डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कुणी 'सुनंदा अवचट' विस्कटलेली घरं उभी करते 
देतात दिलासा कुणी 'अभय बंग'
धीर देतो कुठला 'आमटे' परिवार
भोवतालच्या कोलाहलात

माझ्या नातुले पोतुले,
आनंदतो जीव तुला बागडताना पाहून आठवतं 
स्वतःचं नातवंडपण

आणि साठ वर्षांतील उलथापालथ बघून 
कासावीसही होतो जीव

पण छकुले, माझ्या नातुले पोतुले
एक नक्की
ही जी तोंडं पेपरात दिसतात
रोज सकाळची
किंवा
‘खुळ्या पेटीतून' ऊठसूट डोकावतात
जे मख्ख चेहरे ('महात्म्याला पाठीशी घेऊन )
त्यांना नाही घ्यायचं मनावर.
(गुंतलेत ते सगळे गळा धरण्यात दुसऱ्याचा आणि सोडवून घेण्यात स्वतःचा)

आपल्या सुदैवानं
देशाचं गाडं सुरळीत राखण्याशी 
त्यांचा सुतराम् संबंध नाही.

लाखो राबणारे हात
आणि शिस्तीने चालणारे पाय
'चालविती हाती धरूनी' आपल्याला

कुणी 'सुनंदा अवचट' विस्कटलेली घरं उभी करते 
देतात दिलासा कुणी 'अभय बंग'
धीर देतो कुठला 'आमटे' परिवार
भोवतालच्या कोलाहलात

लावतात आपापला सुरेल, स्वच्छ षड्ज
 कित्येक 'कुमार', 'किशोरी' आणि पंडितजी' 
बरसत अमृतकण आसमंतात.

कुणी कारंथ, शरदबाबू, प्रेमचंद
महादेवी, मर्ढेकर
होत आलेत व्याकुळ सदैव
जे जन्मले व मेले त्यांच्यासाठी.

आपल्या प्रयोगशाळेत स्वतःला कोंडून घेणारे वैज्ञानिक
नक्षत्रांशी संवाद साधणारे जयंत नारळीकर.
असंख्य आहेत भोवती
त्यांच्या त्यांच्या परिसरात मग्न
(करताहेत देशाला मोठे तेच स्वतःबरोबर )

फार कशाला?
दारात रोज येणारी भाजीवाली
"बगून घ्या बाई
डेख न् डेख ताजा, पान न् पान कवळे हाय
फुकटचा नाय घेत जादा रुपाया" 
असं मेथीची जुडी देत
खणखणीत ठणकावते

तोवर कशाला करूं काळजी तुझी 
माझ्या सोनुले, नातुले पोतुले

Tags: दिलासा कविता दीपा गोवारीकर poem dipa govarikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके