डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोणतेही झाड हे एक कलापूर्ण बांधकाम असते!

सुंदरलाल बहुगुणांचे चिपको आंदोलन भारतभर गाजले. वृक्षांचे जतन आणि जोपासनेचे महत्त्व मानवाने जाणले. वृक्ष अमाप तोडीमुळे जंगले, वने नाहीशी झाली. पर्यावरणाचा तोल बिघडला. अनेक प्रश्न उभे राहिले भस्मासुरासारखे. ग्लोबल वॉर्मिंगचे महाभयानक संकट पृथ्वीवर ओढवले. माणूस उशिरा का होईना जागा होतो आहे, शहाणा होतो आहे, असे चित्र दिसू लागले. नवी झाडे लावणे सुरू झाले. वृक्षतोडीला बंदी आली. आहेत त्या झाडांचे संवर्धन करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. तरीही अजून रस्ता रुंदीकरणासाठी हजारो भरदार वृक्ष तोडले जातच आहेत. इमारती बांधण्यासाठी टेकड्या बोडक्या केल्या जाताहेत. बंगल्यांच्या जागी फ्लॅट उभे करण्यात भोवतालच्या वनराईचा चेंदामेंदा केला जातो आहे... आणि गीत अडथळा होतो व कचरा पडतो म्हणून उच्चभ्रू समाजातले, उच्चशिक्षित समंजस नागरिक भव्य प्रचंड गुलमोहराचा विस्तार तोडून त्याचे एकच फांदी असलेले25/30 फूट उंचीचे केविलवाणे खोडशिक ठेवण्यात धन्यता मानताहेत.

डिसेंबर महिन्याची दुपार. कुठंतरी पाऊस झाला होता. त्याचा गारवा हवेत होता. उन्हाचा पत्ता नव्हता. अशा दुखऱ्या हवेत अस्वस्थ वाटतं. जेवणं आटोपली होती. ‘द कंट्री डायरी ऑफ ॲन एडवर्डियन लेडी’ हे एडिथ हॉल्डन या निसर्गप्रेमी बाईचं पुस्तक मी वाचत होते. 1906 सालीबार्इंनी शब्दांत आणि चित्रात पकडलेले निसर्गाचे अद्‌भुत आणि रमणीय रूप. ब्रिटिश कंट्रीसाईडचे बदलते ऋतुचक्र. अप्रतीम जलरंगचित्रे आणि टाकाने लिहिलेला भावस्पर्शी मजकूर. एखाद्या प्रसन्न पहाटेसारखे हे पुस्तक चित्तवृत्ती उल्हसित करणारे होते. माझे हे आनंद वाचन बाहेरून लयबद्धपणे येणाऱ्या ‘काड्‌काड्‌काट्‌...’ अशा आवाजाने विस्कटून गेले. तो कठोर आवाज मनावर घाव घालू लागला.

पुण्याच् डेक्कन जिमखाना भागात भर दुपारी असे काड्‌काड्‌ आवाज येतात. हातात उंच आकड्या घेऊन बंगल्यांच्या बागेत वाढलेल्या आंबा, पेरू, रामफळ, जांभूळ, शिरीष, गुलमोहर वृक्षांच्या वाळलेल्या फांद्या काढून त्या जळणासाठी गोळा केल्या जातात. कटाकटा मोडून त्यांचे भारे बांधणारी बाया, पोरे, बापे दिसतात. समजावलं, हटकलं, रागावले तर तात्पुरते निघून जातात. पुन्हा तासाभरात दुपारच्या शांत वातावरणाला चरे पाडणारे आवाज सुरू होतात.

पुस्तकात खूण घालून मी उठले. बाहेर येऊ न पहाते तो शेजारच्या गुलमोहरावर सुमारे 40 फूट उंचावर एक माणूस चढून फांद्यावर घाव घालत होता. खाली रस्त्यावर पक्ष्यांच्या पिसासारख्या हिरव्या गारपानांची आणि ओल्या जखमी फांद्यांची गर्दी झाली होती. त्याच्या भोवतालीवर पाहणारे दोन गडी उभे होते. रस्त्यावर वाहतूक नेहमीप्रमाणे चालू होती. पायी चालणारेही येत -जात होते. नेहमीच्या आणि आजच्या या रहदारीत थोडा फरक होता. झाड तोडताहेत हे दिसल्या वर आपल्या अंगावर काही पडत नाही ना, हे क्षणभर थबकून पाहून प्रत्येक जणपुढे जात होता एवढेच. ज्या फांद्या धडावेगळ्या केल्या जात होत्या , त्याच्या जवळच तिसऱ्या मजल्यावरच्या गीत एक गृहस्थ कमरेवर दोन्ही हातठेवून झाडाचे शिरकाण वर मान करून लक्षपूर्वक पाहात होते.

आमच्या घरासमोर एक आणि कुंपण संपल्यावर लगेच शेजारच्या इमारतीपाशी असे हे दोन गुलमोहर जुळ्या भावंडांसारखे गेली काही वर्षे फांद्यांचा प्रचंड विस्तार घेऊन डौलाने उभे होते. डोळ्यांना आल्हाद देत होते. साळुंक्या, मैना, बुलबुल असे पक्षी त्यांच्या गार सावलीला येऊ न मंजुळ शब्द करायचे. आजूबाजूच्या घरांमुळे, सावलीमुळे हे दोन्ही वृक्ष बरेचसे रस्त्यावर झुकले होते. थकले भागले मजूर, मोलकरणी, यांच्या छायेला विसावायचे. शाळेतली पोरे कोंबडा का कोंबडी विचारत फुले गोळा करायची. कोरी सुरेख गाडीमाच्या सावलीला लावून ड्रायव्हर मंडळी सीट मागे करून निवांत ताणून द्यायची. मार्च महिन्यात ही झाडे भगवी व्हायची अन्‌ फुलांच्या सड्याने जाणाऱ्या येणाऱ्याना मखमली पामघड्या घालायची.

वडील म्हणायचे, ‘कोणतेही झाड म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने एक कलापूर्ण बांधकाम असते.’ खोडाची जाडी, फांद्यांचा विस्तार. डहाळ्या, एकंदर उंची झाडाला मिळालेला तोल, आकार, जमिनीतल्या मुळ्यांची जाडी आणि विस्तार लक्षपूर्वक पाहिला तर यामागे उत्तम रचना आहे हे ध्यानात येते. एखादी फांदी जरी आपण तोडली तर सगळा तोल बिघडतो.

आणि ही मंडळी एखादीच नाही तर अनेक फांद्या छाटत होती. काय प्रकार होता? सवयीने ठाऊक झाले होते की मधूनमधून महानगरपालिकेची मंडळी वीजेच्या तारांना फांद्या अडचण करतात, म्हणून झाडे छाटायला यायची. वडील फार संतापायचे. अधिकाऱ्याना फोन करायचे अन्‌ आमचे वृक्ष अबाधित राहायचे.

‘तुम्ही महानगरपालिकेचे लोक आहात का?’

मी चौकशी केली.

‘नाही. हे वर साहेब उभे आहेत त्यांनी बोलावलंय. त्यांच्या गीत फांद्या येतात. पानांचा कचरा पडतो.’

‘पण मग त्यासाठी जवळजवळ निम्मे झाड उतरवलेय तुम्ही.’ मी ओरडले. लक्षात आले की ज्याचे झाड आहे तो मालक, ज्यांना या झाडाने सावली दिलीय तो शेजार सारे घरात चिडीचूप आहेत. रस्त्यावरून  जाणाऱ्यातला कुणी पर्यावरणवादी यांना अडवत नाही. कचरा पडतो म्हणून झाडच तोडायचे? मुलाने मांडी ओली केली तर मांडीच कापण्यासारखा हा प्रकार नाही का?

लहानपणी वाचलेली बिष्णोर्इंची कथा आठवली. राजस्थानच्या मरूभूमीत घडलेली ही कथा. राजाच्या महालासाठी लाकडे हवीत म्हणून हुकूम सुटला. राज्यातल्या एका खेड्यात बरीच झाडे असल्याची माहिती मिळाली. प्रधानाने झाडे कापून लाकडे आणण्यासाठी लोक पाठवले. गावातल्या लोकांनी पावसाचा अभाव असलेल्या कोरड्या वालुकामय जमिनीत थेंबथेंब पाणी वाचवून ती झाडे जगवली, वाढवली होती. लेकरांसारखी माया होती आपल्या वृक्षांवर त्यांची. ते वृक्षतोडण्याचा राजाचा हुकूम झाला हे कळल्यावर सारे गावकरी चिंतेत पडले. साऱ्यानी एकत्र येऊ न शपथ घेतली की ‘राजहुकूमाची तोहीम झाली तरी हरकत नाही. प्राणांची बाजी लावू अन्‌ ही पोटच्या पोरांइतकीच प्रिय झाडे वाचवू. लाकूड नेण्यासाठी आलेली राजाची माणसे गावकऱ्यानी परत पाठवली. प्रत्यक्ष राजाज्ञेचा अवमान एका छोट्या गावानं करावा म्हणजे काय? प्रधान संतापला. त्याने पुन्हा कुऱ्हाडी घेऊन माणसं पाठवली. बरोबर सैनिकही पाठवले. सैन्यासह वृक्ष तोडायला लोक आले म्हटल्यावर सारा गाव एकेका वृक्षाला मिठी मारून उभा राहिला. ‘पहिला घाव आमच्यावर बसेल मग झाडांवर.’ त्यांचा निर्धार पाहून सैन्य कचरले. आलेल्या लोकांना कुऱ्हाडी उचलवेनात. मग मात्र प्रधान फारच संतापला. जातीनिशी तो हजर झाला. सेनापतीलाही त्याने सोबत आणले. आज्ञा सुटल्या... ‘झाडे तोडा, कुऱ्हाडी चालवा.’ सैनिक आज्ञा भंग करेल त्याच्यापाशी धारदार तलवार पाजळत उभे राहिले. आलेल्या कामगारांचा नाईलाज झाला. कुऱ्हाडी चालू लागल्या ,वृक्ष आणि त्याबरोबर गावकरी कोसळू लागले. हाहाकार उडाला. राजाला बातमी कळली, तशी त्याने घटनास्थळी धाव घेऊन हा संहार थांबवला. गावच्या मुखियापुढे राजाने क्षमायाचना केली. मुखियाने 10 वर राजाकडून मागून घेतले, त्यात वृक्षांचे संपूर्ण संरक्षण करण्याची अट या बिष्णोर्इंची होती.

सुंदरलाल बहुगुणांचे चिपको आंदोलन भारतभर गाजले. वृक्षांचे जतन आणि जोपासनेचे महत्त्व मानवाने जाणले. वृक्ष अमाप तोडीमुळे जंगले, वने नाहीशी झाली. पर्यावरणाचा तोल बिघडला. अनेक प्रश्न उभे राहिले भस्मासुरासारखे. ग्लोबल वॉर्मिंगचे महाभयानक संकट पृथ्वीवर ओढवले. माणूस उशिरा का होईना जागा होतो आहे, शहाणा होतो आहे, असे चित्र दिसू लागले. नवी झाडे लावणे सुरू झाले. वृक्षतोडीला बंदी आली. आहेत त्या झाडांचे संवर्धन करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले.

तरीही अजून रस्ता रुंदीकरणासाठी हजारो भरदार वृक्ष तोडले जातच आहेत. इमारती बांधण्यासाठी टेकड्या बोडक्या केल्या जाताहेत. बंगल्यांच्या जागी फ्लॅट उभे करण्यात भोवतालच्या वनराईचा चेंदामेंदा केला जातो आहे... आणि गीत अडथळा होतो व कचरा पडतो म्हणून उच्चभ्रू समाजातले, उच्चशिक्षित समंजस नागरिक भव्य प्रचंड गुलमोहराचा विस्तार तोडून त्याचे एकच फांदी असलेले25/30 फूट उंचीचे केविलवाणे खोडशिक ठेवण्यात धन्यता मानताहेत.

Tags: ज्ञानदा नाईक कोणतेही झाड हे एक कलापूर्ण बांधकाम असते! आणि मृगाचा पाऊस आला... weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके