुषांनी मतदान करून आपली सामूहिक इच्छा स्पष्ट केली. श्रमिक संघटना सी.पी.एम.च्या लोकसंघटनेशी जोडली गेली. संघटनेचे काही कार्यकर्ते कुमारसोबत पक्षाचे सभासद झाले. आज कुमार सीपीएम संचलित महाराष्ट्र राज्य शेतमजूर संघटनेचा सेक्रेटरी आहे. राज्य समितीचा सदस्यही आहे. पूर्वी श्रमिक संघटनेचा नेता म्हणून वेगवेगळ्या आंदोलनांत, चर्चासत्रांत, राजकीय कार्यक्रमांत तो वक्ता म्हणून पुढे असायचा. आज शेतमजुरांचे, ऊसतोडणी कामगारांचे, केळीबागेत काम करणान्या मजुरांचे लढे लढवण्यात तो पुढे असतो. अजूनही एका स्वयंअनुशासनाने तो महाराष्ट्रभर फिरत असतो. जागतिकीकरण, बाजारपेठेचे वाढते वर्चस्व, शासनयंत्रणेचे बदलते रूप, औद्योगिक क्षेत्रातच नके तर प्रामीण कृषिक्षेत्रातही श्रमिकांची बदलणारी परिस्थिती यांतून निर्माण झालेल्या प्रश्नांसंबंधात त्याच्याशी बोलले, तर ह्या परिस्थितीने नवे प्रश्न निर्माण केले आहेत आणि ते जुन्या पद्धतीने सोडविता येणार नाहीत असे मान्य करून ‘पूर्वीसारखे एकाच क्षेत्रातील सर्व कष्टकऱ्यांना संघटित करून लढा देणे हे आज शक्य नाही. कष्टकरी आता गावाच्या शिवारात बद्ध नाही, स्थलांतर हा त्याच्या जीवनाचा स्थायीभाव होऊ पाहतोय. पण त्याचबरोबर सर्व राज्याच्या पातळीवर ग्रामीण शेतमजुरांची एकच एक प्रमुख मागणी घेऊन राज्यव्यापी लढा देण्याचीही आज परिस्थिती नाही’, हे तो मान्य करतो.

ग्रामीण जीवन बदलतेय, झपाट्याने बदलतेय, वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळ्या समस्या आहेत. शोषकवर्गाचे रूप जास्तीतजास्त धूसर होत चालले आहे. परिस्थिती गुंतागुंतीची होत आहे. हे खरे आहे की, मधला काही वर्षांचा काळ चळवळीच्या दृष्टीने अतिशय वाईट होता, शत्रू अधिक प्रबळ झाला म्हणून नव्हे... तर एकूण परिस्थितीच झपाट्याने बदलत होती म्हणून... तो काळ आता बदलतोय, अशी चिन्हे दिसायला लागली आहेत. जागतिकीकरण आणि परराष्ट्रीय कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे किंवा सरकारच्या कल्याणकारी कारभाराच्या डगल्याला जागोजाग छिद्र पडून शासनाचे खरे रूप बाहेर दिसू लागल्यामुळे म्हणा, ग्रामीण क्षेत्रातील तरुण अस्वस्थ होऊ लागला आहे. ह्याचा अर्थ चळवळींना भरती येईल, जनसमुदाय उत्स्फूर्त हालचाल करू लागतील असे काही कुमारचे मत नाही. कारण या परिस्थितीत केवळ निष्ठा, त्याग व धाडस हे गुण असूनही उपयोग होणार नाही. लढ्यातील सामान्य माणसांची आणि कार्यकर्त्यांची या भोवतालच्या गुंतागुंतीच्या वास्तवाविषयीची जाणीव वाढायला हवी. वाढवायला हवी. हे काम अवघड आहे, ह्यात काहीच शंका नाही; पण या बदलत्या, गुंतागुंतीच्या वास्तवाची जाणीव होणे हे पुढील लढ्याला अत्यंत आवश्यक आहे. पण त्याचबरोबर हा एक विशिष्ट मुद्दा कळीचा, बाकी सगळे गौण- अशी समज लढ्याला निश्चितच पोषक नाही.

ऊसतोडणी कामगार, केळी कामगार लढ्यांच्या संबंधातच सांगायचे तर, संप करून एखाद्या कारखान्याची मजुरी वाढवण्याचा संदर्भ देऊन भागणार नाही, राज्यातील सर्वच ऊसतोडणी कामगारांना कामगार म्हणून मान्यता मिळावी, त्यांना तशी ओळखपत्रे द्यावीत, आणि सर्व राज्याकरताच अशा मजुरांना जीवनात सुरक्षितता लाभावी असे प्रयत्न, असे नियम होणे गरजेचे आहे. आज आणि त्या काळीही समाजातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजगटाच्या यातनांविषयी, त्यांच्या स्वप्नांविषयी संवेदनाशील असलेला कुमार स्वतःच्या दुःखाबद्दल, स्वतःच्या खाजगी वैयक्तिक जीवनाबद्दल क्वचित बोलत असे. खरं तर त्या वेळी मागोवा ग्रूप आणि श्रमिक संघटना यांच्याशी बांधिलकी मानणारी मंडळी व्यक्तीव्यक्तींतील राजकीय संबंध आणि मैत्रीचे, स्नेहाचे संबंध ह्यांत अंतर नसले पाहिजे, असा आग्रह धरणारी होती. त्यामुळे कार्यकर्ते आपसांत राजकीय विषयावर जेवढ्या हिरीरीने चर्चा करीत तेवढ्याच सहजपणे आपल्या खाजगी आयुष्याबाबत बोलत असत. खेड्यापाड्यांतील कार्यकर्त्यांच्या घरच्या परिस्थितीबद्दल, घरगुती अडचणींबद्दल बारकाईने माहिती राखणारा कुमार मात्र आपल्या वैयक्तिक पातळीवरील क्लेशांविषयी क्वचितच मांडत असे, अगदी खोदून कुणी जर विचारलेच तर त्याच्या पद्धतीप्रमाणे थट्टा-मस्करी करून त्या विषयाला बगल देत असे. स्वतःच्या डोळ्यांतील अश्रु लपवून दुसऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसायला एक शक्ती असलेले व्यक्तिमत्त्व आवश्यक असते ह्यात काहीच शंका नाही. पण आपले दुःख न लपवता समवेदनेचे नाते जोडण्यातून खरी शक्ती आकारात येते हेही तितकेच खरे आहे. सातव्या दशकाच्या काळात कुमारने व एका समविचारी तरुणीने ‘जीवनसाथी’ म्हणून सहजीवन जगण्याचा प्रयत्न केला.

परंतु विविध कारणांनी तो प्रयोग दोघांनाही अर्धवटच सोडून द्यावा लागला. तेव्हापासून कुमार अविवाहित राहिला आहे. तो एकटा आहे असं म्हणता येईल; पण तो एकाकी जीवन जगतोय असं मात्र म्हणता येणार नाही. एक क्रांतिकारक विचारसरणी घेऊन संघर्षमय राजकीय कार्यालाच जीवनात महत्त्वाचे स्थान देणाऱ्या कार्यकर्त्याच्या प्रेमाच्या, मैत्रीच्या संबंधांनाही मर्यादा येतात असे मला नेहमी वाटत आले आहे. काही गोष्टी अशा कार्यकर्त्याला नाकाराव्या लागतात किंवा नाकारल्या जातात. सातव्या दशकाच्या सुरुवातीपासून सामाजिक आणि राजकीय कार्यांतले चढउतार ज्याने अनुभवले आहेत, असे कार्यकर्ते आपल्याला दिसतात. असे होणे म्हणजे तो त्या व्यक्तींचा दोष आहे. त्यांचा दुबळेपणा आहे असे मला कधीच वाटलेले नाही. कारण आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत ‘नैराश्य’ आणि ‘सत्तासंपादनाची भूक’ ह्या दोन्ही धोक्यांपासून स्वतःला दूर राखणे हे सामान्यत्वाचे लक्षण नाही. कुमारने ह्या दोन्ही धोक्यांपासून स्वतःला दूर राखले आहे. जगण्याची एक पद्धती त्याने निवडली आहे आणि तसा तो जाणीवपूर्वक जगत आहे. तो ज्या पक्षामध्ये कार्य करतो त्या पक्षाला त्याच्या या गुणांचा लाभ होऊ शकतो का, तसा लाभ करून घेणे शक्य आहे का, ह्या प्रश्नांबद्दल आपल्याला विचार करायची गरज नाही.
 

(स्वतःला झोकून देऊन उभे आयुष्य पणाला लावून झुंजणाऱ्या कार्यकर्त्यांचे ‘साधना’ला खूप अगत्य आहे. साने गुरुजींच्या जीवननिष्ठेची ही कृतिशील प्रतिबिंबेच आहेत असे आम्हांला वाटते. कार्यकर्ता पडतो कसा, समुदायाशी आपली नाळ जोडतो कसा, लढतो कसा; कुटुंब, सगेसोयरे, समाज यांचे हार आणि प्रहार पचवितो कसा, याचा अंतर्वेध घेणारा आलेख मांडता यावा यासाठी हे सदर सुरू करत आहोत. कोणीच लढत नाही आणि कोठे काहीच घडत नाही, असे मानणाऱ्या अनेक मरगळलेल्या मनांना ही जितीजागती उदाहरणे उमेद व हिंमत देतील असा विश्वास वाटतो. महाराष्ट्रातल्या ज्या ज्या कार्यकर्त्यांबद्दल असे शब्दांकन व्हावे असे वाचकांना वाटते तेही त्यांनी जरूर कळवावे.)

- संपादक
 

Tags: श्रमिक संघटना मागोवा ग्रूप समाजकार्य कुमार शिराळकर व्यक्तिविशेष shramik sanghatana magova group social work kumar shiralkar individual special weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके