डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू

प्रा.व.वा. देशमुख यांनी फुले-सयाजीराव- शाहू-आंबेडकर हे नवे वैचारिक प्रारूप स्वीकारण्याची गरज व्यक्त केली आहे. ते म्हणतात, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण, धर्मचिकित्सा, सामाजिक सुधारणांचे कायदे, विविध प्रकारच्या सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिक व कृषी सुधारणांच्या बाबतीत केलेले अलौकिक कार्य आणि राजा असूनही आपल्या वर्गीय हिताविरोधी बंड करून स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी झपाटलेल्या सयाजीरावांचे नाव फुले-शाहू-आंबेडकर चळवळीशी निगडित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला तर ते सत्याशी व इतिहासाशी सुसंगत ठरेल. पुरोगामी चळवळीने या चारही महामानवांच्या ऐतिहासिक कार्याचा विचार करून भविष्यात वाटचाल केली पाहिजे. गंगेचे अलाहाबादचे विस्तीर्ण पात्र पाहताना गंगोत्रीकडे दुर्लक्ष होऊ नये.  

बडोदा आणि कोल्हापूर ही भारतातील दोन प्रागतिक संस्थाने आहेत. विशेष म्हणजे ही दोन्ही मराठी संस्थाने ज्याप्रमाणे पुरोगामी धोरणांच्या दृष्टिकोनातून परस्परांशी संवादी नाते ठेवून होती त्याचप्रमाणे रक्तसंबंधांच्या दृष्टीनेही या दोन संस्थानांचा 82 वर्षांचा प्रदीर्घ ऋणानुबंध होता. सयाजीराव आणि शाहू यांच्या प्रागतिक धोरणांमध्ये असणारे कमालीचे साम्य व प्रागतिक कोल्हापूरच्या जडणघडणीसाठी बडोद्याने पुरवलेल्या ज्ञानउर्जेची दखल आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासकारांबरोबरच शाहू इतिहासकारांनीही अजिबात घेतली नाही. महत्त्वाचे म्हणजे शाहू महाराजांनी कोल्हापूरचा पुरोगामी वारसा बडोद्याकडून घेतला होता हा एक ‘जाणीवपूर्वक’ अंधारात ठेवलेला इतिहास आहे. सयाजी-शाहू पत्रव्यवहार चाळला तरी महाराजा सयाजीराव शाहू महाराजांसाठी ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड’ होते या ऐतिहासिक सत्यावर पूर्ण प्रकाश पडतो.

आधुनिक महाराष्ट्रातील पुरोगामित्वाचे ‘फुले-शाहू-आंबेडकर’ मॉडेल महाराष्ट्राचे बौद्धिक नेतृत्व करत आहे. या तिन्हीही महापुरुषांच्या विचार आणि कार्यातील परस्परसंबंध आपण आग्रहाने मांडतो. परंतु या तिघांच्याही जीवनातील समकालीन संदर्भ तपासले असता महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी या तिघांचा सकारात्मक आणि रचनात्मक सामाजिक संवाद होता याचे असंख्य पुरावे उपलब्ध असल्याचे आढळते. त्या दृष्टीने जेव्हा आपण शाहू महाराजांचा सयाजीरावांशी नेमका कसा संवाद होता हे शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक सुखद धक्के बसतात.

सयाजी-शाहू या वैचारिक ऋणानुबंधातील सर्व चढ-उतार ‘जसे घडले तसे’ आणि संजय सुब्रमण्यम यांच्या ‘जोडलेला इतिहास’ (Connected History)  या संकल्पनेच्या आधारे जोडून-समजून घेतले तर आपला एक अत्यंत धक्कादायक पुरोगामी आणि खरा इतिहास स्पष्टपणे पुढे येतो जो अत्यंत वैभवशाली आणि आपल्याला संवादाची परंपरा आहे, याची जाणीव अधोरेखित करणारा ठरतो.

सयाजीरावांचे समकालीन : राजर्षी शाहू

नाशिक जिल्ह्यातील कवळाण्यासारख्या छोट्या गावात पाटीलकीचे वतन असणाऱ्या सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेले सयाजीराव वयाच्या 12 व्या वर्षी दत्तक जाईपर्यंत निरक्षर होते. गावातील सर्व जातीधर्माच्या गोरगरीब सवंगड्यांमध्ये सयाजीरावांचे बालपण गेले. बडोद्याला दत्तक गेल्यानंतर सर इलियटसारख्या व्यापक दृष्टी असणाऱ्या शिक्षकाचा सहवास, उपजत चौकस बुद्धी, कष्ट आणि वाचन यातून सयाजीरावांमधील समाजक्रांतिकारक अतिशय गांभीर्याने घडला. 1875 ला बडोद्याच्या गादीवर दत्तक गेलेल्या सयाजीरावांनी  1881 ला वयाच्या 18 व्या वर्षी राज्यकारभार हाती घेतला.

तर शाहू महाराज 1894 ला वयाच्या 20 व्या वर्षी कोल्हापूर संस्थानातील कागल येथून कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. त्याच वर्षी राज्यकारभाराचे अधिकार त्यांना प्राप्त झाले. एका अर्थाने हे दोन महान राजे समकालीन होते. सयाजीरावांना 64 वर्षे असा प्रदीर्घ काळ राज्यकारभार करता आला. दुर्दैवाने शाहू महाराजांना अवघी 28 वर्षे राज्यकारभार करता आला. शाहूंना दीर्घायुष्य लाभले असते तर त्यांनी बडोद्याची ‘प्रतिसृष्टी’ कोल्हापुरात उभी केली असती हे त्यांच्या लढवय्या स्वभावावरून निश्चितपणे म्हणता येईल.

सयाजीरावांनी आपल्या पुरोगामी राज्यकारभाराला शाहू महाराजांच्या आधी 13 वर्षे आरंभ केला. महाराजा सयाजीराव आणि शाहू महाराज हे परस्परांचे नातेवाईक होते. त्यांच्यामधील पुरोगामी वैचारिक संवाद 1900 च्या कोल्हापुरातील वेदोक्तापासून ते 1922 मध्ये राजर्षी शाहूंच्या निधनापर्यंत म्हणजे 22 वर्षांचा होता. या 22 वर्षांतील सयाजी-शाहू संबंध समजून घेणे आणि शाहूंच्या पुरोगामी धोरणातील ‘सयाजीविचार’ अधोरेखित करणे हाच उद्देश या चर्चेमागे आहे.

महाराजा सयाजीराव-राजर्षी शाहू : तुलनात्मक ‘आकलन’

सयाजीराव महाराज आणि राजर्षी शाहू या दोन महान राजांची तुलना महाराष्ट्रातील शाहू प्रेमींना कदाचित अतिरेकी आणि अनावश्यक वाटेल, परंतु महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा समजून घेण्यासाठी ती अनिवार्य ठरते. या दोन्ही राजांचा तुलनात्मक अभ्यास फार पूर्वीच व्हायला हवा होता. परंतु सयाजीरावांना ‘बडोद्याचे’ म्हणून आम्ही दुर्लक्षित ठेवले. दोघांकडेही काम केलेल्या वि.द. घाटे या शिक्षणतज्ज्ञाने ‘दिवस असे होते’ या आत्मकथनात या दोघांची अत्यंत चित्तवेधक तुलना केली आहे. अलीकडे शाहू गौरव ग्रंथासाठीच्या लेखात बाबा भांड यांनी घाटेंच्या तुलनेचा अधिक विस्तार त्यांनीच शोधलेल्या नव्या संदर्भांच्या आधारे केला आहे. प्रस्तुत तुलना ही मुख्यत: पुरोगामी महाराष्ट्राचे ऊर्जाकेंद्र बडोदा कसे होते, हे शोधणे या मर्यादित भूमिकेतून आणि या दोघांचे बोट धरून केली आहे.

प्रारंभी वि.द. घाटे यांनी या दोघांच्या स्वभावाच्या अंगाने केलेली तुलना विचारात घेऊ. वि.द. घाटे म्हणतात, ‘‘शाहूमहाराज आणि सयाजीराव महाराज हे दोघे राजपुरुष बरेचसे समकालीन. दोन्हीही मोठी माणसे; परंतु दोघात फार फरक होता. पहिले दहा-दहा तास उन्हातान्हात घोड्यावर बसून डुकरांचा माग काढायचे, तर दुसरे दहा-दहा तास नव्या नव्या शास्त्रांवरील ग्रंथांचे श्रवण करीत जागरण करायचे. एखादा प्रश्न डोकावला रे डोकावला की पहिले त्याला ताबडतोब कार्यवाहीत आणायचे. दुसरे स्वतःचे मत निश्चित असले तरी चार तज्ज्ञांची कमिटी नेमायचे. त्यांना पुरेसा वेळ द्यायचे. त्यांचा अहवाल सावकाश वाचायचे. चर्चा करायचे व मगच निर्णय घ्यायचे. सयाजीरावांपाशी जन्म काढलेले माझे मित्र मला थट्टेने नेहमी सांगत, एखाद्या माणसाने राजवाड्यात येऊन, समोर उभे राहून महाराजांना शिव्या दिल्या असत्या तर सदर इसमाने खरेच शिव्या दिल्या का, दिल्या असल्यास त्या किती वाईट होत्या, शिव्या वाईट असल्यास त्यास काय शिक्षा करावी, हे ठरविण्यासाठी महाराजांनी एखादी कमिटी नेमली असती.’’ वि.द. घाटेंचे हे विश्लेषण वाचल्यानंतर या दोघांच्या स्वभावातील दोन टोकांचे आपल्याला दर्शन घडते.

या तुलनेच्या शेवटी वि.द. घाटेंनी केलेले विश्लेषण आपल्या पुढील विवेचनासाठी मार्गदर्शक आहे. घाटे म्हणतात, ‘‘तसे पाहिले तर शाहूमहाराजांनी जे जे केले ते सारे सयाजीराव महाराजांनी केले. इतकेच नव्हे तर त्यांच्यापूर्वीच केले. वेदोक्त सयाजीराव महाराजांनीच सुरू केले. शाहू महाराजांनी पुढे ते धसास लावले. सयाजीरावांनी आपल्या पंक्तीला अस्पृश्यांना घेतले. त्यांना नोकऱ्या दिल्या. आंबेडकरांच्या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला; परंतु हे सारे केले ते अलिप्त वृत्तीने. आपल्या विशाल कार्यक्षेत्रातील आणि विशालतर जीवनातील केवळ एक भाग याच भावनेने आणि दृष्टीने. साहजिकच सयाजीरावांच्या सामाजिक किंवा जातीय कार्याचा गाजावाजा झाला नाही आणि त्यांच्यावर टीकेचा वर्षावही झाला नाही.’’

वि.द. घाटेंनी दोघांच्याही कार्याचे ऐतिहासिक मूल्यमापन केले आहे. कोल्हापुरातील अनेक सुधारणांचा उगम सयाजीरावांच्या धोरणात असल्याचे अनेक पुरावे शाहू महाराजांनी बडोद्याशी केलेल्या पत्रव्यवहारात सापडतात. परंतु यासंदर्भात चर्चा मात्र झालेली नाही. ही चर्चा दोघांपैकी कोण श्रेष्ठ हे ठरविण्यासाठी नाही, पुरोगामी धोरणांच्या अंमलबजावणीत परस्पर पाठबळाची गरज असते. ही गरज इतिहासात कशी भागवली गेली होती हे समजण्यासाठीच ही तुलना केली आहे.

घाटेंप्रमाणेच बाबा भांड यांनी सयाजीराव आणि शाहू यांची तुलना करून काढलेला निष्कर्ष वरील मांडणीची पाठराखण करताना दिसतो. बाबा भांड म्हणतात, ‘‘महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू हे दोघेही समाजपुरुष लोककल्याण आणि समाजसुधारणांसाठी उत्तम प्रशासनाचा आदर्श होते, बुद्धीवादी होते, नवीन प्रयोग करण्यास मागे-पुढे पाहत नसत. सयाजीरावांचा मदतीचा हात अधिक मोकळा होता. वेगवेगळ्या जातीच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहाचा शाहूंचा प्रयत्न हे चांगले उदाहरण सांगता येईल. शाहू छत्रपतींचे ब्रिटिश सरकारांशी असलेले मित्रत्वाचे संबंध आणि वागणे त्यांच्या समतोल व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. याउलट, एक व्यासंगी, विद्वानांच्या संगतीत वावरणारे आणि जगभर फिरलेले स्वाभिमानी सयाजीराव महाराज ब्रिटिशांची रणनीती पुरती ओळखून आयुष्यभर संयमाने सरकारशी संघर्ष करत राहिले. हे करत असताना त्यांनी रयतेच्या कल्याणाचा चोवीस तास ध्यास घेतला. साहित्य, कला, संस्कृती, उद्योग, शेती आणि प्रशासनात बडोदा हे हिंदुस्थानातील अग्रगण्य संस्थान बनवले. शाहू महाराजांच्यापूर्वी महात्मा फुले व सत्यशोधक चळवळीकडे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी लक्ष दिले.

‘‘राजर्षी शाहू आणि महाराजा सयाजीरावांची पिंड व प्रकृती मूलतः भिन्न होती. राजर्षी शाहू एखादी गोष्ट करताना एकदम धडक मारत, टक्कर घेऊन प्रतिस्पर्ध्याला चारीमुंडी चीत करण्याची पहिलवानी शक्ती वापरत. याउलट, सयाजीराव महाराज एखादा निर्णय घेताना चार तज्ज्ञांचे मत घेत, त्यांचेकडून अहवाल मागवत, स्वत: त्याचा विचार करुन समतोल निर्णय घेत. तरीसुद्धा विद्याप्रसारक चळवळीचे सयाजीराव पहिले आश्रयदाते झाले. पुढे सयाजीरावांच्या कार्यात शाहू महाराजांनी भर घातली. सयाजीरावांचे धोरण सामिलकीचे असल्याने कट्टर हिंदुत्ववादी सावरकरवादी, फुल्यांचे सत्यशोधक, आर्यसमाजाचे, बुद्धिस्ट आणि पुरोगामी विचारांची माणसे त्यांच्याकडे नोकरीला होती. या सर्वांना बरोबर घेऊन सयाजीराव महाराजांनी सामिलकीच्या धोरणाचा पुरस्कार केला. महाराष्ट्रालाच नव्हे तर सर्व हिंदुस्थानाला गौरव आणि अभिमान वाटावा असे या दोघांचे कार्य आहे.’’

वरील तुलना भारताच्या प्रबोधन परंपरेतील या दोन महापुरुषांच्या नेमक्या स्थानाची, योगदानाची, परस्पर प्रभावाची आणि या दोघांच्या जोड इतिहासाचा नेमका परिचय करून देणारी आहे.   

बडोदा : पुरोगामी कोल्हापूरचे ‘उर्जाकेंद्र’

गेल्या 20 वर्षांत शाहू संशोधनाचा परमोच्च विकास महाराष्ट्रातील तथाकथित इतिहास संशोधकांनी जिद्दीने केला. त्याचे कौतुक केलेच पाहिजे. परंतु महापुरुषांना ‘सुपरमॅन’ म्हणून सादर करण्याची स्पर्धा फारच केविलवाणी आणि मनोरंजक आहे. कारण महापुरुषांनी परस्परांचे हात पकडून ‘विषमतेचा महापूर’ पार करण्याची जीवघेणी लढाई प्राणपणाने लढली असताना अभ्यासक, अनुयायी, भक्त आणि संशोधक यांनी मात्र आपापल्या जातीच्या महापुरुषांवर ‘खाजगी संपत्ती’सारखा दावा केला आहे.

हे महापुरुष समाजाचे असताना त्यांना एका जातीत किंवा एका कंपूत जखडून ठेवण्याची करामत आपल्या संशोधकांनी केल्यामुळे त्यांच्यातील संवाद आपण गाडून टाकला. परिणामत: राजर्षी शाहूंच्या पुढे असणारा सयाजीरावांचा आदर्श आणि शाहूंनी सयाजीरावांचे केलेले शब्दश: अनुकरण याचे शेकडो पुरावे उपलब्ध असतानाही पुढे आले नाही. म्हणूनच इतिहास जोडून अभ्यासण्याची गरज आहे. याच भूमिकेतून शोध घेतला असता कोल्हापूरचे ‘ऊर्जाकेंद्र’ बडोदा असल्याचा सिद्धांत प्रस्थापित होतो.

सयाजीरावांनी 1882 मध्ये अस्पृश्य आणि आदिवासींसाठी मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू केला. सयाजीरावांनी त्यांच्या संस्थानातील सोनगड या ठिकाणी 1882 ला अस्पृश्य व आदिवासींसाठी मोफत तसेच वसतिगृहाच्या विनामूल्य सुविधेसह हा निर्णय राबविला. पुढे 11 वर्षे या निर्णयाच्या अंमलबजावणीतील अडचणी अभ्यासून 1893 मध्ये अमरेली प्रांतातील 10 खेड्यांमध्ये सयाजीरावांनी या प्रयोगाचा विस्तार केला. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यांची परिपूर्ण तयारी करून त्यानंतर 13 वर्षांनी 1906 मध्ये आपल्या संपूर्ण राज्यात सर्व जातीधर्माच्या मुलामुलींकरिता मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा अंमलात आणला.

सयाजीरावांच्या 1882 मधील निर्णयाचे अनुकरण करत शाहू महाराजांनी 1918 मध्ये प्रथम कोल्हापूर शहर आणि लगेचच संपूर्ण संस्थानात मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा अंमलात आणला. पण बहुधा आर्थिक अडचणींमुळे तो फक्त मुलांसाठी लागू केला. मुलींना या कायद्याचा लाभ झाला नाही. या उदाहरणावरून दोघांच्या कार्यपद्धतीतील फरक स्पष्टपणे अधोरेखित होतो. यासंदर्भात शाहू संशोधक डॉ.रमेश जाधव महत्त्वाचे निरीक्षण नोंदवतात. ते लिहितात... ‘‘मुलांच्या सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणावर शाहू छत्रपतींनी जितके लक्ष केंद्रित केले होते तितके लक्ष त्यांनी मुलींच्या शिक्षणावर केंद्रित केल्याचे दिसत नाही. ... मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षण कायद्यातून मुलींना वगळण्यात आले होते.’’

पुढच्याच वर्षी 1919 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानातील अस्पृश्य शाळा बंद करून स्पृश्य-अस्पृश्यांच्या सहशिक्षणाचा धडाकेबाज निर्णय घेतला. याउलट बडोद्यात 1882 पासून सयाजीरावांच्या निधनापर्यंत अस्पृश्यांच्या शाळा पूर्ण क्षमतेने काम करत होत्या. अस्पृश्यांच्या शाळांबरोबर सहशिक्षणाचा पर्याय शाहू महाराजांच्या हुकूमाअगोदर 31 वर्षे सयाजीरावांनी लोकांपुढे खुला ठेवला होता. याच वर्षी 8 जानेवारी 1919 ला एक आदेश काढून अस्पृश्य विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, पाट्या, पेन्सिली इत्यादी अभ्यास साहित्य पुरवण्याचा हुकूम करून त्यासाठी 2500 रुपये मंजूर केले होते. हा आदेश म्हणजे 1882 च्या सयाजीरावांच्या आदेशाचे शब्दशः अनुकरण होते. कारण सयाजीरावांनी ही योजना 1882 पासून म्हणजेच शाहूंच्या निर्णयाअगोदर 37 वर्षे बडोदा संस्थानात राबवली होती. अस्पृश्यता निर्मूलनामध्ये सर्वांत क्रांतिकारक यश सयाजीरावांनी साध्य करून दाखवले. ही भारतातील सर्वात मोठी शैक्षणिक क्रांती होती जिचा आजपर्यंत अभ्यास झालेला नाही.

सयाजीराव : कोल्हापुरच्या वेदोक्तातील ‘पाठीराखे’

बडोद्यात 1896 मध्ये उद्‌भवलेले वेदोक्ताचे प्रकरण 1900 ला कोल्हापूर संस्थानात उद्‌भवले. राजवाड्यावरील सर्व विधी वेदोक्ताऐवजी पुराणोक्त पद्धतीने होतात, हे राजारामशास्त्री भागवतांनी शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर शाहू महाराज विरुद्ध ब्राह्मण हा संघर्ष तीव्र झाला. टिळकांच्या केसरीने राजर्षी शाहूंच्या विरोधात आणि ब्राह्मणांच्या बाजूने हे प्रकरण तापवले. 7 ऑक्टोबर 1901 रोजी राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने केले पाहिजेत व जो न करील त्याला दक्षिणा मिळणार नाही असा हुकूम शाहू महाराजांनी काढला. परंतु कोल्हापुरातील ब्राह्मण याला दाद देत नव्हते. पुढे हे प्रकरण 1905 पर्यंत पेटत राहिले. एकच प्रकरण हाताळत असताना या दोन राजांच्या धोरणातील फरकामुळे या दोन ठिकाणच्या वेदोक्ताचे परिणाम वेगवेगळे झाले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शाहू महाराजांच्या वेदोक्ताच्या संघर्षात सयाजीराव शाहू महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.

त्यासंदर्भात दि.के. बेडेकरांचे निरीक्षण एकूणच महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर संघर्षाचे दिग्दर्शन करते. ते म्हणतात, ‘‘1900 पूर्वीच्या कालखंडात ब्राह्मणवर्गाने जोतिबा फुले यांच्याशी जो तुटकपणा व बेपर्वाईची वृत्ती दाखविली ती चुकीची होती. 1900 नंतरच्या काळात पुन्हा अशीच चूक ‘वेदोक्त प्रकरण’ या गाजलेल्या प्रकरणात घडली. पत्रव्यवहारामध्ये ह्या बाबतीत एक महत्त्वाचे पत्र आले आहे. ते पत्र सयाजीरावांनी शाहूछत्रपतींना लिहिलेले असून त्यात म्हटले आहे की, ‘सातारा येथील माझ्या मनुष्याला पत्र लिहून त्याच्याजवळ कागदपत्र असतील तर ते आपल्या हवाली करण्यास कळवितो.’ प्रतापसिंह महाराजांनी ‘वेदोक्त विधीची पद्धत’ 1838 मध्ये सुरू करविली व त्यासाठी उदेपूरच्या घराण्याची भोसले घराणे ही शाखा असल्याचा पुरावा उदेपूराहून आणवून घेतला होता. यासंबंधीचे हे कागदपत्र आहेत. खुद्द सयाजीरावांनी 1896 पासून आपल्या राजवाड्यातील धर्म कृत्ये वेदोक्त पद्धतीनेच सुरू केली होती. शाहूमहाराजांनी वेदोक्त विधीबद्दल जो रास्त आग्रह धरला त्याला काही विलंब न लावता व आढेवेढे न घेता मान्यता देणे पुण्याच्या ब्राह्मण नेत्यांना शक्य होते. पण ह्या बाबतीत योग्य ते धोरण न ठेवण्याची चूक झाली व मराठा समाजाला (म्हणजे त्यातील वरिष्ठ लोकांना) ब्राह्मणांविरुद्ध सकारण राग आला, हे उघड दिसते.’’

दि.के. बेडेकरांच्या या निरीक्षणाला आधार पुरविणारे संदर्भ शाहू पेपर्सच्या 10 खंडांमध्ये आपल्याला सातत्याने भेटतात. 1901 पासून हा संघर्ष मृत्यूपर्यंत म्हणजेच 1922 पर्यंत जवळजवळ 21 वर्षे शाहूंच्या मनात खदखदत होता. त्यांच्या आक्रमक स्वभावाला अनुसरून वेगाने आणि कायमचा ब्राह्मणी वर्चस्वाचा हा बुरूज फोडण्यासाठी ते पेटून उठले होते. त्यामुळेच धर्म आणि जातविषयक सुधारणा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ते वेदोक्तानंतर झपाट्याने जवळ करू लागले.

खासेराव जाधव : सयाजीराव - शाहुंमधील ‘क्रांतिकारक’ दुवा

राजर्षी शाहू आणि खासेराव यांच्यातील नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. कित्येक प्रसंगी शाहू महाराज खासेरावांना खाजगी पत्रे लिहून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत असत. राजर्षी शाहू खासेरावांना गुरुस्थानी मानत होते. तर खासेराव सयाजीरावांचे नातेवाईक आणि विश्वासू अधिकारी होते. राजर्षी शाहू बऱ्याचदा आपले मन मोकळे करण्यासाठी खासेरावांना पत्र लिहीत असत. त्याचप्रमाणे सयाजीरावही आपले मन मोकळे करण्यासाठी खासेरावांशी बोलत असत. बऱ्याचदा शाहू महाराज काही बाबींची चर्चा थेट सयाजीरावांशी न करता खासेरावांशी करत असत. एक प्रकारे सयाजीराव आणि शाहू महाराजांना जोडणारा एक विश्वासू आणि क्रांतिकारक दुवा अशीच खासेरावांची भूमिका होती.

1901 मध्ये शाहूंना लिहीलेल्या एका पत्रात सयाजीराव वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करतानाही दिसतात. या पत्रात सयाजीराव म्हणतात, ‘‘आपण विलायतेस जाल तेव्हा युरोप खंडातील चित्तवेधक स्थळे व संस्था पाहण्याची संधी केव्हाही दवडू नये. अशा संस्थांचे निरीक्षण केल्याखेरीज पाश्चात्त्य देशांत ज्या निरनिराळ्या संस्कृती उपलब्ध आहेत, त्यांचे तुलनात्मक ज्ञान संपादिता येणार नाही. आपण ज्या कार्याला उदार अंत:करणाने चालना दिली आहे, ते मी विसरलो नाही व पुढेही विसरणार नाही. आम्हाला थोडीशी अनुकूल परिस्थिती प्राप्त होण्याची मी वाट पाहत आहे. आपण आमच्या लोकांच्या कल्याणाचे कामी जे लक्ष घालीत आहात, त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो.’’

1887 च्या पहिल्या युरोपवारीत सयाजीरावांनी तुलनात्मक विचाराचे महत्त्व स्वअनुभवातून जाणले. पुढे आयुष्यभर त्यांनी हा वसा जपला. तुलनात्मक विचारपद्धतीमुळे आंधळ्या अनुकरणापेक्षा आपल्या परिस्थितीनुसार इतरांकडून काय आणि कसे स्वीकारावे याची दृष्टी लाभते. याच भूमिकेतून सयाजीरावांनी शाहूंना वरील ‘वडिलकी’चा सल्ला दिला होता.

बडोदा : कोल्हापूरातील सामाजिक सुधारणांचा ‘रोडमॅप’

9 मे 1918 रोजी शाहू महाराजांनी सयाजीरावांना लिहिलेले इंग्रजी पत्र हे सामाजिक सुधारणेबाबत राजर्षी शाहुंसमोरील बडोद्याच्या आदर्शाचा उत्तम पुरावा आहे. या पत्रात बडोद्यातील शिक्षण निरीक्षक म्हणून काम करणारे आर्य समाजाचे कार्यकर्ते पंडित आत्माराम हे बडोद्याच्या सेवेतून कोल्हापुरात शैक्षणिक काम पाहण्यासाठी हवे असल्याचे शाहू महाराजांनी सयाजीरावांना लिहिले होते. त्याचप्रमाणे याच पत्रात बडोद्यातील जमीन विभाजना-संदर्भातील कायदा हवा असल्याचे लिहिले होते. तर त्याच दिवशी लिहिलेल्या मराठी पत्रात बडोद्यातील जमिनीच्या विभाजनाबद्दलचा कायदा देण्याची विनंती शाहू महाराजांनी केली होती. त्यावर ‘हा कायदा अद्याप पास झालेला नसून तो पास झाल्यानंतर तुम्हाला पाठविण्यास मंत्र्यांना सांगितल्याचे’ सयाजीराव महाराजांनी कळवले.

आधुनिक महाराष्ट्रात मराठा जातीच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सर्वप्रथम आणि सर्वाधिक योगदान देणारे गंगारामभाऊ म्हस्के यांनी 1885 मध्ये पुण्यात मराठा जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. महाराजांनी या संस्थेला 1885 ते 1939 असे 54 वर्षे अखंडपणे आर्थिक पाठबळ दिले. ही मदत 5 लाख 29 हजार 556 रु. इतकी होती. आजच्या रकमेच्या दरात या रकमेचे कमीतकमी मूल्य 72 कोटी 25 लाख रु. हून अधिक भरते.

वसतिगृह, शिक्षण आणि संस्थाच्या प्रशासनासाठी शिकलेले लोक मिळवण्यासाठी राजर्षी शाहू यांचा म्हस्केंबरोबर पत्रव्यवहार होत होता. 1894-95 च्या दरम्यान शाहू महाराजांच्या मागणीवरून म्हस्केंनी दाजीराव अमृतराव विचारे आणि भास्करराव विठ्ठलराव जाधव या दोन बहुजन समाजातील होतकरू पदवीधर विद्यार्थ्यांची नावे कळवली. पुढे शाहू महाराजांनी भास्करराव जाधवांची 8 जून 1895 रोजी असिस्टंट सरसुभे म्हणून कोल्हापूर संस्थानात नेमणूक केली. शाहू महाराजांनी दाजीराव विचारे यांनाही बांधकाम विभागाचे प्रमुख केले. सयाजीरावांचे आर्थिक पाठबळ मिळालेल्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर शिकलेल्या 32 व्यक्ती कोल्हापुरात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होत्या. यामध्ये जिवाजीराव सावंत, पहिले क्षात्रजगद्‌गुरू सदाशिवराव पाटील बेनाडीकर, कोल्हापूर संस्थानातील पहिले मराठा न्यायाधीश खंडेराव बागल, शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी पी.सी. पाटील ही काही प्रमुख उदाहरणे सांगता येतील. शाहू महाराजांच्या कार्याला सयाजीरावांकडून मिळालेली प्रेरणा, नैतिक पाठबळ आणि सहकार्य हे वादळातील दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरल्याचे यावरून सिद्ध होते.

आर्य समाज, सयाजीराव आणि शाहू यांच्यातील सहसंबंध डॉ. रा.चिं. ढेरे यांनी अतिशय दुर्मिळ संदर्भांच्या आधारे मांडला आहे. डॉ. ढेरे लिहितात, महाराजांचे धाकटे बंधू संपतराव गायकवाड यांनी स्वामीजींना कळवले होते की, आर्य समाजाच्या विचारांच्या प्रसारासाठीच नव्हे तर समाजसेवेच्यासाठी विशेषतः अंत्यजांच्या शिक्षणासाठी उपयोग व्हावा म्हणून महाराजांनी बडोदा शहराच्या परिसरातच एक वास्तू देण्याची इच्छा दर्शवली आहे.

असे हे आर्य समाजाच्या प्रचारकांनी प्रभावित केलेले बडोदा शहर आणि तेथील सयाजीरावांसारखे निर्भय, निरामय, प्रागतिक शासक राजर्षी शाहूंच्या प्रेमाचे विषय होते. राजर्षींच्या पत्नी महाराणी लक्ष्मीबाई बडोद्यातीलच गुणाजीराव खानविलकर या जहागीरदारांच्या कन्या होत्या आणि हे घराणे गायकवाड घराण्याशी निकटच्या नातेसंबंधातील होते. महाराणी लक्ष्मीबाईंच्या आजींचे सयाजीरावांशी बंधुत्वाचे नाते होते. राजर्षींवर बडोद्याचा अवीट प्रभाव होता. ढेरेंनी आर्य समाजाच्या अंगाने राजर्षी शाहूंवरील ‘सयाजी प्रभाव’ वरीलप्रमाणे स्पष्ट केला आहे. शाहूंच्या सर्वच पुरोगामी धोरणांवर ‘सयाजी प्रभाव’ नाकारता न येण्याइतका स्पष्ट आहे. परंतु शाहूंवरील अलीकडच्या एका सर्वात परिपूर्ण आणि संशोधनात्मक ‘महाप्रकल्पा’त मात्र सयाजीरावांचा संबंध केवळ ‘अर्पणपत्रिके’त ‘बांधून’ ठेवला आहे हे विशेष. यावर स्वतंत्र संशोधन होण्याची नितांत गरज आहे.

महाराजा सयाजीराव : राजर्षी शाहूंचे ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड’

महाराजा सयाजीराव राजर्षी शाहूंसाठी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड होते यावर प्रकाश टाकणारे एक पत्र शाहू पेपर्समध्ये उपलब्ध आहे. कर्झन भारतातला आपला कार्यकाळ पूर्ण करून परत जात असताना निरोप समारंभात लॉर्ड कर्झनची शाहू महाराजांशी भेट झाली. त्या वेळी सयाजीरावांच्या प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानिकांनी करावे असे कर्झन यांनी राजर्षी शाहूंना सुचवले.

येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागते ती अशी की, ब्रिटिश अधिकाऱ्यामध्ये सयाजीरावांचा सर्वाधिक संघर्ष लॉर्ड कर्झनशी झाला होता. असे असूनही कर्झन सयाजीरावांबद्दल जे बोलतात ते अधिक महत्त्वाचे आहे. 22 सप्टेंबर 1917 ला राजर्षी शाहूंनी सयाजीरावांना लिहीलेल्या पत्रात सयाजीरावांनी राबविलेले प्राथमिक शिक्षणाचे धोरण आपले जीवनध्येय म्हणून स्वीकारल्याचे लिहिले आहे. शाहू महाराज लिहितात, I want to get it (i.e. programme of introducing Free and Compulsory Primary Education in the State) done in my life time and follow Your Highness.  यावरून शाहू महाराजांनी सयाजीरावांना आपले आदर्श म्हणून स्वीकारले होते हे सिद्ध करते.

धार्मिक सुधारणा : बडोदा-कोल्हापूर ‘सहसंबंध’

1896 च्या बडोद्यातील वेदोक्ताच्या अगोदर 14 वर्षे म्हणजेच 1882 मध्येच सयाजीरावांनी धर्म सुधारणांचे काम हाती घेतले होते. 1893 मध्ये सयाजीरावांनी ब्राह्मण आणि मुसलमान यांना धर्मकार्य म्हणून वाटली जाणारी खिचडीसाठीची तांदूळ आणि डाळ यातील सावळा गोंधळ दानधर्माचा नियम करून संपवला. गरजू, अंध, अपंग, अनाथ यासारख्या गरजूंना अन्नदान करण्यासाठी पास देण्याची व्यवस्था केली. हीच परंपरा राजर्षी शाहूंनी पुढे 38 वर्षांनी स्विकारल्याचा पुरावा 22 ऑक्टोबर 1920 रोजी शाहू महाराजांनी बडोद्याच्या खासेराव जाधवांना लिहिलेल्या पत्रात आढळतो. या पत्रात आपण कोल्हापूर संस्थानामार्फत पंढरपूरच्या देवस्थानासाठी नैवेद्य इत्यादींवर होणारा खर्च बंद करून त्याचा वापर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करावा असा हुकूम दिल्याचे मोठ्या समाधानाने शाहू महाराज सांगतात.

शाहू महाराजांनी आपल्या जनक घराण्यातील चुलत बहिणीचा विवाह इंदूरच्या होळकर या संस्थानात घडवून आणण्यासाठी 1918 पासून खूप प्रयत्न केले होते. राजर्षी शाहूंच्या हयातीत हा विवाह ठरला आणि त्यांच्या मृत्यूनंतर तो विवाह झाला. या विवाहाची प्रेरणासुद्धा बडोदाच होती. सयाजीराव महाराजांच्या कन्या इंदिराराजे यांनी कूचबिहार या आदिवासी संस्थानातील राजकुमार जितेंद्र नारायण यांच्याशी स्वत: ठरविला होता. हा विवाह 1913 रोजी झाला. हा फक्त आंतरजातीय विवाह नव्हता तर मराठा-आदिवासी विवाह होता हे महाराष्ट्राला माहीत नाही. आधुनिक भारतातील जातीअंताच्या चळवळीला सर्वाधिक प्रेरणा देणारा हा पहिला अशा प्रकारचा विवाह ठरतो. याबरोबरच शाहू महाराजांनी 23 फेब्रुवारी 1918 रोजी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदाही केला होता. या कायद्याअगोदर 17 वर्षे अशाच प्रकारचा कायदा 1901 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा या नावाने सयाजीरावांनी बडोद्यात केला होता.

जीवनाच्या उत्तर काळात शाहू महाराज अस्पृश्यता निवारणाबरोबर जातीअंताकडे वळले होते हे यातून स्पष्ट होते. ज्याप्रमाणे कोल्हापूर संस्थानातील शैक्षणिक प्रगतीबरोबरच धर्मसुधारणेसाठीही पंडित आत्माराम हे राजर्षी शाहूंच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. 1919 मध्ये शाहू महाराजांनी पंडित आत्मारामांना कोल्हापूरला बोलावून राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे चालवण्यास दिले होते. कोल्हापुरातील शिक्षण आणि अस्पृश्योद्धार या दोन्ही कामांसाठीचा हुकमी आधार याच भूमिकेतून शाहू महाराज बडोद्याकडे पहात होते.

सयाजीराव - शाहू : ‘दुर्लक्षित’ पत्रव्यवहार

महाराजा सयाजीराव आणि शाहू महाराज यांच्यात झालेला पत्रव्यवहार पुरोगामी महाराष्ट्राच्या संघर्षगाथेतील एक ऊर्जादायी ‘प्रेरणाप्रवास’ आहे. या पत्रव्यवहारात शाहूंनी ब्राह्मणी व्यवस्थेशी केलेल्या संघर्षात बडोद्याने दिलेले ‘बळ’ अधोरेखित होते. हे बळ शाहूंच्या एकाकी झुंजीत ‘देवदूता’चे काम करणारे ठरले. कोल्हापुरातील आणि पुण्यातील ब्राह्मण समुदायाशी वेदोक्तापासून चालू असलेला शाहूंचा संघर्ष त्यांच्या मृत्यूपर्यंत अखंड सुरू होता. याचा परिणाम म्हणून कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला मुंबई विद्यापीठाची कायमस्वरूपी मान्यता मिळत नसल्यामुळे राजर्षी शाहू अस्वस्थ होते. मृत्यूपूर्वी दोन महिने म्हणजे 23 मार्च 1922 ला त्यांनी ‘सयाजीरावांनी लक्ष घालून राजाराम कॉलेजला कायमस्वरूपी मान्यता मिळवून देण्याच्या कामात सहकार्य करावे. या कामी त्यांनी आपला प्रभाव वापरल्यास त्यांचा मी कृतज्ञ राहीन’ या आशयाचे पत्र सयाजीरावांना लिहिले होते. यानंतर लगेचच राजाराम कॉलेजला कायमस्वरूपी मान्यता मिळाली हे विसरता येणार नाही. याअगोदर राजाराम कॉलेज चालवायला घ्यावे, अशी विनंती शाहू महाराजांनी बडोद्याच्या खासेराव जाधवांना केली होती.

शाहू महाराज बडोद्याच्या धोरणांचा सातत्याने अभ्यास करून त्या धर्तीवर आपल्या संस्थानात योजना राबवत असल्याचा पुरावा 30 जानेवारी 1918 च्या पत्रात मिळतो. या पत्रात शाहू महाराजांनी बडोद्याच्या दिवाणांकडून सयाजीरावांनी लागू केलेल्या विवाह आणि जातीबाबत कायद्यांच्या पुस्तकांच्या काही प्रती मागवल्या होत्या. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सयाजीरावांवरील मृत्युलेखात म्हणाले होते की, बडोद्याचे कायदे हे इंग्लंड-अमेरिकेपेक्षाही पुढारलेले आहेत. राजर्षी शाहूंचे वरील पत्र आणि बाबासाहेबांचा अभिप्राय यांचे एकत्र वाचन केल्यास कोल्हापूर या प्रागतिक संस्थानाच्या सामाजिक धोरणांवरील बडोद्याचा प्रभाव स्पष्ट होतो. इतकेच नव्हे तर स्वतंत्र भारताची लोकशाही राज्यघटनेतील अनेक कलमेही बडोद्यातील कायद्यांशी सुसंगत आहेत. त्यामुळे स्वतंत्र भारतातील सामाजिक लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ म्हणूनसुद्धा सयाजीरावांचा विचार करणे अपरिहार्य ठरते.

मामा परमानंदांनी 1889 मध्ये सयाजीरावांना उद्देशून लिहिलेली खुली पत्रे म्हणजे सुधारणांचा ‘रोडमॅप’ होता. मामा परमानंदांनी सयाजीरावांना लिहिलेली ही पत्रे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झाली. शाहू महाराजांचे गुरु फ्रेजर यांनी हा ग्रंथ शाहू महाराजांच्याकडून वाचून घेतला होता. हे उदाहरण शाहू महाराजांच्या वैचारिक जडणघडणीवर आणि त्याच्या बडोदा संदर्भावर प्रकाश टाकणारे आहे.

प्रा.व.वा. देशमुख यांनी फुले-सयाजीराव- शाहू-आंबेडकर हे नवे वैचारिक प्रारूप स्वीकारण्याची गरज व्यक्त केली आहे. ते म्हणतात, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण, धर्मचिकित्सा, सामाजिक सुधारणांचे कायदे, विविध प्रकारच्या सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिक व कृषी सुधारणांच्या बाबतीत केलेले अलौकिक कार्य आणि राजा असूनही आपल्या वर्गीय हिताविरोधी बंड करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी झपाटलेल्या सयाजीरावांचे नाव फुले-शाहू-आंबेडकर चळवळीशी निगडित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला तर ते सत्याशी व इतिहासाशी सुसंगत ठरेल. पुरोगामी चळवळीने या चारही महामानवांच्या ऐतिहासिक कार्याचा विचार करून भविष्यात वाटचाल केली पाहिजे. गंगेचे अलाहाबादचे विस्तीर्ण पात्र पाहताना गंगोत्रीकडे दुर्लक्ष होऊ नये.  शाहू महाराजांच्या कार्याला बडोदा आणि सयाजीरावांकडून मिळालेली प्रेरणा, मार्गदर्शन, नैतिक पाठबळ आणि सहकार्य हे वादळातील दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले हेसुद्धा आपण दिलदारपपणे स्वीकारण्याची गरज आहे.

‘दिलदार’ शाहू महाराज

बडोद्याच्या राज्यकारभारासंदर्भात शाहू महाराजांनी दिलदारपणे दिलेली कबुली आजही आपल्यासाठी ‘दिशादर्शक’ आहे. यासंदर्भात ‘एका शिपायाचे आत्मवृत्त’ या आपल्या आत्मचरित्रात बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे लिहितात, ‘‘आमच्या राज्यकारभारातील उत्तम राज्यकारभार पाहून कोल्हापूरचे महाराज म्हणत असत की, तुमच्या राज्यकारभारास उत्तम सर्कशीचा मोठा तंबू, त्यामध्ये खुर्च्या, बाके, रिंगा वगैरे सामान, उत्तम रिंगमास्तर व काम करणारी उत्तम जनावरे व खिलाडी लागतात; परंतु आमचा राज्यकारभार म्हणजे माळावरील कोल्हाट्याचा खेळ. नुसते ढोलके वाजविले की, काम झाले. आम्हाला तुमची केव्हाही बरोबरी करता येणार नाही.’’ हा पुरावा थेट शाहू महाराजांच्या कथनातील असल्यामुळे त्यातून निघणारा निष्कर्ष निसंदिंग्ध ठरतो.

सयाजी-शाहू पुरोगामी ऋणानुबंधाचा नेमका, सुस्पष्ट आणि अस्सल पुराव्याचा इतिहास सहज उपलब्ध असताना आपल्या अभ्यास परंपरेने तो समजून का घेतला नाही, याचे उत्तर आता शोधावेच लागेल. कारण सयाजीरावांच्या इतिहासाचे पुनर्वाचन आता होऊ लागले आहे. परिणामी महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेच्या मनात हे संबंध अंधारात का राहिले? असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. अशा प्रश्नांचे समाधानकारक उत्तर जर आपण दिले नाही तर आपला पुरोगामी इतिहास संशयाच्या भोवऱ्यात सापडेल.   

(26 जून ही शाहू महाराजांची जयंती, त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध केला आहे. संपादक)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिनेश पाटील
dineshpatil1942@gmail.com

समाजशास्त्र विभाग प्रमुख- यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके